Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 19, 2006

Hitguj » My Experience » कर्कवृत्त » Archive through April 19, 2006 « Previous Next »

Sakheepriya
Tuesday, April 18, 2006 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काकूंची आणि माझी मैत्री गेल्या तीन वर्षांची. मी First Year Engineering ला शिकत होते, आणि त्या पुण्याच्या Engineering College (COEP) मधून Chemistry च्या Professor म्हणुन रिटायर झालेल्या. माझ्यापेक्षा जवळ जवळ १५-१६ वर्षांनी मोठ्या असलेल्या एका मित्राच्या त्या आई. आमच्या दोघींच्या वयातलं अंतर बघता, मी त्यांना 'मैत्रीण' म्हणणं विचित्र वाटेल... पण आमच्या वेगवेगळ्या विषयांवर रंगणार्‍या गप्पा, हास्यविनोद, त्यांचा सदैव ओसंडून वाहणारा उत्साह, जगण्याची उमेद यावरून मला त्या मनाने माझ्यापेक्षाही तरूण वाटतात. FE ला मी Applied Chemistry ला Guidance साठी म्हणून त्यांच्याकडे गेले, आणी आमची ओळख झाली. या निमित्ताने त्यांच्याशी जमलेली Chemistry मात्र आजतागायत टिकून आहे!

त्यावेळी काकूंशी बोलताना त्या नुकत्याच Breast Cancer मधून बर्‍या झाल्याचं कळलं. त्यांचा Cancer तेव्हा पूर्ण बरा झाला होता, पण मी उत्सुकतेने त्यांना त्याबद्दल अधिक विचारलं असता, त्यांनी तो संपूर्ण अनुभव मला सांगितला. ज्या धैर्याने, शांतपणाने, आशावादाने काकू कर्करोगाला सामोर्‍या गेल्या ते ऐकून मी स्तब्धच झाले! त्यांच्याबद्दलचा मनातला आदर दुणावला. नंतर त्यांनी हा सगळा Cancer विषयीचा अनुभव शब्दबद्ध करून मला वाचायला दिला. तो इथे post करण्याचं खूप दिवसांपासून मनात होत... आज मुहूर्त लागत आहे!
उद्या काकूंचा वाढदिवस असतो. त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा!


Sakheepriya
Tuesday, April 18, 2006 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्कवृत्त
-सौ. कुंदा महादेवकर



सारं कसं छान चाललं होतं. जीवन झुळझुळ वहात होतं. दिवसांची फुलपाखरं मस्त मजेत उडत होती. आयुष्याची ओंजळ आनंदपुष्पांनी ओसंडली होती. २००२ सालच्या जानेवरी महिन्यात तर हा आनंदझुला उंचच उंच गेला होता. आता वयाला सहा दशकं पूर्ण झाली होती. बराच काळ म्हणजे सुमारे एकोणचाळीस वर्षं रेंगाळलेली प्राध्यापकीची ईनिंग आता मी स्वयंघोषित केली होती. प्रपंचही नेटका होता. आता मी मुक्त होते. पुष्कळ गोष्टी करायच्या राहून गेल्या होत्या. त्या आता करायच्या होत्या. बर्‍याच इच्छा पूर्तीच्या प्रतिक्षेत शिणल्या होत्या. अर्धवट अवस्थेत सोडलेलं - रुसलेलं संगीत पुनःच्च गोंजारायचं होतं. लताच्या हळुवार जुन्या गाण्यांची मखमली मोरपिसं कुरवाळायची होती, घरातील न वाचलेल्या पुस्तकांना न्याय द्यायचा होता.

दूर क्षितीजावर येऊ घातलेलं वार्धक्य उभ होतं. त्याला समाधानपूरवक सामोरं जायचं होतं. तृप्ती च्या पालखीतून त्याला मिरवत आणायचं होतं. काव्य - शास्त्र - विनोदाच्या चवर्‍या ढाळत आणायच होतं - हे करायचं, ते करायचं आस्तित्वाच अंगण अशा विचारांच्या रांगोळ्यांनी सजलं होतं. मनसुब्यांच्या मनोर्‍यांना अंत नव्हता. स्वप्नांना कुठेही किनारा नव्हता.

सर्वसाधारणपणे प्रकृतीही उत्तम होती. नाही म्हणायला तो जीवनसखा - मधुमेह सोबत होता. मात्र गेले काही दिवस, डाव्या वक्षस्थळात हाताला कुठेतरी टणक वाटत होतं. माझ्या दृष्टीने तो भास होता. मनाचा खेळ होता. कारण दोन वर्षांपूर्वी माझी मोठी बहीण कर्करोगाने गेली होती. आणि मन चिंती ते वैरी न चिंती, या (अ)विचाराने शंकेचं ते जळमट मी झटकून टाकी. वास्तविक आमच्या कुटुंबात मानवी शरीराच्या जवळजवळ सर्व अवयवांचे डोक्टर आहेत. सारे अश्विनीकुमार आणि धन्वंतरी घरी दारी वावरतायत पण त्यापैकी कुणालाही मी ह्याविषयी बोलले नाही. मला तशी गरजच वाटली नाही. (वैद्यकीय बेफिकिरीचं कुठे एखादं पारितोषिक असेल तर संबंधितांनी माझा जरूर विचार करावा.)

जानेवारी महिन्यात थोडा बदल म्हणुन आम्ही उभयता उरळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात एका आठवड्यासाठी गेलो होतो. पूर्ण बॉडी मसाज हा तिथल्या दिनचर्येचा एक आवश्यक भाग असे. मसाजसाठी एक रूढार्थाने अशिक्षित बाई येत असे. तिने पहिल्याच दिवशी सांगितलं - " बाई, छातीत डावीकडं टणक लागतया. पुण्याला गेल्यावर डागदरला दावा बरं का. " मी आपलं " हो, हो " केलं. फेब्रुवारी महिनाही गेला. टणकपणाचं क्षेत्रफळ दिसामाशी वाढत होतं. पण मला काय त्याचं? मार्च उजाडला. साधारण वीस तारखेच्या सुमारास वृत्तपत्रामध्ये एका तज्ज्ञ डॉक्टरांचा स्तनाच्या कर्करोगावर लेख आला होता. त्याच्या प्रादुर्भावाबद्दल स्त्रिया कशा जागरुक नसतात, लक्षणांविषयी कशा उदासीन असतात, कोणत्या चाचण्या आवश्यक असतात वगैरे गोष्टींचा उहापोह ह्या लेखात होता. अंगावर एक जळजळीत दृष्टिक्षेप आणि पुढ्यात वृत्तपत्र - पाठोपाठ शब्द - " हे वाच " - दुसरं कोण असणार?


Sakheepriya
Tuesday, April 18, 2006 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकाट्याने उठले आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला फोन लावला. " हॅलो, मला मॅमोग्राफीसाठी अपॉईंटमेंट हवी आहे. " आठ दिवसांनंतरची वेळ मिळाली. मॅमोग्रफी झाली. त्या तंत्रज्ञ कन्यकेने नांदी ऐकविली. " डावीकडे प्रॉब्लेम दिसतोय. सोनोग्राफी करावी लागेल. " सोनोग्राफी करणार्‍या डोक्टरांनी नांदीचा अंतरा पूर्ण केला, " डावीकडे गाठी आहेत. उद्या F.N.A.C. करून घ्या. " शरीरात उमटत चाललेलं कर्कवृत्त आता दृष्टीपथात येत होतं. तरीही मी आतून तशी हलले नव्हते.

दुसर्‍या दिवशी म्हणजे २६ मार्च ला F.N.A.C. नामक टेस्ट झाली. ही टेस्ट म्हणजे डायरेक्ट गाठी मध्ये सिरींज खुपसून आतील द्रव पदार्थ काढून घेतात. तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला. रिपोर्ट संध्याकाळी मिळणार होता. रिपोर्ट आणायला माझी सून - जी स्वतः डेंटल सर्जन आहे, ती गेली. रिपोर्टबद्दल उत्सुकता असली तरी कशी कोण जाणे, मी विलक्षण शांत होते. सून परत आली अन माझ्या खांद्यावर डोकं ठेवून गदगदून रडायला लागली. तिच्या हातातील रिपोर्ट मी वाचला - suspicious malignancy'. खरं म्हणजे, मी जात्या मनाने फार कणखर नाही. पण परमेश्वरानं माझ्यात कॅन्सर बरोबर आत्मबळही ठासून भरलेलं असावं. मनाची किंचितही चलबिचल झाली नाही. उलट एक सून तिच्या सासूसाठी रडते आहे ह्यामुळे मी मनातून अति सुखावले. धन्य झाले.

रिपोर्ट घेवून उभयतांनी डॉक्टरांना गाठले. कॅन्सर खूप advance स्टेजचा होता. ताबडतोब शस्त्रक्रिया करणं भाग होतं. त्याक्षणीही माझ्यातील व्यवहारी गृहिणी जागी होती. " डॉक्टर, मला सांगा, एवढं सगळं करून मी ह्यातून वाचण्याचे चान्सेस किती आहेत? नाही म्हणजे, खर्च करायचा, मी यातना सोसायच्या अन परत हाती काही नाही असं व्हायला नको! " डॉक्टरांनी वासलेला आ मिटला आणि उद्या सकाळी admit व्हायला सांगितलं.

घरी आल्या आल्या मी चिरंजीवांना फर्मान सोडलं. " हेमंत, गाडी काढ. आज सर्वांनी मस्तपैकी जेवायला जायचं बाहेर. अन नंतर आईस्क्रीम! " माझ्यात कुठला उत्साह संचारला होता कोण जाणे? घरी येऊन फोनवरून कॉलेजच्या कामाची व्यवस्था केली. बॅग भरली अन सकाळी admit झाले. माझा हा ' भलता ' मूड बघून घरातील मंडळीही ठीक होती. घरातून बाहेर पडताना शेजारीणबाईंना सांगितलं - " वहिनी, हॉस्पिटलमध्ये निघालेय. कॅन्सेर आहे. बहुतेक उद्याच ऑपरेशन होईल. " त्यांचा प्रश्नांकित चेहरा बघायलाही वेळ नव्हता.

हॉस्पिटल्च्या आवारात शिरतानाच मी जाहीर केलं - " उत्तमातील उत्तम खोली घ्या. " पुढचं मनात म्हटलं - " काय व्हायचं असेल ते ऐषोरामात होऊ द्या. " प्रसंगाचं गांभीर्य बुद्धिला पटत होतं. पण ते मनात घुसू दिलं नव्हतं. आल्या परिस्थितीला आपसूकच हसत सामोरी जात होते. उद्या काय असेल हा विचार मनात येतच नव्हता. पण निश्चितच निराशही नव्हते. मंगेशकर हॉस्पिटल तेव्हा नवीनच होतं. लतादीदींच्या हॉस्पिटलमध्ये रहातेय म्हणून मनात कुठेतरी अप्रूपही वाटत होतं. त्यादिवशी आवश्यक त्या तपासण्या झाल्या. आता उद्या म्हणजे ३० मार्चला सकाळी नऊ वाजता ऑपरेशन.


Sakheepriya
Tuesday, April 18, 2006 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शुद्धीवर आले अन जाणवलं, हेमंत माझ्या केसांवरून, चेहर्‍यावरून हळुवारपणे हात फिरवत होता. त्याक्षणी लक्षात आलं की काहीतरी गंभीर मामला असावा. कारण " मॉं " म्हणून मिठी मारणं तोवर फक्तं हिंदी सिनेमातच पाहिलं होतं. नंतर समजलं की कॅन्सर तिसर्‍या अवस्थेत होता. ऑपरेशन केलं नसतं तर पुढचा फारच थोडा काळ मिळाला असता.

हळूहळू जाणवलं की आता मी एकस्तनी झाले होते. बाबा आमट्यांनी त्यांच्या आनंदवनतील रुग्णांची अजिंठ्याच्या भग्न शिल्पांशी केलेली तुलना आठवली. पण ऑपरेशनंतरही एकूण प्रकृती समाधानकारक होती. मात्र काखेतील जखमेतून एक प्रकारच स्त्राव वहात होता. तो स्त्राव एका रबर ट्यूबद्वारे प्लॅस्टिक बाटलीत जमा होत राहील अशी व्यवस्था केली होती. बाथरूमपर्यंत चालू शकत होते पण काखेतील तो कमंडलू सतत बरोबर बाळगावा लागे. चार दिवसात डिस्चार्ज मिळाला. आणि वन पीस नसले तरी जिती जागती घरी आले. गेले ५ - ६ दिवस फारच Action Packed होते. घटना वेगाने घडल्या होत्या. घडून गेलेल्या नाट्याची तीव्रता आता लक्षात येत होती. पण नाटक संपलेलं नव्हतं. ह्या कर्कनाट्याचा केवळ पहिला अंक झाला होता.

आता दुसरा अंक - केमोथिरपी! डॉक्टरानी चाकू - सुर्‍या वापरून कर्कासुराचं शरीरातील प्रमुख ठाणं जरी उध्वस्त केलं होत तरीही, गनिमाचा एखाद - दुसरा शिपाई कुठेतरी दडला असण्याची शक्यता होती. त्याला टिपणं अत्यावश्यक होतं. नाहीतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या! ह्या दोन अंकांमध्ये साधारणपणे एक महिन्याचं मध्यंतर होते. आता मी काहीशी उत्सवमूर्ती होते. आप्तेष्ट, शेजारी, मित्र-मैत्रिणी, जुने सहकारी - असा सुहृदांचा प्रवाह चालिला! माझ्या असण्या - नसण्याशी कल्पनेपेक्षा खूपच लोक निगडीत होते. ते बघून स्वत्व कुठेतरी सुखावत होते. माझी शारिरीक आणि मुख्य म्हणजे मानसिक प्रकृती उत्तम होती. मी हसत होते. नेहमीसारखी खिदळत होते. आगतांच्या गप्पांमध्ये रंगून जात होते. येणारे सर्वजण अगदी गंभीर चेहर्‍याने यायचे. आता आपल्याला काय बघावे लागणार ह्या मानसिक दडपणाखाली येत. पण माझा नूर पाहून त्यांचा सुखद अपेक्षाभंग होई.

पण नाही म्हटल तरी मनात कुठेतरी केमोविषयी एक प्रकारची सूक्ष्म धास्ती होती. केमोथेरपीच्या परिणामांविषयी खूप ऐकून होते. ' रोग परवडला पण उपचार नकोत ' अशी त्याची दुष्कीर्ती माहिती होती. आणि मला तर रोगाच्या तीव्रतेनुसार आठ cycles घ्यायच्या होत्या. एकूण काय, शरीरामध्ये Operation नंतरही चुकून कुठे तरी राहिलेल्या Cancer पेशींचा नाश करण्यासाठी केमो घेणं अटल आहे असं उमजलं. जे अटल आहे ते निदान हसतमुखानं स्वीकारावं असं असा निर्णय घेतला. मात्र ह्या केमोयुद्धाची नीटपणे व्यूहरचना करणे आवश्यक होते. आता मी त्याच्या मागे लागले.

सर्वप्रथम, केमोमुळे त्रास होण्याचा संभव असला तरी अंतिमतः ते माझ्याच फायद्यासाठी आहे हे मनाला निक्षून बजावले. संभाव्य दुष्परिणाम कमीत कमी व्हावेत, ह्यासाठी वनौषधीतज्ज्ञ डॉ. उर्जिता जैन ह्यांचे मार्गदर्शन घेतले. आयुर्वेदतज्ज्ञ, होमिओपाथ यांच्याशी चर्चा केली. मनाची साकारात्मकता वाढवण्याकरता समुपदेशकांचा सल्ला घेतला. एका परिचित रेकीतज्ज्ञांना दूरस्थ रेकी देत राहण्याबद्दल विनंती केली. आणि मी केमोसाठी सिद्ध झाले, सज्ज झाले. पहिल्या केमोचा दिवस उजाडला. या " पहिल्या खेपेला " सतत डोक्टरांच्या निरिक्षणाखाली असणं आवश्यक असतं. त्यामुळे रात्रीचा मुक्काम ओघानेच आला.

केमो म्हणजे, हातातील शीरेतून सलाईनच्या माध्यमातून काही औषधे शरीरात प्रविष्ट केली जातात. ही औषधं म्हणजे Cancer पेशींचा संहार करण्यासाठी पाठवलेलं सैन्यदल असतं. मात्र या सैनिकांना आपपरभाव नसतो. मित्र आणि शत्रू दोघेहीजण यांना समान असतात. त्यामुळे ओल्याबरोबर सुकंही जळतं. Cancer पेशींबरोबरच बर्‍याच प्रमाणात शरीरातील ' सज्जन ' पेशीही नाश पावतात. तांबड्या पेशींच प्रमाण एकदम कमी होत. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी होतं. पांढर्‍या पेशींच प्रमाण घटल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती ढासळते. अशक्तपणा येतो. अन्नावरची वासना उडते. जेवण जात नाही. अशक्तपणात त्यामुळे भरच पडते. ह्या अडचणीवर मात करण्यासाठी एक रामबाण उपाय असतो. रोज साधारण पाच लिटर पाणी पिणे. इन्फ़ेक्शनच धोका टाळण्यासाठी उकळलेलंच पाणी पिणे, कुठलाही कच्चा पदार्थ न खाणे ही पथ्य असतातच.

प्रत्येक दोन केमोमध्ये तीन आठवड्याचं अन्तर असे. मात्र प्रत्येक आठवड्यात रक्तातील हिमोग्लोबिन आणि पांढर्‍या पेशींचं प्रमाण तपासावं लागे. पहिल्या आठवड्यात मी अगदी गलितगात्र असायची. दुसर्‍या आठवड्यत पुष्कळशी बरी आणि तिसर्‍या आठवड्यात चांगली टुणटुणीत व्हायची. तिसर्‍या आठवड्यात सगळं पूर्ववत झालं की लगेच पुढची पुढची केमो. आठवडे सरकत होते. केमोचक्र फिरत होतं. आता हे सारं माझ्या अंगवळणी पडत होतं. दुसर्‍या केमोनंतर केस गेले. तिरुपतीला न जाता वेणीदानाचं पुण्य पदरी पडलं. आरशात डोक्याचा गोटा पाहून सुरुवातीला गदगदून येई. पण हे गेलेले केस परत येतात असं डॉक्टरांनी खात्रीपूर्वक सांगितलं होतं. त्यामुळे तशी मी निश्चिंतही होते. एक मस्त विग करून घेतला. आता साठीतही त्यामुळे केस घनदाट आणि काळेभोर झाले. आणि महाराजा, जेहत्ते कालाचे ठायी, अशा रितीने आठही केमो संपल्या. नंतरच्या सर्व टेस्ट व्यवस्थित आल्या. नाटकाचा दुसरा अंक संपला.

तिसरा अंक त्यामानाने फार गुंतागुंतीचा नव्हता. ' रेडिओथेरपी ' ! म्हणजे Cancer जेथे होता त्या जागेवर प्रभावी किरणांचा स्त्रोत सोडतात. ही ट्रीटमेंट अठ्ठावीस दिवस घ्यावी लागली.

क्रमशः


-----------------------
मानवी मन 'वढाय वढाय' हेच खरं! आपल्याला जे विनासायास मिळत राहतं त्याचं काही महत्त्वच वाटत नाही. पुरेशी किंमत मोजल्याशिवाय मिळालेल्या सुखाचं मोलच लक्षात येत नाही. माझंही असंच झाल. आतापर्यंत आयुष्य तसं सुरळीत होतं. दिवस उगवायचे-मावळायचे! दिवस - रात्रीच्या किनार्‍यांमधून जीवनौघ वहात होता. आपसूक पुढे जात होता. पण नियतीनं हा भला मोठा कातळ वाहत्या ओघात भिरकावला अन सारं ढवळून निघालं. अवघं अस्तित्वच डळमळीत झालं. उर्वरीत आयुष्याच्या अर्ध्या पेल्यातलं रितेपण दृष्टीस पडलं, तेव्हा कुठे गत जीवनाचा भरलेला अर्धा पेला जाणवला. आयुष्याची किंमत कळली. श्वासाचं मोल समजलं. हातात पडलेला हा आयुष्याचा बोनस खूप काही शिकवून गेला. हे पुनर्जात जीवन अर्थपूर्ण वाटतं.

आता येणारी प्रत्येक पहाट, उगवणार्‍या प्रत्येक दिवशीचा सूर्य, आयुष्यावर पडणार्‍या प्रत्येक दिवसाचा कवडसा हा माझ्या दृष्टीने एक उत्सव असतो. आता किती दिवस अन किती क्षण शिल्लक आहेत, याची मला तमा नसते. प्रत्येक क्षण जीवनाने ओथंबलेला आहे ह्याचा अनुभव घेते.

हात कृतज्ञतेने जोडले जातात आणि मग त्याच ओंजळीत ह्या सार्‍या निमिष कळ्या हळुवार जपते. त्यांच्या सुगंधाने सुखावते.

*** समाप्त ***



Lopamudraa
Tuesday, April 18, 2006 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lihi ajun, manalaa bhavatey... kharokhar great kaaku..

Jaaaswand
Tuesday, April 18, 2006 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखीप्रिया..

वाचून अगदी भरून आले....
खरच madam ला सलाम....एवढ्या अवघड प्रसंगाला कणखरपणे सामोर्‍या गेल्याबद्दल..
खरच हे सगळ सहन करायला खूप daring लागते अंगी आणि madam नी तर
हसत मुखाने सगळे निभावून नेले....

मी त्यांना madam अश्यासाठी म्हणतोय कि.. त्या मलाही engineering ला
1st year ल शिकवायला होत्या , ofcourse for Applied Science- Chemistry

त्या सुंदर गातात हे तर तुला माहित असेलच...
आमच्या engg college च्या एका समारंभात त्यांनी गायलेले गाणे मला अजून आठवत आहे..
ये जिंदगी उसी कि हें जो उसी का हो गया...

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणतात ना
माझा त्यांना नमस्कार सांग..

मी तुला मेल करीनच

जास्वन्द...


Maitreyee
Tuesday, April 18, 2006 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Gr8! लिहिलय पण सुरेख. प्रत्येक परिच्छेदात या काकूंचे धैर्य, आत्मविश्वास, सकारात्मक वृत्ती,जीवनावर प्रेम सगळे पुरेपूर जाणवतय. इतक्या गंभीर आजाराशी जिद्दीचा लढा वाचताना मला अनिल अवचटांची मुलगी, नाव बहुधा मुक्ता, तिचा ' एपिलेप्सी शी लढा ' आठवला. गेल्या वर्षीच्या एका दिवाळी अंकात वाचला होता.

Zelam
Tuesday, April 18, 2006 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारच छान. किती possitive attitute आहे आणि धैर्याने परिस्थितीला सामोरं जाणं

Chinnu
Tuesday, April 18, 2006 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखी, या अश्या प्रसंगातुन जावुनही त्यांचे मनोबल खचले नाही. त्या खरच खुप ग्रेट आहेत.

Ninavi
Tuesday, April 18, 2006 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, सुंदर.
हे शेअर केल्याबद्दल धन्यवाद, सखीप्रिया.


Arch
Tuesday, April 18, 2006 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती, धिराने, दुसर्‍याला त्रास न देता त्या सामोर्‍या गेल्या cancer ला आणि विजयीपण झाल्या. केवढ शिकण्यासारख आहे.

Moodi
Tuesday, April 18, 2006 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दृढ निश्चय अन जिद्द या बळावर परीस्थितीवर मात करणार्‍या तुझ्या काकुंना आमचा प्रणाम. अतीशय कौतुकास्पद आहे हे जीवन.

Kandapohe
Wednesday, April 19, 2006 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखे, काकुंची जिद्द, धीर, सकारात्मक वृत्ती बघून अचंबीत झालो. या लेखाने मला माझ्या अशाच कर्कव्रुत्ताने पिडीत मावशीची आठवण झाली. `माय मरो व मावशी जगो` असे काहीसे ऋणानुबंध होते.

वाचून आलेले अश्रू प्रचंड प्रयत्न करून आतल्या आत दाबायचा प्रयत्न करत आहे. बघू तुझ्या काकू किती धैर्य देतात.

त्यांना माझा नमस्कार आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा सांग!




Mrdmahesh
Wednesday, April 19, 2006 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काकूंना माझा सलाम,
कॅन्सर ने माझे वडील आणि आजी दोघेही गेले. त्यांचा वेगळा होता. त्यांचे जीवन मी जवळून पाहिले होते. त्या पार्श्वभूमीवर काकूंचा लढा कॅन्सरपीडितांना खूपच प्रेरणादायी ठरेलच यात शंका नाही.
काकूंचे धैर्य, मानाची शांती असामान्य आहे.
काकू कॅन्सर मधून खडखडीत बर्‍या होवोत ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना.
सखीप्रियांनी हा लढा मायबोलीकरांसमोर शब्दरूपात आणला आणि एका मानवी जीवनाचे प्रेरणादायी कर्तृत्व समोर आणले त्याबद्दल त्यांना धन्यवाद.


Sanghamitra
Wednesday, April 19, 2006 - 12:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखे किती सहज लिहीलंय.
कॅन्सरपेशंट्स नी वाचलं तर त्यांना नक्की वाटेल की एवढं काही अवघड नाहीये.
खूप छान लिहीलंय खरंच.


Champak
Wednesday, April 19, 2006 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप छान अनुभव!

chemistry ची लोक असतात च मुळी unique :-)
श्री. राम नाईक पण कर्करोगाने पीडीत आहेत, पण कार्यक्षमतेवर कधी फ़रक पडु दिला नाही!:-)


Rachana_barve
Wednesday, April 19, 2006 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरी असतात काही काही लोकं. नाहीतर आमच्यासारखी साध्या साध्या कारणाने हताश होतात.
कौतुक वाटत अशा लोकांच. काकूंचा कॅंसर पुर्ण बरा होवो हिच इच्छा


Junnu
Wednesday, April 19, 2006 - 9:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप छान लिहील आहे. आदर वाटतो अशा लोकांचा.

Sakheepriya
Thursday, April 20, 2006 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद सर्वांना. तुमच्या या प्रतिक्रिया मी जरूर काकूंपर्यंत पोहोचवेन!

रचना, अगं बरा झालाय काकूंचा कॅन्सर पूर्णपणे. पण तशा त्या weak झाल्यात खूप आता. तरीदेखिल त्या जमेल तसं कॅन्सर पेशंट्स करता Conselling वगैरे करत असतात. काही NGOs शी पण संबंधित आहेत बहुधा. ती पण माहिती इथे टाकेन, जमेल तसं.


Badbadi
Thursday, April 20, 2006 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखे, काकू खरंच gr8 आहेत.. परीस्थिती माणसाला किती शिकवते, किती बदलू शकते याचं नेमकं उदाहरण अशा काही घटनातून मिळतं

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators