Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
माणिकगड

Hitguj » My Experience » भटकंती » माझे दुर्गभ्रमण » माणिकगड « Previous Next »

Gs1
Wednesday, March 14, 2007 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिकगड

.. .. ..

Gs1
Wednesday, March 14, 2007 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सह्याद्री हे असे एक व्यसन आहे की कोणी एकदा डोंगरात जाउन आले की पुढच्या शनिवारी पुन्हा जायचे वेध लागतात. शनिवार, १० मार्च सात वाजता सात शिलेदार जमलो होतो माणिकगड आणि सांकशी हे दोन दुर्ग सर करायला. मनोज, कीर्ती, आरती, कूल, केशव तर होतेच पण बऱ्याच दिवसांनी धुमकेतू पण होता.

आधी सांकशीच्या पायथ्याच्या गावाला जायचे तिथे रात्री राहून, सकाळी सांकशी करून मग वडगावला यायचे आणि माणिकगड चढायचा असे ठरवले होते. पण सांकशीच्या पायथ्याला एक दर्गा असून मुस्लिम बांधवांचे प्राबल्य असलेली वस्ती असल्याने तिकडे मुक्काम करणे सुरक्षित नाही असे इतर दुर्गयात्रींकडुन कळले आणि बेत बदलला. पुणे, लोणावळा, खोपोली, चौक मार्गे वडगाव नावाचे एक छोटेसे गाव शोधत दहाच्या सुमारास पोहोचलो. एरवी दहाच्या सुमारास सर्व गावे झोपेत गुडुप झालेली असतात, पण रविवारी जिल्हा परिषद निवडणुका असल्याने वस्ती वस्तीत जाग होती, आणि बाहेरून आलेल्या गाडीकडे जरा संशयानेच बघितले जात होते.

वडगावला दोन एस्टी बस उभ्या होत्या, एक खोपोलीहून आणि दुसरी पनवेलहून मुक्कामी येते असे कळले. गावात पोहोचताच गावच्या पोलिस पाटलांनी आमची चौकशी केली, आणि गडावर जायला आलोय याची खातृ पटताच सर्व सहकार्य देउ केले, आम्ही देवळात झोपायचा विचार करत होतो, पण त्यांनी एका बैठ्या घराची ऐसपैस गच्ची देउ केली, लगोलग घरमालक गनेश पोफाटेने थंड पाण्याची कळशी भरून आणून दिली. आमच्या बरोबर बरोबर बायामाणसे आहेत हे कळल्यावर तर त्यांनी उघड्यावर झोपू नका, आमच्या घरात झोपा असाच आग्रह धरला. पण त्यांना अजून त्रास देणे काही बरोबर वाटले नाही.

गच्चीत अंगतपंगत आटोपली, समोर एक डोंगराची सोंड दिसत होती. फारशी उंच वाटत नव्ह्ती, तेंव्हा बारा एक वाजेपर्यंत माणिकगड करून मग सांकशीला जावे असा विचार केला, पण माणिकगडाला जायला तीन तास लागतील असे गणेशचे म्हणणे पडले, समोरचा डोंगर पाहून तर काही तसे वाटत नव्हते. गच्चीतच पथाऱ्या पसरल्या. रसायनीच्या जवळ असल्याने निसर्गाच्या कुशीत येऊनही हवा काही तेवढी प्रसन्न वाटत नव्हती. पहाटे पहाटे मात्र चांगलीच थंडी होती आणि त्यात असंख्य कोंबड्यांनी चार वाजल्यापासूनच आरवून आरवून जीव नकोसा करून टाकला.

गणेशने गरम गरम चहा देताच चहाबाज मंडळी खुष झाली, आणि लवकर आटपा असे एकमेकांना म्हणत शेवटी निघायला साडेसात वाजले. माणिकगड समोरच्या सोंडेवर नसून त्याच्या मागच्या डोंगरावर आहे आणि बऱ्यापैकी उंच आहे हे लक्षात आले होते. सकाळची वेळ असल्याने वाटाड्या नको असे ठरवून चढाई सुरू केली. आमच्या पाठीवर माथेरानचे मोठे आडवे पठार त्याच्या बरोबर समोर तेवढेच मोठे आणि सुंदर असे प्रबळगडाचे पठार, इर्शाळगडाचा सुळका असे सारे दिसत होते. पहिली सोंड चढुन, डोंगरवाडी ओलांडुन एका मोकळ्या पठारावर आलो आणि पलिकडे एका सुरेख जलाशयाचे आणि अंगठा वर केलेल्या कर्नाळा किल्ल्याचे दर्शन घडले. आता माणीकगडाचा कातळमाथाही समोरच होता. पण आमची वाट वर चढण्याऐवजी उजवीकडच्या दाट जंगलात घुसून गडाला वळसा घालू लागली. बराच वेळ झाला तरी वाट पुढे पुढेच जात राहिली, त्यात केशव आणि धुमकेतू पुढे कुठेतरी गायब झाले. असेच अजून एक सव्वा तास पुढे चालत गेलो आणि आम्ही जवळ जवळ ३२० अंशाचा वळसा घालून झाला गडाला, जिकडुन आलो ते गावही पुन्हा दिसू लागले आणि अखेर वाट वर चढू लागली. एका तटाखाली येउन थांबलो आणि मग वरुन धुमकेतू डोकावला

थोडा कातळ चढुन भग्न प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेशलो तेंव्हा साडेतीन तासाहून अधिक पायपीट झाली होती. थोडीशी तटबंदी, आणि पाण्याची चार टाकी एवढेच शिल्लक आहे गडावर. जवळजवळ सर्वच किल्ल्यांचा १८१८ मध्ये ते जिंकल्यावरही प्रचंड विध्वंस केला आहे इंग्रजांनी, स्वातंत्र्यानंतर भोरसारख्या संस्थानांनी किमान काही गडांची तरी चांगली व्यवस्था ठेवली होती, पण एकदा पुरातत्व खात्याच्या ताब्यात कारभार गेल्यावर जे होते त्याचेही नव्हते होण्याची क्रिया सुरू झाली आहे. २००० वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले जीवधन नाणेघाट असो वा अदभूत असा हरिश्चंद्रगड असो किंवा राजांचा राजगड असो, या सगळ्यांची किंमत यांच्या लेखी एकच ' क' दर्जाची संरक्षित वास्तू. म्हणजे काय तर आम्ही काही करणार नाही आणि इतर कुणीही हात लावायचा नाही. साधा रायगडावर सध्याचा पुतळा बसवायला लढा द्यायला लागला होता गोनिदा, बाबासाहेब पुरंदरे वगैरे मंडळींना. जाज्वल्य पराक्रमाची साक्ष असलेल्या या साडेतीनशे किल्ल्यांसाठी मिळून जेवढे बजेट आहे त्याहून अधिक बजेट एकट्या बिबी का मकबरासाठी आहे.

गडाच्या एका टोकावरच्या एका झाडाखाली चूल मांडली होती, आणि पाणी उकळू लागले होते, ते पाहून पोटातल्या भुकेची जाणीव झाली. थोड्याच वेळात भरपेट उपमा आणि लिंबू सरबत असा बेत पार पडला. आमच्या ट्रेकमध्ये स्त्रीवर्ग स्वयंपाकपाण्याला हात सुद्धा लावत नाही. पण आम्हालाही कधी नव्हे ते असे सगळे करायला आणि स्वतःलाच वा मस्त झाले आहे असे म्हणत खायलाही फार मजा येते. चार टाक्यापैकी एका टाक्यात एकदम काळे पाणी दिसते. वरचा थर बाजुला केला की एकदम नितळ, थंडगार पाणी. या वेळेला त्या टाक्याच्या बाजूलाच लिंबाची झाडे लावण्याचा प्रयत्न केला. बघू जगतात का. जवळच छोटी शिवपिंड आहे वर अभिषेकासाठी कलशही आहे. जवळ जवळ सहा फूट विंगस्पॅन असलेल्या एका पक्ष्यानेही घिरट्या घालत दर्शन दिले. घार असावी असे वाटले.

वरून आसमंत न्याहाळतांना परतीचा शॉर्टकट शोधण्याचाही प्रयत्न चालू होता, पुन्हा एवढा मोठा वळसा घालायचा नव्हता. थोडे खाली उतरलो आणि एका कोरड्या ओढ्यातून उतरण्याचा प्रयत्न करू लागलो, वाट थोडी अवघड आहे आणि पुढे एक घसाऱ्यामुळे थोडा अवघड झालेला ट्रॅव्हर्स केला की एकदम आम्हाला पहिल्यांदा लागलेल्या पठाराच्या वर येउन पोहोचलो. पुन्हा एकदा लांबलचक वाट चालू लागलो. उन्हाचा तडाखा होताच, त्याट एकदा वाट चुकण्याचे वगैरे नेहेमीचे सोपस्कार करत चारच्या सुमारास वडगावात पोहोचलो.

गणेशने पुन्हा हसतमुखाने स्वागत केले, भराभर हात पाय धुवायला, प्यायला पाणी आणून दिले. ताजेतवाने होउन आम्ही निघायची तयारी करू लागलो. या प्रेमळ पाहूणचाराचे मोल कसे ठरवणार ? पण तसेच मोफत घेणेही योग्य वाटत नव्हते, इतर ठिकाणी थोडा आग्रह केला की घेतात पण खूप आग्रह करूनही गणेशने काही पैसे घेतले नाहीत. मग त्याला अजून नाराज करवेना. मग त्याच्या आजींना काही नाममात्र पैसे दिले.

तिकडेच ओट्यावर बसलो होतो तर एक अजून आजी समोर येउन पैसे मागू लागल्या. मला तर कळेनाच की आत्ता हा नाही म्हणत होता आणि या कसले पैसे मागतात. मी म्हटले किती देउ, त्या म्हणाल्या अहो दिले की मत, शंभर रुपये द्या. गणेशने लगेच मध्ये येउन ते पैसे पुढे मिळत आहेत तिकडे त्यांना पाठवले. आणि ओशाळवाण हसत सध्या दरडोई शंभर रुपये मिळत आहेत मत द्यायचे असे सांगितले. आपण ऐकत वाचत असतो, पण इतके उघड आणि सर्रास बघून आम्ही थक्कच झालो.

माणिकगडानेच सगळा वेळ घेतल्याने सांकशी होणार नव्हता. मग तसेच सरळ पुण्याकडे वळलो, वाटेत खुणावत रहाणारा माणिकगड सोपा वाटला तरी किती फसवा आहे हे नीटच कळले होते..

आता चोवीस पंचवीसला कुठेतरी जायचे आहे, आणि एकदा हरिश्चंद्रावर निवांत रहायला जायचे आहे आणि उन्हाळा आहे तोवर कोयनेच्या घनदाट जंगलातले महिमंडणगड, चकदेव करायचे आहेत आणि मे मध्ये आंबे खात कोकणातले सागरदुर्ग करायचे आहेत, परतीला गप्पा रंगत गेल्या आणि यादीही वाढत गेली...


Dineshvs
Wednesday, March 14, 2007 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोकणातले गड करायला घेतलेय, कि मुक्कामाला या रे माझ्याकडे.
म्हणजे अनुभव पहिल्यांदा ऐकायचे भाग्य मिळेल मला.


Dhumketu
Thursday, March 15, 2007 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाव बदलायला पाहिजे... आजकाल धुमकेतु म्हणूनच ओळख करुन देतात :-(


Surendraharkal
Thursday, March 15, 2007 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"Harischandravar nivaant rahayala jaayache aahe" jamal tar me pan yeto..pudhachya mahinyaat...

Sakhi_d
Thursday, March 15, 2007 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरिशचन्द्र ठरला तर मलाही सांगा

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators