कुलंग... जेथे आकाश ठेंगणे वाटते...

Submitted by विमुक्त on 29 September, 2009 - 05:07

"येत्या विकऐंडला कुलंगला जायचा बेत आहे... येतोस का?" असा राहुलदादाचा SMS आला...

खूप दिवसांपासून मला कुलंगला जायच होतं... कळसुबाईच्या कुशीत अलंग, मदन आणि कुलंग विसावले आहेत... इगतपुरीच्या परिसरात अजीबात भटकलो नव्हतो... तिकडच्या डोंगररांगा जरा वेगळ्याच आहेत... आकाश सुद्धा ठेंगण वाटावं असे उंच डोंगर आहेत...

मग शुक्रवारचं काम संपवून मी बदलापुरला राहुलदादा कडे पोचलो... रात्री सगळी तयारी करुन झोपी गेलो... पहाटे ५.४६ च्या लोकलने कल्याणला पोचलो आणि मग कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलमधे चढलो... राहूलदादा, अरुण सर, निलीमा मँडम, अवळे सर आणि मी असे आम्ही पाचजण कुलंगला चाललो होतो...

कसाऱ्याला वडापाव-चहा घेतला आणि जीप ठरवून काळुस्त्याला पोचलो. गावकऱ्यां सोबत थोड्या गप्पागोष्टी झाल्यावर कुलंगवाडीच्या (कुरुंगवाडी) वाटेवर चालायला सुरुवात केली. शेताच्या बांधावरुन ही वाट जात होती. दूरवर एका डोंगराच्या मागून कुलंग आणि त्याचा धाकटा भाऊ - छोटा-कुलंग मान वर काढून आमच्याकडे बघत होते. कुलंगवाडीहून दळणासाठी काळुस्त्याला चाललेले काही गावकरी वाटेत भेटले. त्यांच्या मते, "आम्ही काळुस्त्याला न येता, आंबेवाडीला जायला हवं होतं" कारण ते जवळ पडलं असतं, पण भटकायला निघाल्यावर जवळ-दूरचा सवालच नव्हता.

ह्यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे भाताची शेतं जरा वाळली होती; रोपं जरा पिवळी पडली होती. शेताच्या कुंपणावर घाणेरी फुलली होती. दीड तास चालल्यावर कुलंगवाडीच्या पठारावर पोचलो. समोर छोटा-कुलंग पासून सुरु झालेली डोगंररांग डाव्या हाताला दूरवर कळसुबाई पर्यंत पसरली होती. अंगा-पिंडानं धष्टपुष्ट असलेला कुलंग अगदी उठून दिसत होता.

(उजवी कडून दुसरा डोंगर म्हणजे कुलंग)

हिरव्यागार पठारावर नागमोडी वळणं घेत जाणाऱ्या पायवाटेवरुन आम्ही पुढे सरकत होतो. दुपारच्या उन्हाचे चटके आता जाणवत होते. थोडावेळ आराम करण्यासाठी एका ओढ्याकाठी विसावलो. थोडंफार खाल्लं, पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या आणि कुलंगच्या दिशेने चालायला लागलो.
पठार सोनकीच्या फुलांनी बहरलं होतं. बाळाला जशी आईची ओढ असते, अगदी तशीच सोनकीला उन्हाची ओढ असते. दुपारच्या उन्हात सोनकीचं सौंदर्य जास्तच खुलून दिसतं. सोनकीला 'सोनावळी' असं सुद्धा नाव आहे.

गळ्यातली घंटा वाजवत, पठावरचं कोवळं, लुसलुशीत गवत खात गुरं भटकत होती आणि त्यांचा गुराखी एका झाडाच्या सावलीत हाताची उशी करुन निवांत पहूडला होता. काय ते सुख!!! मन संतुष्ट असेल तर उपाशी पोटी सुद्धा छान झोप लागते.

पठारावर अनेक पायवाटा फुटल्या होत्या. आता पायवाटेकडे जास्त लक्ष न देता, कुलंग आणि मदन मधल्या खिंडीच्या दिशेने सुटलो. दुपारी १.३० च्या सुमारास एका ओढ्यात जेवणासाठी थांबलो. वाहत्या पाण्याचा खळखळाट ऐकत, ओढ्यामधल्या दगडावर बसून जेवायला (ठेपले, छुंदा आणि लाडू) सुरुवात केली. तहान लागली की बसल्या जागीच जरा वाकून ओढ्यातलं पाणी प्यायचो. जेवणा नतंर थोडावेळ आराम केला आणि पुन्हा चालायला लागलो.

खूप जंगलतोड झाल्यामुळे पावसानंतर सुद्धा जंगल जरा विरळच भासत होतं. जंगलात गुरांच्या वाटा, लाकुडतोड्यांच्या वाटा आणि गडावर जाणाऱ्या वाटांच जाळं पसरल होतं. ह्या गोंधळात आम्ही वाट चुकलो आणि कुलंगच्या ऐवजी मदनच्या वाटेने बरच चढलो. चढत असताना, "आपण वाट चुकलोय... जरा खालूनच उजवीकडे वळायला हवं होतं..." असं सारखं राहुलदादा सांगत होता. आम्ही धरलेली वाट एका लहानश्या धबधब्यात संपली. मग मागे वळलो आणि बरच खाली गेल्यावर उजवीकडे कुलंगच्या दिशेने जाणारी वाट सापडली. ही वाट ओढा पार करुन कुलंगकडे जाते आणि ओढ्याला पाणी असल्यामुळे मगाशी वर चढत असताना ह्या वाटेचा अंदाज नाही आला. ओढ्यातल्या पाण्याने जरा ताजेतवाने झालो आणि कुलंगच्या वाटेला लागलो तेव्हा ३.३० वाजले होते. थोड्याच वेळात वरच्या पठारावर पोचलो. समोर मदनगड आणि त्याचं नेढं लक्ष वेधून घेत होते.

मदनगड मागे आणि कुलंग डाव्या हाताला ठेवून आडवं चालायला लागलो. अर्ध्या तासात, कुलंगवर चढणारी धार लागली. धारे वरुन चढायला सुरुवात केली. खूप तीव्र चढ होता आणि धारेवर कारवीचं जंगल माजलं होतं. दीड माणूस उंच कारवी आणि बांबूमुळे पायवाट पूर्णपणे झाकली होती. पावसानंतर गडावर जाणारे आम्हीच पहिले होतो. मग एका सुकलेल्या कारवीचा बुंधा उपटला आणि त्याने कारवीचं जंगल झोडपत वाट शोधत झपाझप चढायला लागलो. घामाने संपूर्ण न्हाऊन निघालो होतो. दमलो की काही क्षण थांबायचो आणि मग परत कारवी झोडपत चढायचो. तासभर चढल्या नंतर, जरा अवघड कातळ-टप्प्याच्या पायथ्याशी जरा विसावलो.

(शेवाळं असलेला भाग फोटोत नाही आला...)

पावसामुळे शेवाळं साचलं होतं आणि पाठीवर अवजड पीशव्या घेऊन कातळ-टप्पा पार करणं जरा अवघड वाटत होतं. घसरण्याचा सवालच नव्हता कारण घसरलो तर गेलो ह्यात काही शंकाच नव्हती. तितक्यात निलीमा मँडमला एक भन्नाट युक्ती सुचली. आम्ही जवळ असलेले कापडी रुमाल शेवाळ असलेल्या ठीकाणी टाकले आणि त्यावरुन चालत तो टप्पा पार केला. सगळ्यात शेवटी एक-एक रुमाल उचलत मी तो टप्पा पार केला. आता पुढची वाट पण जरा बिकटच होती. नीट लक्ष देत चढत होतो. कातळात खणलेल्या उभ्या पायऱ्या चढून गडावर पोचलो तेव्हा संध्याकाळचे ६.१५ वाजले होते. गड दाट धुक्यात बुडाला होता. गडावर प्रवेश केल्यावर उजव्या हाताला हाकेच्या अंतरावर गुहा आहे. दगड फेकून, जरा आवाज करुन गुहेची नीट पडताळणी केली. गुहेच्या एका भागात पाणी साठलं होतं आणि उरलेल्या भागात जरा ओलावा होता. ओलावा असलेल्या भागात सगळं सामान पसरलं. आम्ही गडावरच्या टाक्यातून पाणी आणे पर्यंत, अरुण सरांनी गँस पेटवून सूप तयार केलं. दिवसभराच्या मेहनती नंतर गडावरच्या गारव्यात गरम-गरम सूप पिण्या सारखं दूसरं सूख नाही. त्यानंतर सगळेजण रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागले. व्हेज-पुलाव, पापड आणि आंबा-बर्फी असा जेवणाचा बेत होता. जेवण आटपून, अंथरुण-पांघरुण पसरुन झोपायला रात्रीचे १० वाजले. दिवसभर खूप दमछाक झाली असल्यामुळे नीटशी झोप लागली नाही. मधेच उठून टॉर्च लावला तर एक भला मोठ्ठा खेकडा राहुलदादाच्या उश्याशी बसला होता.

त्याला फास लावून पकडला आणि गुहेच्या बाहेर सोडून दिला. परत जरा वेळ अंथरुणावर पडून राहिलो. झोप काही लागत नव्हती, मग मी पहाटे ५.३० ला उठून गुहेच्या वर जाऊन सुर्योदयाची वाट बघत बसलो. गार वाऱ्यामुळे खूप थंडी पडली होती. पहाटेच्या मंद तांबड्या प्रकाशात डोंगर सुद्धा झोपी गेल्या सारखे भासत होते.

(मदन, अलंग आणि कुलंग)

थोड्याच वेळात तांबडं-केशरी सुर्यबिंब कळसुबाईच्या मागून वर आलं आणि कोवळं उन्ह खाली झिरपू लागलं. कोवळ्या उन्हाचा स्पर्श होताच पक्ष्यांना जाग आली आणि खालचं जंगल जिवंत झालं. डोंगर सुद्धा कोवळ्या उन्हात न्हाऊन ताजे टवटवीत झाले. भान हरपून मी सृष्टीच चैतन्य अनुभवत होतो. अशा काही क्षणांनीच आपलं आयुष्य सजलेलं असतं.

सकाळच्या नाष्त्याला नूडल्सचा उपमा आणि चहा होता. ते आटपून गडावर भटकायला निघालो. सारा गड वेगवेगळी फुलं माळून नटला होता. सोनकी, तेरडा, निसूर्डी, नभाळी, पांडा, श्वेतांबरा आणि असंख्य फुलांनी गड सजला होता. सोबत अवळे सर असल्यामुळे प्रत्येक फुलाबद्दल छान माहिती मिळत होती; वेगवेगळ्या फुलांची नावं त्यांच्यामुळेच कळाली.

(काळी निसूर्डी)

(नभाळी)

(पांडा)

(श्वेतांबरा)

(पान-तेरडा)

(शेपुट हबेनारीया... ground orchid)

हिरव्यागार रंगात सजलेला छोटा-कुलंग फारच छान दिसत होता. आज पर्यंत छोटा-कुलंगवर कोणा माणसाचे पाय पडले नाहीत. "एखाद्या डोंगरावर आजपर्यंत माणूस पोचलाच नाही" हे ऐकायला जरा विचीत्रच वाटतं ना?...
कुलंग वरुन तळकोकणात थेट १४०० मीटर खाली डोकावता येतं. इगतपुरीच्या परिसरातले जवळ-जवळ सगळेच डोंगर कुलंगच्या माथ्यावरुन ओळखता येतात. गडावर फारसं बांधकाम नाही, पण कातळात खणलेली अनेक पाण्याची टाकी आहेत.

(नागाच्या फण्या सारखा आकाशात घुसलेला छोटा-कुलंग )

दुपारच्या जेवणाला अरुण सरांनी चायनीज राईस बनवला होता. सोबत सोया सॉस, टोमँटो सॉस आणि चायनीज जेवणाकरता लागणारे सगळे जिन्नस होते. पोटाचे इतके लाड तर घरी सुद्धा होत नाहीत. जेवणा नंतर थोडावेळ गप्पागोष्टी झाल्या, चहा झाला आणि परत हुंदडायला निघालो. कातळात खणलेल्या नितळ पाण्याच्या टाक्या जवळ बसून, बराच वेळ खालचं कोकण न्याहाळलं. संध्याकाळ होताहोता धुकं पडायला सुरुवात झाली. धुक्यामुळे सुर्यास्त दिसला नाही, पण धुकं जरा विरळ झालं की काळ्या ढगांमधून पाझरणाऱ्या संधीप्रकाशामुळे सारा आसमंत सोनेरी भासत होता. भटकून गुहेत पोचलो तेव्हा अंधारलं होतं. मस्त पालक-कॉर्न सूपचा आस्वाद घेत गुहेच्यावर बराच वेळ बसून राहिलो. आता धुकं अजीबात नव्हतं... एक-एक करत कोकणातले दिवे पेटत होते आणि वर आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. दोन दिवसापूर्वीच अमावस्या झाली होती, त्यामुळे काळ्या आकाशात चांदण्या जास्तच उठून दिसत होत्या. आजुबाजूला गुडूप काळोख आणि वर-खाली टिमटीमणारा प्रकाश असा वेगळाच अनुभव होता तो.

भात, आमटी आणि बटाट्याची भाजी असं रात्रीच जेवण होतं. जेवण उरकून लवकरच झोपी गेलो. आज फारच वेगळा दिवस जगलो. कसलीच घाई नव्हती; चिंता नव्हती... केवळ स्वच्छंदपणा, निवांतपणा होता. आज रात्री मस्त झोप लागली. पहाटे लवकर उठून परत सुर्योदयाची वाट बघत बसलो. कितीही वेळा सुर्योदय पाहिला तरी दरवेळेस तो वेगळाच जाणवतो. उजेडल्यावर कुलंग आणि आजुबाजूचे डोंगर ढगाच्या सागरातून मान वर काढून एकमेकांकडे बघत होते.

चहा आणि फोडणीचा भात खाल्ला आणि निघण्याच्या तयारीला लागलो. गुहा होती तशी स्वच्छ केली, केलेला कचरा पिशवीत भरुन सोबत घेतला आणि सकाळी ८.३० ला उतरायला सुरुवात केली.

(ह्या गुहेत २ दिवस राहिलो...)

चढण्यापेक्षा उतरणं नेहमीच अवघड असतं, त्यामुळे जपूनच उतरत होतो. अवघड कातळ-टप्पा पार केल्यावर जरावेळ आराम केला. आता कारवीच्या जंगलातून उतरताना सारखं घसरायला होत होतं. उतार संपल्यावर जरा निवांतच चालत कुलंगवाडीच्या पठारावर पोचलो.

(उतरताना काढलेला कुलंगचा फोटो...)

दुपारच्या उन्हामुळे खूप दमायला होत होतं. थोडावेळ थांबलो आणि सोबत असलेलं खावून घेतलं. परत काळुस्त्याच्या वाटेला लागलो. बरेच गावकरी लाकडाची अवजड ओझी घेऊन काळुस्त्याला चालले होते. त्यांच्याशी बोलल्यावर कळालं, की आता काही दिवसात काळुस्त्याला धरण बांधणार आहेत; पावसाचं पाणी साठवून ठेवायला. म्हणजे काही महिन्यानंतर काळूस्त्याहून कुलंगला जाता येणार नाही. आंबेवाडी वरुन मात्र जाता येईल. भर उन्हात चालत सुमारे ४.३० वाजता आम्ही काळुस्त्याला पोचलो. पोचल्यावर काही क्षणातच आभाळ भरुन आलं आणि मुसळधार पाऊस कोसळायला लागला. "संपूर्ण पावसाळ्यात असा पाऊस पडला नाही", असं गावकऱ्याचं म्हणणं होतं. एक तास पाऊस कोसळत होता. पाऊस थांबल्यावर वातावरणात मस्त गारवा पसरला.

टमटम ठरवली आणि घोटीच्या दिशेने निघालो. उन्हामुळे सुकलेली शेतं, आत्ताच्या पावसात पाणी पिऊन टवटवीत झाली होती. डोंगरावरून गढूळ पाण्याच्या धारा खाली कोसळत होत्या. अनपेक्षीत पणे पडलेल्या पावसामुळे सगळेच सुखावले होते. गेल्या तीन दिवसात जे काही अनुभवलं त्यामुळे सर्वजण खूप खूष होते. अर्ध्या तासात घोटीला पोचलो. मी घोटीला उतरुन सीन्नरला जाणाऱ्या ट्रक मधे बसलो. राहुलदादा, अरुण सर, निलीमा मँडम आणि अवळे सर त्याच टमटमने कसाऱ्याला निघाले. घोटी वरुन सीन्नरला जाणारा रस्ता फारच रमणीय आहे. एक तासात सीन्नरला पोचलो आणि पुण्याला जाणारी बस धरली. घरी पोचायला रात्रीचे १२ वाजले.

गेल्या तीन दिवसात बरीच धडपड केली होती, पण जे काही अनुभवलं ते केवळ स्वप्न होतं. बऱ्याच नवीन लोकांशी ओळखी झाल्या, नवीन प्रदेश बघितला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीन दिवस मनसोक्त भटकलो...

गुलमोहर: 

कळसूबाईचा सुर्योदय आणि ढगसागराचा फोटो तर उच्च.... Happy
वृत्तांत आणि सगळेच फोटो अप्रतीम....

अलंग, मदन, कुलंग हे technical आहेत आणि तीन दिवसही कमी पडतात... फार कष्ट पडतात... तुम्ही सगळे ग्रेट आहात... Happy

सॅम चार वेळचं जेवण गुणिले ५ जण म्हंजे १० ते १५ किलोच ओझ सोबत बाळगाव लागत...

... २ दिवस तुम्ही डोंगरावरच्या अंधार्‍या गुहेत काढले. अनेक ट्रेक वर्णनं वाचली पण तुम्ही मात्र कमालच केलीत.
विमुक्त खरोखरच ग्रेट आहात रे बाबा तुम्ही ....

मस्त वर्णन आणि जबरी छायाचित्रं !
मी २ दिवसांपुर्वी कुलंग केला. सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो. आता आम्बेवाडीपासून कुरूंगवाडीपर्यत डांबरी रस्ता झाला आहे. एस्टी मात्र आम्बेवाडीपर्यंतच जाते. आणि पुढे जायला तिथे वाहन मिळणार नाही. पण स्वतःचे वाहन केलेत तर थेट कुरूंगवाडीला नेता येते. आम्ही क्वालीस नेली होती तिथपर्यंत.

विमुक्ता,

ती नेहमी दिसणारी फुले सोनकीची आहे ते आज कळले. ती फुले खरचं उन्हात लक्ष वेधून घेतात आणि पानंचा पोपटी रंग, त्यावर किंचित लव, पांनाचा आकार!!! फार सुरेख आहे सोनकी!

तू एक एक शब्द छान वापरला आहेस. मजा आली वाचायला आणि जीवन सुंदर आहे याचा प्रत्यय आला.

धन्यवाद मित्रा.

सुंदर.
परवा गोरखगडला गेलेले असताना इतरांकडून कुलंगचं खूप वर्णन ऐकत होते. आता हे फोटो पाहून जाण्याची तीव्र इच्छा होतेय. Happy

Pages