--अ‍ॅक्सिडेंट-----------

Submitted by सुनिल परचुरे on 18 August, 2009 - 04:53

--------------------------------------------------------अ‍ॅक्सिडेंट--------------------------------------------------
``अं - या - यान - बसा. मी तुम्हा दोघांचीच वाट पहात होतो`` इन्स्पेक्टर गावडे म्हणाले.
``अरे - सावंत - तो फॅन चालु कर आणि दोन ग्लास पाणी आण बघु``.
डॉ. अजिंक्य देवधर व अनुराधा देवधर हे दोघेही आत आले. दोघेही विमनस्कपणे खुर्चीवर बसले. हातानेच डॉ. अजिंक्य यांनी पाणी नको अशी खुण केली.
``मग चहा घेणार कां ? मी ही घेईन - अरे सावंत - तिन चहा सांग बघु``, इन्स्पेक्टर गावडे म्हणाले.
``ह - आता जरा सावरलात ना? मी तुम्हाला फक्त थोडीशी चौकशी करण्याकरता बोलावलाय... हं - नांव काय होत म्हणालात मुलाच ?``
अनुराधाच्या डोळ्यासमोर तो प्रसंग आला. नुकतेच हॉस्पिटलमधून मुलाला घेऊन घरी आली होती. रात्री दोघांच्या गप्पा सुरु होत्या.
``काय ग याच नांव काय ठेवायच - काही ठरवलयस का ?``
``अहो हे बघा - तो समोरचा ड्रॉवर आहे नं, त्यात 1001 नावांचे पुस्तक आहे - त्यातली मी वाचली - पण मी आणखीनच संभ्रभात पडले - कुठले ठेवावे - हे का ते -``
``अग, नांव असं साध म्हणजे जोडाक्षर नसणार पण चांगल हवे``.
``म्हणजे ?``
``अग बघ म्हणजे आता माझ नांव - अजिंक्य - माझ्या लहानपणी ह्या मोठया माणसांचा एक खेळच होता - मुद्दाम मला विचारायचे तुझ नांव काय? अदिंतय - असा काहीतरी माझा बोबडा उच्चार ऐकला कि फिदिफिदि हसत बसायची, आपल्याला 1ली 2रीच्या धडयात असतात न - बबन बस - छगन बस - नमन ये - अशी साधी सोप्पी - लहान मुलांना घेता येतील अशी नावे हवीत`` अजिंक्य म्हणाला.
``तुम्हाला न सारखं बाई असल काहीतरी विचित्र सुचत असते``. अनुराधा म्हणालि
``माझ तर अस म्हणण आहे की आपल नांव निवडायला आपल्याला चॉईस हवा`` - अजिंक्य म्हणाला.
``मग चॉईस कळेपर्यंत कशी हाक मारायची ?`` अनुराधा म्हणाली,
``अग नाहीतरी कुठलही नांव ठेवल तरी त्याचा शॉर्टफॉर्म होतोच. म्हणजे कॉलेजच्या मित्र कंपनीत मी अज्या म्हणूनच फेमस होतो.
``हे बघा - जरा सिरियस व्हा नं``.
``हे बघ आता अगदी खर सांगतो - म्हणजे तुला चालणार असेल तर, सांगु - ज्या दिवशी हा झाला त्या दिवशी खुप वादळी वारे - पाऊस पडत होता, तर असा बेभान वारा त्यावर कितितरी नांव आहेत - समीर आहे - झालच तर दुसर -
``नको - नको - चालेल छान आहे नांव समीर - मुख्य म्हणजे जोडाक्षर नाहीत - तुमच्या म्हणण्यानुसार - ``हसत हसत अनुराधा म्हणाली.
``अहो बाई - नांव सांगताना - ``इन्स्पेक्टर म्हणाले.
``अहो तुम्हाला नांव माहीत नाही कां ? असे परत - परत तेच प्रश्न विचारु नका हो``. अनुराधाच्या डोळ्यात पणी यायला लागले.
``हे बघा - मला कळतय आता तुम्ही नांही - तुमच्यातली आई बोलतेय - पण हे पण लक्षात ठेवा की ह्या खाकी कपडयाच्या आत आम्ही माणसच असतो - मिनिमन ज्या फॉरमॅलिटिज कराव्या लागतील तेवढया तर मला केल्याच पाहिजेत नं ? घ्या - आधी चहा घ्या !`` इन्स्पेक्टर म्हणाले.
चहाचा एक घोट घेतल्यावर तिला बर वाटल - कढत घोटाबरोबर कढत आवंडाही गिळता आला.
``कुठल्या कॉलेजात होता ?`` इन्स्पेक्टरनी विचारले.
कॉलेज ऍडमिशनच्या वेळचा गोंधळ तिच्या डोळ्यासमोर तरळु लागला. डॉ. अजिंक्य एक प्रख्यात सर्जन म्हणून प्रसिध्दी पावत होता. अनुराधाचीही कन्सटींग सुरु होती पण समिरच्या डोक्यात काही वेगळच होते.
``डॅड - मला ऍडव्होकेट व्हायचय``
``काय ?``
``होय - व-की-ल``.
``अरे बाबा - मला माहितिय की मी काही पॉलिटिकल माणूस किंवा नेता नाही की मी म्हणेन मी डॉक्टर - तुझी आई डॉक्टर तर आमची गादी तुच पुढे चालवली पाहिजे. अरे 10 वीत तु एवढा बोर्डात आलायस तर`` - ``नाही डॅड - माझ काकाशी बोलण झालय, ते तुमच्याशी बोलणारेत``.
काका म्हणजे अजिंक्यचे मोठे बंधु - ऍडव्होकेट शिरिष हे क्रिमिनल केसेसमध्ये एक मोठे प्रस्थ होत - लहानपणापासून जेव्हा समीर त्यांच्याकडे जायचा तेव्हा त्यांच्या भोवती असलेले लोकांच कोंडाळे - शह - प्रतिशह करण्याचे प्लॅन्स - वेगवेगळ्या विचित्र सोडवलेल्या केसेस - त्यांच्या वर्तमानपत्रातील मुलाखती ह्याच समीरला खुप अप्रुप होते हे माहित होत - पण एकदम अस म्हणजे - अनुराधाच्या मनात यायला लागले की त्याला त्यांच्या घरी जास्त वेळा पाठवायलाच नको होते - दिवाळी - मे महिना म्हणजे सतत त्यांच्यामध्येच -
``नाही माझ ठरलेल आहे. बि.ए.,एल.एल.बी., करुन मी काकांसारखा मोठा वकील होणार. अहो बाबा त्यात काय थ्रिल असते हे तुम्हाला कळणारच नाही. तुम्ही सर्जन म्हणजे बघा हं - पेशंट जरी वेगवेगळे असले तरी रोग एकच - तेच हृदय - तोच व्हॉल्ब - तशीच कापाकापी -
पण इथे माणस वेगवेगळी - प्रत्येकानी काही गुन्हा केला असला तरी त्या मागची कारण वेगवेगळी - त्यातल्या कमी जास्त खाचाखोचा ओळखून त्याप्रमाणे सेक्शन्स लावून क्लायंटला सोडवायच - जस्ट फँटॅस्टिक - मी ह्याबाबतीत ब-याच वेळा काकांशी बोललोय`` समीर आपल्या मुद्यावर ह्यांच्या सारखाच ठाम. शेवटी सर्वांनी मिळून त्याच्या बि.ए. लाच ग्रिन सिग्नल दिला.
``एल.एल.बी. शिकत होता`` - अनुराधा म्हणाली.
``तो बाईक कधीपासून चालवत होता ? म्हणजे त्याच लायसन्स?`` इन्स्पेक्टरनी विचारल.
त्याला बाईक घेऊन देतांना काय आपण गहजब केला होता. लहानपणी हा सायकल खरा दोन दिवसातच शिकला, तो झाल्यावर मीच ठरवल होत की तो शाळेत जाईस्तो मी कंस्लटन्सी बंद ठेवणार, त्याच्यावरच लक्ष केंद्रीत करणार. त्याला अगदी लहान सायकल आणली तेव्हा केवढी मारामारी झालि. बाकीची माणस एवढी पटापट सायकल चालवतात मग मला पहिल्याच दिवशी का येत नाही म्हणून हटून बसला, दुस-या दिवशी मी त्याच्या सीटला धरुनच चालवते होते - पण हळु हळु तो बॅलन्स करत आरामात चालवू लागला. म्हणून मी हात सोडले तर धाडकन आपटला - ढोपर फुटली - रडारड - मग अजिंक्य म्हणाला मी रविवारी दुपारपासून तुला शिकवीन - झाल - दुपारी त्याने नेला काय न - तासाभरात आले काय - आरडा ओरडा करतच - आई डँडींनी मला सायकल शिकवली - झाल म्हणजे आम्ही आपला मरमर मरायच आणि ह्यांनी नुसत मम - म्हणत हात लावला की - नांव मात्र ह्यांचेच.
पण बाईकच्या वेळी मात्र मी ठामपणे नाहीच म्हटल होत, ही कॉलेजमधली मुल - काय स्पीड - मागे मुली बसल्या की काय भन्नाट जातात - मी म्हणत होते त्याला कार घेऊन देऊ पण समीरच एकच बाईकमध्ये जी मजा आहे ती कारमध्ये नाही.
``अग ह्या कॉलेजमधल्यानी अस नाही जायच तर मग काय तु - मी अस बसून जायच कां ?`` हसत हसत अजिंक्य म्हणाला. शेवटी समीरच्या वाढदिवशी बाईकची चावी त्याच्या हातात दिल्यावर त्याच्या चेह-यावरील आनंद पाहून मीही हरखले.``
``हे बघा डॉक्टरसाहेब`` - इन्स्पेक्टरने सांगायला सुरुवात केली. ``अहो त्या दिवशी मी दुपारीच निघालो - माझ पर्सनल काम होत म्हणून - सिव्हिल ड्रेसमध्ये बाईकवरुन जात होतो, मे महिन्याच दुपारच रणरणत ऊन - त्या वरती नाक्यावर जे क्रॉसिंग आहे तिथून जाताना मी पाहलय तर रस्त्याच्या एका कडेला एक बाईक पडलिय, पुढे एक चाळीशिचा माणुस बेशुध्दावस्थेत पडलाय - आणि एक शंभर फुटावर एक मुलगा पडलाय, मी उतरलो - त्या माणसाला पाहिल - त्याचा उजवा हात, पाय सुजला होता. फॅक्चर झाल्यासारखे वाटत होते. पुढे आलो तर मुलगा नुसता रक्तान माखला होता - जिवंत होता - कुठलातरी ट्रक दोघांना उडवून गेलेला दिसत होता. हे ट्रकवाले म्हणजे न एकदम असली औलाद, त्यांना दुस-याच्या जिवाची फिकिरच नसते.
आधी म्हटल ह्या दोघांना लौकरात लौकर हॉस्पिलमध्ये न्यायला हव. म्हणून गाडी-रिक्षा मिळेल का बघत होतो. पण एकतर ह्या उन्हामुळे वाहने ही तुरळक येत होती. त्यात एक दोन गाडया थांबल्या. त्यांना विनंती केली - पण अस रक्ताळलेली माणस बघून पटकन निघुन जात होती. अहो ह्या नोकरीत कधी कधी असे प्रसंग येतात की माझा माणसावरचा विश्वास शेकी होतो.
तेवढयात एक सरदारजी - निळा फेटा बांधलेला आला - त्यानेही बराच प्रयत्न केला - शेवटी एक गाडी मध्ये उभा राहून आडवली - त्यात ह्या दोघांना जबरदस्तीने ठेवल - तोही बरोबर आला होता हॉस्पिटलमध्ये - पण-पण डॉक्टर म्हणाले की जरा लौकर आणला असता तर नक्कीच वाचला असता - मुलाच्या खिशातून त्याच्या डायव्हिंग लायसेन्सवरुन तुमच्या घरी फोन केला - गावडेंनाही आवंढा आवरेना, .....क्षणभर शांततेत गेला.
तो दुसरा माणुस आनंद देशमुख त्यालाही मी इथे आता बोलावलेय - येईलच तो - इस्न्पेक्टरनी हळूच घाम पुसण्याच्या निमित्ताने डोळे पुसले.
आजीला 15 मिनिटात जेवायला येतो म्हणून सांगून बाहेर पडलेला - अजून का नाही आला म्हणून ती मोबाईल करतेय, तर मोबाईल घरीच विसरलेला - मित्राला फोन केला तर तिथेही पोहोचला नव्हता - आणि ही बातमी ऐकल्यावर तर तिच्यावर आभाळच कोसळले. अजुनही झोपेत दचकून उठल्यावर म्हणते - अग समीर आला का जेवायला - मित्राकडे गेलाय - आणि मग एकदम भानावर येते - आजोबा तर शून्यातच नजर लाऊन बसलेले - एकुलता एक नातू आणि आता -
``येऊ कां मी आतं ?``
``हं - या नं, या बसा, हेच ते - आनंद देशमुख`` इन्स्पेक्टर म्हणाले.
``नमस्कार`` - खर सांगु अहो मीच अजुन ह्या धक्यातून सावरलो नाही आहे - तर तुमची अवस्था तर " देशमुख म्हणाले.
``हं हे पाणी घ्या`` इन्स्पेक्टर म्हणाले.
``हं आता मला सांगा बघु त्या दिवशी नेमक काय झाल``
``अहो ह्या जन्मी तरी तो दिवस मी विसरु शकणार नाही. कामावर जायला मला उशीरच झाला होता. आमची कंपनी तिथेच त्या रस्त्यावरुन पुढच्या चौकात आहे. कुठे रिक्शा मिळते का म्हणू मी बघत बघतच जात होतो. तेवढयात मागे बघितले एक कार जोरात एका ट्रकला ओव्हरटेक करुन पुढे गेली. त्याला वाचावण्याकरता ह्या ट्रक ड्रायव्हरने थोडे डाविकडे टर्न केले. तिथुनच -तिथुनच हा मुलगा बाईकवरुन जात होता, ट्रक जवळ आल्यावर त्यानेही बाईक डाविकडे वळवली पण त्याच्याच पुढे मी होतो. मला धडकल्यावर साहेब तो जो फेकला गेला तो एकदम ट्रकच्या मागच्या चाकाखाली`` -
``आई - गं ``- अनुराधा कळवळली.
काही क्षण शांततेत गेले. आनंदही पुढचे काही बोलू शकला नाही.
``साहेब - पण मला धडकल्या बरोबर जसा मी पडलो तेव्हाच मला कळल मी - माझा उजवा पाय व हात मोडलाय, माझ्या डोळ्यासमोर अंधेरी यायला लागली - पण साहेब पडल्यावर मी पाहिल की ट्रक ड्रायव्हर एक सरदारजी - निळा फेटा घातलेला डोकावला - नंतर हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंतच मला काहीच आठवत नाही - तिथे गेल्यावर मला शुध्द आली.
हां पण साहेब आता आठवल बघा - इतके दिवस माझ डोकच सुन्न झाल होत - काही विचारच करता येत नव्हता - तो- तोच ट्रक ड्रायव्हर होता - जो हॉस्पिटलमध्ये आम्हाला घेऊन आला होता - पण एवढ नक्की साहेब त्याची काहीच चुक नव्हती कि मुलाचीही नव्हती.
अनुराधाला काहीच सुचत नव्हत. इतके दिवस त्या ट्रक डायव्हरला खुनी म्हणून तिने लाखोल्या वाहिल्या होत्या. पण आता - आता त्याला खरा माणूस म्हणाव की समिरला गाडीत न घेता जाणा-या माणसांना खुनी म्हणावे - हेच कळत नव्हते. डोळ्यापुढे फक्त काळाकुट्ट अंधार होता.

गुलमोहर: 

कथेचे टेकिंग मस्त..!

पण १ प्रश्ण - जर सरदारजी चांगला होता तर त्याने का नाही नेले त्या दोघांना इमिजिएटली? त्यामुळे शेवट जरा विस्कटला. आता चाफाच्या गोष्टींसारखं त्या सरदारजीचं भूत असेल तर शक्य आहे मग!

जाईजुई आभार.जेव्हा कुठ्ल्याहि ड्रायव्हरला आपल्या गाडिखालि कुणि आल्याच कळ्त तेव्हा त्याला सावरायला काहि वेळ जातोच.मनावरच भितिच- घबराटिच भुत उतरल्यावरच माणुस मदतिला धावतो.प्रतिसादाबद्दल धन्यवाद.