मायबाप सरकार

Submitted by सिद्धार्थ राजहंस on 21 October, 2009 - 12:11

दिगू आज सकाळी लवकर उठून प्रवासाला निघाला होता. तो पुणे विद्यापीठात समाजशास्त्राचा दुसऱ्या वर्षाला होता. तसेच अधून मधून थोडे सामाजिक काम पण करी. आपण जे काही शिकतो आहे त्याच्याविषयी अधिक जवळून जाणून घेण्याची त्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने त्याच्या एका काकांतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील तात्या पाटील नामक एका नेत्याची अनौपचारिक भेट घ्यायचे ठरवले होते. त्याच्या काकांचे ते सख्खे मित्र. प्रवास सुखद चालू होता. वातावरण थोडे ढगाळ होते.

लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य.त्यात काय एव्हड?? म्हणजे त्याचं काय आहे की आधी राजेशाही होती, त्यावेळी राजा म्हणेल तिच पूर्व दिशा समजली जायची. राजाच्या मृत्यूनंतर राजाचा मुलगा परत राजा व्हायचा. राजाचा धर्म तोच प्रजेचा धर्म , राजाची भाषा तिच प्रजेची भाषा. राजा म्हणेल तितका कर जनतेला भरवा लागे. बदल्यात तो प्रजेचे रक्षण करे, म्हणजे करेच असे काही नाही पण करावे अशी अपेक्षा असे. तसेच कुणापासून रक्षण हा पण एक महत्त्वाचा मुद्दा.

दिगुच्या डोक्यात विचार गाडीतून दिसणार्या झाडांप्रमाणे पळत होते. यंदाच्या अवेळी पावसाने ओढे नाले ऑक्टोबरमध्येपण भरून वाहत होते.ऊसाचे ठीक होते पण इतर पिकांची पार रया गेली होती.
कंडक्टरने पूर्णं पैसे घेऊन कमी पैशाची तिकिटे दिली होती. दिगूच्या ते लक्षात आले पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. कशाचेच काहीही न वाटणे, अपराधीपणाची भावना नसणे, हे लोकशाहीचे मूलभूत लक्षण ? दिगुच्या डोक्यात विचार चमकून गेला. त्याच्या अभ्यासाच्या नादाने त्याला आता एकंदरीत बऱ्याच गोष्टींचा मुळापासून विचार करावा लागत होता.
रस्त्यावर अनेक ठिकाणी प्रचाराचे बोर्ड लागले होते. शिवरायांना वंदन करून अनेक जण मत मागत होते. आजच्या राज्यकर्त्यांना आज परत शिवशाही आणायची आहे. 'शिवशाही' आजही लोकांच्या मनातील आदर्श राज्य आहे. त्याचे दाखले अजूनपण दिसत होते. तोपर्यंत गाडी स्टेशनात गेली. काकांचे मित्र जाधव दिगूला घ्यायला आले होते. त्यांनी त्याच्या राहण्याची व्यवस्था जवळच्याच एक हॉटेलात केली होती. दिगूची जाधवांशी थोडीफार ओळख होती. त्याने असेच बोलण्यास सुरुवात केली.
"काय जाधव? कशी काय म्हणते आहे तयारी?? कार्यकर्त्यांचा उत्साह काय म्हणतोय??"
"दरवर्षीप्रमाणे यंदाही जोरातच आहे, पैसाही झ्याक ओतला आहे सगळ्यांनी. १००० रुपये रेट आहे सध्या"
"हो का, म्हणजे यंदाही परत तेच सरकार येणार म्हणाकी..."
"तसंच म्हणायचं.."
"लोक खूश आहेत की काय?? पण रस्तेतर अजूनही खराबच आहे की"
"खूश बिश काय नाही..पण म्हसोबाला नाही सटवाई आणि सटवाईला नाही म्हसोबा तसं काहीतरी"
जाधव पुढे बरंच काय काय सांगत होते या वेळचे साखर कारखान्यातील राजकारण , एकमेकांना पाडण्यासाठी उचललेला विडा, पक्षातील बंडखोरी, नवीन शत्रू व मित्र आणि बाकीचे इतर राडे.
मागच्या स्टॉपवर दिगूने वर्तमानपत्र विकत घेतले होते. त्यामुळे त्याला एकंदरीत थोडीफार माहिती झाली होती. परत तो तात्या पाटीलांना भेटणार पण होता म्हणून त्याने सहज विचारले.
"पण तात्या पाटलांचे आणि सदा मोहित्यांचे कस काय तुटलं?? नात्यातले न ते??"
"पाटलांनी कुणाला कधी फुड येउनची नाही दिलं ना.. मोहित्यांचे सगळे उमेदवार यंदाच्या साखर कारखाना निवडणूकीत तात्यांनीच पाडले ना, परत मोहित्यांना यंदा तिकीट नाही मिळाले त्यामुळे तात्यांच्या एकदोन सभांना उपस्थिती सोडून त्यांनी काय बी नाय केलं"
“पण कितीही झालं तरीही तात्यांची मुस्सदेगिरी वाखाणण्याजोगी आहे, सगळ्यांना पुरून उरतील असे आहेत तात्या. त्यांच्या डोक्यात काय काय चालू असेल काही सांगता येत नाही” दिगूने आपल्याकडे असलेली माहिती पुरवली.
“तर उगाच का इतकी वर्षे राजकारणात हायत काय? लई जण आले आणि गेले”
"पण याचा शिंदेना नक्की फायदा होणार.." जाधवांना चावी द्यायच्या उद्देशाने दिगू म्हणाला.
"होईल की आपण नाय म्हणत नाही पण या नादात साखर कारखान्यातील ऊसाचा राडा यंदा पण होणार असं दिसतया, शेतकर्यांच नुस्कान "
"पण शेतकऱ्यांचा काय सं....." दिगूचे वाक्य अर्धवटच तुटले.
आपण राजकारणाविषयी बोलतो आहोत का लोकांविषयी?? दिगूच्या डोक्यात विचार चमकून गेला.
काय संबंध या दोन गोष्टींचा?? का आहे ?? बहुतेक नसावा.
राजकारण हा पश्चिम महाराष्ट्रातील माणसाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असे दिगूने एकले होते. त्याची साक्ष देत जाधवांचा अस्सल कोल्हापुरी भाषेत राजकारणाचा काथ्याकूट चालूच होता, पैज लावून कोण जिंकणार यावर भाष्य चालू होते.
दिगू नंतर त्याच्या खोलीवर आला व त्याने सगळी वर्तमानपत्रे वाचायला घेतली. अनेक ठिकाणी तात्यांच्या नेतेपणावर स्तुतिसुमने उधळली होती. तात्यांनी एकंदरीत सगळीस वर्तमानपत्रे मॅनेज केलेली दिसत होती. वाचता वाचता त्याची मधे तुटलेली विचारांची साखळी परत सुरू झाली.

एकंदरी समाजाला एखादा नेता हवाच असतो. चांगले वा वाईट दोन्ही गोष्टींची जवाबदारी घ्यायला. बऱ्याच वेळा तो त्या समाजातील सर्वात हुशार माणूस असतो म्हणूनतर तो लोकांवर राज्य करू शकतो. सत्ता हाती येताच अनेक लोक बदलतात. पण शिवाजीराजासारखा एखादाच सत्ता सांभाळू शकतो. त्याचे पाय जमिनीवर राहू शकतात. आणि लोकांचे कल्याण होऊ शकते. या राजाने लोकांचे संरक्षण केले, त्याने प्रजेच्या गरजा ओळखून त्यांचे खऱ्या अर्थाने पालनपोषण केले. शिवशाहीचा गुंता दिगुच्या डोक्यातून सुटू लागला होता. एक राजेशाही असूनही शिवशाही लोकांना का हवी आज ते कळत होते. पण असे शिवाजी काय प्रत्येक मतदारसंघात थोडीच होणार आहेत. विचार करता करता दिगूला झोप लागली.
सकाळी उठून दिगू मतदार संघाच्या दौऱ्यावर निघाला. अनेकांचे निवडणूक जाहीरनामे नजरेखालुन घालणॆ चालू होते. दरवर्षीप्रमाणॆ यंदाही २४ तास वीज, कर्जमाफी, पक्के रस्ते इ. होतेच. दिगूने दिवसभरात अनेक जनसामान्यांची मते घेतली. त्यांना पेन्शन, स्वस्त वीज, गॅस, पेट्रोल, मुलाबाळांना मोफत शिक्षण व रोजगाराची हमी हे सर्व हवे होते. एकाने कोणीही निवडून आले तेरीही ते सगळे चोर आणि स्वार्थी आहेत असे सांगितले दिगूला ते पटले नाही.
नंतर संध्याकाळी दिगूची तात्यांबरोबर भेट होती. पत्ता शोधत शोधत दिगू तात्यांच्या टोलेजंग बंगल्यासमोर आला. सर्वत्र धावपळ सुरू होती. मोठा मांडव घातला होता. तात्यांची मोठ-मोठी पोस्टर्स लागली होती. जीप ट्रॅक्स मधून प्रचाराचे लाउड स्पिकर्स जोरात सुरू होते. पत्रके वाटली जात होती. कार्यकर्त्यांसाठी समोरच्याच हॉटेलमध्ये खास मटणाच्या जेवणाची व्यवस्था केली होती. दिगूने तात्यांच्या सेक्रेटरीकडे जाऊन भेटीसंबंधी चौकशी केली. सेक्रेटरी आत खोलीत गेला.
१-२ मिनिटात दिगूच्या मोबाईलवर त्यांचा कॉल आला. पलीकडून एक भारदस्त आवाज ऎकु आला.
“हां, दिगू टिपणीस रात्री बसुयाकी ...म्हणजे कसं सगळं निवांत बोलता येईल. काय ते तुमचे प्रश्न बिश्न सगळं होऊन जाउदे की...कसं, शेवटी तुमच्या काकांना शब्द दिलाय काय”
“हो चालेल ना. काही प्रॉब्लेम नाही”
“ठिऽऽक आहे मग”
५-१० सेकंदाच्या बोलण्यातपण दिगूला तात्यांची माणसांशी संवाद करण्याची हातोटी दिसून आली. नंतर उरलेला वेळ गावात इकडे तिकडे फिरण्यात घालवून तो रात्री ११-११.३०च्या सुमारास तात्यांच्या बंगल्यावर पोचला. आचारसंहितेमुळे गावात सर्वत्र सामसूम होती. त्यांच्या से़क्रेटरीने दिगूला लगेच त्यांच्या बंगल्याच्या मागच्या बागेत पाठवले.
तात्या एका हाताची घडी घालून व एका हाताची दोन बोटे तोंडावर ठेवून खुर्चीत विचारमग्न बसले होते. आजूबाजूला ४-५ कार्यकर्ते कुजबुज करत होते. दिगू आल्याचे बघताच तात्या कार्यकर्त्यांना म्हणाले, “हम्म चला आता आजच्यापुरते बास झाले, उद्याचे उद्या बघू. काय नाही जमले तर बार उडवून टाकू कसं” सगळे कार्यकर्ते हसले व निघू लागले.
जाता जाता एक जण थंडपणॆ परत आला व तात्यांच्या कानात काहीतरी कुजबुजला.
तात्यांनी नीट लक्ष देऊन ऎकले व म्हणाले, “बरोबर आहे तुमचे तेच करावे लागणार, बघा कसं जमतंय”.
दिगू या सर्वांचे संपेपर्यंत शांतपणॆ खुर्चीत बसून तात्यांचे निरीक्षण करीत होता. तात्यांचे व्यक्तिमत्त्व चांगले भारदस्त होते. त्यांनी करड्या रंगाची सफारी घातली होती. खिशातून एक सोनेरी पेन चमकत होता. थोडीशी स्थूल अंगकाठी, उन्हात रापलेला तांबूस चेहरा, डोक्यावर विरळ होत चाललेले केस, धारधार नाक आणि त्यावर बारीक सोनेरी काड्यांचा मोठा चष्मा. सर्वजण निघून गेल्यावर तात्यांनी एक क्षणभर स्वतःशीच विचार केला व नंतर हसत म्हणाले,
“बोला दिगूसाहेब हे ऎन निवडणुकांच्यावेळीच काय अभ्यासाच काढलय म्हणलं? बाकी तुम्ही लोक अभ्यास नाही करणार तर आणि कोण करणार म्हणा.”
“काय आहे, तुम्ही नेतेलोक निवडणुका सोडून इतर वेळी भेटत नाही ना म्हणून म्हणल आत्ताच भेटून घ्यावं” दिगूचे तरुण रक्त बोलून गेले. संध्याकाळपासून थांबून दिगू पार कंटाळून गेला होता.
तात्यांना दिगूचे बोलणे फारसे रुचले नाही. त्यांनी दिगूकडे फक्त एक कटाक्ष टाकला व शांत बसून राहिले.
दिगूने मग सरळ विषयाला सुरुवात केली.
“यावेळची निवडणुक कोण जिंकणार तुम्हाला काय वाटते?”
“एक मिनिट, तुमच्या खिशातला मोबाईल, पेन सगळं काढून ठेवा इथे समोर, बॅग तर नाहीच आहे तुमच्याकडे. त्याचे काय आहे, आजकाल कोणावर विश्वास नाय ठेवता येत..”
दिगूने तात्यांच्या म्हणण्याप्रमाणे केले. तात्यांनी दिगूचा मोबाईल सुरू नसल्याची खात्री केरुन घेतली.
व म्हणाले “हां काय म्हणत होता तुम्ही, हां आम्हीच जिंकणार की, बाकी महाराष्ट्राचं माहीत नाय पण आमच्या आमदारसंघात तरी आम्हीच जिंकणार की” तात्या शक्य तेव्हडी शहरी मराठी बोलण्याचा प्रयत्न करत होते.
“तुम्हाला पूर्णं खात्री आहे? तुमच्या यावेळच्या जाहीरनाम्यात रस्ते, वीज या नेहमीच्याच गोष्टी आहेत. गेल्या खेपेला तुम्हीच सत्तेवर होता. परत तुमच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप. लोक तुम्हाला आत्ता निवडून देतील?”
“हे बघा तुम्ही काय पत्रकार नाही, त्यामुळे मी स्पष्टच बोलतो. हि लोकशाही आहे, म्हणजे लोकांचे राज्य, लोक निवडून देतील तोच नेता. त्यामुळे लोकांनी कुणाला निवडून द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे. आणि निवडणुका कोण जिंकणार हे माझ्या मते तुम्ही म्हणता त्या गोष्टींवर फारसे अवलंबून नसते. तुमची मतदारसंघातील टोटल पावर, बरोबर असलेले इतर राजकारणी लोक, विरोधकांची एकजूट आहे का नाही आणि केलेली इतर कामे यावर असतं सगळं”
“तुम्हीच म्हणालात की केलेली कामे..”
“केलेली कामे म्हणजे आमच्या साखर कारखान्यात नोकऱ्या, दुधाचे ऊसाचे भाव वैगेरे. आता रस्त्याचं द्या सोडून पण वीज आहेच की आत्ता चोवीस तास, निवडणुका संपल्या की चालू होईल भारनियमन !!” तात्या हसत-हसत म्हणाले.
दिगू थोडा शांत झाला व म्हणाला, “पण एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही वाटत तुम्हाला की लोकांच्या अपेक्षा पूर्णं करणे तुमचे कर्तव्य आहे?”
“कस आहे लोकांच्या अपेक्षा माप आहेत, त्यांना स्वस्त धान्यापासून ते नोकऱ्यांपर्य़ंत सगळे हवे आहे. आता दरवर्षी एखादी योजना काढतोच ना आपण, परवा कर्जमुक्ती आता २ रुपयाला तांदूळ गहू वैगेरे आहेच की ”
“पण यासाठी पैसा कुठून येणार?, तुमच्या मतांसाठी कर्ज काढणार ते परत लोकच्या पेश्यातूनच फेडणार. मतांसाठी राज्याला देशाला कर्जबाजारी करणे पटते तुम्हाला?”
“मग विकासाची कामं कशी होणार? आता नीट विचार करून बघा, स्वस्त धान्य देऊन काय होणार आहे, लोकांना चार घास सुखाने खाता येतील. समाजाचा सुखी होईल आहेच की नाही?”
तात्यांकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर होते. पण दिगू शांत बसणार नव्हता.
“मग या योजना राबवताना होणारा भ्रष्टाचार वैगेरे ?”
“आता त्याला आम्ही काय करणार. लोकच योजना राबवणार, प्रत्येकापर्यंत थोडा-थोडा पैसा जायला नको का ?” तात्या मिश्कीलपणे म्हणाले.
“पण यात तुमचा कोणताच सहभाग नसतो असे म्हणायचे आहे तुम्हाला?”
“आता खरं सांगू. आत्ताच्या निवडणुकीला एव्हडा पैसा आमचा खर्च झाला, होत आहे. पैसा उभा करणॆ ही वेगळी गोष्ट आहे. पण घातलेला पैसा परत कसा येणार? कुठून येणार हा पैसा? नाहीतर निवडणुका लढवता लढवता आम्हालाच २ रुपयाचा तांदूळ घ्यायला लागायचा कसं.”
तात्या आज जोरातच होते. आणि दिगूचा या कसलेल्या माणसापुढे बोलताना कस लागत होता. पण दिगूला थोडंफार समाधानही होते की हा माणूस कस काय कोण जाणॆ पण मनापासून खरे बोलत होता.
“मग तुम्ही हे सगळं का करता?”
“का करतो कारण आमचे बा पण हेच करायचे म्हणून, पण ते समाजकारण करायचे आणि त्यांनीच आम्हाला शिकवलं”
“समाजकारण करायचे म्हणजे?”
“समाजकारण म्हणजे पूर्वीच्या काळचे राजकारण. तेव्हा गांधींचा वैगेरे खूप प्रभाव होता ना म्हणून सरळ राजकारण नाही म्हणायचे!”
दिगूच्या चेहऱ्यावर बऱ्याच वेळाने एक मिश्किल छटा उमटली.
“नाही हसू नका. अस तेच म्हणायचे” तात्या म्हणाले.
“बरं. इथेल्या बऱ्याच लोकांवर तुमचा खूप जास्त प्रभाव आहे, काय वाटत तुम्हाला?”
“कसं आहे, तुम्ही कितीही काहीही म्हणा आम्ही आमच्या भागासाठी बरीच कामं केलेली आहेत. बऱ्याच लोकांच्या अनेक समस्या वैयक्तिक असूदे आम्ही सोडवल्या आहेत. लोक या गोष्टींचे उपकार मानतात.”
“पण हे तुमचे काम नाही?”
“काम आहे ना. पण कोणी कोणासाठी फुकट काही करत नसतो. का करावं त्यानं ना? दुसऱ्याला पण किंमत राहत नाही अशाने. आता साधंच बघा लोक कोणत्याही उमेदवाराला मतं का देतात कारण तो त्यांची कामं,अपेक्षा पूर्णं करेल म्हणून ना. काही लोक पैसे घेऊन मते देतात, सध्याचा रेट तुम्ही ऎकलाच असेल. मग लोक पण स्वार्थीच झाले की. त्यामुळे आम्ही कोणासाठी काही केलं तर हे बघतो की त्यांच्या लक्षात राहील ते. नाहीतर लोकांच्या पण विस्मृतीत जाते सगळे”
“पण कसं?”
“आता आजच सकाळी एके ठिकाणी गेलो होतो. कार्यकर्ते सांगत होते आमचा प्रभाव थोडा कमी होत आहे म्हणून. भेटलो तिथे एक दोन जणांना, विचारलं त्यांना त्यांच्या मुलाच आमच्या कारखान्यातलं काम कसे चालू आहे म्हणून. काय कळायचं ते कळलं त्यांना”
दिगूच्या डोक्यात त्याने मघाशी विचार केलेली गोष्ट चमकून गेली. नेता हा त्या समाजातील सर्वात हुशार माणूस असतो म्हणूनतर तो लोकांवर राज्य करू शकतो.
“म्हणजे तुम्ही स्वतः:हूनच बघता की लोक तुम्हाला मायबाप म्हणून डोक्यावर बसवतील. आणि त्याशिवाय त्यांना पर्यायच नाही”
“हा हे थोडंफार आम्हाला करावंच लागतं. बाकीच सगळं कार्यकर्ते बघतातच की. पण दुसरं कस आहे लोकांनापण डोक्यावर बसवायला कोणीतरी हवंच आहे ना. आम्ही नाही तर दुसरे कोणी. मग आम्ही का नको?”
दिगू पुर्णपणे सुन्न झाला होता. काहीतरी विचारायचे म्हणून त्याने विचारले.
“ठीक आहे. किती महत्त्वाची आहे आताची निवडणुक तुमच्यासाठी?”
“खूपच महत्त्वाची. सद्या हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. विरोधी पक्षाच्या हाय कमांडने आम्हाला हरावयाचंच ठरवलं आहे. बक्कळ पैसा ओतला आहे. त्यामुळे खूपच महत्त्वाची. आमची अंतर्गत बंडाळी संपलेली आहे. पुढचे पुढे बघू”.
बोलता बोलता तात्या उठले, दिगूपण उठला.
आणि तात्या म्हणाले, “तुम्ही विचारायच्या आधीच सांगतो. सध्याचा आठवडा लई टेन्शनचा गेला आहे. निवडणुक जिंकायचीच आहे. कितीही म्हणलं तरी आमची एक राजकारणी म्हणून काही तत्त्वे आहेत त्यांच्याशी तडजोड नाही करायची आहे. पण कधी कधी इलाज नसतो. तुमच्याशी बोलून मनावरचा ताण हलका झाला. म्हणून कदाचित एव्हड खरं मी बोललो असेल. बाकी काही नाही.”
दिगू कसेबसे हात जोडून “धन्यवाद” म्हणून पुटपुटला आणि तात्यांच्या घराबाहेर पडून सोडियमच्या पिवळ्या प्रकाशातून रस्त्यावर चालू लागला.
दुसऱ्या दिवशी गाव सोडून निघताना गावात एकंदरीत तंग वातावरण दिसले. पोलिसाचीही संख्या वाढलेली दिसली. जाताना स्टेशनवर त्याने वर्तमानपत्र विकत घेतले. मुख्य बातमी वाचली की काल रात्री तात्यांच्या समर्थकांनी त्यांचे विरोधक शिंदेवर गोळीबार केला. गोळीबारात शिंदे बचावले पण गाडीचे नुकसान झाले आणि गोळी लागून त्यांचा ड्रायव्हर सदाशिव माने जागीच मृत्यू पावला. त्याने भराभर घटना घडल्याची वेळ पाहिली. रात्री साधारण ३ वाजता. म्हणजे..म्हणजे त्याच रात्री २ तासापूर्वी तो तात्यांना भेटला होता...........
दिगूला भोवळ आल्यासारखे झाले.
आपल्या घरी तो पोचला. पोलिसापैकी कोणीही त्याला २-३ दिवसात तो तात्यांच्या बरोबर हजर असल्याची साक्ष देण्यास बोलवले नाही. पुढील ४-५ दिवसांमधील बातम्यांमधून हे स्पष्ट झाले की एकंदरीत तात्या या प्रकरणातून सुटले होते. त्यांच्या २-३ समर्थकांवर खुनाचा खटला चालणार होता.........
दिगू पुढचा महिनाभर एकच आशा बाळगून होता. तो महिना त्याने कसाबसा घालवला.
शेवटी त्याला हवा होता तो दिवस आलाच, निवडणुकांचे निकाल लागले.
तो डोळ्यात प्राण आणून टीव्हीकडे बघत होता.
त्याच्या डोळ्यात एक अतीव निराशा झळकली, तात्या निवडणूक जिंकले होते.
त्याच्या डोक्यात एकच गोष्ट येऊन गेली.
लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य.
समाप्त

गुलमोहर: 

लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य.
समाप्त..............
हम्म........... ३५-५० टक्के मतदान करणार्‍यांच बहुद्धा.....

Madhukar.77, champak आणि zakasrao प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!