दुसरी आई

Submitted by सुनिल परचुरे on 8 September, 2009 - 07:32

---------------------------------------------------दुसरी आई--------------------------------------------------------------------------
``आजी , आम्ही आलो`` सुनित,विनित दोघेही धावतच आजी जवळ गेले. ``अरे या या`` म्हणत आजी दोघांना बिलगली ``कधी आलात रे तुम्ही सर्वजण ?``
``हे काय आत्ताच येतोय`` सुनित म्हणाला.
``आजी ह्या टर्मीनल एक्झाममध्ये मी पहिला आलो तर हा दुसरा - विनित म्हणाला.
``अरे व्वा, म्हणजे आम्हाला दोघांनाही पेढे द्यावे लागतील`` आजी म्हणाली.
``हे बघ आई, तु घरी कधी जाणार आहेस. मला तुला एक बातमी द्यायची आहे. मुद्दामच आधी तुला सांगितली नाही`` मी म्हणालो.
" तासाभरातच मि येते."
``ठीक आहे, त्याप्रमाणेच आम्ही सर्वजण येतो`` मी म्हणालो.
तुम्हाला वाटेल मी कोण, माझी मुल कोण, ही आजी कोण ? सर्वच तुम्हाला सांगतो. एक वेगळीच कहाणी माझ्या आयुष्यात घडली.
मी म्हणजे आनंद जोगळेकर, मुळचा मी रत्नागिरी-पावस रस्त्यावर एक छोटे समुद्र किनारी गांव आहे, तिथला. आमचे एक छोटसच घर आहे. पाच पन्नास सुपारी-नारळाची झाड आहेत.थोडि भातशेति आहे. माझ्या वडलांची खुप इच्छा होती मी असली वाडीतली काम करु नये, शिकाव. त्यामुळे मी रत्नागिरीतुनच कॉम्फ्युटर इंजिनियर झालो. मुंबईला एका कंपनीत मला जॉबही मिळाला. नोकरी लागुन सहा महिनेसुध्दा झाले नसतील तर अचानक माझी आई नाग चाऊन वेळेवर औषधोपचार न झाल्याने गेली. एखाद्याच्या नशिबात सुखच नसते. आता कुठे मी आयुष्यात उभा रहात होतो. आई आता सुखाचे दिवस बघणार होती, पण नाही . ती गेली. वडिल म्हणाले मी होतय तितके दिवस इथेच गावी राहतो. मधुन मधुन तुच येत जा. माझी नोकरी नवीन होती. घरही भाडयाचेच होते. असेच दिवस ढकलत होतो.
काही महिन्यांनी आमच्या ऑफिसची ट्रिप माथेरानला आली होती. वर आल्यावर सर्वच जणांची चालुन दमछाक झाली होती. चहाची तल्लफ सर्वांनाच आली. म्हणून माथेरान स्टेशन बाहेरच समोर एक छोटेसे खोपटेवजा हॉटेल होते. बाहेर गाडीवर रानमेवाही ठेवला होता. सर्वजणांनी आधी जांभळे, तिखटमिठ लावलेल्या कै-यांच्या फोडी, करवंदावर ताव मारला. मग गरमागरम चहा.
``किती झाले पैसे ?``
``नऊ चहा व ह्या एवढया फ्लेट मेवा धरुन 80 झाले``,
55 च्या आसपास एक बाई म्हणाली, सहावारी साडी, ठसठशीत कुंकु. मुख्य म्हणजे स्वच्छ बोलण, मला आश्चर्यच वाटले.
``हे घ्या 100 रुपये, काय हो तुम्ही अगदी व्यवस्थित मराठी बोलता.
``हो - हे घे बाकीचे`` त्यां काही जास्त बोलल्या नाहीत.
``अहो - हे - काय तुम्ही मला एक दहाची नोट जास्त दिली`` एक नोट परत करताना मी वाकलो होतो.
त्यांनी ती नोट घेतली व माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शामध्ये मला फक्त आईची आठवण झाली. कितीतरी वर्षे मोठा होईस्तोवर रात्री झोपतांना आई मला डोक्याला तेल लावुन अशी डोक्यावर हात ठेऊन हळुवार थोपटायची.
``तुम्ही इथेच राहता का ?``
``हो - इथे जवळच मागच्या बाजूला घर आहे, पुढच्या वेळी कधी इथे आलात तर चहा फ्यायला इथे नक्की या``.
ही आमची पहिली भेट. ऑफिसची दर दोन तीन महिन्यातुन एकदा तरी माथेरान हि ट्रेकिंग ट्रीप असायचीच. दर वेळेला चहाला तिथेच थांबू लागलो. आजूबाजूचे सगळेजण त्यांना अक्का म्हणून हाक मारत. का माहित नाही पण तिच्यात मी माझ्या आईला शोधु लागलो होतो.
``काय हो आज अक्का दिसत नाहीत त्या ?`` एकदा तिथे गेलो असतांना मी विचारले.
``त्यांना बर न्हाय``
``अच्छा ? काय होतय ?``
``तॉप येतोय ?``
``बर त्या राहतात कुठे ? मला त्यांच घर सांगता का ?
``हे बगा . समोर जे मोठे झाड दिसतय ना त्याच्या खाल्या अंगालाच आहे !``
``बर बर मी शोधतो``.
जवळच काही अंतरावर त्यांच घर दिसल - शोधायला तसा काही त्रास पडला नाही. तशा त्या तिथे फेमस वाटत होत्या.
``आत येऊ का ?``
``कोण ?``
``मी आनंद !``
``अरे ये न ! उठुन बसत त्या म्हणाल्या.
``अहो नको नको - उठून बसु नका. कळले बर नाही. म्हणून बघायला आलो.
``काय रे बाबा - हा ताप काय दोन दिवसांचा साथी, परवापासून परत राहीन की उभी तिथे ?``
घरात शिरतानाच प्रसन्न वाटले. बाहेर छोटस अंगण साफ झाडून सारवलेल होते. बाहेर एक छोटी खोली पण सर्व नीटनेटकी होती. एक लोखंडी कॉट, कपाट, एका बाजूला देवांच्या तस्विरी मध्ये एक मिशिबाज दणकट माणसाचा फोटो होता. कुठेही घाण, कचरा नव्हता.
``तुम्हाला बर नाही तरी तुम्ही घर एवढ स्वच्छ ठेवलय ``
``अरे नाही. माझा मुलगा, सुन इथेच असतात. मुलगा खाली नेरळच्या शाळेत शिक्षक आहे. सुन मला कामात मदत करते``
``मग मला कुठे दिसत नाहीत ती``
``मुलगा शाळेत आहे व सुन औषध आणायला गेलीय``
``खर सांगु तुमच घर बघुन एकदम प्रसन्न वाटल. मला माझ्या कोकणातल्या घराची आठवण झाली. माझ्या आईलाही अशीच घर स्वच्छ ठेवायची सवय होती``.
``होती - म्हणजे-
"गेल्याच वर्षी ती गेली. तुम्हाला एक विचारु रागावणार नाहीत न?"
``अरे विचार - रागावायच काय त्यात``.
``मी तुम्हाला अक्का, काकु किंवा असलच काही म्हणण्यापेक्षा आई म्हणु ? चालेल`` माझा आवाज कापरा झाला. त्यांनी फक्त माझा हात हातात घेतला. त्या स्पर्शातूनच मला त्यांचा होकार कळला. मला खुप हलक वाटत होते. का कोण जाणे पण हे न विचारल्याचा माझ्यावर बोजा होता. खरतर मी एक इंजिनियर,ह्या कोण कुठल्या एक चहाच स्टॉलवाल्या बाई. पण कधीकधी ख-या रक्ताची, नात्याची नाती ही तकलादू असतात. पण आयुष्यात अशा व्यक्ति येतात की त्या आपलाच एक अविभाज्य भाग बनुन जातात.
``काही खायला हवय का ?``
``नको रे, थांब इतक्यात सुनबाई येईल, आज तिच्या हातचा चहा पिऊन बघ``.
``हो चालेल न. हे बघ , मी तुला अत्तापर्यंत माझच सगळं सांगितलय. तुझ तु काहीच कधी सांगितल नाहीस. मी मध्ये एकदा तुला विचारल होत की तु एवढी शुध्द कशी बोलतेस ? सांग नं``
``अरे काय सांगु बाबा माझी कर्मकहाणी"- अस म्हणत ती थांबली तिची नजर एकदम भुतकाळात गेली.
आम्ही खरतर चार बहिणी व दोघे भाउ मिळून सहाजण . आमचे वडिल तेव्हा मुंबईचे हेड पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर होते. खुप मान होता. मोठे रहायला घर, गडी माणसांचा राबता असायचा. मी सर्वात शेंडेफळ, त्यामुळे माझे खुप लाड व्ह्यायचे. सर्वजण आम्ही त्यावेळच्या मोठया शाळेत जायचो. मोठा भाऊ सदाशिव खुप हुषार होता. खरतर ते आयुष्य हे एक स्वफ्नच होते. आता तुम्ही जसे मरिनड्राईव्हवर घोडागाडीतून जाताना तसे आम्ही व्हि.टी. ते गेटवे जायचो. दिवाळी म्हणजे चंगळच असायची. कितितरी ड्रायफ्रुटस यायची. दिवाळी म्हणजे सर्वांना छानछान नवीन कपडे. फराळ, खरच सोन्याचे दिवस होते ते. पण मी तेव्हा 6 वीत होते. त्यावर्षी आमच नशिब जे फिरले ते फिरलेच. वडील अचानक हार्टऍटकने गेलेकाय अन आमच आयुष्यच बदलून गले. त्यांना काय थोडाफार फंड मिळाला त्यात एवढया सगळ्यांची लग्न,शिवाय घरखर्च चालुच. कठीण दिवस होते ते. गरिबी वाईट नसते रे, पण सतत बोट दाखवून तिची आठवण करुन देणारेच वाईट असतात. मामा-काका-आत्या ही नाती हळुहळु दुरावली. मोठया भावाला खर तर खुप पुढे शिकायच होत पण त्याच्यावरच जबाबदारी पडल्याने त्याला तिथेच पोस्टात नोकरी करावी लागली.
पुढे आम्ही ठाण्याला भाडयाच्या घरात शिफ्ट झालो. कधी कधी एखाद दिवस नुसती पातळ भाजी तर पातळ भाजीच पिऊन राहायचो. आम्ही सर्वजण मोठे होत होतो. लग्नाला आलेल्या बहिणी , जस जिला स्थळ मिळाल तशी लग्न झाली . सर्व नोकरदार जावई. माझ्या नशिबी हे होते. पेशाने शिक्षक. हे घर आहे न इथेच मी लग्न होऊन आले. खाली नेरळला शाळेत शिक्षक होते. रोजचा हा प्रवास, त्यांच्या एका ओळखीच्याने थोडी जागा दिली, म्हणून इथेच घर बांधले, तेव्हा आता इतकी हॉटेल्स नव्हती रे.
खाऊन पिऊन का होईना पण सुखी होते. एक लहान मुलगा दिनकर ही झाला. एक दिवस असेच शाळेत पावसाळ्यात शॉर्टकटने जाताना जो त्यांचा पाय घसरला तो घसरत-फरफटत खडकावर आपटतच खाली आले. दोन दिवस बेशुध्दच होते . नंतर गेले. माझ्यावर आभाळच कोसळल. वडील गेले तेव्हा भाऊ-बहिणीचा तरी आधार होता. आता परत मी एकटी झाले. अक्षरश मी वेडिपिशी झाले. पण फक्त मुलाकडे बघुनच मी स्वतला सावरले. म्हटले नाही, आता ह्याच्याकरता तरी आपल्याला जगलेच पाहिजे.
ह्यांच्याच शाळेत मला प्युनची नोकरी मिळाली. संध्याकाळी इथे हळुहळु एका चहाच्या दुकानात कामाला लागले. मुलगाही सकाळी माझ्याच बरोबर शाळेत यायचा. दुपारी आम्ही दोघेही परत इथे घरी येत असू. त्याच खाण , अभ्यास झाला की मी इथे चहाच्या दुकानावर यायचि. जमेल तस रानमेवा म्हणजे सिझनल फळही विकत होते.
पण दैव कस असत बघ. हा मुलगा काही एवढा हुषार निघाला नाही. पण कसबस बि.ए.बि.एड. करुन त्याच शाळेत शिक्षक म्हणून लागला. गेल्याच वर्षी त्याच लग्नही झाल. नंतर हे स्वताच चहाच दुकान टाकल. त्यांनि स्वताचि स्कुटरहि घेतलि. एवढयात त्यांची सुन आली.
``ही औषध आणलयीत, ही आधी घ्या बघु``. तुम्ही होय, चहा टाकते थांबा ?`` अस म्हणत ती आत गेली.
``बाप रे आई, तुमच्या आयुष्यात एवढे चढउतार आले ? खरच धन्य आहे तुमची`` मी म्हटले.
असेच दिवस जात होते. माझीही एकदोन महिन्यातन एकदा चक्कर व्हायचीच. नंतर माझ लग्न ठरल. माझ्या बायकोला - नंदिनिला ही सर्व हकीकत मि सांगितली. तिलाही ह्या नात्याच खुप अप्रुप वाटल्याच पाहून बर वाटल. लग्नात सर्वजण आले होते खास माथेरानहुन. आता त्यांच्या कुटुंबात आईच्या नातवाची सुनितची भर पडली होती.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
``हे काय ! अक्का कुठायत ?`` मी माथेरानमधील आईच्या चहाच्या दुकानाच्या बाजूच्या दुकानवाल्याला विचारले.
``म्हणजे तुम्हाला माहीत नाही ! आश्चर्य आहे. दोन दिवस झाले दुकान बंद आहे. खुप वाईट झाल."
``काय झाल ?``
``आहो दोन दिवसापूर्वी त्यांच्या मुलाचा व सुनेचा ऍक्सीडेट झाला. रात्री दोघेही स्कुटरवरुन खालून येताना कोण धडकल कळलच नाही. बरीच रात्र झाली तरी दोघं का नाही आली म्हणून सगळ्यांनी शोधाशोध केली तेव्हा रस्त्याच्या कडेला ही दोघेही ऑन द स्पॉट गेलेली होती``.
माझे तर हातपाय कापायला लागले. कालच मी मिटींग करता दिल्लीला गेलो होतो. तिथून घरी आलो. हिला आता पाचवा महिना होता, ती एकटी कुठे राहणार म्हणून आईकडे गेली. त्यामुळे त्यांना आमचा कॉन्टॅक झाला नसेल. आम्ही दोघेही धावतच आईच्या घरी गेलो.
एका कोप-यात पार विस्कटलेली आई बसली होती. बाजूलाच वर्षाचा सुनित खेळत होता. आईच्या दोन बहिणीही घरात होत्या. मला बघितल्यावर माझा हात हातात धरुन बांध फुटल्यासारखी हमसाहमशी आई रडू लागली. मी फक्त तिचा हात धरुन बसुन राहलो. नंदिनी त्यांच्या पाठीवरुन हात फिरवत होती. रडण्याचा बहर ओसरल्यावर ति म्हणाली ``आता काय बोलु ? बोलण्यासारख काही राहीलच नाही. बाबा गेले , हे गेले तेव्हा मी देवाशी खुप भांडले होते , आता ती भांडायची ताकदच राहिली नाही. ``कितीतरी वेळ आम्ही असेच बसुन होतो. आई आज मी जात नाही. इथेच थांबलो, उद्या जाऊ, तुम्ही दोघेही येताय का आमच्या बरोबर ?``
``नको रे बाबा``
``बर ठीक आहे, उद्या सकाळी आम्ही येतो``.
हॉटेलच्या रुमवर गेल्यावर काही सुचतच नव्हत. अजुनही मी या धक्यातुन सावरलो नव्हतो. कितितरी वेळ आम्ही दोघेही काही बोलत नव्हतो.
``नंदु - एक विचारु रागावणार नाहीस न ?
``अरे विचार न, अस का बोलतोस`` नंदिनी म्हणाली.
``माझ्या मनात अत्ता एक विचार आलाय. बघ तुला कसा वाटतोय. आता ह्या वयात आईला परत त्या नातवाच एवढया लहान वयापासून कराव लागणार. दिवसे दिवस तीच वय होतय. तिला नुसते पैसे देऊ म्हटल तर ती कधीच घेणार नाही. एकदम मानी आहे. त्यापेक्षा सुनितला जर आपण दत्तक घेतला तर ? म्हणजे तो तसा लहान आहे. त्याला त्याच्या आई-बाबांची आठवणही एवढी राहणार नाही. आपल्यात रमुन जाईल. शिवाय थोडेच दिवसात त्याला खेळायला आणखी कोणतरी येतच आहे की आपल्याकडे, काय वाटत ?``
``आयडिया चांगली आहे मला जर विचार करु देत, सकाळी मी सांगते. झोप आता रात्रीचे 2 वाजलेत.`` नंदिनी म्हणाली.
सकाळी आम्ही आमचे सर्व आटपले, रुम वरुन निघतांना मी नंदिनीला विचारले ``मग काय ठरल तुझ``.
``खर सांगु - मला तुमचा अभिमान वाटतो. सध्याच्या परिस्थितीत हाच एक चांगला मार्ग आहे``.
``थॅक्स``, मी म्हटले व आम्ही दोघेही आईकडे आलो.
थोड इकडचे तिकडचे बोलल्यावर मीच विषय काढला.
``आई मला एक महत्वाच तुझ्याशी बोलायय``.
``बोल बाबा``.
``हे बघ मी जे काही तुला सांगतो आहे ते आम्ही दोघ पुर्ण विचार करुन, ठरवून मगच बोलतो आहे`` तुझी ना नसेल तर सुनितला मी दत्तक घ्यायच ठरवलय``.
आधी आईला पटकन काही समजलच नाही. पण जेव्हा तिच्या चेह-यावर कळल की मी तिला काय विचारतोच तर ति एकदम स्तब्ध झाली.
``आई खरच अस कधी कुणाच झाल नसेल की मी बाळंत व्हायच्या आधीच मला एक मुलगा झाला . मी एवढीच खात्री देऊ शकते की, सुनित मध्ये व माझ्या होणा-या बाळात मी कधीही भेदभाव करणार नाही``. नंदिनी म्हणाली.
नंतर ब-याच दुस-या विषयांवर बोलणी झाली. निघतांना मी म्हटले ``बर आई आम्ही आता निघु? काय ठरवलस तु ?``
``मी नंतर सांगेन`` आई म्हणाली.
नंतर त्या गेलेल्या दोघांचे दिवसही झाले. महिना दोन महिने झाले. नंदिनी बाळंत व्हायची वेळ आली तरीही आईचे एकच, मी सांगते. नंतर बघु. माझ काही ठरत नाही अजून``.
नंदिनी बाळंतीण झाली. मला मुलगा झाला. पाचव्या दिवशी हॉस्पीटलमधून तिला घरी आणल. थोडयाच वेळात दारावरची बेल वाजली. दार उघडल तर दारात आई. सुनितला घेऊन. खरच आमचा आनंद खरोखर द्विगुणीत झाला होता. बारश्याला मुलाचे नांव सुनितच्या जोडीला विनित ठेवले.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
`या - या - अरे बापरे केवढी मोठी झाल्येत दोघेजण`` तिच्या घरात सर्वजण शिरता शिरता आई म्हणाली.
आजी अत्तातर दोन महिन्यांपुर्वी भेटलो होतो. दोन महिन्यात काय एवढे मोठे होऊ ?`` विनित म्हणाला.
``अरे मला बाबा वाटल तस. बर ते जाऊ दे, काय बातमी द्यायची आहे`` आई म्हणाली.
``हं अशी उभी रहा बघु. अस पुर्व पश्चिम कुठे , ह , अशी उभी रहा. आता ही पहिली पत्रिका तुला देत आहे``, मी म्हणालो.
अक्षता लावून पत्रिका मी आईच्या हातात दिली व आम्ही सर्वजण तिच्या पाया पडलो.
``आमचे येथे श्री कृपेकरुन आमचे नातु चि. सुनित व चि. विनित आनंद जोगळेकर यांचा व्रतबंध...........
माझ्या बाबांच्या नांवाने जरी पत्रिका होती तरी खाली दोन्ही आईंची नांवही टाकली होती.
तिने दोन्ही नातवंडाना घट्ट छातीशी धरले. तिच्या डोळ्यात पाणी तरारले होते. माझ्या दोन्ही आईंच्या आत्म्याला शांती लाभल्याचा भास मला झाला.

गुलमोहर: 

----------------------------------------------------------------------------------------कुठे
---------------------------------------------------------गेले -----------------------------------------------छान.

काळजात थेट जाऊन भिडली.-------------------------------काहीच सुचत नाही काय म्हणू.पण त्यानी आईला सुनीत सोबतच घरी आणायला हवे होते.असो.

अप्रतिम सुनिल ...फारच सुरेख..पण एक नाहि कळले..

....माझ्या दोन्ही आईंच्या आत्म्याला शांती लाभल्याचा भास मला झाला.....
दुसरी आई लाच दाखविली ना पत्रिका मग आत्म्याला शांती कशी...म्हणजे generally आपण असे गेलेल्या व्यक्ति संदर्भात म्हणतो ना??

खूपच छान आहे कथा. पण शेवटचे वाक्य खटकले.
<<<<<<माझ्या दोन्ही आईंच्या आत्म्याला शांती लाभल्याचा भास मला झाला>>>>>
आत्म्याला शांती मिळणे असं आपण फक्त मृत व्यक्तींबद्दलच म्हणतो ना... आणी दुसरी आई तर अजुन जिवंत आहे.

सुनिल, कथा अप्रतिम आहेच !! खुप चागली खुलवली आहे. यापुर्विच्या कथाही मी वाचल्या आहेत. नविन कथा केव्हा ??