Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 30, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » श्रावण » कथा कादंबरी » मोकळीक » Archive through August 30, 2007 « Previous Next »

Psg
Wednesday, August 29, 2007 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निधीनी घेतलेल्या सुंदर उखाण्यानी निधी-अभयचा गृहप्रवेश झाला. घरात हास्याचे फ़वारे ऊडत होते, लगबग चालू होती नीलाची. मनासारखी सून मिळाली होती याचं समाधान होतं. घरात बरेच पाहुणे होते. उद्याच सत्यनारायण होता.. त्याची तयारी, सगळ्यांची जेवणं.. गडबड होती. बाहेरच्याच खोलीत दीवाणावर आक्का बसल्या होत्या मावशींशी बोलत. ’बस्तान हलवलं’, ’देवच सोडवेल’ वगैरे काहीतरी नीलाला ऐकू आलं. साधारणपणे काय बोलणं चालू असेल दोघींचं असा अंदाज आला तिला आणि तिच्या कपाळावर एक सूक्ष्म आठी आली. पण आत्ता काहीच बोलायची वेळही नव्हती आणि प्रसंगही. कार्य मनासारखं पार पडलं होतं, सून आवडली होती.. आता पुढचं पुढे..

४-५ दिवस झाले. निधी-अभय गावाला गेले, घरातले पाहुणेही गेले. घरात आता ते तिघंच राहिले- नीला, अशोक आणि आक्का. एके दिवशी दुपारी नीलानी पुढची खोली आवरायला घेतली. टीव्हीच्या खालच्या कपाटात बरंच सटरफटर सामान होतं ते तिने साफ़ केलं, अजून २ कप्पे रिकामे केले. आक्का बघत होत्याच.
"काय गं, काय करतेस?"
"आक्का, या कपाटात तुमची औषधं, तुरळक सामान, तुमची पुस्तकं वगैरे ठेवतीये. कपड्याचं कपाट आतच राहूदे.. पण हे रोज लागणारं सामान इथे ठेवतीये. अजून काही असेल तर सांगा.."
"पण हा खटाटोप कशासाठी?" सगळं समजूनही आक्कांनी मुद्दाम विचारलं.
आता स्पष्ट बोलायलाच हवं होतं, नाहीतर आक्का फाटे फोडत बसल्या असत्या हे अनुभवानी माहीत होतं तिला.
"आता अभय-निधीला ती खोली लागेल."
"हो गं बाई! आता माझं चंबूगबाळं त्या खोलीत राहून कसं चालेल? आण की कपड्यांचं कपाटही बाहेर.. त्या खोलीत अडचण कशाला उगाच? पण इथली शोभा जाईल नाही? आधीच मी म्हातारी इथे पथारी पसरणार.. त्यातून माझ्याहूनही म्हातारं कपाट नको इथे.." आक्कांनी कारण नसताना आकांततांडव करायला सुरुवात केली. पण नीलाकडे ऐकून घेण्याशिवाय पर्यायच नव्हता.

४ खोल्यांच्या ब्लॉक मधे २ संसार आणि ५ माणसं बसवायची म्हणजे थोडीफार ऍडजस्टमेन्ट सगळ्यांनाच करायला लागणार होती.. समजून घेऊन सगळ्यांनी ती केलीही असती. आक्कांना हे समजत नव्हतं असं नाही. पण गप्प बसून ऐकणार्‍या नव्हत्याच त्या. नीलाच्या मनात आलं, अभय आणि अशोकनी तिचं वेळीच ऐकलं असतं तर??? सुस्कारा टाकून ती पुढच्या कामाला लागली..

अभय-निधी परत आले. अभय ऑफिसला जायला लागला, निधी ४ दिवसांनी रुजू होणार होती. नीला एके दुपारी नेहेमीप्रमाणे तिच्या ’मनोरंजन केंद्रात’ गेली. घरी निधी आणि आक्का दोघीच. परत आली तर घरात अंधार, शांतता.. आक्का दिसत नव्हत्या, निधी तिच्या खोलीत होती, जवळजवळ रडण्याच्या बेतात. नीलाला काही समजेनाच एकदम..
"निधी, काय झालं? अशी का बसलीस? दिवा नाही लावलास?"
निधीचं लक्षच नव्हतं.."अं? सॉरी आई, मी विसरलेच"
"बरं बरं, असूदे. पण अशी का बसलीस? बरं वाटत नाहीये का?" नीलाला तिच्याबद्दल खूप माया वाटली..
"नाही तसं काही नाही.." निधीला काहीतरी सांगायचं होतं बहुतेक, पण कळत नव्हतं सासूला कसं सांगावं ते.. ती रागावलेलीही होती, गोंधळलेलीही.. नीलाला अंदाज आला..
"काय झालं निधी? आक्का काही बोलल्या का?"
निधीला एकदम सुटल्यासारखं झालं. ती सांगावं की नाही या संभ्रमात होती, पण नीलानीच विचारल्यावर तिने मनाचा हिय्या केला..
"अं.. हो. तुम्ही गेल्यावर त्या आल्या इथे. मी आमच्या ट्रिपच्या सामानाची आवराआवर करत होते. इकडच्यातिकडच्या गप्पा मारत होतो आम्ही. बोलता बोलता त्यांनी माझं शिक्षण, पगार सगळं विचारलं आई.. अगदी माझ्या बाबांचादेखील.. लग्नात किती खर्च आला, दागिन्यांवर किती खर्च आला.. मला आधी काही वाटलं नाही, मी सांगितलं सगळं.. पण नंतर आई त्यांनी माझ्या.. आमच्या हनीमूनबद्दल चौकश्या.."
निधीला लाजही वाटत होती, धक्काही बसला होता आणि रागही आला होता. सासूजवळ आजेसासूबद्दल बोलणार तरी काय? पण आता बोलायला सुरुवात केलीच होती..
"हे असे प्रश्न त्यांच्याकडून.. आणि त्यांचा टोनही.. मला हे सगळं फार विचित्र वाटलं.."
नीलाला समजलंच काय झालं असेल ते. ती गंभीर झाली..नीलानी निधीचा हात हातात घेतला. तिच्याकडे पहात ती म्हणाली,
"बरं झालं, मला लगेच सांगितलस ते. पुन्हा असं होणार नाही असं बघू आपण."

रात्रीचे ८.३० झाले होते. नीला पानं घेत होती. आक्का टेबलपाशीच बसल्या होत्या. सहज चौकशी करत आहोत असं दाखवत त्यांनी हळूच नीलाला विचारलं,
"आज अजून आले नाहीत हे दोघं, जेवायची वेळ झाली."
"ते बाहेर जेवून, नंतर नाटक बघून येत आहेत."
आक्कांनी नापासंतीनी मान उडवली.
"वाढतच चाललंय हं मुलांचं. आत्ता ४ दिवसापुर्वीच तर सिनेमा पाहिला की.."
नीला काहीच बोलली नाही, आपलं काम करत राहिली. मग आक्काच पुढे म्हणाल्या,
"सून घरात येऊनही तुझ्यापाठचं स्वयंपाकघर काही सुटत नाही बघ.." नीला त्यांना ओळखून होती. त्या पद्धतशीरपणे तिच्या मनात निधीबिषयी काहीबाही भरवायच्या प्रयत्नात होत्या. एरवी कधी ’तिला काम पडतं’ हे त्यांच्या तोंडातून आलं नसतं! ती एका शब्दानेही पुढे बोलली नाही. आक्का सारवासारव करत पुढे म्हणाल्या,
"हे रात्री-अपरात्री येतात.. माझी झोपमोड होते गं, म्हणून म्हणलं, बाकी काही नाही."
एक तरी तक्रार करायचा हक्क बजावलाच आक्कांनी.
"बरं मी सांगते अभयला तुमची झोपमोड होणार नाही असं पहायला."

त्या दिवशी रविवार असूनही घरात गडबड होती. आक्कांना पटकन अंदाज येईना.. कशाबद्दल चाललं असावं हे? त्यांनी निमूटपणे हातात जपमाळ घेतली आणि कानोसा घेऊ लागल्या. अभय आणि अशोक बाहेर पडलेले कळले त्यांना आणि त्यांना आश्चर्यच वाटले.. हल्ली अभय निधीबरोबरच जायचा बाहेर, किंवा एकटा.. आणि या दोघी स्वयंपाकघरात काय करत होत्या?
नीला निधीला म्हणत होती, "बघ गं, इतक्या भाज्या पुरतील का?"
निधीनी अंदाज घेतला, "आई, टॉमॅटो थोडा जास्त लागेल ना? आणि हे इथे उकळले, आता काय करू?"
"उकळले का? झाकण ठेव मग, पुन्हा ५ मिनिटानी काढ.."
आक्कांना अजूनही कळेना, पण निधी काहीतरी करत होती एवढं लक्षात आलं त्यांच्या.
"निधी काही नवीन करतीये का? म्हणजे प्रयोग का आमच्यावर आज?"
प्रश्न खेळीमेळीचा वाटत असला, तरी त्यातला खवचटपणा लपत नव्हता.. निधीचा चेहरा उतरला. नीला म्हणली,
"निधी आज पिझ्झा करणारे. आणि रसगुल्लेही. आज यांच्या लग्नाचा पहिल्या महिन्याचा वाढदिवस.."
"हो का? माझ्या काही लक्षात आले नाही हो. मग आज नाही का बाहेर जायचे जेवायला? एरवी तर सारखे जाता की. उगाच घरात घोळ.."
"आक्का, ती करतीये ना हौसेनी.."
"पण मला नको हो तो पिझ्झाबिझ्झा.. मला काही तो चावायचा नाही.." तटकन नीलाला तोडून टाकत त्या म्हणाल्या.. नीलाला अपेक्षित होतंच ते.
"तुमच्यासाठी रोजचा स्वयंपाक केलाय आधीच" तिनी विषयच संपवला. आक्का थोड्या वरमल्या.
"हो का? पण मला त्या पिझ्झ्याची भाजी दे हो थोडी.. पाहीन तरी कशी चव असते ते. आणि एक रसगुल्लाही खाईन. पण काय गं, अभय आणि अशोक कुठे गेलेत?"

इतक्यात अशोक-अभय आलेच. अभ्यच्या हातात मोठं खोकं होतं. या तिघीही बाहेर आल्या.
"नीला, हे घे पेढे. देवासमोर ठेवा. छान मिळाला नाही अभय?"
"हो, मस्त डील मिळालं निधी. बरोबर ’सीडीमन’ मिळाला गिफ्ट म्हणून."
निधीही खुश झाली.
अशोक म्हणाला, "चला मग अभय, जागेवर ठेवा त्याला. सगळी कनेक्शन नीट बसत आहेत ना पहा, नाहीतर वेळीच ईलेक्ट्रिकलवाल्याला बोलवायला लागेल. केबलची वायर आहे ना आत? त्यांचा माणूस संध्याकाळी येईल तेव्हा घरी रहा, काही शंका असतील तर विचारता येतील त्याला"
आक्कांना आता राहवले नाही.."अरे पण आहे काय त्यात?"
"आजी, मी नवा टीव्ही घेतलाय.."
"अगंबाई! नवा टीव्ही! कशासाठी? आणि ठेवणार कुठे तो?"
"आमच्या खोलीत."
आक्कांचा पारा पुन्हा चढला. "बरोबर. मी बाहेरची खोली अडवून ठेवली आहे ना.. रात्री-बेरात्री तुम्हाला तिकडचा टीव्ही नाही लावता येत. पण मग तोच नाही का हलवायचा आत? लग्गेच नवा कशाला आणायचा? मी नसते आले हो तुमच्या खोलीत, सोडून दिलं असतं टीव्ही पहाणं"
"पण आईला पहायचा असतो ना टीव्ही, आणि मी आणला तर काय झालं?"
"हो बाबा, तू काय कमावता आहेस. काहीही करायला मोकळा आहेस.. आणा, टीव्ही आणा, अजून कायकाय आणा.." बडबडत त्या बाहेर गेल्या..
अभय चिडलाच होता. तो नीलापाशी आला.
"असं काय करते गं ही! काही चुकलं का टीव्ही आणला तर? तिलाच त्रास होतो आवाजाचा म्हणून आणला. आणि आई आम्हाला नको का गं थोडं स्वातंत्र्य? दर वेळी असं काहीतरी बोलून ती सगळ्या मूडचा पचका करते!"
"तुला माहीत आहे ना त्यांचा स्वभाव अभय? हे आपल्याला नवीन आहे का? चल, तू उगाच मूड खराब करू नकोस. निधीनी सकाळपासून खपून कायकाय केले आहे बघ.. चल, जेवून घेऊया." नीलानी पुन्हा एकदा विषय मिटवायचे काम केले. पण आक्कांचे वागणे तिलाही खटकले होतेच. एक बरं झालं की अशोकसमोरच हे झालं, नाहीतर कधीकधी नीला अतिशयोक्ति करते की काय असं वाटायचं त्याला!

आक्कांचा हे वागणं कोणालाच नवीन नसलं तरी दर वेळी ते टोचत होतं हेही तितकच खरं. त्यांचा स्वभावच तिरका होता. ’आपला शब्द शेवटचा’ असला पाहिजे याकडे त्यांनी आयुष्यभर लक्ष दिलं. नशीबानी सून त्यांना गरीब मिळाली- त्यांच्या सत्तेला तिने कधी आक्षेप घेतला नाही. त्यांचे यजमान आणि अशोक दोघेही घरच्या बाबतीत अलिप्तच. त्यामुळे त्यांना कधीच कुठेच आडकाठी आली नाही. खोचक बोलायचं, प्रत्येक बाबतीत खुसपट काढायचं, कधी कोणाच्या मनाची पर्वा करायची नाही आणि सर्व म्हणजे सर्व बाबतीत, अगदी खासगी बाबतीतही नाक खुपसायचं असा स्वभाव! मात्र नातसून घरात आली आणि आपलं घरातलं स्थान डळमळीत होतंय की काय असं वाटायला लागलं त्यांना. अगदी खोलीही सोडावी लागली हे तर फारच लागलं त्यांना. एक तर वयामुळे थोडं नमतं घ्यावं लागत होतंच. त्यातून घरचे त्यांचं बोलणंही फारसं मनावर घेत नव्हते. नीला तर चक्क दुर्लक्षच करत होती त्यांच्याकडे- म्हणजे त्यांचं जेवण, पथ्य बघायची, पण बाकी एक अक्षरही बोलायची नाही. अभयशी तर पहिल्यापासूनच त्यांचे खटके उडायचे. एकूणात आता आयुष्यभर कधीच न केलेली तडजोड करावी लागणार अशी चिन्ह होती!

रात्रीचे सव्वाअकरा-साडेअकरा झाले असतील. नीलाचा गाढ झोप लागली होती आणि इतक्यात दाणकन काहीतरी पडल्याचा आवाज झाला. नीला खाडकन झोपेतून जागी झाली. अशोकलाही जाग आली. बाहेरून अभयचाही आवाज आला. दोघेही पॅसेजमधे आले तर अभय त्याच्या खोलीच्या दारात उभा आणि बाहेर चक्क आक्का! हातात पाण्याचा तांब्या. फुलपात्र खाली पडलं होतं त्याचा आवाज झाला होता. नीलाला वेगळीच शंका आली.
"आक्का, या वेळी तुम्ही अभयच्या खोलीबाहेर काय करताय?"
आक्का घाबरल्या होत्या. गुळमुळीत उत्तर दिलं त्यांनी, "काही नाही गं, जरा पाणी प्यायला उठले होते."
"तांब्या-भांडं तर तुमच्या उश्याशी ठेवलं होतं."
"हो गं, पण असंच झोप येईना.."
"म्हणून तुम्ही अभयच्या खोलीपाशी आलात??" नीलाचा आवाज तीक्ष्ण झाला..
"तसं नाही गं, शतपावली घालत होते..."
"हातात तांब्या धरून?"
"नाही, यांच्या खोलीतून आवाज येत होते.."
"शीऽऽ!!" नीलाला शिसारी आली. अशोक-अभयच्या चेहर्‍यावरचे भावही झरझर पालटले!
हे बघून मात्र आक्कांनी सूर बदलला.
"देवा! तूच बघ रे बाबा. या घरात आता शतपावलीही घालता येत नाही रे मला मोकळेपणी!"
आता अशोकही गप्प बसला नाही.
"आक्का बास कर आता. जाऊन झोप, आणि झोप आली नाही तर स्वस्थ पडून रहा."

दुसर्‍या दिवशीपासून नीला कामाला लागली. अशोकला तिने कल्पना दिली ती काय करणारे याची, परवानगी मागायची वेळ आता गेलेली होती. कालच्या प्रसंगानंतर बरेच दिवस डोक्यात असलेल्या कल्पनेला आता प्रत्यक्षात आणायचे ठरवले तिने. २-३ दिवसात काम झालं तिचं. त्या दिवशी रात्री जेवायच्या टेबलवर हे चौघं होते. आक्का बाहेर असल्या तरी कान त्यांचे आतच होते नेहेमीप्रमाणे. नीलानी बोलायला सुरुवात केली.
"अभय, मी परवा वाघोलीकरांना भेटून आले. आपल्याच बिल्डींग्मधे तुमच्या लग्नासाठी आपण त्यांचा रिकामा फ्लॅट वापरला होता बघ, ते! ते त्यांची जागा भाड्यानी द्यायला तयार आहेत. येत्या १ तारखेपासून तू आणि निधी त्यांच्या घरात रहायला जा."

अभय आणि निधीला अनपेक्षितच होतं हे! दोघांनाही धक्का बसला.
"आई, अहो, असं अचानक?"
"हो ना आई, असं एकदम काय?"
"आपण आधी पण बोललो होतो अभय याबद्दल. तुझं लग्न ठरलं तेव्हाच मी म्हणलं होतं तुम्हाला की तुम्ही वेगळे रहा. पण तेव्हा तुम्ही विरोध केलात, तडजोड करू म्हणालात, म्हणून तेव्हा काही बोलले नाही मी." आक्कांमुळे घरात अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत याची नीलाला खात्री होती.. आणि परवाचा प्रसंग तर कहर होता.
"पण आमची काहीच तक्रार नाहीये आई"
नीलाला एकदम गहिवरून आलं. किती गुणी मुलं होती खरंच!
"तसं नाही रे बाळांनो. पण हे इथे तिसर्‍या मजल्यावरचं तर घर आहे. आणि वेगळं घर केलं तर लगेच काय आपण वेगळे होतो का? मला निधीचे सगळे सणवार, हौसमौज करायची आहे अजून!"
"मग हे असं काय आई?"
"अरे, त्यानिमित्तानी तुम्हाला थोडी मोकळीक मिळेल, थोडे स्वातंत्र्य मिळेल. हेच तर दिवस आहेत. त्यात सतत कोणाचीतरी आपल्यावर नजर आहे, कारण नसताना टोमणे ऐकायला लागत आहेत, वातावरण गढूळ आहे.. कशाला असं रहायचं? आम्ही केलं सहन.. सतत नजरकैद, जरा म्हणून मनमोकळेपणा नाही कधी मिळाला. आमचं जे झालं ते झालं. पण तुमचे हे दिवस पुन्हा यायचे नाहीत. सुदैवानी वाघोलीकर लगेच तयार झालेही. त्यामुळे बाकी काही बदलणार नाही रे. अगदी स्वयंपाकघरही नका करू वर. पण रहायला मात्र जा तिथे. माझा आग्रहच समजा. आणि मुलांनो, गैरसमज करून घेऊ नका रे.." नीलाला पुढे बोलवेना. खूप खूप भरून आलं तिला.

पुढचे काही दिवस खूप गडबड होती मग घरात. निधीनी थोडीफार खरेदी केली, नीलानेही माळ्यावरचं जास्तीचं सामान काढलं, अभय करार करून आला वाघोलीकरांबरोबर. आणि एका रविवारी रात्री जेवणं झाल्यावर सगळं सामान त्यांनी वर नेलं. फार काही नव्हतंच, पण जे काही होते ते सगळ्यांनी मिळून लावूनही टाकलं. नीला आणि अशोक अबोलपणेच जिना उतरले. दरवाजा उघडून आत येतात तर आक्का पुढच्या खोलीत नाहीत!

आक्कांनी पुढच्या खोलीतलं आपलं सामान भराभर ’त्यांच्या’ खोलीत हलवलंदेखील होतं आणि त्यांना तिथे गाढ झोपही लागली होती!


समाप्त!

Ladaki
Wednesday, August 29, 2007 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम छान मांडलिये कथा... खुप दिवसांनी मायबोलीवर काहीतरी आणि चांगले सलग वाचायला मिळाले... ALL THE BEST... keep writting... :-)

लाडकी...

Arati7
Wednesday, August 29, 2007 - 8:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच छान पण खरच का अशी विचित्र माणस असतात या जगात??... strange!!!

Monakshi
Wednesday, August 29, 2007 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम छान लिहिलं आहेस. माणसं अशी का वागतात???????????????

Mankya
Wednesday, August 29, 2007 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम ... छान रेखाटलायस स्वभाव आक्कांचा ! अभिनंदन ! व. पू. नी म्हटल्याप्रमाणे ही स्पर्धा असते तारुण्यातल्या मस्तीची वार्धक्यातल्या सुस्तीशी आणि Generation Gap ही आहेच की, असे बदल स्वाभाविक आहेत सामान्यपणे आणि स्वाभाविक गोष्टींवर रागावण्यात किंवा चिडण्यात अर्थ नसतोच ना !
आणि स्वभावाला औषध नाहि म्हणतात ते अगदी खरंय !

माणिक !


Gobu
Wednesday, August 29, 2007 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, छान आहे कथा! आपल्याला झालेला त्रास आपल्या पिल्लाना होऊ नये, म्हणुन मातेने घेतलेली काळजी सुरेख दाखवलीस! घरात सुन आली की आई ही सासु होते, पण आईपण कधीच जात नाही!

Supermom
Wednesday, August 29, 2007 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरेख कथा पूनम. अशी माणसं असतात. घरात जराही तडजोड न करणं हा यांचा स्थायीभाव.
मुळात स्वत आनंद घ्यायचा नाही कशाचा नि दुसर्‍यालाही घेऊ द्यायचा नाही अशी वृत्ती असली की सारंच अवघड होतं.


Chinnu
Wednesday, August 29, 2007 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम कथा आवडली गं.

Prajaktad
Wednesday, August 29, 2007 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा आवडली.. सुपरमॉमशी सहमत!

Zelam
Wednesday, August 29, 2007 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम छान रेखाटले आहेस बारकावे.
* ब्लॉग वर वाचली होती तुझ्या.


Disha013
Wednesday, August 29, 2007 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम,मस्त कथा! शेवट वाचुन हसायला आले बघ! असतात अशी बालिशपणानी वागणारी माणसं जगात...

Daad
Wednesday, August 29, 2007 - 10:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, सुंदर. विषय नेहमीचा, नाजुकही पण छान संभाळलायस. इतक्या थोडक्यात गोष्टीचा फ़्लो, संवाद, पात्रांची ओळख.... ही कसरत अवघड आहे आणि अप्रतिम साधलीये. अभिनंदन! तुझं लिखाण खूप काही शिकवतं... लिहिण्यातलं आणि विचारातलंही, लिहीती रहा!

संवाद महत्वाचा आणि (अहंकार बाजूला ठेवून) तो होत राहिलाच पाहिजे. कधी कधी आपण आपल्या बाजूने बांधत रहातो ब्रिज पण दुसर्‍या बाजूने बांधणं सोडा, पण आपण बांधलेला तोडण्याचेच प्रयत्नं असतात. काय करावं अशा वेळी?
ideally , तेच्- बांधत रहावं. निष्काम कर्मयोग म्हणतात, तेच. खूप खूप कठीण आहे करणं (सांगणं सोप्पं आहे, अगदीच. म्हणूनच म्हटलं adeally ).
काय साधू अशाने आपण? संवाद साधेल का? कदाचित, कधीतरी! किंवा साधणारही नाही. ह्या कथेतल्या आक्कांसारखं माणूस असेल तर कदाचित नाहीच.

पण, atleast , 'मी माझ्या वतीने कुठेही प्रयत्नांची कसर ठेवली नाही' हा माझा clean conscious असेल.
हा माझा विचार आहे.... आणि अगदीच idealistic आहे.


Zakasrao
Thursday, August 30, 2007 - 3:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, छान लिहिल आहेस. रोजच्या आयुष्यात घडणार्‍या गोष्टींवर तु चांगल लिहु शकतेस. :-)
वरती मानक्या ने जे लिहिलय त्याला अनुमोदन.
मला एक वाटत आलय आजपर्यंत ते म्हणजे संसाराची आवड असणे आणि त्यात अडकुन पडणे अगदी खुप वय झाल्यानंतरही हे मागच्या पिढितील स्त्रियांमधे फ़ारच होत. हे वाइट आहे अस नाही पण नवीन पिढी, त्यांची बदललेली मत आणि तो संसारत गुरफ़टण्याचा स्वभाव ह्यात मग हळु हळु दुरावा वाढतच जातो.त्यावेळीहि मी पणा न सोडता राहणारे अशा अक्का असतात त्या मग असेच काहितरी वागत जातात. अध्यात्म आणि ह्या जगातील फ़ोलपणा त्यांच्या लक्षात येत नाही किंवा लक्षात आले तरी ते कळतय पण वळत नाही अस काहिस होत. अर्थात ह्यावर "आवा चालली पंढरपुरा" नावाच एक काव्य आहे ते कोणी लिहिलय ते आठवत नाहि(बहुतेक तुकारम महाराज) पण त्यातल वर्णन मला पटल होत.



Princess
Thursday, August 30, 2007 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, खुप सुरेख कथा. तुझ्या कथांचे दोन गुणविशेष म्हणजे तुझ्या कथा वाचकाना तिष्ठत ठेवत नाहीत आणि दुसरे म्हणजे वास्तवाच्या अगदी जवळ जाणार्‍या असतात.
सव्यसाची, लग्न झाल्याबरोबर वेगळे घर थाटणे या गोष्टीला कदाचित समाजात अजुन खुलेपणाने मान्यता दिली जात नाही. घरात सगळ्यानीच रहावे असे वाटत असेल तर सगळ्यानाच थोडे जुळवुन घ्यावे लागणार.
सशल, प्रत्येक वाक्याला एक मोदक तुला :-)


Manjud
Thursday, August 30, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, झक्कास कथा!!! खूपच आवडली. एका पोस्टमधे पूर्ण केलीस त्याबद्दल तुला १०० पैकी १०० मर्क.

मला नाही वाटत की अक्का खलनायिका म्हणून prsent केल्या आहेत. उतारवयातील आड्मुठेपणा ह्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. कदाचित आपण म्हातारे झाल्यावर आपलाही स्वभाव असा होऊ शकेल. आपला आता घराला काहिच उपयोग नाहिये ही भावना अश्या स्वभावाला खतपाणी घालत असेल कदाचित.

असो. पूनम पुन्हा एकदा मस्त गोष्ट!!!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators