Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 11, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » कथा कादंबरी » Saadhee maaNasa » Archive through May 11, 2007 « Previous Next »

Daad
Thursday, May 10, 2007 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"आज्जे, आज्जे वो sss !" समोर रस्त्यापलिकडे रहाणार्‍या अरविंदाने हाळी घातली. "कुटं हाइसा?"
"इकडे, मागल्या पडवीत ये रे", काकू पारडीला बांधता बांधता म्हणाल्या.
"आंबेहलद हाये का? आईन मागितलीया" इतरवेळी पारडीशी लडिवाळ करणारा अरविंद दुरूनच बोलला.
"काय करून घेतलन आईने?" काकू शिंकाळ्यातला बटवा काढता काढता म्हणाल्या.
"बाबान मारलंय" खाली मान घालून हळू आवाजात अरविंद म्हणाला.
"काय?" काकू थबकून म्हणाल्या "बरं. तू जा खळ्यात. मी देते आई ला नेऊन हं?" शहाण्या मुलासारखी लांबलचक "हो" ची मान वळवत दुडक्या चालीने अरविंद निघाला.
"अरे, थांब. काही खाल्लयस का सकाळपासून? लक्ष्मी, ए लक्ष्मी... कुठे गेली कुणास ठाउक." इतक्यात पदराला हात पुसत लक्ष्मी आली.
"हातातलं ठेव आधी आणि पोराला खायला दे, भाकरी. मी आलेच हं समोर जाऊन येते".
"अरू, घरात जा, लक्ष्मी देईल ते सगळं खायचं. कळलं? आणि दादाला मी बोलावलय म्हणून सांग."

मी माजघरातूनच विचारलं "काकू, मी येऊ?"
"येतेस? चल", काकू पातळाचा सोगा सोडून पदर सारखं करीत म्हणाल्या.
उन्हं कलली होती. त्यांच्याबरोबर मऊशार धुळीत पावलं खुपशीत मीही निघाले. काकू थोडं माझ्याबरोबर थोडं स्वत: शीच बोलत होत्या.
"लहूनं मारलं? व्हायचंच नाही असं. काय विपरीत झालंय कुणास ठाऊक"
"अगं हा लहू माझ्या समोर मोठा झालाय. शिकल्या सवरलेल्यांना नाही अशी समज आहे त्याला. आई वडिलांनी ठरवलेली मुलगी नाकारून मामाच्या गावचीच ही पार्वती परणून आणलीये- तुमच्या भाषेत 'लव म्यारिज' म्हणायचं. दोघांचा घास सरकत नाही एकमेकांशिवाय."
"लहू पीत्-बीत नाही, अन, पारू तर माझी लाखात एक पोर आहे..."
"काय झालं असेल?"
इतकं बोलेस्तोवर आम्ही रस्ता ओलांडून लहूदाच्या खोपीच्या अंगणात शिरलोही.

मला नं हे शाकार खूप खूप आवडतं. लहूदांनी स्वत:च्या हातांनी बांधलय, म्हणे. पुस्तकात वर्णन वाचतो नं, अगदी तस्सं. आमच्या घरतून तर दिवसाच्या अन, रात्रीच्याही कोणत्याही वेळी, बघत रहावं असं.
स्वच्छ सारवलेलं अंगण, भातुकलीतलं असावं तसं तुळशीवृदावन, त्यात डोलणारी सुबक, ठुसकी, मंजिर्‍यांचा भार घेऊन अश्शी लवू की तश्शी... अशी हिरवीगार तुळस. अंगणाच्या तिन्ही बाजूंना हौसेनं लावलेली, तशी साधीच, सोनकेळ, झेंडू, अनन्त, जास्वंद असली फुलझाडं, कोपर्‍यातला डेरेदार आंब्याला बांधलेला, साधा रहाटाच्या दोराचा झोका, लहूदांची सोडलेली बैलगाडी, त्यांचे रवंथ करीत बसलेले बैल, पारूवहिनीच्या कोंबड्या, बकर्‍या, गावतल्यांचं येणं जाणं... या संपूर्ण चित्रावर एक समाधानाची साय दिसते.

काळ्याशार कातळातून कातून काढावा असा लहूदा होता. कधी आम्ही लहूदाला दु:खी, वैतागलेला बघितला नाही. तो सुद्धा कुणाचंतरी शेत कुळानेच करत होता. गावातल्या इतर कुळांसारखेच त्यालाही problems होतेच. कधी उसावर कीड पडली, कधी पाऊस जास्तच झाला, तर कधी साखर कारखान्यांनी उस उठवलाच नाही, वीज सतत मिळत नाही... एक ना दोन... हजार तरी प्रश्न. अजून एका लहान बहिणीचं लग्नं, दोन आड वयाचे मुलगे, त्यांचं शिक्षण, थोडं फार कर्जं असल्या गोष्टींनी बेजार झालेला बघितला नाही आम्ही त्याला. पारूवहिनी त्याच्याही एक पाऊल पुढे.
शेतकामात मदत तर करायचीच पण आल्या-गेल्यांचं, सासरच्या सगळ्यांचं रितीने, प्रेमाने करून वर आणखी शेजारच्यांच्या, गावातल्यांच्या मदतीला कायम पुढे. आमच्या घरीसुद्धा काकूंना मदतीला यायची आपलं आवरून.

"द्येवानं हात पाय धड दिलेत, रोजगार करा, म्हेनत करा, भाकर खावा... पोरगंबी शिकत्यात, मला हाताला लागत्यात. उगाच काय खोटी तक्रार करायची?" असलं साधं, सोप्पं आयुष्याचं समीकरण होतं लहूदाचं.
पारूवहिनीच्या दोन्ही बाळंतपणात रात्रभर हॉस्पिटलच्या दारात बसून आपल्या नातलगांमध्ये हसू झालेला लहूदा पारूवहिनीला मारतो?

क्रमश:


Daad
Thursday, May 10, 2007 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही दारातून आत शिरलो.
अंथरुणं व्यवस्थीत गुंडाळून भिंतिशी ठेवली होती. त्याला टेकून अरूचा दादा अभ्यासाचं पुस्तक समोर ठेऊन बसला होता. त्याला काकू म्हणाल्या, "दादा, आमच्या कडे जा. लक्ष्मीचं काम आहे काहीतरी.... आत्ता जाशील?"
दादा लगोलग उठून गेला.

घरातला केर वारा, चुलीला पोतेरं, देवाची पुजा, वगैरे झाल्याचं दिसत होतं. पण नेहमी उजेडाच्या खांबाला धरून वर वर जाणार्‍या चुलीतल्या धुराच्या वलयांची जाग नव्हती, स्वयंपाकघराला. घर त्यामुळे एकदम ओकंबोकं दिसत होतं. बाजूच्या खोलीतही पारूवहिनी नाही असं बघून काकू मागल्या दाराने गोठ्यात शिरल्या. तर इथे गोठा लोटत "सूं सूं" करीत रडताना दिसली.

"काय गं? काय झालं?" काकू म्हणाल्यासरशी पारूवहिनी वळली. डोक्याला खोक पडली होती आणि त्यावर पट्टी बांधली होती. एका हातातल्या बांगड्याही वाढवलेल्या दिसत होत्या.
"काकू तुमी? तुमी कशाला तरास करून आलात? अरूबरूबर पाठून द्यायची?"

"इकडे बाहेर अंगणात उजेडात ये बघू, मला बघूदे किती न कुठे लागलय?"

"ह्ये होय? त्ये काय नाय वो. जरा उलिसक जात्यावर डोकं आपटल. आमच्या घरातली मिळंना कुटं ती, आंब्येहलद म्हून...."

तिच्या हाताला धरून काकऊंनी तिच्या डोळ्यात बघत विचारलं "अरूनं सांगितलं मला. तुला सांगायचं नसेल तर नको सांगुस पण माझा जीव रहाणार नाही. लहू आला की त्याला जाब विचारीन"

पारूनहिनीला आता मात्रं रडू आवरेना. वादळात सापडलेल्या केळीसारखी गदगद हलत होती ती. काकू तिच्या पाठीवरून हात फिरवीत "उगी पोरी उगी" म्हणत होत्या पण तिला रडूही देत होत्या. मी आपली गांगरून नुसतीच उभी होत्ये.
पारूवहिनीचा पहिला आवेग ओसरल्यावर मात्रं घरातून पाण्याची छोटी कळशी आणण्याचं काम मी केलं.
चार पाण्याचे हबके तोंडावर मारून पारूवहिनी माझ्याकडे बघून थोडकी हसली.
"धाकल्या वैनी, किती दिस हायेसा अजून?"

काकू म्हणाल्या, "तिचं राहूदे. तुझं सांग आधी. काय झालं?"

"तुमी ह्यान्ला धाकल्या भाऊंच्या बरोबरीनं ढोपरायेवडं होता त्येवापासून बगता. ह्यांनी कंदी कुनाचं काय घ्येतलं का उचललं? नाकाम्होरं बगून चालनारा मानूस. अशा मानसाला अवदसा आटिवतेच कशी म्हन्ते मी?
आता, माजं काय चुकलं काय रिती-भाती पेक्षा येगळं, इपरित वागले तर कुनी सुदरायचं? यांनीच! पन यांचं चुकलं तर कुनी सांगायचं?"
"मी सांगायला नको? का हवं तसं, मनापरमानं, येडं-इद्र वागू द्यायचं आपल्या मानसाला?"

क्रमश:


Manogat
Thursday, May 10, 2007 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Daad
छान झाली आहे सुरवात, येउदेत लव्कर पुढचा भाग.


Daad
Thursday, May 10, 2007 - 10:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"काय केलं लहूनं?" आपल्याच शब्दांवर आपलाच विश्वास नसला की वेगळंच कुणीतरी बोलल्यासारखं वाटतं. तसा आवाज आला काकूंचा.

"मी जाऊ, काकू? परत येईन उद्या..." असं मी म्हटल्यावर, पारूवहिनी म्हणाल्या, "तुमीबी ऐकाच वैनीसा. चांगल्या, सोच्छ मानसाला येड लावती दुनिया... तुमच्यापून काय लपवायचं?"

"अवो, गेल्या साली ईज मिलाली, नाय मिलाली... काय काय जालं तुमाला ठावं हाय. पान्याच्या दिसात दिसाकाठी चार तास बी ईज न्हाई. परसंगाला डिजेलवर चालिवला हिरीचा पंप. पिकाला पानी नको? आमचीच न्हाई तर, सगल्यांची हीच गत.
आमी सादी सरल मानसं गप्-गुमान ईजेचं बील जे काय आलं त्ये भरलं. त्येबी आमाला कटिन वो, कुळाची जिनगानी, म्ह्येनत मरनाची पन हाती काय उरंल त्यो नशिबाचा ख्योळ!" परत एकदा तिला उमाळा आला.

काकू उसासून म्हणाल्या, "हो, गं पोरी. आमचं तरी काय, कुळाचं नाही, घरचंच. पण वाडवडिलांनी राखलेली काळी आई, तिला विकवत नाही. आमच्याच्यानं होतंय तोवर करायचं. भरोसा कसलाच नाही, बाई. पाऊस सुद्धा वेळेवारी नाही तिथे माणसांचं काय घेऊन बसलीस? शेतकर्‍याचं आयुष्य असंच असतं...."

उसळून त्यांना मध्येच तोडत पारूवहिनी म्हणाली,"सगल्या शेतकर्‍यांचं सांगू नगा मला. त्ये धारकर पाटील? मोटे बैजवार श्येतकरी हाईत. त्यांना नाई धग लागत कसली. जवा आमी डिजेलसाटी पैका वोकीत होतो तवाबी त्यांच्या पंपान्ला ईज व्हती, चौवीस, तास.
त्यांच्या पिकाला कीड लागनार न्हाई. त्यांला औषीद, खत सगलं उसनवार मिलतय बाजारात्सून. आमाला तारन द्याया होवं उसन्या-पासन्यासाटी."

"ती काय नवीन गोष्ट झाली? ह्यांचे हात पोचलेत वर पर्यंत राजकारणात. कसल्या कसल्या पार्टीचे नेते येऊन हुर्डाच काय, ओली-सुकी, काय म्हणाल तसल्या पार्ट्या करतात. त्यांच्याशी बरोबरी कोण करील बाये?", काकू हताशपणे म्हणाल्या.

"त्यांच्यासंग इरे-सरी म्हनत नाई आमी. आमी कोन करनार? त्ये बडं. आमचं मीठ्-भाकरी ब्येस हाये, द्येवाच्या दयेनं.
काकू, या वर्साला गवर्मेणनं सगळ्या शेतकर्‍यांची थकलेली ईज बीलं मापी केली... सगल्यांची. ह्या ह्या धारकराची बी चालीस हजाराची थकबाकी मापी केली सरकारनं.
कर्जं काडूनबी, आमी वेलच्या वक्ताला भरीत होतो बीलं त्ये काय म्हून? तर ह्ये जाऊन आलं तालुक्याच्या दप्तरात की बाबा, आमी परमानिकपरमानं भरली बीलं त्याचे काय वापस द्येनार काय? तर सायब म्हनलं की ज्यांनी दिले त्यांचे पैशे गेले... दिली नसंल तरच सरकार बील सोडतय बगा. पैसे वापस मिलनार न्हाईत."

क्रमश:


Daad
Thursday, May 10, 2007 - 10:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"त्ये बीलापाई, यांनी हौसेनं केलेली पुतलीमाला ठिवली ना, गहान. त्ये लागलं बगा मनाला यांच्या. आता आज ईजेचं बील भरायची शेवटली तारिक व्हती. पन ह्यांची काय हालचाल दिसंना. म्हून कालच्याला दोपारच्या भाकरीला आटवन केली की इजेचं बील भरायचं हाये म्हून. तर म्हनाले या वक्ताला भराचं न्हाई.
मी म्हनले, आत्ता? आनि ईज काटली तर? पंप बंद ठिवून कसं चालंल? डिजेल फुकट मिलत न्हाई.
तशी म्हनले, काई ईज काटत न्हाईत. गेल्या वक्ताला बीलं भरली... काय उपेग जाला? डिजेल आनावं लागलं, वर आनखी लोगांची थकल्याले सगले पैशे माफ केले सरकारनं. मंग मी बीलं कशापाई भरू? मला कय येड लागलय?"

"अगं पण लहूनं हात कशाला उगारला ते सांगशील तर?", काकू म्हणाल्या.

"मी लई समजावलं त्यांला. की कुनाचं वंगाळ वाईट, त्यांच्यापास. आपलं पानी आपुन न्हाई निर्मळ राकायचं तर कुनी? पोरांनी फकस्तं शाळंतच शिकायचं होय? की बाबा, खरं बोला, लटकं बोलू नगा, परमानिकपरमानं रावा.... आपून आई-बाप काईबी करू, कसबी वागू, तर पोरं सुदरतील?."
"अवो, कदी न्हाई ती गल्यातल्या पंढरपुरच्या मालेची आटवन दिली. म्हनले, माल घ्येतली तवाच ह्या ध्यायीवर तुळशीपान ठिवलं तुमी, चांगल्या कामासाटीच लावायची आण घ्येतली. आनि दोन बांगड्या आनि माजं सोन्यचं डोरलंमनी काडून दिलं.
म्हनले, सोनं म्होप ईल घरात, नशिबात असंल तर. चार सोन्याचे तुकडे जावुन आपुन भिकारी होत न्हाई. पन बील भरण्याचं पैसं चोरून, अडकवून चोर मात्तर होवू"

"कदी न्हाई ते बोल बोल बोलले मला. म्हनाले, चोर म्हनन्याची कुनाच्या बाची हिम्मत हाये आपनाला?
तर मी म्हनले, कुनी काय म्हनाया नगं. आपुन आपले चोर हुतो की नाई? जगाशी खोटं बोलान, आपुन आपल्याशी कसं लटिकं बोलायचं? येकदा चोर त्यो चोरच..."
"त्ये म्हनले की तुज्या श्यानपनापाई घरदार इकावं लागंल. पोरांच्या शिकशनासाटी भीक मागावी लागंल... रामराज्याचे दीस गेले. कलयुगात चार लोकांपरमानं थोडं इकडं-तिकडं वागावं लागतय. चार दिले चार घेतले म्हनजे पाप होत न्हाई आताच्या दिसात.......
ह्ये सोनं तुज्या बापाचं न्हाई, मी घातलय तुज्या अंगावर... त्ये काडायचा काई अदिकार न्हाई तुला, म्हनले...."

"ह्ये असं जालंय बगा. येक सादा, सरल मानूस त्याला वाकड्या वंगाळ वाटंनं जायला लावनारं हाये ये सरकार. तुमी चिरी-मिरी दिल्याबिगर तुमच्या कापल्या अंगुठ्यावर मुतनारबी न्हाईत, असली मानसं राज्य चालिवत्यात. माज्या तापल्या भांग्रावानी मालकाचं श्यान केलं.... मुडदा बशिवला त्यांचा....."

असं म्हणून पारूवहिनी हमसून हमसून रडू लागली. आपल्या माणसाचं असं पतन बघून तडफडलेली ही पारूवहिनी बघून मी थक्कच झाले. काकूंनाही काय बोलावं कळेना.

मग आपणंच सावरून खंबीर स्वरात म्हणाली, " काय बी सागून ऐकना, तवा मी बी ठरिवलं. माजा आजपून सत्याग्रेव हाये. ज्येवन करनार न्हाई आनि ज्येवनार बी न्हाई. पोरांला उपाशी ठेवीत न्हाई, मी. तवा, म्हायेरी निगून जा म्हनाले. मी म्हनले, काम्हून? ह्ये घर माजं हाये, तुमी आपली म्हनुनच आई-बापाशी भांडून परनुन आनली. आता आपली तुपली वाट येगळी न्हाई. आनि जीव ग्येला तरी मी तुमाला वंगाळ वागू द्येनार न्हाई."
तवा चिडून हात उगारले जरा. माजा तोल जावून पडले न खरंच जात्याला आपटले, काकू. लटकं सांगीत न्हाई"

भरून येऊन काकुंनी तिला जवळ घेतली, "धन्य गो बाय माजी. तुजी दृष्ट काढायला हवी. तुझ्यासारख्या लेकी-सुना मिळोत बाये सगळ्या घरांना. आता हे सांग, कुठे गेलाय माझा पोर?"

उठून पदराने तोंड पुसत आणि डोक्याची पट्टी सोडत वहिनी म्हणाली, "काय की? आजच्याला बील भरून आले न्हाईत तर उपाशी झोपू दोगबी. आनि अजून न्हाई ऐकलं तरी जात्यात कुटे? मी हाये अन त्ये हायेत. काय मारा, झोडा कायबी करा. पन वाईट वंगाळ वागन्याला माजी साथ न्हाई, आनि तुमाला करूबी द्येनार न्हाई, श्याप न्हाई.
पन, तसलं कायबी होनार न्हाई, काकू. द्येवाघरलं मानूस हाये त्ये, माजा इस्वास हाये."

असं म्हणत तिनं देवाजवळच्या करंडा घेऊन काकूंना, मला कुंकू लावलं. आणि काकूंपुढे नमस्काराला वाकली. काकूंनी तिला वरच्यावर धरली आणि आपल्या हातातली सोन्याची बांगडी काढून तिच्या भुंड्या हातात चढवली देखिल.
"आता भरल्या हाताने नमस्कार कर, पोरी. तुला बळ देत नाही मी, त्याची गरजच नाही तुला, समर्थ आहेस, सगळ्या घरादाराचं शील राखायला. पण माझा आशिर्वाद समज, हो." भरल्या डोळ्यांनी पारूवहिनी एकदा हातातल्या बांगडीकडे आणि एकदा काकूंकडे आळीपाळीने बघत राहिली.

मला मात्रं नमस्काराला कोणत्या मुर्तीपुढे आधी वाकू तेच कळेना....

समाप्त.


Mrinmayee
Friday, May 11, 2007 - 12:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'दाद' येव्हडं नावंच पुरे असतं पुढलं वाचायला! खूप खूप सुंदर काहीतरी वाचायला मिळणार हे ठाउक असतं! ही कथा वाचली आणि दाद द्यायला शब्दच सुचले नाहीत. शब्द बंबाळ न होऊ देता अत्यंत नेटक्या शब्दात, इतकी जबरजस्त ताकदीची कथा मायबोलीवर तुझ्यामुळे दिसते.
मला मात्रं नमस्काराला कोणत्या मुर्तीपुढे आधी वाकू तेच कळेना.... काय अप्रतीम शेवट!!!!


Nanya
Friday, May 11, 2007 - 12:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अ प्र ती म.... शब्दच नाहीत दुसरे..


Ek_mulagi
Friday, May 11, 2007 - 1:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान ग, दाद. अप्रतिम.

Mukund
Friday, May 11, 2007 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद...

काय शैली आहे ग तुझी.. सरस्वतीचे वरदान आहे तुला हे ही गोष्ट वाचल्यावर सहज समजुन येते. मायबोलिवरच्या काही शिरोमणी मधील तु एक आहेस.तुझ्या अशा लघुकथांचा संग्रह जरुर पुस्तकरुपाने प्रकाशीत कर. मी तुझे ते पुस्तक घेण्यात पहिला असेन.. मागे तुझे रुबीक क्युब सुद्धा वाचले होते... तिही गोष्ट केवळ अप्रतिम..


Zakasrao
Friday, May 11, 2007 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वच्छ सारवलेलं अंगण, भातुकलीतलं असावं तसं तुळशीवृदावन, त्यात डोलणारी सुबक, ठुसकी, मंजिर्‍यांचा भार घेऊन अश्शी लवू की तश्शी... अशी हिरवीगार तुळस. अंगणाच्या तिन्ही बाजूंना हौसेनं लावलेली, तशी साधीच, सोनकेळ, झेंडू, अनन्त, जास्वंद असली फुलझाडं, कोपर्‍यातला डेरेदार आंब्याला बांधलेला, साधा रहाटाच्या दोराचा झोका, लहूदांची सोडलेली बैलगाडी, त्यांचे रवंथ करीत बसलेले बैल, पारूवहिनीच्या कोंबड्या, बकर्‍या, गावतल्यांचं येणं जाणं... या संपूर्ण चित्रावर एक समाधानाची साय दिसते. >>>>>>
छान, खुप छान, अप्रतिम.
खुप मस्त लिहितेस. शेवट तर ग्रेट.


Rani_2007
Friday, May 11, 2007 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद तुम्हाला काय 'दाद' द्दयावी तेच कळत नाही. ..केवळ अप्रतिम आणि परिणामकारक.

Psg
Friday, May 11, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद! सुरेख भाषा, तो बाज मस्त सांभाळला आहेस. पारू आणि लहू यांना एकदम जिवंतपणे उभं केलस! मस्त!

Aaftaab
Friday, May 11, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद!!!!!
अतिशय सुंदर...
विषय, वातावरण निर्मिती, अचूक शब्दयोजना, माफ़क कथाविस्तार आणि अप्रतिम शेवट...
अजून येऊ देत.. आम्ही चटकलो आहोत वाचायला..
'आता तुमी बी लिवाच अन आमी बी हायेच वाचायला.. मंग बगू कोन पयले थकतय..'
कसं


Nandini2911
Friday, May 11, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपर्ब.. खरंच पूर्ण कथा वाचल्यावर आलेला एकमेव विचार. काय छान पात्र जिवंत केलीस... लहू एकदाही कथेत येत नाही तरी डोळ्यासमोर उभा राहतो. ग्रेट.

Bee
Friday, May 11, 2007 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'उलिसक... 'पारू हा शब्द वाचून वर्‍हाडी भाषेची आठवण झाली. पण ही भाषा पुर्णतः वर्‍हाडी नाही वाटत. नक्की कुठल्या भागतला हेल आहे हा?

कथा.. शैली.. निरिक्षण.. ह्याबद्दल दाद ध्यायलाच नको.. नेहमीप्रमाणे सुंदर!


Kashi
Friday, May 11, 2007 - 6:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अ प्र ती म.... शब्दच नाहीत दुसरे.. अतिशय सुंदर...Manogat
Friday, May 11, 2007 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद,
मी पण सहमत आहे..
कथे बद्द्ल अता वेगळ कही सांगायला शब्दच नाही
अप्रतिम! :-)


Saee
Friday, May 11, 2007 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिप्रायांसाठी शब्दांची टंचाई आहे आता! वाचकांसाठी अत्यंत दर्जेदार आणि पौष्टिक खाद्य नियमीत पुरवते आहेस तु...

Sanghamitra
Friday, May 11, 2007 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद नेहमीप्रमाणेच सुरेख.
शेवटचे वाक्य अगदी शोभेलसे.


Mandarp
Friday, May 11, 2007 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद,
खूपच सुंदर कथा. अप्रतीम.
अश्याच सुंदर सुंदर कथा लिहीणे चालू ठेव.
त्यासाठी तुला शुभेच्छा!!!!

मंदार.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators