बदला !

Submitted by कवठीचाफा on 25 September, 2009 - 06:16

पलंगावर पडल्या पडल्या मी भिंतीवरच्या पालीच्या हलचाली न्याहाळत होतो. हळूहळू ती पाल समोरच्या नाकतोड्याकडे सरकत होती आणि तिच्या अस्तित्वाची जाणिवही नसलेला नाकतोडा एकदम शांत होता. अचानक पालीने त्याच्यावर झडप घातली आणि आपल्यावर येणार्‍या संकटाची त्याला कल्पना येण्यापुर्वीच तो तिच्या जबड्यात तडफ़डत होता.
मी ही किरणवर असाच अनपे़क्षीतपणे घाला घालणार होतो. मार्ग सुचत नव्हता पण किरणला संपवण्याचा निश्चय मी पक्का केला होता.

किरण आणि मी तसे जुने मित्र म्हणजे जिवलग म्हणता येणार नाही पण दोन मिनीटं थांबुन बोलण्याइतपत नक्कीच. आमची मैत्री जास्त वाढायला कारण ठरली ती मधुरा, माझी आणि किरणची कॉमन मैत्रिण. सदा हसरी, हजरजबाबी, स्मार्ट अशी. मधुरामुळे आम्हा तिघांचा ग्रुप झाला. कॉलेजकट्टा, कँटीन ही आमची रोजची भेटीची ठिकाणं. तासनंतास आमच्या गप्पा रंगत असत मग त्या कोणत्याही विषयावर का असेनात! माझं वाचन दांडगं असल्याने मी कधीच बोलण्यात हार जात नसे. बोलताना मी एखादा मुद्दा बिनचुकपणे मांडला की ती कौतुकभरल्या नजरेने माझ्याकडे पहात असे. एकुणच वातावरण आणि वयं पहाता मला प्रेमात पडायला वेळ लागला नाही. माझं कॉलेजातलं अभ्यासातलं आणि इतर कलांमधलं वर्चस्व वादातीत असल्याने वर दिसायलाही उजवाच असल्याने तिच्याकडूनही मला प्रतिसाद मिळायला वेळ लागला नाही.
या सगळ्या प्रकारात आमच्या ग्रुपचा तिसरा मेंबर म्हणजे किरण, त्याच्या कडे आमचं जरा दुर्ल़क्षच झालं. किरणच्या मनात काय विचार चालु होते त्याची जाणिव मला जेंव्हा मधुराने तिला किरणने प्रपोज केल्याचे आणि तिने त्याला नकार दिल्याची बातमी मला सांगितली तेंव्हा झाली. त्या दिवसापासुन आमच्यात आणि किरणच्यात थोडा दुरावा निर्माण झाला खरा.
यथावकाश मी आणि मधुराने प्रेमाच्या आणाभाका घेउन झाल्या, कॉलेज संपल्यावर एखादी छानशी नोकरी मिळवुन आम्ही लग्न करायचं ठरवुनही टाकलं. किरणच्या वडीलांना शेअरमार्केटमधे प्रचंड फ़ायदा झाल्याने त्यांनी नोकरी सोडून धंद्यात उतरायचं ठरवलं, त्यावरुन त्यांच्या घरात जे वादळ उठलं त्यात किरणही ओढला गेल्याने सगळंच सुरळीत झालं.

कॉलेज संपलं आणि रोज डझनावारी अर्ज खरडताना ‘नोकरी मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही’ हे जाणवत राहीलं. नोकरी मिळाली तरी ती कुडमुडीच असायची पण मला हवी होती माझ्या स्वप्नातली छानशी नोकरी जिच्यामुळे मी मधुराशी लग्न करु शकलो असतो. या नोकरी शोधण्याच्या धडपडीत आमच्या भेटीगाठीही कमी झाल्या पण मलाही त्यात वावगं वाटलं नाही. एखादी चांगली नोकरी मिळायचाच आवकाश मधुरा कायमची माझी होणार होती.
पण हे असं घडायचं नव्हतं.

कारण ठरला किरण, त्याच्या वडीलांनी बिझनेसमधे उतरल्यावर भक्कम पैसा कमावला तो ही अल्पावधीत. एव्हाना ते शहरातल्या मोजक्याच श्रीमंतात गणल्या जायला लागले. यानंतर काय घडलं ते कळलं नाही पण एक दिवशी किरण- मधुराच्या लग्नाची पत्रिका माझ्या घरी येउन पडली..... पोष्टाने.
चडफ़डत....... चडफ़डत राहीलो मी......... एकदा वाटलं थेट मधुराला भेटून स्पष्टीकरण मागावं पण सध्या ती ही शहरात नसल्याचे कळले. बहुतेक हे ही किरणनेच रचलेलं कारस्थान असावं ,आपल्या एकुलत्या एक मुलाच्या हट्टापुढे जगातला कोणता बाप झुकणार नाही ?

बस्स, त्याच दिवशी मी किरणचा बदला घ्यायचा निश्चय केला. मला किरणला संपवायच होतं पण कसं.....? चाकु, सुरा असल्या हत्याराने त्याला मारणं मला मुळीच शक्य नव्हतं कारण मुळात इतकी हींमत माझ्यात नाही, आणि रक्त बघुन तर मला चक्कर येते. बंदुक, पिस्तुल माझ्या आवाक्या बाहेरची हत्यारं आणि विषप्रयोग करणे सर्वथा अशक्य. एक- दोन दिवस अश्या भयाण अस्वस्थतेत गेल्यावर डोक्यातले विचारमंथन कमी झाले आणि त्यातुनच तेलाच्या काळ्या तवंगासारखा एकच विचार तरंगला, काळी जादू ....... करणी ......., हा मार्ग माझ्या सारख्यांसाठी एकदम योग्य होता.

मी निवडलेला मार्ग तसा वरवर सोपा वाटत होता पण प्रत्य़आत फ़ाSSरच कठिण. एकतर असे काळी जादू करणारे बाबालोक रस्त्यावर सापडत नाहीत. वर्तमानपत्रात दिलेल्या जाहीरातीतली तमाम वचनं आणि विधानं तद्दन खोटी असतात हा ही अनुभव आला. शेवटी अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नांतुन मी एक पत्ता मिळवलाच, यासाठी मला दारुच्या गुत्त्यापासुन ते सभ्य माणसाला नाव घ्यायलाही लाज वाटेल अश्या ठिकाणांपर्यंत वावर केला. सरतेशेवटी मी मिळवलीच.

ती एक निर्जन जागेतली झोपडी होती. शहराच्या बाजुने वहाणार्‍या नदीच्या पात्रा पलिकडे असलेली. तिथलाच तांत्रीक असले अघोरी कार्य करु शकतो असे मला पक्के कळले होते. झोपडीपर्यंत जाताना ठाम असलेली माझी पावले जवळ जाताच लटपटायला लागली. वेळ दिवसाची असली तरी भयाण शांतता, आगदी एखाद्या पाखराचाही आवाज नाही. बाजुने वहाणारी नदीही शांतच, मधेच तिच्या प्रवाहात तयार होणारा एखादा भोवरा त्या वातावरणात आपल्या खळबळाटाने भर घालतोय, जणु पाण्यातुन अचानक काही बाहेर येउ पहातयं असं वाटावं.

थरथरत्या हातानं मी झोपडीचा दरवाजा उघडून आत पाउल टाकले. वर कुठेतरी लावलेल्या एखाद्या काचेच्या कौलातुन आत पसरलेल्या अंधुक उजेडात धिप्पाड वाटणारी काळीभोर असलेली त्या मांत्रिकाची बाह्याकृती माझ्याकडेच पहाताना दिसत होती. त्याच्या बाजुलाच म्लान असलेले अग्निकुंड दिसत होते. तिथे रिकाम्या असलेल्या एकमेव फ़ाटक्या चटईवर मी बसलो. अर्थात इतक्या दुरवर मी आल्याने माझ्या हेतुची थोडीफ़ार कल्पना असावीच, पण मी माझ्या कामाचे स्वरुप सांगताच त्याने सरळसरळ नकार दिला, पण मी पिच्छाच सोडत नसल्याचे बघुन थोडे आढेवेढे घेत अखेर तो तयार झाला. या कामासाठी लागणार्‍या साहीत्याची यादी जेंव्हा त्याने माझ्यासमोर मांडली तेंव्हा मात्र माझे डोळे विस्फ़ारले. साध्या लिंबापासुन ते कोणत्या कोणत्या प्राण्यापक्षांच्या नेमक्या हाडांपर्यंत बरंच काही होतं त्यात, या वस्तु मी केंव्हा आणि कशा मिळवणार.....? badla-chafa.jpg
अखेरीस या वस्तुही त्यानेच आणायचे मान्य केले पण त्यासाठी त्याने मागितलेली रक्कमही तशीच होती. सुडाने वेडापीसा झालेल्या अवस्थेत मी ती रक्कमही मान्य केली, मात्र एक गोष्ट मात्र मलाच मिळवावी लागणार होती. किरणचे रक्त.. आगदी एखादा थेंब असेल तरी चालेल पण ते गरजेचं होतं, ते ही येत्या दहा दिवसांत कारण दहा दिवसांनी अमावस्या होती आणि तीच रात्र किरणची शेवटची रात्र ठरणार होती.

त्या दहा दिवसांच्या कालावधीत मला जमा करण्याची मुख्य गोष्ट होती ‘पैसा’ कारण मांत्रिकाला द्यायची रक्कम भरमसाठ होती. दहा दिवसांत मला ती जमवायलाच हवी होती. थोडीफ़ार शिल्लक आणि उसन्याउधार्‍या करुनही ती पुर्ण होत नव्हती म्हणुन मी माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाला लाजिरवाणी वाटणारी गोष्ट केली आणि सतत आठवडाभर ती करतच राहीलो. या आठवडाभरात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे किरणचे ‘रक्त’ कसे मिळवायचे याचाच विचार करत राहीलो. कदाचीत कुठूनतरी माझाही विचार होत असावा, किरणला अपघात झाला. त्याला शहरातल्या एकमेव मोठ्या हॉस्पिटलमधे ठेवण्यात आलं. मला ही बातमी कळाल्यावर आनंदच झाला, या अपघातातुन तो वाचुच नये अशी ईच्छाही मनात डोकाउन गेली, पण नाही...., किरणचा मृत्यु मी योजलेल्या भयानक पध्दतीनेच मला व्हायला हवा होता. मला चटकन एक कल्पना सुचली, तडक मी हॉस्पिटलमधे पोहोचलो. किरणची प्रकृती ठिक होती पण ते एक बडे धेंड असल्याने त्याला एका खास ए.सी. रुममधे ठेवलं होतं. सर्जिकल मास्कमागे चेहरा लपवत त्या रुमच्या आजुबाजुला वावरत राहीलो. तिथले सगळेच कर्मचारी तसले मास्क वापरत असल्याने त्यात वावगं वाटायचं कारणच नव्हतं. बराचवेळ घोटाळत राहील्यावर मला जे हवे होते ते घडले. तासातासाने रुम साफ़ करणार्‍या सफ़ाई कर्मचार्‍याने किरणच्या रुममधली वेस्टबास्केट उचलुन बाहेर आणली. ताबडतोब मी त्याच्या हातातुन घेतली, कदाचीत मला एखादा नवा कामगार समजुन तो सरळ पुढच्या रुमकडे निघुन गेला. आडबाजुला जाउन मी ती बास्केट उपडी केली. आतला कचरा विस्कटून पहाताना मला हवी ती गोष्ट सापडली. तो एक कापसाचा गोळा होता, त्याच्यावर एक लहानसाच पण रक्ताचा डाग होता. कदाचीत सलाईन इंजेक्शन वगैरेच्या सुईमुळे आलेले रक्त त्याने टिपले असेल. हवी ती वस्तु सापडताच मी सरळ घर गाठले. माझ्याकडे आता महत्वाच्या दोन्ही गोष्टी होत्या उद्याच्या अमावस्येला किरणचा शेवट नक्की होता.

अमावस्येची काळीकुट्ट रात्र, त्या निर्जन भागात बॅटरीच्या झोताच्या मागोमाग चालणारा मी एकटाच. त्या दिवशी दिवसा जे पक्षांचे आवाज ऐकायला मी आसुसला होतो तेच आवाज आता या काळोखाच्या विळख्यात कानावर पडताच दचकायला होत होतं. वा-याच्या सळसळत्या आवाजात बॅटरीच्या उजेडाच्या कडेकडेला दिसणारी झाडंही भयावह अकृत्या दाखवत होती. हातातल्या रुमालाने सारखा घाम टिपावा लागत होता, एव्हाना हातातल्या टॉर्चचे सेलही संपायला लागल्याने असेल उजेड मंदावला होता. कसाबसा मी त्या झोपडीपर्यंत पोहोचलो. छातीतली धडधड कानापर्यंत पोचत होती तिच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत, लटपटत मी दरवाजा लोटला.

आतमधला भाग मागल्यावेळेच्या तुलनेत पार बदलला होता. गेल्यावेळी म्लान दिसणारे ते अग्निकुंड आता धडधडत होते, त्याच्या पिवळ्यानारंगी उजेडात दाढीमिश्यांचे जंजाळ असलेला तो धिप्पाड तांत्रीक भयावह दिसत होता. त्याने भस्माने अंगावर काढलेले पट्टे त्यात आणखी भर घालत होते, कोणत्या चितेची ती राख असेल कोण जाणे. आजुबाजुला ठेवलेल्या मानवी कवट्या, त्यातल्या काही नकलीही असतील पण छातीत धडकी भरवायला पुरेश्या होत्या.
हातातलं पैशांचं पुडकं मी त्याच्या समोर ठेवलं. त्यानं मान डोलावत ते न मोजताच बाजुला सरकावलं कदाचीत आपल्याला फ़सवण्याची कुणाला हिंमत होणार नाही याची त्याला खात्री असावी. खर्जातल्या आवाजात त्याने माझा विचार पक्का असल्याची खात्री करुन घेतली. मी मान डोलावताच त्याने आत्ता करत असलेल्या कामाची जबाबदारी माझी असल्याचे सांगुन टाकले. बहुदा ही त्यांची रूढी असावी. त्याने माझ्यावर सोपावलेल्या दुसर्‍या कामाबद्दल मला विचारलं, थरथरत्या हातानं मी खिशातली कागदाची पुरचुंडी काढून त्याच्याकडे दिली, त्यातल्या कापसाच्या बोळ्याकडे पाहून मान डोलावत त्याने ती बाजुला सुरक्षीत ठेवली.

तांत्रिकाच्या सांगण्यावरुन समोरच्या नदीत अंघोळ करुन ओल्या कपड्यातचं मी त्याच्या समोर आखलेल्या रिंगणात बसलो. रिंगणातुन काहीही झालं तरी बाहेर न पडण्याची कडक ताकीद त्याने मला दिली होती. आपल्या खर्जातल्या आवाजात एक एक मंत्र उच्चारत त्याने बाजुला ठेवलेल्या ढीगातुन एक एक वस्तु काढून समोरच्या अग्निकुंडात टाकायला सुरुवात केली. प्रत्येक वस्तु आगीत पडताच कुंडातुन निघणारे चित्रविचीत्र आवाज आता त्या झोपडीत दाटायला लागले होते. अग्निकुंडातुन निघणार्‍या धुराला खवखवणारा उग्र वास यायला लागला. मधेच एखादी वस्तु आगीत पडताच ज्वाळेचा रंग निळा होत होता. कडवट दर्प सहन न होऊन नाकाडोळ्यांतुन पाणि वहायला लागले. अचानक मंत्रोच्चारण थांबले. आपल्या जागेवरुन उठून त्याने झोपडीची काही कौलं बाजुला काढली आणि पुन्हा तो आपल्या जागी बसला. त्यावेळी मोठ्या आवाजात काही उच्चारुन त्याने मुठीतली वस्तु कुंडात टाकली, त्यासरशी ज्वाळा आणखी भडकल्या. तडतड करत उडालेल्या एका ठिणगीचा चटका मलाही बसला, पण..... पण, आणखीही काही घडत होतं. मघा त्याने काढलेल्या कौलातुन थंडगार वारा आत येत होता. आधिच ओला असल्याने म्हणा पण मला चांगलीच थंडी वाजायला लागली. बाहेर वा-याचा जोर जास्त असावा असं आत येणार्‍या वार्‍याच्या झोतावरुन वाटत होतं. काही वेळातच हा प्रकार काही वेगळाच असल्याची जाणिव झाली, आत येणार्‍या वार्‍याने आता लहानश्या वावटळीचे रुप घेतले. आता तांत्रिकाने बाजुला ठेवलेली आणि इतकावेळ मला न दिसलेली लहानशी कापडी बाहूली हातात घेतली. मंत्रोच्चार करताना तो तिच्यावर काही प्रक्रीया करत होता. शेवटी त्याने मी आणलेला कापसाचा बोळा त्या बाहूलीत भरला आणि बाहूली बंद केली. पुन्हा बाहूली समोर ठेऊन त्याचे मंत्रोच्चार वेगाने सुरु झाले. झोपडीत अवतरलेल्या त्या वावटळीचा केंद्रबिंदू आता ती बाहूली झाली होती. मधेच अचानक कुणी बटण दाबावे तशी ती वावटळ थांबली, आणि प्रथमच माझे लक्ष समोर केंद्रीत झाले. अग्निकुंडाच्या वेड्यावाकड्या नाचणार्‍या प्रकाशात समोरच्या त्या वेड्याविद्र्या विकृत चेहर्‍याच्या त्या बाहुलीला मी हालचाल करताना पाहीले आणि डोळ्यावर अंधार दाटून आला.

गाSSर पाण्याच्या सपकार्‍याने मी शुध्दीवर आलो. एव्हाना छताच्या कौलांसहीत सर्व पुर्ववत झाले होते. समोर तांत्रीकाच्या हातात ती बाहूली होती, आणि तो मला सांगत होता.
" आता हिच्यात तुमच्या मानसाचं प्रान हैत समजा, हिला कायबी कराल तसं त्या मानसाला हुईल बगा"
बोलता बोलता त्याने पुढे केलेल्या बाहुलीच्या स्पर्शाने मी दचकुन मागे उडालो. त्या भरात मी कधी ते रिंगण पार केलं ते मलाच कळलं नाही, चमकुन मी तांत्रिकाकडे पहाताच त्यानं मान डोलावली, कदाचीत आता त्या रिंगणाची गरज नसावी. तरीही मला ती बाहूली हातात घ्यायची नव्हती. अखेरीस मी त्यालाच काय काय करायचे ते सांगीतले पण एक अट घातली. सकाळी दहाच्या आत त्याने काहीही करायचे नव्हते कारण..... हॉस्पिटलातल्या पेशंटना भेटण्याची वेळ सकाळी दहाला सुरु होते. मला किरणच्या त्या अघोरी यातना माझ्या डोळ्याने पहायच्या होत्या. एका असुरी आनंदात मी घरी आलो. झोप कदाचीत येणार नाही असं वाटत होतं पण डोळा लागलाच.

जाग आली तेंव्हा सव्वा नऊ झाले होते. मी घाईतच आवराआवरी केली. तरी आरश्यासमोर उभं राहुन केसांवर कंगवा फ़िरवेपर्यंत घड्याळाने दहाचे ठोके दिले. आणखी पंधरा मिनीटांनी काही फ़रक पडणार नव्हता. बुट चढवताना समोर पडलेल्या जुन्या वर्तमानपत्रातला किरणच्या अपघाताच्या बातमीचा मथळा दिसला. विचार केला बातमी वाचुन आलो असं सांगता येईल म्हणुन पुर्ण बातमी वाचुन काढली. बातमीच्या शेवटाला एक आवाहनही होते, अपघातामुळे किरणला रक्ताची तातडीने गरज आहे शहरातल्या रक्तपेढीत त्याच्या गटाच्या रक्ताची कमतरता असल्याने रक्तदात्यांनी तातडीने मदत करावी. त्याचा रक्तगटही अत्यंत दुर्मिळ असा `ओ निगेटीव्ह' असल्याने ही गरज निर्माण झाली होती.

बातमी वाचुन वर्तमानपत्र बाजुला टाकले आणि बाहेर पाउल टाकणार तोच............ माझ्या डाव्या पायातुन जोरदार वेदना उसळली आणि तो पाय लुळा पडला. वेदना सहन न होऊन मी जमिनीवर कोसळलो. मनात क्षणात विचार चमकला अरे असे तर.........त्याच क्षणी उजव्या पायातुनही तशीच जोरदार वेदनेची लाट शरीरभर पसरली. वेदनांच्या मोहोळात सापडल्याने डोळ्यावर अंधेरी यायला लागली. ओरडून सांगावेसे वाटत होते कुणीतरी त्या तांत्रिकाला थांबवा...... आता तो अश्याच सुया खुपसत रहाणार. दोन्ही पायात झाल्या आता दोन्ही हातात, आणि नंतर कपाळाच्या मध्यभागी खिळा..........., वेदनेच्या तिसर्‍या लाटेत मनातले विचारही कस्पटासारखे भिरकावल्या गेले, पण असं मला का........? वेदनेने तडफ़डत डोळ्यातला अंधार दाट होत असताना शेवटच्या क्षणी विज चमकल्यासारखा विचार चमकला. मागे आठवडाभर मी एक लाजिरवाणे कृत्य करत होतो, महागड्या दराने माझंच बहुमुल्य रक्त विकत होतो.

आणि माझा रक्तगट आहे `ओ निगेटीव्ह'.

*******************
रेखाटनः पल्लवी देशपांडे

गुलमोहर: 

चाफा,

जरा घाबरत घाबरत्च कथा वाचायला लागलो. (भयकथा असेल म्हणुन नाही तर मायबोलीच्या आय डी वर आधारीत आहे का म्हणुन Happy पण नव्हती..थँक गॉड)

मस्त आहे कथा..शेवट छान!

बापरे.. कसली भयंकर आहे. मला मधुरा असेल कि काय अस वाटलेल पण ट्विस्ट आवडला.
(ते किरण नाव बदला बुवा... Sad )

वाव... ट्विस्ट ची कल्पना होती. फक्त शेवट करताना काय करुन त्यालाच इजा होईल ह्याची कल्पना मला आली नाही. मस्त भट्टी जमल. Happy

सर्वप्रथम मनस्वी धन्यवाद,
ट्वीस्ट बद्दल म्हणाल तर, मुळात तो आहे असं गृहीत धरुनच आपण वाचायला सुरुवात करतो पण तो नेमका कसा असेल याबद्दल एक भुंगा सोडून द्यायचे काम करायचा प्रयत्न केलाय Happy

खूपच छान ! त्या कापसाच्या बोळ्यातच ट्विस्ट आहे असे कळले होते पण मी जे अंदाज बांधले होते त्या पेक्षा शेवट वेगळाच होता Happy

.... ट्विस्ट आहे असे कळले होते >>>>>

चाफ्या आता वेगळा विचार करुन लिहि. लोक लै पुढे गेलेत.:)

हम्म्म्म्म... एकदम चफा स्टाईल...

आठवडाभरात ७-८ बाटल्या रक्त काढलं... अश्याने तुम्हालाच रक्त द्यायची वेळ येइल...

पण कथा आवडली...

पुनश्च धन्यवाद ! Happy
चंपक Lol अनुमोदन
>>>>>>>आठवडाभरात ७-८ बाटल्या रक्त काढलं...
हे शक्य आहे, असं रक्त विकणारे पाहीलेयत मी.

Pages