एक दिवस

ठताक्षणी सवयीने पेपर आणायला तो बाहेर गेला आणि येताना त्याच्या डोळ्यांना जाणवले की आज काहीतरी बदललंय. बाल्कनी आणि किचनचा ओटा दोन्ही जागा मोकळ्या होत्या. ती इथे आल्यापासून प्रत्येक दिवशी सकाळी ती या दोन्ही पैकी एका जागेवर असतेच. पेपर उचलून आत आणल्यावर तो वाचायच्या वेळीच आपण डोळे पूर्ण उघडतो. आणि त्यावेळी ती दिसते. कॉफी करत असलेली किंवा बाल्कनीत मग घेऊन उभी असलेली. आज कुठे गेली असेल?

लगेच तिला शोधायला आत जाणं जरा विनोदी वाटत असूनही तो आत वळला. इतक्यात तीच स्टडीमधून बाहेर आली.

"उठलास? तुलाच नोट लिहीत होते. चल मी निघते."
"इतक्या लवकर?"
"हो रे. आज मीटिंग आहे लेक्चर्सच्या आधी."

आज त्याला सुट्टी आहे हे ती गेल्यावर त्याला आठवलं. तो बाल्कनीत आला विचार करत. आज काय झालं एकदम? हे असं कधीच वाटलं नव्हतं आयुष्यात. असं म्हणजे कसं हेही त्याला कळेना. नक्की काय? असुरक्षितता? ती जाईल याची भिती? आणि मग ती आजच का? खरं तर हा सगळा सेटअप आपल्याच मनाप्रमाणे झालेला.

पहिल्यांदा ती इथं आलेली त्याच्याकडे त्याच्या मैत्रिणीबरोबर- निशीबरोबर. निशीची शाळेतली मैत्रीण. इथं शिकायला आलीय, निशीचेच अपार्टमेंट शेअर करतेय, त्याचं घर तिला खूप आवडलं - हे सोडून फारसं काही लक्षात राहिलं नव्हतं तिच्याबद्दल. आणि ते घर होतंच तसं. प्रशस्त. शांत. स्वतःचंच एक वेगळं जग असलेलं. जुनी दोन मजली पारंपारिक रचना. मागे लांबरुंद यार्ड आणि पुढे प्रशस्त लॉन. दोन्हीकडे लांबलचक व्हरांडे. उंच छताच्या खोल्या. अँटीक मोजकं फर्निचर. आणि एक अख्खी वेगळी स्टडीरूम. तसा शांत गारवा तिने कधी अनुभवलाच नव्हता. आणि कुणीही बोललं की थोडासा आवाज घुमतो त्यामुळे घराच्या भव्यतेची जाणीव होते हे तिनेच सांगितलेलं.

मग एका वीकेंडला त्यांचा ग्रूप येणार होता रहायला तर त्याने निशीला सांगितलं होते, तुझ्या मैत्रिणीलाही घेऊन ये हवंतर. तिला आवडलंय ना घर. तेव्हा मग तीही आली होती. ते दोन दिवस एखाद्या रिसॉर्टवर एन्जॉय करावेत तसे केले होते तिने. बाल्कनीतल्या गार्डन चेअर्स, लॉनमधल्या सिटआऊटमधले बेंचेस आणि दिवाणखान्यातला मोठा झोपाळा हे तर होतंच. पण किचनच्या मागच्या यार्डकडे जाणार्‍या पायर्‍या, स्टडीरूममधली छोटी सेटी, दिवाणाखान्यातून वरच्या मजल्यावर जाणारा लाकडाला पिस्ता रंगाचा ऑइलपेन्ट दिलेला जिना, वरच्या मजल्यावरच्या मोकळ्या गच्चीच्या कडेला ठेवलेला लाकडाचा मोठा बॉक्स या आणि अशा कितीतरी जागा तिने शोधल्या आणि वाचनसमाधीसाठी वापरल्या होत्या. ती त्या बाकीच्या ग्रूपसारखी केवळ आवाजी आनंद व्यक्त करणारी नव्हती. तो तिच्या चेहर्‍यावर दिसायचा.

तो वीकेंड संपल्यावर त्याला त्या छोट्या छोट्या जागांमधे ती जाणवायला लागली. तिला आपण इतकं महत्व देऊ असं कधी वाटलं नव्हतं त्याला. आणि त्या क्षुल्लक जागांनाही असं वाटलं नसणार. अजून काही दिवसांनी पुन्हा कुणी नवा गडी या शहरात आल्याचं निमित्त होऊन त्यांच्या ग्रूपचं भेटायचं ठरत होतं. तेव्हा त्याने आधी निशीला फोन केला होता. मागच्या वेळसारखे इथे रहायलाच या म्हणून. ते सगळं ठरल्यावर मग त्याने तिच्याकडे चौकशी केली होती ती पण येतेय ना म्हणून. तर कळले की तिचं कसलंसं प्रेझेंटेशन आहे पुढच्या आठवड्यात. मग तो तिच्याशीच बोलला की तिथे तयारी करण्यापेक्षा माझ्या स्टडीत जास्त छान होईल. तिला खूप बरं वाटलंय पण ती विचार करून सांगेल असे ठरल्यावर मग वाट बघणं आलं. पण ती आली होती. आणि मग अजून दोनतीनदा त्याच ग्रूपबरोबर तसेच प्लॅन्स झाल्यावर त्याच्यासकट त्याचं सगळं घरच तिची वाट बघायला लागलं होतं.

हळुहळू बॅकयार्डमधे तिच्या आवडीच्या काही झाडांची त्याच्या वाढदिवसाच्या, नवीन वर्षाच्या आणि अजून पण कसल्या कसल्या निमित्ताने भर पडत गेली. शिवाय आवडत्या कंपोजर्सच्या, मूव्हीजच्या सीडीज, डीव्हीडीज असंही इतर काही. कुठल्याशा ट्रिपवरून आणलेले जुन्या देवतांचे मुखवटे. तिचे श्वास, आश्चर्यानंदाची वाक्ये, हसू, उसासे. असं बरेच काही जिथे जाईल तिथे घरात तिनेच निगुतीने ठेवलेलं, लावलेलं, जोपासलेलं, विसरलेलं सापडायला लागलं त्याला. दोघांपैकी कुणीही आपल्या भावना बोलून दाखवलेल्या त्याला आठवत नव्हत्या. त्या अशाच समजत गेल्या, गृहित होत गेल्या. ते गृहित होणं आधी रोमांचक आणि नंतर सवयीचं होत गेलं.

आणि एक दिवस त्याने तिला इथे रहायला येण्याबद्दल विचारलं. एका आडबाजूच्या कॅफेमधे एका संध्याकाळी ते बसलेले असताना. अशा जागा ती कुठून शोधून काढायची कोण जाणे? इथला कॉफीचा वास, मागची दाट झाडी, लाकडी बांधकाम, उन्हाळ्यात संध्याकाळी येणारे कवडसे आणि हिवाळ्यात मिणमिणत्या प्रकाशातली ऊब, तिथले एक गुबगुबीत पांढरंशुभ्र मांजर आणि बुधवारी गेलात तर आर्त व्हायोलीनचे सूर.. हे सगळे मिळूनच ती कॉफी आठवते असं म्हणते ती. आता कुठेही तसा कॉफीचा वास आला की तो सगळा माहौलच जसाच्या तसा समोर येतो. आणि तिथेच एका केनच्या खुर्चीवर विसावलेली ती पण.

तर त्याने असं सहजपणे विचारलं याचं तिला इतकं आश्चर्य वाटल्याचंच त्याला आश्चर्य वाटलं. त्यात काय? इथे कितीतरी लोक रहातात असे.
"ओके. मग त्या आधी आपण लग्न करून टाकू."
आता धक्का बसायची त्याची वेळ होती. किती सहज बोलतेय ही!
"तुला खरंच असं वाटतंय?" त्यानं खात्री करून घेतली.
"तुला खरं सांगू? मी अजून लग्नाचा विचारच केला नाहीये. आणि गरज काय आहे त्याची? माझ्याइतकंच तुलाही तुझं स्वातंत्र्य प्रिय नाही का राणी? हे बघ एकदा बंधनात पाय टाकला की दोन दिशांना नाही जाता येणार. एका कुणाच्या तरी इच्छेप्रमाणेच होणार आणि दुसर्‍याची फरफट होणार त्यात. आता कदाचित रक्तात चुकून राहून गेलेले कुठलेतरी जीन्स बोलून जातीलही की मला मान्य आहे तुझ्यात विरघळणं. माझ्या अस्तित्वाचं वेगळेपण संपवणं. हे आत्ता त्या भरात होऊन जाईलही पण पुढे एकाला पश्चात्ताप आणि दुसर्‍याच्या माथी त्या पापाचे खापर. माझं म्हणशील तर मी कुणाच्या इच्छेनुसार स्वतःला बदलूही शकणार नाही आणि माझ्यासाठी कुणी घुसमटत त्याग करत राहतंय हेही मला सहन नाही होणार. "

ती काहीच बोलली नव्हती यावर. मग म्हणाली, "ठीक आहे. विचार करून सांगते."

मग काही दिवसांतच ती इथे आली होती रहायला. त्या दिवसानंतर तिने परत तो विषय काढला नव्हता. पण घर मात्र उजळून गेलं होतं त्याचं. ती इथे आल्यापासून तो घरी लवकर यायला लागला होता. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी सोडलेलं वैभव तिच्याबरोबरीने तोही अनुभवायला शिकला. तिच्याइतकं ते घरही आतिथ्यशील झालं होतं. कुणाकुणाच्या किती गोष्टी साजर्‍या केल्या गेल्या इथे. हौसेने. कागदोपत्री त्याचं असलं तरी घराला विचारलं असतं तर त्याने मालक म्हणून तिलाच स्वीकारलं असतं. आणि आत्ता तो विचार करतोय तर त्याच्या लक्षात येतंय की त्यानं पण. आणि नुसत्या घराचाच का त्याच्या आयुष्याचाही ताबा तिच्याच हातात होता की.

आणि मग सकाळचा प्रसंग आठवून तो अजून अस्वस्थ झाला. या अस्थानी भितीचे त्याला कारण समजेना आणि त्यावर काय उपाय करावा तेही. उन्हं अजूनही पूर्वेकडेच होती. समोरचं लॉन छान चमकत होतं. सकाळी तिच्याबरोबर बाहेर पडलो तर हा सोहळा पहाणं सक्तीचं असतं. जसा दिवस चढत जातो तसं हे ऊन रंग बदलतं. तसंच नात्याचंही होतं ना. दिवसाच्या सुरुवातीचं कोवळं उन आल्हाददायक आणि आश्वासक. नंतरचं तापदायक तरीही आयुष्याला अतिशय गरजेचं. आणि मग संध्याकाळचं उदास तरीही हळवं. जितका वेळ मिळेल तितकं बरंच असं. पण मग रात्रीचं काय? म्हणजे नात्याचा अंत? नाही.. ही कसली तुलना? त्याने डोकं हलवून ते विचार जणू झटकून टाकले. ती नसेल तर आपलं काय होईल? इतकं काही अवघड नाहीये तसं. काही महिन्यांपूर्वी नव्हतीच की ती. तेव्हाही छानच चाललं होतं.

सुरूवातीला एकदा आई आली. 'छान वाटतं तुमच्या घरात रहायला' असं तेव्हा तिने आईला सांगितलं होतं. मग त्याच संध्याकाळी आईसाहेबांनी आपल्याला विचारलं होतं की 'बाबा काय विचार आहे?'

हे असले प्रश्न आई सहसा विचारत नाही. मग आई गेल्यावर 'तुझी आई एकटी का रहाते तिकडे? एवढं मोठं घर आहे आणि आता त्या एकट्याच आहेत तर मुलाजवळ राहू वाटत नाही त्यांना?' यावर आपली रिऍक्शन बघताच नुसतं गोड हसली आणि म्हणाली 'सॉरी'. बाकी आईशी तिचे धागे जुळले तेही तसेच. 'तुझी आई म्हणजे एक गोंडस म्हातारी आहे' असे म्हणते. आईही येते अधूनमधून हल्ली.

संध्याकाळी घरी आलो लवकर तर मागच्या अंगणात रोपट्यांना पाणी घालणारी ती आणि पायर्‍यांवर बसून तिच्याशी गप्पा मारणारी आई असं दृष्य दिसतंच मग तेव्हा हमखास. मग इतर वेळी दोघं मिळून जो स्वैपाकाचा कार्यक्रम करतो त्याऐवजी या बाया काहीतरी वेगळंच करतात. बर्‍याचदा जेवण तयार असतं एकदम काँटिनेन्टल. किंवा मग आज आपण बाहेर जायचंय जेवायला असं फर्मान. मित्राच्या आईला आवर्जून जेवायला सोबत नेणारी गर्लफ्रेंड आत्तापर्यंत आपल्यालाही नव्हती आणि आपल्या मित्रांनाही.

अशी माणसं असतात? आपल्याला इतर कुणी वर्णन करून सांगितलं असतं तर फार खोटं ढोंगी वाटलं असतं. पण तिला तसं प्रत्यक्ष जगताना आपण बघतोय. जगण्याचा आनंद एखादं माणूस इतका भरभरून घेऊ शकतं इतकंच नव्हे तर तिचा प्याला अपुरा पडतो त्या फेसाळणार्‍या जीवनानंदासाठी आणि नकळत आपला प्यालाही भरून जातो.. तरीही वर थोडा उरतोच. कधी कधी तर एक शब्दही न बोलता तास न् तास आपण एकमेकांबरोबर घालवू शकतो. फक्त एकमेकांचे सोबत असणंच हवं असतं अशा वेळी. तर कधी कधी तास न् तास अखंड बडबडसुद्धा करत रहातात बाईसाहेब. आणि मजा म्हणजे अशा वेळी स्वतःच्याच मूड स्विंग्जची चेष्टा करणं हे हमखास ठरलेलं.

तिच्या विचारात तो गुरफटून गेला. आज बाहेर पडून भटकू एकटेच म्हणून तो उठला. हे घर गावापासून बरंच बाहेर. मोकळा लांबलचक रस्ता आणि दोन्ही बाजूंना उंच, राखाडी-तपकिरी शेलाट्या बुंध्यांचे वृक्ष. वारा सुटलाय जोरात. एका विशिष्ट लयीत त्या झाडांचा आवाज होतोय. त्या वार्‍याची, झाडांच्या पानांची आणि आपल्या बुटांच्या ठोक्यांची सिम्फनी. आपणही तिच्यासारखेच झालोय असं वाटून एक हसू पसरलं त्याच्या चेहर्‍यावर. पण तरीही ती असती तर काहीतरी वेगळं नवंच म्हणाली असती.

आत्ता कुठे दिवस डोक्यावर येतोय. तरी हवा गारच आहे आज. आणि मिणमिणता सूर्य. दिवस उदास, न सरणारा. एकटेपणाची सवयच नाही राहिली. तिला सुट्टी घ्यायला सांगायला हवं होतं. फोन करून उपयोग नव्हता. शिकत असल्यापासूनच ती लेक्चर्स चालू असताना फोन बंद करून ठेवे. आता स्वतः पण शिकवते तेव्हा प्रश्नच नाही. तेवढ्यात तिचा एसेमेस आला. 'आज शक्य होईल तितक्या लौकर निघते. त्या कॅफेमधे जाऊ या संध्याकाळी. तिथेच भेटू. '

त्याने लगेच प्रयत्न केला. फोन ऑफ होता. मग रिप्लाय केला. तिच्या दोन लेक्चर्स च्या मधे कधीतरी वाचेल. मग त्याने शहराकडे जाणारी बस घेतली. शॉपिंग हा त्याच्यासाठी अगदीच दुर्लक्षित टाईमपास. आता तो भर पेठेतून भटकत होता. खिडक्यांमधून डोकावणार्‍या वस्तू बघत. नाजूक पिवळ्या रंगाचा सिल्कचा स्कर्ट बघून त्याला तिने सांगितलेलं आठवलं. तो नकळत आत शिरला.

संध्याकाळी कॅफेत ठरलेल्या वेळेच्या आधीच पोचला तो. हातातल्या शॉपिंग बॅग्स कोपर्‍यात ठेवून तिथेच एका खुर्चीत बसला. तिथून कॅफेचा मागचा भाग दिसतो. मागे थोडेसे यार्ड आणि मग दाट झाडी. झाकोळ बराच आधी येतो इथे त्यामुळे. त्यापलिकडे डोंगरांची अंधुक निळसर रेषा. डोंगर आकाशाबरोबर रंग बदलतात. दिवसा निळा रात्री काळा. पण तरीही त्यांचं असणं विरून जात नाही. उलट त्या एका गडद रेषेनं त्यांचं आकाशापासूनचं वेगळेपण अजूनच जाणवतं.

"त्या गर्द झाडीकडे आणि मागच्या डोंगराकडे पाहिलं की मन पण गर्द होतं ना? अजून मोकळं, मोठं?"
तिने समोर येऊन बसत विचारले. तो मायेने हसला.
"आज खरं तर मीच तुला म्हणणार होतो कुठे तरी जाऊ या म्हणून. पण तुला कशी आठवण झाली इथे यायची?"
"अरे एक आनंदाची बातमी सांगायची होती तुला. इथे साजरं करावंसं वाटलं. खरं तर आपण इतक्या ठिकाणी एकत्र गेलोय पण हे अगदी आपलं आहे. मी आणि तू म्हटलं की प्रत्येक वेळी मला तुझं घर आणि मग हा कॅफेच आठवत राहील."

पुन्हा एक अनामिक निळसर भिती सळसळत गेली त्याच्या मनातून. तिला बोलू देऊ नकोस. आधी तू बोल. कुणीतरी त्याच्या कानात म्हणाले. पण तिच्या उत्साहाच्या कारंजापुढे तो स्तब्ध झाला. काय खायचेप्यायचे ते नेहमीप्रमाणे ठरल्यावर ते घेऊन येऊन बसल्यावर ती म्हणाली,
"आता ऐक. माझा प्रोजेक्ट पूर्ण तर झालाच आहे आणि तो स्पॉन्सर पण होतोय. गेस व्हॉट? माझ्याच देशातल्या एका कंपनीकडून. आता हे सेमिस्टर संपले की लगेच मला तिकडे जावे लागेल."

त्याच्या चेहर्‍यावर इतकावेळ ताण दिसत होता. आता तर नकळत सगळ्या कॅफेला ऐकू जाईल असा दुःखोद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडला. भानावर आल्यावर त्याच्या लक्षात आलं की या संकटाचीच चाहूल लागत होती सकाळपासून.

" ठीक आहेस ना तू? काय झालं? मी जातेय म्हणून इतकं वाईट वाटतंय की काय?" ती हसली.
त्याने तिचा हात हातात घेतला.
" खरंच. तू गेलीस तर माझं जगणं फक्त अवघडच नाही अशक्य होईल राणी. प्लीज माझा विचार कर. मी फार गुंतलोय तुझ्यात. मी माझी चूक मान्य करतो. तू स्वतः म्हणालीस तेव्हाच तुला लग्नाच्या बंधनात अडकवून टाकायला हवं होतं. फार मोठा सन्मान होता तू मला असं विचारणं हा. तुला काय वाटलं असेल जेव्हा मी उत्तर दिलं तेव्हा?"

ती बघतच राहिली त्याच्या चेहर्‍याकडे.

" खरं सांगू? त्या दिवशी तुझ्याशी बोलले त्यानंतर फार विचित्र अवस्था झाली माझ्या मनाची. असं मी कुणाला स्वतःहून विचारेन असं कधी वाटलंच नव्हतं मला. माझं मलाच खूप आश्चर्य वाटतं अजूनही की कसं विचारलं मी असं? पण त्यावेळी विचारलं खरं. असं रहाणं आणि त्यातही तुझं लग्न न करण्याबद्दल इतकं ठाम असणं दोन्हीचाही शॉकच होता. पण इथं आल्यावर नवीन गोष्टी शिकत गेले. तू खूप आवडला होतास. तुझ्या घरासकट. पण तूच जास्त."

तिचे डोळे काठोकाठ भरलेले. त्याचे मात्र हा बांध फोडून वाहू लागलेले.

"मग तडजोड करायची ठरवली. सुखं मिळवणं आपल्याच हातात असतं रे. फक्त ती अशाच प्रकारे मिळावीत असले आपले अट्टाहास आड येतात. मग पटलंही तुझं बोलणं. स्वतःचं स्वत्व जपणं. आणि प्रेम तर आहेच ना. उलट सामाजिक बंधन नसलं की आपणच अधिक जबाबदारीने ते नातं निभावतो हेही अनुभवलं. आता वाटतं बरंच झालं त्यावेळी तो निर्णय घेतला नाही ते. फार रिलॅक्स झाले असते मी. तू पहातोस ना किती गुंतते मी प्रत्येक छोट्या गोष्टीत. शिक्षण केलं असतं पूर्ण पण मग आज जे इथपर्यंत पोचलेय ते छोटंसं स्वप्न पूर्ण करता करता काय झालं असतं काय माहीत? माझ्या वृत्तीत बसत नसतानाही मग स्वीकारलं सगळं. पण काही असलं तरी त्याचा पश्चात्ताप करावा लागला नाही कधीच."

ek_divas.jpg
"पण मला मात्र पश्चात्ताप होतोय." तो कसाबसा म्हणाला. दाटलेल्या घशाने त्याला बोलता येईना.
"मी तुझ्यासाठी.."
एवढे बोलून त्याने कोपर्‍यातल्या शॉपिंग बॅग्स कडे बोट दाखवलं. तिनं उचलून एकेक उघडल्या. स्कर्ट बघून हरखलीच ती.
"किती सुंदर आहे रे!!"
"हं." 'दुसरी उघड' - त्याने खुणेनेच सांगितलं.
त्यात एक सुंदर हिर्‍याची अंगठी होती.
"छान आहे खूप."
"तुझ्यासाठीच आणली होती. आणि तो स्कर्ट पण. तुमच्याकडे वधू सिल्कचं पिवळं वस्त्र वापरते ना लग्नात, म्हणून."
जर्द पिवळ्या साडीऐवजी पेस्टल यलो स्कर्ट. आता तिच्या भरल्या डोळ्यातून हसू सांडायला लागलं.
तिनं उठून त्याला घट्ट मिठी मारली.
"म्हणजे तू थांबणार आहेस ना?" त्याने आशेने विचारलं.
"राजा अरे या आयुष्यातून एकदाच येणार्‍या संधीची मी वाट पहात होते. माझ्या करियरचा पहिला माईलस्टोन असेल हा. तुला काय २ महिने पण वाट बघता येणार नाहीये का?"
"ओह माय. म्हणजे तू दोन महिन्यांनी परत येणार आहेस होय?" त्याने दोन्ही बाजूंनी घट्ट पकडून ठेवलेले तिचे हात अज्जिबात न सोडता विचारलं.
"म्हणजे काय? माझा इथला चाललेला जॉब सोडायचा माझा अजिबात विचार नाहीये सरकार. फक्त ते प्रोजेक्ट तिकडे जाऊन संपवणार. माझ्या पोस्ट ग्रॅडसाठी महत्वाचे आहे ना ते. अर्थात अशा अजून संधी मिळाल्या तर त्या घेणारच रे. पण या इतक्या सुंदर युनिव्हर्सिटी कँपसमधली स्वप्नभूमी सोडून कुठे जाणार?"
"आणि माझी अंगठी? तिच्या बिचारीच्या नशीबात काय आहे?"
"ती बेडी कशाला? मी काही कुठे जाणार नाहीये." तिने डोळे मिचकावले.
"नाही बाबा, ती रिस्क मी नाही घेणार आता. तू माझीच रहाणार आहेस आयुष्यभर ही खात्री आत्ता हवीय मला."
"माझं प्रोजेक्ट संपलं की मगच. पिवळं सिल्कचं वस्त्र पण घेऊन येईन ना येताना." त्याचा गालगुच्चा घेत ती म्हणाली.

त्या दिवशी घरी परतताना उशीर झाला असूनही बर्‍याच आधी बसमधून उतरून चालत निघाले ते. ते उंच वृक्ष अंधारात उभ्याउभ्याच विसावले असले तरी मंद झुळकांनी एक संथ लय पकडली होती. त्याने अपेक्षेने तिच्याकडे पाहिलं आणि त्याच वेळी ती म्हणाली,
"तुमच्या चर्चमधे हिम्स म्हणतात तसं वाटतंय ना या झाडांचं आणि झुळकांचं गाणं?"

-संघमित्रा