Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

Archive through April 27, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » विनोदी साहित्य » स्पर्धा » Archive through April 27, 2007 « Previous Next »

Daad
Tuesday, April 24, 2007 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"किती?" मी जवळ जवळ किंचाळलेच.
"एकोणैशी. एका दिवसात नाहीयेत सगळे". माझ्या हाय पीच किंचाळण्यावर व्यंकटेश तितक्याच शांतपणे म्हणाला. अशावेळी 'स्थितप्रज्ञ कसा दिसतो?' वैगैरे लक्षणं झळकतात ह्याच्या चेहर्‍यावर.
"अरे, पण मी एकटी इतक्याजणांबरोबर कशी वाजवणार? दोन दिवसात झाली म्हणून काय झालं?"
"तू एकटी नाहीये sss स, बर!"
मी चिडलेली असताना मला कुणी समजवण्याच्या सुरात बोललं ना की भयंकर राग येतो. वर आणखी याला व्यवस्थीत थांबे घेत बोलायची सवय आहे.
"तबला वाजवण्याच्यासाठी काही उपयोग नाहीये तुझा मला..." हे वाक्य माझ्या डोक्यातून निघून तोंडातून बाहेर पडण्याआधी त्याचा थांबा संपला "अजून एक तबलाकार बोलावलाय".
तबलाकार?
"अरे मग मला कधी सांगणार हे?" असंसुद्धा म्हणायचं विसरले. ही एक अजून खोड याची. मोठ्ठे मोठ्ठे शब्द वापरतो कारण नसताना. तबला वाजवणार्‍याला तबलाकार म्हणतो हा गाढव!

"नाही! याचा व्यवस्थापकीय कामकाजाशी दूरान्वयेही संबंध नाही आणि माझे हातही मोकळे नाहीत". हातात शिडी घेऊन, स्टेजवरचा बल्ब बदलेपर्यंत शीडी धर म्हणनार्‍या एका अव्यवस्थापकीय मदतनीसाला हा स्थितप्रज्ञ एका हातात एक कागद आणि दुसरा हात झब्ब्याच्या खिशात ठेवून बोलला.
कावळ्याच्या कानातून धूर यायचा बाकी दिसत होता. कावले हा एक नैमित्यिक उत्साही volunteer . आमच्या सगळ्या कार्यक्रमांत, competitions मध्ये सगळ्या प्रकारची मदत करायला एका पायावर तयार- 'उज्वला' हे निमित्त त्यात असेल तरच, offcourse . शिवाय त्याची गॅंगही होती. कावळ्याचे टवळे म्हणायचो आम्ही त्यांना- त्यांच्या मागे.

कावळ्याची अवस्था बघून कुणीतरी मदतीला धावलं, व्यंकटेशच्या! कावळ्याच्या नव्हे!
शांतपणे तसंच वळून पुन्हा मला ताब्यात घेत व्यंकटेश म्हणाला "बरोब्बर सकाळी फाईव्ह्हंड्रेडला रेपोर्टिन्ग करायचंय, सगळ्यांनी. त्यानन्तर नाष्ता, मग पाठीमागच्या खोलीत तुम्ही तयार रहायचय. तू आणि वासूदेव."
वासूदेवला त्याचे वडीलही वासूदेव म्हणत नाहीत. प्रत्येकवेळी ह्याने वासूदेव म्हटलं की डोक्यात डी-क्रिप्ट करायला लागतं वश्या! बरं तोंडावर प्रश्नचिन्ह दिसून उपयोग नाही. व्यंकटेश, "वश्या" हे सुद्धा ब्र्म्हदेवाचं नाव त्याच्यासमोर घेतल्यासारख्या "आदरपूर्ण" भावनेने घेतो. आमचं डीक्रिप्शन वासूदेव चं वश्या पर्यंतच चालतं. "आदराने वश्या" च्या पुढे गुंता होतो डोक्यात.
"तुमची हत्यारं घेऊन..." पुढचं मला पाठ आहे. आधी तबले आणि पेटी ह्यांना हत्यारं म्हणणार्‍याला त्याच हत्यारांनी ठोकून दुरूस्त करायला हवं असं माझं प्रामाणिक मत आहे.

पेटी एकच पुरते, तबले वेगवेगळ्या स्वरांचे लागतात, डग्गा एकच लागतो, प्रत्येक तबला लावायला वेगवेगळी हातोडी लागत नाही, लोहाराच्या घणासारखा दिसणारा हातोडा हा तबल्याच्या हातोडीला पर्याय नाही (ह्यात मी मुलगी आहे याचा काहीही संबंध नाही), कोणत्याही पेटीवर पट्ट्या दोनच रंगांच्या असतात्- पांढरी आणि काळी, तबला वाजवणार्‍याला साईड र्हिदम्स वाजवण्यासाठी कमीतकमी अजून दोन हात लागतील....
हे सगळं प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक कॉम्पिटिशनला नव्याने समजाऊन सांगतो आम्ही त्याला.
पण व्यंकटेश पुढे इलाज नाही. तो सर्वांगाने व्यवस्थीत आहे. नाट्यसंगीताच्या स्पर्धांच्या वेळी हा झब्ब्यावर जाकिट घालतो आणि खाली लेंगा. भावगीतांच्या स्पर्धेला बदलून सुरवार. शिवाय जाकिट काढून खांद्यावर शाल (झब्बा ठेवून)
ह्याला व्यंकटेशच म्हणावं लागतं कारण college च्या canteen चा पोर्‍या, त्याला व्यंकटेश म्हटलेलं कळतच नाही- व्यंक्याच म्हणावं लागतं.

क्रमश:


Daad
Tuesday, April 24, 2007 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"आंतर महा-विद्यालयीन भावगीते आणि नाट्यगीतांच्या यावर्षीच्या स्पर्धेत आपलं भरघोस स्वागत आहे" हे वाक्य व्यंकटेश, चार जीने चढून धापत असलेल्या महाविद्यालयीन मुलं, मुली (विषेशत: मुली) त्यांचे आई-वडील, मैत्रीणी अशा सगळ्यांना म्हणतो आहे. त्यासाठी तो एखाद्या ग्रूपला थांबवून धरतो आणि मागून चढणारे फत्ते पावले की, एक गठ्ठा स्वागत करतो.
मग नम्रतेने चहापाण्याच्या "व्यवस्थेची" माहिती देतो. "बाजूच्या खोलीत एक कप चहा, दोन(च) ग्लूकोजची बिस्किटं प्रत्येक स्पर्धकासाठी, फक्त" ह्याला 'चहापाण्याची व्यवस्था' असं व्यवस्थीत नाव आहे. व्यंकटेशचा नम्रपणा बर्‍याचशा अशा "व्यवस्थांमधून" आम्हाला सुखरूप तरून नेतो.

"तिची तिसरी खेप रे, कुणीतरी तिचं ओझं उचला..." अशी अचरट आज्ञा, मी तबले घेऊन जीने चढताना बघून फक्त फद्याच देऊ शकतो. त्याच्या "रिपोर्ट करण्याच्या" टेबलाजवळ मासकीही फिरकत नसताना "मरेन पण टेबल सोडणार नाही" अशा आवेशात तो उठून उभा रहातो पण दोन पावलं पुढे येऊन मदत करत नाही. फद्या स्वत: तबला वाजवतो, चांगला वाजवतो. पण त्याचे नखरे, "साथ नको पण फद्या आवर" या जातीचे आहेत. त्याला टेबलामागे बघून मी सुटकेचा नि:श्वास टाकते दुसरा "तबलाकार" हा गोलाकार नाही, म्हणून!
मागून पेटी घेऊन वश्या टपकतो. त्याला माझा नि:श्वास पूर्ण ऐकू आलाय, त्यामागचा विचार नाही. आपला फास्-फुस करणारा श्वासाचा भाता त्याने अजून दोन वेळा ओढला.
"हा! श्वास एक व्यवस्थीत वापरा का, सगळ जमतय बग. यकच काय धा खेप हूंदेत जावा तिकडं" इती वश्या.
वश्या गुणी आहे आणि इतका चांगला वाजवणारा नसता तर एव्हाना मी त्याला त्याच्या पेटी सकट वाजवला असता.

एकतर सकाळी... नव्हे पहाटे साडेपाचला, त्याची बिंदू घेऊन रवी कामत हजर्- बिंदू ही त्याच्या मोठ्या भावाने उदार मनाने त्याला आजच्या सारख्या दिवशी चालवायला दिलेली, सायलेन्सर गेलेली फटफटी. (नावही भावाने उदारपणे वापरायला दिलेलंच हा वापरतो) दार वाजवायलाच नको. आजूबाजूची सगळीच दारं उघडलीयेत बिंदूच्या फटफटण्याने.
"चल लवकर, व्यंकटेश तांडवायलाय तिकडे" रवी कामत लहान लहान वाक्यच बोलतो. त्यातही short forms वापरायची वाइट्ट खोड. त्याच्या या वाक्यातून 'व्यंकटेश तांडव नृत्य करायला लागलाय' असा अर्थ बोध घ्यायचा. रव्या मोठ्ठं आणि पूर्ण वाक्य बोलतो तेव्हा त्यात कर्ता, कर्मं क्रियापदाच्या जागी शिव्या असतात. तेव्हा त्याची छोटी वाक्यं म्हणजे चांगलं लक्षण मानतो आम्ही.

"निघायचं?" माझ्या अवताराकडे बघूनसुद्धा रव्या विचारतो. त्याल बहीण नसल्याने असेल कदाचित पण, मी एक मुलगी आहे आणि मला तयार व्हायला वेळ लागतो किंवा मला "तयार" व्हावं लागतं हेच मुळी तो विसरलाय. तोच नाही, ग्रूप मधले सगळेच मला त्यांच्यातलाच एक समजतात. मला सवय झालीये, म्हणा.

"हे, हे सगळं न्यायचंय?" तिथे ठेवलेल्या तबल्यांच्या चार जोडांकडे बघून रव्या स्तंभित, अचंबित वगैरे झाला.
"हे सगळे तू वाजवणार? एकटी?"- बावळट, यडचाप म्हणतात तसला प्रश्न पण तिरसटपणाने विचारलेला. "हो. पण एकाच वेळी नाही" तितकंच बावळट स्पष्टीकरण देते, मी. तू एक तिरसट तर मी चार, घे.

"दोन घे", बिंदूवर टांग टाकत रव्या म्हणतो. "काय?दोन? मग बाकिचे काय..." मी शाब्दिक प्रतिकार का काय म्हणतात तो करणार इतक्यात रव्या आणि बिंदू एकदम सुरू होतात.
बिंदूच्याही वरचा ठ्ठ्या लावून रव्या जे लांबलचक वाक्य म्हणतो त्यावरून 'ते मातीचे नसतील तर पोचतील तासाभरात' एवढं कळतं मला. त्यातले दोनच माझे असतात आणि बाकीचे त्याच्या आईच्या गायन मास्तरांच्या क्लासातले. त्यांचा केसही वाकडा झाला तर (मास्तरांचा नव्हे, तबल्यांचा) आई रव्याला परतेल हे त्यालाच काय, मलाही माहितेय. त्यामुळे मी निवांत.
दोन हातात दोन तबले, घेऊन मी रव्याच्या मागे टांग टाकूनच बसते. आई इतक्यात माझ्या बदलायच्या कपड्यांची पिशवी घेऊन येते. तिला रव्याच्या गळ्याशिवाय जागा नाही. अजून काळोख असल्याने रव्याला हे चालतंय.

रव्या माझ्या भावाला खूण करतो. भाऊ बिंदूला stand वरून ढकलून देतो. रव्याच्या साईजचे अडीच तरी लागतिल तिला हलवायला. आता तिथे पोचल्यावर हा हाकारे घालणार परत तिला stand वर चढवायला. रव्याला किंवा बिंदूलाही धरण्याची गरजच नाही. ताशी २५ च्या पलिकडे फक्त आवाज जातो तिचा.

क्रमश:


Sakhi_d
Tuesday, April 24, 2007 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद..... दाद द्यायला शब्दाच नाहीत.
तु सगळच छान लिहितेस...
keep it up :-)


Runi
Tuesday, April 24, 2007 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ताशी २५ च्या पलिकडे फक्त आवाज जातो तिचा. >>>
दाद, अश्या भन्नाट कल्पना कशा काय सुचतात. मस्तच... चालु दे.
नर्मदा सारखे थेट भिडणारे लिहिणारी हिच ती दाद यावर विश्वास बसत नाही, अप्रतिम.
रुनि


Mrinmayee
Tuesday, April 24, 2007 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे पण काय झकास लिहिते आहेस! 'फटफटणारी बिंदू'.. सहीच! :-)

Chaffa
Tuesday, April 24, 2007 - 7:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद,
तुला दाद द्यायला शब्दच नाहियेत. अप्रतीम!!!!


R_joshi
Wednesday, April 25, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद अप्रतिम फारच छान:-)
पुढचा भाग लवकर टाक


Suvikask
Wednesday, April 25, 2007 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारसं लक्ष देऊन वाचावे अस काही त्यात वाटत नाही... विनोदी तर नाहीच नाही... तरी पण चालू द्या... ज्यांना आवाडतयं ते वाचतीलच...

Daad
Thursday, April 26, 2007 - 7:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्यंकटेशाच्या कृपेने आम्हाला दोनदा नाश्ता पावला होता आणि unlimiTed चहा-कॉफ़ी मिळत होती. सकाळच्या पहिल्या नाश्त्यातली चकली, विनासायास सरळ करता येत असल्याचं बघून कुतयाच्या शेपटीसारखी परत अगदी मूळ "चकली"पदाला नाही तरी "कडबोळे"पदाला चाललेल्या चकलीला वश्या वेळ मिळेल तेव्हा परत सरळ करून बशीत ठेवत होता. मी गुणी मुलीसारखी ती चघळून संपवली होती.
एक चिमणी आली एक दाणा घेऊन गेली.... असं करीत चिवडाही संपवला- तसा चिवडा फार नव्हता पण एकावेळी एकच दाणा खाता येण्याच्या कटकटीचा- कटकटीत होता.

आम्ही मागच्या खोलीत काव काव कावलो होतो. संस्थेने पुरवलेले साथिदार हा हुद्दा नसून हा एक वेगळा "सोसायचा जन्म" आहे. किंवा गेल्या जन्माच्या पातकां वगैरेसाठी करायचं प्रायश्चित. काय एक एक प्रकार बघायला आणि ऐकायला मिळतात!

मला खात्री आहे, फद्या एखाद्या मुलीला चहापान व्यवस्थेतले बारकावे समजावून सांगताना यांनी विचारल्यावर, 'साथीदार कुठेत' हे दाखवताना त्याची "फक्त" दिशा चुकली- "तिसरं दार" हे बरोबर पण दिशा चूक, साफ चूक.
त्यामुळे "बहिर्दिशे"ला जाऊन आलेले एक बलदंड गृहस्थ, त्यांच्या त्यांच्याहूनही सुदृढ पत्नी, त्यांची लहान बहीण वाटेल अशी मुलगी, गायन मास्तर, एक चुलत बहीण (वश्याने मावस ऐकल म्हणे) आणि दोन मैत्रिणी असा जथा खोलीत आला. आधीच बाहेर फसल्याने हे गृहस्थ 'फसफसत' होते. त्यात वर आणि मी, एक मुलगी तबल्यासमोर आणि वश्या (मुलगा) पेटीमागे बघून "हा काय खेळ आहे?" असं गर्जत ते गृहस्थ तरा तरा का काय म्हणतात तशा स्टाईल मध्ये परत बाहेर गेले.
तो पर्यंत मी रुमाल घेऊन उभ्याच राहिलेल्या "स्वयंवरसिद्ध" त्या जानकीला विचारलं (बाकीची सभा आसनस्थ झाली होती). मुलीला मी विचारायचं आणि मुलांना वश्याने असं आधीच ठरलं होतं.
"कोणत्या पट्टीत?"
"हातीची वरमाला घेऊन" चालल्यासारखी ती धीमी धीमी पावलं टाकीत वश्याच्या दिशेने निघाली. वश्या अंग चोरून चोरून भिंतीत घुसायच्या गतीला आला होता. जपून वाकत तिने पट्टी पेटीवरच दाखवली- स्वच्छ काळी चार! वश्याने खिशातून रुमाल काढून घाम पुसला आणि बोटं पुसता पुसता पट्टीही पुसून घेतली.
मी: "बस ना. कोणतं नाट्यगीत?"
"हे मिनी उभ्यानेच म्हणणार आहे" एक सखी वदली.
नाव मिनी तर. हं? स्टेजवचे सगळे माइक stands मिनीच आहेत. एकही दोन फुटापेक्षा वर उठत नाही हे मलाही माहीत होतं. पण तो प्रवेश तिकडेच काय तो घडू दे म्हणून मी गप्प बसले. नेहमीचा सत्यवचनी वश्याही गप्प बसला.
"कशी या त्यजू पदाला हा हा" हे शेवटच्या "हा हा" सकट स्वरात म्हणत ती एकदम थांबली आणि गद्यात म्हणाली "हे नाट्यगीत म्हणणार आहे, आज"
वश्या ने उगीचच "आज? मग..." असलं काहीतरी विपरीत सुरू केलं होतं पण मी त्याला मधेच तोडत "वा वा, हं सुरू कर" म्हणून तबला उगीचच खाणदिशी वाजवून चाट थाप बघितली. त्याबरोबर तिच्या आईने एका सखीला बाहेर पाठवलं "काकांना सांग बोलावलय. मी बोलावलय!" -निव्वळ खरखरीत खर्ज!
मग मास्तरांकडे वळून म्हणाल्या "मास्त sss र" (काय गोड गळा होता आईसाहेबांचा? मग मगाचचा खरखरीत "खर्ज" काय म्हणून? असं आपलं मला वाटलं.)
"मास्तंर, ते मुलायम सांगता ना?" मला वश्याने गिळलेला आवंढा चार फुटांवरही ऐकू आला.
मास्तर (त्यांचा) आवंढा गिळून माझ्याकडे वळत म्हणाले "काय आहे, मिनीसाठी थोडी ना sss जूक साथ हवी, म्हणजे कसं? आपण मुला sss यम म्हणतो ना, तशी" मुलायम म्हणताना त्यांनी डग्गा वाजवल्यासारखं केलं की ढोपर खाजवलं कळलं नाही मला पण माझा विरस का काय म्हणतात तो नक्की झाला. मी एक छप्परतोड लग्गी-चाट लावायची म्हणतेय आणि ह्यांना जमिनीला नुसतं गिलाव्याचं सारवण हवंय.- असो, पुढल्या स्पर्धकाला तोडू (छप्पर).

आम्ही तिच्या तोंडाकडे बघतोय, चार सुदीर्घ का प्रदीर्घ श्वास घेऊन तिने नयन उघडून आम्हा पामरांकडे बघत म्हटलं "सुरू करू?" वश्याचा हात कपाळाकडे जाता जाता थांबलेला मी बघितला.
तोपर्यंत तिचे वडील आत आले त्यांना बघून आईसाहेबांनी नुसतं खर्जात (बरोबर! त्याच खरखरीत खर्जात) "बसा!" एवढच म्हटलं. ते उभे होते तिथल्यातिथे बसले, मटकन म्हणतात तसे.

मी ही जमेल तेव्हढा खरखरीत खर्ज लावून म्हटलं "हं" (म्हणजे- "सुरू कर माझे बाई आता")
जवळ जवळ फक्त दीडच पायावर उभं रहात, दाराकडे हात करून, ती म्हणाली, "दादा ते आले ना sss ?"
"दादा" म्हटल्याने वश्या दु:खाने, ओशाळून, लाजून वगैरे मान खाली घालता झाला. आणि मी दाराकडे पाहिलं. कोण आलं आता?
तोपर्यंत तिने म्हणायला सुरूवातही केली. "कशी या त्यजू पदाला हा हा.....".

मी: "हो हो हो...." (मागे एकदा रस्त्यात आडव्या आलेल्या म्हशी हाकलताना असा आवाज कुणीतरी काढल्याचं लक्षात होतं. it was very effective .)
मी: "हे 'दादा ते आले...' आणि 'कशी या त्यजू पदाला....' काय संबंध?"
मास्तर: "तसा का ss ही नाही, पण बरं दिसतं म्हणतो मी. काय चित्रेबाई?"
आम्ही निमूटपणे पुढची साथ केली.
क्रमश:


Sakhi_d
Thursday, April 26, 2007 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद काय म्हणु तुला??
हे सगळ आॅफ़िसमधे वाचण रिस्की आहे....


Anilbhai
Thursday, April 26, 2007 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दाद,
जरा सावकाश येवु दे. इतका वेळ अस मोठ्याने हसत रहाण ऑफ़िसात शक्य नाहिये.


Ekrasik
Thursday, April 26, 2007 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लय भारी,
बिंदु, तांडवायलाय तर एकदमच भारी.
आवडेश.


Daad
Friday, April 27, 2007 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"अघलव, काड्या. अ घ ल व"

तिसर्‍यांदा सुधारला त्याला. एकतर स्त्रीपद, त्यात शब्दबंबाळ शिवाय दोनच महिन्यांपूर्वी याच्या दाताला तार लावलीये, फटी बुजवायला.
सोप्पी, सुंदर नाट्यगीतं नाहीत? आहेत, खूप आहेत!
पण हेरंब सहस्रबुद्धे हे नाव धारण करणार्‍या ह्या पाच फुटी, पंचेचाळीस किलो वजनाच्या जीवाला हे मान्य नाही. त्याला आयुष्यात सगळी adventures याच्या आईच्या भाषेत "नसती थेरं" करून बघायची आहेत. त्याचे सगळे परिणाम भोगण्याची त्याची तयारी असते.... normally त्याचे परिणाम इतरच जास्त भोगतात. बिल्डिंगमध्ये घुसलेला चोर "पकडण्यासाठी" चोरापाठोपाठ हा पायपा वरून उतरायला गेला. चोर कधीच पसार. मग बंबवाले त्यांची शोडी घेऊन येईपर्यंत हा तिसर्‍या मजल्यावर पायपाला चिकटून, त्याला धीर देत त्याचे बाबा तेलंगांच्या ToileT च्या खिडकीत. (तेलंग आमच्या Toilet मध्ये obvious reason साठी). त्याची आई तळमजल्यावर तारांगण घालीत, मोठा भाऊ तिथल्याच सांडपाण्याच्या उघड्या टाकीवर दुसर्‍या टाकीचं झाकण लावण्याच्या फटपटीत, धाकटा भाऊ दुसरी उघडी टाकी राखत....... आम्ही सगळे सकाळी पाच वाजल्यपासून जागत...... परिणामांचे भोग, दुसरं काय?

सरळ मांडी घालून त्याला म्हणता येत नाही. मुलींसारखी एका बाजूला तिरपी मांडी घालून बसतो, गाताना.
"ललना मना नच अघलव शंका अणुही सहते कदा". लिहिणारे लिहोत बापडे, समर्थ म्हणणार्‍यांनी म्हणावं काय वाट्टेल ते. पण शब्द जोडत तोडत म्हणण्यात कसं आलंय adventure ? मलाच काय पण वश्यालाही "अग लघुशंका" ऐकू येत होतं.

"अणुही सहते कदा...." वश्याचा "दा" भात्यातली हवा संपून लहान लहान होत थांबला. काड्याला धीर कसा तो नाही. तो स्वत: पुढच्या 'ललना' वर गेल्याने त्याने आपणहून भाता मारला. पण वश्याचं बोट "दा" वरच. वश्या पूर्ण पुतळाच. माझ्या आणि काड्याच्या मागच्या भिंतीतून आवाज आला "आमची practice घेता का?" गर्रकन मान फिरवून काड्याही पुतळा.

मागच्या भिंतीतल्या खिडकीत कुणी ललना नि:शंकपणे आमची चांगली चाललेली practice थांबवून "आमची" घेता का असं अणूही विचार न करता विचारित होती. कोणत्याही कारणासाठी माझी मी, इतक्या अंशात मान वळवणं शक्य नसल्याने हातानेच मी तिला समोरच्या दरवाजाशी ये असं सुचवलं.

दारातली ललना पाहून "सुरेखच"- मीही मनातल्या मनात म्हटलं.
हे दोघं झपुर्झा अवस्थेत असल्याने मोठ्यानेही मीच बोलले. "कोणतं गाणं?"

एक किणकिण स्वरात ऐकू आली "सपनातिल्या किळ्यांनो, उमल्यू निकाची किंवा". प्रत्येक शब्द लाडिक आवाजात चावत चावत, तोंड जमेल तितकं वेंगाडत म्हटलेल्या या ओळीने मात्र वश्या भानावर आला "भावगीतांचं उद्या आहे सगळं."
आता गालात आवळा किंवा लिमलेटची गोळी धरून बोलल्यासारखं परत लाडिक "पण किती लवकर यावं लागतं practice साठी sss ? आणि गर्दीही किती होते? मना sss सारखं गाताही येत नाही, हो किनाई रे?"
काड्या गडबडीने म्हणाला "हो, हो त्यात काय एव्हढं, घेऊन टाकू, माझी झालीच आहे, काय?" याला म्हणतात हलवायाच्या घरावर.....

क्रमश:Daad
Friday, April 27, 2007 - 2:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तितक्यात फद्या excuse me असं तिरसट बोलत, नखशिखांत स्वच्छ पांढर्‍या रंगातल्या एका मुलीला स्वहस्ते घेऊन आला- हात तेव्हढा धरायचा बाकी होता.
".... तशी बरी वाजवते, म्हणजे साथीला ठीकय. तू संभाळून घेशील म्हणा...." हे तो तिला माझ्याबद्दल सांगत होता.

"ए, ही नी! नीलांबरी अंधारे. 'ताक करी' म्हणणार आहे....."
"तात करी दुहिता विनाशा, फद्या, तात करी!" माझा जमेल तितका विनाश करायचा प्रयत्न. फद्याचे डोळे दिपल्याने कानही कामातून गेलेत आणि असल्या गोष्टी मनावर घेण्याच्या पलिकडे पोचलाय.
"ए, तेच ते".
"ए, वश्या बघ रे"
"ए, येतो गं"
फद्याला इतक्या वेगवेगळ्या शेड्स्मध्ये 'ए' म्हणता येत असेल असं वाटलं नव्हतं!

जातीने विचारपूस करत वश्या म्हणाला, "तात करी का? वा वा!. बस ना श्वेतांबरी."
वश्याच्या डोक्यात रंगांचा गोंधळ झाला असणार. एकतर तिच्या टिकलीपासून शबनम पर्यंत सगळं सगळं पांढरं होतं, ती स्वत: सावळी वगैरे म्हणण्याइतकी सुद्धा उजळ नव्हती....
"नीलांबरी..." मी सुधारला त्याला.
"सॉरी मिस काळोखे" वश्याचा तोल जातो तेव्हा साफच जातो.
"अंधारे!" आता तिने सुधारला.
"तेच ते. तात करी का? वा वा!" वश्या त्याच्या चकलीसारखा परत गोल फिरून तिथेच? हे "तात करी" आतापर्यंत नऊ जणी म्हणून गेल्या होत्या. अजून एक म्हणणार असेल तर गळ्याला तात लावून जीव देईन असं वश्याच म्हणाला होता मगाशी, आता 'वा वा'?
मी: "तात करी? अं...."

नी:"का? नको?" ही रव्या कामतची बहीण शोभली असती. छोटी छोटी वाक्य.
वश्या: "नाही म्हणजे... नाट्यगीत छानच आहे आणि तू म्हणत गोडच असणार, ते सोड...."
मी (वश्याला काटून): "पण अजून नऊ जणी म्हणणार आहेत"
वश्या (मला काटून) : अशी आतल्या गोटातली बातमी आहे, तुला म्हणून सांगतोय!"

नी:"मेंदीच्या पानावर चालेल?"
वश्या: "मेंदिच्या पानावरं काय चालेल?"
मी:"भावगीतांच्या स्पर्धा उद्या आहेत"
नी:"हे नाट्यगीतच आहे. आम्ही आमच्या नाटकात वापरलं होतं"
वश्या:"नाही चालायचं, हे मुळीच चालायचं नाही. उगीच नाही ते...." (वश्याला ह्याचं मधलं म्युझिक वाजवताना घाम फुटतो.)
नी:"माझी दुसरी फारशी पाठ नाहीत. बरं तेजोनिधी लोह... कसं वाटतं?"
वश्या: "लोहच्या पुढचं येतंय?"
नी: "हो sss !"
काही अरिष्टाची शंका येऊन मी: "पूर्ण म्हणशील का?"
नी: "तेजोनिधी गोल गोल..."

तिची पूर्ण practice होईपर्यंत, वश्याने परत एकदा गो sss ल होऊ बघणार्‍या चकलीवरून नजर काढली नाही.
मगाशी एका स्पर्धकाला नाट्यगीताचे मूळ शब्द सांगितल्याने आम्हाला तंबी मिळाली होती. आपल्याच मांडीवर बोटाने 'गोल गोल' काढीत गाण्याचा शब्दांसकट बट्ट्याबोळ करणारीलाही आम्ही निमुटपणे साथ केली.

क्रमश:


Sanghamitra
Friday, April 27, 2007 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरदस्त.
पूर्ण होईपर्यंत मधे पचकणार नव्हते पण
डोळ्यातून पाणी काढलंस.
कित्येक वर्षात इतकी हसले नव्हते.


Daad
Friday, April 27, 2007 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"साल्या काय भानगड करून ठेवलीयेस?" रव्या धाडकन दार उघडून आत आला आणि साध्या लहर्‍याच्या साथीत कुणालातरी कसं खाल्लं ती कथा सांगणार्‍या वश्याला त्याने मानगुटीला धरून उभा केला सुद्धा.
"पळा, लेको. तुम्ही भानगडी करा अणि आम्ही...."
खरतर, त्याला पळण्यात मदत करण्यापलिकडे रव्याचा काही उपयोग नाही. आतून स्वच्छ स्वर लावून गाण्याला, ओरडण्याचा पर्याय वापरणार्‍या त्याच्या आईची सवय आहे रव्याला, बोलताना सुद्धा. वाक्य लहान, आवाज मोठ्ठा.

"....एक दैत्य तुझ्या नावाने बोंबलतोय बाहेर...... अरे राक्षस आहे रे तो रा..." पुढचे शब्द रव्याच्या गळ्यात अंतर्धान पावले कारण तो असुर दारात प्रकट झाला होता.

"राम राम!" मांजरी समोर नैवेद्य म्हणून ठेवलेला (जिवंत) उन्दीर ज्या स्वरात राम नाम घेईल त्या स्वरात रव्या ने त्यांना नमस्कार केला.
वश्या मात्र या कानापासून त्या कानापर्यंत हसला. रव्या चिडूनही आत्ता याक्षणी काही उपयोग नव्हता.
वश्या:"मास्तर!" हसण्याचं कारण रव्याचा पचका नसून राक्षसाशी पूर्वीची ओळख!
राक्षस: "वास्द्येवभाव"
शिवाजी-अफज़लखान भेटीचा (अति) प्रसंग साक्षात! वश्या जमिनीपासून चार बोटं हवेत होता बराच वेळ. (दारात ज ss रा फट मोकळी मिळताच रव्या पळाला).
अफजलखान: "किती दिवसांनी गाट पडलं तुमचं. काय राव आमाला विसरलात काय? पत्र नई, गित्र नई, तिकडे आलं तर तोंड दाकवायला सुद्दा येत नाई, आॅ?"

वश्या:"हे आमचे तालिम मास्तर, मधुकर साने".
मी (मनात): "वश्या तालमीत? नाव काय सांगितलं?"
मी (मोठ्याने): "काय?"
(माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून) अफजलखान: "त्ये श्येतकी-गितकी सोडून आलो बगा. आता नुस्तं येक डिग्री पाडुन घ्येतली का, मिल्ट्रीत निगालो राव आपुन."
वश्या: "काय गाणार आज?"
मी (अजून मोठ्याने): "काय?"
(माझ्याकडे परत पूर्ण दुर्लक्ष करून) अफजलखान:"त्ये नांदी म्हणतो, म्हणतो मी"
वश्या: "तीच काय?"
अफजलखान:"तीच तर काय, गुर्जी दुसरं नाटकगाणं काय शिकवायला तयार नाय बग"
मी (बधीर आवाजात): "कोणती?"
(आता माझ्याकडे लक्ष देऊन) पण वश्या कडे वळून त्यांच्या मते कुजबुजत अफजलखान:"कुणी दुसरं तबलंवालं नाय काय? यांना ऐकू काय येतय, नाई येत म्हटलं तर कसं? शिवाय आणि त्ये नांदी जरा दमाचं आणि ह्ये पोरगी वाजिवणार म्हणजे त्ये आपलं मलखांबाला यरंडेल लावल्यासारकं होणार वो आमचं"
वश्या: "संस्थेने दिलय हो साथीदार, आपण जमवून घ्यायचं"

माझ्या समोर ठेवलेला डग्गा आपल्या हाताने परत एकदा चुंबळीत घट्ट बसवत अफजलखान: "असूदे असूदे... बाई, जरा जोरात येऊदे आवाज नं काय? बाकी भाऊ जमवून घ्येतात" रागाने तोन्डाला फेस येतो ऐकलं होतं पण मग प्रसंगी राग गिळावा लागतो असंही ऐकल्याचं आठवलं.

अफजलखान: "वास्द्येवभाऊ सांगतो तुमाला, गुर्जी म्हणाले होत्ये, त्ये आत्ता खरं होतय बगा. त्यांचाच प्रसाद हो. सूरं, शब्दं असे सपष्ट दिसतात हो दिसतात. ताना कशा आतू sss न आतू sss न येतात, बगा. कदी कदी कशा थांबवायच्या कळत नाईत"
अफजलखानाने अस्तन्या सावरेपर्यंत वश्याने सूर सांगितला आणि नांदीही- "पंच्तुंड नर्रुंडमाळ धर, पार्वतीश आधी नमितो".
पंचतुंड....वा वा, माझी आवडती.

त्यांनी खिशातून कागद काढला आणि म्हणायला सुरूवातही केली. एक कडक उठान घेऊन मी ठाणदिशी समेवर येताच त्यांनी "हाण तिच्याआ.... वाजवा वाजवा" म्हणून आता तबलाही घट्ट बसवला. काही का असेना चला, साथ आवडलीये असं म्हणून मीही खूष झाले, जरा.

शब्दन शब्द जरा जास्तच सपष्ट येत होता. स्वरात न जमल्यास हातवारे मदतीला होते. मगाशी डग्गा दाबून का बसवला ते आत्ता कळलं. तरी मी थोडं अधिक सरकून घेतलं होतं ते बरच झालं. इथे आखाडा उघडला होता.
'पंचतुंड'ला दोन्ही हातांनी पाच्-पाच तोंड दाखवत मग 'नररुंड'ला त्यांच हातांनी दहाच्या दहा मुंडी मुरगाळल्यासारखा आवेश होता (स्वरात नव्हे, हातवार्‍यात).
मला जरा वेळाने डोळे बंद केले तरीही "पंचतुंड नर रूंद मान धर, पार्वतीस आधी धरितो" असलं काही-बाही हिंसक ऐकू येऊ लागलं होतं.
वश्या काय करतोय ते बघण्यासाठी डोळे उघडण्याचीही गरज नव्हती. चकली कधीच संपली होती. शिवाय ही नांदी त्याला त्यातल्या सगळ्या बुभु:त्कारांसकट पाठ होती, आणि त्याने सुरू केलेल्या त्याच्या अध्यात्मिक गुरूंच्या नामजपाची "फिसफिस" मला नीटच ऐकू येत होती.

बरं, मी इतरांच्या 'पंचतुंड' नंतर उठलेल्या ताना ऐकल्यात, यांच्या 'नररुंड'नंतरच्या ताना पचायला कठीण होत्या. पंचतुंड च्या जागी मोठ्ठा श्वास घेऊन "नररुंड" मधला 'ड' अर्धाच म्हणून ताना उठत होत्या. भयंकर वाटतं होतं ते ऐकायला.

ताना "आकारात" ऐकल्यात आम्ही. झालंच तर हुंकाराने सुरू करून 'ऊ'कारात तार षड्ज लावा, 'ई'कारात स्वर लावा, चालतं आपल्याला.
पण "ह्या ह्या ह्या ह्या... SSS " असा प्रत्येक स्वर सपष्ट म्हणत 'ह्या'कारातल्या ताना?
नाक, कान, तोंड, मिळेल तिथून हसू फिस्सकन बाहेर पडायला बघत होतं. ते दाबण्यासाठी मला काय काय करावं लागलं ते माझं मलाच माहीत.

इतक्यात कावळ्या, उज्वला आणि तिच्याबरोबरच्या दोन चिमण्यांना घेऊन आत आला, स्टेजवरच्या लायटिंगमधल्या खुबी आणि त्रुटी समजाऊन सांगण्यासाठी.
अफजलखान तटकन थांबून: "बाकीचं तिथं स्टेजवरच हून जाउंदे. बरं वाजवता, हो तुमी. नायतर काय एकेक साथीचे असतात, तोंडं काय करतात, हसतात काय, विचारू नका. हात मोडून ठेवलेत एकेकाचे. आमी गवयी नंतर. आदी पैलवान!!" म्हणून उठला देखिल.

बाहेर स्पर्धा सुरू व्हायची वेळ झालीच होती. मी, 'नांदी आहे, जरा दमदार ठेका हवाय त्यांना, सुरूवातीलाच आहे, त्यामुळे तू वाजवलस तर बरं दिसेल' वगैरे वगैरे सांगितल्यावर, फद्या "पण एकाच हं" गाण्याला साथ करायला तयार झाला.

समाप्त!


Psg
Friday, April 27, 2007 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरदस्त!

काय फ़्लो आहे. काय लिहितेस गं!

शरण आले मी तुला! गंडा कधी बांधतेस? :-)


Nandini2911
Friday, April 27, 2007 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाक, कान, तोंड, मिळेल तिथून हसू फिस्सकन बाहेर पडायला बघत होतं. ते दाबण्यासाठी मला काय काय करावं लागलं ते माझं मलाच माहीत
>>>>>>>.
ऑफ़िसमधे माझेही असंच झालय

Anjut
Friday, April 27, 2007 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा फारच छान सुन्दर स्टाइल आणि खरोखर विनोदी.

Rahulphatak
Friday, April 27, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती स्वत: सावळी वगैरे म्हणण्याइतकी सुद्धा उजळ नव्हती... >>>
आवडलं ! :-)

.
हितगुज दिवाळी अंक २००८ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions