पुन्हा पुन्हा का...?

पुन्हा पुन्हा का ओठांवरती तुझेच येते नाव...?
पुन्हा पुन्हा का वाटेवरती तुझाच लागे गाव...?

पुन्हा पुन्हा का मनी जागतो तुझाच हळवा सूर ?
पुन्हा पुन्हा का तुझ्या स्मृतींचे धुके आणखी धूर ?
पुन्हा पुन्हा का तो आठवतो अर्ध्यावरचा डाव....?

पुन्हा पुन्हा का तेच खुळेपण, तीच भोळसट आस ?
पुन्हा पुन्हा का स्वप्नामधले जपू तुझे मी भास ?
पुन्हा पुन्हा का त्याच मृगजळामागे माझी धाव ?

पुन्हा पुन्हा का होतो चकवा, येते तेच ठिकाण ?
पुन्हा पुन्हा का त्याच ठिकाणी घुटमळतो हा प्राण ?
पुन्हा पुन्हा का तीच भावना...पुन्हा तोच का भाव ?

पुन्हा पुन्हा का नाइलाज हा ? आहे काय इलाज ?
पुन्हा पुन्हा का कालच्याच त्या जखमा होती आज ?
पुन्हा पुन्हा का ताजे होती जुनेच सारे घाव ?

पुन्हा पुन्हा का तेच तेच अन् पुन्हा पुन्हा का तेच ?
पुन्हा पुन्हा का उभा राहतो जो न सुटे तो पेच ?
पुन्हा पुन्हा का सुटे सारखा असा मनाचा ठाव ?

-प्रदीप कुलकर्णी