आम्ही (अ)तृप्त

Submitted by नविना on 7 October, 2009 - 10:41

परवाच्या दिवशी सकाळी उठल्यावर मला थोडं डोकं दुखल्यासारखं वाटत होतं. नॉर्मली डोकं दुखणं लोकांना आवडत नाही, पण मला मात्र फार बरं वाटतं, माझं डोकं दुखलं की. माझ्या भावाचं पण असंच आहे. मी भारतात असताना त्याला साधी शिंकं जरी आली तरी तो मला लगेच फोन करून सांगायचा, आणि of course vice-cersa पण तितकंच खरं. म्हणजे मी कुठे अगदी दारावर हात जरी आपटला तरी त्याला फोन करून सांगायचे.

त्याचं असं आहे, आम्ही दोघही गेली १०-१२ वर्ष आजारीच पडलो नाहीये. आम्हाला ह्या गोष्टीचं फार वाइट पण वाटतं. पण म्हणतात ना " जगी सर्व सुखी असा कोण आहे!!!!" आमचं derived extension असं होतं ह्यावर "आमची ताई". तिला सतत काही ना काही होत रहायचं. नाही म्हणायला मला लहानपणी म्हणजे मी ६वी मध्ये असताना एकदा कावीळ झालेला(ली). नेमका काय म्हणतात ते मला माहीती नाही. असो. आणि मी कदाचित तिसरी चौथीत होते तेव्हा माझ्या पायात गिट्टी गेली होती. अगदी टाचेच्या मध्यभागी वगैरे पोचली होती आणि पायाला चिरा देऊन काढावी लागली होती. ज्यांनी माझ्या पायावर उपचार केलेत ते डॉक्टर काका माझ्या बाबांचे मित्र आहेत. ते मला म्हणालेही होते तू जरा उचापत्या कमी करत जा, तुझ्या बाबाला टेंशन येतं. माझ्या उचापत्या काही कमी झाल्या नाहीत पण तेव्हापासुन मला कधीच काही झालंही नाही हेही खरं. दुखापत डॉक्टर काकांना घाबरली म्हणायची!!!

माझ्या भावाला तो २ वर्षाचा असताना खांद्याला फ्रॅक्चर झाला होता पण त्याचंही त्यानंतर तेच. कधी काही झालंच नाही. त्याला तर कावीळ पण नाही झाला कधी. मी त्याला चिडवते ह्या साठी सुद्धा. "ऐ ह्या ह्या immune system तुमची. कधी आजारी पडायचं सुखच नाही तुमच्या नशिबात." ह्यावर तो मला नेहमी म्हणतो, " देवानी मला विचारलं होतं, का रे बाबा तुला काय सुख देऊ, तर मी त्याला म्हटलं मला नाही केलंस सुखी तरी चालेल माझ्या बहिणीला मात्र माझ्यापेक्षा जास्त सुखी कर. आणि बघ त्यानी तुला एक आजारपण जास्तीचं देऊन सुखी केलंय. मला ह्यातंच सगळं मिळालं माझी ताई." हे एकदम ड्रॅमॅटीक स्टाईल मध्ये हं. आमचं असं बोलणं नेहमी चालायचं. आणि आई बाबा मात्र खूप रागवायचे. " देवानी चांगलं धडधाकट शरीर दिलं आहे तर यांना हे भिकेचे डोहाळे लागलेत. कधी सुधरतील कोणास ठाऊक." इति आई-बाबा. "हे नेहमीचंच आहे यांचं" इति आम्ही. असा आमचा संवाद पुर्ण होणार.

बाकी काहीही होत नसलं तरी ही डोकेदुखी मात्र मला फार वर्षांपासुन चिकटली आहे. आणि माझ्या भावाला मी त्यावरही चिडवते, की माझं डोकं दुखतंय. तुझं तेही नाही. यावर तो म्हणतो " अगं देव जेव्हा माझ्या शरीरात डोकं फिट करत होता ना तेव्हा मी जरा गुढगे लावण्याची अपॉईंट्मेंट घेण्यात गुंतलो होतो, त्यामुळे माझ्या डोक्यात काय काय फिट केलंय मी चेक नाही केलं. त्यात डोकेदुखीच्या पेशी राहुन गेल्या असतील. पण ठीक आहे असं करुन देवानी माझ्या बहिणीला अजुन एक सुख दिलंय. मी त्यातही खुप आनंदी आहे."

माझी ताई मात्र या बाबतीत खुपच सुखी होती. तिला लहानपणी कावीळ, टायफॉइड, फ्रॅक्चर, टाके, खोक असं सगळं झालं आहे. ह्यावरही आमचं म्हणणं असं आहे की, देवानी ती पहिली म्हणून तिला अती उत्साहात सगळंच दिलं. आणि मग त्याचा family quota संपला. म्हणून मग आमच्या वाट्याला काहीच नाही आलं. आता ती थोडी दुख्खी आहे म्हणा, आणि आम्ही पण तिच्यासाठी कारण तिला diabetes detect झालाय. तिला त्यानी फारसा फरक पडला नाही कारण तिला कधी गोड वगैरे खाणे ह्यामध्ये ईंटरेस्ट नव्हताच. आणि ती स्वतः डॉक्टर असल्यामुळे ती OK आहे.

अर्थात आम्हा दोघांना पण असं काहीतरी भव्य दिव्य नको आहे पण तरीही आम्हाला वर्षातून एकदा ताप आलेला नक्कीच आवडेल. कमीत कमी छान सर्दी किंवा खोकला पण चालेल. पण काहीतरी होऊ दे हीच प्रार्थना करतो आम्ही देवाजवळ नेहमी. आणि आत्ता हे लिहीत असतानाच माझ्या भावाचा फोन आला होता. तो म्हणाला मला सर्दी झालीय, आणि खोकला सुद्धा. अगदी खोकलून पण दाखवलं त्यानी मला म्हणजे ऐकवलं. आणि म्हणाला "दसर्‍याच्या दिवशीच फ्रेश प्रार्थना केली होती देवीला!!!. कंपनी मध्ये जायचा कंटाळा आला होता. मी देवीला म्हटलं की जर तू मला दुखणं दिलं तर मी नक्की एक चांगलं काम करीन. आणि तिनी माझी आर्त हाक ऐकली. आता मी नक्की एक चांगलं काम करणार." आणि नंतर लगेच एक प्रश्ण पण विचारला " ए चांगलं काम म्हणजे काय करु?"आणि मी ही त्याला लगेच सांगितलं "माझ्यासाठी एक ड्रेस घेउन टाक लगेच!!! आणि ताईसाठी पण. बहिणींची सेवा म्हणजे निश्चितच एक चांगलं काम आहे." तो उत्साहाने हो सुद्धा म्हणाला. त्याच्या मते हे चांगलं काम खरंच सोप्पं आहे. चला एक ड्रेस नक्की झाला. ह्या आनंदात मी फोन ठेवलाय, आणि आता मी पण जातेय देवाची फ्रेश प्रार्थना करायला.

गुलमोहर: