असेही योगायोग - वस्तू लुप्त योग

Submitted by दाद on 30 January, 2008 - 19:33

काय्ये... आपली... म्हणजे माझी आणि तुमची नाही. तर... मानव जातीची झेप लांबवर पोचायला लागल्यावर ग्रहमालेत नवीन नवीन ग्रहांची भर पडायला लागलीये.
जावयाचं स्थान दशमग्रहावरून बरंच खाली घसरलय असं ऐकून आहे. असो...
तर ह्यामुळेच काही नवीन योगांचा योगही अपरिहार्य आहे.... असं तुम्हाला नाही का वाटत? नसेना का... मला वाटतंय तितकं पुरे आहे.
तर... ह्या योगमालेतला पहिला योग....

वस्तू लुप्त योग...

हा योग सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी गुरूस्थानी आल्यासारखा येतोच येतो. 'आपल्याला हवी असलेली वस्तू गायब होणे' इतका साधा आणि वरवर गरीब वाटणारा हा योग आहे.

साधारणपणे चाळिसाव्या वर्षापासूनतर कधीही हा राशीला येऊ शकतो. शरीर शास्त्राच्या परिभाषेत ह्याला 'विस्मरण' असं गोंडस नाव देण्याचा प्रयत्नं केला आहे.

आत्ता तर इथे होता अथवा होती... हा वाक्प्रयोग वारंवार होऊ लागतो आणि तो चष्म्यापासून, बायकोपर्यंत, फायलीपासून आगगाडीपर्यंत आणि वेलीवरच्या फुलापासून अख्ख्या टेकडीपर्यंत कशालाही लागू होतो.

ह्या योगाच्या चक्रात अडकलेल्या माणसांचे हात, पाय त्यांच्या धडाला चिकटलेले असल्यास फक्त जाग्यावर राहू शकतात बाकी समस्तं दुनिया हरवण्यात गुंतलेली असते आणि हे शोधण्यात.

ह्या माणसांच्या बायका, 'इथेच थांब, कुठेही हलू नकोस. मी आत्ता तिकिटं घेऊन येतो' ह्या दरडावणी किंवा विनवणीनंतरही, 'अय्या, अस्साच रंग हवा होता मला परवा' असं स्वत:शीच म्हणत जवळून गेलेल्या अपरिचित महिलेच्या मागे प्लॅटफ़ॉर्म नंबर एक वरून तीनपर्यंत, तिला 'कौनसे दुकानमेसे लिया ये?' असं विचारायला जातात. तिकिट खिडकीच्या मेणचटलेल्या लाकडी फळीवर ठेवलेली छत्री, ह्यांनी दोन पायात ठेवलेली ब्रीफकेस, इ. वस्तू त्यांना स्वत:ला पाय असल्यासारख्या पळून जातात. रेस्टॉरन्टमध्ये खुर्ची ओढून हे बसू जातात तेव्हा ह्यांनी खुर्चीवरचे हात काढणे आणि बूड टेकणे ह्यामधल्या क्षणांत खूर्ची गायब होते.

ह्या योगाची लागण झालेला मनुष्य लगेच ओळखू येतो. पहिल्या प्रथम तो जवळ जवळ प्रत्येक गोष्टं चटकन, हाताशी, नजरेसमोर, अशीच ठेवतो. त्यामुळे ह्याचे शर्टं कमीतकमी चार खिशांचे असतात, पॅंटला चोरखिसे धरून सात तरी खिसे असतात. दाढीच्या ब्रश पासून लेंग्याच्या नाडीपर्यंत, आयोडेक्सपासून बुटाच्या लेसपर्यंत आणि फुगवायच्या उशीपासून फोल्डिंग चमच्यापर्यंत काहीही नको तेव्हा ह्याच्याकडे सापडू शकतं. आयत्या वेळी गायब होऊन शोधत बसायला नको म्हणून सगळ्या कुलुपांच्या चाव्या ते कुलुपांनाच लावून ठेवतात.

हा योग अगदी गुरूस्थानी नसल्यास, ह्यांना हरवलेल्या वस्तू सापडतात पण नको त्या, नको तेव्हा आणि नको तिथे. उदा. वाण्याकडे तेल आणण्यासाठी नेलेल्या पिशवीत धुवायला टाकायचा दुपारच्या जेवणाचा डबा, माशेवालीच्या हातात ठेवायला शंभराच्या नोटेऐवजी दुपारच्या सिनेमाच्या शोचं तिकिट. आंघोळ करताना काढून ठेवलेल्या चष्म्याच्या जागी साबणाच्या वडीचा कोळ.
घरात खिशात फुलपुडीच्या ऐवजी ऑफिसात शोधत होते ते टोपणाशिवायचं गळकं पेन, ऑफिसात दुसऱ्या खिशात साहेबांना द्यायच्या बाबांच्या अंगाऱ्याच्या पुडीऐवजी बायकोच्या केसाची क्लिप... ती ही बहुदा, हरवलेली बायको सापडली की परत द्यायला म्हणून हाताशी असावी म्हणून बाळगलेली.

ह्यांनी 'तुमच्या कडे नीट, व्यवस्थित, परत सापडेल अशा जागी ठेवा' म्हणून दुसऱ्याकडे ठेवायला दिलेली वस्तूही त्या माणसासकट गायब होते. पैसे, पासपोर्ट, दाग-दागिने इ. महत्वाच्या वस्तू तर हमखास.

ह्यांनी उगीच नेट्वर्क ट्रॅफिक नको म्हणून कंपनीच्या शेअर ड्राईव्ह वर वाचवलेली महत्वाची फाईल ड्राईव्हबरोबर पळून जाते. ह्या योगाच्या माणसांना 'तेलही गेले तूपही गेले' मधल्या हाती धुपाटणे घेऊन फिरणाऱ्या माणसाचा हेवा वाटतो कारण ह्यांचं धुपाटणंही गेलेलं असतं.

ही माणसं आगगाडीच्या रात्रीच्या प्रवासात बॅगेबरोबर स्वत:लाही एका साखळीने गाडीला जाम बांधून ठेवतात. न जाणो....
ह्या योगाचा फटका खाल्लेला माणूस त्याचं अख्खं घर आतल्या बायको, सासू सकट हरवून बसल्याचं ऐकण्यात आहे. एक दिवस ऑफिसातून परत येऊन दाराचे बेल वाजवावी तर वेगळीच बायको... आपलं बाई दार उघडते.

आपल्या ह्या योगाला कंटाळून जीव द्यायला गेलेली माणसं ज्याच्यावरून उडी मारायची ती बिल्डिंग किंवा टेकडी किंवा पूल हे सुद्धा 'आत्ता होतं'.... ह्याच गर्तेत हरवून बसतात.
ह्यांचं आयुष्य म्हणजे एक लपा-छपीचा खेळ असतो पण राज्य कायम ह्यांच्यावर... हाच योग.

गुलमोहर: 

तिकिट खिडकीच्या मेणचटलेल्या लाकडी फळीवर ठेवलेली छत्री, ह्यांनी दोन पायात ठेवलेली ब्रीफकेस, इ. वस्तू त्यांना स्वत:ला पाय असल्यासारख्या पळून जातात. वेगळीच बायको.. हरवलेली पिन..हरवलेली टेकडी..पूल (माझ्यासाठी कायम हरविणारा रस्ता पण जोडत आहे यात)..:):):):)
धुपाटणं माझं पण गेलं आहे गं Sad
राज्य कायम असतं ह्यांच्यावर... अगदी बरोबर Lol
(वस्तू लुप्त योग म्हणावं का? लोलूप हे सुखलोलूप व्यतिरिक्त वाचल्याचं स्मरत नाहीये.)

||माशेवालीच्या हातात ठेवायला शंभराच्या नोटेऐवजी दुपारच्या सिनेमाच्या शोचं तिकिट.||

||दुसऱ्या खिशात साहेबांना द्यायच्या बाबांच्या अंगाऱ्याच्या पुडीऐवजी बायकोच्या केसाची क्लिप||

जाम हसले मी वाचून............

>>>कंपनीच्या शेअर ड्राईव्ह वर वाचवलेली महत्वाची फाईल ड्राईव्हबरोबर पळून जाते

ही, ही, ही!!! :):) आणि जेह्वा तिची सगळ्यात जास्त गरज असते तेह्वाच पळून जाते!!! :):)

जमलंय बर्का. मस्तच एकदम. खूप योग सापडतील असे. अजून लिही. Happy
फाईल ड्राईव्हबरोवर पळून जाते. :)))
(हे मी आधी ड्राईव्हरबरोबर असं वाचलं. शिरिमंत लोकांच्या पोरी जातात असं नेहेमी वाचल्यामुळं असेल Happy )

धन्सं दाद. (मला कॉमेंट एडिटता येत नाहीये.)

झ़कास,अजून योग वाचायचा योग येउद्या!
वस्तू हरवण्याचा योग तर मला चाळीशि सुरु व्हायच्या कितीतरी आधीच आला.आता मनातले विचार आणि ़आयडीआ हरवण्याचा प्रकारही सुरु झाला आहे!

मस्त हं. हसून हसून पुरे वाट झाली. माझ्या बाबतीत (चष्मा, पेन, किल्ल्या) तर हे आजकाल नेहमीच घडू लागलंय. त्यामुळे मी सुद्धा किल्ल्या कुलुपाला लावण्याचाच विचार करतोय. Wink

सध्या मला नाव लुप्त योगाने ग्रासलय. ३-४ वर्षांनी एखादी व्यक्ती भेटली की बाकी सर्व आठवत पण नाव आठवत नाही.

दाद, अगदी मस्त गं. खुप हसले Lol
माझे अतिमहत्त्वाचे सर्टिफिकेट्स, रिसीट्स, पासबूक आजवर कधीही लौकर मिळाल्याचे आठवत नाही Sad
आताशा काही शोधताना, काय काय मिळत नाहीय त्याची यादी घेउन सुरूवात करते. हवी ती वस्तू नाही मिळाली तरी मागे कधी तरी हरवलेली वस्तू तरी मिळेल म्हणून. Proud
ड्रेस ची सलवार, कमीझ, ओढणी एकाच हँगरला मिळणे दुरापास्त. त्यातल्या त्यात नवर्‍याने काही शोधताना कपाट उचकले असेल तर मग विचारायलाच नको.
एकदा एक्झाम साठी दुसर्‍या गावी, हॉल टिकेट विसरून गेले होते Sad

'अय्या, अस्साच रंग हवा होता मला परवा' असं स्वत:शीच म्हणत जवळून गेलेल्या अपरिचित महिलेच्या मागे प्लॅटफ़ॉर्म नंबर एक वरून तीनपर्यंत, तिला 'कौनसे दुकानमेसे लिया ये?' असं विचारायला जातात. >>>>>>
मस्तच... Lol Lol Lol

हा फक्त चाळीशीनंतरचा योग नाही तर आजकाल कधीही होणारा योगायोग आहे कारण मी अनेकदा नेहमीच्या रस्त्यांतही गल्लत करते. बाकी सगळं आठवतं पण रस्ते काही माझी साथ देत नाहीत........

माझ्या बाबती contact lense लुप्त योग कधी कधी घडतो, पण त्यामुळे होणारा खोळंबा, नाचानाच (माझी आणि जवळपासच्यांची) यामुळे कायम लक्षात राहतो.
१) एक्दा संध्याकाळी बसची वाट पहात थांब्यावर उभा असताना लेन्स डोळ्यातून निसटली..मला एकट्याला मिळणार नाही (तेवढ्यापुरता मी एकाक्ष)आणि कुणाचा पाय पडेल म्हणेल शेजारच्या सांगितले..एकाने रस्ता अडवला, एकाने जवळच्या दुकानात जाऊन विजेरी आणली...१० मिनिटे शोधले(बसही आली नाही सुदैवाने)
पण व्यर्थ. घरी आल्यावर कपडे बदलताना शर्टला चिकटलेली लेन्स पडली आणि माझा जीव भांड्यात पडला.
२) एकदा डोळ्यात घालता घालता लेन्स निसटली, टेबल शोधले, जमिनीवरला केर काढला, पत्ता नाही. घाम फुटला. तो पुसायला चेहर्‍यावर हात फिरवला तर लेन्स गालावर चिकटलेली.
३) रात्री २ लेन्स काढून नीट ठेवल्या...सकाळी एकाच डबीत(एकच) लेन्स. दुसरी गायब. शोधाशोध सुरू. कुठे असेल? डबीच्या झाकणाला पालीसारखी उताणी लटकत होती. ऑफिसमधे हिच्यामुळे लेट मार्क.

भन्नाटम लेखम........!!!

आवड्या ...............

दोन आठवडे झाले दोन ड्रेसवरचे दुपट्टे शोधतेय खरच कुठे लुप्त झालेय कळत नाहिय.. Sad
बाकी लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम. हहपुवा.. Happy