डॉ. खान यांचे २००३ साली लिहिलेले पत्र आता उघडकीस आणण्यामागे "अंतस्थ कोsपि हेतु" काय असेल?

Submitted by sudhirkale42 on 2 October, 2009 - 03:50

हा माझा इथे पहिलाच लेख आहे. बहुदा चुकून "मागोवा" या ठिकाणी मी तो चढवला. मग आता इथे पुन्हा चढवतो आहे. चुकीबद्दल क्षमस्व.
सुधीर काळे, जकार्ता
============================================================
डॉ. अब्दुल कादीर खान यांच्या पत्राच्या प्रकाशनाने भारतीय वृत्तपत्रें, नियतकालिकें व टेलीव्हिजनसारखी सर्व माध्यमें यांच्यात सध्या एकच खळबळ माजली आहे. दि. २० सप्टेंबरच्या संडे टाइम्समध्ये श्री. सायमन हेंडरसन यांचा लेख प्रकाशित झाला आहे. (पहा http://tinyurl.com/mm3ll6 हा दुवा). डॉ. खान हे एकेकाळी सर्व पाकिस्तानी जनतेच्या गळ्यातला ताईत असलेले, पाकिस्तानी अण्वस्त्राचे जनक समजले जाणारे शास्त्रज्ञ! त्यांना नीशान-इ-इम्तियाज़ हा उच्चतम पाकिस्तानी मुलकी सन्मान दोनदा व हिलाल-इ-इम्तियाज़ हा द्वितीय क्रमांकाचा मुलकी सन्मान एकदा वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांकडून मिळालेला आहे. असे असूनही त्या देशाच्या राज्यकर्त्यांनी स्वत:ची पापे लपविण्यासाठी त्यांना बदनाम करून आज गृहकैदेत टाकले आहे. एका कोर्टाने जरी त्यांना मुक्त केले असले तरी ते आता खरोखर मुक्त झाले आहेत कीं नाहींत याबद्दल शंका घेण्यास जागा आहे.
प्रसिद्ध झालेल्या लेखात त्यांनी आपल्या पत्नीला लिहिलेल्या चार पानी हस्तलिखित पत्रातील मजकूर जाहीर झाला आहे. जेंव्हां आपल्याला जिवे मारले जाईल अशी भीती त्यांना वाटू लागली तेंव्हां त्या पत्राच्या अस्तित्वाच्या भीतीमुळे कदाचित त्यांचा जीव वाचेल किंवा कमीत कमी जगाला ते कसे निर्दोषी होते हे कळेल या उद्देशाने आपल्या डच पत्नीला (हेनीला) घाई-घाईत लिहिलेले पण बर्यापैकी तपशीलपूर्ण असे हे पत्र आहे. या पत्रात त्यांना ज. इम्तियाज यांनी (कदाचित) बेनझीर भुत्तोच्या इशार्यानुसार इराण, उत्तर कोरिया, चीन व लिबिया या देशांना अण्वस्त्रनिर्मितीचे तंत्र व कांहीं महत्वाची यंत्रे विकायला सांगितले. त्यानुसार डॉ. खान यांनी कृतीही केली. पण ही गोष्ट प्रसिद्ध केल्यास सार्या पाकिस्तानची उरली-सुरली इज्जतही जाईल या भीतीने ही विक्री डॉ. खान यानी वैयक्तिक लोभापोटी केली असा अपप्रचार मुशर्रफ यांच्या कारकीर्दीत सुरू केला गेला व त्यांच्या कुटुंबियांनाही त्रास दिला जाईल अशी धमकी देऊन जुलूम-जबरदस्तीने त्यांना पाकिस्तानी चित्रवाणीवर असा कबुलीजबाब द्यायला भाग पाडले गेले व लगेच मुशर्रफ यांनी त्यांना मोठ्या मनाने माफीही देऊन टाकली!
संडे टाइम्समध्ये हा लेख प्रसिद्ध होताच अमेरिकेतील दूतावासाचे प्रवक्ते श्री. नदीम कियानी यांनी डॉ. खान यांची या पत्रातली विधाने अधिकृत नसून वैयक्तिक आहेत व त्यांचा पाकिस्तान सरकारशी काहीही संबंध नाहीं असे जाहीर केले आहे.
पण एरवी शिकारी कुत्र्यासारखे टपून असणारी व कुठल्याही सनसनाटी बातमीवर हिंस्त्र श्वापदासारखी तुटून पडणारी अमेरिकत वृत्तपत्रे व अन्य मीडिया "अळीमिळी गुपचिळी"च्या पवित्र्यात अगदी गप्प कां आहेत? आयबीएन या ’सीएनएन’च्या भारतीय अपत्याने ही बातली अगदी "हेडलाईन न्यूज"सारखी दिली असली तरी ’सीएनएन’ गप्पच! असे का?
२००३ साली लिहिलेल्या या पत्राची प्रत आय.एस.आय. या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेला डॉ. खान यांच्या पाकिस्तानातील घराच्या झडतीत सापडली. त्यावेळी त्यांना कळले की त्या पत्राच्या प्रती त्यांनी आपल्या पत्नीखेरीज त्यांच्या लंडनस्थित दीना या मुलीला व ऍम्स्टरडॅमस्थित कौसर खान या पुतणीलाही पाठविली होती. खूप दमदाटी करून त्यांनी डॉ. खान यांना दीनाला फोन करायला भाग पाडले व त्या पत्राची तिच्याकडे असलेली प्रत नष्ट करविली. कौसर खानच्या घरी डच गुप्तहेर संघटनेचे अधिकारी आले, त्या पत्रासकट कौसर खानला गुपचुपपणे त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले व तिच्यादेखत त्यांनी तिने अद्याप न उघडलेले पत्र फोडले, मजकूर वाचला. कौसर खानला या मजकुराबद्दल माहिती होती का असे विचारले असता तिने नकारर्थी उत्तर दिले व ते पत्र तिला फक्त सांभाळून ठेवायला सांगितले होते असे तिने सांगितले. मग तिला जाऊ देण्यात आले.
हे पत्र मग डच गुप्तहेर संघटनेने नक्कीच अमेरिकन गुप्तहेर संघटनांना दिले असणार. मग आतापर्यंत त्यावर काहीच कारवाई का झाली नाही व बेनझीरच्या मृत्यूनंतर ते आज का प्रसिद्ध करण्यात येत आहे? संडे टाइम्सच्या लेखानुसार जन. इम्तियाजही कालवश झाले आहेत. म्हणजे दोन्ही आरोपी (बेनझीर व जन. इम्तियाज) आज हयात नाहींत म्हणून हे आता फोडण्यात आले?
कीं अण्वस्त्र बनवण्यात गुंतलेल्या पण ते नाकारणार्या इराणबरोबर लवकरच एक बैठक संयुक्त राष्ट्रांच्या विद्यमाने भरत आहे. त्या बैठकीच्या ऐन तोडावर त्यांची जगभर नाचक्की करण्यासाठी ही वेळ शोधण्यात आली? पाकिस्तानला अण्वस्त्रें बनविण्याचे तंत्रज्ञान कुठून मिळाले? हे तंत्रज्ञान अमेरिकेनेच रेगन/(थोरले)बुश यांच्या कारकीर्दीत पाकिस्तानला बहाल केले असण्याची दाट शक्यता आहे. कारण अफगाणिस्तानचे युद्ध चिघळ्ल्यास व रशियाबरोबर समोरासमोर अणुयुद्ध पेटल्यास पाकिस्तानी भूमीवरून अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्रे डागणे सोपे होईल अशी कल्पना या दोन राष्ट्राध्यक्षांच्या जहाल गटातील सल्लागारांच्या/मंत्र्यांच्या सुपीक डोक्यात आली व त्यानुसार अमेरिकन विधिमंडळांना (congress) न कळविता व प्रसंगी त्यांना खोटी माहिती हेतुपुरस्सर देऊन हे तंत्रज्ञान पाकिस्तानला देण्यात आले असे मानायला जागा आहे. असे असल्यास या गौप्यस्फोट आता करून हे तंत्रज्ञान पाकिस्तानला चीनने दिले असा कांगावा करत "तो मी नव्हेच"चा प्रयोग करायला अमेरिका मोकळी राहील. पण पाकिस्तानला अण्वस्त्रें बनविण्याचे तंत्रज्ञान कुठून मिळाले? ते तंत्रज्ञान पाकिस्तानने 'down-the-line' कसे विकले? ज्याने पाकिस्तानला दिले त्या राष्ट्राने पाकिस्तानवर कसे काय कांहींच निर्बंध घातले नाहींत? आणि जर घातले असूनही ते न जुमानता पाकिस्तानने अण्वस्त्रप्रसाराला असा हातभार लावला असेल तर या बेलगाम वारूसारखे उधळणार्या व दहशतवादाविरुद्ध तोंडदेखले लुटपुटे लढणार्या पाकिस्तानला आजही अमेरिका पाकिस्तानला दहशतवादाविरुद्धच्या युद्धातील सच्चा मित्र या नात्याने अजूनही का वागवीत आहे व त्यांच्यावर पैशाचा पाऊस पाडत आहे? आजही पाकिस्तान अमेरिकेशी दुटप्पीपणे वागत आहे. इकडे अमेरिकेचा पैसा घ्यायचा व तिकडे दहशतवाद्यांना आतून मदत करायची असा पाकिस्तानचा दुटप्पी डाव अमेरिकेला अद्याप कसा कळत नाहीं?
अमेरिकेच्या या वागण्याने भारताचे अतोनात नुकसान होत आहे. पाकिस्तान एका बाजूला अमेरिकेकडून व दुसर्या बाजूला तिचा नजीकच्या भविष्यकाळातला कट्टर शत्रू चीन या दोन्ही बाजूंकडून आपले उखळ पांढरे करून घेत आहे. व अशा तर्हेने मिळालेले पैसे दहशतवादाविरुद्ध न वापरता भारताला त्रास देण्यासाठी वापरत आहे हेही आता उघड आहे. हे सारे अमेरिकेला कधी व कसे समजणार? आणि कोण समजावून सांगणार?
थोडक्यात खालील प्रश्न अनुत्तरित आहेत:
१) डच गुप्तहेरखात्याने (नक्कीच) दिलेल्या माहितीवर आधारित कारवाई पाकिस्तानविरुद्ध वेळेवर का केली गेली नाहीं?
२) ही माहिती आता उघड करण्याच्या मुहूर्तामागे काय कारणे आहेत? त्या पत्रातील मुख्य आरोपी बेनझीर भुट्टो व जन. इम्तियाजचा झालेला मृत्यू? कीं इराणबरोबर लवकरच सुरू होणार्या अण्वस्त्रविरोधी वाटाघाटींआधी इराणला बदनाम करणे? कीं डॉ. खान यांच्याकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून इराणची थापेबाजी उघडी करणे? कीं पाकिस्तानला आम्ही अण्वस्त्रतंत्रज्ञान दिलेच नव्हते, ते चीनने दिले अशी जगाची दिशाभूल करणे?
भारतीय वृत्तपत्रांनी याच्या मुळावर घाव घालून सत्य परिस्थिती जगापुढे मांडली पाहिजे व पाकिस्तानचा पर्दाफाश करून भारतावरचे ओझे कमी केलेच पाहिजे. असे न केल्यास fourth Estate या संदर्भातल्या कर्तव्याला ते खरे उतरले नाहींत असेच सारे जग म्हणेल.
सुधीर काळे, जकार्ता

गुलमोहर: 

खरंच विचारप्रवृत्त करणारी गोष्ट.

भारतातल्या प्रत्येकाने देशाभिमान बाळगून सुनियोजित प्रगती साधून अमेरिका आणि इतरांना फाट्यावर मारायला सुरवात करावी.

भारतातल्या प्रत्येकाने देशाभिमान बाळगून सुनियोजित प्रगती साधून अमेरिका आणि इतरांना फाट्यावर मारायला सुरवात करावी.नेते मण्डळीना वगळुन होउ शकेल.