समृद्धीची गंगा विदर्भ- मराठवाड्याकडे वळणार का?

Submitted by tilakshree on 26 January, 2008 - 05:00

मद्य आणि औषधे यांच्या उत्पादन प्रक्रियेत वापरले जाणारे अल्कोहोल मळीपासून न बनवता ते धान्यापासूनंच तयार करावे आणि मळीपासून बनलेले अल्कोहोल औद्योगिक आणि इंधनासाठी वापरण्याच्या प्रस्तावावर राज्यशासन गांभीर्याने विचार करत असून तसा कायदा अस्तित्वात आल्यास पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस बागाईतदारांप्रमाणेंच विदर्भ, मराठवाड्यातल्या सामान्य शेतकर्‍यांना बरे दिवस येण्याची शक्यता आहे.
धान्यापासून एथिल अल्कोहोल निर्मिती प्रकियेची व्यवहार्यता तपासून पहाण्यासाठी 'मिटकॉन'या संस्थेने अभ्यास करून आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला. धान्यापासून अल्कोहोल निर्मितीची प्रक्रिया मळीपासून अल्कोहोल निर्मितीच्या प्रक्रियेच्या तुलनेत अधिक पर्यावरणानुकूल आणि सुलभ आहे. धान्यापासून बनलेल्या अल्कोहोलची किंमत किंचित अधिक ठेवल्यास ही अल्कोहोल निर्मिती किफायतशीर होऊ शकेल; असे मिटकॉनच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रांमधे प्रचलित असणार्‍या पद्धतीनुसार मद्य आणि औषधनिर्मितीसाठी वापरण्याचे (पोटेबल) अल्कोहोल धान्यापासून; तर औद्योगिक आणि इंधनांत मिसळण्यासाठीचे अल्कोहोल ऊसाच्या मळीपासून तयार करण्याबाबत राज्यशासनाने कायदा करावा आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करावी. दरम्यानच्या काळात धान्यापासून अल्कोहोल निर्मिती करणार्‍या उद्योजकांना प्रोत्साहन देणार्‍या सवलती, अनुदाने देण्याच्या योजना राबवाव्यांत असे 'मिटकॉन'ने आपल्या अहवालांत सुचविले आहे. ही सूचना राज्यशासनाने गांभीर्याने विचारांत घेतली असून नजिकच्या भविष्यकाळात यासंबंधी कायदा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. अशा निर्णयामुळे आजपर्यंत अवर्षण, कोरडवाहू जमीन आणि दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकून प्रसंगी मृत्युला कवटाळणार्‍या विदर्भ, मराठवाड्याच्या शेतकर्‍यांना दिलासा मिळ्ण्याची शक्यता आहे.
धान्य आंबवून त्यातून अल्कोहोलची निर्मिती केली जाते. ज्यामधे चांगल्या प्रमाणात कर्बोदकं आहेत अशा सर्व धान्यापसून अल्कोहोल मिर्मिती करता येते. प्रामुख्याने मका, गहू, ज्वारी या धान्यापासून अल्कोहोल बनविले जाते. आज जगभर पेट्रोलियमचे साठे कमी होत चालले आहेत. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात पर्यायी किंवा पूरक इंधन म्हणून 'इथेनॉल'चा वापर वाढंत आहे. त्यासाठी आवश्यक असणारे अल्कोहोल मुख्यतः मक्यापासून बनवले जाते. भारतातही 'इथेनॉल', 'बायोडिझेल'चा वापर अनिवार्य होत आहे. राम नाईक पेट्रोलियम मंत्री असताना इथेनॉलच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आणि विद्यमान सरकारनेही हे धोरण पुढे नेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार देशात इथेनॉलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.सध्या देशात सर्व उपयोगांसाठीच्या अल्कोहोलची निर्मिती केवळ ऊसाच्या मळीपासून केली जाते. वाढत्या मागणीला पुरे पडण्याची क्षमता आपल्या साखर किंवा 'डिस्टीलरी' उद्योगामधे निश्चितच नाही. याखेरीज आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रदूषण! मळीपासून अल्कोहोल तयार करण्याच्या प्रक्रियेत निर्माण होणारे सांडपाणी (वेस्ट वॉटर),इतर रसायने आणि वातावरण प्रदूषित करणार्‍या वायू आणि द्रव्यांचे उत्सर्जन. ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका 'डिस्टीलरी'ने हलगर्जीपणाने आपल्या प्रकल्पातील सांडपाणी बुंध्यात ओतल्यामुळे दिडशे वर्षांपूर्वीचा वडाचा वृक्ष वठून आजूबाजूच्या शेतजमिनीचे नुकसान झाल्याचे उदाहरण प्रस्तुत लेखकाने प्रत्यक्ष अनुभवले आहे. य तुलनेत धान्यापासून अल्कोहोल निर्मिती कितीतरी प्रमाणात सुरक्षित आणि पर्यावरणानुकूल आहे; यावर तज्ज्ञांनी शिक्का- मोर्तब केले आहे. याशिवाय मळीपासून बनलेल्या अल्कोहोलचा वापर असलेल्या मद्य आणि औषधांच्या तुलनेत धान्यापासून तयार झालेल्या अल्कोहोलचा वापर असलेले मद्य व औषधे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अधिक सुरक्षित असल्याबाबतही तज्ज्ञांनी निर्वाळा दिला असून 'मिटकॉन'ने ही आपल्या अहवालात ही बाब नोंदवली आहे.
भारतातही काही प्रमाणात धान्यापासून उत्पादित केलेल्या अल्कोहोलचा वापर असलेले मद्य तयार करण्यास सुरुवात झाली आहे. अशा मद्याचा वैशिष्ट्यपूर्ण स्वाद आणि गंध यामुळे त्याच्या मागणी आणि उत्पादनातही प्रतिवर्ष १० टक्क्यांनी वाढ होत आहे. धान्यापासून अल्कोहोलनिर्मितीच्या प्रक्रियेतील आणखी एक फायदेशीर बाब म्हणजे पशु़खाद्य! या प्रक्रियेत तयार होणार्‍या धान्याच्या चोथ्यापासून पशुखाद्य (कुट्टी) तयार होते. याशिवाय अल्कोहोल उत्पादन प्रकल्पाच्या 'बॉयलर' साठी इंधन म्हणून धान्याचा इतर टाकाऊ भाग (ताटं, पाला-पाचोळा) उपयुक्त ठरतो. पंजाबमधे धान्याद्वारे मद्यनिर्मिती करणार्‍या कंपनीने आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील गव्हाच्या पारंपारिक बाजारपेठेला आव्हान उभे केले असून त्यामुळे शेतकर्‍यांचीही आमदानी वाढून त्यांचे राहणीमान सुधारल्याचा कंपनीचा दावा आहे.
महाराष्ट्रापुरता विचार केला तर राज्यशासनाने मद्य आणि औषध निर्मितीसाठी धान्यापासून उत्पादित केलेले अल्कोहोल वापरण्याचा कायदा केला तर कदाचित महाराष्ट्राचे अर्थकारण एक नवे वळण घेऊ शकते. ज्वारी हे राज्यातील महत्वाचे पीक आहे. ज्वारीच्या उत्पादक देशांत भारताचा सहावा क्रमांक लागतो आणि भारतातील उत्पादनात मोठा वाटा महाराष्ट्राचा असतो. अल्कोहोलनिर्मितीसाठी ऊसाची मळी आणि ज्वारी या दोन्ही कच्च्या मालांच्या उपलब्धतेबाबत तुलनात्मक विचार केल्यास मळी ही वर्षातून ६ महिने उपलब्ध होते. उर्वरीत कालावधीत यंत्रणा पडून रहाते. ज्वारीचे पीक मात्र खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात पिकते. त्यामुळे कच्चा माल वर्षभर उपलब्ध झाल्याने अल्कोहोल निर्मितीची यंत्रणा पूर्ण ताकदीने वर्षभर चालू राहू शकते.
भारताने सन २००५-०६ या वर्षात ८० लाख मेट्रिक टन ज्वारीचे उत्पादन केले आहे. देशांतर्गत ७७ लाख मेट्रिक टनांची मागणी पूर्ण करून २५ हजार मेट्रिक टन ज्वारी निर्यातही केली. जगभरात ज्वारी या पिकाखाली असलेल्या क्षेत्रापैकी २० टक्के क्षेत्र भारतात आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजराथ, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेश ही राज्यं ज्वारी पिकवतात. महाराष्ट्रातील तुलनेने मागास असणार्‍या विदर्भ, मराठवाड्यातच ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात होत असून त्याच्या प्रमुख व्यापारी केंद्रामधेही मुंबई व कोल्हापूरचा अपवाद वगळता अक्कलकोट, बार्शी, पंढरपूर, कुर्डुवाडी अशा त्याच भागातील ठिकाणांचा समवेश आहे.
मात्र कापूस या नगदी पिकाच्या नादी लागून विदर्भातील; तर ऊसाच्या नादाने उर्वरित महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी ज्वारीची उपेक्षांच केली. त्यामुळे राज्यातंच नव्हे तर देशातही ज्वारीच्या उत्पादनांत लक्षणीय म्हणजे खरिपांत २००५-०६ मधे ५० टक्के; तर रब्बी हंगामात २५ टक्के घट झाली. अल्कोहोल निर्मितीसाठी धांन्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढल्यांस पश्चिम महाराष्ट्रात बागाईतदारांच्या परसातून वाहणार्‍या समृद्धीचे काही ओघळ तरी विदर्भ मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या वावरांत जातील आणि त्याचे परिणाम संपूर्ण राज्याच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यायाने राजकीय क्षेत्रात दिसून येतील याबाबत शंका नाही.
साखरसम्राट होणार मद्यसम्राटही!!!
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यांत सहकारी साखर कारखान्यांद्वारे आपले राजकीय स्थान बळकट करून आपापली 'संस्थाने' निर्माण करणार्‍या साखरसम्राटांनी आता आपला मोर्चा अल्कोहोल निर्मितीकडे वळवल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांनी धान्यापासून बनवलेल्या अल्कोहोलचे मद्य तयार करणारा कारखाना काढला असून आणखी अनेक राजकारण्यांनी त्यादृष्टीने तयारी सुरु केली आहे.

गुलमोहर: 

चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

पण मला काही प्रश्न आहेत.
१. धान्यापासुन तयार होणार्‍या मळी पासुन फक्त अल्कोहोल तयार करतात कि ईंधन निर्मिती पण करता येते? उसाच्या मळीपासुन ईंधन निर्मिती होते का?
२ ज्वारी पासुन तयार होणारी मळी म्हणजे काय? ती नक्की कशी तयार करतात?

धान्यापासून मळी तयार करत नाहीत तर धान्य 'क्रॅश' करून ते आंबवतात. त्यातला चोथा काढून उरलेल्या द्रवापासून अलोकोहोल तयार करतात. हे 'एक्स्ट्रॉ नॅचरल अल्कोहोल' असते. त्यापासून मद्य बनवले जाते. मळी हे साखर बनवण्याच्या प्रक्रियेतले बाय-प्रॉड्क्ट आहे. ऊसाच्या रसाला उकळून त्यातून साखर काढून घेतल्यानंतर उरणारे द्रव्य म्हणजे मळी. त्यापासूनही अल्कोहोल मिळते; मात्र त्याचा दर्जा काहीसा दुय्यम असतो. धान्यापासून तयार केलेल्या अल्कोहोलपासूनही 'इथेनॉल' बनवले जाते.