Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पुण्यातील रिक्‍शावाला....

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » पुण्यातील रिक्‍शावाला.... « Previous Next »

Ajay_buwa
Tuesday, July 31, 2007 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुणे तेथे काय उणे, याबाबत कुणाचेही दुमत नसावे. पुणे ते पुणेच. तेथील सारे काही वेगळे.
रिक्षावाले सुद्धा....!
बाकी सर्व ठिकाणचे रिक्षावाले चालवताना किंचित तिरके (म्हणजे सुकाणुच्या उजव्याबाजूला अधिक झुकलेले) बसलेले असतात. तर पुण्यातले भाऊ सरळच.
गंतव्य ठिकाण सांगितले तर चेहऱ्यावरची रेषही न हलवता मिटरचा खटका खाली ओढतात.
आम्हालाही असाच एक भेटला. खाकी पॅन्ट. किंचित पिवळसर झालेला पांढरा शर्ट. उंची जेमतेम पाच फूट असेल. तब्येत मजबूत. खुरटी दाढी. वरचं जंगल मात्र "तम्मा तम्मा लोगे' गाण्यातील संजय दत्त सारखं. आधीच लांबुळकं तोंड. त्यात गुटख्याचा तोबऱ्यामुळे त्याचा झालेला हनुमान आणि डोक्‍यावर सदैव सैनिकासारखे ताठ उभे असलेले केस. काहीसा डायनासोरसारखा दिसणारा.

शनिवारवाडा- आम्ही म्हणालो.

मिटरचा खटका पडला अन्‌ डुर्रर्र.... (रिक्षा सुरू झाली.)

कुठं जायचं? पहिला प्रश्‍न आला.

भंगार घ्यायला येणारे जसा ठरवून आवाज काढतात तसा घोगरा आवाज आला पाठोपाठ गुटख्याचा वास असलेले काही थेंबही तोंडावर आले. आधीच सांगितलेले ठिकाण पुन्हा सांगितले.

पुन्हा डुर्रर्र....

"तुमच्या मायला. पुन्हा सांगा की राव!''
(यातील पहिले संबोधन समोरून येणाऱ्या वाहनाला उद्देशून बोलला, हे नंतर कळालं.)

पुन्हा डुर्रर्र....

आणि अचानक आमचं धड एका झटक्‍यात बाजूला झुकलं. तर डोके प्लास्टिक आच्छादनाखाली लपलेल्या सळईवर धडकताना राहिले. गल्लीच्या वळणावर (पुण्यात सगळ्या गल्ल्याच की राव!) समस्त दुचाकीस्वारांना आपले सारथ्य कौशल्य दाखवत कट मारताना तो धक्का बसला होता.
आम्ही त्याच्या पाठीमागच्या कुशनला धरून मधोमध बसलो. अगदी डायनासोरच्या तुऱ्याच्या रेषेत.

"लय गाड्या झाल्या बघा पुण्यात'', गर्दीतून कट मारत गाडी पुढे काढताना तो म्हणाला.

हंम्म... (आम्ही)

"निस्ता रंग देतात. चकाचक करतात आणि सोडून देतात रस्त्यावर. कुत्र्याच्या पिलासारखं. लोकं बी येडेच. पुण्यात धड चालायला जागा नाही. हे गाड्यांवर उंडरताहेत. मी म्हणतो या गाड्यांवर बंदी आणली पाहिजे.''

" या बाहेरच्या लोकांनी पुण्यात येऊन सगळी घाण केली आहे. हाकलायला पाहिजे साल्यांना.''- सारथ्य आसनावरून हा संतप्त सूर उमटला. पाठोपाठ " साहेब, तुम्ही कुठले?''- हा त्याचा चाचपणी करणारा प्रश्‍नही आला. आम्ही धर्मसंकटात.

त्याच्या घोगऱ्या आवाजात थोडं मार्दव आलं असलं तरी त्याच्यातील भूमिपुत्र जागृत झालेला असल्याने आणि मुखातील गुटखारसाच्या पुनःफवारणीच्या भीतीने उत्तर काय द्यावं, याचा आम्हाला प्रश्‍न पडला होता. केवळ आधी सारखं हंम्म करून भागणार नव्हतं.

मनात जुळवाजुळव चालली असताना सिग्नलवर शेजारी कार आली. आतमध्ये स्लिव्हलेस टॉप आणि मिनीस्कर्टवाली सुंदर कन्या व शेजारी गळ्यात हात टाकून बसलेला तरूण होता. या जोडीने मला रिक्षावाल्याच्या प्रश्‍नापासून सोडवलं.

"बघा, बघा कसे निर्लज्जासारखे बसले आहेत.'' तो म्हणाला, " म्हणून म्हणतो. या गाड्यांवर बंदी आणायला पाहिजे. आमचा धंदाही बुडतो आहे. हे आयटीफायटीवाले आले आणि घाण झालीये. बघा कसे चिकटून बसलेत'' आत्ता कळालं. याला कारवर बंदी हवी होती ते.

"जाऊ द्या हो, भाऊ-बहीण असतील''- उगाच काय तरी बोलायचं म्हणून आम्ही बोललो. अन्‌ तेच चुकलं.

ते ऐकून तो फिस्सकन्‌ हसला, पण त्याच्या मुखतुषारांनी भस्सकन आसमंतात उडून आमचेही चुंबन घेतले. मनात म्हटलं, झक मारली आणि मुंबई पाहिली. रुमालाने तोंड पुसून काढलं.

"काय राव मजाक करतात. आसं भाऊ-बहिण चिकटून बसतांत का?''- तो

"नसतीलही. आपल्याला काय करायचंय.'' - आम्ही.

या बोलण्यावर त्याने शेजारच्या गोल आरशातून आमच्याकडे "यडपटच दिसतंय' असा कटाक्ष टाकत, हॅंडलचा कान पिळला

.डुर्रर्र....डुर्रर्र.... (रिक्षेचा वेग वाढला.)

दोन-तीन मिनीटे झाली. इकडे आमचा सारथी शांत झाला होता. तो काहीही बोलला नाही. आम्हाला त्याच्यातला भूमिपुत्र पुन्हा जागृत होतो की काय अशी भीती वाटली. खरी भीती ती गुटख्याच्या थेंबांची.

झालं. तो पुन्हा बोललाच. "राव, त्यांच्याशी आपल्याला काय लेवा-देवा नाही. पण असं काही दिसलं ना की लोकांचा हा भ्रष्टाचार जगाला लवकरच संपवणार बघा.''

गुटख्याचे थेंब उडवत त्याच्या बोलण्यातून इंटेलेक्‍चुअलपणा डोकावला.

"लोकं कसही वागायला लागले आहेत.'' तो बोलू लागला, ""पोरी कशा कपडे घालून फिरतात, कोण कसा नशापाणी करतो याचा धरबंधच राहिला नाही. अहो, मागे सिंहगडाच्या पायथ्याशी तर नशा करताना बऱ्याच पोरापोरींना पकडलं. येडे असते तर कोणी विचारलही नसतं. (त्याला बहुदा अशिक्षित म्हणायचे असावे) पण, सापडलेले सगळे इंग्रजीवाले. त्यात पोरी बी मोठ्या घरच्या होत्या.''

"म्हणून काय आख्खं पुणे बिघडलं का'', चेहऱ्यावर येणारे तुषार चुकवत मी बोललो.

"घ्या, अहो बऱ्याच चौकांमध्ये नशेचं सामान मिळतं आहे. कमी वयात जास्त पैसा बिघडवतो. या पोरांना जास्त बिघडवतो. माझी पोरगी आजच म्हणाली की कॉलेजला जाण्यासाठी गाडी घेऊन द्या. एवढी चैन दिली तर बिघडणार नाही का ही पिढी. पुण्यात तर बऱ्याच चौकांमध्ये तुम्हाला ड्रग्ज विकणारे सापडतील. असंच सुरू राहिलं नाही तर जग संपणार नाही का?''

पच्च्‌ पच्च्‌ (रिक्षाबाहेर तोंड काढून तो थुंकला)

"म्हणूनच लादेन उठला आहे. आपल्या जीवावर.'' त्याचं बोलणं पूर्ण झालं नव्हतं. अचानक हा लादेन मध्येच कसा आला याचा आम्हाला प्रश्‍न पडला. त्यावर काही विचार करण्याआधीच त्याचं पुढचं वाक्‍य कानावर आदळलं. ""आधी त्याने (लादेन) मुंबईत स्फोट केले. मुंबईत जास्त भ्रष्टाचार आहे. आता पुण्याचा नंबर लागणार. बघा. लवकरच, जास्त नाही. दोनच वर्षात सगळं नष्ट होईल.''
त्याने छातीठोक दावा केला.

शनिवारवाडा आलाच होता. मीटरवरचा आकडा पाहून 20 रुपये सांगितले. पैसे घेतानाही. त्याने मला दोन बोट उंचावून दाखवली. म्हणाला, ""फक्त दोनच वर्ष. बघालंच तुम्ही.''

त्याच्या डोक्‍यात लादेन अफगाणिस्तानातल्या गुहांप्रमाणेच घर करून बसला होता. खाली उतरून बघतो तर आमच्या शर्टचा इंच न्‌ इंच त्याच्या गुटख्याच्या मुखरसाच्या तुषारांनी काबीज केला होता. अगदी, अमेरिकेने लादेनला मारण्यासाठी अफगाणिस्तानात केलेल्या कार्पेट बॉंबिंगप्रमाणे.

दोन दिवसांनी मुंबईत पोहोचलो. बायकोने शर्टवरची गुटख्याची नक्षी पाहिली. आन्‌ रिक्षावाल्याने सांगितलेल्या लादेनने "अवघ्या दोनच दिवसांत' माझ्या घरातील शांतता नष्ट केली.

Aktta
Tuesday, July 31, 2007 - 5:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय मस्स्त लिहील आहेस......
पन फ़क्त पुण्यातील रिक्‍शावाला.... का
बाकि नाहि चालनार का?????
एकटा....


Pancha
Tuesday, July 31, 2007 - 10:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा, खुपच छान लिहिले आहे

Farend
Wednesday, August 01, 2007 - 12:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ajay LOL खरेच कोणीतरी अस्सल भेटलेला दिसतोय. गुटखा सोडून, कारण तो सर्वत्र आहे. ५-६ वर्षांपूर्वी मुंबईत कोणत्याही प्लॅटफॉर्म वर रूळाजवळ उभे राहणे अशक्य झाले होते कारण दर दोन मिनिटांनी कोणत्यातरी बाजूने पुचूक पुचूक आवाज येत आणि येणार्‍या गाडीच्या मार्गावर फुले उधळावी तश्या पिचकार्‍या पडायच्या :-) आता बंदी आली आहे म्हणे.

Rutu_hirwaa
Wednesday, August 01, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दर दोन मिनिटांनी कोणत्यातरी बाजूने पुचूक पुचूक आवाज येत

फ़ारेन्ड :-):-)


Rutu_hirwaa
Wednesday, August 01, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय
फ़ार म्हंजे फ़ारच हसायला आलं..
मेल मधून पाठवलं तर चालेल का??



Ajay_buwa
Wednesday, August 01, 2007 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो,
प्रतिक्रियांबद्दल मनःपुर्वक धन्यवाद.
मला भेटलेला हा प्रातिनिधिक रिक्षावाला. असली इतरही पात्रं आहेत. अनेक. येतील हळुहळु तुम्हाला भेटायला. तुमचं खळाळून हसणं आम्हाला मेलने पाठवता नाही आलं तरी चालेल. तुम्ही मनाशीच खुद्‌कन हसलात तरी आम्हाला पावेल.
पुन्हा एकदा धन्यवाद.

Ana_meera
Wednesday, August 01, 2007 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लादेन आणि पुण्यातील रिक्‍शावाला....
अलि शनि, २१/०७/२००७ - १३:३१. » प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा. कथा | प्रकटन | विनोद | अनुभव

हा मनोगत वर आधीच आलाय लेख. तुमचाच ना? अजय बुवा ऊर्फ़ अली?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators