सात ठिपके, सात ओळी

saat_thipake_img1.jpg

घू दे गं जरा मला फोटो नीट."

"ही घे, तुझी कॉपी. बघ! सगळ्यांनी घ्या गं आपापल्या. राणीची कॉपी तिला पाठवली मी."

"वा! काय फोटो आहे! मी कुठली म्हणायची यातली? तरी सांगत होते उगाच कुणालाही नको पकडू फोटो काढून द्यायला… सात ठिपक्यांची रांगोळी दिसते आहे. आणि तो निळ्या रंगातला ठळ्ळक ठिपका म्हणजे राणी का?"

"ए आशे, एवढा काही वाईट नाही हां, जरा जवळून घेतला असता तर चाललं असतं. आणि आता राणी इथं नाही म्हणून…"

"उर्मि, तुला काय.. आयतं मिळालेलं सगळं चांगलंच..."

"मला आवडला बाई! आता आली आहे ठिपक्यांची ओळ, पण दिसतोय ना सगळ्या एकत्र.."

"गुड, रुशीला आवडला बघ. काय गं, माया, एवढं काय निरखून बघत बसलीस? ठेव आता."

"हो, आम्ही पण निघतोच आहे, जायला पाहिजे, अंधार होत आला. पुढच्या महिन्यात भेटूच गं."

"या उर्मि आणि रमीची सदा घाईच… थांबा गं जरा..."

...तरी हळूहळू सगळ्यांची निरोपाची भाषाच सुरु झाली. सर्वांनी तो त्यांच्या सहलीचा फोटो मात्र जपून ठेवला. पुन्हा आपण सातही जणी तशा एकत्र येऊ की नाही असं मनात प्रत्येकीलाच वाटलं असणार. आजचं भेटणंही तसं मारून-मुटकून जमवून आणलेलं, तरी राणी नव्हतीच! या ठिपक्यांना एकत्र जोडणारी रेषा हळूहळू पुसट होत चालली होती आणि प्रत्येक ठिपका स्वतःसाठी आखून घेतलेल्या, ठरवलेल्या स्वतंत्र ओळीत चालायच्या तयारीला लागलेला...

***
त्यानंतर लगेचच पुढच्या महिन्यात भेटलोही. रुशीच्या लग्नात. आम्हांला पहिल्यापासूनच वाटायचं, आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांत आधी रुशीचंच वाजणार. आणि तसंच झालं.

रुशी तशी सधन पण जुन्या वळणाच्या घरातली, तशी रोखठोक आणि फटकळसुद्धा. त्यावेळी मुलीनं घराबाहेर पडणं हे काही अपूर्वाईचं राहिलं नव्हतं. तरी सुद्धा रुशी तसा विचार मनात आणेल असं वाटत नव्हतं. तिचं आयुष्य एका ठराविक मार्गाने जाणार आहे हे तिला माहित होतं आणि त्याला तिची काहीच हरकत नव्हती. तिनंही वेगळ्याच आकांक्षा बाळगून गोष्टी गुंतागुंतीच्या करून ठेवल्या नाहीत. म्हणजे 'स्वतःच मन मारलं' असं नाही, पण परिस्थिती समजूतदारपणे स्वीकारली.

तिच्या लग्नात आम्ही मात्र धमाल केली. पण अर्थातच वजा राणी. तिला नाहीच जमलं यायला. जवळच्या म्हणून आम्ही दोन-तीन दिवस मुक्कामच ठोकून होतो रुशीच्या घरात. डोक्यावरचा पदर सावरणारी रुशी बघून हसू येत होतं. मग एकदाची रुशी बोहल्यावर चढली.

प्रत्यक्ष रुशीकडून आणि माया तिच्या माहेरच्या घराजवळ रहायची म्हणून रुशीच्या घरून मायातर्फे अशी खुशाली कळत राहिली. नंतर रुशी आपल्या चौकोनी कुटुंबात रमली पण कायम संपर्कात राहिली.

माया आणि रुशी तशा 'जवळच्या' मैत्रीणी म्हणायच्या. का, तर जवळ-जवळ रहायच्या म्हणून. नेहमी बरोबर असायच्या. तशी माया अगदीच वेगळी. अभ्यासात हुशार पण शांत, हळवी. रडूबाईच म्हटलं तरी चालेल. हे गुण बाकीच्यांपेक्षा अगदीच वेगळे! चांगली खेळाडू होती. टीम हरली की रडत बसायची. पण हीच माया ग्रुपमधल्या कोणाला इतर कोणी काही बोललेलं मात्र अजिबात खपवून घ्यायची नाही. मग मात्र अगदी हिरीरीनं बाजू घेणार! पुन्हा जिला कोणी बोललं तिला त्याचं काहीच नसायचं. ती म्हणणार, 'जाऊदे गं, तू कशाला एवढं बोलतेस?' झालं! मग 'मी एवढी बाजू घेतली त्याचं काहीच नाही ' म्हणून माया पुन्हा वाईट वाटून घेत बसणार.

माया पुढचं शिक्षण घ्यायला दुसर्‍या शहरात गेली. तिथं तिला तिचा भविष्यातला जोडीदार भेटला. दोन्ही घरातून असलेला सुरूवातीचा विरोध पत्करून शेवटी संसार मांडला, पण नंतर झालं सगळं सुरळीत.

उर्मिला. आणि उर्मिला म्हटलं की रमा आलीच. या दोघी आत्ये-मामे बहिणी. उर्मि आधी ग्रुपमध्ये आली, मग रमी. तशा दोघीही घुसखोरच. नवीनच होत्या तेव्हा आम्ही केली थोडी मदत. पण मग आमच्यातल्याच होऊन गेल्या. उर्मि आळशी पण जरा तरी बरी, रमी मात्र अभ्यासात अगदी यथातथाच होती. पण तिच्या हातात कला होती. सुंदर पेंटिंग्ज, भरतकाम, विणकाम आणि काय काय करायची. वहीच्या आतल्या पहिल्या पानावर नावाभोवती ‘नक्षी काढून दे’ म्हणून आम्ही तिच्या मागे लागायचो. उर्मि आणि रमी दोघीही मनानं चांगल्या होत्या. उर्मि आळशीपणामुळं माझी बरीच बोलणी खायची. ‘पुन्हा मदत करणार नाही’ हे हज्जारवेळा ऐकवलं होतं तिला. पण तिचा गोड स्वभाव नेहमी माझ्या निर्धाराच्या आड यायचा. ग्रुपमध्ये कोणाच्या कुरबुरी झाल्याच तर ‘बोलाबोली’ लावून देण्यात या दोघी नेहमी पुढं.

'कुरबुरी' म्हटलं की आशी आठवणारच. प्रत्येकीबरोबर एकदा का होईना हिची वादावादी झालेली. आशी व्यवहारी होती, कधी कधी स्वतःपुरतं बघायची. तडजोड कमी. हिच्या हट्टापायीच कधी कधी खटके उडायचे. पण बाकीच्या त्याकडे दुर्लक्ष करायला शिकल्या. आशीनीसुद्धा कधी मनात अढी धरली नाही. एकदा माझ्या डान्सच्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी आमचं भांडण झालं. जरा जोरातच. सगळ्या येणार होत्या, पण मला वाटलं आता ही कसली येते, पण आली सगळं विसरून.

तिच्या हट्टी, जिद्दी स्वभावाचे काही फायदेही झाले आम्हाला. प्रत्येकीच्या व्यापातून सर्वांसाठी वेळ काढणं कमी होऊ लागलं तेव्हा हिनेच पुढाकार घेऊन एका ठराविक दिवशी काही वेळ तरी सर्वांनी आलं पाहिजे असा हुकूम काढला. तिला वचकून सगळ्या यायच्या. बाकीच्यांनी हात टेकले तरी तिला कायम शह द्यायला तयार असायची ती राणीच!

घोळक्यात असलात तरी त्यातल्या काहीजणी जास्त जवळच्या वाटतात, असतात. तशी राणी मला जास्त जवळची आणि बहुतेक तिला मी! असं असूनसुद्धा तेव्हाही मला वाटायचं की मी किंवा ग्रुपमधलं इतर कुणीही तिला नीट ओळखतच नाही. तिनं मात्र मला ओळखलं होतं. साधारण रुशीसारख्याच संस्कारात वाढलेली, पण ही बंडखोर होती. खरं तर सरसकट तसंही म्हणता येणार नाही. तिचा हा बंडखोरपणा मधूनच उगवायचा. अचानक धक्के द्यायची.

राणी स्वतःच्या मनाविरुद्ध एका क्षेत्रात शिरली. मग मध्येच दिलं सोडून आणि स्वतःला हवं तेच केलं. हिचा काही भरवसाच नसायचा त्यामुळं बाकी कोणी ती पुढे काय करेल याबद्दल फारसे आडाखे बांधले नव्हते. सगळ्यात आधी घोळक्यातून तीच बाहेर पडली. व्यावसायिक शिक्षण घेऊन कामाचा अनुभव मिळवण्यासाठी दुसर्‍या शहरात गेली, पण तिथं बस्तान बसलं नव्हतं.

***
रुशीच्या लग्नानंतर फार काळ मी कोणाच्या थेट संपर्कात राहिलेच नाही. वाटलं होतं त्यापेक्षा लवकरच मी रुशीच्या मार्गानेच घराबाहेर पडले आणि थेट सातासमुद्रापलिकडे आले. त्याआधी एक दोन वर्षं स्वतःच्या पायावर उभी होते. मी सर्वांना माझा निर्णय सांगायला फोन केला तर एकदोघी चकितच झाल्या.. त्यांना आनंद झाला अर्थातच पण मला असं वाटून गेलं की माझ्याकडून त्यांच्या काही वेगळ्या अपेक्षा होत्या.…

परदेशात आल्यानंतरच्या सुरूवातीच्या धडपडीनंतर आयुष्य बरंचसं सुरळीत झालं. पुन्हा शून्यातून सुरूवात करून का होईना पण एकदा स्वतःच्या पायावर उभं राहता आलं. अशाच पद्धतीनं परदेशात येऊन आपलं आयुष्य सुरु करणार्‍या अनेक जणींपेक्षा माझी गोष्ट काही वेगळी नव्हती.

इतक्या दूरवर येऊन पडल्यावरही माझा थोड्याफार प्रमाणात सर्वांशी संपर्क राहिला. कदाचित मला ते अंतर जास्त जाणवत असल्यामुळं असेल, मी जास्त प्रयत्न केले.

केवळ एकत्र येणं एवढंच बंध तयार होण्यामागचं कारण होतं. आम्ही भेटलो तेव्हा मिळते-जुळते स्वभाव आणि आवडीनिवडी बघून मैत्री करायचं ते वयच नव्हतं. तसं पाहिलं तर तेव्हा स्वतःचीच ओळख नीट पटलेली नसते. प्रत्येक जण घडत असतो, आजूबाजूच्या प्रत्येकाचा त्या घडण्यात वाटा असतो. तेव्हा आधी मैत्री. ओळख मागून आली. जशी ओळख वाढत गेली तसं प्रत्येकीने गुण-दोषांसकट सर्वांना स्वीकारलं. मैत्रीसाठी मैत्री… कशावरही अवलंबून नसलेली. म्हणून काळाच्या कसोटीवर खरी उतरली.

***
"कधी पोचते आहेस गं मग? ओपनिंगच्या दिवशी असशील ना? उर्मि पण त्याच सुमारास येते आहे."

"हो तर! ते कसं चुकवेन मी? उर्मि पण खूप दिवसांनी भेटतेय. बाकीच्या काय म्हणतायंत? माया कशी आहे आता? तिला खूप भेटावंसं वाटतंय आणि राणीलाही.."

"येतायत् सगळ्याच. माझा कॉन्टॅक्ट झालाय सगळ्यांशी. समारंभानंतर निवांत बोलायला वेळ मिळेल. भेटूच…"

कित्येक दिवसांनी… वर्षांनी पुन्हा सगळ्या एकत्र भेटण्याचा योग येत होता.

माझ्या पूर्वीच्या देशाच्या वार्‍यांत कधी एक-दोघी भेटायच्या. पण यावेळी नेमकी उर्मिही तिच्या शाळेला सुट्टी म्हणून सहकुटुंब येत होती. तिला भेटून बरीच वर्षं झाली होती, मी देश सोडून गेल्यास उर्मि प्रथमच भेटणार होती. अभ्यासात आळशी उर्मि शाळेत मुलांकडून कसा अभ्यास करुन घेत असेल हे कोडंच होतं. पण ते काम ती गोड गोड बोलून करुन घेत असणार आणि उर्मिबाई पोरांच्या एकदम लाडक्या असणार असा अंदाज होता.

सगळ्यांना एकत्र आणायला यंदा रमानेच खूप प्रयत्न केले होते. कारणच तसं होत. रमाच्या कलाकृतींसाठी उघडलेल्या तिच्या स्वतःच्या शोरुमचं ओपनिंग होतं! छोट्या प्रमाणावर सुरु केलेल्या व्यवसायानं आज मोठं रूप घेतलं होतं. ते पहायची आणि तिचं कौतुक करायची संधी कोणाला घालवायची नव्हती.

रुशी शहरात होतीच. ही तर समाजसेवेलाच रमली होती. सधन घरातच पडल्यामुळं आणि सगळं आपलंच आहे हे दिसत असल्यामुळं घरी कोणाचा शिक्षणाकडे फारसा कल नव्हता. पण रुशीनं आपल्या मुलांच्या बाबतीत मात्र ते चालू दिलं नव्हतं. सुबत्तेचा स्वतःपुरता वापर न करता बराच पैसा गरजूंच्या पदरात पडावा हे पहात होती. मागे भेटली तेव्हा डोक्यावर पदर, मोठ्ठं कुंकू आणि वागण्यात असा ठसका की मंत्रीणबाईच शोभत होती. पुढंमागं एखादं पद सांभाळेल अशीच तिची वाटचाल चालू होती.

आशी पडली होती एका मोठ्ठ्या एकत्र कुटुंबात. बराच गोतावळा असलेल्या. पण सगळ्यांना धरुन राहिली होती. एव्हाना त्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांबद्दल मला बरीच माहिती झाली होती. आशी फोनवर बोलायला लागली की प्रत्येकाची खबर दिल्याशिवाय सोडायची नाही. अजूनही तशीच हट्टी राहिली असेल की जमवून घ्यायला लागली असेल असा विचार यायचा, पण आनंदी असायची. आपल्या मैत्रिणींना भेटवायला आपल्या गोतावळ्याला घेऊन येणार होती…

मायाच्या आयुष्यात मात्र वादळ येऊन गेलं. जोडीदार सोडून गेल्यावर एकटी मागे राहिल्यानंतर आत्ता कुठं जरा स्थिरस्थावर होत होती. ही अशी शांत, हळवी आणि हिच्यावरच असा प्रसंग ओढवला ते ऐकून काळजीच वाटली होती. पण बोलली तेव्हा जाणवलं की बळ मिळवलं आहे कुठूनतरी. विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी, पुन्हा नव्यानं खेळ मांडण्यासाठी.. किंवा ते आधीपासूनच असावं फक्त ते आहे हे कधी लक्षात आलं नव्हतं.

मी देशवारीला गेले आणि राणीला भेटले नाही असं सहसा झालं नाही. माझ्या सुरूवातीच्या भेटीच्या वेळीही तिची धडपड चालूच होती. मुळात हुशार आणि कष्टाळू, मग जेव्हा मनातला गोंधळ संपला तेव्हा कधीतरी धडपणे स्वतःच्या पायावर उभी राहिली. एकटं रहायचा निर्णय घेतला. यावेळी तिला भेटण्यात जास्त उत्सुकता होती याचं खास कारण म्हणजे तिच्या आयुष्यात आलेलं नवं माणूस. राणीनं एक मुलगी दत्तक घेतली होती. तिला मी पहिल्यांदाच भेटणार होते. मला कळवलं तेव्हा धक्काच बसला होता, सुखद धक्का! राणीची धक्के द्यायची सवय काही गेली नव्हती म्हणायची…

***
saat_thipake_img2.jpg

या वेळच्या भेटीनंतर मात्र असं वर्षानुवर्षांचं अंतर न टाकता पुन्हा सगळ्यांनी लवकरच भेटण्याच्या आणाभाका घेतल्या… तरीही परत एकदा आपापल्या वाटेने जाण्यापूर्वी तो सात ठिपक्यांच्या रांगोळीचा फोटो काढून घ्यायला विसरलो नाही.

मागं वळून बघताना वाटतं आपल्याला कुणाचीच नीट पारख करता आली नाही. प्रत्येकीनं आपलं आयुष्य सार्थ करायचा प्रयत्न केला, गरज पडेल तसं स्वतःला बदललं, स्वतःचं सामर्थ्य ओळखून, योग्य मार्ग निवडून यशस्वी झाल्या. संकटात धीरानं वागल्या. या सगळ्या जवळच्या मैत्रिणी आहेत याचा अभिमान वाटतो. यापैकी कोणी काही खूप जगावेगळं करत नाही आहे, तरीही. मी त्यांच्यापैकीच एक आहे म्हणून त्यांच्यातच स्वतःला पाहते. रांगोळीमधला प्रत्येक ठिपका महत्वाचा असतोच असं नाही, काही नुसतेच मध्ये असतात दुसर्‍या ठिपक्यांना जोडणार्‍या रेषेवर आणि ते सुद्धा सगळे मिळून तयार झालेल्या सुंदर रांगोळीचा भाग बनून जातात, तशी.

-जेलो