Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Mail..........!

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » कथा कादंबरी » Mail..........! « Previous Next »

Chaffa
Saturday, April 21, 2007 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अत्यंत वैतागुन सुबोधने पीसी चालु केला आणी रोजची मेल पहायला सुरुवात केली. हात यांत्रीकपणे की बोर्डवर चालत राहीले आणी मन मात्र सध्या चालू असलेल्या सगळ्या घटनाचक्रात भरकटत राहीले,
सुबोध एका चांगल्या कंपनीत कामाला होता एक चांगले घर सुंदर पत्नी आणी भरघोस पगार देणारी नोकरी या पलीकडे आणखी काय अपेक्षा असणार एका सर्वसामान्य माणसाच्या आणी त्याच्या सुदैवाने हे सगळ त्याच्याकडे होतंच. पण काही दिवसांपुर्वीच त्याच्या ह्या सुखी जिवनाला कुणाचीतरी नजर लागावी अशा घटना घडायला लागल्या होत्या. तो काम करत असलेली कंपनी अचानक नुकसानीत जायला लागली होती त्यामुळे व्यवस्थापनाने त्यांच्या धोरणानुसार कर्मचारी कपात केल्यामुळे त्याला नोकरी गमावावी लागली. तसं शुभदाच्या त्याच्या पत्नीच्या नोकरी करण्याने त्यांचा संसार सुरळीत चालु होता पण आपण बेकार असणं ही भावनाच त्याला नकोसे करुन टाकत होती गेला महीनाभर रोज कुठे ना कुठे सि.व्ही. पाठवुन आता तो ही वैतागला होता. पण नविन नोकरी मिळण्याची चिन्हे काही दिसत नव्हती त्यामुळे त्याच्या वैतागण्यात आणखी भर पडत होती. आजही तो असाच वैतागुन आपला ईन्-बॉक्स तपासत होता आणी पुन्हा त्याला ते मेल दिसले पुन्हा पहील्या क्रमांकावरच. सुबोधला रागही आला आणी आश्चर्यही वाटले कारण गेला संपुर्ण आठवडा हे मेल त्याच्या ईनबॉक्स मध्ये न चुकता येत होते पहील्यांदा त्याने तिकडे दुर्लक्ष केले आणी सरळ स्पॅम म्हणुन मोकळा झाला. तरीही ते मेल येतच राहीले आणी ते ही पहिल्या क्रमांकावरच. नेहमीप्रमाणे त्याचा हात मेल डिलीट करण्याकरीता सरसावला पण क्षणभर थांबुन त्याने विचार केला वाचुन तर पाहु काय आहे ते? त्याने ते मेल उघडले आणी चक्रावुन वाचतच राहीला कारण संपुर्ण मेल त्यालाच उद्देशुन लिहील्यासारखे लिहीले होते. त्याच्यावर जे प्रसंग आले होते त्याचेही त्यात व्यवस्थीत वर्णन होते. हे मेल पाठवणारा जणू त्याच्या बरोबरच वावरत होता. हा विचार मनात आल्यावर तो क्षणभर थबकला आपल्या जुन्या सहकार्‍यांपैकी तर कुणाचे हे काम नसावे? पण पुढच्याच क्षणी त्याला त्या विचारातला फ़ोलपणा जाणवला त्याच्या सहकार्‍यांना त्याचा हा mail ID कुठे माहीत होता?आणी नोकरी सुटताच सहकारीही त्याला विसरलेच होते. म्हणजे यात काहीतरी वेगळेपणा आहे हे नक्की त्याच्या मनाने कौल दिला. मग झपाटल्या सारखा तो ते मेल पुन्हा पुन्हा वाचु लागला नक्कीच कुणीतरी त्याच्यासाठीच पाठवलेले मेल होते ते.
पुन्हा पुन्हा मेल वाचताना त्यात दिलेल्या लिंककडे तो आकर्षीत झाला क्लिक करताच लिंक ओपन झाली आणी त्याच्या मॉनीटरवरचा प्रकाश एकदम नाहीसा झाला जणू त्याने एखाद्या अंधार्‍या गुहेत प्रवेश केला होता पडद्यावर काहीतरी दिसेल या अपेक्षेने सुबोध एकटक त्याच्याकडे पहात राहीला आणी हळुहळू त्याला ते दिसले. त्या दाट अंधारात दोन लाल गुंजेसारखे ठिपके चमकत होते कमीत कमी काहीतरी हालचाल दिसली म्हणुन आता सुबोधचे लक्ष आणखी जास्त केंद्रीत व्हायला लागले आता त्या ठिपक्यांचा आकारही वाढायला लागला होता जणू सुबोध आता त्या गुहेत आणखी खोल खोल जात होता आपल्या आजुबाजुला त्याचे लक्ष नव्हतेच नाहीतर त्याच्या असे लक्षात आले असते की त्याच्या मॉनिटरवरुन तो काळोख आता त्याच्या खोलीतही शिरायला लागला होता. पण सुबोधची नजर आता त्या तांबड्या ठिपक्यांचा पाठलाग सोडायला तयार नव्हती आता त्या ठिपक्यांचा आकारही स्पष्ट व्हायला लागला कुणीतरी लालभडक डोळे रोखुन त्याच्याकडे पहात होते. आजुबाजुचा थंडगार काळोख आता सुरीने कापता येईल ईतका दाट झाला होता त्यात कुबट वासाची भरही पडली होती ' हे चुकिचे आहे, अशक्य आहे' त्याचे अंतर्मन त्याला सावधगीरीचा ईशारा देत होते पण तो समजुन घेण्याइतपत सुबोध शुध्दीवर होताच कुठे? त्याचा त्या अंधार्‍या गुहेतला प्रवास चालुच होता कोण जाणे किती काळ?
शुभदा ऑफ़ीसमधुन घरी आली, तशी ती आज लवकरच आली होती तिच्या ऑफ़िसमधल्या मैत्रीणीची तब्बेत अचानक बिघडल्याने तिला घरी सोडायला ती आज हाफ़ डे घेउनच निघाली होती पण मैत्रीणीला घरी नेउन तिच्या डॉक्टरना फ़ोन लावुन बोलावुन घेण्यात तिचा वेळ गेलाच शेवटी तिचे सगळे व्यवस्थीत करुन ती आपल्या घरी आली. तरीही आज नेहमीपेक्षा लवकरच आली. दरवाजाची बेल दाबुन ती वाट पहात राहीली नेहमी सुबोध यावेळी घरीच असे. आज स्वारी कशा मुडमधे आहे कुणास ठाउक ती मनात विचार करत राहीली नोकरी गेल्यापासुन सुबोध जरा चिडचीडा झाला होताच पण ती समजु शकत होती. दरवाजा आजुन उघडला नाही असे पाहून तिने पुन्हा बेल वाजवली पण आत काहीच हालचाल जाणवली नाही म्हणुन तिने आपल्या पर्समधुन चावी काढून लॅच उघडले दरवाजा उघडताच तिला पहिल्यांदा तिला आतला काळोख जाणवला. आत ईतका काळोख असुनही घरातला एकही दिवा आजुन लावलेला नव्हता. "आज महाशय पुन्हा नोकरीच्या शोधात बाहेर पडलेले दिसतात" ती पुटपुटली आणी तीने दिवे लावायला सुरुवात केली पण राहून राहून तिला आतला काळोख भेडसावत राहीला बाहेर बर्‍यापैकी उजेड असुन घरात काळोख कसा? जशी जशी शुभदा त्यांच्या रुमकडे जायला लागली तशी तशी वातावरणातल्या बदलाची तिची जाणीव आणखी तिव्र व्हायला लागली. एखाद्या बंद जागेत भरुन रहातो तसा कुबट वास तिला जाणवायला लागला विचारांच्या तंद्रीतच तिने बेडरुमचा दरवाजा उघडला आणी समोर कंप्युटर समोर बसलेल्या सुबोधला पाहुन ती दचकलीच. त्याची तिच्याकडे पाठ होती. " म्हणजे हा घरातच होता? मग दार का उघडले नाही? पी.सी. चालू ठेउन झोपला की काय?" एक ना अनेक प्रश्न तिच्या स्त्रीसुलभ मनाला पडले. झटकन जाउन तिने सुबोधच्या खांद्यावर हात ठेवला पण काहीही प्रतिक्रीया आली नाही म्हणुन तिने समोर झुकून त्याच्या चेहर्‍याकडे पाहीले आणी जे दिसले ते पाहील्यावर तिच्या तोंडून अस्फ़ुट किंचाळी निघाली. सुबोध टकटकीत नजरेने समोर कोर्‍या मॉनिटरकडे पहात होता आणी शरीरातला जिवनरस कमी व्हावा तसा त्याचा चेहरा पांढरा पडला होता, चेहर्‍यावरच्या नसा तटतटलेल्या त्यामुळे तो आगदी भेसुर दिसत होता. शुभदा घाबरली पण क्षणभरच, पुढच्याच क्षणी तिला वास्तवाचे भान आले आणी तिने सुबोधला धरुन गदागदा हलवले. कारण त्याची आवस्था पहाता तो हाकेला प्रतीसाद देईल याची तिला मुळीच आपेक्षा नव्हती. जोरजोरात हलवल्यावर सुबोध प्रगाढ निद्रेतुन जागा झाल्यासारखा भानावर आला. " अरे काय हे कुठल्या तंद्रीत होतास ईतका वेळ?" सुबोध केवळ तिच्याकडे अनोळखी नजरेने पहात राहीला. तिने कसाबसा त्याला बेडपर्यंत नेउन झोपवला आणी फ़्रिजमधल्या थंड पाण्यात टॉवेल भिजवुन त्याच्या चेहर्‍यावरुन हलकेच फ़िरवला तरीही त्याच्याकडून काहीही प्रतीसाद मिळाला नाही जशी त्याच्या अंगातली चेतनाच संपली होती. अखेर तिने त्यांच्या फ़ॅमेली डॉक्टरना फ़ोन लावला. ते येईपर्यंत त्याचे डोके मांडीवर घेउन ती डोळे पुसत राहीली. डॉक्टर आले त्यांनी सुबोधला तपासले, आणी अती अशक्तपणा आल्याने सुबोध तात्पुरत्या कोमात गेला आहे असे निदान करुन आरामाची आवश्यकता आहे असे म्हणत त्यांनी त्याला झोपेचे ईंजेक्ष्शन दिले आणी काही औषधेही लिहुन दिली. डॉक्टरांना सुबोधजवळ बसवुन ती औषधे घेउनही आली. एव्हाना टक्क उघडे असलेले सुबोधचे डोळे शांत झोप लागल्यासारखे मिटले होते, ते पाहुन एक सुस्कारा टाकत शुभदा घरातल्या बाकी कामाला लागली. सुबोधला झोपेचे ईंजेक्ष्शन दिलेले असल्याने तो आता सकाळपर्यंत जागा होणार नव्हताच आणी तीचीही अन्नावरची वासना उडाली होती. पण रिकाम्यापोटी झोपु नये म्हणुन तिने फ़्रीजमधुन ग्लासभर दुध घेतले आणी दिवे बंद करुन ती सुबोधशेजारी बेडवर लवंडली. मन काळजीने ग्रासुन गेले होते पण दिवसभराची दगदग काळजीवर मात करुन गेली आणी शुभदाचा डोळा कधी लागला ते तिलाही कळले नाही.
रात्र हळूहळू गडद होत होती आणी अचानक सुबोधने खाडकन डोळे उघडले. त्या काळोख्या गुहेतला प्रवास, त्यातुन अचानक मागे खेचल्या गेल्याची जाणीव त्याला स्वस्थ राहू देईना. मन नावाचे काही अस्तित्वात नसल्यासारखाच यांत्रीकपणे तो पुन्हा पी.सी. कडे गेला पुन्हा तो चालु करायची गरज लागणार नव्हतीच कारण तो ईतकावेळ चालुच राहीला होता. समोरच्या पडद्यावर ते डोळे दिसतात का याचा तो असुसुन शोध घेत राहीला आणी त्याला ते दिसले, पुन्हा त्याला आमंत्रीत करत असलेले, त्याच्यावर नियंत्रण करत असलेले ते डोळे त्याला दिसले ते आता त्या काळोखात आणखी खोल गेले होते. तिथपर्यंत पोहोचायलाच पाहीजे ह्या भावनेने त्याला भारुन टाकले आणी असेल नसेल ती शक्ती पणाला लावत तो त्यांचा पाठलाग करु लागला. त्या अंधार्‍या गुहेत.........................
मध्येच कधितरी शुभदाला जाग आली सवयीनेच तिचा हात शेजारी सुबोधच्या जागेकडे गेला आणी तो तिथे नाही हे जाणवताच तिच्या काळजाने ठाव सोडला. डोळे उघडून ईकडे तिकडे पहाताना दाट झालेल्या काळोखाची तिला जाणीव झाली बेडलॅंप चालु असुनही त्याचा प्रकाश कुठेतरी शोषल्यासारखा मंद झाला होता आणी पुन्हा तो कुबट वास, ती तात्काळ उठून पी.सी. कडे धावली आणी तिथे सुबोधला बसलेला पहाताच तिच्या काळजात चर्र्रर्रऽ झाले. तशीच धडपडत तिने दिवा लावला आणी ती सुबोधजवळ पोहोचली आणी त्याच्या खांद्याला धरुन हलवले, आणी ऽऽ. त्याचा निष्प्राण देह तिच्या हातावर कलंडला.

सुबोधला असे अकाली जाउन आज जवळजवळ दोन महीने होत आले होते. शुभदाच्या मनातला आक्रोश आजुनही कमी झाला नव्हताच पण जग रहाटीत पुन्हा झोकुन देणे गरजेचे होतेच म्हणुन ती पुर्ववत आपल्या दिनक्रमाला लागली होती. सुबोधच्या मृत्युचे कारण कुणालाही सांगता आलेले नव्हते त्यामुळे काही संशयी नजरा तिला घायाळ करत होत्या. सुबोधशीवाय हे एकटे घर तिला खायला उठत होते. धक्क्यातुन सावरुन घेत तिचे आयुष्य आता एकाकी चालू झाले होते. आज जवळजवळ दोन महीन्यांनी तिने पी.सी. चालु केला आणी आपला मेलबॉक्स उघडला. त्यात साठलेल्या सगळ्या मेल मध्ये ते मेल उठून दिसत होते आगदी पहील्या क्रमांकावर, ते डिलीट करण्यासाठी तिने कर्सर त्याच्याजवळ नेला आणी ती थबकली पहायला काय हरकत आहे नाहीतरी आता वेळच तेवढा भरपुर उरला आहे असा विचार करुन तिने त्या मेलवर क्लिक केले.................


Runi
Sunday, April 22, 2007 - 2:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए चाफ्फा कसले भितीदायक लिहितोस रे. ही कथा काल्पनिक आहे हे माहित असुनही शेवट वाचुन मी चरकले.

Srk
Sunday, April 22, 2007 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे चाफ़्फ़ा वाचुन झाल्यावर मी पटकन विंडो बंद केली. प्रतिक्रिया लिहायला घेतांना कथा परत वाचण्याच टेम्पटेशन झालं. भर दुपारी वाचतांनासुद्धा जरा काळवंडल्यासारखं वाटायला लागलयं. शेवट तर शहारुन टाकणारा झालाय.

Meggi
Sunday, April 22, 2007 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला tension च आलं वाचतना...

Sakhi_d
Monday, April 23, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा मस्तच... office मधे आहे हे विसरायलाच झाले....

डिटेल मेल नंतर करेन... :-)



Sush
Monday, April 23, 2007 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुन्दर भयकथा.
वाचून डोळ्यासमोर अन्धारी आली.
वाचताना चित्र डोळ्यासमोर येते.
क्शणभर विसारायला होत आपण कोठे आहोत


Nandini2911
Monday, April 23, 2007 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे... किती भयानक..
चाफ़्या प्रगती आहे रे


Rajya
Monday, April 23, 2007 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा,

मस्तच रे!
अंगावर काटा आला.
अगदी सुहास शिरवळकरांची आठवण झाली.


R_joshi
Monday, April 23, 2007 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा... खुपच छान. कथा वाचताना मी ही गुहेत खेचली जात आहे असच वाटल. शेवट तर भीतीचा उच्चांक गाठतो.

Disha013
Monday, April 23, 2007 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा,उत्कृष्ट वातावरण निर्मिती! लोकहो,अनोळखी मेल उघडुन बघायचा मोह टाळा.

Yog
Tuesday, April 24, 2007 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथेत वातावरण निर्मिती चान्गली आहे पण काही गोष्टीन्चा सन्दर्भ नीट कळत नाही. "कुबट वास"?
शिवाय झोपेचे इन्जेक्शन दिले तरी त्याने "खाडकन" डोळे उघडले? (धक्कातन्त्र थोडे उथळ वाटते):-)
असो. सुरुवातीला थोडी गूढ वाटली पण तपशिल अन शेवटात घाई केल्याने धक्कातन्त्र थोडे फ़सल्या सारखे वाटले.
चू. भू. दे. घे.


Kmayuresh2002
Tuesday, April 24, 2007 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा,चांगला प्रयत्न आहे रे.. योगच्या मुद्द्यांशी सहमत...

Chaffa
Tuesday, April 24, 2007 - 7:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी धन्यवाद, आणी rajya सुहास शिरवाळकरांच्या नखाचीही सर नाहीये कथेला पण आठवण झाली यातच मला धन्यता.
योग,मयुरेश,
भय-संदेह कथांना धक्कातंत्र नाही वातावरण निर्मीतीचीच गरज असते,(असे म्या पामराला वाटते) धक्कातंत्र हा प्रांत रहस्यकथांचा, पण तुमचा सल्ला मुळीच अयोग्य नाहीये हे एकदम मान्य.


Bhidesm
Thursday, April 26, 2007 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नारायण धारप लिहायचे तशासारखी सुरूवात वाटली. कुबट वासाचा संदर्भ त्यांच्या बर्‍याच कथांमध्ये आहे. चांगली सुरूवात आहे कथेची. या कथेचे पुढचे भाग वाचायची इच्छा आहे.

Disha013
Thursday, April 26, 2007 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा संपली आहे की.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators