Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पांडवगड

Hitguj » My Experience » भटकंती » माझे दुर्गभ्रमण » पांडवगड « Previous Next »

Gs1
Monday, April 24, 2006 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेणवलीचा कृष्णा काठचा पांडवगड

Gs1
Monday, April 24, 2006 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सह्याद्रीचा सहवास हे एक व्यसनच आहे, दूर राहू असे ठरवले तरी फार काळ दूर रहाता येत नाही. साधारण वीस दिवसांपूर्वीच बरीच चर्चा करून आता पाऊस पडेपर्यंत ट्रेक नाही असे ठरवले होते पण त्यानंतर लगेचच १५ तारखेला आम्ही पाच जण कोरलाई, अवचितगड करून आलो होतो. तेंव्हाही एकंदर ऊन आणि रखरखाट बघून आता पुढचा ट्रेक नक्कीच पावसाळ्यात असे ठरवले होते. अर्थात तसे व्हायचे नव्हतेच.

शनिवार, २२ एप्रिल. रात्री साडेआठ नऊला कार्यालयातील कामे संपवत आल्यावर, दुसऱ्या दिवशी रविवार असल्याची जाणीव झाली. सहजच कूल (सुभाष) ला फोन केला. 'हॅलो' म्हणण्याऐवजी सुभाष म्हणाला, 'कुठे जायच?'
असे घोड्यावर बसून तयारच असलेले साथीदार असल्यावर अजून काय पाहिजे. 'तू सॅक घेऊन निघ तर, मग ठरवू.' सहज फोन केला होता हे विसरून मी म्हणालो.

स्वारगेटला भेटायचे. तिथे कूलने माहिती काढल्याप्रमाणे साडेबाराच्या मुंबई महाबळेश्वर बसने वाईकडे जायचे असे ठरले. पण तिथली एकंदर गर्दी, आणि आमच्या बिघडलेल्या सवयींमुळे शेवटी गाडी घेऊन निघालो. पांडवगडाच्या पायथ्याच्या मेणवली या नाना फडणवीसांनी नावारूपाला आणलेल्या छोट्याशा गावात आम्हाला वाईमार्गे पोहोचायचे होते.

पुणे सातारा रस्त्याने कात्रज, शिरवळ, खंबाटकी घाट असे गेलो. खंबाटकी उतरल्यानंतर लगेच उजवीकडे महाबळेश्वर फाटा लागतो. तिथे महामार्ग सोडुन वाईकडे वळलो. कुठेही दुऱवर दिवे दिसत नाहीत, रस्त्याच्या दुतर्फा घनदाट वडांनी कमानी उभारलेल्या. फार सुरेख रस्ता आहे हा. वाई या इतिहासप्रसिद्ध गावी पोहोचलो (९० किमी). इथूनच पाचगणीला नेणारा पसरणीचा घाट सुरू होतो. नाक्यावर पेंगणाऱ्या एका पोलिसाला विचारून वाई गावात शिरलो आणि कृष्णाकाठाने लगेच चार किमीवर असलेले मेणवली गाठले.

गावात एक देऊळ दिसत होते. समोरच्या अंगणात पारावर तीन चार जण झोपले होते. तिकडेच गाडी लावली. आसपास कुठे पांडवगड दिसतो का ते बघायचा प्रयत्न केला. एव्हाना साडेतीन वाजले होते. दोन तास झोपून ताजेतवाने होउन चढाईला सुरूवात करू असे ठरले. देवळात गेलो, तेथे एका भिंतीशी अगोदरच झोपलेल्यातल्या एकाने आमच्याकडे डोळे किलकिले करून पाहिले आणि पुन्हा झोपला. आम्हीही पथाऱ्या पसरल्या. ट्रेकींगमुळे गेल्या वर्षभरात असे अनोळखी गावांमध्ये जाउन किती तरी वेळा देवळात, ओसरीवर, पारावर झोपलो, तिथल्याच विहिरीचे पाणी शेंदून मनसोक्त वापरले. दर वेळेला लोकांचे अगत्यच अनुभवास आले. किती वेळा छोट्या चिल्ल्यापिल्ल्यांनीही आपले खिसे रिकामे करून करवंदे, जांभळे वा कैऱ्या देऊ केल्या. अशा वेळेला मला आमच्या संकुलाच्या उद्यानातील नळाला असलेले कुलुप आठवते, वा त्यातील बाकावर एखादा अनोळखी मनुष्य क्षणभर बसलेला दिसला तर त्याला आमच्या सुरक्षा रक्षकांकडुन कशी वागणूक मिळेल असा विचार डोक्यात येतो आणि संकोचायला होते.

पहाटे साडेपाचला उठलो, सहाला चालायला सुरूवात केली उन्हाळ्यातही ट्रेक 'ताप'दायक व्हायला नको असेल तर वासोटा, महीमंडणगड वा जंगली जयगड सारखा घनदाट जंगलातला करायला हवा, किंवा मग रात्रीचा वा पहाटे लवकर चालणे सुरू करायचे अशा तऱ्हेने योजलेला हवा. सहा हा तसा उशीरच म्हणायला पाहिजे. पांडवगड मेणवलीच्या उत्तरेला वसलेला आहे, गडाच्या मध्यावरून दोन सोंडा गावाच्या उजव्या डाव्या बाजूला उतरल्या आहेत. दोन्हीकडुन वाट आहे. आम्ही डाव्या सोंडेवर चढाई सुरू केली. अर्ध्या तासात धारेवर पोहोचलो आणि पलिकडचे विहंगम दृष्य दिसू लागले. धारेवरचे दगड धोंडे चढत उतरत बरीच ऊंची गाठली, दीड एक तासात डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो तेंव्हा लक्षात आले की गडाची खालून वाटणारी उंची फसवी आहे. एवढे वर आलो तरी अजून पायथ्याशीच आहोत असे वाटावे एवढे अजून चढायचे होते. त्याअर्थाने चढुन आलो तो डोंगर म्हणजे गडाचा पायथाच म्हणायचा. पण तिथला देखावा सुरेख होता. पाचगणीचे टेबललँड, वैराटगड, धोम धरणाचा जलाशय, कृष्णा आणि वाळकी चा संगम, त्यातून खरच कमळासारखा उगवलेला कमळगड असे सर्व दूरपर्यंत स्पष्ट दिसणारे दृष्य डोळ्यात साठवून घेतले आणि पुढे निघालो.

एक चार घरांची छोटी वस्ती ओलांडली. इथून सरळ वर चढुन जायचे होते, पण आम्ही वाट चुकलो, बराच वेळ गडाच्या बाजूबाजूने वाट नेत राहिली, आणि अर्धा गड ओलांडल्यावर एकदम खालीच जाऊ लागली. आता पुन्हा एवढे मागे जायचाही कंटाळा आला, मग आम्ही जी करू नये ती चुक केली आणि मागे जायचे सोडुन सरळ उभे वर चढायला सुरूवात केली. खर तर वाट सोडुन इतर कुठुनही चढता येऊ नये अशीच रचना असलेल्या डोंगरांवर किल्ले बांधलेले असतात. काही ठिकाणी सरळसोट कातळभिंती असतात तिथे असा काही विचार करायचा प्रश्नच नसतो, पण जिथे जमेल असे वाटते तिथेही हमखास फसगत होते. काटेरी झुडुपातून, धोकादायक घसाऱ्यावरून (स्क्री), तर दर पावलाआड प्रस्तरारोहणाचे न शिकलेले तंत्र पणाला लावून आम्ही एक एक पाउल वर सरकत राहिलो. गडावर जायची एक वाट दक्षिण मुखावरून तर दुसरी उत्तर मुखावरून, आणि आम्ही पूर्व मुखाच्या मधोमध डोंगराला भिडलो होतो. आता वर वा खाली कुठेच जाणे अशक्य आहे असे प्रसंग चार पाच वेळा आले. एकदा तर मी ज्या दगडाला लटकलो तो हलू लागला तेंव्हा डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती, पण पुढे असलेला कूल सरपटत खाली आला आणि त्याने त्याचा पाय खाली सोडला मला धरायला. मग निसटलेला दगड जेंव्हा थेट चित्रपटातल्याप्रमाणे दरीत शेवटपर्यंत कोसळतांना पाहिला तेंव्हा हृदयाचा ठोकाच चुकला होता. अजून एक चुक म्हणजे इतरांना अनेकदा सांगतो त्या उलट मी स्वतः मात्र शॉर्ट्स आणि टीशर्ट घातला होता. कुठलाही मोसम असो, कुठलीही वेळ असो, ट्रेकला नेहेमी हात पाय पूर्ण झाकले जातील असाच पोषाख हवा. तर परिणामस्वरूप जेंव्हा दोन तासांनंतर आम्ही अखेर दक्षिण मुखावरच्या वाटेला जाउन मध्यात मिळालो तेंव्हा खरचटले नाही असा एक सलग सेंटीमीटरही भाग शिल्लक उरला नव्हता माझ्या हातापायांवर. वाट सापडल्याच्या आनंदात आम्ही प्रत्येकी दोन घोट लिंबू सरबत आणि अर्धी बाटली पाणी याची 'पार्टी' केली

एकदा वाट सापडल्यावर मात्र 'धोपट मार्गा सोडु नको' चा मंत्र आचरत लवकरच गडावर दाखल झालो आणि गडाच्या फसव्या उंचीचा पुन्हा प्रत्यय आला. बालेकिल्ल्याचा कातळ समोर दीडेकशे फुट खडा होता. त्याच्या डाव्या बाजूने आम्ही त्या कातळाच्या गार सावलीतून गडाच्या उत्तर टोकाकडे चालत राहिलो. वाटेत एक पाण्याचे टाके आहे, एक अरुंद तोंडाची गुहाही आहे.

गडाच्या उत्तर टोकाला पार कड्यावर एक बंगला बांधलेला आहे. तिकडे गेलो, कुत्र्यांचे भुंकणे ऐकुन बंगल्यात रहाणारे श्री. शेर वाडिया हे पारशी गृहस्थ बाहेर आले. त्यांच्याबद्दल वाचले होतेच, आता ओळख करून घेतली. सुमारे तीस वर्षांपूर्वी त्यांनी अख्खा पांडवगड विकत घेतला, त्यावर हा बंगला बांधला आणि तेंव्हापासून ते गडावर एकटेच रहात आहेत. वर्षातून केवळ एकदा गड उतरून खाली जातात. सर्व जंगली प्राण्यांचा जवळुन अनुभव घेतला आहे, आतापर्यंत त्यांची बावीस कुत्री बिबट्याने वा वाघाने मारली आहेत. ते, त्यांचा गड, त्यांची कुत्री, आणि त्यांनी पाळलेला एक वळू याभोवतीच त्यांची दिनचर्या फिरते. असे एक हसतमुख आणि विलक्षणच व्यक्तीमत्व आहे हे वाडिया म्हणजे.

बालेकिल्ल्यावर गेलो. खूपच ऊंच आल्याने आसपासचा खूप दूरवरचा चौफेर प्रदेश दिसत होता. समोरच मांढरदेवी, थोडा पलिकडे केंजळगड असे सर्व पाहिले. वर पांडजाई देवीचे मंदिर आहे. किल्ला बराच प्राचीन आहे, दरवाजा आणि एखादा बुरूज सोडल्यास सर्व बांधकाम पडुन गेले आहे. आत्ता असलेले गवत बघता पावसाळ्यात इथे घनदाट रान असणार हे लक्षात येते. आता पावणेअकरा वाजले होते आणि उन चांगलेच तापले होते. वाडियांनी गडाच्या उत्तरेकडुन एक उभ्या धारेचा थेट खाली उतरण्याचा मार्ग खोदुन काढला आहे. तो वाई मांढरदेवी रस्त्यावरच्या धावडी या गावाजवळ उतरतो. त्या रस्त्याने भाजून काढणाऱ्या उन्हात तीन चार तास खाली खाली उतरलो आणि रस्त्याला लागलो तेंव्हा घड्याळात मात्र पावणेबाराच वाजले होते. यष्टीने वाईला गेलो आणि तिथुन पुन्हा मेणवली.

मेणवलीला कृष्णा नदी एक मोहक वळण घेते. त्या वळणावरच नाना फडणवीसांनी एक अप्रतिम घाट बांधला आहे. त्यावर एक देऊळ आहे आणि समोर एका घंटाघरात चिमाजीअप्पाने वसई विजयात जिंकून आणलेली फिरंग्यांची महाकाय घंटा टांगली आहे. नदीला भरपूर पाणी, रूंद व खोल पात्र, तीरावर सावली धरणारे वृक्ष. जखमा आणि उन यांनी काहिली होत असतांना अजून काय मागू शकत होतो. त्या पाण्यात झोकून दिले. एका झाडाची आठ दहा फुटांवरची आडवी फांदी बरीच पात्रात आली होती, मेणवलीची चिल्लीपिल्ली त्याचा स्प्रिंगबोर्ड करून धडाधडा उड्या वा सूर मारत होती. तृप्त होईपर्यंत नदीत पोहलो. निसर्गवर्णन वगैरे माझा प्रांत नाही, एवढेच सांगतो की नेहेमी वर महाबळेश्वरला जाण्याऐवजी कधीतरी इथेच किमान दोन दिवस निवांत जाउन रहावे आणि पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र या वेगवेगळ्या वेळेला संथ वहाणाऱ्या कृष्णामाईची, घाटांची, परिसराची शोभा अनुभवावी असा हा परिसर आहे.

बाजूलाच नानांचा प्रशस्त वाडा आहे. त्यांचे वंशज अजून रहातात तिथे. विनंती केल्यास वाडा दाखवतात असे ऐकले होते म्हणून वाड्यावर गेलो. साडेबारापर्यंतच दाखवला जाईल अशी सूचना वाचून परत फिरत होतो, तर वाड्याचे मालक श्री. अशोक फडणवीस आले आणि अत्यंत मार्दवपूर्ण रितीने आमची चौकशी केली, वाडा दाखवायची व्यवस्था केली. तोपर्यंत दोन वाजले होते, मग वाईला जाऊन बंडु गोरे यांच्या सुप्रसिद्ध भोजनालयात साध्याच पण चविष्ट भोजनाचा आस्वाद घेतला आणि पुन्हा मेणवलीमार्गेच धोम धरणाकडे निघालो. आजूबाजूला बघत हळू हळू जात होतो, त्याचे लगेच बक्षीस मिळाले आणि आपला डौलदार पिसारा सावरत एक मोर आम्हाला आडवा गेला.

धरणाजवळ पैठणसारखी बाग केली आहे असे वाचले होते. पण ती उजाड होउन काही काळ लोट्ला असे तिथे गेल्यावर कळले. धरणभिंतीलगतचे नृसिंहेश्वर मंदिर आणि त्यातले कासवाच्या पाठीवरचे नंदीचे शिल्प मात्र बघण्यासारखे आहे. कमळगडाचे व पांडवगडाचेही छान दर्शन होते इथून. आता परतीचे वेध लागले होते, वाटेत मुद्दाम वाईच्या भाजीबाजारात गेलो आणि कृष्णाकाठची सुप्रसिद्ध वांगी घेतली, त्याचेच झणझणीत भरीत खात आज हा वृत्तांत लिहित आहे...

सर्वांना घेऊन पुन्हा इथे यायचेच असा बेत करत पुण्याकडे परत फिरलो. वाई मागे टाकले तरी आता परिचयाचा झालेला पांडवगड पुन्हा मागे वळून पहावे असे वेगवेगळया कोनातून दर्शन देत होता.









Moodi
Monday, April 24, 2006 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे अनेक अवीट गोडीचे अनुभव तुम्ही, दिनेश अन कूल वाचायला देता ना आम्हाला, त्यातच पोट भरतोय बघा जी एस आम्ही. खरे नशीबवान आहात तुम्ही, सुख म्हणतात ते हेच असेल..

Seema_
Monday, April 24, 2006 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त , हे असल काही मला कधीच जमणार नाही . त्यामूळ तुमच्या सगळ्या trips चा व्रुतांत वाचुन तेवढच समाधान

Atul
Monday, April 24, 2006 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जी एस, मजा आली वाचायला. मी बन्डू गोरे यान्च्या कडे ८५ किन्वा ८६ साली कधितरी जेवलो होतो, त्याची एकदम आठवण आली

Cool
Tuesday, April 25, 2006 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


माझ्या अनेक ट्रेक पैकी अत्यंत उत्तम असे या ट्रेक चे वर्णन करता येईल.. चढतांनाच चुकलेली वाट, आम्ही नकळत निवडलेला अवघड रस्ता, त्यावर चढतांना आलेला अनुभव सगळच अवर्णणीय. शेर वाडिया यांची भेट हा त्यातीलच अजुन एक चांगला अनुभव. आम्ही वाडिया यांची एक छोटेखानी मुलाखतच घेतली, त्यात इकडे एकटे रहाण्याचा निर्णय घेतांना काय वाटले असे विचारल्यावर त्यांनी आम्हाला You live in a city, still you are alone. I am lucky that I am living alone, but I am not alone असे तत्वड्यान ऐकवले. ते वर्षातुन एकदा, किंवा दोनदाच गड उतरतात तरीहि जगाशी जोडलेले आहेत, चक्क Internet , cell phone च्या साह्याने. दृढ निश्चय, तो तडिस नेण्याची धडपड, आणि तरीही चेहर्‍यावर टिकुन राहीलेले हास्य या गोष्टी शिकवायला शेर वाडीया यांच्या सारखा गुरु मिळणे ही त्या ट्रेक ची उपलब्धी. अशी भेट घडल्यावर आम्ही त्यांच्या सोबत फोटो न काढणे शक्यच नव्हते. गड फिरुन आम्ही परत उतरल्यावर मेणवली गावातील कृष्णेच्या चंद्राकार घाटावर आलेला अनुभव हा तर या सगळ्या अध्यायाचा कळस.. भरीस भर म्हणुन वाई गावातील गोरेंकडचे जेवण होतेच. आणि हे सगळे कमीच म्हणुन की काय त्या मोराने दिलेले सुंदर दर्शन, पुढे धोम गावातील मंदिर, त्याबाहेरील छानसा नंदी

एखाद्या दिवसाने आपल्याला भरभरुन द्यावं याचं आदर्श उदाहरण म्हणजे हा ट्रेक...


Dhumketu
Tuesday, April 25, 2006 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही रे... पांडवगड मस्त आहे. तिथून एक देशावर यायला एक घाट आहे. तो develop करणार आहेत असे ऐकले होते...
अवचीतगड मिस झाला...
मध्ये मी १ दिवसात पाले-गांधार लेणी, चांभारगड, कावळ्या केला...

ह्या शनिवार रविवार आहात का?
२-२.५ दिवसाचा ट्रेक करता येईल...
वासोट्याला आता पायथ्याशी तंबु मिळतो भाड्याने.. रेट माहीत नाही.. पण सरकारी तंबू असतो...
भैरवगड्-रामघळ ही करता येईल.. बर्‍यापैकी झाडी असते...


Milindaa
Tuesday, April 25, 2006 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या येथे गड पण विकत घेता येतात ?

Anilbhai
Tuesday, April 25, 2006 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला किती हवेत रे?

Naatyaa
Wednesday, April 26, 2006 - 1:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला किती हवेत रे?>> काय? गड का तंबू?

Giriraj
Wednesday, April 26, 2006 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृपया येथे TP करू नये! भर उन्हात ट्रेकला नेले जाईल!
आदेशावरून!:-)


Mi_anandyatri
Monday, December 03, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल पांडवगड ला जाऊन आलो.. जाण्यापूर्वी GS गुरूंकडून सर्व आवश्यक माहिती घेतली होतीच.. केवळ त्याचमुळे (प्रत्येक ट्रेक मधला अपरिहार्य आणि most exciting असा) वाट चुकण्याचा भाग या वेळी चुकला.
Bike वर गेलो असल्याने वेळ ही बर्‍यापैकी हातात होता.
पण तरी शेर वाडियांना भेटता नाही आलं.
जाताना शिरवळ ला "श्रीराम" मधला सुप्रसिद्ध वडा खाल्ला, गडाकडे जाताना वाटेतल्या वस्तीवरच्य विहिरीचं थंडगार पाणी शेंदलं, परत येताना मेणवली चा कृष्णेचा घाट ही पाहिला.. पाण्यात पाय सोडूनही बसलो
याच घाटावर 'स्वदेस' मधली बरीचशी दृश्ये चित्रित झालेली आहेत, हे तिथे गेल्या गेल्या कळतं...
तसंच काही काही दृश्यांत पांडवगड ही दर्शन देतो..

GS गुरूंच्या post मधला
"नेहेमी वर महाबळेश्वरला जाण्याऐवजी कधीतरी इथेच किमान दोन दिवस निवांत जाउन रहावे आणि पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र या वेगवेगळ्या वेळेला संथ वहाणाऱ्या कृष्णामाईची, घाटांची, परिसराची शोभा अनुभवावी असा हा परिसर आहे. " हा भाग तंतोतंत खरा आहे..


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators