आमचे हे

Submitted by सुनिल परचुरे on 21 August, 2009 - 08:53

।। श्री ।।
आमचे हे
``आज आपण सर्व जण इथे जमलो आहोत ते माझ्या पत्नीच्या - म्हणजे निर्मलाच्या 25 व्या कादंबरीच्या प्रकाशना निमित्त. हिच्या एवढया कादंब-या ह्या फक्त गेल्या 10 वर्षात लिहून होतील अस खरच कधी वाटल नव्हत. कॉलेजमधली नोकरी - माझ्यासारख्या कटकटया नवरा व मिलिंद सारखा उचापत्या करणारा मुलगा - शिवाय घरकाम ही सर्व कसरत सांभाळत इतक लिखाण करण खरोखरच कौतुकास्पद आहे`` -
माझा नवरा म्हणजे गिरिश गोखले हा माझ म्हणजे स्वताच्या बायकोच कौतुक करत होता, ऐकायला जरा बर वाटत होत.
``हिची पहिली कादंबरी जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा मानधन तिला किती मिळाल होत माहित्येय - 10,000/- रुपये आणि पहिल्या कादंबरीच्या आनंदाप्रित्यर्थ हिने ओळखीच्यांना दिलेल्या पार्ट्या आणि त्या आठवणीकरता घेतलेल्या साडया हा सर्व खर्च धरुन जवळजवळ 15000 च्या वर आकडा गेला होता. मी म्हटले अग एकच कादंबरी आहे म्हणून ठिक - तु जर अशाच कादंब-या लिहित गेलीस आणि असाच आतबट्ट्याचा व्यवहार होत राहिला तर माझ आयुष्य म्हणजे गंभीर प्रकरणच होऊन बसेल``.
झालं - म्हणजे गाडी परत मुळ पदावर आली म्हणायची. सुरवातीला कौतुक करत होते म्हणून मी हरभ-याच्या झाडावर चढत होते पण लगेच मुळावर घाव घातलाच. भावना आणि व्यवहार ह्यामध्ये स्पष्ट रेषा आखून घेतलेला इतका कोरडा माणूस मी दुसरा बघितला नाही. प्रत्येक गोष्ट पैशात मोजून बघणार, गोड वासाचा दरवळणारा मोगरा हा नाजुक भावना निर्माण करण्याकरता घ्यायचा - पण ``अरे बापरे 5 रुपये - ह्याला एवढयाशा वितिला`` - म्हणत परत त्या गजरेवाल्याला द्यायचा - भावनेपेक्षा पैशाची किंमत जास्त करणारा.
नाही - मी म्हणते ह्यांच सुरवातीच आयुष्य ह्यांनी खडतर काढल - आई-वडिल कोल्हापुरला असतात - पण ग्रॅज्युएट होऊन एल.एल.एम. करुन वकिली करायची हेच खुळ पहिल्यापासून डोक्यात - त्यामुळे कोल्हापुर सोडुन काकांकडे राहायला - शिकायला म्हणून मुंबईतल्या चांगल्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतली. वडिलांची परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे महिन्याला ते जे पैसे पाठवतील त्यात काकांना घरात देऊन कॉलेजची फी-पुस्तक सगळ जमवायच म्हणजे काटकसर आलीच. तेव्हापासून हात आखडता घ्यायची सवय लागली असेल - पण मी म्हणते किती ?
तुम्हाला एक गंमत सांगते - म्हणजे हे एल.एल.एम. होऊन हायकोर्टाची प्रॅक्टिस सुरु केली होती. ठिक चालल होती - मीही सांगलीची एम.ए. झालेली. लग्नानंतर रहायला म्हणून उपनगरात एक वनरुम किचनची जागाही घेतलेली होती ह्यांनी - पहिली रात्र - खरोखरच स्वप्नवतच होती ती - मला मध्यरात्री जाग झाली. डोळे उघडते तर हे काहीतरी लिहित होते.
त्यांना म्हटले अहो काय लिहिताय आत्ता ह्यावेळी - काही कविता वगैरे - ``छेग - अग पटकन झोप लागेना - मग लक्षात आले - रोजची सवय - आजच्या दिवसाचा खर्च लिहीला नव्हता. तो लिहीत होतो - आता खरी झोप लागेल``.
तेव्हाच कळल की अरे बापरे - असल्या माणसा बरोबर आपणाला संसार करावा लागणार आहे तर -
सुरवातीचे दिवस मजेत जात होते - म्हणजे ह्यांच माझ्यावर पेम नव्हत अशातला भाग नव्हता - पण पेम ते किंमतीत तोलमोलत होते - तेवढ खटकत होते - सुरवातीला मी घरीच असायची - ऑफिसमधून आले - जेवण वगैरे झाले की आम्हा नवविवाहितांच पहिल काम काय - तर - आजचा खर्च लिहीणे -
रविवारी भाजी आणणे हे त्यांच काम होते - तेव्हा भाजीवाल्या बरोबर रुपया - रुपया करता केलेली घासाघीस मला बघवत नसे - म्हणजे साधारण अस म्हणतात की घासाघीस करणे हा बायकांचा जन्मसिध्द हक्क आहे - इथे तर उलट होते - मलाही काही अस नव्हत की घासाघीस करु नये - पण आता खाण्यापिण्याच्या बाबतत चांगली क्वॉलिटी हवी असेल तर तिथे मी नाही घासाघीस करत - भाजीवाला भय्या जो भाजीचा दर सांगेल त्यापेक्षा काही नाही तरी आठ आणे - रुपया जे जमेल तो भाव कमी करुनच भाजी घेणार - ह्यांनी कधीतरी मला सांगितल्याच आठवतय -
कॉलेजमध्ये असतांना त्यांनी स्टेशनवर गाडीचे तिकीट मागितले - त्या तिकीट देणा-या माणसाने सांगितले 10 रुपये द्या तर - ह्यांनी विचारले काही - कमी नाही का ?``
तुम्ही म्हणाल काय नव-याच्या सारख्या कागाळ्या सांगतेस - पण संपुर्ण पांढ-या रिमकागदावर जसा एक छोटासा शाईचा डाग उठुन दिसतोनं तसच ह्यांच आहे - बाकी सर्व अगदी पांढ-या रिमकागदा सारखे आहेत पण खर्च म्हटला की ह्यांचा बारीक शाईचा डाग पडलाच.
पण एक मात्र आहे - पुर्वी त्यांच्या वाढविदसाला - आता माझ्याही वाढदिवसाला न चुकता अंधेरीच्या वृध्दाश्रमात जाणार - तिथल्या म्हाता-यांची चौकशी करणार - हजार-हजार रुपये डोनेशन देणार - म्हणजे ह्याचे हे कोडे मला उलगडतच नाही -
सुरवातीचे 5-6 महिने मी बघितले ह्यांचा रोजचा खर्च लिहिण्याच आपल्याला काही जमणार नाही - आणि एक दिवस तर ह्यांनी कहर केला - खर्चात 100 रुपयांचा फरक येत होता - तो का येतोय ते शोधच म्हणाले - माझे - पैसे आहेत - त्याचा हिशोब लागायलाच हवा म्हणाले -
माझे पैसे ? म्हणजे मी कोणीच नाही - माझ्या डोक्यात चीडच आली - म्हटल तुम्हाला वाटत न हे मला जमत नाही - उद्यापासून मी हे लिहीणार नाही - मी कमवत नाही - नोकरी करत नाही म्हणून - तुम्ही कमवून आणता म्हणजे तुमचे पैसे - पण हे घर संभाळणारी तुम्हाला सर्व प्रकारचे सुख देणारी मी कोणी नाही ? ह्या पैशात माझा जराही वाटा नाही ?
सुदैवाने एक दिवस आधी पेपरात जाहीरात पाहिली होती - आमच्या घराजवळच्या एका आर्टस् कॉलेजमध्ये प्रोफेसरची नोकरीची - रात्रभर विचार केला - ह्यांना काही बोलले नाही - सरळ ऍफ्लीकेशन देऊन टाकला - आणि काय आश्चर्य मला मराठी-संस्कृत ह्या आवडीच्या विषयांवर लेक्चररची नोकरी मिळाली. अपॉईन्टमेन्ट लेटर मिळाल्यावर ह्यांना दाखवल.
``हे काय ? तु नोकरी करणार ?``
``हो कां ? नुसत घरात बसून काय करु ? ही नोकरी म्हणजे प्रोफेसरची, सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत - माझ्या आवडीचे विषय आहेत. आणि मुख्य म्हणजे मी माझे पैसे कमवीन. ते फक्त माझे असतील. घर चालवायला तुम्ही जे पैसे द्याल त्यात मी ते चालवीन``.
आणि खरच माझ जीवनच बदलुन गेल. म्हणजे फक्त पैशा करता नाही हं - तर मला निरनिराळी पुस्तक वाचायला मिळाली - नवीन नवीन मुला मुलींशी परिचय झाला - एक माझ - स्वतच अस मला फिल्ड मिळाल - जिथे मी माझ कर्तृत्व दाखवू शकत होते.
पुढे आमच्या कुटुंबात मिलिंदची भर पडली. पण त्यामुळे मी माझा जिवनक्रम बदलू दिला नाही - तस माझ कॉलेज अर्धा दिवसच असायच - मला बाई हि तशी मिळाली होती - त्यामुळे मिलींदचाही प्रश्न एवढा भेडसावला नाही - तो उठून त्याच सगळ होईस्तो मी घरी यायची -
ह्यांची ही प्रॅक्टीस चांगली चालायला लागली होती - पण स्वभावात म्हणाला तर काही फरक पडत नव्हता. ऑफीसमध्ये एक फक्त फ्युन कम क्लार्क होता - बाकी होल अँड सोल हेच.
ह्यांचाच एक मित्र होता - पण मजेत प्रॅक्टिस करत होता. म्हणायचा अरे तु कितीही हुषार असलास पण उपयोग काय. तुला लोकांकडून काम कस करुन घ्याव तेच जमत नाही. एक लक्षात ठेव - खर्च कमी करुन आपल इन्कम वाढवू नकोस तर आपल इन्कम कस वाढेल ते बघ - खर्च कसा कमी करु हाच विचार करत राहिलास तर दात कोरुन पोट भरण्यासारखे होईल.
पण नाही - एक माणुस ह्यांच्याकडे टिकेल तर शपथ. एकतर पगार कमी देणार. त्यात खर्चाला कोणी पैसे मागितले तर म्हणणार टॅक्सीने कशाला गेलास ? बसने जायचे होते - उगाच मी पैसे देणार नाही - पुढच्या वेळी टॅक्सीने गेलास तर मी पैसे देणार नाही`` - ह्या माणसाला काम वेळेत होतय की नाही ह्या महत्वापेक्षा पैसे किति जातात ह्याचाच विचार.
टॅक्सीवरुन एक गोष्ट सांगायची म्हणजे आमच्या नेपाळ ट्रिपची - कधी आम्ही लांब टुरला गेलोच नव्हतो - मीच ठरवल तिघांनी नेपाळला जायचे. जातांना ट्रेन-बसने गेलो पण येताना काठमांडु ते दिल्ली अस अट्टाहासाने मी विमानाच तिकीट काढले. म्हटल हा ही एक नवीन अनुभव घेऊ - सर्व ट्रिप मजेत झाली - पण येतांना विमानप्रवासाच्या वेळेला शेवटच्या दिवशी आम्ही एअरपोर्टवर निघालो - तर म्हणाले अग अजून 4 तास अवकाश आहे - परवाच मी बघितले - इथूनच बस एअरपोर्टवर जाते - आरामात जाऊ - म्हटले अहो बसचा काय भरोसा - टॅक्सी करु - प्रथमच विमानाने जातोय - जरा हिंडु - एअरपोर्ट बघु - पण नाहीच - म्हणाले वेळ आहे बसनेच जाऊ - बसस्टॉपवर आलो - काही बसेस येत होत्या - जात होत्या - पण एअरपोर्टची बस काही लगेच आली नाही - माझा जीव वरखाली - शेवटी दिड तासानी बस आली - कुठेतरी बिघडली होती - मनात अक्षरक्षा ह्यांना बोल लावत होते - म्हटले `` जर विमान चुकल तर पैसे तयार ठेवा. पुढच्या विमानाच्या तिकीटाचे आणि जर लगेच मिळाल नाही तर तेवढया दिवसाच्या हॉटेलचे`` - कसेबसे धावत पळत एअरपोर्टवर आलो - अगदी चेकइन बंद करायचीच वेळ आली होती - कसबस शरीर व सामान ढकलत विमानात गेलो - ह्यांच्या तोंडावर विजयी हास्य - बघ - स्वस्तात तुला आणल की नाही ! सगळ्या ट्रिपची मजाच घालवून टाकली - माझ नेहमी एकच सांगण होते आपण कमावतोय ते थोडे कुठेतरी भोगा की .........
ह्याच धावपळीत मला एक गोष्ट स्वस्थ बसु देत नव्हती. माझ्या मैत्रिणीची - खरी हकीकत होती - तिच्यावर काहीतरी लिहाव अस वाटायच - लिखाणाला सुरवात केली - पण हळुहळु तिच्या स्वभावाचे एक एक धागे उलगडतांना कथेची कादंबरीच झाली.
नशिबाने ह्यांच्या ओळखीचे एक दोन प्रकाशक होते. त्यातील एकाला ति आवडली - त्यातुन मानधनाचा प्रश्न आला - नेहमी प्रमाणे ह्यांच सुरु झाल - पण मी प्रकाशकांना साफ सांगुन टाकल - तुम्ही 101 रुपये दिलेत तरी ते मी स्विकारीन. इथे रुपयांपेक्षा माझी कादंबरी छापली जाणार हा आनंदच अमोल आहे.
आणि काय आश्चर्य - तिची पहिली आवृत्ति हातोहात खपली - वाचकांत विशेषत स्त्रि वाचकांत मी एक लेखिका म्हणून प्रसिध्द झाले - मग मात्र मी मागे वळून बघितलेच नाही - अनुभवाची शिदोरी होतीच - प्रत्येक माणूस हीच एक कादंबरी असते - त्यात इतक्या प्रसंगाची गुंफण असते की काय लिहाव काय लिहू नये हेच कळत नाही. एक एक विषय - व्यक्ति दिसत गेल्या सुचत गेल्या मी लिहीत गेले - माझ्या 25 कादंब-या कधी झाल्या ते मलाच कळले नाही - 25 कादंब-या अरे हो - हाच विषय चाललाय - आपल्या कौतुकाच्या कौंटुबिक प्रसंगात - गिरिश - गिरिश बोलतोय -
``आणि हा कौतुकाचा प्रसंग आपल्या घरातल्याच माणसां बरोबर होतोय म्हणून मी सांगतो - की मी ह्या प्रसंगी निर्मलाला 11 लाखचा चेक देत आहे - माझी अशी इच्छा आहे की त्याचा तिने एक ट्रस्ट करावा व वाचनीय साहित्य जे लोकांना सहज उपलब्ध होत नाही, ज्यामध्ये तिच्याही कादंब-या आल्याच हे मुद्दाम नमुद करतो - तर हे साहित्य - हि पुस्तक सर्वांच्या हातात जावीत अशी ह्या ट्रस्टतर्फे व्यवस्था व्हावी`` - आणि नातेवाईकांच्या टाळ्यांच्या गजरात तो बोलायचा थांबला.
माइया नवार्‍याचा एक नविनच पैलु मला दिसला.
माइया पुढच्या कादंबरिचा नायक माइया डोळयासमोर आला.

गुलमोहर: 

चांगली लिहीली आहे छोटेखानी. फक्त लिहीतांना मध्ये मध्ये ते हायफन नका देवु, ते अनावश्यक आहेत, ते मध्येच आल्याने रसभंग होतो.

मस्तच.......! आपल्याला आवडले बुवा तुमचे लिखाण . एकूण नवरा किंवा बायको एकजण हिशेबी असतेच.छान रंगविली आहे कथा.