Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कमळगड

Hitguj » My Experience » भटकंती » माझे दुर्गभ्रमण » कमळगड « Previous Next »

Gs1
Monday, July 31, 2006 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात रायरेश्वरावरून पहिल्यांदा सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला कमळगड आणि त्याला खेटून उभे असलेले वर्‍हाडाचे सुळके पाहिले तेंव्हापासून तिथे जायचे मनात होते.

नंतरही पांडवगडाला गेलो तेंव्हा आणि मग मकरंदगडाला जातांना पाचगणीचा पसरणी घाट चढतांना उजव्या हाताला सतत दिसणारा कमळगड खुणावत राहिला.

सह्यधारेचा महाबळेश्वरजवळील भाग हा मोठमोठ्या डोंगरांनी दाटीवाटी करून व्यापला आहे. त्यातच उत्तरेला वळसा घालणारी वाळकी, तर दक्षिणेकडुन वेढा घालणारी कृष्णा आणि पूर्व पायथ्याशी या दोघींच्या संगमातून आणि धोम धरणाच्या फुगवट्यामुळे निर्माण झालेला मोठा जलाशय अशा या पाण्यातूनच उगवला आहे अशा कमळगडाला जायला आम्ही नेमका मुहूर्त शोधला तोही या दोन्ही नद्यांना महापूर आला असतांनाचा. शनिवारी रात्री बातम्यांमध्ये वाईत पाणी घुसलेले दाखवत होते ते बघून बेत बदलावा असे वाटू लागले होते.

पण दिनेश गोव्याहून वाईला यायला निघाले होते, संपर्क होत नव्हता. त्यामुळे वाईत फारच पाणी असेल तर कुठल्या पर्यायी गडांवर जाता येईल याचा विचार करून ठेवला आणि रविवारी ३० जुलैला सकाळी आरती, शीतल, कूल, गिरी आणि मी असे पाच जण स्वारगेटहून एक सुमो घेऊन निघालो. कात्रज उतरायच्या आतच भूक भूक सुरू झाल्याने खेड शिवापूरला न्याहारीसाठी थांबलो. तिथेच सर्वांचे वजन करण्याचा उपक्रम पार पाडता असे लक्षात आले की नियमित ट्रेक करणार्‍यांच्या वजनात भरघोस वाढ झाली आहे. ( यावरून उपाशी चालवण्याच्या वगैरे तक्रारी असत्य आहेत हे लक्षात आले. )

भराधाव जात शिरवळ, खंबाटकी मार्गे वाई गाठले. दिनेश पहाटेच वाईला पोहोचून, ताजेतवाने होऊन वाईतील पूरपरिस्थितीची पहाणी करून आले होते. त्यांना बसवून घेतले आणि लगेच पुढे प्रस्थान केले. गावात आलेले पाणी ओसरले होते पण एक पूल अजुनही पाण्याखालीच होता. वाईवरून एक रस्ता मेणवलीमार्गे धोम धरणाकडे जातो, त्या रस्त्याने धोमला पोहोचलो आणि जलाशय डाव्या हाताला ठेवत एका रम्य रस्त्याने पुढचा प्रवास सुरू झाला. पाणी एवढ्या वेगाने येत होते की लाटांचा समुद्रासारखा खळखळाट ऐकू येत होता. खावली गावानंतर डावीकडे वासोळे या गावाला जाण्यासाठी वळलो आणि वाईहून निघाल्यापासून सव्वा ते दीड तासात वासोळे गावी पोहोचलो. साडेनऊची एक एस्टीही आहे वाई ते वासोळे अशी.

गावात उतरले की समोरच कमळगडाच्या दोन वैशिष्ट्यांपैकी एक दिसू लागते. एका आडव्या पठारावर वेगवेगळ्या आकाराचे अनेक छोटे सुळके रांगेने उभे राहिलेले दिसतात, हेच ते वर्‍हाडाचे सुळके. गावातून तुकाराम नावाचा एक वाटाड्या घेतला आणि पावणेअकराच्या सुमारास चढाई सुरू केली. पुढचा रस्ता एका ओढ्याने बंद केला होता, आम्ही पायवाटेने वर चढत भातशेतीच्या कडेने तुपेवाडी नावाची वस्ती गाठली. दोन्ही गावातील जो भेटेल त्याने वर जायला विरोध केला, पाउस धुके, ढग तर खूपच होते पण ओढे फार फुगले आहेत असे सर्वांचे मत होते. पण तुकारामचे, आमच्या वाटाड्याचे मात्र जाऊ असे म्हणणे होते. कमलगड ऐकले होते त्यापेक्षा उंच तर आहेच आणि भरपूर चढाई केल्याशिवाय मुख्य पहाडावर जायला सुरुवातही करता येत नाही. पाउस झेलत असंख्य ओढे कधी तुडवत तर कधी ओलांडत हळू हळू बर्‍यापैकी उंची गाठली.

जवळपास सगळा वेळ मी वाटाड्याबरोबरच होतो त्यामुळे थोड्याच वेळात आमच्या वाटाड्यालाही रस्ता नीट माहीत नाही हे लक्षात आले. सर्वांच्या विरोधाला न जुमानता आम्हाला उत्साहाने वर घेऊन येण्याचे कारण हे सुद्धा मजुरीची निकड हे होते असेही त्याने बोलण्याच्या ओघात सांगून टाकले. एकंदर विस्तारही खूप असल्याने वाट चुकण्यास एकदम योग्य परिस्थिती होती. पण अखेर मुख्य पहाडाला बिलगून असलेल्या या डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो. त्या थोड्या मोकळ्या पठारावर येताच समोरून येणारे महाबळेश्वरचे सुसाट वारे आम्हाला भिडले, जोरदार पाऊसही आला. पण थोड्याच वेळात दाट जंगल सुरू झाले आणि जरा आडोसा मिळाला. माथ्यावर दाट जंगल टिकून आहे अशा अगदी मोजक्या डोंगरांपैकी एक आहे कमळगडाचा डोंगर.

निघाल्यापासून अडीच तासांची पायपीट झाल्यावर अखेर गोरक्षनाथांचे मांदिर दिसले. ते दिसताच दिनेशनी स्वेच्छानिवृत्ती जाहिर केली. शीतलचीही तिचा पहिलाच ट्रेक अस्ल्याने दमछाक झाली होती, तीही थांबली. आम्ही पुन्हा जंगलातून पुढचा प्रवास करत कमळगडाच्या मोकळ्या हिरव्यागार पठारावर आलो, आता इतके धुके दाटले होते की गडमाथा कुठे आहे हेही कळत नवह्ते. या पठारावर धनगराचे एक घर आहे, आमच्या वाटाड्याला आता अजिबातच रस्ता सुधरेनासा झाल्याने त्याला वाट दाखवायला त्याने आजून एक शंकर नावाचा वाटाड्या त्या एकमेव घरातून मिळवला आणि पुन्हा एकदा एका दाट रानातल्या वाटेतून कमळगड चढुन गेलो. शेवटी एका अरुंद घळीतून वर चढुन जावे लागते आणि आपण गडावर दाखल होतो. गडाचा आकार अगदी छोटा आहे, आत आल्यावर समोरच गडाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणता येईल अशी गेरूची भुयारासारखी काव / खाण आहे. आत उतरायला खोल खोल पायर्‍या गेल्या आहेत, आणि तळाशी भर उन्हाळ्यातही थंडी वाजते असे कळले.

शंकरचे कुटुंब म्हशी पाळते, त्यांच्याकडे उन्हाळ्यात दही ताक वगैरे मिळू शकते. शिवाय गहूही पिकवतात खालच्या पठारावर.

परत फिरलो, देवळात पोहोचलो. एकंदर उशीर झाला असल्याने जेवणाचा बेत पुढे ढकलून खाली उतरू लागलो. मुसळधार पाउस सुरू झाला, त्यातच आमच्यातले तीन जण काही काळ हरवले, तुकारामला पुढच्या ओढ्यांची भीती वाटू लागली होती. पण फारसे अवघड काही करावे न लागता सव्वा पाचला वासोळे गावात पोहोचलो. वाटेत तुपेवाडिला वित्थलाचे मंदिर आहे, पावसाळा सोडुन इतर ऋतूंत रहाता येईल असे आहे. पण देउळ खूपच ओले असल्याने तिथेही जेवलो नाही, आणि मग वाईला गेल्यावरच पहावे असे ठरले.

वाईला दिनेशचा निरोप घेतला, खूप दगदग होते खरतर त्यांना पण निसर्गावरच्या आणि आमच्यावरच्याही प्रेमाने ते अधुन मधुन जमवतातच. अजून थोडी कळ काढण्याची सर्वांनी तयारी दाखवल्याने पुण्याकडे परत निघालो. गाडीत बसल्या बसल्या आरतीने आणलेला शिरा आणि मसालेभात एक मिनिटात संपला. वाटेत कैलासमधले गरमा गरम पिठले, कढी चाखून नऊला परत पोहोचलो.

एक अक्षरश: जलमय ट्रेक गाठीशी जमा झाला. बाकी अधिक वर्णन, फोटो दिनेशकडुन येईलच..



Dineshvs
Monday, July 31, 2006 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शीतल म्हणजे माझी भाची. नाहितर एव्हाना तिच्या नावाची शोधाशोध सुरु झाली असेल.
यावेळी फार फ़ोटो नाही काढता आले, आणि माझ्या पीसी वरुन अपलोडहि करता येत नाहीत.म्हणुन मंडळाकडे पाठवत आहे.
ज्या देवळात आम्ही थांबलो होतो, तिथे आम्ही धुनी वैगरे पेटवली. तिथे कुणीतरी रहात होते. भांडी, केरोसीन, काडेपेटी सगळे होते.
भारंगी, कळलावी सारखी मोजकी फुले सोडली तर फुले नव्हतीच.
वयाच्या मानाने प्रवासाची दगदग सोसत नाही, हे खरेय, पण मग हे सगळे जिवाभावाचे सवंगडी, असा एखादा शब्द उच्चारतात ना कि, नकार देणे जीवावर येते.


Moodi
Thursday, August 03, 2006 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे काय जी एस अजून फोटो आले नाहीत एवढ्या सुरस वर्णनानंतर? बरं इथे जायचय का?

http://www.loksatta.com/daily/20060803/viva03.htm

Gs1
Thursday, August 03, 2006 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


माझ्याकडे अजूनपर्यंत फक्त आमचेच फोटो आले आहेत. गडाचे नाही.

एकदम छान ठिकाण सुचवले आहेस. बघायला हवेच.


Girivihar
Saturday, August 05, 2006 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मजा आहे लेको तुमची, नाहीतर आम्ही फ़िरतोय रिजनल मीटीन्ग करत, कधी दिल्लि, कधी कोचि, तर कधी कोलकता......

Moodi
Friday, September 08, 2006 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो जी एस कुठे हरवलात? कामात पूर्ण गर्क दिसताय. इथे जाऊन या ना वेळ मिळेल तेव्हा. मी तर कुठेच जाऊ शकत नाही, तुम्ही जा ना माझ्या वतीने.

* मी जाईन तेव्हा हातात काठी असेल की काय देव जाणे. *

http://www.loksatta.com/lokprabha/20060915/paryatan.htm

Bee
Saturday, September 09, 2006 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोविंद, आता इथे न लिहिता, दिवाळी अंकासाठी काहीतरी लिही.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators