लांडगा आला रे आला

"XXXXX XXX" मनातल्या मनात दिवेजाला एक सणसणीत शिवी हासडत कारेकर आपल्या जागेवर परत गेला. हेड कॅशियरचा बोर्ड त्याच्याकडे दात विचकून बघतोय असे त्याला वाटले. "ह्या बँकेचा खरा राजा दिवेजा आहे. आम्ही सगळे त्याचे गुलाम. बस और एक दिन भिडू..." कारेकर पुटपटला. खुर्चीवर बसताना त्याची नजर पायाजवळच्या स्विचकडे गेली. त्याच्या चेहर्‍यावरच्या आठ्या थोड्याशा निवळल्या. सहज करतोय असे दाखवत त्याने तो स्विच दाबला नि समोरच्या लेजरमधे डोके खुपसले. तिरक्या नजरेने लक्ष मात्र डेस्कवरच्या घड्याळाकडे होते. वीस मिनीटे.

अलार्म दाबून पोलिस उगवेपर्यंत कमीत कमी वीस मिनीटे तरी लागतात. त्याच्या बँकेने नुकतीच ही नवी सुरक्षा यंत्रणा बसवून घेतली होती. सायलेंट अलार्म. बँकेमध्ये दोन स्विच बसवले होते. एक कारेकरच्या केबिनमधे तर दुसरा मॅनेजर दिवेजाच्या. कोणीही तो दाबला की पोलिस चौकीमध्ये अलार्म वाजत असे. प्रत्यक्ष बँकेमध्ये काहीच जाणवत नसे. एखादा दरोडेखोर अलार्मच्या आवाजामुळे घाबरून जाऊन काही करून बसेल म्हणून हा नवा उपाय. पुढच्या भागामध्ये नि तिजोरीजवळ motion detector बसवलेले होते. ते बँक बंद झाली activate होत असत. पण परत अलार्म फक्त पोलिस चौकीमध्ये वाजत असे. खिडक्या नि दरवाजेही त्याच यंत्रणेमध्ये जोडलेले होते. यंत्रणा activated असताना ते उघडले किंवा तोडले तर पोलिस चौकीमध्ये अलार्म वाजत असे. अतिशय उच्च दर्जाची सुरक्षा यंत्रणा होती. परत कारेकरच्या बेताला एकदम साजेशी.

कारेकर तसा साधा सरळ गरीब माणूस होता पण ह्या नव्या क्रेडिट कार्डच्या मोहामध्ये हे घेऊ, ते घेऊ करत कर्जाच्या जंजाळामध्ये अडकला नि डोक्यावर भले मोठे कर्ज येऊन बसले होते. नव्या जागेचे पैसे भरायला हातात काही उरले नव्हते नि होते नव्हते तेवढे पैसे जागेत अडकलेले. त्याने दिवेजाकडे कर्जासाठी अर्ज दिला (दिवेजाचे उत्तर काय असणार हे माहीत असून.) दिवेजाने त्याला सरळ कचर्‍याची टोपली दाखवली होती. दोन वर्षांपपूर्वी दिवेजाला कारेकरच्या जागी अजून कोणाची तरी वर्णी लावायची होती पण हेड ऑफिसने दिवेजाच्या उमेदवाराला बाजूला करून कारेकरला बढती दिली त्याचा हा खुन्नस. रोजच्या कामातही कारेकरला झाडायची एकही संधी दिवेजा सोडत नसे. शक्य तेव्हा कोणाच्यातरी समोर कारेकरला कमीपणा दाखवून दिवेजा आपली सुरसुरी भागवून घेत असे.

दिवेजाच्या छळवादाने हैराण झालेल्या कारेकरला क्रेडिट कार्डची वाढती बिले बघून वेड लागायचीच पाळी आली होती. रोज हाताआड होणार्‍या नोटांचे आकर्षण टाळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले होते. रविवारी क्रेडिट कार्ड कंपनीचा माणूस घरी येऊन धमकावून गेला त्या दिवशी कारेकरने उरली सुरली सगळी सदसद् विवेकबुद्धी गुंडाळून टाकली. त्याच्या डोक्यात एक योजना आखली जात होती.

आज पण कारेकरला झाडून दिवेजा बाहेर गेला नि कारेकरने अलार्म activate केला होता. गेले काही दिवस हाच प्रयोग करून तो पोलिसांना "तयार" करत होता.

बरोब्बर विसाव्या मिनिटाला इन्स्पेक्टर जाधव दोन हवालदारांबरोबर आत शिरला. आत सगळा कारभार नेहमीसारखा सुरू आहे हे बघून त्याच्या कपाळावर एक आठी उमटून गेली. पटकन उठून कारेकर त्याला सामोरा गेला.

"अरेच्चा! परत अलार्म वाजला का? ह्या आठवड्यामध्ये ही चौथी वेळ."

"XXXXXXX" जाधवने फक्त पोलिसच वापरतील अशी शिवी हासडली.

"ही सिस्टीम बसवली तेव्हा त्यांनी सांगितले होते असे होऊ शकते पण इतक्या वेळेला होईल हे नव्हते सांगितले. सॉरी, तुम्हाला परत विनाकारण तसदी पडली जाधवसाहेब."

"तुम्ही लवकर तुमची सिस्टिम नीट चेक करून घ्या. आणि कमीत कमी अलार्म चुकून वाजतोय हे कळल्यावर बंद तरी करत जा." जाधव गुरकावला.

कारेकर काही बोलायच्या आत दिवेजाचा आवाज दुमदुमला "अरे जाधवसाहेब तुम्ही?"

"आता तुम्ही बोलावले म्हटल्यावर यावे लागते दिवेजासाहेब" जाधवने बोलावले नि "दिवेजासाहेब" या शब्दांवर योग्य तेवढा जोर देत दिवेजाला update केले.

"ओह! परत अलार्म? ओह नो!!! horrible!!! 'm extremely sorry, Sir. कारेकर, काय प्रकार आहे हा? काय चाललंय काय हे?" दिवेजाने कारेकरला हाणायची संधी अजिबात सोडली नाही. तरी बरं की ही यंत्रणा बसवायची आयडिया त्याचीच होती.

कारेकरला अजून काही बोलायची संधी मिळायच्याआधीच दारातून मिसेस दिवेजा आत घुसली. तिच्या हातात एक भलामोठा पुष्पगुच्छ नि काही फुगे होते.

"I wanted to surprise you, Mr... Wish you Very Happy Birthday!!!" मिसेस दिवेजाने हातातल्या वस्तूंचे प्रयोजन जाहीर करून टाकले. "I think we should go out for lunch. What say?" मिसेस दिवेजा भरधाव सुटली होती.

"Oh sure. Jadhav why don't you join us?" दिवेजाने बोलता बोलता तो मोठा पुष्पगुच्छ नि फुगे घेऊन कारेकरच्या हातात दिले. "कारेकर, can you please keep them in my cabin?" हे काम खरं तर शिपायाला पण सांगता आले असते पण दिवेजा तो दिवेजाच.

ते गॅसने भरलेले फुगे नि बुके ठेवताना कारेकरने दिवेजाच्या सात पिढ्यांचा मनात उद्धार करत प्लॅनचा दिवस निश्चित करून टाकला होता.

त्या दिवशी रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर कारेकरने आपली स्कूटर बँकेच्या मागच्या दरवाज्याजवळ लावली नि तो किल्ली वापरून आत शिरला. त्याने पटकन भिंतीवरच्या पॅनलमध्ये keycode टाकून अलार्म disable केला. बँकेत अंधुक प्रकाश होता. पण कारेकरला संपूर्ण जागेची खडान् खडा माहिती होती. त्याला हवे ते तो सरळपणे घेऊ शकला असता पण हा डाका वाटायला हवा होता. जागेची थोडीशी तरी उलथापालथ करणे अतिशय जरूरी होते.

तो भरभर मुख्य दरवाजापाशी गेला. तिकडे ठेवलेल्या माठाला धक्का देउन त्याने खाली पाडले. एक दोन टेबलावरच्या फायली अस्ताव्यस्त केल्या. बहुतेक केबिनचे दरवाजे उघडून टाकले. ते करता करता तो एकदम दिवेजाच्या केबिनसमोर थबकला. त्या बुकेमधून दिवेजा त्याच्याकडे वेडावून बघतोय असे त्याला वाटले. त्याला बांधलेले फुगे मंदपणे झुलत होते. ते पाहून त्याच्या कपाळावरची नस टरटरली. रागारागामध्ये त्याने ती फुले कुस्करून जमिनीवर फेकली. त्यांना बांधलेले फुगे उडून छताजवळ गेले. त्याने उडी मारून एक पकडला नि फोडला. फोडण्याचा आवाज बंद जागेत छान घुमला नि दचकून कारेकर थबकला. आपण कुठे आहोत नि काय करतोय त्याचे भान येताच तो चटकन मागे वळला. अतिशय जलदगतीने त्याने बाकीची कामे आटोपली. दिवेजाच्या केबिनमधून काँबिनेशन वापरून सेफ उघडली. आतले पैसे नेहमीच्या सराईतपणे पिशवीत भरले. खरं तर त्याला इतके सगळे नको होते पण डाका वाटायला हवा तर .....

मागच्या दारातून बाहेर पडायच्या आधी त्याने अलार्म activate केला नि दरवाजा बंद करून घेतला. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये दिवेजा अडकणार नाही हे कारेकरने ओळखले होते पण थोडाफार चौकशीचा भुंगा त्याच्यापाठी लागेल तोही कारेकरला पुरेसा होणार होता. शिवाय ह्या अलार्मची आयडिया दिवेजाची असल्यामुळे त्याची बँकेत पत कमी होणार हा फायदा पण होताच.

बाहेर आल्यावर त्याने रस्त्यावरचा एक मोठा दगड उचलला. हा तो दर्शनी भागतल्या काचेतून आत फेकणार होता. काच फुटल्यावर आतमध्ये हात घालून दरवाजा उघडायचा नि सुंबाल्या करायचा असा त्याचा बेत होता. पोलिस नेहमीप्रमाणे आरामात उगवणार ह्याची त्याला खात्री होती. जाधव अजून ड्युटीवर असेल तर कदाचित कोणीच येणार नाही असाही विचार त्याच्या मनात तरळून गेला. जेव्हा जे कोणी इथे येईल तेव्हा चोर डाका टाकून पळून गेले असे वाटणार होते. उद्याच्या पेपरमध्ये पोलिसांना बेजबाबदार वागण्यासाठी धारेवर धरले जाणार होते.

विचारांच्या नादात कारेकर बँकेला वळसा घालत समोरच्या बाजूला आला नि थबकला. कोणीतरी हातगाडी ढकलत रस्त्यावरून चालले होते. कारेकर रस्त्यावरच्या झाडाच्या आडोश्याला थांबून राहिला. Better to be safe than sorry. त्याच्याकडे वेळेची कमी नव्हती.

जवळजवळ दहा पंधरा मिनीटे तो तिथे उभा असेल. अगदी हातगाडी निघून जाऊन पार नजरेआड होईतो. मग हळूच वाकून त्याने रस्त्याच्या दोन्हीकडून एकही वाहन येत नाहीये, कोणी पादचारी नाहीये ह्याची खात्री करून घेतली. सर्वत्र निरव शांतता होती.

पटकन् दगडी पायर्‍या चढून तो बँकेच्या खिडकीजवळ गेला नि त्याने हातातला दगड काचेवर फेकला. फुटलेल्या खिडकीतून आत हात घालून त्याने दरवाज्याची कडी उघडली नि पोलीस चौकीमधे अलार्म वाजला असेल ह्याचा विचार करत तो धावत स्कूटरकडे पळाला. जाधवच्या तोंडातल्या शिव्या आठवून त्याला उगीच हसू फ़ुटले.

स्कूटर सरळ करत त्याने किल्ली फ़िरवली. किक मारून सुरू करत तो मेन रोडकडे वळला नि समोरून आलेल्या पोलिसांच्या जीपच्या हेडलाईटच्या प्रकाशामध्ये गपकन् थांबला. "हे कसे शक्य आहे? इतक्या लगेच कसे काय आले हे?"

त्याच्या हातात बेड्या ठोकत त्याला जीपमध्ये बसवल्यावर त्याला राहवले नाही.

"पण खरंच तुम्ही एवढ्या लगेच कसे काय आलात? अलार्म तर आत्ता सुरू झाला असेल."

"आत्ता? जवळजवळ गेली वीस मिनीटे कोकलतोय तो. आम्ही आधी लक्ष दिले नव्हते पण वीस मिनीटे ठणाणा केल्यावर शेवटी यावेच लागले." जाधवबरोबर सकाळी असलेला हवालदार अजून ड्युटीवर होता.

"पण कसे शक्य आहे हे?" कारेकरला उत्तर मिळाले नाही.

कारेकरला त्याचे उत्तर दुसर्‍या दिवशी भेटायला आलेल्या दिवेजाने दिले.

"You useless swine, Karekar. What the hell do you think you were doing? Thank God, My balloons saved the bank."

कारेकरच्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह पाहून दिवेजाने खुलासा केला होता.

ज्या क्षणी कारेकरने मागच्या दरवाजाजवळ अलार्म activate केला होता, तरंगणार्‍या फुग्यांमुळे motion detector activate होऊन अलार्म वाजू लागला होता.

"XXXXXX XXXX दिवेजा" ह्या वेळी कारेकरने आपल्या रागाला तोंडाद्वारे वाट करून दिली होती.

(Kimberly Brown च्या एका कथेचा अतिशय स्वैर अनुवाद)

-असामी