संवाद - अर्चना जोगळेकर

संवाद - अर्चना जोगळेकर
मुलाखतकार - प्रणव मायदेव
विशेष आभार - प्रिया पाळंदे

Archana Joglekar

र्चना जोगळेकर हे नाव मराठी रसिक प्रेक्षकांच्या घरांमधून जवळजवळ गेली तीन दशकं आपली ओळख टिकवून आहे. अनेक पारितोषिकविजेत्या मराठी व हिंदी चित्रपटांमधून, दूरदर्शनवरील गाजलेल्या मालिकांमधून, इतकेच नव्हे तर रंगमंचावरील नाटकांमधूनही आपण त्यांच्यातल्या गुणी अभिनेत्रीला पाहिलेलं आहे व मनापासून गौरवलेलं आहे. त्यांच्या शास्त्रीय नृत्याच्या अभ्यासाविषयी आणि प्रेमाविषयी तर आपण जाणतोच. कथ्थकमधील त्या अतिशय सहजतेने घडवत असलेला नेत्रसुखद पदलालित्याचा आविष्कार, जोडीला उत्तम भावप्रदर्शन व कसलेला अभिनय, आणि नृत्यातील त्यांची अचूकता व त्यावरील त्यांचे प्रभुत्व यांचा त्रिवेणी संगम असलेल्या त्यांच्या नृत्याने देशविदेशात कित्येक सन्मान मिळवले आहेत; प्रशंसा व प्रसिद्धी मिळवली आहे. भारतीय शास्त्रीय नृत्याची परदेशी नुसती ओळखच करुन देण्याचे नव्हे तर ते जोपासले कसे जाईल, नवीन पिढीला त्याचे शिक्षण कसे मिळेल यासाठीही कार्यरत असणार्‍या अर्चनाजींशी नुकताच गप्पा मारण्याचा योग आला. मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी 'संवाद' या मालिकेअंतर्गत तुम्ही मुलाखत द्याल का असे विचारले असता अर्चनाजींनी पटकन हो म्हटले. मुलाखतीनंतरही अनेक वेळा फोनवरती माझ्या प्रश्नांना व विनंत्यांना त्यांनी अगत्याने उत्तरे दिली त्याबद्दलही त्यांचे विशेष आभार!

प्रणव : अर्चना, सध्या तुम्ही देशविदेशातून नृत्याचे एवढे वेगवेगळे कार्यक्रम करत असता. तुमचा नृत्याचा अभ्यास कधी आणि कसा सुरु झाला याविषयी थोडं आम्हाला सांगाल का?
अर्चना : माझी नृत्यातली गुरु माझी आईच आहे- गुरु आशा जोगळेकर. आणि घरातच गुरु असल्यामुळे मी अगदी चालायला लागल्यापासूनच माझं नृत्याचं शिक्षण सुरु झालं. परंतु अगदी फॉर्मल म्हणजे शेंडी धरून असं म्हणायला गेलं तर वयाच्या सहाव्या वर्षापासून माझं शिक्षण सुरु झालं. नंतर नृत्यामधे मी माझं गांधर्व महाविद्यालयाचं 'अलंकार', म्हणजे MA, ते पूर्ण केलं. शिवाय त्याच्यापुढेही चिक्कार अभ्यास केला. भरपूर रियाज केला. मुंबई विद्यापीठाच्या ज्या शास्त्रीय नृत्य स्पर्धा असतात त्यांच्यात मी लागोपाठ दोन वर्ष गोल्ड मेडल्स मिळवली होती. वेगवेगळ्या स्टेट लेव्हलला किंवा नॅशनल लेव्हलला ज्या स्पर्धा होतात त्यांच्यामधे पण बक्षीसं मिळवत असा तो नृत्याचा प्रवास सुरु झाला. हळूहळू मोठ्या फेस्टीव्हल्स मधे वगैरे नृत्य प्रस्तुती सुरु झाली. There was never turning back after that!

प्रणव : एवढ्या लहान वयापासून तुम्ही नृत्य शिकायला सुरुवात केलीत, तर लहानपणापासून तुम्हाला नृत्यात गती होती किंवा आवड होती असं तुम्हाला वाटतं का? की घरचंच वातावरण तसं असल्यामुळे- कारण तुमच्या आईच स्वत: एक प्रख्यात नृत्य शिक्षिका आहेत- तुम्हाला तशी आवड निर्माण झाली असावी?
अर्चना : ज्यावेळेला आई गुरु असते त्यावेळी आईचं काहीतरी रक्तातून पण अंगात आलेलंच असतं ना? Genes तर निश्चितच होते. मी लयीमधे पहिल्यापासून अतिशय पक्की होते. बालपणी वयानुसार नेहमी खेळण्यामधे, इकडेतिकडे उंडारण्यामधे लक्ष असायचं. त्याच्यामधे नेहमी माझं चित्त विचलित व्हायचं. मग मला माझ्या आईकडून भरपूर कानपिचक्याही मिळायच्या. पण हे फक्त जेमतेम सुरुवातीची तीन चार वर्षं. वयाच्या तेराव्या वर्षी मी नृत्यामधे उपांत्य विषारद म्हणजे BA part one करत होते. आणि सोळा वर्षांची म्हणजे बारावीत असताना, मी ऑलरेडी नृत्य विषारद झालेली होते. नृत्याचं माझं शिक्षण खूप झपाट्यानी पूर्ण झालं होतं. आता मी मागे वळून पाहाते तेव्हा माझ्या लक्षात येतं की मी माझ्या आईची खूप चांगली विद्यार्थिनी होते. माझी आई पण हे कबूल करते की अर्चना तिची सर्वोत्तम शिष्या आहे म्हणून. एखादी गोष्ट एकदा शिकवल्यावर कधीही गुरुला ती मला पुन्हा सांगावी लागली नाही. I was thourough with it. म्हणजे स्वत:चा स्वत: रियाज करुन मी तिच्यापुढे उभी रहायचे. तिची मुलगी म्हणून तिने मला कधीच वेगळं शिकवलं नाही किंवा वेगळं ट्रीट केलं नाही. तिच्यासारख्या गुरुपुढे मी तेवढी माझी लायकी स्वत: निर्माण केली असं मला वाटतं. मुळातच स्वाध्यायी स्वभाव असल्यामुळे शिकवलेल्या गोष्टीचं "स्व अध्ययन", ज्याला आपण स्वाध्याय म्हणतो, ते मी भरपूर करत होते.

प्रणव : तुमच्या आईव्यतिरिक्त तुमचे आणि कोणी नृत्यातले गुरु होते का? इतर कोणाकडून तुम्ही नृत्याचं formal training घेतलंत का?
अर्चना : नाही, खर्‍या अर्थाने माझी आईच माझी गुरु आहे. त्याच्यानंतर मग मला प्रगत मार्गदर्शन असं खूप बुजुर्ग मंडळींचं मिळालं. त्यात पंडिता रोहिणी भाटे, ज्या माझ्या आईच्या गुरु आहेत, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. नंतर बिरजू महाराजांकडून पण थोडंफार मार्गदर्शन घेतलं. बनारस घराण्याचे महाराज कृष्णकुमार आहेत त्यांच्याकडूनही मार्गदर्शन घेतलं. अश्या बर्‍याच मंडळींकडे शिकले. मुख्य म्हणजे सर्वच उत्तम कलाकारांचे कार्यक्रम अनेकवेळा पाहून माझ्यावर कथ्थकचे उत्तम संस्कार झाले.

प्रणव : या सगळ्या गुरुंकडे शिकतांनाच्या तुमच्या काही आठवणी आहेत का किंवा कायम लक्षात राहिलेले काही प्रसंग आहेत का?
अर्चना : असे अनेक प्रसंग आहेत... (हसत) किती प्रसंग सांगायचे. अगदी लहान असताना माझी आई गोपीकृष्णांकडे शिकली. माझी आई गोपीकृष्णांची आत्यंतिक लाडकी शिष्या! आईबरोबर मी पण जायचे गोपीकृष्णांच्या क्लासमधे. तिथल्या वार्षिक उत्सवात होणार्‍या कार्यक्रमांमधे आई प्रमुख भूमिकेत असायची. मीही त्या कार्यक्रमांमधे भाग घ्यायचे. मोठे झाल्यावर ज्यावेळेला वेगळे स्वतंत्र कार्यक्रम करायला लागले त्यावेळी मला आठवतंय... 'स्वरसाधना समिती' ही मुंबईतली अतिशय नावाजलेली संस्था आहे. त्यांच्यातर्फे वेगवेगळ्या शास्त्रीय स्पर्धा घेतल्या जातात. त्या स्वरसाधनेच्या नृत्य स्पर्धेमधे मला पहिलं पारितोषिक मिळालेलं होतं. त्यांच्यातर्फे जो वार्षिक नृत्य महोत्सव आयोजित केला जातो त्या महोत्स्वासाठी त्यांनी मला परफॉर्म करायला बोलावलेलं होत. त्या महोत्सवासाठी दिल्लीचे बनारस घराण्याचे महाराज कृष्णकुमारही तिथे आलेले होते.

त्यांचा दुसर्‍या दिवशी कार्यक्रम होता आणि माझा पहिल्या दिवशी. ते दिल्लीवरुन लवकर आले होते आणि ऑडियन्स मधे बसून त्यांनी माझा कार्यक्रम पाहिला. माझं नृत्य पाहिल्यावर ते उठून मागे बॅकस्टेजला आले आणि त्यांनी स्वत:ची ओळख करुन दिली. ते म्हणाले, "बेटा किस के पास सीख रही हो?" मी म्हटलं, "मै मेरे माँ के पास सीख रहीं हूँ". "बहौत बढिया नाचती हो, कहाँ हैं तुम्हारीं गुरु?" आई पटकन पुढे झाली. तिची ओळख त्यांनी करुन घेतली आणि ते म्हणाले, "दिल्ली में तुम आना. मै दिल्ली में तुम्हारा कार्यक्रम रखूँगा". परंतु त्यावेळी ऑलरेडी माझ्या सिरियल्स आणि पिक्चर्सची शूटींग्ज सुरु झालेली होती. आणि माझ्या ठरलेल्या तारखा लागलेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी बोलावलं आणि मी त्यावेळेपुरतं नुसतं "हो हो हो" केलं. आम्हाला वाटलं की ते काय तोंडदेखलं बोलतायत, ते किती मनावर घ्यायचं. पण ते इतकं त्यांच्या मनावर बसलं होतं की दिल्लीला गेल्यावर एक वर्षभर ते सतत मला पत्र लिहित होते, की 'तू दिल्लीला ये, मी तुझे उत्तर हिंदुस्थानात कार्यक्रम करतो. या सगळ्या लोकांची तू सुट्टी करुन टाकशील, तू इकडे ये'. शेवटी आई मला म्हणाली की 'आता मलाच लाज वाटायला लागली की इतके बुजुर्ग कलाकार एक वर्षभर पत्र लिहितायत! तर तू कसाही शूटींगमधून वेळ काढ'. तेव्हा मग वेळ काढून आम्ही दिल्लीला गेलो होतो. त्यांच्याच घरी राहिलो. त्यांनी इतक्या प्रेमानी आमचं सगळं केलं. त्यांची मुलं, त्यांच्या पत्नी, सगळ्यांनीच एवढे लाड आणि कोडकौतुक केलं! त्यांची सगळी मुलं लग्न झालेली म्हणजे मोठीच होती. ती पण मला चिडवायची. ती म्हणायची की 'इतना जो प्यार बाबूजी तुम्हे दे रहे है ना, वो तो हमे भी नही देते!' आईला तर त्यांनी आपली बहिण मानली. आई त्यांना मग राखी बांधत असे. बसून भाव दाखवणे यातले ते बनारस घराण्यातले बादशाह मानले जायचे.

मी अतिशय भाग्यवान आहे की अशा बुजुर्ग मंडळींचं उदंड प्रेम आणि भरपूर आशिर्वाद मला मिळालेले आहेत.

सगळ्यात बुजुर्ग तबल्याचे जे कलाकार आहेत ते म्हणजे बनारसचे किशनमहाराज. ते अल्लारखांच्या वयोगटातले. ते मुंबईला आले होते तेव्हा त्यांचा परिचय झाला. ते म्हणाले होते की 'बनारस कभी आओगी तो जरुर मिलना'. त्यानंतर लगेचच इलाहाबादला माझा एक कार्यक्रम होता. पण त्यावेळी इलाहाबादला डायरेक्ट फ्लाईट नव्हती. त्यामुळे मी बनारसला उतरुन, पुढे मला न्यायला संयोजक येणार होते त्यांच्याबरोबर कार ने इलाहाबादला जाणार होते. बनारस एअरपोर्टवरुन मी आवर्जून किशनमहाराजजींना फोन केला. म्हटलं "मै आई हूँ, इलाहाबाद जा रहीं हूँ प्रोग्रॅम के लिये". तेव्हा ते म्हणाले "आओ आओ, घर पे आओ, मै तुम्हारा इंतजार करता हूँ". दुपारी तिकडे पोचले बारा की एक वाजता तर ते न जेवता माझी वाट पाहात होते. त्यांनी अगदी आपुलकीनी त्यांचं घर दाखवलं. जिथे किशनमहाराज राहतात तो बनारसमधला जुना मोहल्ला आहे. म्हणजे शंभर वर्षांपूर्वी जी शहराची रचना होती ना, छोटी गल्लीबोळं वगैरे, ती अजूनही तशीच आहे. तिथे ते दाखवत होते, "अरे यहाँ सितारा रहती थी, वहाँ गोपी नाचता था. वो उधर रियाज करते थे, हम यहाँ रियाज करते थे". तो त्यावेळचा सबंध माहौल कसा असेल त्या कल्पनेनीच मला एका वेगळ्या दुनियेत गेल्यासारखं वाटलं. नंतर ते मला त्यांच्या घरातल्या वरच्या मजल्यावर घेऊन गेले. तिथे एक छान हॉल आहे आणि त्या हॉलच्या समोर स्टेजच्या बाजूला सहा फूट उंच गणपतीची बसलेली पखावज वाजवणारी मूर्ती आहे. मला महाराजजी सांगत होते की ती मूर्ती त्यांनी स्वत: बनवलेली आहे. तिचे पखावज वाजवणारे हात दाखवून ते म्हणाले मी माझे स्वतःचे हात असे ठेवले आणि पखावज वाजवताना हाताची पोझिशन कशी असते त्याप्रमाणे मूर्तीचे हात बनवले. ती इतकी सुंदर मूर्ती आहे प्लास्टर ऑफ पॅरीस ची आणि शिवाय रंगवलेलीही म्हणजे कलर मूर्ती आहे. अतिशय सुरेख! तिथे मी त्या गणेशमूर्तीसमोर अथर्वेशीर्ष नाचले होते.

त्यांच्याकडे नाचून पुढे मी इलाहाबादला कार्यक्रमासाठी गेले. तेव्हा तिथल्या प्रयाग हिंदी साहित्य परिषदेनी मला 'नृत्यभारती' हा किताब दिला होता - for outstanding contribution in Kathak.

प्रणव : तुम्ही लहानपणापासून कथ्थक मधेच specialization करताय की इतरही कुठले नृत्यप्रकार शिकलात?
अर्चना : मी आधी म्हटल्याप्रमाणे घरातच गुरु असल्यामुळे 'मी काय शिकतेय' हे कळण्याही आधीपासून मी कथ्थक शिकायला लागले होते. नंतर जाण आल्यावर व इतर शैली पाहिल्यावरही कथ्थकच मला सर्वात जास्त आवडली. परंतु दुसरी शैली जिच्याकडे मी आकर्षिली गेले ती म्हणजे उडीसी. उडीसीतले सर्वोच्च गुरु, आता जे हयात नाहीत, ते म्हणजे गुरु केलुचरण महापात्र. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला होता. कथ्थक मधलं माझं अलंकार झालं त्यावेळी त्यांच्याकडे मी उडीसी शिकले. १९८२ पासून त्यांच्याकडे मी उडीसी शिकत होते. कथ्थकमधे सूरसिंगारचा 'शृंगारमणी' हा किताब मला मिळाला होता. गुरुजींकडे उडीसी शिकल्यावर मी "कल के कलाकार" मधे नाचले होते आणि त्याच्यात मला उडीसीसाठी पण टायटल मिळालं होतं.

प्रणव : म्हणजे तुम्हाला दोन्ही प्रकार आवडतात - कथ्थक आणि उडीसी?
अर्चना : हो, पण उडीसी मी प्रोफेशनल लेव्हल वर pursue केलं नाही. परंतु उडीसी शिकल्यामुळे माझं कथ्थक अधिक सुंदर झालं असं मला वाटतं!

प्रणव : आता तुम्ही एवढे live performances करता सगळीकडे; असं कधी होतं का की तुमचा मूड नाहीये किंवा नेहमीसारखा उत्साह नाहीये? आणि झालं तर काय करता?
अर्चना : (हसत) असं अगणित वेळा होतं! मूड नसण्यापेक्षा, खरं तर मूड शारीरिक परिस्थितीवर अवलंबून असतो. थकवा खूप आलेला असतो किंवा अंगात उत्साह नसतो असं कायकाय असू शकतं, पण एकदा आपण एक कमिटमेंट दिली आहे म्हटलं की कुठल्याही परिस्थितीत I try to abide by my commitment with complete sincerity. विशेषतः हे मूड नसणं बिगिनर्स किंवा होतकरु कलाकारांपर्यंत ठीक आहे पण ज्यावेळेला नुसतं A नाही पण A+ ब्रॅकेटमधे जेव्हा तुम्ही जाता, त्यावेळेला ते दायित्व आणि ती जबाबदारी खूप मोठी असते. That time you are gone beyond proving to anybody how good dancer you are. You have to prove to yourself. त्या स्टेजला मी कणभरही कुठे कमी पडलेली मला स्वतःलाच सहन होणार नाही. त्याच्यासाठी मग आयुष्यात तुम्ही vitamins घ्या, योग्य काय खाणंपिणं असेल ते सांभाळा. थोडक्यात, अनेक वेळा आजारी असताना सुद्धा मी परफॉर्मन्सेस दिले आहेत. एकदा तर मला कावीळ झालेली होती. मी वरपासून खालपर्यंत पिवळीधम्मक पडले होते. पण मी सहा महिने आधी मुंबईमधेच एक प्रोग्रॅम कमिट केला होता - हिंदुस्थान लिव्हर्स ग्रूप साठी कॉर्पोरेट परफॉर्मन्स होता. त्यांचे Liason officer सारखे फोन करुन "अर्चनाजी, just a reminder - तुमची ही डेट आमच्याकडे आहे हं, आहे हं" करुन आठवण देत होते. आई म्हणाली की 'अगं तुला बेडवरुन खाली उतरुन बेडरुममधून लिव्हिंग रुम मधे यायची पण एनर्जी नाहीये, तू कशी नाचणार तिकडे?' पण मी म्हटलं 'नाही, मी त्यांना कमिट केलंय, I will not back off!' मला अजून आठवतं- मला एक तास सोलो नृत्याचा कार्यक्रम करायचा होता! मी त्यांना म्हटलं की तुम्ही गाडी पाठवा, AC असलेली पाठवा, काळ्या काचा असलेली पाठवा. कारण आम्ही राहायचो अंधेरीला, आणि परफॉर्मन्स होता चर्चगेटला. तो ड्राईव्हिंगचा स्ट्रेस मी वाचवला. आणि काविळीमधे तुम्हाला माहिती असेल तर आपल्याला sun rays अजिबात सहन होत नाहीत. म्हणून मी मुद्दाम डार्क ग्लासेसच्या गाडीत सूर्य पूर्वेला तर मी पश्चिम बाजूला बसून चर्चगेटला पोचले. I was constantly sipping sugar water. म्हणजे indirectly I kept myself on saline. I was wearing a green full sleeves costume, आणि पिवळ्या रंगाची ओढणी. मुळातच माझे डोळे हिरवे. त्यामुळे ते पिवळं आणि हिरवं यांचं रिफ्लेक्शन झालंय असं भासवून मी माझा डोळ्यातला पिवळा रंग लपवला! चेहर्‍याला मेकअप असल्यामुळे कातडीचा पिवळा रंग दिसायचा प्रश्न नव्हता.

प्रणव : एवढया अशक्तपणामधे आणि आजारपणामधे सुद्धा तुम्ही तो कार्यक्रम केलात?
अर्चना : स्टेजवर musicians एकतर माझे नेहमीचे होते आणि दर महिन्याला माझे पाच-पाच, सहा-सहा-कार्यक्रम चालू होते. त्या आठवड्यातच डॉक्टरांनी ब्लड टेस्टस करुन डायग्नोज केलं होतं आणि मला सांगितलं होतं की तुला दणदणीत कावीळ आहे, so just take it easy. I was on heavy medication! त्यावेळी गायला साथीला शरद जांभेकर होते. तबल्याला मुकुंदराज देव वगैरे ही सगळी मंडळी होती. त्यांनी आईला विचारलं की 'आशाताई, या अवस्थेत ती काय नाचणार आहे?' आई म्हणाली की 'मला माहिती नाही, ती स्टेजवर काय announce करते ते ऐका आणि पहा!' (हसतात)

Archana Joglekarप्रणव : माझा पुढचा प्रश्न तुम्हाला खरंतर असा होता की इतकी वर्षं स्टेज वर परफॉर्मन्सेस केल्यानंतर आताचे परफॉर्मन्सेस तुम्हाला सोपे वाटतात का? पण मला वाटतं की मला उत्तर आधीच मिळालंय कारण तुम्ही म्हणालात की प्रत्येक क्षण अगदी उत्तम होईल असा तुम्ही प्रयत्न करता... तरी देखील मला तुम्हालाच विचारु देत की आधी एवढे परफॉर्मन्सेस केल्यानंतर आता ते करणं थोडं सोपं होतं का?
अर्चना : माझ्या कुठल्याच परफॉर्मन्स मधे 'I have done thousands of performances, this one does not matter' ही भूमिका कधीच नसते. Every performance matters. प्रत्येक वेळेला ऑडियन्स कोण आहे याचं भान ठेवणं खूप आवश्यक असतं. जसं मी आता म्हटलं की ज्यावेळी मी काविळीत परफॉर्मन्स केला त्यावेळी एक तास नाचल्यानंतर मी announce केलं की I have Jaundice म्हणून. ते ऐकल्यावर लोक थक्क झाले की ही कशी नाचू शकली या अवस्थेमधे आणि मला त्यांनी standing ovation दिलं. परंतु असं अनेकवेळा झालं की १०४ ताप आहे अंगामधे, आणि मी दोन दोन तास नाचल्ये. मी नेहमी म्हणते की एकदा का रंगमंचावर शिरल्यावर ती जी रंगमंचाची चौकट आहे, ती नटराजाची चौकट आहे. तिथे जर तुम्ही तुमच्या कलेशी प्रामाणिक असाल तर नटराजाचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर असतो. तिथे कोणी माझं काही वाकडं करु शकत नाही. एकदा घुंगरु घालून तिथे उतरलं की ती जणू 'माझी' जागा असते!

आणि प्रेक्षकांबद्दल बोलायचं तर लातूरच्या शेतकर्‍यांपासून आईसलँडीक लोकांपर्यंत सगळ्यांसमोर नाचले. म्हणजे प्रेसिडेंट पासून प्राईम मिनिस्टर पर्यंत... माझ्या एका कॉन्सर्ट मधे तर दहा हजार सगळे फक्त मान्यवर लोकच होते - चाळीस देशांचे Consul General होते, आपले Prime Minister होते, तीन राज्यांचे Chief Ministers होते, Cultural Ministers होते.. तर अश्या high profile performances पासून ते बिहारच्या गावकर्‍यांपासून ते लातूरच्या शेतकर्‍यांपर्यंत ते shareholders of the banks (हसत) अशा extreme variety of audiences साठी मी अनेक वेळा परफॉर्म केलेलं आहे! आणि त्या प्रत्येक वेळेला मी ऑडियन्सशी कनेक्ट झाले आहे! It is very interesting and challenging for an artist.

प्रणव : तुम्ही वेगवेगळ्या नाटकांमधनंही कामं केलीत. 'उघडले स्वर्गाचे दार'...
अर्चना : ते माझं पहिलं नाटक. म्हणजे माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'उघडले...' या नाट़कानीच झाली.

प्रणव : अच्छा. याच्याव्यतिरिक्त इतर कुठल्या नाटकांमधनंही कामं केली होतीत का?
अर्चना : हो. 'उघडले स्वर्गाचे दार' केलं. त्याच्यानंतर 'कळत नकळत' आणि 'मुक्ता' ही नाटकं केली. अशी दोनतीनच नाटकं केली मी. 'उघडलेचेच' जवळजवळ चारशे प्रयोग झाले होते. 'उघडले' झाल्याबरोबरच मला सिरियल्स आणि पिक्चर्सच्या ऑफर्स यायला लागल्या होत्या. आणि ज्यावेळी मी पिक्चर्स करायला लागले त्यावेळी असं लक्षात आलं की नाटकाचे प्रयोग पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा मला कॅमेर्‍याचं माध्यम जास्त आवडलं.

प्रणव : मोठ्या पडद्यावर कशा आलात अर्चना, म्हणजे तुमचा पहिला चित्रपट ब्रेक तुम्हाला कसा मिळाला?
अर्चना : मी मराठी पिक्चरपासून सुरुवात केली. माझा पहिला पिक्चर जो मी साईन केला तो 'खिचडी' होता. पण पहिला जो रिलीज झाला तो 'अर्धांगी' होता. त्याचे दिग्दर्शक राजदत्त होते. हिंदी मधे 'संसार' हा माझा पहिला पिक्चर होता. तो टी. रामाराव यांनी दिग्दर्शित केला होता. त्याच्यात माझ्याबरोबर शेखर सुमन, रेखा, राज बब्बर, अनुपम खेर, अरुणा इराणी, शफी इनामदार ही मंडळी होती.

प्रणव : तसे तुम्ही बरेच हिंदी चित्रपटही केलेत...
अर्चना : बरेच पिक्चर केले, बर्‍याच हिंदी सिरियल्सही केल्या...

प्रणव : सिरियल्सकडे वळण्यापूर्वी मला 'निवडुंग' बद्दल बोलायचंय. कारण निवडुंगचा उल्लेख अपरिहार्य आहे. मराठी चित्रपटक्षेत्रात अतिशय नावाजलेला व वेगळा असा हा चित्रपट आहे आणि त्यातली अमर गाणी आजही सगळ्यांच्या तोंडी आहेत. तर या चित्रपटात भूमिका कशी मिळाली? आणि त्यावेळच्या तुमच्या काही आठवणी आहेत का?
अर्चना : मी हिंदी सिरियल्स मधे बिझी असताना मला महेश सातोस्कर आणि अरुणा जोगळेकरांनी काँटॅक्ट केलं. खरंतर निवडुंगमधे त्यांनी ओरिजिनली प्रियाला घेतलं होतं - प्रिया तेंडुलकरला. पण त्यांचा डेटस चा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि महेश व अरुणाला त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे पुढे जावं लागलं. आणि मग त्यांनी मला काँटॅक्ट केलं. मी त्यांच्यासाठी ते जमवलं आणि असा निवडुंग सुरु झाला. निवडुंगसाठी हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत होतं. तेव्हा महेश आणि अरुणा यांना लक्षात आलं की अरे अर्चना इतकी चांगली डान्सर आहे तर आपण दुसरा कोणी कशाला डान्स डायरेक्टर बोलवायचा, तिलाच करु दे. असं म्हणून मग निवडुंगचं नृत्य दिग्दर्शन पण त्यांनी मला दिलं होतं. तर तेही मीच केलं होतं.

त्यातली गाणी फारच छान होती. निवडुंगच्या नृत्य दिग्दर्शनाबद्दल मला नॉमिनेशनही मिळालं होतं - हे मला प्रभाकर पेंढारकरांनी सांगितलं. ते ज्युरीजच्या पॅनल वर होते. ते म्हणाले की 'तुझं चित्रपटातलं नायिकेचं काम तर अप्रतिम झालेलंच आहे पण तुझं नाव मी 'तू तेव्हा तशी' या गाण्याच्या उत्तम नृत्य दिग्दर्शनासाठी सुचवलंय. तू स्वत: उत्तम डान्सर असूनसुद्धा त्या गाण्यात डान्सला इतकं subdued आणि controlled ठेवलं आहेस आणि तू तुझ्यातला डान्सर कुठेही हावी होऊ दिला नाहीस. तुझ्यातल्या डायरेक्टरने त्या गाण्याला पूर्ण न्याय दिलेला आहे' असं म्हणून त्याचं नॉमिनेशन त्यांनी मला दिलं होतं.

प्रणव : हे नॉमिनेशन कुठल्या अवार्डबद्दल होतं?
अर्चना : महाराष्ट्र राज्य पारितोषिक वितरण सोहळा जो होतो, त्यासाठी.

प्रणव : 'निवडुंग' मधलं तुमचं सगळ्यात आवडतं गाणं कुठलं? मला माहित्ये प्रश्न अवघड आहे आणि उत्तर सोपं नाही पण तरी एखादं विशेष आवडणारं गाणं आहे का?
अर्चना : निवडुंग मधलं.. केव्हा तरी पहाटे!

प्रणव : गाण्यावरुन आठवलं - मला असं कळलं की तुम्ही एका चित्रपटासाठी पार्श्वगायन देखील केलेलं आहे! तर हे खरं आहे का?
अर्चना : नाही, नाही, मी चित्रपटासाठी पार्श्वगायन केलेलं नाही. जैन टीव्ही म्हणून एक चॅनल आलं होतं. जसा क्लोजअप अंताक्षरीचा कार्यक्रम आहे, तसाच त्यांनी पण अंताक्षरीचा कार्यक्रम सुरु केला होता. त्या कार्यक्रमाचं जे टायटल साँग होतं, ते मी आणि सुदेश भोसलेनी गायलं होतं. आणि आमच्या नृत्यासाठीच्या ज्या वेगवेगळ्या म्युझिकचं जे रेकॉर्डींग केलेलं आहे, त्या रे़कॉर्डींगमधे पण मी गायलेली आहे.

प्रणव : हा नृत्यदिग्दर्शनाचा जो अनुभव मिळाला, तो तुम्ही इतर कुठल्या चित्रपटांसाठी वापरलात, की फक्त निवडुंगसाठीच तुम्ही नृत्य दिग्दर्शन केलंत?
अर्चना : पिक्चर्ससाठी नाही पण त्यानंतर मी दोन सिरियल्ससाठी नृत्य दिग्दर्शन केलं होतं. स्मिता तळवलकरनी बाजीराव मस्तानीवर 'राऊ' सिरियल केली होती. त्यात मस्तानीच्या भूमिकेत अश्विनी होती. त्यावेळी स्मिताने मला विचारलं की तू करशील का डान्स डायरेक्शन? मी म्हटलं करेन! अश्विनी माझी चांगली मैत्रीण. मी त्यापूर्वी तिच्याबरोबर 'किस्सा शांती का' या सिरियलमधे काम केलं होतं. त्यात मी शांतीची प्रमुख भूमिका करत होते आणि माझ्या बहिणीच्या रोलमधे अश्विनी होती. I know that Ashwini is not a trained dancer but she is a very hardworking person. खूप sincere आणी मेहनती आहे अश्विनी. 'राऊ' मधल्या गाण्याच्या अगोदर एक महिना मी तिच्याकडून प्रॅक्टीस करुन घेतली होती आणि मग कोल्हापूरला जाऊन आम्ही शूटींग केलं होतं.

त्याच्यानंतर एक हिंदी मालिका होती 'फुलवंती' नावाची. That was a real life story based on the life of a dancer from the 18th century. ती गव्हर्न्मेंट ऑफ इंडियातर्फे कमिशन्ड सिरियल होती आणि मंगेशकर फॅमिलीने प्रोड्यूस केली होती.

प्रणव : बरोबर, त्यात अरुण गोविल होते ना तुमच्याबरोबर?
अर्चना : हो. आणि निवडुंगचे जे दिग्दर्शक महेश सातोस्कर, तेच याचे पण दिग्दर्शक होते.

प्रणव : मला ती सिरियल चांगली लक्षात राहण्याचं कारण म्हणजे कबीराचे शब्द असलेलं व लतादीदींनी गायलेलं एक गाणं त्यात होतं, 'तेरा मेरा मनुवा कैसे इक होई रे.." आणि हातात गजरे घेतलेल्या तुमच्यावर ते चित्रित झालं होतं तो scene मला अजून आठवत आहे. तर 'फुलवंती'मधली सगळी नृत्यं तुम्ही बसवली होतीत...
अर्चना : हो, 'फुलवंती'चं डान्स डायरेक्शन माझं होतं. 'फुलवंती'च्या नृत्यदिग्दर्शनासाठी आधी दुसर्‍या एक कथ्थक डान्सर मधुरिता सारंग म्हणून आहेत, त्यांना घेतलं होतं. मधुरितानी नृत्याचं सगळं रेकॉर्डींग केलं आणि पहिलं गाणं - जेव्हा पेशव्यांच्या दरबारात फुलवंती नाचते - ते गाणं edit झाल्यावर बहुतेक मंगेशकर फॅमिलीचं काही समाधान झालं नाही. म्हणून उषा मंगेशकरांचा मला फोन आला की 'अर्चना, फुलवंतीचं नृत्य दिग्दर्शन तू करशील का? बाळासाहेब म्हणतायत की निवडुंगचं नृत्य दिग्दर्शन तू खूप छान केलं होतंस, तर याचंही तूच कर'. कारण निवडुंगचं म्युझिक हृदयनाथ मंगेशकरांचंच होतं आणि फुलवंतीचंही... आणि ही सगळी गाणी लतादीदींनीच गायली होती. मी त्यांना म्हटलं की 'त्यापेक्षा तुम्ही बिरजू महाराजांना का नाही घेत, गोपीजींना का नाही घेत, म्हणजे मलाही काहीतरी शिकायला मिळेल'. पण ते तसं करण्यात फारसे उत्सुक नव्हते. आणि मला ते करण्यात विशेष उत्साह नव्हता कारण ते काम इतर कोणीतरी आधीच करत होतं. शिवाय 'फुलवंती' बनेल, पण मधल्या मधे आमच्या दोघींमधे गैरसमज होतील. म्हणून मी म्हटलं की मी आधी मधुरिता सारंगशी बोलेन. तिची काही हरकत नसेल तरच मी करेन. कारण फुलवंतीची प्रमुख भूमिका मी करतच होते, त्यामुळे मी फार काही गमावतेय असं मला वाटत नव्हतं. मी मधुरिताशी बोलल्यावर ती म्हणाली की कोणी लुंग्यासुंग्या येऊन माझ्या रेकॉर्डींगची वाट लावण्यापेक्षा it is anytime better that you handle the matter! आणि अशाप्रकारे (हसत) 'फुलवंती'चं नृत्य दिग्दर्शन माझ्याकडे आलं!

प्रणव : छोट्या पडद्यावरच्या इतर अनुभवांविषयी...
अर्चना : अनेक सिरियल्समधून मी कामं तर केलीच. पण मी दोन मालिका दिग्दर्शित देखील केल्या होत्या. 'अवघाचि संसार' नावाची मराठीमधे एक मालिका मी दिग्दर्शित केली होती. वपुंच्या कथांवर आधारित शॉर्ट स्टोरीज असं या मालिकेचं स्वरुप होतं. त्यात मोहन जोशी, सविता प्रभुणे, विक्रम गोखले, गिरीश ओक, नीना कुळकर्णी वगैरे मातब्बर कलाकारांनी भूमिका केल्या होत्या. त्यातल्या एका गोष्टीत मी स्वतः प्रशांत दामलेबरोबर काम केलं होतं.

दुसरी मालिका जी मी केली होती ती होती हिंदीमधे प्राईम टाईमवर प्रसारित झालेली 'साम्राज्य' ही मालिका. या मालिकेची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि निर्मिती हे सगळं माझं होतं. यात विक्रम गोखले, सुधीर दळवी, टॉम आल्टर, अनंत जोग, स्मिता जयकर, नीना कु़ळकर्णी हे सगळे कसलेले कलाकार तर होतेच पण त्या शिवाय अगणित नवीन चेहरे देखील होते. 'साम्राज्य'च्या दिग्दर्शनासाठी मला Critics' award ही मिळालं होतं.

प्रणव : तुम्ही नाटकं, पिक्चर्स आणि छोट्या पडद्यावर - म्हणजे या तिन्ही माध्यमांमधून भरपूर कामं केलेली आहेत. तर यापैकी - तुम्ही आधी म्हणालात कॅमेरा - पण कुठलं माध्यम सगळ्यात जास्त आवडलं आणि का?
अर्चना : पिक्चरचं. दोन तीन कारणं आहेत. म्हणजे तसं पहायला गेलं तर टीव्ही सिरियलचं सुद्धा मिडियम चांगलं आहे. त्या सिरियलचं कथानक खूप gripping आणि चांगलं असेल तर तुम्ही ते enjoy करु शकता. पण खूप वेळा सिरियलचं बजेट मर्यादित असल्यामुळे जे technical compromises केले जातात ते मला आवडत नाहीत. अश्या तडजोडी पिक्चर्स मधे नसतात. एक आहे की नाटकामधे सलग परफॉर्मन्सचा जो आनंद असतो तो चित्रपटांमधे नसतो. फिल्म्समधे त्या त्या शॉटपुरते तुम्ही काम करु शकता. नाटकामधे सलग परफॉर्मन्स असतो पण ज्यावेळेला आपण म्हणतो की या नाटकाचे चारशे प्रयोग झाले याचा अर्थ तोच परफॉर्मन्स मी चारशे वेळा केलेला असतो. अधिकाधिक जसं आपण करत जातो तसं प्रत्येक वेळेला upto a point आपल्याला त्यात नवनवीन जागा मिळत जातात अभिनयाच्या. पण ते ठराविक, एक साठ सत्तर प्रयोगांपर्यंत मिळतील नवीन जागा. त्याच्यापुढे तसं पहायला गेलं तर its quite mechanical.

प्रणव : म्हणजे नावीन्य उरत नाही काही त्याच्यात आता...
अर्चना : Exactly. आणि ते वैविध्य आपल्याला चित्रपटाचा मीडीया देऊ शकतं. त्या मिडीयामधलं Taking, Angles, Short divisions, या टेक्निकल बाबींमधे मला प्रचंड इंटरेस्ट असल्यामुळे मला ते माध्यम जास्त आवडतं.

प्रणव : एक मुद्दाम आठवणारी गोष्ट म्हणजे तुमची 'पान-पसंद' ची जाहिरात! मी नुकतंच कुठेतरी वाचलं की नाक मुरडावं ते त्या जाहिरातीतल्या 'शादी, और तुमसे?' म्हणणार्‍या अर्चना सारखं! (हे ऐकल्यावर अर्चना खळखळून हसतात) तर याशिवाय इतरही जाहिराती केल्या होत्यात का?
अर्चना : ती पॉप्युलर होती. त्याशिवाय लिप्टन ताजा चाय ची जाहिरात पण खूप पॉप्युलर झाली होती. झाकिरभाईंची त्यावेळेला 'वाह, ताज' ची जाहिरात येत होती. ती आणि त्याचवेळेला माझी जाहिरात अशा दोन्ही एकत्र रिलीज झाल्या होत्या. लिप्टनच्या जाहिरातीत मी हिरव्या रंगाचा साधा मलमलचाच पण डान्सचा ड्रेस घातलेला होता. रियाज करुन मी दमून बसते, घुंगरु सोडते, चहाचा कप घेते, आणि चहा पिते. आणि मग तिथून मी उंच मारलेली उडी असा त्यांनी शॉट फ्रीझ केला होता. त्यात 'लिप्टन ताजा चाय, कम्माल की ताजगी' असं माझं एक वाक्य होतं! That was very very popular. रामदेव मसाल्याच्याही चिक्कार जाहिराती केल्या होत्या. Vicks ची केली होती, Lux ची केली होती. निरमा, पेअर्स सोप वगैरेंच्याही केल्या होत्या. कलानिकेतन साड्यांच्याही जाहिरातींमधून चिक्कार कामं केली होती.

प्रणव : No wonder, की तुम्ही प्रत्येक मराठी घरात, मराठीच काय पण संपूर्ण देशभरातल्या सगळ्या घरांतून एवढ्या ओळखीच्या होतात आणि अजून आहात. तर अर्चना, देशातल्या एवढ्या वलयांकित कारकिर्दीनंतर इकडे आल्यावर तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला काही फरक जाणवतो का, किंवा तुम्ही ते लाईफ miss करता का?
अर्चना : Miss म्हटलं तर मी कॅमेरा, art life, आणि शूटींगचा आनंद miss करते. परंतु लग्न करणे हा माझा जाणीवपूर्वक निर्णय होता. आयुष्यातल्या वैयक्तिक जीवनातला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो जगायची मला मनापासून इच्छा होती. पण योग्य जोडीदार मिळत नव्ह्ता. क्लासिकलच्या फील्डमधल्या लोकांनी तर असं गृहीतच धरलं होतं की आता हिने कलेला सर्वस्वी वाहून घेतलेलं आहे. ही मुलगी काही लग्न करणार नाही. अश्यामधे एका मुलाशी माझी ओळख करुन दिली आशा खाडिलकरांनी. आणि (हसत) मला तो मुलगा आवडला.

प्रणव : आता तुम्ही अर्चना जोगळेकर-मुळ्ये आहात, बरोबर? तर श्री. मुळ्येंबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगाल का?
अर्चना : माझे मिस्टर डॉ. निर्मल मुळ्ये. त्यांनी फार्मसीमधे Ph D केलेली आहे. मूळचे संगमेश्वरचे. घरातली बहुतांश मंडळी डोक्टर्सच असलेले असे हे डॉक्टर निर्मल मुळ्ये.

प्रणव : तुमच्या कारकिर्दीला त्यांच्याकडून किंवा त्यांच्या घरच्यांकडून सपोर्ट मिळाला का?
अर्चना : मला अगदी २०० टक्के सपोर्ट आहे. गंमत म्हणजे त्यांचे घरचे सगळे संगमेश्वरचे आहेत. पण मुंबईला त्यांची research laboratory आहे. त्यामुळे संगमेश्वरला असले तरी त्यांचं मुंबईला सारखं जाणंयेणं असायचं. तर आम्ही दोघंच एकमेकांना भेटलो आणि एकमेकांना पसंत केलं. कारण दोघंही fiercely and economically independent, well settled adult members. आणि दोघंही headstrong! There was no way family members could have had any say in our marriage. म्हणजे आम्ही लग्न करायचं ठरवलं आणि मग आपापल्या कुटुंबियांना सांगितलं. माझ्या सासू-सासर्‍यांनी मला माझ्या साखरपुड्याच्या दिवसापर्यंत सून म्हणून बघितलेलंच नव्हतं. म्हणजे त्यांना 'अर्चना जोगळेकर' माहिती होती, त्यांनी 'अर्चना जोगळेकरला' बघितलेलं होतं अनेक वेळा, पण आपल्या मुलाची होणारी बायको (हसत) या दृष्टीने बघितलं नव्हतं. साखरपुड्यापूर्वी सासूबाईंशी फोनवर माझ्या गप्पा झाल्या होत्या. त्या फोनवर मला कितीतरी वेळा म्हणाल्या की 'मी किती आनंदी आहे की तू मला सून म्हणून मिळत्येस'. नंतर मग आम्ही प्रत्यक्ष भेटलो आणि त्या मला म्हणाल्या की 'तू तुझं हे क्षेत्र कधीही सोडू नकोस. तुला आमचा पूर्ण सपोर्ट आहे'.

आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्यादिवशी आमचं लग्न झालं तो दिवस! आमचं लग्न ३० एप्रिल ला झालं. आणि दरवर्षी ३० एप्रिललाच महाराष्ट्र राज्य पारितोषिक वितरण सोहळा असतो. कारण तो दादासाहेब फाळक्यांचा जन्मदिवस आहे. तर त्यादिवशी सकाळी लग्न करुन मी संध्याकाळी पारितोषिक वितरण सोहळ्याला हजर होते! मानपत्र वाचनाचं काम त्यांनी माझ्याकडे दिलं होतं. आणि मला अजून आठवतंय मी हिरवा शालू घालून स्टेजवर गेले. तिथे माधुरी आणि नाना पण बसले होते. माझं नाव स्टेजवर अनाऊन्स केल्यावर मी माईकवर अनाऊन्स केलं की आजच सकाळी माझं लग्न झालं. माधुरी आणि नाना (हसत) दोघंही स्टेजवरुन 'आँ...?' करुन माझ्याकडे बघत राहिले. ऑडियन्स मधे माझे सासू-सासरे, माझे मिस्टर सगळे आवर्जून कौतुकानी येऊन बसले होते. त्यांचा सगळ्यांचा पूर्ण पाठिंबा मला आहे.

प्रणव : तुमचा सध्याचा दिनक्रम कसा असतो? तुम्ही क्लासेस मधे बिझी असता हे माहीत आहे पण त्याव्यतिरिक्त काही करता का?
अर्चना : खरंतर सध्या मी माझे सगळे क्लासेस शुक्रवार, शनीवार, रविवारला फोकस केलेले आहेत. पण अधेमधे मी मुलींना बोलावते घरी. काही विशेष मार्गदर्शन देण्यासाठी म्हणून. पण ते तुरळक असतं. कारण आता माझा मुलगा साडेसहा वर्षांचा आहे; धृव त्याचं नाव. तो पण आई वडिलांचे सगळे गुण - बुद्धिमत्ता घेऊन आलेला आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून माझी धडपड चालू आहे. तो शाळेत गेलेला असतानाचा वेळ माझा असतो. त्यावेळेला मी माझं creative work आणि घरातली आपली नित्यनेमाची कामं करते. आणि तो दुपारी शाळेतून घरी आल्यावर त्याला वेळ देण्याचा प्रयत्न करते आणि त्याबरोबर माझी इतर कामं चालूच असतात. त्याच्या सगळ्या activities weekdays मधे प्लान केलेल्या असतात त्यामुळे शुक्रवार ते रविवार मात्र मी पूर्ण वेळ क्लासेससाठी देते. त्याशिवाय इथे माझी जी acadamy आहे ती गंधर्व महाविद्यालयाला पण संलग्न आहे. त्यामुळे परिक्षा केंद्राचं पण काम असतं. प्रत्येक एप्रिल-मे सेशनला आणि नोव्हेंबर-डिसेंबर सेशनला इथून विद्यार्थी परिक्षेला बसतात. तेही एक वेगळं काम आहे घेतलेलं.

प्रणव : त्याशिवाय तुम्ही ठिकठिकाणी performances करत असता त्यात सुद्धा तुम्ही बिझी असत असाल?
अर्चना : हो, जसा आत्ता नुकताच पेन्सिल्व्हेनियाला परफॉर्मन्स झाला. जानेवारीमधे बोलणं चाललंय भारतामधे - मुंबईत - एक परफॉर्मन्स करेन. तिथे गेलं की लोकांना कळतं. काही लोकं एकेक वर्ष आधीपासून डेट ब्लॉक करतात. मला मनापासून परफॉर्मन्स द्यायला आवडतात ते म्हणजे महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या टूरिझम डिपार्ट्मेंटच्या वेगवेगळ्या सन्माननीय उत्सवांमधे. उदाहरणार्थ एलिफंटा फेस्टिव्हल किंवा अजंता वेरुळ फेस्टिव्हल, कालिदास फेस्टिव्हल, नाशिक फेस्टिव्हल वगैरे.

प्रणव : तुम्ही भारतात मुलींना शिकवायचात आणि इथे पण शिकवता आहात. तर तुम्हाला भारतातल्या विद्यार्थ्यांमधे आणि इथल्या विद्यार्थ्यांमधे काही फरक जाणवतो का - त्यांच्या dedication मधे किंवा skills मधे वगैरे?
अर्चना : जनरल आयुष्याच्या approach मधेच फरक आहे! ते American culture नाही म्हटलं तरी त्यांच्यामधे आहे; त्यांच्या पालकांमधेही आहे. मी बनियाच्या दुकानात गेल्यावर चार आणे दिलेत म्हणजे तेवढी पुडी मला मिळालीच पाहिजे हाच रवैय्या तुम्ही क्लासिकल आर्ट फॉर्ममधे शिकताना नाही ठेवून चालत. कारण ती पुडी मी खूप बांधून देईन हो, पण ती गिळायची आणि पचवायची समोरच्याची ताकद नको का! तो एक महत्त्वाचा शिक्षणाचा भाग आहे हे बर्‍याच जणांच्या खिजगणतीतही नसतं.

तिथल्या(भारतातल्या) पोरांची आठवड्याला दोन तीन वेळा तीन-तीन तास खपायची तयारी असते. आणि असं म्हणणं की आमची पोरं इथे फार activities मधे बिझी असतात हे चूक आहे, कारण तिथलीही पोरं तितकीच बिझी असतात. तिथली मुलंही भरपूर active असतात आणि शिक्षणाच्या - शालेय शिक्षणाच्या बाबतीत - तिथली मुलं नक्कीच खूप पुढे आहेत. इथे 'एक ना धड भाराभर चिंध्या' अशी परिस्थिती जास्त दिसते. कारण इथे आठवड्यातून कुठलीही activity फक्त एकदाच करायची असते. एक दिवस टेनिस, एक दिवस पियानो, एक दिवस डान्स असं सगळं तोंडी लावायला थोडं थोडं घेतलेलं आहे. आम्ही आमच्या मुलाला चार दिवस बिझी ठेवलं... पण त्यातून प्रत्यक्ष त्याच्या पदरी किती पडलं हे किती पालकांना कळत असतं, याची शंकाच आहे! खर्‍या ज्ञानापेक्षा दिखावा जास्त आहे!

प्रणव : याचा तुमच्या शिकवण्यावर परिणाम होतो का? म्हणजे कुठल्याही गुरुला dedicated विद्यार्थी नसले तर येईल असं frustration कधी येतं का?
अर्चना : मला सुरुवातीला जेव्हा मी न्यू जर्सीत आले तेव्हा हा त्रास झाला होता. कारण दर महिन्याला तीन चार विद्यार्थी यायचे, आणि आधीचे तीन चार गळायचे. ओव्हरनाईट शिकून तुम्ही सिनेमातल्या गाण्यांवर नाचायला शिकाल अश्या अपेक्षेनी जे आले होते त्यांचा इंटरेस्ट गेला परंतु जे क्लासिकल म्हणूनच शिकायला आले होते, ते शेवटपर्यंत शिकत गेले. आणि जेव्हा त्या मुली बाहेर नाचायला लागल्या तेव्हा मग बाकीच्यांचे डोळे एकदम दीपले. आता मात्र सुदैवानी असं आहे की ज्यांना मनापासून शिकायचंय अशीच मंडळी येतात.

प्रणव : तुमच्या नॄत्य शिक्षणाच्या संस्थेचं नाव काय?
अर्चना : 'अर्चना नृत्यालय - The kathak dance academy'. ही मी स्थापलेली संस्था नाही तर १९६३ साली माझ्या आईने तिची स्थापना केली. म्हणजे ४४ वर्ष जुनी ही संस्था आहे आणि तिचं मुख्य कार्यालय मुंबईला आहे आणि इथली संस्था मी तिची शाखा म्हणूनच ट्रीट करते.

प्रणव : भारतीय शास्त्रीय नृत्याच्या भविष्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याचं पुढे काय होईल अशी चिंता वाटते का?
अर्चना : अजिबात चिंता-बिंता वाटत नाही. अगदी दणक्यात चाललेलं आहे - जगभरात. तुम्ही जिथे बघाल तिथे ठायी ठायी सगळे लोक क्लासिकल डान्स शिकतायत. फक्त मला असं वाटतं की क्लासिकलचे कार्यक्रम फार होत नाहीत. जसे सगळीकडे संगीत महोत्स्व होत असतात त्या मानाने नृत्याचे कार्यक्रम कमी होतात. आता इथे न्यू जर्सी मधे मी गंधर्व महोत्सव सुरु केलेला आहे, त्यात गायन, वादन आणि नृत्य हे तिन्ही प्रकार आम्ही सादर करतो. या महोत्सवात आजपर्यंत विश्वमोहन भट, आरती अंकलीकर, अश्विनी भिडे, शाहिद परवेझ, पं. जसराज ही मंडळी येऊन गेलीयेत. आणि दरवर्षी संस्थापक म्हणून मी त्याच्यात कार्यक्रम करते.

प्रणव : टीव्ही वरती जे 'Dancing with the Stars' किंवा 'नच बलिये' सारखे जे कार्यक्रम येतात ते तुम्ही बघता का?
अर्चना : मी बघितले नाहीत; पण 'नच बलिये' ची जी choreographer आहे, ती आमचीच विद्यार्थिनी आहे. त्यामुळे तिच्यातर्फे मला कळत असतं काय काय चाललंय ते.

प्रणव : तुम्ही Western classical dances बघता का, किंवा follow करता का?
अर्चना : हो, इथे प्रिंस्टन युनिव्हर्सिटीमधे जेव्हा तिथले विद्यार्थी presentations देतात, ते मी बर्‍याच वे़ळा attend केलेले आहेत. Modern dance मधे काही concepts चांगल्या असतात परंतु ही जी सगळी नृत्यं आहेत ती फक्त physical आहेत, emotional नाहीयेत. त्यांच्या ज्या काही movements असतात त्या फक्त body movements पुरत्याच मर्यादित असतात. त्याच्यामधे emotions कधीच दिसत नाहीत. That applies to ballet also.

प्रणव : Emotions म्हणजे तुम्ही भावमुद्रा म्हणताय का?
अर्चना : म्हणजे शास्त्रीय नृत्यातून अभिनय जो केला जातो, that is completely non-existant in the western classical art form.

प्रणव : अर्चना, मला कल्पना आहे आपण भरपूर वेळ बोलतोय तुमच्या व्यस्त वेळापत्रकामधेही. तर हा शेवटचा एक प्रश्न तुमच्यासाठी. मायबोलीच्या वाचकांसाठी हा खास दिवाळी विशेषांक संवाद आहे; तर त्यांच्यासाठी तुमचा काही संदेश आहे का?
अर्चना : माझ्याकडून सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! इथे अमेरिकेमध्ये राहूनही जास्त धडपड करुन आपण आपल्या संस्कृतीशी नातं जोडायचा प्रयत्न करतो - जो प्रत्यक्ष भारतात असताना कदाचित आपण केला नसता - तर तो प्रयत्न आणि आपल्या संस्कृतीशी असलेलं आपलं नातं कायम जोडलेलं राहू दे, आणि आपल्या पुढच्या पिढीत पण ते तसंच जोडलेलं राहू दे, अशी माझी शुभेच्छा!

प्रणव : अरे वा, या इतक्या सुरेख संदेशाबद्दल तुमचे धन्यवाद! आणि इतकं मनमोकळं आणि मनमुराद बोलल्याबद्दलही तुमचे आभार! Thank you so much!
अर्चना : You are welcome!