पुण्यातलं माथेरान

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

पुणे शहराजवळ कोथेरूड जवळ एक टेकड्यान्ची रांग आहे. त्यातल्या एम.आय.टी. मागच्या टेकडीला वेताळ टेकडी म्हणतात. ही माझी आवडती जागा. तिथे गेलं की कसं प्रसन्न वाटत.

गेल्यागुरुवारी मी वेताळ टेकडीवर जायला निघालो. दोन दिवसापासून पाउस पडू लागला होता. या टेकडीवर ए.आर.ए.आय. मूळे गाडीनी वर जायला चंगला रस्ता आहे. त्यामूळे बरेचजण गाडीनीच वरपर्यन्त जातात. अर्थात ठरावीक ठिकाणा पर्यंतच. असो, तर त्या दिवशी पावसामूळे काही हौशी मुलं सोडली तर बाकी सगळा शुकशुकाट होता. मी जमेल तसं चिखल चुकवत चालत होतो. निसर्गाच्या सानीध्यात राहून माणसाची उंची वाढते असं ऐकलं होतं. पण त्याचा इतका लगेच प्रत्यय येईल असं वाटलं नव्हतं. काही वेळातच माझी उंची एक ते दिड इंच वाढली. मधे मधे दगडांवर बुटाचे तळवे घासून मी ती कमी करत होतो. निसर्ग किती तत्पर असतो, दोन दिवस पाणी मिळाल्या बरोबर सगळी कडे पसरलेली बीजं जीव धरु लागली होती. सगळी कडे हिरवं गार झालं होतं. मला निरनीराळ्या किड्यांच निरीक्षण करायलाही आवडतं. आत्ता तर तिथे असंख्य प्रकारचे किडे प्रकट झाले होते. निरनिराळ्या गोगल गायी होत्या. एका लालचुटूक मखमली किड्याने माझं लक्ष वेधून घेतलं. त्याला मी मोबाइलच्या कॆमेरात बंदीस्त करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या अपेक्षेसारखा नाही जमला. या सगळ्यांच शेड्यूल इतकं अचूक कसं असतं आणि तेही कुठल्याही रिमाईंडर शिवाय, हे एक गुढच आहे. जरा पाउस पडायचा अवकाश की हजर. या टेकडीवर झाडंही अनेक प्रकारची आहेत व निरनीराळ्या भागात दाट जंगल म्हणावं इतकी घनदाट आहेत. काही ठिकाणीतर दिवसाही रातकिड्यांची किर किर चालू असते. पावसाळ्यात २,३ फूट उंच गवत वाढतं, काही ठिकाणी तर ४,५ फूट उंच असतं. पुर्वी मोर पहाण्यासाठी मी २,३ फुटी गवतात दाट झाडांत जात असे पण आता हिम्मत होत नाही. पावसाळ्यात उगवणार्या काही छोट्या झाडांना साबणाच्या फेसासारख्या फेसाचे गोळे लागलेले दिसतात. ते पाहून माझ्या मुलाने एकदम म्हटंल की झाडं दाढी करतायत. असच एकदा टेकडी उतरता उतरता एका झाडाला अनेक दिवे लागल्यासारखे दिसले. म्हणून मी त्या झाडापर्यंत गेलो. फळ, शेंग असा काहीतरी तो प्रकार होता. त्याचा आकार बदामासारखा व एक दिड से.मी. एवढा होता, त्याच्या कडाना व मध्यभागी जाड शिरा होत्या व त्यामधे पातळ दुधी पडदा होता. त्यामूळे त्याच्या पलीकडून कुठूनही प्रकाश आला की तो पडदा प्रकाशीत होउन लांबून दिवे लावल्यासारखे वाटत होते. असच एकदा एका फळाचं कवच मिळाल. त्याच्या आतल्याबाजूला खवल्यांसारख मुद्दामूनही करता येणार नाही इतकी सुंदर नक्षी होती. ते बाहेरून बघीतलं की नारळासारख वाटे, आडव ठेवलं की पणती दिव्यासारख वाटे. असे अनेक खजीने इथे पहायला मिळतात.

काही महीन्यां पुर्वी पावसाळ्याच्या शेवटी आणि हिवाळ्याच्या सुरुवातीच्या सुमारास असाच टेकडीवर गेलो होतो, तेव्हां तिथलं वातावरण.... अगदी दाट धुकं होतं. थंड्गार हवाहोती, त्यातच धुक्याचा ओलावाही जाणवत होता. मधूनच वार्याची मंद झुळूक येत होती. वनस्पतींचा विशीष्ट वास तर मधूनच एखादा सुगंध वातावरणात भरून राहीला होता. रोजची पक्षाची किलबील मंदावली होती, मधूनच एखाद्या मोराची साद ऐकू येत होती. एकूण वातावरण अवर्णनीय होतं. निसर्गानी इतका सुंदर स्क्रीन सेव्हर लावून ठेवला आहे की त्याची तुलनाच होउ शकत नाही.
त्याचवेळेला अजून एक गोष्ट बघायला मिळाली. झाडा झाडात कोळ्यांची असंख्य जाळि लागली होती आणि जाळ्यांच्या मध्यभागी वेगवेगळ्या प्रकारचे कोळी. अगदी पाउल वाटेत गुरांच्या पावलांमूळे झालेल्या खळग्यांमधेही छोटी छोटी जाळी होती. यासगळ्या जाळ्यांच्या धाग्यांवर दवाचे थेंब रांगेत जमा होउन सगळी कडे असंख्य मोत्याच्या माळाच माळा दिसत होत्या. मधूनच झुळूक आली की धुक्याची हालचाल होई आणि सुर्याच्या किरणांचे कवडसे येत. त्यात सगळ्या माळा उजळून निघत. अशी चित्र फक्त मेलमधेच बघितली होती. प्रत्यक्षात प्रथमच पाहीली.
आसच एकदा गेलो असताना एका वाळक्या काडीच्या टोकावर एक मोठा भूंगा पंख पसरून सुर्याकडे पाठ करून उन खात बसला होता. ते बघून एकदम माझ्या मनात आलं की हा नक्की पुणेरीच असणार मुंबईच्या भुंग्याला कुठ्ये इतका वेळ. गमतीचा भाग सोडला तरी तो इतका निवांत बसला होता की मी त्याच्या पासून ४,५ इंचावर होतो तरी हलेना, शेवटी काही वेळानी उडाला.

या टेकडीचा विस्तारही बराच मोठा आहे. एखादं गाव वसूशकेल एवढा. चतू:श्रूंगी ते पौड फाटा, व पाषाण, बावधन, चांदणी चौक ते सिम्बायोसिस असा साधारण तिचा विस्तार आहे. या टेकडीवर काही ठीकाणी जुन्या दगडाच्या खाणी आहेत. त्यातली ए.आर. डी.ई. च्या बाजूच्या टेकडीवरची खाण जरा मोठी आहे. पावसाळ्यात या खणींमधे थोडं पाणी साठतं व ते पुढे बरेच महीने असतं. या खाणीच्या उभ्या उंच ओबडधोबड भिंती पक्षांना घरटी करण्यासाठी सुरक्षीत ठीकाण ठरल्या आहेत. खाणीमूळे सगळीकडे स्फटीकासारखे निरनिराळे खडे इथे मिळतात. माझ्या मुलीनी असे बरेच खडे गोळा केले आहेत. इथे मारुती, गजानन महाराज, दत्त इ. ची अनेक ठीकाणी छोटी छोटी देवळं आहेत. ए. आर. ए. आय. च्या मागे जो उंच भाग आहे तिथे वेताबाबाचे देउळ आहे. मला वाटत हे याभागातलसगळ्यात उंच ठिकाण असावं. तिथे गेल्यावर इतका वारा असतो की तिथून हलूच नये अस वाटतं. या ठिकाणाहून चहू बाजूचा लांब पर्यंतचा व्ह्यू मिळतो.

निरनिराळ्या वेळी निरनिराळी वाटते ही टेकडी. उन्हाळ्यात जवळ जवळ सर्वच झाडांचे खराटे झालेले असतात. तरीही यावर्षी तिथे २५ ते ३० प्रकारचे पक्षि आलेले होते. सगळ्या प्रकारांची नावं काही मला माहीत नाहित. पण त्यांच निरीक्षण करण्यातही आनंद मिळतो. दिड इंचा एवढ्या लहान पक्ष्यां पासून ते मोरां पर्यंत, अनेक प्रकार आहेत. ६०, ७० मोर आहेत. मुक्त वातावरणातले प्राणी पक्षी बघण्यात एक वेगळाच आनंद असतो. मोरासारखा मोठा पक्षीही निसर्गात इतका सामावून जातो की झाड आणि काट्क्यां मधे अगदी ५,६ फुटांवर असला तरी पटकन दिसत नाही. तिथे ससेही बर्या संख्येने आहेत. हरणं व तरसं आहेत अस ऐकलं आहे पण प्रत्यक्षात पाहीलं नाही. साप, विंचू, मुंगूस असेही बरेच प्रकार आहेत. एकूणच इथलं वनस्पती आणि प्राणी जिवन एकमेकांच्या साथिनी छान चालू आहे. आर्थात त्याला काही धोके आहेतच. जसं गवताला आगी लागणे; गावठी कुत्र्यां पासून मोर, ससे यांना असलेला धोका; तिथे येउन शांतता न पाळता आरडा ओरडा करणार्यांमूळेही हे प्राणी डिस्टर्ब होत असतीलच. तसेच फिरताना काही ठिकाणी फुटलेल्या बाटल्या दिसतात त्यावरून घडणारे गैर प्रकार लक्षात येतात. आणि सगळ्यात मोठा धोका म्हणजे डेव्हलपमेन्टच्या नावाखाली पसरत असलेला अजगर चहूबाजूनी ही टेकडी गिळंकृत करेल की काय अशी भिती वाटते.
दाट झाडी, लाल नसले तरी मातीचे रस्ते, व स्वयंचलीत वहानांपासून मूक्त, ही टेकडी म्हणजे पुण्यातलं माथेरानच आहे.

(हे जुनच लिखाण आहे, रंगीबेरंगीत परत लिहीत आहे)

सुधीर
007.jpg

प्रकार: 

सुधीर, ही टेकडी मी लहानपणापासून पाहिलेली आहे, आम्ही नेहमीच दुसर्‍या बाजूने चढलो. साधारण १५-२० वर्षांपूर्वी तेथे मोर आले. आणि ती हरणे म्हणजे भेकरे आहेत बहुतेक. मस्त भाग आहे हा. पूर्वी तर तेथे वरती एक ग्राउंड ही होते, तेथे जाऊन मॅच खेळल्याचे आठवते. माझा एक ए.आर्.ए.आय. मधे नोकरीला असलेला मित्र पूर्वी 'टेकडी चढून' ऑफिसला जात असे Happy बहुधा त्या आधी कोथरूड भागातून फारसे कोणी तेथे येत नसत. मला वाटते मागच्या काही वर्षांत ही टेकडी गजबजली. गर्द झाडी, वेगवेगळे प्राणी आणि शहराचे views यामुळे तेथे जायला मस्त वाटायचे! पुढे चतु:श्रुंगीच्या बाजूला जाताना एक शंकराचे देऊळ मधे आहे (साधारण त्या टॉवर जवळ) तेथे महाशिवरात्रीला खूप गर्दी होत असे, आता माहीत नाही.

बर्‍याच वर्षांत गेलो नाही, पण सगळ्या आठवणी परत आल्या. धन्यवाद हे लिहिल्याबद्दल!

सगळ्या आठवणी जाग्या झाल्या...मी बर्याच वेळा जायचे.. शिवाय माझे बाबा ए.आर्.ए.आय मधे असल्याने खूप वर्षांपासून तिथे येणं,जाणं होतं..पावसाळ्यात मोर दिसायचे! अगदी सहज फिरता फिरता दिसायचे.. आजकाल असे नाही दिसत्..मी तर खूप वर्षात तिथे मोर नाही पाहीला..(मला नाही दिसला..)
पण एकंदरीत खूप मस्त जागा आहे पुण्यातली! संध्याकाळी ए.आर्.ए.आय किंवा कांचनगल्ली साईडनी चढून ,खाणी पर्यंत जाऊन मस्त सुर्यास्त पाहून परत आले की इतकं फ्रेश वाटायचं! श्या...am missing tekadi!! Sad

farend, भाग्यश्री

अभिप्रायाबद्दल धन्यवाद,

खरच अजूनही बराच भाग छान आहे इथला. पण गेल्या २,३ वर्षात खुपच नुकसान होत चालल आहे. आणि टेकडीला चिकटून इमारती होऊलागल्यानी झाडं कमी झाली आहेत, प्राणी पक्षीही डिस्टर्ब होत असतीलच. हल्ली तर वस्त्यांमधे वानरं फिरू लागली आहेत.

हा फोटोतला मोर तिथलाच आहे.

सुधीर

वर्णन आणि खुप सुंदर फोटो Happy
आता तिकडे बरीचशी बांधकाम होत आहेत का??
MIT तर टेकडीवरच आहे की. आणि त्याच्या बाजुला देखिल बरीच बांधकाम दिसतात.

MIT टेकडीवर नाहीय्,पायथ्याशी आहे.. पण आम्ही लास्ट इयरला असताना टेकडीवर एक Sigma one नावाचा प्रोजेक्ट सुरू करण्यावरून खूप वाद झाले होते.. पण तो पास झालाच, आणि ते बांधकाम सुरू झाले... आता काही वर्षात ती टेकडी कितपत टेकडी राहील काय माहीत.. कारण MIT वाले सुद्धा ढीगानी कॉलेजेस काढतायत्,त्या एरीया मधे..

झकासराव, बिएसके, चिनू

प्रतिसादाबद्दल आभार

तो सिग्माचा प्रोजेक्ट पुर्णही होत आला आता, खरच काहीच दिवसात नाहीशी होईल टेकडी.

सुधीर

वर उल्लेख केल्या प्रमाने मि तो लाल किदा पाहिला आहे अतिशय सुन्देर आनि नाजुक असा ह प्रानि फक्त पाव्साल्यात दिसतो.

अतिशय मऊ मखमलि लाल रन्गाचि पाथ असते आनि सगल्यात गम्म्त त्याल हात लावला तर तो त्याचे पाय कासवासारखे आत घेतो आनि त्याचे १ सुन्देर लाल बतन तयार होते. आम्हि असे किदे गोलाकरुन काद्यापेतित थेवायचो. पन आज्काल असे किदे दिसतच नाहित .
मि माझ्या मुलाला अनेक वेला त्याचे वर्नन सान्गितले आहे पन दाखवायचा योग कधि आला नाहि.

मला असे कलले होते कि त्य तेकदिवर अजुन्हि बरेच मोर आहेत्.आनि तेथे फिरायल येनारे लोकच त्यान्च्या खान्याचि व्यवस्था करतात.

अ ले ले ले... असे कशाने ज्याले..... बोबले बोबले का बोलताय?

Happy Happy Happy Happy

गोल्ड

प्रतिसादाबद्दल
धंन्यवाद,

तुम्ही थोडा प्रयत्न करून निट लिहू शकाल, या नव्या मायबोलीत तर ते जास्त सोप आहे.
फॉन्ट्ची माहीती
http://www.maayboli.com/node/974#comment-1845
इथे मिळेल.

सुधीर सुरेख वर्णन केलेले आहेस. मागे एकदा मी ए.आर.ए.आय.मधे कामानिमित्त आलेलो होतो. तेव्हा मी हे सगळे पाहिलेलेच होते. तुझ्या लिहिण्याने पुनर्भेट झाली.

मोराच्या शेपटाच्या टोकापर्यंत प्रकाशचित्र पोहोचले असते तर परिपूर्ण झाले असते. पण मोर एवढा चपळ असतो आणि माणसापुढे जराही टिकत नाही त्यामुळे तसे प्रकाशचित्र मिळणे जरा अवघडच. पुन्हा कधी जमले तर अवश्य काढ.

- नरेंद्र गोळे

गोळे काका

धंन्यवाद

सुधीर
--------------------------------------
हर देशमे तू हर वेषमे तू , तेरे नाम अनेक तू एक ही है
तेरी रंगभुमी यह विश्वंभरा , सब खेलमे मेलमे तूही तो है

<<काही वेळातच माझी उंची एक ते दिड इंच वाढली. मधे मधे दगडांवर बुटाचे तळवे घासून मी ती कमी करत
होतो. >>.....:हाहा:
छान लेख.