धाकटी सून

Submitted by मानुषी on 9 October, 2009 - 03:07

धाकटी सून
जिममधे मस्त संगीताच्या ठेक्यावर एरोबिक्स अगदी रंगात आलं होतं. तेवढयात पर्समधे ठेवलेला शिल्पाचा सेल वाजला. जिम इनस्ट्रक्टरने आकडे मोजता मोजता कपाळावर आठया घालून नापसंती व्यक्त केली. सेशन संपायला दहाच मिनिटे अवकाश होता. शिल्पाने सेल तसाच वाजू दिला. काही क्षणांनी बंद झाला.
सेशन संपल्यावर शिल्पा घाइघाइने बाहेर आली. सेल हँड्स फ़्रीवर ठेवला, कार स्टार्ट केली. पाहिलं तर संजूचा मिस्ड कॉल दिसला.
"काय गं .......नेमका माझ्या जिमच्या वेळातच केलास ना फ़ोन?" दोघी अजूनही शाळेत असल्यासारख्या भांडायच्या.
"झालं का तुझं आखाडयात घमून...? " संजूनेही वाकडयात शिरत हसत हसत प्रतिप्रश्न टाकला. संजू नेहेमीच शिल्पाच्या फ़िटनेस च्या वेडाची चेष्टा करायची.....अगदी शाळा कॉलेजच्या दिवसांपासून.
"अब बको भी...!" संजूच्या वाकड्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत शिल्पाने तीन शब्दात फ़र्मान सोडलं.
"हम अभी नही बकूंगा......क्योंकी शीक्रेट हाय. मिलना पडेंगा" संजूही काही पड खायला तयार नव्हती.

ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी संध्याकाळी दोघी "आमंत्रण" मध्ये भेटल्या. सर्व आवडीच्या पदार्थांची ऑर्डर दिली. वेटर ऑर्डर घेऊन जायचीच वाट पहात असल्यासारखी शिल्पा दबक्या आवाजात म्हणाली," अगं सांग ना आता काय झालंय ते...तीर्थाचं काही आहे की काय?"
"अगं हो........शिल्पा तुला शशीताई आठवते?"
"म्हणजे काय .........तू म्हणजे ना काहितरीच विचारतेस. अगं पण तिचं काय आत्ता?" शिल्पा नेहेमीप्रमाणे खूप इम्पेशंट झाली होती. एकीकडे सँडविचचा फ़न्ना चालू होता.
"अगं मागे मी तुला अमेयबद्दल बोलले होते ना? तर तो बहुतेक शशीताईशी रिलेटेड असावा." संजू म्हणाली.
" काय्यतरीच काय गं संजू बोलतेस तू ........! आपण कॉलेजमधे असतानाच शशीताईचा मुलगा पहिली दुसरीत होता.....आठवतेय का तुला? .........आता तो खूपच मोठा असेल गं..पण..."शिल्पा गोंधळात पडली होती.
"अगं जरा मला बोलू देशील का?" संजूने शिल्पाला मध्येच तोडलं.
"आणि शशीताईच्या त्या मुलाचं नाव अमेय कुठे होतं? काहीतरी दुसरंच होतं गं!" शिल्पा खूप उतावीळ झाली होती आणि तिच्या स्वरात अविश्वास ओतप्रोत भरला होता.
"शिल्पा अगं अजून पिक्चर क्लिअर नाहीये. मी म्हणतच नाही की तो नक्की शशीताईचाच मुलगा आहे ...मी म्हणतीय की तिच्याशी तो रिलेटेड असावा ...कारण एकतर ही हल्लीची मुलं .......त्यांच्या मित्रांची आडनावंच त्यांना माहिती नसतात. तर बाकी फॅमिली बॅकग्राउंड वगैरे सोडच. त्यामुळे मी आणि मिलिंदने अगदी खोदून खोदून विचारल्यावर तीर्थाने अमेयचं फ़क्त आडनाव सांगितलं .....’पिंगळे’ ...आणि .."
"अगं शशीताईचं आडनाव पिंगळेच ना!" एकदम साक्षात्कार झाल्यासारखा शिल्पाचा चेहेरा फ़ुलला.
"बरोबर आहे...... पण तीर्था म्हणते अमेयला वडील नाहीत आणि त्याच्या आईचा जरा विरोधच आहे या सगळ्याला.....उगीचच! आणि पिंगळे आडनावाची काय एकटी शशीताईच आहे का या जगात? म्हणजे तसे सगळे डीटेल्स जमतच नाहीयेत शशीताईशी ! पण ......." संजूच चेहेरा विचारमग्न आणि कोड्यात पडल्यासारखा दिसत होता. त्यात शिल्पाच्या उतावीळ प्रश्णांमुळे तिला सगळं संगतवार सांगायचं असून सांगता येत नव्हतं. ती पटकन पुढे म्हणाली, " शिल्पा आता जरा थांब..... सांगते सगळं ....पण नीट मधे न बोलता ऐक. " संजूने सगळं नीट सांगायला सुरवात केली. "अगं एक तर अमेयच्या आईचा विरोध आहे या संबंधाला. त्याला कारण म्हणजे त्याच्या मोठ्या भावाने..पार्थने... लव्ह मॅरेज केलंय........आणि आता तिच्यामुळे......मोठ्या भावाच्या बायकोमुळे रिलेशन्स खूपच बिघडलीयंत. म्हणजे आता अगदी एकमेकांशी आजिबातच संबंध नाहियेत. या सगळ्याचा शॉक बसून अमेयचे वडील गेले.......असं अमेयच्या आईचं म्हणणं आहे.....असं तीर्था सांगत होती. आणि हे सगळं तिला अर्थातच अमेयकडून कळलं .......तर तुला आमचे नवरोबा माहितीच आहेत......"इतकं एका दमात बोलून झाल्यावर संजूने मधे थांबून जरा श्वास घेतला.
तेवढ्यात शिल्पा म्हणाली, "ओह् ...मग बरोबर आहे गं त्यांचं ...अमेयच्या आईचं.....एकदा दुधाने तोंड पोळलेला माणूस ताक सुद्धा फ़ुंकूनच पितो. त्यांना आता परत दुसर्‍या मुलासाठी पुन्हा लव्ह मॅरेजची रिस्क घ्यायची नसणार गं. आणि हो तुमचे नवरोबा ...मिलिंदचं काय म्हणणं आहे यावर?"शिल्पा म्हणाली.
" अगं मिलिंद काय ....तो म्हणतो मुलाच्या आईला मान्य नाही तर तुम्ही तरी कशाला घाट घालताय पुढे जाण्याचा....अजून काही आपण तीर्थासाठी मुले पहात नाही आहोत , आता सुरू करू! कशाला उगीच त्यांच्या गळ्यात पडताय.........कळलं ना? हे आमचे नवरोबा. मीच लावून धरलय की एकदा भेटून तरी येऊ म्हणून. पाहू ना काय म्हणणं आहे त्यांचं ते! " संजू म्हणाली .
संध्याकाळ दाटून आली होती. दोघी आपापल्या घरी गेल्या.
.................................................................................................................

कॉलेजमध्ये तीर्थाचा एक मोठा ग्रूप होता. अर्थातच मुलामुलींचा. सुरवातीला नुसताच मित्र असलेला अमेय ........आता तीर्थाचा बेस्ट फ़्रेंड बनला होता. करता करता हळूहळू अमेय आणि तीर्थामधली फ़ुलत गेलेली मैत्री संजूने पाहिली होती. ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असतानाच अमेयने जीआरई देऊन एमएस करण्यासाठी अमेरिकेला जायचं निश्चित केलं होतं. तेव्हाच एके दिवशी कधीतरी तीर्थाने अमेयबद्दल संजूला सांगितलं. संजूला साधारण कल्पना होतीच.
शेवटी संजू एकदा ऑफ़िशिअली अमेयशी बोलली. तीर्थाने आधीच संजूचं खूप होमवर्क घेऊन ठेवलं होतं.... "आई ...त्याला त्याच्या सगळ्या खानदानाची हिस्टरी विचारू नको ..हे विचारू नको ...ते विचारू नको....फ़क्त त्याला सांग की एकदा तुझ्या आईला भेटायचंय."....वगैरे.
त्यामुळे शेवटी एकदा अमेयच्या आईला भेटूनच सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्याव्या असा संजूचा विचार होता. अश्या रितीने शाळेपासूनच्या सवयीनुसार घडलेलं सगळं तिने शिल्पाच्या कानावर घातलं होतं.
..................................................................................................................
ठरल्याप्रमाणे एका रवीवारी अमेयच्या आईला भेटण्याचं ठरलं. मिलिंद तसा तयारच नव्हता. त्याचंही खूप होमवर्क घ्याव लागलं संजूला. अमेयने पत्ता दिलाच होता. दोघांनी काय काय बोलायचं वगैरे साधारण ठरवलं. रवीवारी सकाळी येतो असा अमेयजवळ निरोप दिला.
रवीवारी सकाळी दोघे अमेयच्या घराशी पोचले. बंगला तर छानच होता. चोहो बाजूनी बाग फ़ुललेली होती. नारळाची झाडं बंगल्यावर छत्र चामरं ढाळंत होती. गेट उघडून आत शिरताना अतीव उत्कंठेमुळे तिच्या घशाला कोरड पडली होती. छातीत धडधडंत होतं.
बेल वाजवून दोघे वाट पहात थांबले. दार उघडलं गेलं. संजूला समोर दिसला तो शशीताईचा चिरपरिचित चेहेरा! थोड्या काळाच्या रेघोट्या होत्या चेहेर्‍यावर पण बाकी फ़ारसा फ़रक नव्हता शशीताईत. तेच मोठं कुंकू, डोळ्यात रेखलेलं काजळ......लांब वेणी.......टापटीप रहाणी....संजू क्षणभर स्तब्ध झाली.
शशी पण चकीतच झाली संजूला पाहून. शशीच्या डोळ्यासमोर भूतकाळ सरसर उलगडला गेला..................................!
....................................................................................................................

.............अंघोळ करून रोजच्याप्रमाणे तुळशीला पाणी घालायला शशी बागेत आली होती. सुनील पार्थला शाळेत सोडून ऑफ़िसच्या कामासाठी बाहेर गेला होता. तिने तुळशीला हात जोडले.......डोळे मिटले आणि नेहेमीप्रमाणे बरोब्बर हसण्या खिदळण्याचा आवाज आला. ती जणू त्यांची वाटच पहात होती. तिने कंपाउंड वरून नजर टाकली. त्या दोघी खांद्याला पर्स लटकवून कॉलेजच्या दिशेने निघाल्या होत्या. तिला त्या दोघींची खूप गंमत वाटायची. एकमेकीला अगदी लगटून चालताना कुजबुजायच्या काय..........दबक्या आवाजात खुसूखुसू हसायच्या काय! शशीला त्या दोघी खूप आवडायच्या. कॉलेजच्या परिसरातच शशीचं घर होतं. त्यामुळे त्या दोघींना जाता येता पहाण्याचा शशीला छंदच जडला होता. तिला स्वता:चे कॉलेजचे दिवस आठवायचे.
असंच एकदा तिला सुनीलबरोबर कॉलेजमधे जायला लागलं. सुनीलला कॉलेजच्या स्पोर्टस् डेला चीफ़ गेस्ट म्हणून बोलावलं होतं. सुनीलला खेळाची खूप आवड होती. आपला व्यवसाय सांभाळून तो कॉलेजच्या जिमखान्यात अगदी पडीक असायचा. कधी बॅडमिंटन, कधी टेबल टेनीस , कधी अगदी मुलांच्यात हॉकी सुद्धा खेळायचा. सुनीलबरोबर तिलाही स्पोर्टस डेचं आमंत्रण होतं.
कार्यक्रम सुरू झाला. विद्यार्थ्यांच्या एवढ्या गर्दीत शशीला त्या दोघी बरोब्बर दिसल्या. त्यातली एक आज ट्रॅक सूटमधे होती. दुसरी नेहेमीच्याच पंजाबी ड्रेसमधे.
बक्षिस समारंभ सुरू झाला. काही बक्षिसं शशीच्या हातून दिली गेली. "शिल्पा रायकर हे नाव खूपच वेळा पुकारलं गेलं. ती...त्या दोघीतली ट्रॅक सूटवाली पुन्हा पुन्हा येऊन बक्षिसं घेऊन जात होती. शेवटची "बेस्ट अ‍ॅथलीट ऑफ़ द इयर"ची ट्रॉफ़ीसुद्धा अर्थातच शिल्पालाच मिळाली. शशीने तिचे हात हातात घेऊन तिचं अभिनंदन केलं .........तिला ट्रॉफ़ी दिली.
इतर सर्व उपचार होऊन कार्यक्रम संपला. शशी स्टेजवरून खाली उतरून गर्दीत त्या दोघींना शोधत होती. शिल्पाच्या भोवती घोळका होता. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव चालू होता. शशीची व शिल्पाची नजरानजर होताच शिल्पा ट्रॉफ़ी सांभाळत गर्दीतून वाट काढत पुढे येऊन शशीला भेटली. दोघींची ओळख झाली. शिल्पाने आपल्या मैत्रीणीची ओळख करून दिली. "मॅम, ही माझी मैत्रीण संजू........संजीवनी." हळूहळू सर्व संदर्भ निघाले. शशी म्हणाली, " मी तुम्हाला रोज पहाते....तुम्ही कॉलेजला जाता तेव्हा........या नं दोघी एकदा सहज गप्पा मारायला."
त्यानंतर आठवडा असाच गेला. शशी नवरा, संसार, मुलगा.....यांच्यात गुरफ़टून गेली होती. एके दिवशी तिला शिल्पा, संजू दिसल्या. ती हातातलं काम टाकून पळत पळत बागेतून गेटपाशी गेली. तिने त्यांना हटकलं. आत बोलावलं. संजू म्हणाली,"मॅम आम्हाला आत्ता पीरियड आहे. आम्ही संध्याकाळी येऊ का? शिल्पाची प्रॅक्टिस झाल्यावर?" शशी म्हणाली," हो ...चालेल की. मी खायला करीन काहीतरी मस्तपैकी, .......थोडा वेळ काढून या. गप्पा मारू..... ओके? "
शशीने दुपारीच दहीवडे करून ठेवले. संध्याकाळी सुनील पार्थला घेऊन संस्कार वर्गासाठी ग्राउंडवर गेला. ती बागेतल्या झोपाळ्यावर त्या दोघींची वाट पहात बसली. खिदळण्याचे, कुजबुजण्याचे आवाज जवळ जवळ येऊ लागले. धाडदिशी गेट वाजलं. दोघी आत शिरल्या. शशी त्यांचं निरिक्षण करत होती. शिल्पा घामेजलेली होती. ट्रॅकसूटचा जर्कीन कंबरेला बांधलेला....कपाळावर घामाने बटा चिकटलेल्या. पायात स्पोर्टस शूज.........चेहेयावर एक प्रकारचा बेफ़िकीर भाव.......चालणंही जरा पुरुषी थाटाचंच....! शिल्पा चांगलीच उंच, तगडी..जराशी सावळीच तरीही अत्यंत आकर्षक दिसत होती.
आणि संजू ........अत्यंत देखणी गोरीपान नाजूक! संजूने सुंदर नाजूक फ़ुलांचे प्रिंट असलेला पंजाबी ड्रेस घातला होता. ती एका हाताने ओढणी सांभाळत दुसया हाताने कपाळावरचे कापलेले केस मानेला नाजूक झटका देत मागे सारत होती. उंच टाचांचे सँडल्स घालूनही ती शिल्पापेक्षा बरीच बुटकी होती.
"या या! मी वाटच पहात होते." शशीने त्यांचं स्वागत केलं.
"मॅम उशीर तर नाही ना झाला?...या शिल्पाने आज चार राउंड जास्तीच मारले." संजूने बोलता बोलता शिल्पाला कोपराने ढोसलं.
"आणि मॅम......तोपर्यंत ही म्हैस नुस्ती ग्राउंडवरचं गवत उपटत बाकीच्यांशी गप्पा मारत बसली होती. " शिल्पानेही चान्स सोडला नाही. दोघी अगदी प्रेमाने एकमेकींना चापट्या मारत एकमेकींच्या कागाळ्या करत होत्या. विनाकारणच खुसूखुसू हसत होत्या.
" ए, मी काय बाई आहे का तुमच्या कॊलेजातली.........कधीच्या मॅम मॅम करताय ते! चांगलं शशी नाव आहे माझं!" शशीने दोघींना मध्येच टोकलं.
हळूहळू मुली तिला शशीताई म्हणू लागल्या. दोघींनीही नको नको म्हणत दहीवडे फ़स्त केले. खूप गप्पा झाल्या. शेवटी इंग्लिश हा खूप आवडीचा कॉमन फॅक्टर निघाला. तीघी शेक्सपिअर कीट्स, शेली, बायरन पासून ते सिडनि शेल्डन ...अगदी रॉबिन शर्मापर्यंत सगळ्यांवर भरभरून बोलल्या. शशीनं इंग्लिश घेऊन एम्.ए. केलं होतं. तर या दोघींनीही स्पेशल इंग्लिश घेतलं होतं. कधी काही शंका विचारायच्या निमित्ताने या दोघी वरचेवर शशीकडे येऊ लागल्या. शशीलाही छान कंपनी मिळाली. ती त्यांचे फ़ुलपंखी दिवस जवळून पहात होती.....तिलाही स्वता:चे कॉलेजचे दिवस आठवायचे. मागे पडलेल्या विषयाची या दोघींच्या निमित्ताने चांगली उजळणी होउ लागली. हळूहळू त्या दोघी व शशी यांच्यातलं वयातलं अंतर कमी होऊ लागलं.
त्यात पुन्हा शशीच्या मुलाची..पार्थची शाळा शिल्पाच्या घराजवळ असल्याने शशीचंही अधून मधून शिल्पाकडे जाणं येणं असायचं.
एकदा तर शशीने टाकळकर सरांच्या स्पेशल इंग्लिशच्या तासाला बसण्याची स्पेशल परवानगी काढली. ती अधून मधून त्यांच्या तासाला या दोघींच्या बरोबर बसू लागली. एवढा मोठा इंग्रजीचा प्रोफ़ेसर आणि त्यात प्रख्यात समीक्षक म्हणूनही टाकळकर सरांची ख्याती होती तरी सुनीलच्या ओळखीमुळे आणि शशीच्या इंग्रजीच्या प्रेमामुळे त्यांनी तिला नाही म्हटलं नाही. अशी ही तीघींची वयसापेक्ष मैत्री त्या तीघी अगदी एन्जॉय करत होत्या. पुढेमागे स्पेशल इंग्लिशच्या ट्युशन्स घ्याव्या असंही शशीच्या मनात येत होतं. त्यालाही या दोघींचा दुजोरा होता.
एकदा सकाळी दोघी शशीच्या घरावरून कॊलेजला चालल्या होत्या. त्यांना शशी झोपाळ्यावर बसलेली दिसली. जरा खिन्नच दिसत होती. दोघी थांबल्या. गेट उघडून बागेत गेल्या. "शशीताई काय झालं? अशी का उदास बसलीयंस?" संजू म्हणाली
"कुठं काय ..काही नाही" शशीनं स्वता: सरकून दोघींना झोपाळ्यावर बसायची खूण केली. दोघी बसल्या.
"सांग ना शशीताई काय झालं ते" शिल्पा म्हणाली.
"अगं काल रात्री मी जरा अपसेट होते." शशी म्हणाली.
मुलींना वाटलं बहुतेक नवर्‍याशी भांडण! अजूनही त्यांची विचाराची धाव तेवढीच होती. एखादी बाई अपसेट असण्याचं एकमेव कारण फ़क्त नवर्‍याशी भांडण हेच असू शकतं! शशीच्या चेहेर्‍यावर अजूनही टेन्शन दिसत होतं.
"अगं मी काल तीस वर्षांची झाले. मला खूप वयस्कर झाल्याचं फ़ीलिन्ग आलं गं एकदम.रात्री रडूच आलं गं एकदम ...तरी सुनीलने समजूत काढली....! " आता हे सांगताना मात्र शशीच्या चेहेर्‍यावर जरा हसू होतं. असं वाटंत होतं की आता रात्रीच्या तिच्या डिप्रेसिंग विचाराची तिची तिलाच गंमत वाटत होती.
आतापर्यंत मुलीनांही त्या भयंकर तिशीचं टेन्शन आलं होतं. शशीच्याही ते लक्षात आलं.....ती पटकन म्हणाली, "अगं तुम्ही का एवढ्या सीरियस झालात.......तुम्हाला खूप अवकाश आहे अजून तिशीला. चला........ काही तरी तोंडात टाकूया". तीघी घरात गेल्या.
होता होता मुली ग्रॅज्युएट झाल्या. लगेच काही दिवसांच्या अंतराने दोघींची लग्ने झाली. दोघी लग्नानंतरही एकाच गावात गेल्या. हळूहळू आपापल्या संसारात इतक्या बुडून गेल्या की ती भयंकर तिशी कधी आली कधी गेली दोघींनाही कळलंच नाही. काळाच्या ओघात शशीताईशी संबंधच तुटला.
दोघींची मुलं मोठी होत होती. कधी तरी दोघींना शशीताईची आठवण यायची पण ती कुठे आहे काय करते कधीच काही पत्ता लागला नाही.
...........................................................................................................
शशीला सगळं स्पष्ट आठवत होतं.
...........................................................................................................
पार्थने मितालीशी शशीच्या मनाविरुद्ध लग्न केलं होतं. मिताली तिला कधीच आवडली नव्हती. श्रीमंताघरची फ़ारच लाडावलेली मिताली जरी लग्न होऊन तिच्या घरी आली तरी दोघींचं कधीच जमलं नाही. लग्नानंतर लगेचच पार्थ व मिताली इंग्लंडला गेले. पण दोघींचा संबंध जवळ जवळ संपल्यातच जमा होता. पार्थ मात्र नेहेमी फ़ोनवरून आईशी संपर्कात रहायचा.
या पार्श्वभूमीवर धाकटया अमेयच्या बाबतीत शशी जरा जास्तच हळवी झाली होती. आता धाकटी सून तिला स्वता:च्या पसंतीची आणायची होती.
.........................................................................................................
आता दारात अनपेक्षितपणे संजूला पाहून शशी तिच्याकडे पहातच राहिली.
"ओळखलंस?"संजू म्हणाली.
"म्हणजे काय?..........काय बाई गंमतच आहे! अमेयने मला काहीच सांगितलं नाही. फ़क्त म्हणाला तुला भेटायला कोणी तरी येणार आहेत." शशी पूर्णपणे आश्चर्य चकीत. तिच्या चेहेर्‍यावर आनंद आश्चर्य अश्या संमिश्र भावनांचा कल्लोळ स्पष्ट दिसत होता.
"अगं आम्हाला वाटलं तुला हे सगळं पसंत नाही."संजूही जरा अवघडलेल्या अवस्थेत होती.
मिलिंद नेहेमीप्रमाणे नुसताच बावचळलेल्या चेहेर्‍याने तिच्या मागे उभा होता.
"अगं संजू मला धाकटी सून माझ्या पसंतीने आणायची होती. हे बरोबर आहे गं. पण तुझ्या तीर्थापेक्षा माझी पसंती आणखी काय वेगळी असणार? अगं मला माहीतीच नव्हतं की ही अमेयची मैत्रीण माझ्याच छोटय़ा मैत्रिणीची मुलगी आहे ते!"
"शशीताई खरं सांगू का ....आम्हालाही माहितीच नव्हतं की तुला दुसरा मुलगाही आहे."संजू जरा बिचकतच म्हणाली.
"अगं तो जरा लेट कमरच आहे..........पार्थच्या नंतर दहा वर्षांनी झाला. तोपर्यंत तुमची लग्नं झालेली होता. तुम्ही दोघी आपापल्या संसारात गुरफ़टल्या होता."
सगळे मनापासून हसले. वातावरण एकदम हलकं झालं .....निवळलं! सगळ्यांचे चेहेरे उजळले.
गेट वाजलं .......सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या. बाईकवरून अमेय तीर्थाला घेऊन आत शिरत होता!!

गुलमोहर: 

katha patkan sampalyasarakhi vatate. mi kahi phar mothi vachak nahi pan tarihi ase vatale mhanun sangate

मस्त वाहती आहे कथा. संवाद अगदी मस्त जमलेत कारण ते अगदी सहज पटणारे आहेत. कुठेही कसलिही ओढाताण नाही. खूप आवडली.

छानच !!