Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics

अश्वीनी

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » अश्वीनी « Previous Next »

Vaibhav_joshi
Thursday, March 15, 2007 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो, आणखी एक जोमदार ' पहिला प्रयत्न' :

अश्विनी

ऋतू येत होते ऋतू जात होते
स्वतःच्याच मी मग्न तालात होते

नसे भान मजला कळ्यांचे, फुलांचे
तुझे भास प्रत्येक श्वासात होते

जगाशी मलाही न घेणे न देणे
रहाणे तुझ्या फक्त स्वप्नात होते

अशी भूल पडली तुझ्या चेहर्‍याची
पहाणे कुठेही न हातात होते

तुझी आस होती तनाला मनाला
कसे सावरू, वेड रक्तात होते

किती शोधिले मी, तुला पाहिले मी
अखेरीस माझ्याच प्राणात होतेMankya
Thursday, March 15, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोड आहे हि गजल !
नसे भान ... बेभान करतो हा शेर !

माणिक !


Mi_anandyatri
Thursday, March 15, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!
पण मतल्यामधेही "तुझ्या"बद्दल काहीतरी हवंच होतं असं वाटतं...

आणि मक्त्यातील सानी मिसरा "तू माझ्याच प्राणात आहेस" हे आणखी नेमकेपणे सांगू शकेल का?
चुभूद्याघ्या...


Zaad
Thursday, March 15, 2007 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझी आस होती तनाला मनाला
कसे सावरू, वेड रक्तात होते

किती शोधिले मी, तुला पाहिले मी
अखेरीस माझ्याच प्राणात होते

आहा!! मस्तच....

आनंदयात्री,
या मक्त्याचा मला लागलेला अर्थ असा
तुझा शोध सगळीकडे घेतला, पण 'अखेरीस' मला उमगले की तुझे 'असणे' 'माझ्याच प्राणात होते'


Meenu
Thursday, March 15, 2007 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गज़ल आवडली .. ..

Meghdhara
Thursday, March 15, 2007 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह अश्विनी खुपच छान! पूर्ण रमलेली

मेघा


Shyamli
Thursday, March 15, 2007 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी,
नसे भान मजला कळ्यांचे, फुलांचे
तुझे भास प्रत्येक श्वासात होते>>
आवडला हा शेर

जगाशी मलाही न घेणे न देणे
रहाणे तुझ्या फक्त स्वप्नात होते

मला या जगाशी न घेणे न देणे>>अशी वाचली मी चुकुन, जास्ती छान वाटली :-)
मग खालची ओळपण आली आपोआप
पहाणे तुला फक्त स्वप्नात होते
अर्थात सहज सुचल म्हणुन :-)
Mayurlankeshwar
Thursday, March 15, 2007 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझी आस होती तनाला मनाला
कसे सावरू, वेड रक्तात होते

एकदम फना स्टाईल शेर आहे हा!! :-)
गझलेचे सर्वच शेर एकमेकांचे नातलग आहेत असे वाटले. विषयाची continuity छान साधली आहे!

"मक्त्यातील सानी मिसरा "तू माझ्याच प्राणात आहेस" हे आणखी
नेमकेपणे सांगू शकेल का? "
आनंदयात्रींशी सहमत.
इथे उला मिस-यात वाचतावाचता थोडी गडबड होते.म्हणजे 'किती शोधले मी' ह्या नंतर 'तुला पाहिले मी' हे जरा संदिग्ध वाटते.म्हणजे 'शोधणे' संपून एकदम 'पाहणे' कसे काय सुरू झाले असे मला वाटले.
झाड ने सांगितल्यानंतर मात्र थोडा साक्षात्कार झाला.
तरीही अजुन नेमके पणा येऊ शकतो.
उला मिस्-यात 'शोधण्याची' excitement कायम ठेवून सानी मिस्-यात आध्यात्मिक प्रेमाचा धक्का दिला तर शेर अजुन उच्च पातळीवर पोहोचेल इथे धक्का हा शब्द वस्तुनिष्ठ अर्थाने घेऊ नये ही विनंती. 'तू माझ्या प्राणात होतास' हे एखादी प्रतिमा वापरून सांगितल्यास छान होईल. विचार करुन सांगतो :-)
धन्यवाद :-)


Bee
Thursday, March 15, 2007 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, गझल छान आहे.

Ganesh_kulkarni
Thursday, March 15, 2007 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी ,
खुप छान गज़ल!

मला आवडलेले शेर...
१) नसे भान मजला कळ्यांचे, फुलांचे
तुझे भास प्रत्येक श्वासात होते

२) जगाशी मलाही न घेणे न देणे
रहाणे तुझ्या फक्त स्वप्नात होते

३) तुझी आस होती तनाला मनाला
कसे सावरू, वेड रक्तात होते

४) किती शोधिले मी, तुला पाहिले मी
अखेरीस माझ्याच प्राणात होते

Sanghamitra
Thursday, March 15, 2007 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी...
प्रयत्न छानच आहे. तू कविता छान लिहीतेसच म्हणून जरा जास्त विश्लेषण.
सुट्या ओळी छान आहेत पण पहिल्या दोन शेरात दोन्ही मिसर्‍यात connectivity स्पष्ट नाहीये.
पुढचे दोन शेर ठीक ठाक.
शेवटचे दोन शेर मात्र अतिशय सुरेख जमले आहेत.
लिहीत रहा. :-)
मॉड्स : folder च्या नावात श्व ची वेलांटी ह्रस्व करता येईल का?


Chinnu
Thursday, March 15, 2007 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, छान आहे गजल. मक्ता आवडला.

Saurabh
Thursday, March 15, 2007 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, प्रयत्न चांगला आहे. मात्र लगागासाठी केलेले 'पहाणे', 'रहाणे' खटकतात. पाहणे, राहणे असे हवे. रहाणे म्हटलं की मला आडनाव आठवतं!

Ashwini
Friday, March 16, 2007 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना मनापासून धन्यवाद.

कधिकाळी मी गझल लिहीण्याचा प्रयत्न करेन हे स्वप्नातसुद्धा खरं वाटलं नसतं. सगळं श्रेय, इतक्या तळमळीने हा उपक्रम सुरू करणार्‍या वैभवला आणि अतिशय सहनशीलतेने तपासण्याचे काम करणार्‍या स्वातीला.

आता थोडेसे प्रतिक्रियांबद्दल.

झाड, तुला कळलेला अर्थ तंतोतंत बरोबर आहे.

आनंदयात्री, मतल्यामधे 'तुझ्या'विषयी उल्लेख असता तर गझलेत एकंदरीत व्यक्त होणार्‍या अर्थाला अधिक जवळचा झाला असता, खरे आहे. पण कल्पना अशी आहे की, ऋतू येत जात होते, काळ बदलत होता, मी मात्र माझ्या स्वप्नांचे एक जग करून घेतले होते आणि त्या जगातच आत्ममग्न होते.

आणि श्यामली, म्हणूनच तिसर्‍या शेरात असे म्हणायचे आहे की मी या जगात राहातच नाही, फक्त तुझ्या स्वप्नातच राहात असते.

मयूर, सहमत. मक्ता सगळ्यात कठिण होता. 'तुला पाहिले मी' च्या ऐवजी, दुसरे काहीतरी चालले असते, पण सुचले नाही.
मक्त्याला आत्ताचे रूप येण्याआधी एक विचार असा होता:

किती शोधले मी, परी मज कळेना
कसे सापडावे, जे प्राणात होते

पण 'जे'साठी मला लघु अक्षर काही केल्या मिळेना मग मी त्याचा नाद सोडला.

संघमित्रा :-)
आणि ते 'श्व'च्या वेलांटीबद्दल धन्यवाद. Mods , इकडे लक्ष देणार का?

सौरभ, मान्य.


Jayavi
Friday, March 16, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी....... खूपच मस्त गं....!
नसे भान मजला कळ्यांचे, फुलांचे
तुझे भास प्रत्येक श्वासात होते
हा शेर एकदम खास....:-)
श्यामलीनं सुचवलेला बदल मला पण आवडला.....त्याने अर्थाला बाधा येत नाहीये आणि पंच पण येतोय.
बाकी गझल माझ्या आवडीच्या विषयावर असल्यामुळे मनापासून आवडेश :-)

Psg
Friday, March 16, 2007 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, मस्त लिहिली आहेस.. 'तिचं' स्वपनजगतात रहाणं पोचतय! मक्ता अजून चांगला चालला असता.. पण तू म्हणतेस तसं, ते मात्रांचं गणित बसवणं अवघड.. :-) तरीही छान झालिये!

Pulasti
Saturday, March 17, 2007 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी,
भास/श्वास, वेड हे शेर छान आलेत.
श्यामलीची सूचना सयुक्तिक वाटते आहे.
शुभेच्छा!
-- पुलस्ति.

Pendhya
Saturday, March 17, 2007 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, छान गजल आहे. अगदी " बेभान " करणारी.

Ashwini
Saturday, March 17, 2007 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयू, तुझा आणि माझा problem एकच आहे ग. :-)

पूनम :-)

पुलस्ती, श्यामलीची सूचना छानच आहे. दुसर्‍या ओळीत अर्थ थोडा वेगळा येतो असे मला वाटते. आणि 'पहाणे' पुन्हा repeat होते मग पुढच्याच शेरात. पहिली ओळ बदलायला हरकत नाही.
Pendhya , धन्यवाद.


.
हितगुज दिवाळी अंक २००८ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions