पुस्तकपरिचय : मुसलमान मराठी संतकवी

Submitted by राजू on 12 September, 2009 - 11:46

मुसलमान मराठी संतकवी
लेखक : रा. चिं. ढेरे
पद्मगंधा प्रकाशन
प्रथमावृत्ती : १९६७, तृतीयावृत्ती : २००८.

महाराष्ट्राची अध्यात्मिक विचारधारा गेली अनेक शतके संतांनी आपल्या अमृतवाणीने समृद्ध केलेली आहे. या विचारधारेत जसे तळागाळातील अठरापगड जातींचे जनसामान्य सामील झाले, तसेच इतर धर्मातील लोकही सामील झाले. मूळचे मुसलमान असलेले परंतु हिंदू विचारसरणीच्या प्रभावात येऊन ज्या संतांनी काव्यरचना केली, अशा काही कवींची ओळख लेखकाने या पुस्तकात करुन दिली आहे. या पुस्तकाचा हा लहानसा परिचय.

पुढील संतकवींचा परिचय या पुस्तकात आहे:
१. शहा मुंतोजी ब्रह्मणी
२. हुसेन अंबऱखान
३. अलमखान
४. शेख सुलतान
५. शेख महंमद
६. शहामुनी
७.बाजीद पठाण, शहाबेग, शकरगंज, शहा नवरंग, जंगली फकिर सय्यद हुसेन, शहा हुसेन फकीर, सय्यद महंमद, शेख सली महमद, लतीफशाह इत्यादी.

१. शहा मुंतोजी ब्रह्मणी
बहामनी राजघराण्यात जन्म झालेल्या मुंतोजीस वैराग्य उत्पन्न स्वामी सहजानंद यांचा अनुग्रह प्राप्त झाला. सहजानंदांनी त्याचे नाव मृत्युंजय असे ठेवले, आणि ज्ञानसागरानंद असे सांप्रदायीक नाव दिले. मृत्युंजयाचा परमार्थातील अधिकार ओळखून त्याला "ब्राम्हण" करण्याचा प्रयत्न सहजानंदांनी केला, पण तत्कालीन कर्मठ ब्राम्हणांनी तो सफल होऊ दिला नाही. नारायणपूर येथे त्याची समाधी आहे. मृत्युंजयाने पुढील ग्रंथ लिहिले :
१. सिद्धसंकेत
२. अमृतसार
३. अद्वैतप्रकाश
४. प्रकाशदीप
५. स्वरुपसमाधान
६. पंचीकरण
७. गुरुलीला
८. विवोकोपत्ती
९. अनुभवामृत

आपला अध्यात्मिक अनुभव त्याने एका अभंगात मांडला आहे:

बीजें भाजुनि लाह्या करणें | तैसे आम्हां येणें जाणें ||
आकारासी नाहीं ठाव | देहीं प्रत्यक्ष दिसे देव ||
साखरेचा नव्हे ऊस | तैसे आम्हां गर्भवास ||
कापूरदहनीं नुरे मसी | तैसे जालें मृत्युंजयासी ||

आणि आपल्या उदार दृष्टीने लिहीले आहे:
शाह मुतबजी ब्रह्मणी | जिनमें नहीं मनामनी |
पंचीकरण का खोज किये | हिंदु-मुसलमान येक कर दिये ||

२. हुसेन अंबरखान
हुसेन अंबरखानाने गीतेवर "प्रतिश्लोकी" टीका लिहिली आहे. या ग्रंथाचे नाव "अंबरहुसेनी" आहे.
आपली भूमिका स्पष्ट करताना तो म्हणतो :
येथे न लिहिणे अव्ययार्थ | आणि संपूर्ण पदांचा अर्थ |
विचारुनिया वाक्यार्थ | तात्पर्यार्थ लिहिजे ||

ग्रंथारंभी गणेशवंदन करताना तो म्हणतो :
भेदाभेदाचा आग्रह उदंड | तोचि विघ्नसमूह प्रचंड |
तयाते नाशिता जो वक्रतुंड | तया नमस्कारु ||

३. अलमखान
सुरुवातीपासूनच प्रपंचाविषयी उदासीन असणार्‍या अलमखानावर वडवाळच्या नागनाथांनी अनुग्रह केला. याने अनेक स्फुट पदे लिहिली आहेत. त्यांची ज्ञानेश्वरांच्या आत्मानुभवाशी जवळीक जाणवते. उदाहरणार्थ खालील पद पहा:
आज मोठा आनंद झाला माय |
माझा मज भेटला गुरुराय ||
कूर्मदृष्टी करितां अवलोकन |
तेणें गेलें मनाचे मनपण ||
स्वानंदाचा भरपूर लोट झाला |
तत्क्षणी आलमखान बुडाला ||

करळी येथे अलमखानाची समाधी आहे.

४. शेख सुलतान
शेख सुलतान हा शाहिर होता. सातार्‍याजवळच्या गोपाळनाथांच्या कृपेने तो कीर्तने करु लागला. काही हिंदी आणि मराठी पद्यरचना त्याने केली आहे. मराठी पद्यांमध्ये खालील कथांचा समावेश आहे:
१. सती अनसूया २. गणपतिजन्म ३. हनुमंतजन्म ४. कोल्ह्याट्याचे चरित्र ५. शिवरात्रिकथा.

४. शेख महंमद
शेख महंमदाला महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. मालोजीराजे भोसल्यांनी याला गुरू मानले होते. तसेच समर्थ रामदासांनी याच्यावर आरती रचली आहे. शेख महंमद व जनार्दनस्वामी हे गुरुबंधू होत.
त्याच्या रचना अशा:
१. योगसंग्राम २. पवनविजय ३. निष्कलंकप्रबोध

खाली काही शेख महमंदाच्या रचना देत आहे:
देवता असत्या सामर्थ्यपणे | तर तोंडावर का मुतती श्वानें |
प्रसिद्ध देखोनी झकली अज्ञाने | कनिष्ठ भजन करिती ||

सचापीर कहे मुसलमान | मर्‍हाटे म्हणती सद् गुरु पूर्ण |
परी दोहींत नाही भिन्नपण | आखे खोल देखो भाई ||

उत्तम कुळी काय | जाणावी विप्राची |
जो नाहीं हरीची | बोधे भक्ती ||

शेख महंमद | हृदयीं गरोदर |
गर्भीं सर्वेश्वर | सामावला ||

४. शहा मुनी
शहामुनीस मुनिंद्रस्वामीचा उपदेश प्राप्त झाला होता. बीडजवळ त्याची समाधी आहे. याने "सिद्धांतबोध" हा ग्रंथ रचला. सुरुवातीस हा महानुभाव पंथीय असून शेवटी त्याने अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार केला आहे. जन्मजात उच्च्ननीचतेवर याचा विश्वास नाही. तो म्हणतो :
देवाची भक्ती चोखामेळा करी | त्यासी लोक धरिती दूरी |
वैकुंठी महारवाडा वेगळा करी | नांदावया तयासी ? ||

मूळ पुस्तक ओघवत्या शैलीत लिहिलेले असून या संतकवींच्या मूळ रचना वाचण्याची प्रेरणा देते. तसेच हिंदू -मुसलमानांमधील अध्यात्मिक देवाणघेवाण आणि संघर्ष यांची आपल्याला कल्पना येते.

गुलमोहर: 

राजू,
पुस्तकाच्या सन्दर्भाबद्दल धन्यवाद. खुप उपयुक्त माहिती आहे.

मराठीमध्ये सुद्धा मुस्लिम संतकवी आहेत हे माहीत नव्हते.
या उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद. यामध्ये कोणी सूफी कवींनी मराठीमध्ये रचना केल्या आहेत काय?

मेधा,
शेखमहंमद व जनार्दनस्वामींचे गुरु चांद बोधले हे सुफी परंपरेतील होते. त्या अर्थाने शेख महंमद सुद्धा सुफी म्हणता येईल. दत्तसंप्रदायावर सुफी विचारांचा प्रभाव आहे. अधिक माहीती उपलब्ध झाल्यास लिहीन. कुणास माहिती असल्यास कृपया पोस्ट करावी.

धन्यवाद राजू.
माहितीबरोबरच त्यांच्या काही रचना उपलब्ध असतील तर लिहा.
हिंदीतील सूफी काव्य वाचलेले आहे पण मराठीतील सूफी काव्य वाचण्याची आता उत्सुकता आहे.
दत्तसंप्रदायावर सुफी विचारांचा प्रभाव आहे. >> हे सुद्धा माहीत नव्हते. दत्तसंप्रदायात सूफी विचारांवर आधारीत काही रचना असल्यास त्या पण लिहा.

राजू, चांगली माहिती आहे. धन्यवाद. ८ व्या शतकापासून ते १७ व्या शतकापर्यंत भारतात खूप हिंदूंचं इस्लामात धर्मांतर झालं. धर्मांतरानंतर १-२ पिढ्यातरी त्यांच्यावर हिंदू धर्माचा पगडा असायचा कारण खूपदा हे धर्मांतर जबरदस्तीने मनविरुद्ध केले असायचे, पण परत हिंदू धर्मात येण्याचा मार्ग नसायचा. काही संतकवी हे ह्या वर्गातले पण असण्याची शक्यता आहे.

>> मृत्युंजयाचा परमार्थातील अधिकार ओळखून त्याला "ब्राम्हण" करण्याचा प्रयत्न सहजानंदांनी केला, पण तत्कालीन कर्मठ ब्राम्हणांनी तो सफल होऊ दिला नाही.>> ही एक शोकांतिका होती पण हा ह्या चर्चेचा भाग नाही.

हे पुस्तक शोधून नक्कीच वाचेन. धन्यवाद.