अन मी राधा ना उरले!

Submitted by राहुल रेवले on 28 September, 2009 - 02:37

वृंदावनात घुमता । अजूनही बासरी धून।
जागते वक्षावरची। ती कृष्णव्रणांची खूण ॥

उद्दाम स्तनांवर रुतता । त्या कृष्णसख्याचा भार।
हृदयातून अस्फुट फुटला। तो प्रणवाचा हुंकार॥

प्रणयात जागता सूर्य। स्पर्शाने रचला पुल।
द्वैताचे भानही सुटले। मज मोरपिसाची भूल॥

प्रेमाची भरती येता। देहाचे रांजण भरले।
चंद्राचा मज सांगावा। मी दिव्यत्वाला वरले॥

तो अणुरेणूतूनि फुटता। मी माझे मीपण हरले।
तो कृष्ण कृष्ण ना उरला। अन मी राधा ना उरले!॥

गुलमोहर: 

प्रेमाची भरती येता। देहाचे रांजण भरले।
चंद्राचा मज सांगावा। मी दिव्यत्वाला वरले॥------------------क्या बात है...
काही जुन्या आवडत्या ओळी आठ्वल्या : प्रेम जब अनंत हुवा...रोम-रोम संत हुवा...

वैशु, गिरिश , भाऊ, क्रांती अन कविताजी मनापासून आभार.
९,१० वर्षांनी कवितेने पुन्हा माझ्याशी सलगी केली... ती तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहनाने

सुरेख! प्रत्येक द्विपदी सरस.
उद्दाम आणि प्रणव या शब्दांची जागा दुसरे काही घेईल का या विचारात पडलोय. पण ही माझ्यालेखी तीट.