मंजूर नाही

Submitted by क्रांति on 11 September, 2009 - 05:01

नको बंधने, जाच मंजूर नाही
नदीला किनाराच मंजूर नाही !

कशी साथ द्यावी तुझ्या कीर्तनाला?
मृदंगास ठेकाच मंजूर नाही !

तुला शिंपडावे सुखाच्या सरींनी,
तुझ्या श्रावणालाच मंजूर नाही

हसू तेच ओठी, खळी तीच गाली,
कशी आज ही लाच मंजूर नाही ?

तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही !

मिळेना तुझ्या साक्षिने न्याय येथे,
दिलेला पुरावाच मंजूर नाही

लपेटून घ्यावे तुला मी, मला तू,
दुरावा कुणालाच मंजूर नाही !

अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा,
'तुझी भेट आताच मंजूर नाही '

गुलमोहर: 

मस्त. Happy

नको बंधने, जाच मंजूर नाही
नदीला किनाराच मंजूर नाही !
तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही !

अतिशय सुन्दर.

क्रांती,
तुला अव्वल सलाम.
तुझ्या प्रतिभेला ती नेहमीची गोड गोड विशेषणे लावणे आम्हास मंजूर नाही.
अस्सल आणि तेजस्वी कविता Happy

ह्या गझलेच तसच रचनेचं कोणी रसग्रहण करू शकेल का??
बर्‍याच गोष्टी झेपल्या नाहीत.. Sad शब्दांची कारागरी खूपच ओढून ताणून आणल्या सारखी वाटली.. सहजपणा नव्हता.. च उगीच वाटला काही काही ठिकाणी...

नको बंधने, जाच मंजूर नाही >>>>> ठिके पटलं...
नदीला किनाराच मंजूर नाही ! >>>>> किनारा नसेल तर नदी define कशी होणार ???? म्हणजे जो काय पाण्याचा साठा/प्रवाह आहे.. त्याला रूंदी पेक्षा खूप जास्त लांबीचा किनारा असेल तर त्याला ढोबळ मानाने नदी म्हणता येईल.. पण जरा किनारा नसेल तर ती नदी राहिलच कशी ??

कशी साथ द्यावी तुझ्या कीर्तनाला? >>>> हे ही पटलं
मृदंगास ठेकाच मंजूर नाही ! >>> परत वरच्याच सारखं.. मृदंग हेच मुळात तालवाद्य आहे.. जर ठेका नाही तर मृदंगातून सुर येणार का ??? मला ह्या उपमा अजिबात कळत नाहियेत.. !!!!! Sad

तुला शिंपडावे सुखाच्या सरींनी, >>>>ok..
तुझ्या श्रावणालाच मंजूर नाही >>>> म्हणजे ?? "तुला शिंपडावे सुखाच्या सरींन" हे तुझ्या श्रावणाला मंजूर नाही असा अर्थ आहे का ? आणि तुझा श्रावण म्हणजे नक्की कोण ?? सखा, सोबती, प्रियकर, नवरा की अजून कोणी ?? तसं असेल तर त्याला श्रावणाची उपमा का ? म्हणजे प्रियकरात आणि श्रावणात काय साम्य आहे.. आणि जर श्रावण = सखा, सोबती, प्रियकर, नवरा हे assumtion बरोबर असेल तर त्याला तुमचं (म्हणजे जी कोण "तुला" मधे आहे तीच) सुख का नकोय ??? मला आता कॉनोटेशन पण कळत नाहिये.. Sad

हसू तेच ओठी, खळी तीच गाली,
कशी आज ही लाच मंजूर नाही ? >>>> हा शेर जरा जरा कळल्यासारखा वाटतोय..

तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही ! >>>> वसंताचा जाच म्हणजे नक्की काय ? फुलणे = जाच असं अभिप्रेत आहे का ?

मिळेना तुझ्या साक्षिने न्याय येथे,
दिलेला पुरावाच मंजूर नाही >>> हे पण जरा साधं सोप्प असल्याने कळल्यासारखं वाटतय ?

लपेटून घ्यावे तुला मी, मला तू,
दुरावा कुणालाच मंजूर नाही ! >>>> गझलेमध्ये प्रत्येक शेर हा independant असतो असं काशा मधे सांगितलं होतं.. पण मला एकूण मुडच कळत नाहिये.. एकत्र यायचं आहे की नाही ????? ह्या शेरात दुरावा मंजूर नाही म्हणतायत.. वर फुलणं मंजूर नाही म्हणतायत.. Sad

अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा,
'तुझी भेट आताच मंजूर नाही ' >>>>> परत एकदा पलटी..

माफ करा मला कविता अजिबातच कळत नहित.. गझल कार्यशाळेत्भाग घेतला होता म्हणून कधी कधी गझलांवर नजर टाकतो.. पण ह्यात खूपच confusion झालं.. म्हणून एव्हडं लिहिलं.. please रसग्रहण करा..

नेहमीप्रमाणे उत्तम !!!
तुला शिंपडावे सुखाच्या सरींनी,
तुझ्या श्रावणालाच मंजूर नाही - हा शेर जालीम .....

गझल या प्रकाराचं वैशिष्ट्य हेच आहे, की त्यातील प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते, त्यामुळे त्यातल्या प्रत्येक द्विपदीचा अर्थ आणि मूड देखिल वेगवेगळा असू शकतो. एकाच गझलमध्ये दोन परस्परविरोधी विचार दोन वेगवेगळ्या शेरांमध्ये मांडले जाऊ शकतात. गझल प्रकाराबद्दल आणखी विस्तृत माहिती घ्यायची असेल, तर इथे अवश्य भेट द्यावी.
नदीला किनाराच ------ इथे रूढ अर्थाने किंवा भौगोलिक अर्थाने नदी आलेली नाही, तर मनाच्या अवस्थेला नदीची उपमा दिलेली आहे. मनाला बंधने नको आहेत, मुक्तपणे वहायचं आहे, म्हणून किनारा नको आहे. किनारा हे एक बंधनच ना! [तसा सध्या यमुनेलाही किनारा मंजूर नाहीय, उफाणून वहातेय किनार्‍याचे बंध तोडून!:) ]
मृदंगास ठेकाच----- हा देखील उपमेचा भाग आहे. एखाद्या व्यक्तीला आपण इतकं गृहीत धरतो, की त्याच्या मनाचा विचार न करता अपेक्षा करत रहातो. जसं मृदंग हेच मुळात तालवाद्य आहे.. जर ठेका नाही तर मृदंगातून सुर येणार का ???
हे आपल्याला वाटलं. पण कधीतरी त्या व्यक्तीला बंडखोरी करावीशी वाटते, अशा वेळी मृदंगास ठेकाच मंजूर नाही अशी अवस्था होते. [एकदा खरोखरच मृदंगाच्या नाही, पण तबल्याच्या बाबतीत हा अनुभव घेतलेला आहे. घरगुती भजनाच्या कार्यक्रमात तबला काही केल्या सुरात लागायला तयार नव्हता! काय बिनसलं होतं त्याचं, देव जाणे! बरं, कार्यक्रम घरगुती असल्यानं पर्यायी व्यवस्था नव्हती! अखेरीस टाळ आणि टाळ्या यांच्या तालावर कार्यक्रम उरकावा लागला! Wink
तुला शिंपडावे---------- इथे श्रावण म्हणजे जोडीदारच. एखाद्यानं/एखादीनं सुखात असावं, हे त्याच्या/तिच्या जोडीदारालाच नको आहे. त्याचीच इच्छा नाही, तू सुखात असावंस अशी! अशा अर्थाचा तो शेर आहे. असतात असेही काही महाभाग! बरेचदा साध्या साध्या गोष्टीतही जोडीदाराचा विचार न करता मनमानी केली जाते, अशा वेळी त्याला/तिला काय यातना होत असतील, हे मनातही येत नाही! आणि हे वारंवार होत रहातं, त्यावेळची ही अवस्था असते. पुन्हा तेच, समोरच्याला गृहीत धरणे!
तुझ्या सांगण्यानेच----------- सर्वसाधारणपणे वसंत हा फुलायचा ऋतू आहे, असं मानलं जातं. पण वसंतातच फुललं किंवा बहरलं पाहिजे, असं मनाला बंधन थोडंच असतं? ते तर ग्रीष्मातही फुलू शकतं, गुलमोहरासारखं! फुलणे हा जाच नाहीय, पण वसंत [रूढ अर्थानंच नाही, वसंत म्हणजे तारूण्य असा इथे अर्थ घेतलाय.] असतानाच फुलावं, बहरावं असं आवश्यक नाही. कित्येकदा आयुष्याच्या वसंतात बहरण्याची संधी मिळत नाही! जबाबदार्‍या, कर्तव्यं यांच्या जंजाळात फुलायचं, अर्थात स्वतःला व्यक्त करायच राहूनच जातं! मग जेव्हा हा वसंत सरतो, तेव्हा जाणवतं की आपण कधी बहरलोच नाही, आता संधी मिळतेय, तर का सोडा? Happy
लपेटून घ्यावे--------- वर सांगितल्याप्रमाणे गझलमधील प्रत्येक द्विपदी ही स्वतंत्र कविता असते, त्यामुळे मूड वेगवेगळे असू शकतात. आणि आणखी एक महत्वाचं, की प्रत्येक अनुभव, अनुभूती ही व्यक्तिगत, स्वतःची असते, असं नाही! प्रत्येक वेळी एकच मनस्थिती असते, असं नाही. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे विचार मनात येऊ शकतात. वरच्या द्विपदीतलं फुलणं इथे अपेक्षित नाहीय!
अरे त्या उद्याला------------"उद्या"च्या शेराचा अर्थ असा आहे की, वर्तमानाचा विचार सोडून भविष्यात काय आहे, हे पहाण्याचं वेड असतं नेहमीच माणसाला. त्या नादात वर्तमानाकडे दुर्लक्ष झालं, तरी बरेचदा आपण तेच करत रहातो. त्या उद्याला आताच भेटण्याची इच्छा नाहीय, आज फक्त आजच जगायचा आहे, या अर्थाचा तो शेर आहे.
थोडाफार असा!
माझ्या अल्पमतीप्रमाणे ही गझल अशी उलगडली आहे! कविता वाचणार्‍याला तिचा अर्थ आणि संदर्भ जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्यामुळे आपल्या प्रतिसादाचं स्वागत! काही अपरिहार्य कारणांमुळे उत्तरास विलंब झाला, क्षमस्व!
[स्वगतः- हे जरा 'गझल नको, पण रसग्रहण आवर' असं तर नाही झालं ना?] Wink

हसू तेच ओठी, खळी तीच गाली,
कशी आज ही लाच मंजूर नाही ?

तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही !

खुपच सुरेख..

आणी शेवटचा शेर तर निव्वळ अप्रतिम....

क्रान्ती,
जबरदस्त...
कशाला मर्यादा हवी आणि कशाला नको हे आपण कोण ठरवणार?
आवाज उठवणारी कविता.. Happy

पुलेशु.

क्रांति,
सुंदर गझल....
रदीफ छान पेललाय...

तुला शिंपडावे सुखाच्या सरींनी,
तुझ्या श्रावणालाच मंजूर नाही
याचा मी खरोखर पाऊस असाच अर्थ घेतला होता.. आणि माझ्या डोळ्यासमोर गरीब घराच्या पत्र्यातून गळणारा पाऊस आला.
तुमच्या रसग्रहणामुळे आणखी वेगळा अर्थ लागला.. वा...

तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही !
सुंदर...

पण काही ठिकाणी संदिग्धता वाटली..
लपेटून घ्यावे तुला मी, मला तू,
दुरावा कुणालाच मंजूर नाही !
इथे""कुणालाच""जरा संदिग्ध वाटला मला.. म्हणायचं आहे की दोघांनाच दुरावा मंजूर नाही, आणि शब्द आलाय" - "कुणालाच", अर्थात, वृत्तामुळे ते बंधन आलं असावं असं मला वाटतं.. गझलेमध्ये तंत्रही सांभाळावं लागतं, त्यामुळे हे व्हायचच....

'तुझी भेट आताच मंजूर नाही '
सांगता नाही येत, पण काहीतरी शब्दप्रयोगात कमी वाटतंय..
(ही सारी माझी मते आहेत, हे सांगायला नकोच.. :))
चुभूद्याघ्या.

क्रांती, रसग्रहण लिहिल्याबद्दल धन्यवाद.. Happy

नदी आणि मृदूंग हे दोन्ही शेर मी जरा जास्त practicle किंवा logical नजरेतून वाचले असं मला आता वाटयत.. तुम्ही लिहिलेलं एकदम पटलं.. म्हणजे काव्यामधे असं होऊ शकतं..

वसंत.. "जाच" म्हणजे नक्की काय हे कळल्यावर आता अर्थ लागतोय.. तुम्ही अर्थ खूपच छान समजावून सांगितलाय.. !!

लपेटून घ्यावे.. आणि अरे त्या उद्याला.... गझलेबाबतच्या तांत्रिकतेत ते बसत असलं तरी मला त्या जागी आधीच्याचा अर्थाचा शेर आवाडला असता.. तसच तुला शिंपडावे आणि वसंत हे दोन शेर पण एकत्र असणं somehow आवडलं नाही.. अर्थात हे वैयक्तीक मत.. Happy

आता नीट अर्थ कळल्यावर नदी तसेच वसंताचे शेर आवडले...

रसग्रहण लिहिल्याबद्दल तुम्हाला परत एकदा धन्यवाद.. पु.ले.शू.

क्रांती,

तुझी ग़ज़ल आणि रसग्रहण दोन्ही अत्यंत सुंदर! व्वा! धन्य झाल्यासारखे वाटते.

"तिची दृष्ट काढा, तिला तीट लावा,
नजर लावणाराच मंजूर नाही !"

शरद

वा... वा..

तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही !

सुंदर गझल....

आमचे उपसंपाद्क
माणिक सावंत यांना ही गजल खूप आवडली

सुंदर आहे गजल पण आणी तिच्या वरिल रसग्रहणपण फारच सुंदर आहे !
गजलेचा प्रत्येक शेर म्हणजे एक कविता असते अगदि बरोबर आहे .
आपण मोठ मोठ्या साहितिकांच्या सहवासात आल्यासारखं वाटलं !
....धन्यजाहलो !.....

Pages