अभिप्राय तुमचे

मायबोलीच्या हितगुज दिवाळी अंक २००७ बद्दलच्या आपल्या अभिप्रायांचे नुसते स्वागतच नव्हे तर ते वाचण्याची आम्हाला उत्सुकताही आहे. तेव्हा अंकाबद्दलचे आपले अभिप्राय आम्हाला इथे जरुर कळवा.
-संपादक मंडळ

अप्रतिम अंक..

संपादक चाफा आणि चमूचे मनापासून अभिनंदन इतका सुरेख देखणा अंक वाचायला दिल्याबद्दल. भरपूर साहित्य वाचायला आहे आणि सगळच उत्तम दिसतय. अजून खूपच कमी अंक वाचून झालाय म्हणजे फक्त दिवाळी संवाद मधील अर्चना जोगळेकर आणि सावनी शेण्ड्येंची मुलाखत वाचून झाली आणि दोन्ही मुलाखती अगदी खुललेल्या आहेत. छान प्रश्नोत्तरे झालीत. खाजगी आणि व्यावसायिक अशा दोन्ही पैलूंचा समन्वय मुलाखतीत उत्तम झाला आहे.
कथांपैकी सन्मी, पूनम, हवा-हवाई, असामी आणि श्रद्धाच्या वाचून झाल्या आणि आवडल्या. जेलोची गोष्टही खूप आवडली. अज्जूकाचं प्रवासवर्णन आणि सोबतचे फोटो अप्रतीम.
बाकी सगळाच अंक कधी वाचतेय असं झालय.
स्वातीच्या सावरीया बद्दल काय बोलणार? अतिशय प्रसन्न वाटतं ते ऐकून आणि पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं.
माझ्या पियानोच्या लेखामधे ऍप्रोपिएट पिक्चर क्लीप्स टाकली आहेत त्यामुळे लेखाचा लेआउट खूप देखणा दिसतोय. संपादक मंडळाच्या ह्या कलात्मक कामगीरीबद्दल मनापासून आभार.

अभिप्राय

यंदाच्या दिवाळी अंकातलं सगळंच गद्य/पद्य लिखाण मनोरंजक आहे, पण तरी त्यातल्या त्यात मला आवडलेलं नमूद केल्याशिवाय राहवत नाही.

१. साठां उत्तरी
> एक दिवस : सन्मीच्या भाषाशैलीमुळे वाचायला छान वाटते.
> अबोली : नेटकी आणि सकारात्मक.
> दोन शेवट : हा आकृतीबंध अभिनव वाटला. कथेची मजा त्यातच आहे.
> नूरजहान : 'धूम ३' साठी वापरता येईल. स्मित
> तीन पत्त्यांचा तमाशा : शंतनू, तुमची 'शब्दचित्र' रंगवायची हातोटी याही कथेत दिसून येते आहे. (वर्णनं माझ्या palateला जरा बीभत्सतेकडे झुकणारी वाटली मात्र.)
> घरचा पाहुणा : 'सावधान' कथा. स्मित

२. माझिया मनींचे
> १९४७ : खूप आवडला.
> जिज्ञासा : प्रेरणादायी आणि अभिनंदनीय
> सैनिक : विचारप्रवर्तक
> रेशमाच्या रेघांनी : आपल्यातील कलागुण ओळखून ते जोपासायला सांगणारा लेख आवडला. सोबतचे नमूनेही सुंदर आहेत.
> स्टीव्ह वॉ च्या आत्मचरित्राची ओळख वाचनीय आहे.
> प्रवासवर्णन माहितीपर आहे.

३. निःशब्दातले शब्दांत
> 'अजूनही विचार कर' आणि 'विषबधा' दोन्ही अप्रतिम.

४. हलके फुलके
> ब्युरॉक्रसी (लोपा) : बेष्ट! आणि सत्यघटनेवर आधारित आहे म्हणजे कहरच!!
> पिकनिक (चाफ्फा), मुन्नाभाई आणि विडंबन (मिल्या) मस्त.
> कट (दाद) सफाईदार. काही विनोद खास! ('रस्त्याइतका तरी वळू की नको?' वाचून जाम हसले.)

५. इंद्रधनुष्य
> पियानोवरच्या गाण्यांचा लेख झकास. आवडता विषय.
> सात ठिपके.. : नकळत्या वयात होणाया मैत्रीबाबतचा analysis पटला आणि आवडला.
> शब्दकोडं खूप दिवसांनी सोडवलं. मजा आली.

६. संवाद
> सावनी शेंडे यांची मुलाखत बेष्ट! फार छान विचार मांडले आहेत.

७. स्वरचित्रे
> सावनी शेंडे यांचा सोहोनी अतिशय आनंद देऊन गेला.

इतका देखणा आणि वाचनीय अंक काढल्याबद्दल संपादक मंडळ आणि त्यांच्या सल्लागार / सहाय्यकांचं अभिनंदन!

सावरिया...

सावरिया अप्रतिम जमलंय. विवेक, वैभव, स्वाती...धन्यवाद !!
मुखपृष्ठ आणि बासरी खूपच सुरेख.
ट्युलिप, विनय, मिल्या, अज्जुका - लेख खूप आवडले स्मित... बाकी अंक जमेल तसा वाचतोय.

दाद १

अंक वाचणं अजून चालूच आहे. त्यामुळे जसा होईल तशा दादा, दादी... (हे 'दाद' चं बहुवचन नसाव.. पण छान वाटतय).
एकूणच अंक बहू वाचनीय आणि श्रवणीयही झालाय- देखणा! संपादक मंडळी, अंकासाठी झटलेल्या सगळ्यांनाच मनापासून आभार. इतका परिपूर्णं अंक! व्वा!

मुखपृषठ- नीलू, अप्रतिम. ती तरुणी, तिच्या हातातला दिवा आणि त्यायोगे मागे पडलेली तिच्या सावलीची झलक.... सुंदर!
बासरी- भूप! आवडली, खरच! पण अगदी अगदी मनातलं सांगू? मला इथे शहनाई आणि ती सुद्धा एखादा सकाळचा खास राग.... खानसाहेबांची तोडी!

साठा उत्तरी
अबोली- सुंदर कथा.
लांडगा-असामी, आवडली.
दोन शेवट- वेगळीच शैली... मस्तय.
नूरजहा-श्रद्धा, छानय. खूप दिवसांनी वाचली असली.
एक दिवस्-सन्मी, आवडली. तुझ्या शैलीमुळे जास्त.
सुखात्मे-स्वाती... जबरदस्त. विषय, शैली, फ्लो सगळच.

सध्ध्या इतकच!

सनई

दाद - सनईबद्दलचं मत अगदी सगळ्यांच्याच मनातलं असेल, संपादक मंडळासहीत. पण कॉपीराईटच्या नियमाचा भंग होऊ नये हा हेतू तर होताच. शिवाय हितगुज दिवाळी अंकासाठी आपल्याच मायबोलीकराचे बासरीवादन वापरण्यात एक वेगळाच आनंदही आहे.

- प्रिया.

अंक छान आहे.

मुखपृष्ठ नवीन प्रकारचे आणि छान आहे.
काही वाचलंय. काही थोडेदिवसांनी वाचेन.
हेम्स तुझ्या कविता नेहमीप्रमाणेच खास.
-नी

देखणा अंक

अंक अतिशय देखणा आहे.
पुर्ण डिजाइन आणि मांडणी आवडली.
मुखपृष्ठावरचे नीलु ताय चे चित्र एकदम झकास आहे.
आता ती परत चित्रापासुन दुर जाणार नाही हीच अपेक्षा. स्मित
सध्या एक एक विभाग वाचुन काढेन आणि त्या प्रमाणे प्रतिक्रिया देत जाइन.
अंक चाळलाय फक्त. गाणी वै काहीच ऐकु शकत नाही हापिसात त्यामुळे बाहेरुन एक्सेस करेन त्यावेळीच प्रतिक्रिया देइन त्याबाबत.

संपादकांचे आणि मायबोलीचे खुप खुप आभार. त्यानी खुप मेहनत घेतली असणार.

अभिनंदन !

संपूर्ण अंक वाचला, ऐकू शकलो नाही अजून.

जे आवडले, चांगले वाटले त्याविषयी लिहितो..

साठा उत्तरी
तीन पैशांचा तमाशा : वातावरणनिर्मिती चांगली जमली आहे. (पण मूळ कथासूत्रापेक्षा तीच जास्त प्रभावी झाली आहे की काय असे वाटले. )
सुखात्मे : शैली आवडली.

माझिया मनीचे
श्वना : चांगला उभा केला आहे.
बरसातः झुलेलाल, छान लिहिले आहे.
१९४७ : वेगळ्या विषयावर लिहिले आहे हे आवडले.

इंद्रधनुष्य
'पियानोवरची सात गाणी' हा लेख आवडला.

हलके फुलके
कट : खुसखुशीत शैलीतला लेख, आवडला.
मिल्याचे विडंबन आणि लेख दोन्ही मस्तच.

नीलू आणि इतरांच्या उत्कृष्ट चित्रांनी अंक अगदी देखणा झाला आहे. मुन्नाभाई सारखी चित्र तर फार आवडली.

संपादक मंडळाचेही अभिनंदन.

अंक आवडला

१. संघमित्रा - एक दिवस
२. झुलेलाल - बरसात
३. प्रमोद देव - श्वना
४. स्वाती - सुखात्मे
५. मिल्या - मुन्नाभाई
६. जेलो - सात ठिपके, सात ओळी
७. अजय - व्यंगचित्रं आणि हास्य(बोध) कथा
८. तान्याबेडेकर - तीन पत्त्यांचा तमाशा
९. अनामिक - सैनिक
१०. लोपमुद्रा - ब्युरोक्रसी - बरी कशी?
११. ट्युलिप - पियानोवरची गाणी

हे मनापासून आवडलं ..

शब्दकोडी screen वरच सोडवता आली असती तर बरं झालं असतं ..
कविता मला कळत नाहीत म्हणून मी वाचत नाही त्याबद्दल क्षमस्व ..

सगळाच अंक छान झाला आहे .. स्मित

१९४७/व्यंगचित्रे

मुखप्रुष्ठापासूनच अंक डोळ्यात भरतो. माय्बोलीकरांना सुबक अंकाबद्द्ल धन्यवाद.

१९४७ हा जोशींनी चांगला लेख दिलाय. मराठीत वाळींबेंचं १९४७ हे या बाबतीतलं चांगले पुस्तक आहे. आपल्याला खरा ईतिहास शिकविला जात नाही. फ्रान्सची क्रांती, रशियन क्रांती मात्र शिकवितात. लेख चांगला.

२१०७ बाबतची व्यंगचित्राखालील ओळी वाचायला त्रास होतो.

अंक आवडला

दिवाळी अंक आज वाचायला जरा फुरसत मिळालि. जितके वाचले तितके.
लांडगा आला रे ) असामी सुरेख जमलि आहे.
सुखात्मे ) स्वातिजी एकदम सुंदरच.
अद्भुताचा प्रवास ) अजुक्काजी खुपच छान
कट ) दाद कट छानच शिजवलात.स्मित
आमचिही पिकनिक ) चाफ्फ्या हा तुझा स्वानुभव का रे ? कि प्रवासवर्णन?
बाकी आजुन वाचणे आहे .

र्‍ह्स्व -१

अंक हळुहळु वाचतोय. हेम्स यांची कविता खूप आवडली. बोरकर आणि इंदिरा संतांच्या काही कवितांची आठवण करून देणारी. पण बांधणीत तांत्रिक दृष्टया किंचीत बदल केला तर अजून जास्त छान वाटेल, असे वाटले,म्हणून सुचवतोय. उदा. बोरकरांच्या या ओळीचं मीटर पहा
निळ्या जळावर कमान काळी
कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याच्या कारंजीशी
कुठे गर्द बांबूची बेटे

पटले तर घ्या नाही तर सोडून द्या आणि लहान तोंडी मोठा घास घेतल्याबद्दल क्षमा करा.
-र्‍हस्व बी

असे असावे

भरून यावे माथ्यावरती
जलद थबकलेले ते थोडे
नयनातील अश्रूत सुटावे
गहन घनाचे अवघड कोडे

बहरातील फुलांची छाया
पानगळीवर व्हावी नक्षी
टपटपत्या फुलांत मिळाव्या
बरस क्षणांच्या अक्षय साक्षी

हलकासा जरी तरंग तरी हा
भरून यावे, भारून जावे
अंगावरल्या रोमांचांनी
कवितेला मग कवेत घ्यावे!

अभिप्राय

मला सगळा अंक वाचायला वेळ नाही मिळालाय पण नीलूचं चित्र आणि व्यंगचित्रही सुरेखच....

इतका सुंदर अंक काढल्याबद्दल संपादक मंडळींचही अभिनंदनः)
माऊडी

सनई

मोठ्ठी माफी मागते. नीटपणे वाचलच नाहीये की ती बासरी एक मायबोलीकर वाजवतोय म्हणून.
अभिजीत, छान वाजवलीये बासरी. दिवाळी अंकात, खुद्द मायबोलीकराच्या कलाकृतीची जागा दुसरी कोणतीही कलाकॄती घेऊ शकत नाही!

१९४७ मागच्या खर्‍या प्रेरणांचा शोध घ्यायला हवाच आहे

दिवाळी अंक चाळला. विषयांतील वैविध्य पाहून उत्सुकता वाढली.

अज्जुकाचा अद्भुताचा प्रवास संस्मरणीय वाटला.

केदार जोशींचा १९४७ वरचा लेख बरीच मेहनत घेऊन लिहिल्याचे जाणवते.
मात्र, १९४७ मागच्या खर्‍या प्रेरणांचा अजूनही शोध घ्यायला हवाच आहे.
माझा समज असा झालेला आहे की, इंग्रजांना सोयीचे होते म्हणून,
एतद्देशियांतील विघटनवादी, स्वार्थी पुढार्‍यांना हाताशी धरून लाखो भारतवासियांना
निष्कासित करण्याचा तत्कालीन इंग्रज साम्राज्यकर्त्यांचा कट म्हणजे फाळणी.

दुसर्‍या महायुद्धातील युद्धगुन्हेगारांना ज्याप्रमाणे शिक्षा देण्यात आल्या, त्याप्रमाणे
फाळणीच्या गुन्हेगारांना आपण शिक्षा देऊ शकू तो सुदिन लवकरच येवो.

झुलेलाल ह्यांची कहाणी हृदयस्पर्शी वाटली. त्यातील लोपामुद्राचे रेखाटनही.

इतर मजकूर अजून वाचलेला नाही. वाचेन तसतसे अभिप्राय लिहेन.

मात्र, संपादकमंडळाने अपरिमित कष्ट घेऊन सुरेख अंक वाचकांस सादर केला,
ते मंडळ ह्यास्तव ते अभिनंदनास पात्र आहे.

इथे डायल अप जोडणीद्वारे श्राव्य भाग ऐकतांना मात्र निराशाच पदरी पडली.
सुश्राव्य संगीतास मुकल्याची भावना झाली.
एम पी ३ डाऊनलोड करून ऐकता येण्याची सोय, पुढे मागे, (किमान कालांतराने)
करता आली तर पाहावी, ही विनंती.

- नरेंद्र गोळे

सावरिया...

Collaborative effort छानच जमलाय तुमचा.. आता पुढच्या वेळी आणि कुण्या देशातुन तुमच्या गाण्याबरोबर Video सुद्धा येउद्या

डाऊनलोडची सोय आहे

गोळे काका,

"स्वर-चित्रे" विभागातील तीनहि audio files डाऊनलोड करता येतील. काव्याच्या खाली तशी लिंक दिली आहे.

~बडबडी

सोड 'मैत्री' अपयशाची

सुधीर, तू आमच्याशी मैत्री केल्याचे आठवते.
आता तू म्हणतोस ती अपयशाशी होती.

जरी न आम्ही देऊ शकतो खातरी तुजला 'यशा'ची |
रे 'सुधीरा' सोड रे सोड, सोड मैत्री अपयशाची ||

- नरेंद्र गोळे

व्यंगचित्राखालील ओळी

संपादकानी ही उणिव माझ्या लक्षात आणुन दिली होती पण काही कारणांमुळे मी ते दुरुस्त नाही करु शकलो त्याबद्दल दीलगीरी..

खरच की!

तात्काळ प्रतिसाद दिल्याखातर कौतुक करावेसे वाटते.

खरच त्या फाईल्सकडे मी बघितलेच नव्हते. आता बघतो.

- नरेंद्र गोळे

कमनीय बांध्याचे मुखपृष्ठ आवडले!

कमनीय बांध्याचे मुखपृष्ठ आवडले!

इर्दगिर्द पुरेशी जागा सोडली असती तर आणखीही प्रशस्त वाटले असते.

रेखाटन सुंदरच आहे. सुरेख.

- नरेंद्र गोळे

गैरसमज दूर करा

सावनी शेंडेची मुलाखत आवडली. तिची अशी पहिलीच मुलाखत वाचनात आली. बेला बद्दल सा रे ग म च्या निमित्ताने बरीच माहिती मिळाली होती. पण सावनीबद्दल प्रथमच एवढं वाचलं.

एक गैरसमज आहे. 'खयाल' हा शब्द बर्‍याच ठिकाणी 'ख्याल' असा वाचला आहे. मला शास्त्रीय संगितातलं ओ की ठो कळत नही. त्यामूळे तो शब्द नक्की कसा आहे ते कोणीतरी सांगा........

अतिशय सुंदर अंक

अतिशय सुंदर अंक! मुखपृष्ठ, बासरीची धुन व स्वाती आंबोळे यांचे गीत अतिशय आवडले.

जगभर पसरलेल्या मराठी बांधवांना आपले कलागुण प्रसिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मायबोलीच्या संयोजकांना धन्यवाद!

- सतीश माढेकर

ख्याल...

>>एक गैरसमज आहे. 'खयाल' हा शब्द बर्‍याच ठिकाणी 'ख्याल' असा वाचला आहे. मला शास्त्रीय संगितातलं ओ की ठो कळत नही. त्यामूळे तो शब्द नक्की कसा आहे ते कोणीतरी सांगा........>>

"ख्याल" हा फारसी शब्द आहे. ख्याल म्हणजे विचार. एखाद्या रागाचे स्वरूप आपल्या विचारांनी आणि प्रतिभाशक्तीने रसिकांसमोर उभे करणे म्हणजे "ख्याल गायन". ख्यालाच्या बंदिशीत शब्द फार कमी असतात. यात कलाकाराला स्वत:ची किमया दाखवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य प्रदान केलेले असते. जो ख्याल विलंबित अथवा मध्य विलंबित लयीत गातात त्यास "बडा ख्याल" आणि दृत लयीत किंवा मध्य लयीत गायल्या जाणा-या ख्यालास "छोटा ख्याल" असे म्हणतात.

ख्यालात मुख्यत्वेकरून शृंगाररस आढळून येतो. तत्कालीन राजकीय परिस्थिती त्यास कारणीभूत ठरते. मुसलमान राजवटीच्या अंतिम पर्वात ख्यालगायनाचा आरंभ झाला. या काळात देशात शांतता व सुबत्ता होती. लोक ऐषोआरामात जीवन जगत होते.

ख्याल गायकी नावारूपास आणण्यात न्यामत खॉं (सदारंग) यांचा सिंहाचा वाटा आहे. धृपद-धमार या कर्मठ व नियमांनी जखडलेल्या गायकीने कंटाळलेल्या रसिकांना व कलाकारांना ख्याल गायकी म्हणजे वरदान वाटले.

(संगीत अलंकार किरण फाटक यांच्या "संगीत निबंधावली" या पुस्तकातून वरील माहिती उद्धृत केली आहे.)

सनई

मोठ्या मनाची दाद,
अभिप्राय आणि प्रोत्साहनाबद्दल मी आपला आभारी आहे:-)

दाद आणि ट्यू....

दाद आणि ट्यू.. जबरी आणि अप्रतिम!

दाद २

माझिया मनीचे-
प्रेम वरदान-श्रुती, सु.न्दरच. प्रेमाची व्याख्या पटली.
सैनिक- आवडला
रेशमाच्या रेघा- काजं-बटणं इतपत (आणी हो! हूक आणी लूकही) जमतं त्यामुळे असलं काहीही उच्चच! लेख आणि नमुने छान आहेत
प्रवासवर्णन- आवडलं
श्वना- असे बाले गडी बघितलेत. आवडलं.
चाय- कषेयपेयपानाची समग्र कथा! मस्तय! सवाईच्या चहाची आठवण देऊन काळजाचा एक टाका उसवलात.
बरसात- झुलेलाल, पुन्हा एकदा तुमच्या वेगळ्याच शैलीची झलक. खूप आवडली!
जिज्ञासा-कौतुक करावं तितकं थोड आहे. प्रेरणादायी लिखाण आहे.
लांडगा- उपमा मस्तच आहे.
१९४७-आवडला खूपच.

अजून वाचतेच आहे. अधाशासारखा चाळला की मग स्वस्थपणे कसरीसारखा हळू हळू चावून... आपलं वाचणं चालू आहे.

मी दररोज

मी दररोज एक एक कथा वाचतोय. तन्या बेडेकरची कथा छान आहे. श्रध्दा द्रविडची कथा सुरुवातिला ठिक आहे पण शेवट काही तितकासा पटला नाहि. सुपरमॉम नी पण छान लिहिलय.बाकी जसाजसा अंक पुढे वाचत जाईल तसे तसे अभिप्राय लिहिन

मस्तच

मस्त झालाय अंक. जेवढे वाचले त्यातले आवडलेले.
सावरिया सुंदर.
कथांमधल्या सगळ्याच त्या त्या लेखकाचा ठसा सांगणार्‍या.पूनम, सुमॉ, विनय,स्वाती नेहेमीप्रमाणेच उत्सुकतेने वाचायला घेतल्या आणि अपेक्षा पूर्ण.
असामी रुपांतरित गोष्टींची एक वेगळीच गम्मत असते ती बरोब्बर साधलीयस.
लेखांमधे चाय रेम, श्वना आवडले.
अद्भुताचा प्रवास मधले फोटोज छान.
मिनोती तुझा लेख वाचून या मनीचे त्या मनी झाले. डिझाईन्स मस्त आहेत. अगदी मनापासून लिहीलेय. बाकी लेख वाचायचे राहिलेत.
हलके फुलके मधे अजय, बडबडी, दाद, लोपामुद्रा,मृण्मयी यांचे लिखाण आवडले. मृणमयी अगदी ग्यादरिंगची आठवण आली.
विठोबा आणि गोपी मिल्या आज रांधण्यात दंग सही.
कवितांमधे हेम्स (डायरी), जयावी, पमा, प्रदीप, प्रमोद, वैभव यांच्या कविता आवडल्या.
चित्रं नेहेमीप्रमाणेच सुरेख. निलू माझ्या गोष्टीला अगदी समर्पक(जवळजवळ माझ्या कल्पनेतलेच) चित्र काढलेस गं.
सुरेखच आलीत एकूण चित्रं.

आज हलके फुलके

सगळ्यात आधी हलके फुलके वाचले. नेहमीची सवय ना. स्मित
तर
अजयच्या हास्य बोध कथा आवडल्या. त्यातील टोपि विक्याची कथा म्हणजे बॉल मैदानाबाहेर फेकुन देणारा षटकार आहे. स्मित
बडबडीची मॅचची उपमा आवडली. बर्‍याच ठिकाणी खळखळुन हसलो.
चाफ्याची पिकनिक भन्नाटच आहे. त्यातला "ड्युटि" सारखा विनोद तर क्लासच. जोरजोरात येणार हसु दाबताना तोंडातुन फिस्स फुस्स असले आवाज बाहेर येत होते नुसते. स्मित
दाद चा कट मस्तच शिजलाय. खबरदारी म्हणुन मी दिवसा जास्त लोक हापिसात असताना वाचलच नाहि. उशीरा बरेच लोक घरि गेल्यावर वाचायला घेतल आणि मी घेतलेल्या निर्णयाचा मलच आनंद झाला. अप्रतिम आहे वर्णन शैली दादची.
सायकल शुमाकर सारखे अनेक हास्य फुलबाजे आहेत. आता एकच इच्छा आहे. तिने एक वेगवेगळ्या मुड मधील कथासंग्रह काढावा आणि त्याचा पहिला खरेदिदार व्हायला मी हसतमुखाने तयार आहे. स्मित
मिल्याचा आज रांधण्यात मस्त आहे. माझ नाव घालुन गुणगुणुन पाहिल. अगदी चपखल आहे की. स्मित
आणि मुन्नाभाइ मस्त आहे.फक्त त्यात क्रिकेट का घुसल ते नाय कळाल.
त्यातील विडंबन आज आमच्या कडे मेल वर पोहोचल रे मिल्या.
लोपाला वातावरण निर्मिति मस्त जमली आहे.
GS गजानन आणि विनय सी यांची व्यंगचित्रे आवडली.
मृण्मयी याची कथा आहे छानच पण अजुन खुलु शकली असती.

"सावरीया" नी खरच वेड लावलं आहे!

सावरीया नी खरच वेड लावलं आहे.

विशेषत: काजरेकर यांचे स्वर्गीय संगीत.

अर्थातच आशयघन काव्य आणि कमालीची बहारदार पेशकश अतिशय आवडली.
सारे रसायनच वेड लावणारे झाले आहे.

मायबोलीच्या मुकुटात आणखी एक मोरपीस लागले आहे.

सर्व सहभागी व्यक्तींचे मन:पूर्वक अभिनंदन!

- नरेंद्र गोळे

सुखात्मे

स्वातीजी,

सुखात्मे आवडला. विशेषत: डायरी मधील काही नोंदी. अरुण साधुंची ह्याच शैलीतील एक कथा होती, बहुदा मुक्ती ह्या कथासंग्रहामध्ये. अर्थात कथा अजुन डार्क करता आली असती. दस्तोयव्हस्कीच्या कथांसारखी.

शंतनू

आभार!!!

कौतुकासाठी सर्व मायबोलीकरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार!!! स्मित

मस्त अंक

वा!! छानच झालाय अंक. अजून पूर्ण वाचला नाहीये पण कल्पना येतच आहे मांडणीवरूनच... संपादक मंडळ, मायबोली प्रशासक ( नुकतेच मनोगत वर जाउन आलो त्याचा परीणाम स्मित) आणि त्यांना मदत केलेल्या सर्वांचेच खूप कौतुक आहे की त्यांनि इतकी मेहनत घेउन इतका वाचनीय, प्रे़क्षणीय आणि श्रवणीय अंक आपल्या हाती दिला आहे..

सर्वात प्रथम 'सावरीया' ऐकले... काय लिहू? सर्वांनी आधी लिहिले आहेच. मस्त भट्टी जमली आहे... वैभवचे अचूक शब्द, विवेकचे मधुर संगीत आणि स्वातीचा मंजूळ आवाज.. क्या बात हैं!

मुखपॄष्ठ पण मस्त आहे आणि बासरीही छान...

अजून फक्त दाद चा 'कट' आणि ट्यु चा 'पियानो' वाचलाय.
दाद तू म्हणजे तर मायबोलीची मंगला गोडबोले आहेस... स्मित एखादा छोटा विषय घेउन त्याला खुसखुशीत पणे खुलविण्याची तुझी हातोटी जबरदस्त आहे.

ट्यु : निवडलेली गाणी आवडली आणि त्यानुरुप तू केलेले अचूक वर्णन ही सुंदर. त्याकाळातले बारकावे मस्त टिपले आहेस.
---------
माझ्या विडंबन आणि लेखाचे कौतुक केल्याबद्दल सर्वांचे खूप सारे आभार.. खास आभार फ आणि नीलू चे. त्यांनी इतकी समर्पक चित्रे काढली आहेत ना की लिखाणाची खुमारी वाढलीय... विशेषतः संजय दत्तचे व्यंगचित्र अप्रतिम ...

पण मायबोलीकर अभिप्राय देण्यात कंजुस्पणा का करत आहेत. इतक्या कमी comments कश्या इथे?
--------

http://milindchhatre.blogspot.com

साठा उत्तरी

स्वाती आंबोळेची कथा खुपच अप्रतिम आहे. काही काही लोक असे असतात पण त्यांच्याबद्दल फार लिहिलेले न्नाही . पण त्या डायरीतील ओळी,कविता एकदम छान सगळ डोळ्यासमोर ठेवतात. फारच छान!!

नितांतसुंदर अंक

सुरेख मुखपृष्ठ, सरस, वाचनिय साहित्य... सर्वांचेच हार्दिक अभिनंदन.. आज वाचून झाला पुर्ण...
विशेषतः संपादक मंडळीचे अभिनंदन अन आभार...

कथा-

साठां उत्तरी (कथा) वाचुन संपल्या आज
दोन शेवट - कथेच्या form साठी आवडली
तीन पत्त्यांचा तमाशा - वर्णन आणि एकंदरीत व्यक्तीचित्रणं आवडले.
सुखात्मे - या अंकातली माझ्या दृष्टीने सर्वोत्तम कथा

प्रतिसाद

अनामिकच सैनिक हे ललित छान आहे तर स्टीव्ह वॉच्या आत्मचरित्राबद्दलचा लेखही छान आहे. केदार जोशीचा १९४७ हा लेखही खुप माहितीपुर्ण आहे

मजा येतेय वाचायला

मी आपली हळूहळू वाचतीये वेळ मिळेल तसं एकेक.
अबोली : फारच गंभीर आणि ताणपूर्ण वाटलं मला वाचताना. शेवट पॉझिटिव्ह असुनही. पूनमच्या हलक्या फुलक्या कथा वाचायची सवय झालीये.
नूरजहान : मजा आली वाचायला. हलकीफुलकी करमणूक
मॅच : बडे मॅचची उपमा चांगल्या प्रकारे निभावली आहेस अखेरपर्यंत.
आता पुढचं वाचलं की पुन्हा प्रतिक्रीया देईन....

सुंदर अंक..

दिवाळी अंक आल्यापासूनच अभिप्राय लिहायचा होता.. पण काही कारणानी राहूनच जात होतं.. सर्वप्रथम एव्हडा देखणा अंक केल्याबद्दल संपादक मंडळाचे आणि ज्यांनी मदत केली अश्या सर्वांचे अभिनंदन आणि खूप धन्यवाद.. स्मित
मुखप्रुष्ठावरची बासरीची धून खूप सुंदर आहे.. एकदम प्रसन्न वाटले.. पण चित्र मात्र मला मागच्या वर्षीचे जास्त आवडले होते..
कथा सगळ्या वाचून झाल्या..
लांडगा.. मस्त आहे एकदम.. dramatic.. आवडली..
दोन शेवट.. story चांगली आहे त्यातली.. पण शैली नाही आवडली.. नुसतं narration च narration आहे... पात्र पण खूप आहेत आणि निट
establish झाली नाहीत असं मला तरी वाटलं.. त्यामूळे कळायला पण खूप वेळ लागला..
अबोली... एकदम psg style. स्मित शेवटचा प्रसंग अजून थोडा खुलवायला हवा होता असं वाटतं.. ज्यामुळे गोष्टीला अजून depth आली असती..
एक दिवस... एकदम मस्त... वर्णन, वातावरण निर्मिती सगळीच भट्टी छान जमलिये..
तीन पत्त्यांचा... सुंदर लिहिलिये... अंगावर आली खूप...वातावरण निर्मिती एकदम भारी... डोळ्यासमोर उभं राहिलं सगळं..
नुरजहान.. ok आहे... ह्या आधी लिहिलेल्या रहस्य कथा जास्त भावल्या होत्या...
सारीपाट.. मस्त जमलिये.. आवडली.. पण सुपरमॉम तुमच्याकडून एखादा वेगळा प्रयोग वाचायला आवडला असता..
सुखात्मे... नाव वाचून एकदम भूत, आत्मे ह्या संदर्भात काही आहे की काय असं वाटलं.. स्मित खूप सुंदर लिहिलिये.. ह्यावर पुरूषोत्तम करंडकात मस्त प्रायोगिक एकांकिका करता येईल.. !
घरचा पाहुणा.. very realistic.. हल्ली असं कुठेही होऊ शकतं.. good one..
खरतरं कथा विभागात दाद आणि शोनू ह्यांच्या कथा न दिसल्याने जरा वाईट च वाटलं होतं.. पण नंतर दाद चे लिखाण दुसर्या विभागात दिसलं.. शोनू ची कथा हितगुज वर लवकरच येईल अशी आशा आहे...
(to be continued..)

कथा प्रतिसाद

लांडगा आला रे आला चांगली जमलीये सुरुवातीपासुनच आपण आपले टेंन्शनमधे याचा प्लान फसतो की काय स्मित
एक दिवस मस्तच झालीये सगळ्या वर्णनामुळे आणि वातावरणनिर्मीतीमुळे.
दोन शेवटची शैली मला आवडली. असं एकेकजण काय काय करत आहेत हे वाचताना हल्ली खूप सार्‍या कथा असलेले जे सिनेमे निघतात त्यांची आठवण आली.
तीन पत्त्यांचा तमाशा : हातात जेवणाचं ताट घेऊन ही कथा वाचायची दुर्बुद्धी कुठुन झाली मला ? वातावरणनिर्मिती फारच चांगली जमलिये स्मित
सारीपाट : मस्तय आपली सगळी छान छान स्टोरी विथ हॅपी एन्डींग.
घरचा पाहुणा : ही पण आपली छोटीशी आणि छान जमलिये कथा.
कथा विभाग संपला ... स्मित

दाद ३

हलके फुलके

हास्य कथा- अजय, धमाल आली वाचताना. मस्तच. टोपीविक्या आणि माकडा.न्ची गोष्ट.न स्मित
मॅच - असा विचारच नव्हता केला कधी अगदी पटलं. बडबडी, झकास.
पिकनिक- आवडली.
चित्रे-व्यंगचित्रे - छानच आहेत.
ब्यूरोक्रसी-लोपा, मस्तच.
आज रांधण्यात- मिल्या, अरे विडंबन काव्य इतकं चपखल, इतकं चपखल की विचारू नकोस. समश्लोकी अनुवाद वगैरे असतात ना, तसलं.
मूळ गाण्यात 'ज्यास त्यास रंग रंग रंग लागले' मिल्याच.न 'ज्यास त्यास गॅस गॅस गॅस जाहले'.. अरे काय हे! मी हे कॊफी पिताना वाचलं, बावळटासारखं. मग काय? फवारा!
मुन्नाभाई- भन्नाट! म्हणजे काय भन्नाटच. जियो! जाम हसले.
पडद्यामगे-मृण्मयी, मस्तच. तुझं पडद्यामागचं रणकंदन छानच. मला आमच्या शाळेच्या गॅदरिंगची आठवण झाली. हिमगौरी आणि विठोबा झकास.

अजून कविता आणि इंद्रधनुष्य वाचायचय, चवीने!

साठा उत्तरी...

लांडगा आला रे - जेवढी उत्कंठा ताणली गेली त्यामानाने शेवट पटकन झाला असं वाटलं. कदाचित तेच गरजेचंही असेल.
दोन शेवट - ठिक. नुसतंच वर्णन होतं. पण काय म्हणायचंय हे नीटसं कळलं नाही. आयुष्याची क्षणभंगुरता अधोरेखित करायची असावी असाही विचार आला. पण ते तेवढं strongly आलं नाही असं वाटलं. शैली आवडली (साप्ताहिक सकाळ मधल्या प्रदीपच्या कथेचीही शैली छानच होती.) पण शैलीची ताकद वापरली गेली नाही असं वाटलं.
अबोली - थोडी obvious आहे पण मस्त फ्लो आहे. मला आवडली.
एक दिवस - माझं सुरूवातीला नावांच्यात confusion झालं. कुणाचं नक्की कोण कळलं नाही. पण नंतरचा फ्लो खूपच मस्त आहे.
तीन पत्त्यांचा तमाशा - खिळवून ठेवलं. शेवट अस्वस्थ करणारा. पण मूळ कथा शेवटच्या अर्ध्या भागात आली आधीचा अर्धा भाग नुसताच वातावरणनिर्मिती मधे गेला असं वाटलं कथा संपल्यावर. आवडली
सुखात्मे - केवळ fantastic. विषय, आशय, शैली सगळंच लाजवाब. कधी येऊ शिकवणीला?
घरचा पाहुणा - ठिक. विनय देसाईंकडून अपेक्षित नव्हती. तुमच्याकडून खूप वरच्या क्लासची अपेक्षा आहे.

disclaimer - ही फक्त माझी मते आहेत. कदाचित जगातल्या प्रत्येकाचे मत माझ्यापेक्षा वेगळे असू शकते. आणि मी सोडून सगळ्यांचे बरोबर असू शकते. पण सध्या मला जे पटतेय ते लिहिलेय.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

धन्यवाद

गोळे काका तुमच्याशी मैत्री करायची असेलतर अपयशाची मैत्री सोडावीच लागेल. स्मित

सुधीर

सुंदर अंक

खूप सुंदर अंक...

पूनम, संघमित्रा, सुमॉ सुंदर कथा.. श्रद्धा, नूरजहाँ पण छान.. unpredictable...

माझ्या बरोबर आणि सावरिया दोन्ही खूप आवडल्या...

कट आणि मुन्नाभाई मस्तच... खूप हसले... स्मित

-मेग्गी

माझिया मनीचे

अभिश्रुति छान मांडला आहे विचार.
अज्जुक अद्भुताची सफर खरोखर अद्भुत. फोटोंमुळे खरोखर अनुभवता आली.

जिज्ञासा

सौ.स्वाती दिक्षीत यांनी सुरु केलेल्या जिज्ञासा या प्रकल्पाबद्दल वाचुन खुप आनंद झाला. तुम्ही अतिशय चांगले काम करत आहात.समाजकार्यात तुम्हाला यश मिळत राहो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.

माढेकरांनी लिहिलेला लेख छान आहे. असे बरेच लोक आढळतात जे स्वतःच्या फायद्यासाठी दुसर्‍याला खड्ड्यात ओढतात.

चित्रेंचा 'चाय' हा लेखही आवडला. आम्हाला खांडेकरांचा 'संकल्प' नावाचा धडा होता ज्यात त्यांनी या फारशा लिहिण्यासारख्या विषयावर अतिशय छान लिहिले होते. 'चाय' हा लेखही तसाच आहे. फारस काही लिहिण्यासारख नसणार्‍या विषयावरही छान लिहिले आहे

माझिया मनीचे...

प्रेम वरदान... छान होतं. पण जरा जड होतं...
अद्भुताचा प्रवास... ok types... वर्णनापे़क्षा फोटो जास्त आवडले.. अज्जुका, तुमची कथा वाचायला पण आवडलं असतं...
सैनिक.. very touching.. परवाच अशाच आशयाचा एक लेख एका दिवाळी अंकात वाचला. त्यामुळे हा लेख आणखिनच आवडला..
परिचय.. मस्त.. माझ्या वाचायच्या पुस्तकांच्या यादीत एक चांगली भर पडली.. ह्यात मधे मधे थोडी पुस्तकातली वाक्य दिली असती तर अजून मजा आली..
रेशमाच्या रेघांनी.. छान आहे लेख..
१९४७.. एक उत्तम माहितीपर लेख.. खरच ह्यातलं आधी कहिच माहित नव्हतं.. तुमच्या कडे अजून अशी माहिती असेल तर जरूर लिहा.. वाचायला आवडेल..
लांडगा आणि बकरा.. मस्त लिहिलय.. खरच हे चेन बिझनेस वाले असाच त्रास देतात.. लांडगा आणि बकर्याची उपमा मस्त..
चाय रेम्..चांगला झालाय लेख..
जिज्ञासा.. तुमच्या लेखाचं आणि त्यापेक्षाही कार्याचं कोतूक करावं तेव्हडं कमी आहे..
बरसात.. अतिशय सुंदर लेख.. एकदम चित्रमय आहे.. एकदम पटलं सगळ.. स्मित

बाकीचे वाचून झालं की लिहिनच पुढे...

नि:शब्दातले शब्दात..

माझिया मनीचे हा विभाग पूर्ण वाचून झाला नाहीये त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया नंतर देते.

नि:शब्दातले शब्दात..
शब्दकला - चांगली आहे. मीटरचा वसा घेतलाच आहेत त्यामुळे.. २ वळणांशी अडकायला झालं 'कधी आडवळणाची तर्‍हा' आणि 'कधी सळसळती तरुणाई,'
असे असावे - खासच!! हेम्स गं!! मी तुझी जन्मभराची फॅन आहे. पण अजूनही माझ्याकडे पहिल्या क्रमांकावर 'कड्यावर झाड' च आहे.
डायरी - काळजाचा ठाव घेणे याचा अर्थ जिथे उमजतो ती खरी कविता.. तसंच झालंय..
अवगुंठन - उफ्फ!! त्रास दिलास.
मैत्री - शेवटचा झटका छान आहे.
धृवतारा - काही काही कल्पना छान आहेत.
गझल (नितिन भट) - हं.. चांगली आहे.
प्रश्न - अरे वा! मस्तच की.
गझल (प्रमोद खराडे) -
'गाव हे सारे जरी अंधारलेले
सूर्य हो तू, तूच तू तेजाळ आता'
क्या बात है!!
हळवेपण - नवीन आहे विचार. आवडली कविता.
वैभव जोशी - मी काय अभिप्राय देणार!! वाहवा वाहवा!! यापलिकडे?

कवितांच्या विभागाबद्दल एक तक्रार.. विभाग अपूर्ण आहे. पेशव्याची कविता कुठेय? पीक्याची कविता कुठेय? कहा गये वो लोग?

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सर्वांचे मनापासून आभार

"सांवरिया" वर केलेल्या कौतुकाच्या बरसातीने मी भारावून गेलो आहे. असाच लोभ असू द्यावा. यापुढच्या मायबोलीच्या प्रत्येक दिवाळी अंकासाठी एक गाणं तयार करायचं असा संकल्प सोडलाय खरा, पाहू कसं जमतंय ते.

मनात असून देखील हाती घेतलेल्या एका मोठ्या उपक्रमामुळे दिवाळी अंक निवांतपणे अथपासून इतिपर्यंत वाचून काढता आला नाहिये. अरेरे पण अंक वरवर चाळून झालाय. व्यक्तिगत अभिप्राय सवडीने देईनच.

संपादक मंडळाने या कलाकृतीचा स्वीकार करुन आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल धन्यवाद. पण दिवाळी अंकाचं संपूर्ण स्वरुपच देखणं आहे. त्याबद्दल पडद्यामागच्या व पुढच्या सर्वांचं मनापासून कौतुक.