Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मधुमकरंदगड

Hitguj » My Experience » भटकंती » माझे दुर्गभ्रमण » मधुमकरंदगड « Previous Next »

Gs1
Thursday, May 25, 2006 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधुमकरंदगड

गिरीभ्रमणाची आवड असली तरी भर उन्हातली डोंगरयात्रा सहसा कोणाला आवडत नाही. त्यामुळे मग पहाटेचे छोटे वा रात्रीचे किंवा दाट जंगलातले गिरीभ्रमण ठरवणे उन्हाळ्यात आवश्यक ठरते. असाच एक दाट जंगलातला दुर्ग म्हणजे मधु मकरंदगड.

महाबळेश्वर परिसरात सह्याद्रीच्या मुख्य रांगेभोवती अनेक उंच रांगांची दाटी झाली आहे. त्यातच दक्षिणेला कोयनानगर येथे अडवलेले कोयनेचे पाणी पार पासष्ट किमी मागे, म्हणजे महाबळेश्वराच्या पायथ्याच्या तापोळ्यापर्यंत दक्षिणोत्तर पसरले आहे. हा प्रचंड जलाशय आणि त्याच्या पश्चिमेकडची सह्याद्रीची भिंत यामधला प्रदेश हा आपोआपच दुर्गम आणि घनदाट जंगलाचा झाला आहे. याच्या दक्षिण टोकाला कोयनानगरच्या पलिकडे भैरवगड (सारंगगड) आहे आणि मग जंगली जयगड, वासोटा, पर्वत, महिमंडणगड अशी एक से बढकर एक किल्ल्यांची रांग उत्तरेला महाबळेश्वराच्या पश्चिमेला असणाऱ्या मकरंदगडापर्यंत येते.

शनिवार २० मे, दुपारी दोन वाजता कूल, सौमित्र आणि मी असे तिघे निघायचे ठरले होते. पण हळू हळू एक एक जण येत गेला आणि शेवटी संध्याकाळी पाच वाजता गिरी, मिहिर आणि हृषीसह आम्ही सहा जण पुण्याहून निघालो. मागच्याच रविवारच्या लाल डब्याच्या प्रवासाच्या यातना अजून ताज्या होत्या, त्यामुळे गाडी घेउन निघालो.

पुणे सातारा रस्त्याने खंबाटकी ओलांडुन मग वाईकडे वळलो आणि सूर्यास्त होता होता पसरणी घाट चढुन पाचगणीत दाखलही झालो. वाटेत नुकताच सर केलेला पांडवगड ओळख दाखवत होता, तर खालच्या धोमच्या जलाशयतून वर आलेला कमळगडही त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सुळक्यांनी लक्ष वेधत लवकरच यायचे आंमंत्रण देत होता. पाचगणीला पोटपूजा करून महाबळेश्वर गाठले आणि तसेच पुढे अंबेनळी घाटाने पोलादपूरला उतरू लागलो. आता जरा गंमत होती, यावेळेला फारसा गृहपाठ करून आलो नव्हतो. या घाटातूनच एक रस्ता चतुर्बेट येथे जातो तिथुन घोणसपूरला जाता येते, तिथल्या देवळात रहाता येते आणि मग वर किल्ल्यावर चढता येते किंवा हातलोटवरूनही एक रस्ता आहे एवढीच जुजबी माहिती होती. दोन तीन ठिकाणी चौकशी करून साधारण १८ किमीवर गोल्ड स्पॉट धाब्याच्या अलिकडच्या पार या गावाला जाणाऱ्या डावीकडच्या फाट्याला वळलो, मग पारची वाट सोडुन डावीकडे वळलो. हा सगळाच रस्ता घनदाट जंगलाचा, रात्रीचे नऊच वाजले असावेत पण वाटेवर एकही वाहन नाही, मध्ये बरेच फाटे लागतात, कुठे वळावे ते कळत नाही.

त्यात चतुर्बेटला जायचे की हातलोटला ते ठरत नव्हते. आणि शेवटी ज्या घोणसपूरला जायचे होते तिकडे गाडी जात नाही, दहा किमीची जंगलातून जाणारी पायवाट आहे, रात्री जाता येणार नाही एवढेच कळले होते. तेवढ्यात एक समोरून येणारी मोटारसायकल थांबवली. चालकाने आमची चौकशी केली, सुदैवाने तो त्या भागातला ग्रामसेवकच निघाला. शेळके त्यांचे नाव. त्यांनी पुढच्या रस्त्याची माहिती दिली एवढेच नव्हे तर चतुर्बेट ग्रामपंचायतीच्या शिपायाकडे रहायची व्यवस्था होईल हेही सांगितले. गावात गेल्यावर सकपाळांचे घर शोधले, त्यांनी अगत्याने जेवणाची वगैरे विचारपूस केली, आता पुढचा प्रवास सकाळीच करता येईल म्हणून सांगितले. मग त्यांच्याच अंगणात आम्ही पथाऱ्या पसरल्या.

पहाटे उठुन गडाची वाट धरली. सकपाळनाही पोलिओची लस घेउन वर घोणसपूरला जायचे होते. चतूर्बेट गाव मकरंदगडाच्या समोरच्या बाजूला आहे, आम्हाला मकरंदगड उजव्या हाताला ठेवून बरेच डोंगर पार करून गडाच्या पहाडाकडे जायचे होते असे लक्षात आले. पहाडाला मधु आणि मकरंद अशी दोन शिखरे आहेत आणि फक्त मकरंदलाच जाता येते अशी कूलने माहिती पुरवली.

थोड्याच वेळात चांगलेच दाट जंगल लागले. वाटेत जांभळाची भरपूर झाडे आणि त्यांचे सहज हाताला लागतील असे घोसच्या घोस. ती तुरट आंबट गोड जांभळे तोंडात टाकत प्रवास चालू होता तेंव्हा त्यातले नेमके एक अत्यंत गोड जांभळे लागलेले झाड सापडले, हाताशी लागलेली जांभळे खाऊन समाधान झाले नाही. मग काय तिकडे एक छोटा मुक्कामच केला. गिरी, मिहिर त्या दरीतून वर आलेल्या झाडावर चढले आणि थोड्याच वेळात झाड रिकामे !! ओंजळ भरभरून ती गोड जांभळे खाल्ली, आणि जांभळ्या जिभांचे फोटो काढुन पुढे निघालो. श्री. सकपाळ त्यापूर्वीच आम्हाला सोडुन पुढे निघुन गेले होते.

एकंदर तीन तासांच्या रमत गमत केलेल्या पायपिटीनंतर घोणसपूर गावात पोहोचलो, तिथे न थांबता तसेच वर देवळात गेलो. हे देउळ म्हणजे मुक्कामास अत्यंत सुरेख जागा, पण पाणी अजिबात नाही. देवळाबाहेरच जेवलो आणि पुढे पुन्हा चढायला सुरूवात केली. माथ्यानिकट पोहोचल्यावर एक वाट वर जाते तर एक उजवीकडे वळसा घालू पहाते. त्या उजवीकडच्या वाटेने जात एका गुहेपाशी पोहोचलो, गुहेत पाणी होते, पण पिण्यासारखे नसावे. या गुहेचा शेवट सापडत नाही अशी एक आख्यायिका ऐकली होती. गुहेपासूनच एक वाट उभी वर जाते, मध्ये धोकादायक घसारा आहे आणि पाठीवर दरी, एक एक पाउल जपून ठेवत वर चढलो. मला सौमित्रचीच थोडी भिती वाटत होती. तो सर्वात पुढे आणि त्याला मागे अगदी बिलगून हाताचा कोट करूनच मिहिर होता. वर पोहोचलो तेंव्हा त्याच्या आणि आमच्याही जीवात जीव आला. वयाच्या मानाने त्याने खूपच मोठा पल्लाही गाठला व साहसही दाखवले. माथा अगदी छोटा आहे. एक छोटेसे देउळ, एक स्तंभ एवढेच. चौफेर सह्यकड्यांचे आणि दऱ्याखोऱ्यांचे राज्य मात्र सुरेख दिसते. महाबळेश्वर, प्रतापगड, पश्चिमेला महिपत, सुमार, रसाळ सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेला किल्ला आहे हा मकरंदगड.

आमचे वेळापत्रक चांगलेच कोलमडले होते, पण आता सुसाट खाली निघालो, देवळात एक पाच मिनिटे थांबून वेगाने उतरत पायथा गाठला. वाटेत पुन्हा एकदा जांभळे, पेरू, कैरी असा सगळा जंगलाचा मेवा लुटला. श्री. सकपाळ यांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानले, आणि पुण्याकडे निघालो. बरेच जंगल असले तरी अधुन मधुन खरपूस भाजूनही निघालो होतो, त्यामुळे वाईजवळ कृष्णेचा एक वेगवान कालवा पाहिला आणि राहवलेच नाही. पाण्यात उड्या टाकल्या आणि एकदम ताजेतवाने होउन मगच पुण्याकडे परतलो. बऱ्याच किल्ल्यांवरच्या आमच्या चढायांचे, वास्तव्याचे चलत चित्रिकरण व छायाचित्रे साठवलेला माझा भ्रमणध्वनीसंच या दरम्यान हरवला..

येत्या शनिवार रविवार पण एक जंगली डोंगरयात्रा ( महिमंडण वा भैरवगड) योजली आहे. आता पावसाळा सुरू होणार त्यामुळे जंगल भागातली शेवटचीच. येणार का कोणी ?


Lopamudraa
Thursday, May 25, 2006 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा.. वा चांगली आवड जोपासली आहे...!!! तिथे असते तर नक्कि आलो असतो...
मी पहिल्यांदाच या bb . कडे आले... .. great!!!


Dineshvs
Thursday, May 25, 2006 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी वाटच बघत होतो या पोस्टची. तुझे पोस्ट वाचुन, तिथे गेल्यासारखेच वाटते.

Bee
Friday, May 26, 2006 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह छानच रे गोविंदा.. तू मायबोलिकरांचा शिवाजी शोभतोस.. तुझ्यामुळे नविन किल्ल्यांची माहिती मिळते आहे नाहीतर इतिहासात ह्या गडांबद्दल कधी वाचल्याचे आठवत नाही.

Moodi
Friday, May 26, 2006 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जी एस एवढे अप्रतीम वर्णन करताय मग या बरोबर एखादा फोटो पण टाका ना, म्हणजे दुधात साखर.

Giriraj
Friday, May 26, 2006 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो,फोटो इथे पहा....
मधुमकरंद गड

Dineshvs
Friday, May 26, 2006 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरु, ती लिंक ओपन होत नाही. मला ईमेलने फोटो पाठव. मोबाईल सापडला का.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators