मायबोलीचा १३ वा वर्धापन दिन

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मायबोलीने या गणेशचतुर्थीला १३ वर्षे पूर्ण केली. गेल्या एका वर्षात (गेल्या गणेशचतुर्थीपासून या गणेशचतुर्थीपर्यंत) आपण काय केले याचा हा एक मागोवा.

मायबोली ही एकच वेबसाईट न राहता आता तो एक वेबसमुह झाला आहे. त्यामुळे त्या समुहातल्या सगळ्या भागांबद्दल लिहितो. तुमच्यापैकी अनेक जणानी गेल्या एका वर्षात मायबोलीच्या वेगवेगळ्या भागाना, छोटासा हातभार लावला आहे. पण त्या छोट्याश्या हातभाराचे आपल्या मायबोली कुटुंबावर झालेले मोठे परीणाम सांगणंही तितकच महत्वाचं आहे.

मायबोली.कॉम
२ वर्षांपूर्वी मायबोली कुटुंबातल्या सगळ्यात जुन्या आणि मोठ्या वेबसाईटचं डृपल या मुक्तस्रोत प्रणालीवर स्थलांतर सुरु केलं ते अजूनही चालूच आहे. सगळा मजकूर अजून नवीन मायबोलीवर आला नसला तरी सगळ्या सदस्य खात्यांचं स्थलांतर नवीन प्रणालीत पूर्ण झालं आहे. सुरुवातीला (आणि अजूनही काही विभागात) खूप अडचणी आल्या. तेंव्हा मायबोलीकरांनी दिलेला पाठींबा आणि सल्ले/कल्पना यांची खूप मदत झाली. खाली दिलेले अनेक उपक्रम ही नवीन प्रणाली नसती तर शक्य झाले नसते. मुख्य म्हणजे एकाच वेळी, वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या मायबोलीकराना (एकमेकांच्या मधे मधे न येता) विविध प्रकल्प राबवणे शक्य झाले आहे.

सुरुवातीला डृपलमुळे, इतर अनेक डृपल आधारित वेबसाईटसारखीच मायबोली होणार की काय , मग मायबोलीचं वेगळेपण ते काय राहिलं अशी भिती अनेक मायबोलीकरांनी बोलून दाखवली. आणि काही बाबतीत ते वेगळेपण नष्टही झाले आहे. असे असूनही इतर अनेक बाबतीत मायबोलीचे वेगळेपण अजून टिकून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तो कितपत यशस्वी होतोय हे तुम्हीच ठरवायचंय.

गणेशोत्सव २००८
रुपाली महाजन (runi) यांच्या नेतृत्वाखाली , गणेशोत्सव समितीने २००८ चा गणेशोत्सव यशस्वीपणे आयोजीत केला. गेल्या वर्षी पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सवात श्राव्य माध्यमाचा यशस्वीपणे वापर केला.

मराठी गझल कार्यशाळा-२
वैभव जोशी यांच्या नेतृत्वाखाली दुसरी गजल कार्यशाळा यशस्वीरीत्या चालवली. ५० मायबोलीकरांनी यांत भाग घेऊन आपल्या गझला पेश केल्या.

दिवाळी अंक २००८
मेधा पै (shonoo) यांच्या नेतृत्वाखाली , २००८ चा अंक प्रकाशित केला. पहिल्यांदाच आपल्या अंकात दृकश्राव्य माध्यमाचा उपयोग करून मायबोलीकरांच्या विविध कला सादर केल्या.
तसेच मराठी सारस्वताच्या दरबारातल्या मान्यवर साहित्यिकांचे लेखन नामांकीत कालकारांच्या आवाजात श्राव्य माध्यमात प्रकाशित केले. या अभिनव उपक्रमाबद्दल श्री चिन्मय दामले यांचा विशेष उल्लेख करणे उचीत ठरेल.या दिवाळी अंकाला ग्रंथाली-स्टार माझा दिवाळी महास्पर्धेत परीक्षकांचे खास पारितोषिक मिळाले आहे.

मदत समिती आणि स्वागत समिती
सतत वर्षभर शांतपणे मदत समिती आणि स्वागत समिती काम करत असते. नवीन सभासदांना मायबोली कुटुंबात सामावून घेण्यासाठी या मंडळींचा महत्वाचा वाटा आहे.

नवीन वर्ष नवीन रुप
नवीन वर्षात, अनेक वर्षांनंतर मायबोलीच्या बाह्य रुपात बदल झाला. त्या अगोदर जवळ जवळ ६ महिने या प्रकल्पावर काम चालू होते. मायबोलीचं पूर्वीचं रूप अजिबात आकर्षक नाही असं अनेक मायबोलीकरांनी सांगितलं होतं. हा बदल झाल्यावर हा आक्षेप दूर झाला असावा.

नुसतं बाह्य रूप आकर्षक करावे इतकाच या प्रकल्पाचा उद्देश नव्हता. भविष्यातल्या मायबोलीच्या सुविधा उपलब्ध करून देणे सोपे व्हावे, सध्या असलेल्या सुविधा सापडायला सोपे करणे, सुविधांची/विभागांची योग्य ती वर्गवारी करणे असे अनेक उद्देश या बदलात होते.

सर्वोत्कृष्ट कविता
वैभव जोशी यांच्या मार्गदर्शन आणि स्वाती आंबोळे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू झाला. प्रत्येक महिन्याचा शेवटी त्या महिन्यातली सर्वोत्तम कविता घोषीत केली जाते आणि तिला मायबोलीच्या मुख्यपृष्ठावर स्थान मिळते. हि निवड एका तज्ञ समितीतर्फे केली जाते.

अक्षरवार्ता
चिन्मय दामले यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू झाला आहे.नव्याजुन्या पुस्तकांची ओळख करून देणारा, त्यांचं स्वागत करणारा मायबोलीवरील हा नवीन विभाग. नुकतीच प्रकाशित झालेली, किंवा उत्कृष्ट असूनही जरा दुर्लक्षितच राहिलेली अशी दर्जेदार पुस्तकं या विभागात आपल्याला चाळता येतील.

वर्षाविहार २००९
मयूरेश कंटक (Kmayuresh2002) यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आणि पुण्याच्या मायबोलीकरांनी मावळसृष्टी येथे यंदाचा वर्षा विहार साजरा केला. या संमेलनाला आतापर्यंतची सर्वात जास्त उपस्थीती यंदा होती.

टीशर्ट २००९
मयूरेश कंटक (Kmayuresh2002) यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच सुलेखन केलेले टीशर्ट आपण काढले. त्यासाठी डिझाईन तयार करून दिल्याबद्दल प्रख्यात सुलेखनकार 'कल्पेश गोसावी ' यांचे विशेष आभार. या टीशर्ट विक्रीला मायबोलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. या विक्रीतून मिळालेले पैसे ठाणे जिल्ह्यातील एका संस्थेला दिले जाणार आहेत.

आधारगट
मायबोलीकडे सगळेच गरज पडली तर हक्काने मदत मागतात. आणि मायबोलीकरही तितक्याच तत्परतेने मदत करतात. पण कितीही म्हटले तरी सगळ्याच समस्या नेमक्या शब्दात मांडता येत नाही आणि मांडल्या तरी समदु:खी असल्याशिवाय त्या सगळ्याना समजतीलच असे नाही. अशा मायबोलीकरांना एकमेकांचा आधार घेता यावा/देता यावा म्हणून काही आधारगट (Support Groups) सुरु केले आहेत. हळूहळु इतर विषयांवरही असे आधारगट सुरु करू.

संयुक्ता
मायबोलीवर स्त्रियांचा असा एक ग्रुप असावा आणि त्यांनी एकत्र येऊन काही उपक्रम करावेत अशी कल्पना होती. मायबोलीच्या नवीन स्वरुपामुळे असा एक ग्रुप तयार करणं शक्य झालं आहे. 'संयुक्ता' हा असा ग्रूप मायबोलीवर काही दिवसांपूर्वी सुरु करण्यात आला आहे. वैशाली राजे (lalu) यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आता आकार घेत आहे.

खरेदी विभाग

नवीन प्रकाशक/भागीदार
या वर्षात ग्रंथाली, नचिकेत प्रकाशन, सुहास पेठे प्रकाशन, मनोज ताम्हणकर या नवीन भागीदारानी मायबोली खरेदी विभागात त्यांच्या वस्तू विक्रिस ठेवल्या.

भारतातून खरेदीची/भारतात पाठण्याची सोय.
ऑनलाईन पुस्तक खरेदी ही गेली काही वर्षे परदेशस्थ मराठी वाचकांसाठी उपलब्ध असलेली सुविधा आता भारतातही चालू केली आहे.

खरेदी विभागात आतापर्यंत २८ देशांना आपण निर्यात केली आहे. या वर्षात नेदरलँड, न्यूझीलंड, बेल्जियम, स्पेन, दक्षिण कोरीया, दक्षिण आफ्रिका, कोस्टा रिका, मलेशिया, इंडोनेशिया या देशातले पहिले ग्राहक आपण मिळवले.

इतर भाषेतली पुस्तके.
गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेतल्या पुस्तकांची विक्री या गेल्या वर्षात खरेदी विभागात सुरु झाली आहे.

खरेदी विभागाचे काम पाहणार्‍या सौ. विद्या जोशी यांचे आभार.

जाहिराती विभाग
जाहिराती विभागात (मायबोलीवर इतरत्र होत असलेल्या बदलांच्या तुलनेत) फारसे बदल गेल्या वर्षात झाले नाही. आपण या वर्षी, या विभागात पैसे घेऊन जाहिराती घ्यायला नुकतीच सुरुवात करतोय. या संदर्भातल्या मदतीबद्दल दीपक ठाकरे ( Sajira) यांचे विशेष आभार.

कानोकानी.कॉम
२००८ दिपावलीच्या शुभमुहूर्तावर मायबोलीवर नवीन सुविधा / नवीन संकेतस्थळ सुरू केले.
कानोकानी.कॉम (http://www.kanokani.com किंवा http://kanokani.maayboli.com)
कानोकानीच्या माध्यमातून तुम्ही वाचलेल्या लेखनाचा दुवा तुम्हाला इतरांना सांगता येईल. हा दुवा फक्त मायबोलीवरचाच असला पाहिजे असा नाही. मराठी माणसाला वाचायला आवडेल असा कुठलाही दुवा चालू शकेल. शक्य तो मराठीत असावा असा आमचा आग्रह आहे. पण सक्ती नाही. या प्रकल्पाचा उद्देश फक्त दुवा आणि थोडा मजकूर सांगावा इतकाच आहे. प्रत्यक्ष मजकूर मूळ वेबसाईटवरच असेल.

मुक्त स्रोत प्रणाली
डृपल या मुक्तस्रोत प्रणालीवर मायबोली (नवीन मायबोली) आधारीत आहे. युनि़कोडची चांगली सुविधा असल्यामुळे, मराठीतली इतरही अनेक संकेतस्थळे याच प्रणालीवर आधारीत आहेत.

डॄपलचे हे ऋण लक्षात ठेवून, आजपर्यंत वेळोवेळी मायबोली प्रशासनाने डृपलला शक्य तेवढा हातभार लावायचा प्रयत्न केला आहे. अधीक माहितीसाठी हा दुवा पहा.

इतर प्रशासकीय आणि कार्यालयीन कामे
या शिवाय हार्डवेअर्/सॉफ्टवेअरची डागडुजी, सर्वरचे संरक्षण, बॅकप, लेखांची हलवाहलवी, साफसफाई आणि वर्गिकरण, हितगुजवरच्या गरमागरम चर्चेला थंड करणे, एखाद्याला डच्चू देणे ही कामे चालूच असतात. मायबोलीचे कॉर्पोरेटायझेशन झाल्यापासून सगळ्या खर्चाचा ताळेबंद ठेवणे, प्राप्तिकर आणि विक्रिकर यांचा परतावा सादर करणे यासारखी महत्वाची कामे (अमेरिका आणि भारत दोन्ही देशांत) वेळच्या वेळी पार पाडली.

भविष्यातले उपक्रमः
मायबोलीने अगदी सुरुवातीपासून "आधी केले, मग सांगितले" हे धोरण ठरवून घेतले आहे. त्यामुळे नवीन उपक्रमांबद्दल आधी सांगणे योग्य होणार नाही. साधने, वेळ यांच्या अभावामुळे संयोजन केलेले अर्धेच प्रकल्प पुढे जातात किंवा जे जातात त्याना वाटते त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ लागतो. एका अर्थाने हे त्या उपक्रमांसाठी आणि संस्थेच्या वाटचालीसाठी योग्य असते कारण अशा अवघड वाटचालीतून पार पडणारे प्रकल्प यशस्वी होण्याची शक्यता ही वाढते.

आम्ही कोण मधे म्हटल्याप्रमाणे "सर्वात मोठी, सगळ्यात उत्कृष्ट,सर्वसमावेषक" मराठी वेबसाईट करण्याचा आमचा मानस नाही. जितकं शक्य आहे तितकं करायचं पण मनापासून करायचं इतकंच.
----------------------------------------------------------------------------
विविध समित्यांवर काम केलेले मायबोलीकरः

मदत समिती
रुनी (runi) , मिलींदा(milindaa), मृण्मयी (Mrunmayee) आणि चाफा (chafa)

स्वागत समिती
श्यामली (Shyamli), मृण्मयी (MruNmayee), इन्द्रधनुष्य (Indradhanushya) , ITGirl

गणेशोत्सव २००८
रुपाली महाजन (runi), adm - पराग सहस्त्रबुद्धे, dafodils23 संपदा माळवदे, D_ani - अनिता दाणी, marhatmoli - रश्मी ओक, satyajit_m - सत्यजित माळवदे, swaroop - स्वरूप कुलकर्णी

गझल कार्यशाळा २
वैभव जोशी (vaibhav_joshi), स्वाती आंबोळे (swaatee_ambole) , नचिकेत आठवले (nachikets) आणि मिलिंद छत्रे (milya)

दिवाळी अंक २००८
मेधा पै (shonoo), स्वाती आंबोळे(swaatee_ambole) , पूनम छत्रे (psg), चिन्नु (chinnu), अश्विनी काशीकर(kashi), चिन्मय दामले (chinoox), स्लार्टी (slarti), दीपक ठाकरे (sajira) यांनी काम केले.

सर्वोत्तम कविता
वैभव जोशी (vaibhav_joshi), स्वाती आंबोळे (swaatee_ambole), रैना (raina), स्लार्टी (slarti), दाद (daad), श्रिकांत (shrishrikant), अज्ञात (adnyat) , क्रांती (kraanti).

अक्षरवार्ता
चिन्मय दामले (chinoox), अंशुमन सोवनी (aarfy), संकल्प द्रविड (pha) आणि श्रध्दा द्रविड (shraddhak)

वर्षाविहार २००९
मयूरेश कंटक (Kmayuresh2002) ,दिपक (SAJIRA), हिमांशु (himscool), केतन (Arbhaat), निलेश (Neel_ved), विनय (Vinay_bhide), दत्तराज (Indradhanushya), संदीप (Gharuanna), आनंद (Anandsuju) .
सांस्कृतिक समितीमध्ये नंदिनी (nandini2911), दिप्ती (Dakshina), समीर (Sameer_ranade), मीनाक्षी (meenu) .

टीशर्ट २००९
मयूरेश कंटक (Kmayuresh2002) , संदिप (gharuanna), निलेश(neel_ved), अरुण (arun) , हिमांशु (himscool) , चिन्मय (chinoox), पूनम (psg) .

कानोकानी
रुपाली महाजन (runi), अश्वीनीमामी (ashvinimami), चंपक (champak), डॅफोडील्स२३(dafodils23), आयटीगर्ल (ITgirl), केदार(kedar_japan), लवविन (lovevin), महागुरू (mahaguru), मनकवडा(manakawadaa), मनीष(manish2703), नात्या (naatyaa), सायोनारा (sayonara), सुपरमॉम (supermom), टिल्लु (tillu)

विषय: 
प्रकार: 

व्वा छान आढावा घेतलात...

मायबोलीला आणि मायबोलीकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

व्वा, छान माहितीपूर्ण आढावा घेतलाय Happy
(हा असा काही एक "व्हाईट पेपर" बनणे अतिशय चान्गले झाले.... व्हाईटपेपर(?) शब्द बरोबर आहे ना? मागे कधीतरि इकडे आग्र्यात की कुठेतरी "कालकुपी" मधे काही माहिती पुरुन ठेवली होती, तसेच काहिसे, मायबोली सन्दर्भातील जडणीघडणीविषयिची ही माहिती भावी काळासाठी देखिल उपयोगी ठरेल असे वाटते)

मायबोलीचे व सर्वच कार्यकर्त्यांचे अभिनंदन. Happy शुभेच्छा सुध्दा.

मायबोली आणि अ‍ॅडमिन टीमचे अभिनंदन! Happy
अशीच उत्तरोत्तर मायबोली वृद्धींगत होवो!

मराठा तितुका मेळवावा
महाराष्ट्र धर्म वाढवावा!

सतत १३ वर्षे मराठी भाषिकांना एक सुरेख, मुक्त विचारांचे व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल मायबोलीचे अभिनंदन ..

माझा मर्‍हाठाचि बोलु कौतुकें | परि अमृतातेंही पैजां जिंके |
ऐसी अक्षरें रसिकें | मेळवीन ||

मायबोलीचा तेजस्वी पोत नाचवणार्‍या सर्व भुत्यांचे कौतुकाभिनंदन
माता सरस्वतीचा हा जागर असाच दिमाखात चालत राहो.
माझी माय मराठी झळझळीत सुवर्णकांतीने मिरवो.
महाराष्ट्राचा गौरव सार्‍या जगात पसरो
मराठी माणसाला समृद्धी लाभो
मैत्र जीवांचे मिळोत
तुम्हा आम्हा
शुभेच्छा!
Happy

मायबोली हे एक आपले घर आहे.रोज तिथे भेट देणारे खूप आहेत व वाढतच आहेत.
सर्व आयोजकाना अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन - अभिनंदन-- अभिनंदन

टीम मायबोली : शतशः अभिनंदन !!!!!
आपणां सगळ्यांनीच अतिशय प्रशंसनीय काम चालवलय....कीप इट अप ... !!!
माझ्यासारख्या अनेकांच्या जाणीवांच व्यासपीठ तुम्ही सगळे संभाळता आहात...
कौतुक अन आदरास पात्र आहात !!!

पुन्श्च्य धन्यवाद !!!
सस्नेह
गिरीश कुळकर्णी

मायबोलीचे आणि सगळ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन. सगळ्या उपक्रमांचा आढावा छान घेतलाय.
धनु.

छान! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! Happy

आधी केले मग सांगितले....... सुंदर!

आपण अजुन सुंदर बनवुया! Happy

सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा! मायबोली रॉक्स!!
सिंडरेलाच्या शब्दात, हे माझे व अनेकांचे 'इंस्टंट माहेर!'

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच प्रशासकांचे अभिनंदन इतकी वर्ष अव्याहत ही धुरा सांभाळताहेत त्याबद्दल. मायबोलीची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो.

छानच आढावा घेतलाय. मायबोलीचा आणि मायबोलीकरांचा अभिमान वाटला वाचून. सगळ्यांनी आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून मायबोली अजून सुंदर करण्याचा प्रयत्नांना हातभार लावलाय आणि अव्याहतपणे लावत आहेत.
अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा !

Pages