Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
द बर्निंग ट्रेन ...

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » द बर्निंग ट्रेन « Previous Next »

Farend
Thursday, December 27, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यालाच 'धी बरनिन्ग ट्रैन' किंवा यात पहिल्या भागात बराच वेळ रेल्वे न दाखवता इतर बर्‍याच गोष्टी दाखवून लोकांची डोकी फिरवल्याने काही लोक याला The Turning Brain असेही म्हणत :-)

फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा डब्यात कारणाशिवाय साखळी ओढण्याला २५० रू. दंड होत असे तेव्हाची. कदाचित त्याही आधीची. एन्ट्रीलाच तीन पोरे नासिर हुसेन बरोबर एका नॅरोगेज यार्डात गप्पा मारत असतात. नासिर त्यांना एकेका इंजिनाकडे बोट दाखवून 'हे खुद्द महाराजा म्हैसूर यांचे आहे...' वगैरे माहिती पुरवत असतो. ते ऐकून मला वाटले की आजकाल अमेरिकेत जसे CEO वगैरे लोकांच्या स्वत:च्या yachts असतात तसे पूर्वी भारतीय संस्थानिक स्वत:ची इंजिने ठेवून असावेत. तर ही तिन्ही पोरे ठरवात की त्यातील एक मोठा झाल्यावर रेल्वे इंजीन बनवणार, दुसरा कार्स चालवणार आणि तिसरा त्याला घेतले नाही म्हणून ते सर्व तोडून टाकणार. मोठेपणी ते कोण होणार याची किंचितही शंका राहू नये म्हणून त्या तोडणार्‍याला डॅनीसारखीच हेअर स्टाईल दिली आहे. जेमतेम दोन मिनीटे हे बालपण टिकते आणि एकदम एकेकाच्या एन्ट्र्या. डिझेल इंजीनातून तेवढ्या गरम वातावरणातही लेदर जॅकेट घातलेला विनोद खन्ना, एका वेगवान कार मधून धर्मेन्द्र आणि 'लोको शेड' मधून उर्मट पणा दाखवणारा डॅनी. तेव्हढ्यात एक विनोद मेहराही येतो, हा एकदम मोठाच झाला बहुतेक.

तसेच ते थेट एका रेल्वे फंक्शन ला जातात, तेथे धरम आणि विनोद खन्ना शेजारी बसतात. मग हेमा व परवीन काहीतरी जुगलबंदी टाईप गाणे म्हणत दोन मोठ्या थाळ्यांतून फुले उधळतात, ती बरोबर सगळी या दोघांच्या अंगावरच पडतात.

आता दोघे त्यांना पटवण्यासाठी एक नाटक रचतात. दोघांपैकी एकाने मवाली होऊन एकीची छेड काढायची आणि दुसर्‍याने येऊन त्याला बदडायचे वगैरे (मग दुसर्‍या वेळी उलटे). धर्मेन्द्र मवाली होऊन परवीन ला छेडतो, तेव्हाचा त्याचा ड्रेस अचाट आहे, पण नंतर उलट्या प्रसंगाच्या वेळी त्याचा सभ्यपणाचा ड्रेस बघून आधीचा मवाली ड्रेस बरा होता असे वाटते :-) यातून त्या दोघी पटतात, पण अजून नाटक उघडकीस येत नाही. मग एका पार्क मधे सकाळी आठ वाजता मिलनेका वादा झाल्याचे हेमा परवीन ला सांगते आणि काय आश्चर्य! परवीन चा ही तसाच वादा झालेला असतो. हे प्रकरण एवढ्यावर थांबत नाही. त्या दिवशी सकाळी विनोद मेहरासकट जगातील सर्व प्रेमिक आप आपल्या प्रेमिकांना भेटायला त्याच पार्कमधे त्याच वेळी आलेले असतात.

त्यात आपल्या प्रेयसीला भेटायला कशाकशाची गरज पडेल सांगता येत नाही म्हणून पोलिसांचे नकली वेष ही बरोबर घेऊन आलेले असतात. आणि एवढे लोक एकाच वेळी येऊन सुद्धा त्या पार्कमधे सामसूम असते. आणि तरीही रंगिबेरंगी ड्रेस घातलेल्या हेमा व परवीन या दोघांनाही दिसत नाहीत. शॉट ओपन होतो तेव्हा त्या एका झाडामागे उभ्या असतात पण त्या तेथपर्यंत किंवा लगेच दुसर्‍या त्या विनोद खन्नाजवळच्या झाडापर्यंत कशा गेल्या यांना न दिसता? मग या दोघींना कळते काय नाटक होते ते, ते ही मोठे प्रमेय उलगडून सांगितल्यासारखे एकमेकींना सांगितल्यावर. प्रेक्षकांना सगळे नीट समजावून सांगावे लागते या समजुतीमुळे तसे करताना पात्रे किती माठ दिसतात ते यांना कळत नाही.

तुमच्या ऑफिसमधला नेहमी तुमच्या बरोबर काम करणारा माणूस एक दिवस दाढी मिशा लावून पोलिस इन्स्पेक्टर चा ड्रेस घालून आला तर तुम्ही त्याला ओळखणार नाही का? येथे विनोद मेहरा येतो आयत्या वेळी तेथे, तो त्याच्या प्रेयसीबरोबर तेथे आलेला असूनही त्याच्या कडे तो नकली पोलिस ड्रेस आणि दाढी वगैरे असते. विनोद मेहराला तर कोणीही ओळखायला पाहिजे. अमर प्रेम मधे बालकलाकार सारिका मोठी झाली की तिचा विनोद मेहरा होतो, तेव्हा सुद्धा आम्ही ओळखला होता :-)

यात जळणार्‍या आगगाडीचा कोठे संबंध आला असा प्रश्न तुम्हाला आला असेल. बहुतेक असे काही प्रसंग व तीन चार रोमॅंटिक गाणी, बागेत पळणे (ते ही दिल्लीतून थेट वृंदावन गार्डन मधे. महाराजा म्हैसूर ना ही आयडिया असली असती तर कशाला इंजीन वगैरे च्या भानगडीत पडले असते) वगैरे झाल्यावर दिग्दर्शकाला लक्षात येते की रेल्वेवरच्या चित्रपटात थोडीशी रेल्वे दाखवली पाहिजे. आणि मग कथानक पुन्हा त्या रेल्वे इंजीन, लोको शेड मधे परत येते.

नवीन रेल्वे चालू करण्याचे बहुधा दोन मार्ग आहेत्: एक म्हणजे इंजीन व डबे बनवणार्‍या कंपन्यांकडून उपलब्ध असलेले डबे वगैरे निवडून नवीन गाडी चालू करायची म्हणजे आमदार खासदार मंत्री वगैरेंना त्यांच्या ५ वर्षांत मिरवता येते, किंवा हिन्दी चित्रपटातील उपाय म्हणजे तुमच्याकडे जे दोन तीन हॅन्डसम लोक असतील त्यांना गाडीची 'डिझाईन्स' बनवायला सांगायची. मग यथावकाश ५-६ वर्षांनंतर गाडी तयार होते. मंत्री झाल्यावर आपल्या शहरापासून ते मुंबई, दिल्ली आणि पार झुमरीतलैय्या पर्यंत थेट गाड्या चालू करणारे यातील कोणता पर्याय निवडत असतील ते उघड आहे, पण येथे मात्र आख्खी गाडी एकदमच डिझाईन करतात. ते ही फक्त विनोद (दोघे ही) आणि डॅनी या तिघांचेच फायनल मधे येते. हे तिघे नक्की डिझाइन इंजिनीयर असतात की कोण ते कळत नाही पण गाडी डिझाइन करण्या पासून ते तिच्या मार्गातील अडथळे दूर करण्या पर्यंत सर्व 'कंट्रोल' यांच्याकडेच असतो.

आता (जो) मुख्य भाग (असायला हवा होता). गाडी ५-६ वर्षांनी तयार होते. ही नवी 'सुपर एक्सप्रेस' असते. दिल्लीकडून मुंबईकडे 'सौ मील की रफ़्तार से' निघते. येथे अचानक जितेंद्र, नीतू सिंग येतात, इतरही बरेच जण चढतात गाडीत. मग ते आग लागणे, ब्रेक फेल होणे वगैरे होते (बर्निन्ग ट्रेन चे वर्णन लिहिताना आग लागली लिहायला spoiler alert द्यायची गरज नसावी :-) पण त्यातही मोठी आग ज्यामुळे लागते त्याचा डॅनीने केलेल्या 'घातपाता'शी काहीच संबंध नसतो) आणि आता सर्व हीरो लोकांपुढे २-३ प्रश्न निर्माण होतात्: १. आग कशी विझवायची २. इन्जीन मधील इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी कशी थांबवायची ३. हे सर्व करताना जास्तीत जास्त कॉम्प्लिकेटेड पद्धतीने कसे करायचे :-)

ब्रेक लावायला इंजिनाकडे जायचे असते. गाडीचे डबे आतून जोडलेले असले तरी यांना एकदम आहे त्या डब्यातून थेट टपावरच जावे लागते, ते सुद्धा इतक्या सहज की आपल्याला थांबलेल्या गाडीतून प्लॅटफॉर्म वर उतरायला जास्त कष्ट पडतील. मला वाटते या गाडीतून रीतसर उतरणार्‍यांपेक्षा वरती टपावर जाणारे, खिडक्यांच्या गजाला धरून इकडे तिकडे जाणारे आणि वेळोवेळी खाली फेकले गेलेले असेच जास्त असतील. विनोद खन्ना (हा कंट्रोल रूम मधे असतो आता तेथील चीफ इंजिनियर) ठरवतो की जर गाडीत कोणाकडे रेडिओ असेल तर त्यांना सांगू इंजिनाकडे जाऊन इमर्जंसी ब्रेक कसे लावायचे. येथे कहानी की मांग तयार केली जाते. रेडिओ वर प्रथम सांगितले जाते की कोणी ऐकत असाल तर एक लाल कपडा येणार्‍या कोणत्याही स्टेशन वर टाका. मग लाल कपड्याची शोधाशोध सुरू होते. एक नवी नवरी आपला 'शादी का जोडा' द्यायला तयार होत नाही तेव्हा एकदम आशा सचदेव कोठून तरी येऊन भराभर आपली साडी लोगोंको बचाने के लियी काढून देते. पण इतर काही लोकांचे लाल कपडे कोणालाच दिसत नाहीत. तसेच एवढ्या लोकांच्या सामानामधे सुद्धा लाल कपडा नसतो. बरं ठीक आहे साडी काढून दिल्यावर तिला कोणी खास फिल्मी स्टाईल ने आपला कोट वगैरेही देत नाही त्यामुळे ती शेवटपर्यंत तशीच राहते. काय अपरिहार्य गोष्ट होती ना? रेडिओ असेल तरी एकदम सर्व कसे सांगून टाकणार? पुन्हा प्रवाश्यांनी सुद्धा लाल म्हणजे लालच कपडा टाकायला हवा. उगाच निळा, पिवळा टाकला तर काहीतरी भलताच अर्थ निघायचा.

ही आग लागलेली असताना एक नवीन लग्न झालेले जोडपे आपल्या कुपे मधे गाढ झोपलेले असते. त्यातील त्या बायकोला कसला तरी वास येतो व धूर दिसतो म्हणून ती नवर्‍याला जागे करते आणि दार उघडून दोघे जमोरच्या ज्वाळा पाहतात. ती आग पाहूनही तिला पत्ता नसतो की हे काय आहे. मात्र नवर्‍याने ती 'आग' आहे सांगितल्यावर मात्र एक जोरात "बचाओ" ओरडून मग आता आपण दोघे एकत्र मरू वगैरे चालू करते. समोर जाळ दिसत असताना ती आग आहे हे नवर्‍याने सांगितल्यावरच तिचा विश्वास बसतो म्हणजे केवढे प्रेम असेल त्यांचे!

शेवटी अनेक आयडिया वापरून हे तीन हीरो आणि मुंबईत असलेला विनोद मेहरा यातून मार्ग काढतात. तरीही आपल्या डोक्यात प्रश्न येतच राहतात. एकतर ती गाडी मुंबई सेन्ट्रल ला धडकेल त्याच लाईन वर कशाला ठेवायला पाहिजे? जितेन्द्र इंजिनातून परत डब्यात जाताना मधेच एका रॉकेल वगैरेच्या वॅगन वर ("कृपया लूज शंटिंग न करे" वाली, ते लिहिलेले असते तेथे) कोठे चढतो आणि ती वॅगन एकदम चालत्या गाडीला इंजीन आणि डब्यांच्या मधे कोणी जोडली कारण ती इतर शॉट मधे कोठेच दिसत नाही, आणि लूज शंटिंग न करण्यासारखा ज्वालाग्राही पदार्थ या आगीत तसाच कसा राहिला? वगैरे वगैरे...

क्लायमॅक्स मधे मग एक रूळांचा चढ बनवून त्यावर गाडी पाठवायची आणि तेव्हाच कपलिंग उडवून डबे सोडवायचे असे ठरते. यापुढे मुख्य अभिनेत्यांच्या जागी स्टंटमेन वापरतात तसे खर्‍या गाडीच्या जागी मॉडेल ट्रेन्स वापरून शेवटचे शॉट घेतले आहेत. ते इंजीन तर एका टेम्पो ला डिझेल इंजिनाचा मेक अप लावून एका घरात घुसवले आहे आणि ते त्या एक मजली घरापेक्षाही लहान दाखवलेय. पुण्यातील पेशवे पार्कमधल्या फुलराणीचे इंजिन सुद्धा यापेक्षा जास्त अस्सल वाटेल.

आता काही चांगल्या गोष्टी... 'पल दो पल का साथ हमारा...' मस्त आहे आणि स्टेशनातून निघालेली गाडी जसा हळुहळू ठेका पकडत जाते तसा वेग पकडत ही कव्वाली चालू होते आणि मस्त रंगते. एखाद्या यमकावर १०-१२ वाक्ये झाली तरी चपखल शब्द साहिर लुधियानवीला नेहमी बरोबर सापडत असत (कभी कभी मधले 'तेरा फूलों जैसा रंग...' हे आणखी एक उदाहरण) त्यामुळे 'झूम जबतक धडकनो मे जान है...' ची लेव्हल कधीही सुटत नाही. नाहीतर 'गाडी मे कव्वाली जब शुरू हो जाती है तो एक दो तीन हो जाती है' वगैरे काहीतरी ऐकावे लागले असते :-)

धर्मेन्द्रची कॉमेडी. रेल्वे फंक्शन ला 'भाषण' सुरू झाल्यावर 'का बोअर करताय' चे भाव असले आणलेत चेहर्‍यावर, आणि मवाल्याचा आविर्भाव सुद्धा तसाच. विनोद खन्ना ला कॉमेडी जमत नसे हे ही दिसते.

यातील क्लायमॅक्स मधल्या मॉडेल्स ला हसलो पण तेव्हढ्यात 'जब वी मेट' पाहिला आणि त्यातील ते सुरुवातीचे मॉडेल ट्रेन्स चे शॉट त्यापेक्षाही हास्यास्पद वाटले. आत्ताची सर्व कॉम्प्यूटर ग्राफिक्स वगैरे सोय असून सुद्धा 'जब...' मधे त्यात ते गाडी हुकताना आणि परत पकडण्याचा प्रयत्न करताना रतलाम वगैरे च्या वेळचे शॉट विनोदी आहेत, रेल्वेचे आणि पांढर्‍या मोटारीचे मॉडेल वापरलेले. एकदा तर चक्क कोळशाचे इंजीन दिसते! ते पाहिल्यानंतर २५-२७ वर्षांपूर्वीचा असून 'द बर्निंग ट्रेन' स्पीलबर्ग च्या लेव्हल चा वाटेल.


Mukund
Thursday, December 27, 2007 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल LOL!मला आठवतो हा मुव्ही... सभ्य कपडे पाहुन मवाली असतानाचे कपडे बरे होते..मस्तच लिहीले आहेस..

अरे हा मुव्ही कॅसांड्रा एक्स्प्रेस(तोही तद्दन फाल्तु मुव्ही होता) ची भ्रष्ट नक्कल आहे. पण बहुतेक निर्मात्याने या मुव्हीत टॉवरींग इन्फ़र्नो व सिल्व्हर स्ट्रीक या दोन मुव्हींमधले बरेचसे सीन ढापले आहेत. त्यामुळे एक भलतेच (अचाट!) अमाल्गम तयार झाले आहे:-)

आणी एक... या मुव्हीत इफ़्तेकार आहे.. रेल्वेचा चेअरमन का असाच कोणीतरी वरच्या हुद्द्याचा माणुस. इफ़्तेकार बहुतेक मुव्ही साइन करताना निर्मात्याला म्हणत असेल... एक तर पुलीस कमीशनर, हाय कोर्टचा चीफ़ जज्ज किंवा कर्नल वगैरेचे काम असेल तरच मी मुव्ही साइन करीन.. कधी पाहीला आहे त्याला कमी हुद्द्याच्या रोलमधे?:-)

(बाय द वे सिल्व्हर स्ट्रीक हा मुव्ही जरुर पहा.. जीन वाइल्डरची कॉमेडी व त्यातला शेवटचा... ट्रेन शिकागो स्टेशनमधे क्रॅश होते तो सीन बघायला. जीन वाइल्डरचा द वुमन इन रेड हा मुव्हीही पहा.. सही कॉमेडी आहे...)


Dineshvs
Thursday, December 27, 2007 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारेंड हा सिनेमा कुणाच्या लक्षात असेल असे वाटलेही नव्हते. तो काळ मल्टीस्टारर्स चा होता, आणि यात सोळा मोठे स्टार्स होते. पायल नावाची नटिने यात पदार्पण केले होते.
आशा सचदेवचा, साडी सोडण्यापुर्वीचा डायलॉग आठवतोय का ? मेरा ना कभी सुहाग था न होगा वगैरे.
यातली शेवटची प्रार्थना, तेरी है जमी, तेरा आसमाँ पण छान होती, त्यात पद्मिनी कोल्हापुरेचा आवाज होता.

हेमा आणि परवीनचे, पहिले गाणे, मेरी नजर है तुझपे, हे बहुतेक आशानेच दोघींसाठी गायले आहे.
मजा वाटली हे सगळे वाचुन


Satishbv
Thursday, December 27, 2007 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्लायमक्सला निट पहा शिवसेनेच्या रुग्णवाहिका आलेल्या दाखवील्या आहेत. तेव्हढीच चित्रपटाच्या निमित्ताने भारत भर जाहिरात

Sanghamitra
Thursday, December 27, 2007 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धमाल लिहीलेय. मजा आली.:-)
>> प्रेक्षकांना सगळे नीट समजावून सांगावे लागते या समजुतीमुळे
अगदी अगदी. इनोदी लिवायची स्टाईल खासच आहे बाबा तुझी. लिहीत रहा.

Itgirl
Thursday, December 27, 2007 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. अमर प्रेम मधे बालकलाकार सारिका मोठी झाली की तिचा विनोद मेहरा होतो, तेव्हा सुद्धा आम्ही ओळखला होता...

... समोर जाळ दिसत असताना ती आग आहे हे नवर्‍याने सांगितल्यावरच तिचा विश्वास बसतो म्हणजे केवढे प्रेम असेल त्यांचे!.....

कसले मस्त लिहिले आहेस!!
आता कुठला सिनेमा फाडणार? लिही अजून :-)


Zakasrao
Thursday, January 03, 2008 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल
जबराच लिहिल आहेस.
पण तरिही त्या वेळच्या मानाने त्यानी बरेच चांगले स्पेशल इफ़ेक्ट दिले आहेत.
बाकी ते लाल रंगाच्या कपड्यांविषयीच पटल.
कव्वाली मस्तच.
मला वाटत की गुमनाम (CDBG) मध्ये ते विमान उतरवण्याचा सीन हा अत्यंत हास्यास्पद होता. स्पष्टच कळतय की खेळण्यातल विमान आहे. जंगल म्हणुन आजुबाजुला फ़ांद्या लावल्या आहेत अस. :-)
त्यामानाने हे बरेच चांगले.
मी ह्याची सुरवात चुकवली आहे.
आता तुझ परोक्षण वाचल परत एअक्दा बघेन म्हणजे अजुन एक्जॉय करता येइल ही फ़िल्म


Deepanjali
Thursday, January 03, 2008 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना , त्या लाल कपडा वाल्या सीन मधे पूर्ण साडी सोडण्या ऐवजी लोंबणार्या पदराचा एखादा तुकडा नाही का फ़ेकायचा !

Limbutimbu
Thursday, January 03, 2008 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> अमर प्रेम मधे बालकलाकार सारिका मोठी झाली की तिचा विनोद मेहरा होतो, तेव्हा सुद्धा आम्ही ओळखला होता
फाऽऽऽरएण्ड, धमाल लिहिल हेस रे भो! मजा आ गया! :-)

Amruta
Thursday, January 03, 2008 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबु, अगदी अगदी. फारएंड, मस्त लिहिलयस. :-)

Prajaktad
Thursday, January 03, 2008 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा प्रवाश्यांनी सुद्धा लाल म्हणजे लालच कपडा टाकायला हवा. उगाच निळा, पिवळा टाकला तर काहीतरी भलताच अर्थ निघायचा.>>
समोर जाळ दिसत असताना ती आग आहे हे नवर्‍याने सांगितल्यावरच तिचा विश्वास बसतो म्हणजे केवढे प्रेम असेल त्यांचे! >>Dineshvs
Friday, January 04, 2008 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशा सचदेवचे नाव, त्या सिनेमात रामकली, असते ना ?
आमच्या कॉलेज डे ला आली होती ती. तिने आमच्या कॉलेजमधल्या निवेदकाला एकदम मिठीच मारली.
त्यावेळी, तो भलताच गांगरला होता.


Farend
Saturday, January 05, 2008 - 12:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सर्वांना. दिनेश हो ते रामकली च आहे. आणि ते गाणे पद्मिनी कोल्हापुरे ने गायलेय माहीत नव्हते. ते ही गाणे चांगले आहे. आणि हो ते मेरी नज़र है तुझपे ला दोघींना ही आशाचाच आवाज आहे आणि एक शास्त्रीय व दुसरे वेस्टर्न स्टाईल वाटते.

Shendenaxatra
Saturday, January 05, 2008 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या सिनेमात त्या रामकली नावावरून एक हिंदू आणि एक मुस्लिम भांडत असतात की हिंदू आहे का मुस्लिम आणि ती थोर रामकली त्या प्रश्नाचे एकदाही नीट उत्तर देत नाही. शेवटी जळत्या ट्रेनच्या संकटात ते लोक आपले भांडण विसरून हिंदू मुस्लिम ऐक्य होते असे काहीसे दाखवले आहे असे वाटते. (कदाचित त्या बाईंनी आपले वस्त्रहरण केल्यामुळे ही जोडी अवाक् झाली असेल. असो.)

यादोंकी बारातचे शीर्षकगीत ज्यात छोटा आमिरखान गाताना दाखवला आहे त्याच्या श्रेयनामावलीत लता मंगेशकरबरोबर पद्मिनी आणि शिवांगी अशी नावे आहेत. बहुधा हीसुध्दा पद्मिनी कोल्हापुरेच.


Farend
Saturday, January 05, 2008 - 2:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग शिवांगी सुद्धा कोल्हापुरेच का? पद्मिनी कोल्हापुरेच्या त्या शक्ती कपूर बरोबर लग्न केलेल्या बहिणीचे नाव शिवांगीच ना?

Deepanjali
Saturday, January 05, 2008 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' पल दो पल का साथ हमारा ' कव्वाली सर्वात छान आहे गाण्यां मधे .
बाकी movie पण अचाट अतर्क्य असला तरी पहायला मजा येते अजुनही:-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७


 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators