Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
vinaydesai
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » vinaydesai « Previous Next »

कार्यक्रमाची वेळ ठरली होती, संद्याकाळी आठ वाजता. भरतीय टायमाप्रमाणे तो सुरू झाला अर्धा तास उशीरा. खरं तर बर्‍याच ठिकाणी प्रेक्षक उशीरा येतात, पण इथे प्रेक्षक सगळे येऊन बसले तरी कार्यक्रम सुरू व्यायला वेळ झालाच. सुरुवातीलाच महिमाचं आगमन आणि तिचे मोजके चार शब्द झाले. ती खरोखरंच मोजके चार शब्द बोलली. मुलांची तयारी तर संध्याकाळीच झालेली होती, तरी पण आयोजकाना काहीतरी problem असावा.

कार्यक्रमाचा पहिला भाग जुनियर गटाचा होता. मुलांची तयारी पण मस्त झाली होती. आधीच निवड होताना कात्री लावलेली, त्यात त्यानंतर तीन महिने तयारीही केली होती. एक गोष्ट मात्र खटकली. गाणं निवडताना, त्यांचे डॅंस मास्तर, मास्तरणी काय खाऊन बसलेले असतात? सहा ते नऊ वयोगटातल्या मुली जेव्हा ' इश्क इश्क करना है करले...' करत ' धूम मचाले' करतात तेव्हा त्यांचे हावभाव बघून कुठेतरी ' आपण या मुलाना या वयात काय शिकवतोय?' असा प्रश्न कुणालातरी पडायला हवा.
हिंदी सिनेमाची गाणी ही अशीच असतात हे जरी मान्य केलं, तरी वर्षाकाठी तीन तीनशे सिनेमा, आणि प्रत्येकाची पाच सात गाणी, एवढी गाणी असताना, त्यात एकही गाणं मुलांच्या लायकीचं नसतं हे मनाला पटत नाही. एका मोठ्या माणसांच्या गटाने स्वदेश मधलं ' युंही चला चल राही' हे एका फाटक्या माणसावर चित्रित केलेलं गाणं सादर करून, तेही चांगलं कसं करता येईल हे दाखवून दिलं. नशीब चांगलं की मुलाना इम्रान हाशमी, उदिता सारखे कपडे घालून मिठ्या नाही मारायला लावल्या. शिक्षकाला समजत नसेल तर निदान पालकाने तरी विचार करायलाच हवा, नाही का?...



आलेल्या प्रेक्षकाना आपापले भ्रमणध्वनी बंद करायची धमकीवजा सुचाना येतानाच दिली गेली होती. डी. वी. डी., फोटो इत्यादी विकायचा विचार असल्यामुळे प्रेक्षकातून फोटो काढले जाणार नाहीत याची पण खात्री करून घेतली जात होती. भ्रमणध्वनी बंद ठेवायची सूचना खरोखरच योग्य असते. पण स्वतः संयोजक मात्र तो नियम पाळत नव्हते. पंधरा मिनिटांचे मध्यंतर अर्धा तास झाला तरी संपेना. कुणीतरी एक प्रयोजक कुठेतरी अडकला होता. याला भ्रमणध्वनीवर शोधायचा प्रयत्न एका संयोजकाने सुरू केला, तो पुढची पंधरा मिनिटे, प्रेक्षकांसमोर स्टेजवर उभा राहून फोन करत होता. मध्यंतर संपत नाही हे पाहून माझ्या मागच्या एका भारतीय डॉक्टर माणसाने 'Never give these Indians a chance to break' अशी comment टाकली आणि त्याचा मोबाईल वाजला. पुढची पंधरा मिनिटं त्याची आदल्या रात्री दोन वाजता आलेल्या एका पेशंटची केस, पाच सात लोकांबरोबर चर्चा केली. अजून वेळ आहे, ऑपरेशन करून आलास तरी चालेल मी मनात म्हणालो.
या गडबडीत, संयोजकातील एकाच नांव घ्यायचं राहिलं. मग त्या माणसाला शोधा, त्याला प्रेक्षकांपुढे यायची विनंती, मग माफी असा सगळा प्रकार संपयला अजून काही वेळ गेला. मला न्यूयॉर्कला झालेल्या BMM ची आठवण झाली. मॅडिसन स्क्वेयर गार्डनचे कामगार त्यांच्या युनियनच्या नियमाप्रमाणे, साडेदहाला कार्यक्रम बंद करायचे. मग तो संपला असो किंवा नसो. काहीवेळा शिस्तीचा बडगा दाखवावाच लागतो.

कार्यक्रम संपायला रात्रीचे साडेबारा वाजले हे सांगायला नकोच. निकाल सांगण्यापूर्वी सगळ्या म्हणजे जवळपास चारशे कलाकाराना स्टेजवर आणण्यात आलं. आमच्या ग्रूपला Costumes चं बक्षिस जाहिर झालं तेव्हा त्यांना इतर काही मिळणार नाही असं वाटायला लागलं. आम्हाला दुसर्‍या क्रमांकाचं ही बक्षिस मिळालं तेव्हा मुलानी महिमाला बाजूला ढकलून स्टेजवर नाचून घेतलं.

BTW , आमच्या ग्रूपच्या मुलानी, ' मेरा नाम चिन चिन चू' हे कृष्णधवल काळातलं गाणं सादर केलं, आणि कदाचीत वेगळं असल्यामुळे ते तिला जास्त आवडलं. पहिलं बक्षिस मिळालं ते एक लहान मुलांच्या ग्रूपला.. त्यात पाच सहा वर्षां पासूनची चाळीस मुलं होती.. मोठ्यांमध्ये बक्षिस मिळालं ' ताल' च्या ' इश्क बिना' पण मला मात्र स्वदेसचं गाणं जास्त भावलं....
' वो किस्ना है' गेल्या competition चे विजेते होते...



गुढी पाडव्याच्या निमित्ताने,

देवाला केलेली विनंती 'गार्‍हाणे' याचं मालवणीत 'गाराणां' होतं. गेल्या काही वर्षांपासून सणासुदीला किंवा मग गावाकडच्या आठवणी म्हणून आम्ही (गजालीकर आणि मुख्यतः मी मधून मधून एखादं गार्‍हाणं लिहितो.
या गुढीपाडव्यानिमित्त थोड्या जुन्या थोड्या नव्या पध्दतीना एकत्र करून हे नवीन गार्‍हाणं मी गजालीवर टाकलं होतं, पण तिथल्या गप्पा लवकरच वाहून जातात म्हणून ते इथे टाकतोय.. मालवणीत आहे पण समजून घ्यालच.. गम्मत म्हणून लिहिलंय तेव्हा दिवे घ्याच....

लेकरां हंय येवचां विसारली असतीत,
तेंका हंय येवची सुबुध्दी देवा....
पोपटाच्या BB वर पोपटपंची करणार्‍यांका,
चांगलां भविष्य आणि एक पोपट देवा...

लग्नाळूंची लग्ना होवंदे,
स्वप्नाळूंची स्वप्ना पुरी...
माशेवाल्यांका भरपूर माशे,
उरलेल्यांका श्रीखंड पूरी...

फणसाच्या कुवरेची स्वप्ना बघतत,
तेंका मिळाची सांगुळ भाजी...
बाकीची स्वप्ना बगणार्‍यांका,
मिळाची कर्ली आणि पापलेटा ताजी...

सोमवार पाळणार्‍यांका मंगळवारी माशे,
मंगळवार पाळण्यारांका बुधवारी कोमडो...
बुधवार पाळणार्‍यांक बाकीच्या दिवशी,
तिरफाळ घालून तिकल्यातलो बांगडो...

जोतिशवाल्यांका भविष्य दिसाचा,
पत्रिकेवरच्या चंद्र सुरयात....
बाकी सगळ्या गजालीकरांका,
मित्र भेटाचे गावा गावठाणात....

इतकीच विनंती देवा तुका,
सगळ्यांका सुखी ठेवा रे...
तुका कदी विसरा नये आमी,
अशी बुध्दी दी देवा आमका रे....
..END... :-)
चायनीज विनोद...

चायनीज जेवायला गेलात तर शेवटी मिळणार्‍या Fortune Cookie मध्ये मिळणारे सल्ले भन्नाट असतात.. बर्‍याच वेळा तत्वज्ञान असलं तरी काही वेळा विनोदही घडतात... काल एकांकिका संपवून घरी येताना चायनीज जेवायला गेलो, तिथे मला आलेलं Fortune

NIGHT LIFE BELONGS TO YOU...

गम्मत म्हणून मी माझं भविष्य? बायकोला वाचायला दिलं... तिने वाचलं, हसली आणि तिचं भविष्य मला वाचायला दिलं

Avoid Misunderstanding being calm and balanced... :-(
२००४ ची गोष्ट आहे. मराठी विश्व या न्यू जर्सीच्या मराठी मंडळाचा रौप्यमहोत्सव होता. त्यानिमित्ताने इथल्या मुलानी 'पुढे चालला काफ़िला' असा एक कार्यक्रम सादर केला. त्या कार्यक्रमाला 'सुयोग'चे श्री. सुधीर भट हजर होते. त्यांना तो कार्यक्रम खूपच आवडला, आणि त्यांनी त्या पन्नास मुलांचा गटाला भारतात येऊन हा कार्यक्रम सादर करायला आमंत्रण दिलं. कार्यक्रमाचे सुत्रधार होते माधवी, आणि प्रतीक देवस्थळी, कारण ही सगळी मुलं त्यांच्याकडे नृत्यकला शिकलेली. त्यांनी हे आमंत्रण स्वीकारलं आणि दिसेंबर २००४ ला अगदी नाताळच्या मुहुर्तावर पन्नास मुलं, आणि त्यांचे आईबाप जाऊन पोहोचले शिवाजी मंदीरला. कार्यक्रमाचं नांव होतं "My मराठी"
सहा दिवसात सात हाऊसफुल कार्यक्रम करून तो दौरा संपला आणि मुलं परत आली देखील. त्या कार्यक्रमाची VCD आता बाजारात आलेली आहे. खरं तर येऊन बरेच महिने झाले, पण मी इथे माहीती टाकायला विसरलो. आज GD ने (तोच पीतांबर फेम) आठवण करून दिली म्हणून इथे लिहिलं. तुम्हाला मिळाली तर बघायला विसरू नका. मी या कार्यक्रमाला स्टेजच्या मागे द्वारपाल म्हणून उभा होतो. पाहिलंच असेल तुम्ही मला




न्यू जर्सी एकांकिका स्पर्धेची सांगता केव्हाच झालेली असली, तरी दोन आठवड्यानी त्यातल्या तीन एकांकिका आणि न्यूयॉर्कची एक एकांकिका असा भरगच्छ कार्यक्रम न्युयॉर्कने ठेवला होता.

न्यूयॉर्कला कुठल्याही दिवशी जाणं हे अग्निदिव्य असतं. कुठली गाडी कुठल्या दिशेने तुमच्या अंगावर येईल हे सांगणं अशक्य. त्यात पुन्हा त्या पिवळ्या टॅक्सी म्हणजे रणगाडेच जनू. एकादी जवळून गेली तर मी वाट देतो. इकडे सगळीकडेच कावीळ. कोणाकोणाला वाट देऊ?

नशीब, न्यूयॉर्कवाल्यांनी कार्यक्रम रविवारी ठेवला होता. त्यांनाही बर्‍याच वर्षांचा अनुभव आहे. रविवार दुपार असल्याने ट्रॅफिक फार नव्हतं. या वाक्याचा अर्थ प्रत्येक शहरात वेगळा होतो. लोकल गाडीच्या आत, स्वतःचे दोन्ही पाय एकामेकांच्या शेजारी टेकवता आले, तर मुम्बईकर 'आज गर्दी नव्हती' असं म्हणतो तसाच काहीसा प्रकार.

आम्ही वेळेच्या आधी पोहोचण्यासाठी दोन तास आधी निघालो आणि दिड तासात त्या भागात पोहोचलो देखील. फक्त तिथे पोहोचल्यावर ते नाट्यगृह शोधायला दोन तीन लोकांची मदत घ्यावी लागली. अगदी शाळेसमोर असुनही 'शाळा कुठे आहे हो' हा प्रश्न आम्ही ज्या बाईला विचारला तिने 'येडं का खुळं' असं आमच्याकडे पाहून आम्हाला मदत केली.

समस्त न्युयॉर्कर मंडळी अजून पोहोचली नव्हती. 'चिमणे चिमणे दार उधड' ची चक्री चालली होती. (नाटकवाले एकत्र येऊन आपापले संवाद फक्त म्हणतात त्याला चक्री म्हणतात, गैरसमज नसावा). हजर असलेल्या कमिटी मेंबरांनी काहीतरी खाऊन घ्या हो, असं म्हणत आम्हाला समोसे आणि ढोकळा खायला घातला.

तीन वाजेपर्यंत थेटरात फारसे प्रेक्षक आले नव्हते, त्यामुळे कार्यक्रम सुरू कधी होणार हा प्रश्न होताच. मग खबर मिळाली की मिक्सर बंद पडला आहे, आणि तो बदलल्याशिवाय कार्यक्रम सुरू होणार होता. अनिलभाईंना मिक्सर म्हणजे किचन मधला मिक्सर वाटला. नाटकात मिक्सर कशाला हवा, हा त्यांचा प्रश्न. समोसे वगैरे खाऊन झाल्यामुळे आता पुन्हा काय तयारी करायची असा त्यांना प्रश्न पडला. जाऊन कमिटीवाल्यांना विचारणार होते पण या मिक्सरचा संबंध Sound शी आहे हे लक्षात आल्यावर थांबले.

मग एक मिक्सर विकत घ्यायला, एक मिक्सर भाड्याने घ्यायला आणि तिसरा आहे तो मिक्सर चालू करायला, असं करून तीन माणसं तीन दिशेला धावली. या सगळ्या गडबडीत पाच वाजले, तीन मिक्सर आले आणि अर्धं सभागृह भरलं आणि कार्यक्रमाला सुरूवात झाली.

'चिमणे चिमणे' नं मात्र निराशा केली. संवाद होते पण ते एकाच वेगात म्हटले जात होते. नायिका स्टेजच्या खूप पुढे येऊन बोलत होती, त्यामुळे तिच्या चेहर्‍यावर काळोख. त्यात बर्‍याच ठिकाणी हातांची हालचाल कृत्रिम वाटत होती. विनोदी एकांकिका असली तरी हसे फारसे नव्हते. एकंदरीत पहिलाच प्रयत्न असावा असं वाटून गेलं, त्यात sound चा पण problem होताच. मध्ये एक दोनदा प्रेक्षकानी 'आवाज आवाज' असं ओरडून त्यांना जाणीव करून दिली. त्या नाटकात खूप काही करता आलं असतं.

पहिली एकांकिका पाहून उरलेल्या एकांकिकेच्या लोकांनी लाईट आणि साऊंडच्या जागा निश्चित करून घेतल्या. त्यामुळे त्यांना याचा काहीच त्रास झाला नाही.

खाण्यापिण्याची व्यवस्था मात्र उत्तम होती. बटाटेवडे, काजूकतली, समोसे, ढोकळा, शिरा, उपमा, गरम गरम कचोरी आणि बरंच काही.. तुम्हाला मात्र टूक टूक.


आत्ता मस्ती नावाच्या एका भरतीय Restaurant ला जाऊन आलो. खरं तर घरी जेवण तयार होतं पण तरी चार मित्र चाललेत म्हणून मीही गेलो. मुळात मराठी माणसं ह्या धंद्यात नसतात. त्यात देसाई नावाच्या गाववाल्याचं आहे म्हणून थोडा उत्साह दाखवला. खरं तर बायकोने दोन वार्षांपूर्वी तिथे जाऊन आल्यानंतर 'जेवण चांगलं नाही, अजिबात जाऊ नकोस,' असं सांगितलं होतं पण आता दोन वर्षांनी कितीतरी बदल होऊ शकतात या विचाराने गेलो.
Restaurant ला Trenton Times चं अवॉर्ड, New York Times चं अवॉर्ड अशा मस्त जाहिराती ठेवल्या होत्या. आम्ही धरून आठ दहा माणसं होती तिकडे. बुफे जेवण आणि भूक लागलेली तेव्हा लगेच जेवायला घेतलं

तीन चार दिवसांपूर्वी केलेली भाजी, ती पण परत परत गरम करून फ्रीज मध्ये टाकली तर कशी चोथापाणी होऊन नासते ते साग्पनीरचं झालं होतं. आलूगोबीची परिस्थीती याहून वेगळी नव्हती. चिकन तंदुरी खाणार्‍यांचे दात हातात येतील अशी चिवट तंदूरी (मी चिकन खात नाही). त्याला चवही नसावी.
चांगलं काय होतं या प्रश्नाला एकच उत्तर पाणी. जेवणाचा विचका झाला. वेटरला बोलावलं. त्याला भाजी नासल्याची बातमी दिली. 'बघतो' म्हणाला पण आम्ही निघेपर्यंत भाजी तिथेच होती, तेव्हा ती अजून काही दिवस वाढली जाईल याची खात्री आहे. Suggestion Card वर शिव्या घालून आलो, तरी त्याने फारसा फरक पडेल असं वाटत नाही.

निश्कर्षः गाववाला मराठी माणूस म्हणून पुळका आला तरी बायकोचं ऐकावं माणसाने. शेवटी पोटाचा प्रश्न आहे...




AMWAY एक कटकट

अमेरिकेत नुकताच आलो होतो. लायसनचं काम होतं म्हणून घरी लवकर चाललो होतो. एक मिस्त्री नामक माणूस भेटला. बस रिकामी होती तरी माझ्या सीटवर बसला, आणि त्याने सुरुवात केली. मी City मध्ये नोकरी करतो, पण तो माझा Side Business आहे. माझा मेन धंदा म्हणजे आयुष्याची सोय. वगैरे वगैरे वगैरे. फक्त तो काय धंदा करतो हे मात्र सांगेना. मला वाटलं गांजा, गर्द किंवा तत्सम काही विकत बिकत असेल, म्हणून मी त्याच्याकडे संशयाने पाहिलं पण तो त्यातला वाटला नाही. तुला मी धंद्यात कसं पडायचं ते शिकवेन, त्यात किती फायदा होतो ते बघ, आयुष्यभर नोकरी करावी लागणार नाही, या त्याच्या बाता ऐकून माझी तर खात्री झाली की हा अमली पदार्थ नक्कीच विकत असावा. अनोळखी माणसाला लगेच 'आयुष्याची ददात मिटवणारा मार्ग दाखवणारा हा दिवेधारी कुठून आला', याचा विचार करत मी घरी गेलो. त्यानंतर काही दिवसानी मला दुसरा एक तसलाच महाभाग भेटला. Ikea मध्ये काहीतरी बघत होतो, तर लगेच ओळख करून घ्यायला आला. मी Networking करतो, घरी बसून धंदा..

तिसर्‍या दिवशी तो आणि त्याची बायको Appointment घेऊन माझ्या घरी हजर. मलाही जरा उत्सुकता होती, की हा धंदा असा काय की सगळेच भारतीय त्यात धपाधप पडता आहेत. बायकोने आमच्या मुलीला ताब्यात घेतलं, आणि नवर्‍याने ब्रीफकेस उघडली आणि माझी आणि Amway ची पहिली सलामी झाली.

'हे kit वापरून तो अमका लखपती झाला'
'ही योजना हाती घेऊन त्या अमक्याने नोकरी सोडली, आणि गेल्यावर्षी दिड लाख डॉलर कमावले' असे एकापेक्षा एक मोठमोठे पुरावे तो सादर करू लागला. (मला सदू आणि दादू आठवलं, Original पुलंचं) आज तुम्ही Kit घ्या उघ्यापासून तुमच्या घरी चेक यायला लागतील. फक्त त्यासाठी आपण एक मिटींगला गळ्यात टाय घालून जाऊन बसायचं आहे. लहान बाळाला आम्ही संभाळतो.

काय आहे, कधी तीन चार लाख डॉलरच काय, रुपये पण एकदम माझ्या हातात आले नसल्याने मी त्यावर विश्वास ठेवला नाही.

'पण योजना तरी काय आहे?'

'आपण मेंबर व्हायचं की असं Kit आपल्याला मिळणार. त्यात असलेली Cassette ऐकायची म्हणजे Networking शिकायचं आणि फक्त सहा इतर कुटुंबाना आपण Recruit करायचं.

'फक्त सहा?'

'मग ते पुढचे छत्तीस करतीलच.. आणि त्यानी पुढचे प्रत्येकी सहा केले की त्या सगळ्यानी जी जी खरेदी केली त्याचे दोन टक्के तुम्हाला. म्हणजे बघा छत्तीस सक किती? दोनशे सोळा कुटुम्ब झाली. त्यातल्या प्रत्येकाने जर महिन्याला दोनशे डॉलर खर्च केले तर त्याचे दोन टक्के म्हणजे चार डॉलर तुम्हाला, म्हणजे पहिल्यांदा 900 डॉलर पासून सुरूवात. आणि तुम्ही जेवढे जास्त लोक जमवाल, त्यांचे दोन दोन टक्के म्हणजे तो अमुक बघा, तो घर बसल्या दोन लाख डॉलर कमावतो..

'अरेच्चा, एकदम Solid Scheme दिसतेय..'

'नुसता फायदाच फायदा... आपण फक्त त्यांना हव्या असलेल्या वस्तूंची माहीती कंपनीला पाठवायची, वस्तू त्यांच्या घरी आणि दोन टक्के तुम्हाला... आणि दोन दोन टक्के मधल्या चार Agent ना...'

'पण मग ती वस्तू त्यांना महाग नाही का पडणार? कंपनी थोडीच आपला नफा सोडतीय..'

'पडणार ना.. पण त्यांना दोन टक्के मिळायला लागल्यावर त्यांना काय फरक पडतो?'

'पटलं.. पण काय रे, उद्या मला बाजारात जाऊन समजा टुथपेस्ट घ्यावी वाटली तर?'

'आपण सगळे एका Group चे, मग बाजारात जाऊन वेळ कशाला वाया घालवायचा? फक्त आपल्या DD ला, म्हणजे Drug Dealer नव्हे बरं का, Direct Dealer ला कळवायचं की तो पेस्ट पाठवणार. मी तर बायकोला सांगितलं आहे मी आता कुपनं कापणार नाही, आणि बाजारात शॉपिन्ग करणार नाही. आपण फक्त Networking करायचं'

'पण म्हणजे नक्की काय करायचं?'

'ते तुला Seminar ला आल्यावर कळेल. जागा मिळत नाही हां तिकडे, तेव्हा आजच बुकिंग करायचं आहे.'

माझा अचानक करोडपती होण्याचा चांस पुढच्या पाच मिनिटात जाणार? हे बघून तो अगदी हातघाईला आला. पण मी कोकणी माणूस, त्यात पुण्यात जन्मलेला, तेव्हा शंका यायलाच हव्यात...

'पण ही म्हणजे Pyramid scheme झाली..,' नियमात राहून बनवाबनवी करण्यासाठी वापरता येणारी ही एक Popular Scheme आहे...

क्रमशः





Pyramid Scheme आणि माझी ओळख अगदी शाळेत असताना झाली. त्यावेळी असली एक स्कीम आली होती. तेव्हा थोडासा संतोषीमातेसारखा प्रकार असायचा. म्हणजे पोस्टकार्डाच्या एका बाजुला माहीती देणारा मजकूर. आणि दुसर्‍या बाजुला चार पत्ते. त्यातल्या पहिल्या पत्त्यावर आपण एका रुपयाची मनिऑर्डर पाठवायची (तेव्हा पाच पैसे खर्च होता मनिऑर्डरचा) आणि मग उरलेले तीन पत्ते वर सरकवून आपला पत्ता लिहायचा. आणि ते पत्र चार लोकाना पाठवायचं. मग तुम्हाला 256 रुपये मिळणार.
फक्त चालूपणा करून मी माझ्याच मित्रांचे पत्ते लिहून कार्ड पाठवली तर? हा प्रश्न मला पडला. कुणीतरी केलं पण असावं कारण ती स्कीम बंद झाली. पुढे काही दिल्लीवाल्या कंपन्यानी हाच धंदा मुख्यतः स्टीलची भांडी विकण्यासाठी केला. फक्त आता हे पैसे कंपनीच्या खात्यात जमा होऊ लागले. आणि नियम असे की तुम्ही कोर्टात गेलात तरी त्यांचं काहीही वाकडं करू शकत नाही. नव्वदाच्या दशकात सावंतवाडी मध्ये 'आज हजार रुपये भरा, आणि मित्राना सांगा, आणि आठ दिवसात आठ हजारचा टी. व्ही. घेऊन जा' या स्कीम मध्ये चांगली चांगली शिकलेली माणसं अडकलेली पाहिली.
जपानी गाद्या हा असाच एक धंदा. आज मेंबर व्हा, आठ दिवसात दारात मारुती गाडी. पहिल्या दिवशी जे मेंबर झाले ते आठव्या दिवशी गाडी घेऊन फिरले. मग तीन चार हजार किमतीची जपानी गादी घ्यायला बर्‍याच लोकानी एक एक लाख भरले, आणि पुढचे काही महिने 'आपल्या लाखाचं काय होणार' या विचारात त्याच गादीवर तळमळत काढल्या. वरती 'काय मस्त झोप लागते' असं सांगत
मित्रांना अडकवायचा प्रयत्न जागरणाने लाल झालेले डोळे चोळत करत राहिले.

गणिताचा हा नियम खरं तर सोपा आहे. पण भरपूर गणित शिकलेल्या माणसाच्याही ते डोक्यात येत नाही. Raise to हा जो प्रकार आहे तो फार फसवा आहे. एकाच्या सहापट सहा, आणि सहाच्या सहापट छत्तिस. पण पुढे अशा पटी करत गेलात तर लवकरच तो आकडा कोटी, अब्ज, खर्व वगैरेत जातो. एकदा एक ज्यू आणि मारवाडी तीस दिवसांचा करार करतात. त्यात ज्यू माणूस मारवाड्याला रोज एक लाख रुपये देणार, आणि मारवाडी पहिल्या दिवशी एक रुपया, दुसर्‍यादिवशी दोन असं करत करत रोज दुप्पट करणार असं ठरतं. असं एक विनोदवजा गणितही होतं कुठेतरी.
(मारवाडी असे फसत नाहीत, तो दुसरा माणूस कारकून असावा). पण अगदी दोनचा तिसावा घात, हा खरोखर घात का असतो हे तेव्हा कळतं.

भारताची सगळी लोकसंख्या (१०० कोटी) घेऊन, आणि त्यातले 30% लोक म्हणजे ३० कोटी लोक शहरात रहातात असं धरा. त्यात प्रत्येक कुटुंबात चारच माणसं, म्हणजे 7.5 कोटी कुटुंबं झाली.. त्यातले अर्धे रोजमजुरीवर जगतात, तेव्हा तुम्हाला साडेतीन चार कोटी कुटुम्ब मिळतील.. आता सहाला सहाने गुणायला सुरुवात करा. म्हणजे आपल्या लक्षात येईल, की या Pyramid च्या वरचा आठ किंवा नऊ थराना पुरतील इतकी कुटुम्ब आहेत. त्यापुढे येणार्‍या लोकाना काहीही मिळणार नाही. आणि या लोकांनी बाजारात जाऊन खरेदी केली की कुणालाच काही मिळणार नाही.

एवढं कळून सुद्धा माणसं त्यात का पडतात? याला कारण फसवला जाताना माणुस विचार करत नाही. आणि एकदा फसला, की मग तो इतरांना फसवू पाहतो. मग हेच करायचं असेल तर चार पाच मित्र एकत्र येऊन हा धंदा सुरू करा. निदान त्या पिरॅमिडमध्ये तुम्ही वरती असाल.

मी त्या माणसाला घराबाहेर काढलं. शक्यतो मी कुणाशी उध्धटासारखा वागत नाही पण वागलो. त्याने पुढे पुन्हा दोन तीनदा फोन करून मला भेटण्याचा प्रयत्न केला. मग त्याला शिव्या देऊन मी बंद केला. पण हा झाला तात्पुरता उपाय. त्यानंतर पुन्हा जवळचे नातेवाईक, मित्र असल्या स्कीम घेऊन फिरताना दिसलेच. जगातल्या प्रत्येक माणसाला शहाणं करणं खूप कठीण असतं हे तेव्हा पटलं.

एक दिवस पार्क मध्ये माझ्या मुलीला घेऊन खेळवायला गेलो. जवळच एक थोड्या वयस्कर बाई बसल्या होत्या. भारतीय दिसतात म्हणून मी त्यांना Hi - Hello म्हटलं.
"I don't want to meet Amway people" असं म्हणत त्या बाईनी उठून तरा तरा चालू लागल्या...






कालची गोष्ट.. सकाळीच उठून क्रिकेट खेळायला गेलो. आमच्या मैदानाच्या दिशेला वळत होतो, एवढ्यात STOP Sign ला धरून उभ्या असलेल्या एक आज्जी दिसल्या. वयाने असतील पंच्यात्तरीच्या. काहीतरी त्रास होत असावा, कारण त्या बर्‍याच घाबरलेल्या, रडकुंडीला आलेल्या दिसल्या. काहीतरी Health Problem असावा असं वाटलं. गाडी थांबवली, आणि चौकशी केली.

Health चा काहीच Problem नव्हता, पण Problem होता भाषेचा. परवाच कलकत्त्याहून आल्या होत्या, आणि बंगालीशिवाय कोणतीच भाषा येत नव्हती. सकाळी फिरायला बाहेर पडल्या, पण आता घर सापडत नव्हतं. मुलाचं पत्ता, फोननंबर काहीच त्यांच्या जवळ नव्हतं.

Maximum 30 min हेच पुन्हा पुन्हा सांगत होत्या. आता मी राहतो ती Community तशी ३५० घरांची आहे. आणि अर्ध्या तासात एका टोकाकडून दुसर्‍या टोकापर्यंत कुठेही जाता येतं. त्यामुळे घरनंबर, नांव पत्ता काहीतरी माहित असणं महत्वाचं होतं.. त्यांना फक्त बावीस नंबरचं घर आठवत होतं. आडनांव चॅटर्जी हे कळलं, तरी पहिलं नाव सुजय, सुजीत, शुजोत हे चार वेळा विचारून सुध्दा मला समजलं नाही.

जिथे सापडल्या, त्याच रस्त्यावरचं बावीस नंबरचं घर दाखवलं. Everything Same म्हणजे घराघरातला फरक त्यांना कळेना. तरी हिम्मत केली आणि बेल वाजवली. घरातून एक गोरा माणुस आला, आणि त्याने नम्रपणे आम्हाला वाटेला लावलं. आज्जी गाडीत बसल्या होत्या तरी रडत होत्या. आम्ही त्यांना 'शांत करण्याचा प्रयत्न' आणि घर शोधण्याचा प्रयत्न असे एकाच वेळी करत होतो.

शेवटी एका मित्राच्या शेजारी बावीस नंबरच्या घरात एक बंगाली रहातो ते आठवलं. त्यांच्या घरी गेलो तर दारावर पाटी, चक्रवर्ती. रविवारी सकाळी कुणाला भल्या पहाटे आठ वाजता उठवू नये, हा संकेत खुंटीला टांगला, आणि बेल वाजवली. तो स्वतः चॅटर्जी नसला तरी कोणी बंगाली माणसं ओळखीची असतील, निदान त्या बाईंना असलेली माहिती तो आम्हाला सांगेल असं वाटलं. पण बराच वेळ बेल मारूनही कुणीच बाहेर आलं नाही. आज्जींची अखंड बडबड चालू होती, पण बावीस नंबरचं घर एवढंच कळत होतं.

Operator ला फोन केला असता तर निदान पहिलं नांव माहिती हवं होतं. शेवटी आज्जीना गाडीत घालून प्रत्येक बावीस नंबरच्या घराची बेल वाजवायची हाच एक पर्याय उरला. या रविवारी सगळे मला शिव्या देत उठणार हे ठरलंच होतं.

शेवटी एकदाचं एक घर सापडलं. आज्जीनाही ते ओळखीचं वाटू लागलं. मग त्यांनीच बेल मारली. दोन चार मिनिटं थांबलो तरी कुणी बाहेर आलं नाही. आज्जीनी दार ठोकायला सुरूवात केली. चुकीचं घर असेल तर आपली काही धडगत नाही, म्हणून जरा लांबच उभे राहिलो. आज्जींना विचारलं, 'तुम्हाला नक्की आठवतंय का घर?'.

' Flowers ,' आज्जींनी घरासमोरच्या फुलांकडे बोट केलं. या मोसमात सगळ्या घरांसमोर फुलझाडं असतात. तेव्हा 'बेल वाजवा, पण दरवाजे ठोकू नका' अशी त्यांना विनंती केली. पाच मिनिटानी एका बंगाली माणसाने दार उघडलं.

आज्जींना बघून त्याच्या कपाळाल्या आठ्या पडल्या. झोपेतून उठवल्यामुळे तो भलताच वैतागलेला होता. पुन्हा असं होऊ नये, म्हणून माझ्या मित्राने,

"Give her your phone Number, Address.. something Written," असही Request केली.

Thanks, But next Time you find her , don't help her. हे उत्तर मिळालं.

आज्जी त्याला काहीतरी सांगण्याच्या प्रयत्नात होत्या, पण लगेच

"You shutup. You just Shutup" असं तिच्या अंगावर ओरडत त्याने धाडकन दार बंद करून घेतलं. परोपकारी गंपूच्या कानाखाली गणपती काढल्यागत वाटलं.



आमंत्रणं झाली, विनवण्या झाल्या... रुसवे फुगवे पार पडले तरी NJ च्या नशिबी ए. वि. ए. ठि. नाही ते नाहीच. नुसतं नांव काढावं आणि NJ करांनी 'मैं ससुराल नही जाऊंगी' सारखं 'मै GTG नही आउंगा / गी' अशी कारणं शोधायला निघावं. मग मला कॉलेजमध्ये लाडू करायला जायचंय, पासून मुलांचा अभ्यास, मुलीचं लग्न, मोडलेले हातपाय, हनिमून, बिघडलेली पोटं, डोकी, गाड्या, गराजमध्ये पडलेल्या गाड्या, राशीभविष्य (दिवसा प्रवास करू नये), बंद पडलेलं सरकार, चालू असलेला बाजार, नायगारा पासून असंख्य कारण सांगितली गेली. ए. वि. ए. ठी च्या शेपटापेक्षा, कारणाचा हत्ती इतका मोठा झाला, की न -NJ करांनी जाता येता टपल्या मारणे, खवचटपणा करणे, तिरकस बोलणे असे प्रकार सुरू केले आणि शेपुट नको पण हत्ती आवर अशी परिस्थिती झाली.

मी या आठवड्यात NJ मध्येच होतो, आणि कर्म धर्म संयोगाने Admin (अजय) चा फोन आला. नेहमी 'हो' म्हणणारे अनिलभाई यावेळी 'हो... पण.. नाही.. पण हो' करत हो म्हणाले (हा त्यानी दिलेल्या उत्तराचा शब्दशः क्रम आहे, ते कदाचित नंतर Categorically Deny करतील म्हणून सांगून ठेवतो.

तेव्हा अजय, मी, आणि अनिलभाई यांचं GTG का होत नाही याविषयावर चर्चा करत मस्त GTG झालं. अर्थात जेवता जेवता. जेवणाचा मेन्यूच हवा असेल तर 'झोपडी' चा मेन्यू बघावा.

चर्चेचा विषय हवा असेल 'तर आपण सोडून सर्व काही' विषयांवर चर्चा झाली (या वाक्याचा अर्थ कसाही घ्यावा)

आता इतरांच्या करमणुकीसाठी.. NRI अंताक्षरीसाठी आलेला अन्नू कपुर भेटला. मी काही वर्षांपूर्वी त्याला जर्मनीत भेटलो होतो. त्याची त्याला आठवण करून दिली. आम्ही मराठी आहोत, हे कळल्यावर त्याने मराठी बोलायला सुरूवात केली. महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे, आणि 'मी जो काही आहे, त्याचं श्रेय महाराष्ट्राला आहे' असं म्हणाला. त्याला स्वतःला सर्जन होण्याची इच्छा होती, पण चुकून या क्षेत्रात आला. (हे ऐकल्यावर मला पु. लं चं गवयाला पहेलवान, पहेलवानाला डॉक्टर, आणि डॉटरला गवई व्ह्यायची इच्छा होती.... ते आठवलं). त्याच्याशी आजून काही बोलावं असा एक विचार पुढे आला, पण त्याच्या हातात सतत जळती सिगरेट पाहून काही लोकांचा भ्रमनिरास झाला... मग थोडाच वेळ त्याच्याशी गप्पा मारून आम्ही ए. वि. ए. ठि. संपल्याचं जाहीर केलं.

या पुढे जमताना असे मिनि ए. वि. ए. ठि. करावेत असं ठरत आहे. अजय मात्र आता कोणा कोणाच्या मराठीतून शिव्या खाव्या लागतील त्या गहन विचारात पडल्या सारखा वाटला. मी त्याआधीच मायबोलीचा T-Shirt घालून त्याच्यासमोर मिरवून घेतलं होतं म्हणून बरं... नाहीतर.....

(दिवे घ्यालच)

दोन तीन आठवड्यापूर्वीची गोष्ट. सकाळी साडे अकराचा शो 'क्रिश' नामक हिंदी सिनेमाचा (सिनेमाचं पूर्ण नांव लिहिलं नाही तर लोक 'K म्हणजे काय. नीट लिहा की... असं म्हणतील'). आधी मला वाटलं 'बारीक कसं व्हावं' या विषयावर पण लोक चित्रपट काढतात की काय? आपल्या मराठीतल्या ऋषीचा हिंदी रिशी होतो, तसं आपलं 'कृश' चा 'क्रिश' झाला असेल. थेटरवर गेल्यावर कळलं की कुण्या बारीक माणसाची श्टोरी नाही. ते कुणाचं तरी नांव आहे. 'हल्ली अमेरिकन नांव द्यायची पध्दत निघाली आहे' असा विचार येतो तेवढ्यात कन्येने कृष्णाचा क्रिशशी बादरायण सम्बंध जोडून दाखवला.

थेटरवर कुत्रंही नव्हतं, म्हणजे पिक्चर पडेल असणार, मी अंदाज बांधला. हल्ली नवीन आणि महागड्या थेटरावर कुत्री नसतात म्हणा. सिनेमा सुरू झाल्यानंतर देखील थेटरात अमेरिकन थेटरासारखा शुकशुकाट होता. तिकिट काढायला गेलो, तर रांगेत माझ्यापुढे एकच माणूस होता. त्याचं काम झालं, मग मी पुढे झालो. सवयीप्रमाणे हातात योग्य ते पैसे आधीच काढून तयार होतो. हातातले पैसे पुढे करत 'तीन तिकिटं द्या' म्हणेपर्यंत एक तरुण आणि एक तरुणी अचानक कुठून तरी उपटले आणि आपले पैसे माझ्यापुढे घुसवत तिकिटं काढायचा प्रयत्न करू लागले.त्यांना जरा नजरेने झापावं म्हणून एक नजर टाकली, पण कानाला लावलेल्या सेलफोनमुळे त्यांना फारसा फरक पडला नाही.

दिसायला चांगल्या घरातले वाटले. दिडशे रुपयाला एक, अशी तिकिटं काढणारे सुसंकृत नसतील कधाचित तरी अगदीच अशिक्षित नसावेत. मुळात मागे, आजुबाजुला अजिबात गर्दी नसताना दुसर्‍या माणसाला बाजुला करून तिकिट काढायचा अट्टाहास का? काही कळलं नाही. हाच प्रकार दोन दिवसानी 'दिनानाथ'ला. नाटक होतं, मराठी होतं, पण मी तिकिट काढेपर्यंत एक सेकंद देखील दुसर्‍याला थांबणं मान्य नव्हतं.

मग आठवली Reader's Digest ने केलेली ती पहाणी. जगात सगळ्यात उध्दट शहर म्हणून मुम्बईचं कमावलेलं नांव. त्यावर इथे मायबोलीवर थोडी फार चर्चा झाली होती.

मुम्बईकर सदैव घाईतच असतो हे जरी मान्य केलं तरी ती घाई त्याला इतका निष्काळजी का बनवते? आणि जर तो असाच आहे, तर मग स्फोटात सापडलेल्या आपल्या सहप्रवाश्याना मदत करणारा, आणि पुरात अडकलेल्या अनोळखी माणसाना घरातले खाणे पिणे आणून देणारा तो मुम्बईकर कोण? की तो मुम्बईकर नाहीच? म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येणारे काही मुम्बईकर सोडले, तर इतर सगळे त्या स्फोटांनंतर

'आता स्फोट झालाच आहे, तेव्हा इथे थांबण्यापेक्षा आपल्याला पहिली रिक्षा पकडता येईल' म्हणून तसेच पळाले असतील का?

की समोरचा मरणपंथाला लागेपर्यंत मुम्बईकर लक्षच देत नाही. ह्याला नक्की काय म्हणावे?

१. Rat race जी प्रत्येक मुम्बईकराला अशीच धावत ठेवते (धावे त्याला शक्ती मिळे आणि रस्ता सापडे?)
२. उध्धटपणा? माझं काम झाल्याशी कारण. इतर गेले x.x.x.x त.
३. नेहमीची सवय. समोरून येणारी बस जर रिकामी असेल तर कंडक्टरला धक्का मारून चढेन... कारण बस रिकामी असलेली मी कधी पाहिलेलीच नाही.

विचार करायला हवा.....



जयदेव जयदेव जय गणपतीदेवा,
तुमच्या नांवाने हो चालली स्वसेवा...
पालिकेची खाती चढाओढ करिती,
इकडे खड्डे तिकडे, फोनवाल्यांची भीती...जयदेव जयदेव

नको दर्शन चंद्राचे, मान खाली घालतो,
खड्ड्यातल्या पाण्यात चंद्रच तो दिसतो... जयदेव जयदेव

सुरस्त्याचे आश्वासन आम्हा मिळाले,
खड्डे चुकविता तोंडी, पाणी पळाले... जयदेव जयदेव

लोटांगणे घालीन मनी आशा ठेवितो,
खड्ड्यातले लोटांगण तुझ्या पायी वाहतो... जयदेव जयदेव

दिंड्या पताकांचा काळ हा गेला...
'आशिक बनाया'चा जयघोष तुला... जयदेव जयदेव

तुमच्या चरणी आता हीच प्रार्थना,
बंद करा तुम्ही, तुमच्याच काना.. जयदेव जयदेव

गम्मत म्हणून लिहिल्यामुळे, गणेशोत्सवाच्या आरत्यामध्ये टाकली नाही.. (मी पुण्यातले खड्डे पाहिलेले नाहीत, इतरांचे अणभव.. दुसरं काय) :-)



अर्थाचा अनर्थ

एवढ्या दोन शब्दात NJ च्या या ए. वि. ए. ठी. चं वर्णन करता येईल... वृत्तांत मिळणार नाही अशी सज्जड तंबी दिल्यामुळे, एकावेळी एक मग दोन मग अनेक प्रश्न विचारून काही व्यक्ती दुसर्‍याचा पदरामागे लपून वृत्तांत काढण्याच्या विचारात आहेत. त्यांचे हे प्रयत्न तत्काळ हाणून पाडणे आवश्यक आहे, पण अशी व्यक्ती (एकवचन) किंवा अश्या व्यक्ती (अनेकवचन) मायबोलीवर मुक्तसंचारी असल्यामुळे, किंवा स्वतःच पदरवाल्या असल्यामुळे, हाणून पाडण्याच्या बेतास तुर्तास स्थगिती द्यावी लागत आहे. ए. वे. ए. ठि. झालं हे खरं पण तो निव्वळ योगायोग असावा. कारण या व्यक्तीनी येणार की न येणार हे लपवून ठेऊन फक्त लांबून गम्मत बघायचा घाट घातला असावा.

ऐनवेळी मात्र मंदार आणि अनिलभाई सोडले तर कोणीही मायबोलीकर तिथे दिसले नाही. झक्की हे आधी 'लिकर' असली तरच 'मायबो' असल्यामुळे ते येणार नाहीत अशी खात्री पटली होती. मंदारची ओळख करून घेत असतानाच मराठीविश्वाचे आजी अध्यक्ष यानी जरा स्वयंसेवकांची गरज आहे अशी विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन, मान खाली घालून आम्ही त्यांच्या मागे गेलो. मान वर केली तर साक्षात आनंदराव नामक व्यक्ती हाता झारा घेऊन ढोकळे वाढण्याच्या पवित्र्यात उभी राहिलेली दिसली. खरं तर हातातला झारा बघून आम्ही मागच्या मागे पळणार होतो, पण मंदार पुण्याचा आहे हे तेव्हा पर्यंत मला कळालेलं नव्हतं. आनंदरावानी याआधी कधी झारा किंवा तत्सम पाकसिद्धी आयुध हातात धरले नसल्यामुळे ते 'झारा चालवण्यासाठी' तो हातात घेऊन उभे होते. त्यांची ती पध्दत बघून पळ काढावा वाटला, पण एकीकडे बायका (आनंदरावांच्या एकीकडे) आणि एकीकडे जेवण असा प्रकार झाल्याने इकडे आड तिकडे आडवा' अशी काहीशी वेळ आली. एक दोनदा मनाई करूनसुध्दा आनंदरावानी झारा सोडला नाही, तेव्हा तिथल्या ऑफिसिअल वाढप्याने, आता हाताने ढोकळा वाढा म्हणून सांगितले ना? अशी तंबी देऊन पाहिली.

'भरपूर मिरच्या' आणि त्यामध्ये ढोकळे असा काहीसा प्रकार त्यांच्या वाट्याला आल्यामुळे आनंदरावांनी नुसत्या मिरच्या वाढून त्यावर हवा असलाच तर एक ढोकळा अशी पध्दत चालू केली. असं करूनही मिरच्या खपल्या नाहीत म्हणून 'एका ढोकळ्यास दोन मिरच्या', 'एका ढोकळ्यास तीन मिरच्या' असा सेल लाऊन पाहिला. अगदी चार दोन वर्षांच्या मुलांना देखील मिरच्या वाढण्याचा प्रयत्न झाला.
त्या ठिकाणी आलेल्या पुणेकरांना 'मिरच्या खाऊन बघा, तुम्ही गोड माणसं, थोडा बॅलंस हवा' असं सांगून बघितलं.

असो, हाती मिरच्या आल्यातरी मागे न हटता त्या खपवण्यासाठी घेतलेल्या कष्टातच त्यांची सेवाभावी वृत्ती दिसून आली. पुढे त्या मिरच्यांचे त्यादिवशी आणि खाणार्‍यांचे दुसर्‍यादिवशी काय झालं ते ऐकायलाही थांबलो नाही, आणि दुसर्‍या रांगेत (नीट शिस्तीने उभा राहून) मी जेवण आटोपून घेतलं. याच कारणासाठी

MR मी म्हणत होतो की चौकशी आवर.. नाही जमलं ना? म्हणून वाचायला दिला हा रिपोर्ट


!!मालवण!!

सिंधुदुर्ग पाण्यामध्ये किल्ला
राजे शिवरायांनी बांधीला
मालवण पावन असा झाला
नाव देवुन सिंधुदुर्ग किल्ला

किल्ल्याच्या प्रवेशद्वारी कल्पवृक्षाला डहाळी
खावुन तृप्त व्हा, कोवळी मधुर शहाळी
चहुबाजुस आहे पाणीच पाणी खारे
पिण्यासाठी आत गोड पाण्याचे झरे

दांडी किनारी दिसती मच्छीमार बोटी
तिच आहे मालवणची खरी रोजी रोटी
जरीमरी कुंभारमाठ मालवणचे गेट
सोमवारी गजबजते आमची बाजारपेठ

तोंडवळी, तारकर्ली घनदाट सुरुची बनं
पाहुनिया प्रसन्न होतील बघा तुमची मनं
कोळंब, चिवला बिचचा बरा खारा वारा
दिवसभराचा तुमचा शीण जाईल सारा

देवबागची मासळी अन रेवताळ्याची भाजी
लालमातीत बहरलीत आंबा आणि काजी
सगळे पाहुन होणार नाही तुमच्या एकाच भेटीत
संध्याकाळी अवश्य या मांडवीवरील जेटी

-- कवी - बाबल पिंटो --

असा ह्या मालवण!! एकदातरी सगळ्यांनी जरुर भेट देवचा असा. गणपतीच्या निमित्तान गावाक जाणा झाल यंदा…. पावसाच्या दिवसातला गावाक जाणा खरच मन मोहुन टाकणारा आसता.. एकतर गावाक जाताना पावसान तयार झालले छोटे छोटे धबधबे लक्ष केंद्रीत करुन घेततच शिवाय निसर्गान ओढलली हिरवी शाल... जणु असा वाटता एखाद्या नव्या नवरीन नेसललो हिरवो कंच शालुच आसा आणि तो लेवुन निसर्ग नटलो हा.

आंम्ही रवतव कुंभारमाठ आणि आनंदव्हाळाच्या मदी. गेलय तेव्हा भाता पोसवान कापुक इलली.. हिरवाईची छटा थोडीशी पिवळसरपणाकडे झुकणारी. घरात मस्त गणपतीचा वातावरण! गणपतीकडे नवीन लग्ना ज्येंची होतत त्येंची पुजा आसता. शिवाय कसला गार्‍हाणा केला तर ती पुजा अशे एकच दिवशी आमच्याकडे २ पुजा होते. खुप बरा वाटला सांजच्याक भजना.. भजनबारीवाल्यांची. खुप दिवसांनी या सगळ्याचो पुन्हा - नुभव घेवन इलय.

गणपतीसाठी गेलय.. ८ दिवसांचीच रजा.. इतक्या कमी वास्तव्यात १ दाच मालवण बाजारात जावक मेळला. जयंत साळगावकरांनी बांदलला मेढ्यातला गणेश मंदीर खुपच चित्ताकर्शक आसा. गणपतीची सगळी मुर्ती सोन्याची.. मंदीर एकदम खुला खुला. मंदीराचे २ चार पायरे चडले काय २ गज सोंड उभरुन येणार्‍यांचा स्वागत करतत. मंदिराक शुभ्र धवल दगडात बांदला हा. मंदीरात मन प्रसन्न होता. बाजुकच गाबतांचो वाडो आसा. मच्छीमारी आजुनव तितकीशी चालु नाय झाल्याकारणान सगळ्यांचे मोठे मोठे होडये किनार्‍यार लायनीत बांदुन ठेवलले. थयसुन बंदरार गेलय. सांजची येळ आसल्याकारणान खुप दिवसान येळेरलो सुर्य - स्त बगुक गावलो. अगदी मस्त डोळ्यांचा पारणा फेडणारो!

दुसर्या दिवसाक मगे जरीमरीक जावन इलय. थयल्या गावकारान सुखशांतीसाठीचा गार्‍हाणा घातल्यान. थयलोव परीसर जरा जरा बदलता हा. घरा बांदुन लोका थय रवाक इलीत. पुर्वी फक्त थय देवुळ आणी आजुबाजुक उघडा माळरान होता.

आठ दिवसातले क्षण कसे पाखरासारखे उडान गेल कळलेच नायत म्हामदाव चुकला परत इलय पुन्हा मुंबयच्या या प्रवाही प्रवाहाच्या लाटेर स्वार होवक....
पुन्हा एकदा बाबलो पिंटो..

!! कोकण!!

कोकणात येवा आंबोलीक जावा, धबधब्यात न्हावा!
मालवणचो बांगडो खावा, खाजा घेवा, दर्यात थोडे पेवा!!
चारय बाजुक दर्यो आणी किल्ल्यात पाणी गोड!
उगाच नाय सगळ्याका सिंधुदुर्ग किल्ल्याबद्द्ल ओढ!!

वाडीचो डोंगर चढा, मोती तलाव फिरा, खेळणी घेवा लाकडी!
आरवलीचो वेतोबा, रेडीचो गणपती बघुक वाट करा वाकडी!!
आंबे, फणस, जांभळा, काजु, कोकणचो मेवो!
शिपये, मुले, तिसरे खरो रत्नागिरीचोच ठेवो!!

डोंगरमळे शेती, पोफळी, माडार नारळाचो भार!
गाडयेत्सुन बघीत येवा सगळा हिरव्या हिरव्या गार!!
नापरे, आंबोली धबधब्यासाठी पावसात तुंम्ही येवा!
तेरेखोल खाडी बघताना फेरीबोटीचोय अनुभव घेवा!!

डोंगरदरे, शेतीमळे, पार करुन कोकण रेल्वे सुरु झाली!
मुंबयपासुन गोव्या पर्यंत माणसा एकदम जवळ ईली!!
निसर्ग सौंदर्य म्हणतत ता तुंम्हीच डोल्यांनी बघा!
बघुन वगी र्‍हवा नको इतर लोकांका तुंम्ही सांगा!!

हकडे तकडे खयच जवक नको, कोकणच आमचा बरा!
कोकण बगुन पाय उचलाचो नाय, जावक तुमच्या घरा!
ज़ावक तुमच्या घरा!!

वरील लेख हा भावना गोवेकर यानी 'मालवण' या विषयावर लिहिलेला आहे.... Archieve व्हावा म्हणून इथे मी हलवलेला आहे...

मित्रानो,

एक विनंती आहे. आपल्यापैकी बरेच जण हिंदी सिनेमाच्या गाण्यांचे असे रसिक आहेत, की ज्याना बरीच गाणी पाठ असतात, सगळे शब्द माहित असतात, किंवा त्याचे गीतकार संगीतकार माहित असतात. इंटरनेटवर शोधलं तर बर्‍याच साईटवर फुटकळ गाणी सापडतात, पण ती सगळी हिंग्लिश मध्ये असतात. ITRANS सारखी सुंदर साईट आहे, पण ती गेल्या दशकात कुणी पुढे चालवलेली नाही. तेव्हा मनात एक विचार आला.
आपण स्वतः एक साईट तयार केली आणि त्यावर अस्या गाण्यांचे शब्द टाकले तर कित्येकाना उपयोग होईल.

सध्या प्रयोग म्हणून मला शम्भर दिडशे गाणी हवी आहेत. पण ती हवी आहेत आपल्या dev2 मध्ये, म्हणजे ती पटकन convert करून त्यांची JPG करता यईल.

तेव्हा तुम्हाला Interest असल्यास (काही जणाना तो नक्कीच असेल) मला प्रत्येक गाण्याच्या शब्दांबरोबर (सगळी कडवी) मला पुढिल माहिती पाठवा.

गायक, संगीतकार, गीतकार, आणि Contributer म्हणून तुम्हाला आवडेल असा Internet Id

पुढे या साईटची कल्पना नक्की झाली की मायबोलीवर link देता येईल..

मग करताय ना सुरूवात.. दिनेश, प्रिया, लालू, ललिता आणि तमाम अंताक्षरी गँग..

फक्त गाणं लिहिण्यापूर्वी ITRANS वर एकदा चेक करा, म्हणजे त्या गाण्याची पुनरावृत्ती होणार नाही..

गाणं मेलने पाठवायचं आहे, इथे पोस्ट करू नका Please

विनय


कधी कधी मित्रांची अशी एक टोळी जमते. गाण्याची हुक्की येते. मग कोणी पेटी घेतो, कुणी keyboard, Synthesizer कुणी तबला आणि मग गाणी सुरू होतात. मागची गाणी पुन्हा म्हणण्यात अर्थ नसतो, आणि वेगवेगळी गाणी सुचत जातात. या सगळ्यात मी फक्त शेवटचं गाणं गातो. यापूर्वी मी ते सुरुवातीला गाऊन पाहिलं तरी ते शेवटचं ठरतं तेव्हा मी श्रोत्याची भूमिका चांगली करतो हे तुमच्या लक्षात आलं असेलच.(मी असा एक प्रयोग गेल्या GTG ला ही केला (कर्जतला) आणि मग स्वतःच पळालो, इतरांना त्रास नको म्हणून)

या सर्वात माझी अजून एक भूमिका असते, ती म्हणजे गाणार्‍यांना शब्द पुरवायची. गाणारा किंवा गाणारी सुरूवात करतात, पण कडवं आलं की मला 'पुढे काय?' ची खूण हमखास होते. मी पण परोपकारी गंपूच्या स्टाईलने 'चर्मण्वती, चर्मण्वती' चालू करतो. पण होतं काय की जरी काही हजार गाण्यांचे शब्द आठवत असले, तरी सगळ्या गाण्यांचे शब्द आठवणं महा कठीण. त्यातल्या त्यात मी वही ठेऊन गाणी लिहून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मी 'जाने कहां' चे शब्द न्यावेत आणि ऐकणार्‍यांचामूड 'जुनू जुनू जुनू' असावा हे तर नेहमीचच. कुणाला कधी काय आठवेल आणि आवडेल काही सांगता येणार नाही हेच खरं. मध्ये मला कोणीतरी 'जवा नवीन पोपट हा' चे शब्दही विचारले होते.

तेव्हा एकमेव पर्याय उरतो तो Laptop चा. हल्ली इथे बहुतेकांच्या घरी Computer, Wireless Lan वगैरे असतातच. LapTop चालू करावा, या साईटवर जावं आणि हवं ते गाणं पहावं. मग ITRANS, geetManjusha असल्या साईट उपयोगी येतात. तेव्हा हा प्रयोग करायचा विचार आला. मला फायदा होईल, कदाचित तुम्हालाही होईल, आणि मुख्य म्हणजे गाण्याचे मधले भाग, 'ला ला ला ला' किंवा 'हं हं हं हं ' मध्ये ऐकावे लागणार नाहीत..


अंतशब्दी

अंताक्षरी आपण सगळेच खेळतो. बर्‍याच वेळा ट्रीपला जाताना किंवा पार्टीला जमल्यावर गाण्याच्या भेंड्या हा तसा आवडीचा खेळ असतो. काही भिडू अगदी अनभिज्ञ असतात. आमच्यात एक होता तो नेहमी 'गोरी तेरा गांव बडा प्यारा' हे गाणं म्हणायचा. कारण त्याला एकच गाणंयेत होतं. पण एकही भेंडी न चढू देता चार पाच तास भेंड्या खेळू शकणारे बरेच लोक आपल्यात असतात. आपल्या अंताक्षरीवर अखंड भेंड्या चालूच असतात.

पार्टी गेम म्हणून, किंवा काहीतरी वैविध्य (असा शब्द आहे का) आणण्यासाठी थोडे नियम बदलले तर. म्हणजे असं..


एकाने एक गाणं म्हटलं, की त्याचे शेवटचे पाच शब्द घ्यायचे... आजच्या अंताक्षरीचा उपयोग करून


जोगन पे योवन आया, योवन ने ली अंगडाई


यात बघायला गेलं तर जोगन, आया, योवन, ली अंगडाई हे शब्द आहेत...
('पे', 'ने' हे शब्द नाहीत.. मराठीत लिहिलं असतं तर जोगनपे आणि योवनने असे लिहिले असते).
'ली' हा मात्र शब्द आहे लेना या क्रियापदाचा...
पहिला 'योवन' बाद आहे कारण तो नंतर पुन्हा आलेला आहे...

आता पुढचं गाणं जो म्हणेल तो या शब्दावर सूरू करेल.

१० गुणांसाठी (अंगडाई)
९ गुणांसाठी (ली, लेना, लिया)
८ गुणांसाठी (यौवन)
७ गुणांसाठी (आया, आना, आयेगा, आए, आजा)
६ गुणांसाठी (जोगन)

हे नाही जमलं तर पहिल्या ओळीत जर हा शब्द येणार असेल तर..

५ गुणांसाठी (अंगडाई).
४ गुणांसाठी (ली, लाया, लेना, लिया)
३.२.१ पर्यंत

एवढं करूनही गाणं नाही आलं तर नेहमीच्या अंताक्षरीने पुढचं गाणं पण गूण शुन्य...


थोडी सवलत म्हणून गाण्याच्या मुखड्याऐवजी कोणत्याही कडव्याने सुरुवात करता येईल (अंताक्षरीत कडव्यांची नाहीतर उपेक्षा होते).

आता ही अंतशब्दी पार्टी गेम म्हणून खेळत असाल, तर Conductor कडे Bidding करता येईल.. म्हणजे जो गट जास्तीत जास्त गूण मिळवू शकेल, त्याने
पुढचं गाणं गायचं.. या Bidding वर Time-Limit ठेवता येईल...

मायबोलीसारखी अंताक्षरी खेळत असाल, तर गाण्याबरोबर (८ गुणांसाठी मी हे गाणं टाकतोय / टाकतेय असं लिहिता येईल). आणि जास्तीत जास्त्तीन गाणी टाकता येतील.. त्यात सर्वात जास्त गूण असतील त्या गाण्यावरून पुढे चालू करता यईल.. आणि समजा आठ गुणांसाठी गाणं आलं असेल
तर दुसरी कुणीतरी नऊ किंवा दहा गुणांचं गाणं टाकू शकेल....


भेंड्या म्हणून खेळत असाल, तर भेंड्या नाही चढल्या तरी Total ठेवता येईल, आणि Winner ठरवता येईल... (फक्त त्यावरून भांडणे
करता येतील पण ती टाळताही येतील :-) )

आता मी दिलेल्या उदाहरणासाठी

१०. ???
९. ले गई दिल गुडिया जपान की...
८. ??
७. आयेगा, आयेगा आनेवाला
६. ???
५. आजा शाम होने आई, मौसम ने ली अंगडाई
४. है मैने कसम ली
३. ???
२. लो आ गई उनकी याद..
१. रमता जोगी


बघा आवडते का ही अंतशब्दी


एक छोटीशी भागमभाग...

एकादा दिवस असा उगवतो. माझ्या घरी कुणी पाहुणे येणार असतात, आणि ते घरी पोहोचायच्या आधी मला घरी पोहोचायची घाई असते. खरं तर ते सगळ्या कुटुंबाचेच मित्र असतात, पण पाहुणे घरी पोहोचले तरी घरच्या मालकाचा पत्ता नाही हे मला काही पटत नाही, म्हणून मी ऑफिस मधून जरा लवकरच निगह्तो.

दर शुक्रवार प्रमाणे माझ्या कन्येचा क्लास ठरलेला असतो. नशीब क्लास माझ्या मित्राच्या घरी असतो, आणि मी त्याला गुगलवर 'आज जर लवकरच येतो, जरा लवकर परत जायचं आहे,' असा मेसेज टाकतो. कन्या, तिचा भला थोरला की-बोर्ड आणि मी गाडीत बसून निघणार, येवढ्यात बायकोला काही वाणसामानाची लिस्ट आठवते. क्लास सुरू झाल्यावर नाहीतरी मी मित्राच्या घरी तासभर बसणार, तेवढ्या वेळात मी थोडी खरेदी करून टाकावी म्हणून ती तिची छोटीशी लिस्ट माझ्या हाती देते. तिलाही घरातली कामं आटपून, धाकटीला बास्केटबॉल प्रॅक्टिसला सोडायचं असतं.

मित्राचं घर काही फार लाम्ब नसतं, फक्त तिथे पोहोचल्यावर मला पंधरा वीस मिनिटात माझी इतर कामं उरकायची असतात. मित्राची बायको पटकन चहा टाकते. घरून निघताना मला चहा प्यायला वेळच झालेला नसतो. खरं तर चहाची तल्लफ वगैरे नाहीय मला, पण बाहेर मस्त पाऊस पडत असताना एखादा कप चहा प्यायला माझी हरकत नसते. आणि चहाची पाच मिनिटं धरूनही मला फारसा उशीर होणार नसतो, म्हणून मी चहा साठी थांबतो. चहा दिल्यावर 'येताना आमच्या साठी पण दुध घेऊन ये' या तिच्या विनंतीला मान देऊन मी माझ्या वाणसामानाच्या यादीत पटकन नोंद करून बाहेर पडतो.

नवीनच सुरू झालेली भारतीय गोर्सरी (वाणसामानाचं दुकान), त्यांच्या घरापासून दोनच मिनिटावर असते, फक्त तिथे जायला Left-Turn नाहीय, हे तिथे पोहोचल्यावर मला दिसतं. काही वर्षांपूर्वी मी त्या भागात रहात होतो, तेव्हा त्या दुकानाला left-turn होता, हे मला माहीत असतं, पण नियम तोडून पोलीसांची आफत ओढवून घेण्यापेक्षा मी दुसरा मार्ग सोधायला निघतो. फार नाही पण एक दोन मिनिटं उशीर होणार असतो.

भारतीय ग्रोसरी नवीनच सुरू झालेली असल्यामुळे, तिथे कुठल्या भागात काय मिळतं ते मलाच नाही तर त्या दुकानातल्या कामगारांना देखील माहीत नसतं, त्यामुळे माझ्या यादीतली एक एक वस्तू मिळवायला मला दुकानाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सतरा वेळा फिरवलं जातं, आणि तरी भांडी धुवायची साबण पावडर आणि तेल मला कुठ्ठे म्हणजे कुठे सापडत नाहीत. या प्रकारात माझी वीस पंचवीस मिनिटं सहज मोडतात, आणि तरी माझी यादी पूर्ण झालेली नसते. उरलेल्या वस्तू पटकन मिळवाव्यात म्हणून मी पटकन मित्राच्या बायकोला फोन करतो, आणि ती मला 'इथे नाही तर WaWa* मध्ये मिळेल' असा सल्ला देते. घाई घाईत मी तिकडे निघतो.

वावाच्या दाराशी गाडी येताच गाडीतलं पेट्रोल संपल्याचा दिवा पेटायला लागतो आणि आता मला यापुढे पेट्रोल पंपावर जायलाच हवं याची जाणीव होते. या 'वावा' मध्ये पूर्वी बर्‍याच सटरफटार गोष्टी मिळायच्या पण गेल्या दहा वर्षात मॅनेजमेन्ट बदलून आता तिथे फक्त 'कॉफी, सांडविच, आणि खाण्याचे पदार्थ' मिळतात हे आत शिरल्यावर लक्षात येतं. घड्याळाचा काटा थोडा वेगानेच फिरायला लागल्याची जाणीव मला होते, पण तेल, साबण शोढण्यासाठी आता मोठ्या ग्रोसरीला जाण्याशिवाय पर्याय नसतो.

तिथून अजून दोन मैल गेल्यावर Shop N Stop आहे, मी तिकडे जायला निघतो. नशीबाने त्याच दिशेला एक पेट्रोल्पंपही असल्याचं आठवतं. या दुकानातही मला हव्या असलेल्या गोष्टी कुठे आहेत त्या शोधायला वेळ जाऊ नये, म्हणून तिथल्या एका कन्येकडे मी मदत मागतो, आणि ती मला पूर्ण दुकान फिरवून शेवटी दोन टोकाला ठेवलेल्या दोन्ही वस्तू शोधून देते. काऊन्टरवरची कन्या दुकानात कोणीच नसल्यामुळे, आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारायला गायब झालेली असते. ती येऊन बील, पैसे वगैरे सोपस्कार पार पाडते, पण घेतलेल्या वस्तू पिशवीत भरून ध्यायचे कष्ट मात्र घेत नाही. साबणाचा डबा काखेत मारून, मी तेलाची बाटली तशीच हातात घेतो, आणि दरवाजाकडे पळ काढतो, तेवढ्यात मला Cash Machine दिसतं. आठवड्याची Cash तिथूनच काढावी म्हणून मी खिशात हात घालतो, तेवढ्यात हातातला साबणाचा डबा सटकतो. गळणार्‍या पावडरीला आळा घालायला परत दुकानात शिरून पिशवी आणणावीच लागते. मिनिट काटा आता सेकंद काट्यासारखा वाटू लागतो.

गाडीत बसल्या बसल्या मी पेट्रोल पंपाकडे सुसाट सुटतो. पंपा वरचा सरदार आधी एका गाडीवाल्याशी पाच दहा मिनिटं गप्पा मारून माझ्या गाडीकडे येतो, तेव्हा त्याचे पंजाबी भाषेतले सुसंवाद सेलवर चालू असतात, ये मधून मधून येणार्‍या 'पैण दी....' वगैरे शब्दांमुळे लक्षात येतं. क्रेडिटकार्डावर पैसे देऊन मी निघेपर्यांत मिनिट काटा अजून बरीच घरं पुढे गेलेला असतो. निघताना लक्षात येतं की, तिथून बाहेर पडायला फक्त एकच रस्ता असतो, पण त्या रस्त्यावर ट्रफिक जॅम. मला खरं तर त्या रस्त्यावर येऊन, U-Turn मारायला जागा हवी असते, पण एका ट्रकने ती जागा अश्या हुशारीने अडवलेली असते की मला अजून एक दोन मैल पुढे जाऊन परत फिरण्याला पर्याय नसतो.

एवढं करून मी मित्राच्या घरा जवळ येतो, तेव्हा चांगला तास होऊन गेलेला असतो, त्याच्या घराजवळ Visitor Parking full झालेलं असतं, पाऊस वाढलेला असतो, आणि मला गाडी अजून लाम्ब लावावी लागणार असते. घड्याळाच्या काट्यावर मात करत मी धावत पळत त्याच्या घरी पोहोचतो, कन्येला तिच्या keyboard सकट गाडीत घालतो, आणि घाई घाई गाडी चालवत घरी येतो..

येणार्‍या पाहुण्यांना उशीर झालेला असतो, आणि मित्राच्या घरासाठी आणलेला दुधाचा कॅन माझ्याच गाडीत राहिलेला असतो......

(* WaWa नावाचं एक स्टोर आहे इथे)
समाप्त...

वाचलं असेल, तर Rating द्या रे इकडे...
वाचलं नसेल तर विकत घ्यायलाही हरकत नाही... :-)

काही जाणत्या लोकांनी Review पण टाका थोडे...


http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=16205&cat=254&page=2

ही आरती ही श्री. अरविंद सहस्रबुध्दे यानी मायबोली साठी पाठवलेली आहे,
पण ती मी रचली नसल्याने कुठे टाकावी ते कळत नाही.. Mods ती योग्य ठिकाणी
हलवा

आरती देवीची

जयदेवी जयदेवी जय अंबाबाई,
सकल जनांची तू आहेस आई, जयदेवी जयदेवी

रत्नजडीत शोभतो मस्तकी मुकुट,
भाळी भरला असशी कुंकवाचा मळवट,
काळ्याभोर केसांचा पाठीवर संभार,
गळ्यात हालत असे नवरत्नांचा हार, जयदेवी जयदेवी

गौरवर्णी कांती सुहास्य वदन,
कमळासारखे दिसती तुझे हे नयन,
पहाता तुजला, हरपते भान,
भक्तिभावाने झुकते भक्तांची मान, जयदेवी जयदेवी

शुंभनिशुंभानी अवघ्यांना गांजियले,
समस्तानी तुजला साकडे घातियले,
सिंहारूढ होऊनी राक्षसा मारियले,
समस्त भक्तजनांना भयमुक्त केले, जयदेवी जयदेवी

पुरणपोळी साखरभाताचा नैवेद्य दाखवती,
झेंडू शेवंतीच्या माळा तुजला अर्पिती,
अर्पोनी तुजला चणे फुटाणे,
हात जोडोनी तुजला एकच मागणे, जयदेवी जयदेवी

देवोनी आशीर्वाद करी अमुचा उध्दार,
जन्ममृत्यूची आता संपवी येरझार, जयदेवी जयदेवी


श्री. अरविंद सहस्रबुध्दे, कोथरूड पुणे 25444669





श्री गणरायाची आरती

जयदेव जयदेव जय गणराया,
भक्ति भावाने मी पडतो तुझ्या पाया,


माघ शुध्द चतुर्थीला जन्मा तू आला,
दुःखहर्ता म्हणोनी, भक्ता पावला,
शारदा तुझी भार्या, बंधू षडानन,
उमामहेश्वराचा असशी तू नंदन, जयदेव जयदेव

रक्तवर्णि तुझी कांति असे,
ऑंकार स्वरूपात तू दिसतसे,
रूप तुझे पाहता आनंदे मन,
करिती शुभकार्या प्रथम वंदन जयदेव जयदेव


सुपासारखे असती तुझे हे कान,
लुकलुकणारे डोळे दिसती लहान,
एकदंत गजमुख असशी चतुर्भुज,
काय वर्णावे तुझे अलौकिक तेज, जयदेव जयदेव

स्वरुप असे तुझे मनोहरी,
रत्नजडित मुकुट शोभतो तुझिया शिरी,
नागाचा विळखा तुझिया पोटी,
शेंदूर शोभत असे तुझिया ललाटी, जयदेव जयदेव

विद्येची आहे तूच देवता,
तुजवीन आम्हा कोण असे त्राता,
बैसोनी मुषकावर ये आता झडकरी,
देवोनी आशीर्वाद तू आम्हा तारी, जयदेव जयदेव



श्री अरविंद सहस्रबुध्दे, कोठरूड पुणे.....

tumacaI dad Aaplaa saMvaad
Archive through July 19, 2004
Archive through December 09, 2004
Archive through July 28, 2005
Archive through February 23, 2006
Owner vinaydesai Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators