नशीब त्यांचे - भाग १५

Submitted by विनायक.रानडे on 12 October, 2009 - 08:49

माझा एक जवळचा नातेवाईक वीज तंत्रज्ञानाचा पदवीधर होता. एका नावाजलेल्या संगणक कंपनीत ग्राहक सेवेत काम करीत होता. आम्हा सगळ्यांना त्याचे खूप कौतुक होते. १९७३ चा हा प्रसंग आहे. एका शनीवारी मी नेहमी प्रमाणे त्याच्या घरी गेलो होतो. त्याच्या गाडीतून एक वस्तू घरात आणण्या करता मी त्याला मदत केली. त्या वस्तूचे नांव होते मॅगनेटीक कोअर मेमरी - चुंबकीय स्मृती. फेराईट चुंबकीय धातूचा मणी त्यातून तीन तारा ओवलेल्या होत्या. एका तारेने माहिती लिखाण, दुसर्‍या तारेने माहिती वाचन व दिसर्‍या तारेने ह्या मण्याचा स्मृती क्रमांक, असे ६४ X ६४ मण्यांची एक चौकट, अशा १० ते २० चौकटींचे एक स्मृती साधन ज्याचा वापर त्या काळात संगणकात होत असे. त्यातील एक निकामी झालेली चौकट त्याला बदलायची होती. शुक्रवारी ते स्मृती साधन निकामी झाले होते. सोमवार शिवाय नवीन साधन मिळणार नव्हते. ह्या नातेवाईकाला माझी मदत घेऊन ते साधन दुरुस्त करून कमी वेळात संगणक सुरू करण्याची धाडसी कल्पना सुचली होती. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍याची शाबासकी मिळवायची होती.

mcm 1.jpg
चुंबकीय स्मृती चौकट मेन फ्रेम संगणात वापरात होती. ( मॅगनेटीक कोअर मेमरी मॉड्युल )

mcm 2.jpg
चुंबकीय फेराईट धातु मण्यांचा स्मृती म्हणून उपयोग होत असे.

हे त्याने मला न सांगता, मी जर हे काम करू शकलो तर ह्यापुढे तो असे काम मला मिळवून देईल, त्या कामाचा मोबदला काही हजार असतील व असे महिन्यातून पाच सहा प्रसंग घडतात, शिवाय माझे काम आवडले की इतर कामे सुद्धा मिळतील. मला त्या काळात महिन्याला ७०० रुपये पगार मिळत होता त्या तुलनेत काही हजार महिन्यात जास्तीचे मिळतील, फार चांगली संधी होती. मी दोन तासात निकामी स्मृती चौकटीच्या ४०९६ तारांचे जोड काढून नवीन चौकटीच्या ४०९६ तारांची जोडणी पूर्ण केली.

वाचक हो फेकाफेकी वाटते ना ? वाटणारच, एसेस्सी झालेला, संगणक अनुभव नसलेला एक मुलगा असे करू शकणे शक्यच नाही. पण हे घडले. त्या वस्तूची चाचणी करणे आवश्यक होते. त्याचे दोन मित्र ते काम बघायला त्याच्या बरोबरीने ती वस्तू घेऊन गेले. त्या नंतरच्या शनवारी नेहमी प्रमाणे नातेवाईकाला मी भेटायला गेलो, पैसे मिळतील अशी खुळी कल्पना करीत दार वाजवले. दार त्याच्या मित्राने उघडले, आत इतर मित्र पण जमले होते. सगळ्यांनी माझे कौतुक केले. बदल केलेल्या स्मृती चौकटीने संगणक व्यवस्थित काम करीत होता असे कळले. मी पैशाचा विषय काढण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकाची बायको पुढे धावली व खाण्याचे पदार्थ पुढे करीत विषय टाळला. मला चूप बसण्याचा इशारा केला.

मी दुसरा विषय सुरू केला. संपूर्ण स्मृती चौकट एक दोन भाग निकामी झाल्याने बदलण्यापेक्षा एकेक स्मृती भागाची छोटी पट्टी बनवून बाहेरून जोडली तर संगणक फार कमी वेळात सुरू करणे शक्य होईल. सगळ्यांना कल्पना एकदम पटली सगळ्यांनी चाचणी करण्याचे ठरवले. मी बरेच दिवस माझ्या नातेवाईकाला पैशा बद्दल विचारले, त्या सूचनेचे पुढे काय झाले ? त्याने कंटाळून एकदा सांगून टाकले, कंपनीचे काम बाहेरून करून घेणे कंपनीला मान्य नव्हते. एकाबाबतीत माझा विश्वास वाढला. शिकवलेल्यांना दुसर्‍याला फसवण्याचा परवाना असतो.

एकदा सगळे नातेवाईक एकत्र जमलो होतो. ह्या नातेवाईकाने मोठ्या दिमाखात एक पत्र वाचून दाखवले. स्मृती साधनाची यशस्वी दुरुस्ती व फार चांगली महत्त्वाची सूचना त्याचे ते प्रशस्तिपत्र होते व त्या सोबत एक जोडलेली रक्कम होती. ती त्याने वाचून दाखवली नाही. मी ते काम केले होते असे पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला, कोणी ते मान्य केले नाही. असो अशी प्रशस्तिपत्र / रक्कम मिळणे व न मिळणे असते एखाद्याचे नशीब - भेटू भाग १६.

नशीब चे १४ भाग वाचण्या करता ह्या दुव्याला भेट द्या. - विनायक उवाच http://vkthink.blogspot.com -

गुलमोहर: