जीवनरेखेचा (अप)घात...

Submitted by tilakshree on 22 January, 2008 - 17:38

मुंबईच्या कानाकोपर्‍यातून अव्याहतपणे धावणार्‍या लोकल रेल्वे म्हणजे एक आश्चर्यंच मानले पाहीजे. या देशाच्या आर्थिक राजधानीसाठी लोकल सेवा म्हणजे जीवनरेखांच ठरल्या आहेत. या उपनगरी गाड्या लाखो मुंबईकरांची मनोभावे सेवा करत आहेत. मात्र दिवस-रात्र जीव तोडून धावणार्‍या या गाड्याही आज मुंबईकरांना अपुर्‍या पडू लागल्या आहेत. दिसामासानं वाढणारी मुंबईची सूज हे त्या मागचं एकमेव कारण! बारा- बत्तीस, दोन- तेवीस; असा मिनिटा-मिनिटाचा हिशोब! फास्ट- स्लो गाड्यांची भानगड आणि गर्दीचे अमानुष लोंढे; या सगळ्याला तोंड देत लोकलचा प्रवास करणं म्हणजे येर्‍या गबाळ्याचे काम नोहे! बारा गावचं पाणी पिऊनंही लोकलचा प्रवास जमेलंच असं नाही. त्यासाठी पक्का मुंबईकरंच हवा!!
मुंबईतली 'बेस्ट'ची बस सेवा नावाप्रमाणेच बेस्ट असली तरीही मुंबईच्या वाढत्या पसार्‍याला आणि प्रचंड लोकसंख्येला ती अपुरीच पडते. शिवाय धावपळीच्या दिनक्रमांत लोकलंच सोईस्कर ठरते. त्यामुळे लोकलचा प्रवास मुंबईकरांना अनिवार्यंच आहे.
खरंतर या लोकलचा प्रवास हल्ली अत्यंत असुरक्षित बनला आहे. या मुंबईच्या जीवनरेखेंतला प्रवास कधी जीवघेणा ठरेल; याची शाश्वती उरली नाही. रोज लोकलचा प्रवास करून धडपणे घरी परतणार्‍या लाखो मुंबईकरांचा रोज पुनर्जन्म होतो असं म्हणायला हवं. अक्षरशः जीव मुठीत घेऊन कराव्या लागणार्‍या य प्रवासामुळे मनावर प्रचंड ताण पडतो. या संदर्भात एका वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेली एका वैद्यकीय तज्ज्ञाची मुलाखंत वाचनात आली. त्यात त्याने सांगितलेली माहिती भयानक आहे. त्यांच्या मते लोकलमधल्या प्रवासा दरम्यान; विषेशतः सकाळी आणि संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या मनात निर्माण होणार्‍या तणावाची तीव्रता एका 'माईल्ड हार्ट ऍटॅक' एवढी असते. म्हणजे विचार करा... सकाळी लोकलने कामाला जाऊन संध्याकाळी घरी परतणारा प्रत्येक मुंबईकर दर दिवशी ह्रदयविकाराचे किमान दोन सौम्य झटके सहन करंत असतो!!!
या तणावामुळे असेल कदाचित पण लोकलमधल्या गर्दीत लोकांच्या मनातला क्षोभ अक्षरशः खदखदंत असतो. या क्षोभापाई माणूस सौजन्य आणि माणूसकी विसरून हिंसक बनतो. चढता-उतरताना आपल्या आजू-बाजूला वृद्ध, महिला, मुलं-बाळं कोण कोण आहे हे न बघता रानटीपणाने स्वतःला पुढे दामटणं हे य हिंसकपणाचं सर्वसामान्य रूप! मात्र कधी कधी ए़खाद्या प्रवाशाला चालत्या गाडीतून ढकलून देण्यापर्यंत ही हिंसकता अमानुष आणि जीवघेणी ठरू शकते. विरार- चर्चगेट लोकलमधे बोरिवलीला चढून सांताक्रूझला उतरणार्‍या एका वैमानिकाला कांदिवलीजवळ चालत्या लोकलमधून ढकलून देण्याची घडलेली घटना या अघोरी मानसिकतेची द्योतक आहे.
अशा अमानुष कृत्यांमधे सहभागी असलेला प्रत्येक जण व्यक्तिगत पातळीवर एवढा क्रूर आणि विकृत असेल असं नाही. ही कातावलेल्या रानटी समूहाची नतद्रष्ट मानसिकता आहे. रोज ठराविक वेळेला ठराविक स्टेशनवरून रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांचे आपापले गट तयार होतात. ते तसं होणं स्वाभाविकही आहे.अशा गटांच्या माध्यमातून मैत्रीची वीण घट्ट विणलेले अनेक मुंबईकर प्रवासी बघायला मिळतात्.कुणी लोकलच्या तुडुंब गर्दीतही भजनं गातात. देहभान हरपून! अगदी टाळ मृदुंगाच्या साथीनं. कुणी बॅगा मांडीवर ठेऊन पत्त्याचा डाव मांडतात आणि धावपळीच्या दिनक्रमातही आपलं मन रमवतात.या गटांच्या सहयोग्यांची मैत्री केवळ येण्या-जाण्याच्या प्रवासापुरती उरंत नाही तर त्यातून त्यांचे अनुबंध जुळतात. लोकलमधल्या गर्दीचा गैरफायदा घेऊन छेड्छाड करणारे रोड रोमिओ, खिसेकापू यांचा बंदोबस्त करण्यासाठी नियमित प्रवाशांच्या गटांचं सहकार्य रेल्वे पोलिसांनी अनेकदा मागितलं आणि त्या प्रमाणे ते मिळालंही!! हे सगळं निश्चितपणे कौतुकास्पदंच आहे. मात्र या विधायक बाबींबरोबरच चिंताजनक बाब म्हणजे अशा गटांमधे निर्माण होणारा संकुचित अभिनिवेश! वैमानिकाला चालत्या गाडीतून फेकून देण्यामागेही हीच सामुहिक विकृती होती. हे विकृत मानसिकता निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे मुंबईची वाढती लोकसंख्या; आणि त्याला पुरे न पडणार्‍या आवश्यक सुविधा!!!
विरारच्या प्रवाशांना बोरिवलीकरांचा राग! बोरिवलीपासून चर्चगेटकडे जाणार्‍या आणि चर्चगेटवरून बोरिवलीपर्यंतच येणार्‍या भरपूर स्वतंत्र लोकल असताना विरारहून सुटणार्‍या किंवा विरारकडे येणार्‍या गाड्यांमधे बोरिवलीकरांनी चढू अगर उतरू नये अशी विरारच्या प्रवाशांची अपेक्षा. आणि ती स्वाभाविकही आहे. पश्चिम रेल्वेच्या विरारकडे जाणार्‍या किंवा येणार्‍या लोकल ऐन गर्दीच्या वेळी बघितल्या तर आपण मुंबईत आहोत की बिहार, यु.पी. मधे असा प्रश्न पडावा!!! लोकलच्या इंजिनाला वीज पुरवणार्‍या जाड्या-जुड्या विद्युतवाहक तारांची तमा न बाळगता कुणी ट्रेनच्या डब्यावर बसून प्रवास करतात तर कुणी दोन डब्यांच्या मधल्या 'शॉक-ऍब्सॉर्बर'वर आपला ठिय्या मांडतात. कुणी खिडकींत पाय आणि खिडकीच्या गजावर हाताची पकड अशा अवघडलेल्या अवस्थेंत!! डब्याच्या दारात असलेल्या खांबाला पकडून आणि काठावर कसे तरी पाय टेकवून लोंबकळ्णारे तर शेकडो प्रवासी!! जिथे आपल्याच जीवाशी खेळ; तिथे इतरांच्या जीवाची पर्वा कोण कशाला करणार? य बेपर्वाईतूनच त्या वैमानिकाला फेकून देण्याएवढी जीवघेणी विकृती निर्माण होते. विरार लोकलमधून एखादा बोरिवलीचा प्रवासी ऐन गर्दीत बोरिवलीला उतरू पाहील तर त्याला उतरू दिलं जात नाही. तसंच ऐन गर्दीत बांद्रा ते दादर एवढंस अंतर कापायला 'फास्ट ट्रेन' पकडली तर त्याच्यावर नेहेमीचे प्रवासी डाफरणार!! अशा अनेक कारणांनी किंवा डब्यात होणार्‍या धक्का-बुक्कीवरून अशा छोट्या-मोठ्या चकमकी लोकलमधे सतत घडत असतात.
अशी कुठली दंगा-मस्ती, जाणून-बुजून ढकला-ढकली नसेल तरीही लोकलमधे 'अपघात' होण्यासारखी परिस्थिती नेहेमीच असते.असाच एक अपघात मी उघड्या डोळ्यांनी बघितला. पत्रकारिता करताना प्रेतं बघण्याचे अनेक प्रसंग आले.आत्महत्या केलेल्यांचे मृतदेह,अपघातग्रस्तांची विदीर्ण शरीरं,आगीने होरपळलेले,जमिनीखाली गाडले जाऊन सडलेले, पाण्यात बुडून फुगलेले...... हे सगळं बघून नजर मेली खरं तर!!! पण 'तो' दिवस भयानक होता... एक चैतन्याने मुसमुसलेला जीव 'जाताना' मी डोळ्याने बघितला!!
..... गोरेगावहून चर्चगेटला जाण्यासाठी लोकलमधे चढलो.संध्याकाळची वेळ असल्याने चर्चगेटच्या दिशेला फारशी गर्दी नव्ह्ती. उलट्या दिशेने; म्हणजे विरार, बोरिवलीकडे जाणार्‍या गाड्या मात्र ओसंडून वहात होत्या. मे निवांतपणे खिडकीजवळ स्थानापन्न झालो. शेजारचा 'ट्रॅक' 'फास्ट' गाड्यांसाठी होता. पलिकडे उलट्या; म्हणजे बोरिवली, विरारकडे जाणार्‍या गाड्यांसाठीचा ट्रॅक! तिकडून एक लोकल स्टेशनमधे शिरता शिरतांच गोरेगावला उतरणार्‍यांमुळे डब्यांत ढकला-ढकली झाली असावी... त्या रेटा-रेटींत दारांत लोंबकळणारा एक मुलगा... नुकतांच तरुणाईंत प्रवेश केलेला कॉलेजकुमार खांबाचा हात सटकून खाली पडला. तो ही शेजारच्या रुळांमधे... डोळ्याची पापणी लवते-न-लवते तोच... रुळावरून विरारकडे जाणारी डबलफास्ट लोकल त्याच्या देहाच्या चिंधड्या उडवंत मार्गस्थ झाली!!! या भीषण प्रकाराने सर्वंच प्रवासी थिजून गेले. पण बहुतेकांना सावरायला वेळ लागला नाही. कदाचित पक्क्या मुंबईकरांना हे नित्याचं असावं. डब्यातल्या प्रवाशांचे सुस्कार... दु:ख व्यक्त करणारे च... च... किंवा तत्सम आवाज... कुणी मुंबईतल्या असुरक्षित आयुष्याबद्दल चिंता व्यक्त केली; तर कुणी उमलत्या वयातच काळाचा अकाली घाला पडलेल्या त्या नवयुवकाबद्दल हळहळ... साधारणपणे आठ- दहा वाक्यात हा दुखवटा संपला. "अब कम सें कम दस-पंधरा मिनट तो अपनी गाडी नही निकलेगी।" कुणीतरी आपलं खरं 'प्रॅक्टिकल' दु:ख बोलून दाखवलं!!! त्यांच्यासाठी हे 'रुटीन' असेलही... मी मात्र उपरा... हे विदारक दृश्य मला सतत छळंत राहिलं... तब्बल तीन दिवस....

गुलमोहर: 

डोळ्यासमोर लोकलमधले सगळे प्रसंग अगदी व्यवस्थित उभे राहिले.. माझे जवळ जवळ सगळेच नातेवाईक मुंबईतच पसरलेले असल्याने
अगदी शाळेत असल्यापासुन मुंबईच्या बर्‍यापैकी फेर्‍या झाल्या आहेत आणि या लोकल्सचाही भरपूर अनुभव घेतलाय.. लोकल्समध्ये चालणारे निरनिराळे प्रकरही पाहिले आहेत.. नशिब एकच की चालत्या गाडीतुन ढ्कलुन देण्याचे किंवा लोकलखाली येऊन माणसाच्या चिंधड्या उडण्याचे भयानक प्रकार तरी पहायची वेळ अजुनपर्यंत आलेली नाही कधी.... बाकी तुम्ही वर्णन केलेल्या सगळ्या गोष्टी मी लोकलमध्ये अनुभवल्या आहेत..

ह्या विषयावर लिहायचं ठरवलं तर किती लिहू आणि किती नको असं होईल. ह्या लोकलचा प्रवास आमच्यासाठी दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ही अशी लोकलमधून ढकलून देण्याची घटना पूर्वी घडली होती, तपशील नीट आठवत नाहीत पण मुलुंड - ठाण्याच्या मधे महिलांच्या प्रथम वर्गात असं झालं होतं.

तुमचे सर्व लेख वाचले आणि वाचायला आवडले. असेच लिहित रहा.