Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
lalitas
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members A-N » lalitas « Previous Next »

ऍडमिन, आभार मला रंगीबेरंगी घर दिल्याबद्दल, जिथे माझे वेगळे अनुभव आपल्या मायबोलीकरांना सांगण्याची संधी मिळते आहे....

माझी देशांतर करणारी पहिली पिढी! तसे तुमच्यापैकी बरेच असणार.... मी ज्या देशांत आले तेथे भलामोठा अडथळा भाषेचा होता. जर्मन भाषा आयुष्यांत कधीच ऐकली नव्हती. आधी आधी तर कोण काय व कशाला बोलतंय् कळतच नव्हतं! टी. व्ही.वर फक्त आम्ही पुर्वी पाहिलेले इंग्रजी सिनेमे अर्थात जर्मन मधे डब केलेले दाखवले तर काही करमणूक बाकी उजेड! मुलांचं शाळेत कसं होणार याची वरती घनघोर चिंता... त्यांचा अभ्यास घेणें शक्यच नव्हते, गणिताची फक्त आकडेमोड समजावता येत होती. शाळेतुन आलेली लेखी नोटिस समजावून घ्यायला एका माझ्या स्वीस मैत्रीणीकडे धाव घ्यायला लागयची. तिला इंग्रजी येत असे, ती समजावून द्यायची. (माझे व्हेरेनाशी घनिष्ट संबंध अजुनही टिकून आहेत) अगदीच ठकू हो^ऊन गेले होते. इतकी भांबावलें होते की कशी वाट काढावी समजत नव्हतं. नवरा त्याच्या कामांत रमला होता. टेक्निकल फील्डमधे तो इंग्रजी वापरू शकत असे, शिवाय सतत निरनिराळ्या देशांत कामासाठी जावं लागल्यामुळे त्याला माझ्यासारखी भाषेची अडचण जाणवत नव्हती. मी एकटी सगळ्या पातळ्यांवर झुंजत होते. मग अक्षरश युध्दपातळीवर लढा द्यायला सुरवात केली. जर्मन शिकायला इंटेंसिव्ह क्लासेस सुरू केले, स्थानिक महिलामंडळ जिथे ऍरोबिक, शारिरीक शिक्षण, तर्‍हेतर्‍हेचे खेळ शिकवत तें जॉइन केलं हेतु हा की आपल्या गांवांतील काही चेहरे ओळखीचे व्हावेत. स्वीसमधे त्यांची स्थानिक भाषा आहे, ती तुम्हाला बोलता जरी नाही तरी समजायला पाहिजे. स्वीस जर्मनला लिपी नाही, ती आपल्या कोकणीसारखी फक्त बोलीभाषा आहे. स्वीस जर्मन समजायला पांच वर्षं लागली कारण वाचायला लिहायला जर्मन भाषेत शिकत होते. हुश्श! एकदाचं तें जमत गेलं!

त्यावेळी म्हणजे २० वर्षांपुर्वी, इथला समाज रुढीप्रिय आणि पुराणमदवादी होता. त्यांत भारताबद्दल बरेच गैरसमज वा अपसमज बाळगून असायचा. भारतीय लोकांच्या कपड्यांना मसाल्याचा वास येतो म्हणुनही हिणवीत. कांही अंशी तें खरंही आहे. लहान अपार्टमेंटमधे फोडण्यांचा वास आपल्या कपड्यांत मुरतो कारण थंडीमुळे दारं खिडक्या बंद असतात आणि एक्झॅस्टचा तसा उपयोग होत नाही कारण वाढून घेतल्यावरही मसाल्याचा वास घरांतुन पसरतो. त्यासाठी मी किचनचं दार लावून स्वपंपाक करत असे. थंडीच्या दिवसांत सर्वांचं जेवून झाल्यावर खिडक्या १० मिनिटांसाठी उघडून ठेवत असे, त्यामुळे आमच्या घरांत तसा मसाल्यांचा वास येत नसे.

स्वीसमधे त्यावेळी आपले मसाले अजिबात मिळत नसत. अगदी गरजेचे म्हणजे मोहरी, हिंग, जिरं वगैरे भारतांतून आणून ठेवत होतो, पण वर्षभराचं सामान कसं आणणार? डाळ मिळतच नव्हती, तांदूळ अमेरिकन जाडा भरडा किंवा उकडा असायचा. बेसन, कोथिंबीर, कढीपत्ता कित्येक वर्षांत वापरलाच नव्हता, नारळही दुर्लभ... (सध्या श्रीलंकेतील लोकांमुळे सर्वकाहीं मिळत आहे) मग स्वयंपाकाचे अनेक प्रयोग करायचे.... कधी यशस्वी, कधी सपशेल फसायचे! सर्व प्रयोग घरांतल्यांवर करून मगच पाहुण्यांवर होत असत! तरीही कळविण्यास आनंद वाटातोय् की माझ्य प्रयोगानंतरही तमाम जनता सुखरूप आहे!

सध्या मुलांवरील संस्काराची चर्चा मी
'Relationship' मधे मायबोलीवर वाचत्येय्. त्या पार्श्वभूमीवर मी माझ्या मुलांची अभारतीय वातावरणातील्ल जडणघडणीचा विचार करते. इथे ती दोघंही आली तेंव्हा संस्कारक्षम वयांत होती. मोठा मुलगा ९ व धाकटा ४.५ वर्षांचा होता. त्यांना दोन संकृतींमधुन वाढावं लागलं. दोघेही उत्तम मराठी बोलतात. जेव्हढे शक्य होते तेव्हडे भारतीय संस्कार त्यांना आम्ही दिले. तरीही बाहेरच्या वातावरणाचा परिणाम आपल्या मुलांवर फार मोठ्या प्रमाणांत होतो हे इथे प्रकर्षाने जाणवते. भारतांत गेले की तिथे मुलं तिथल्या वातवरणाशी समरस होतात, पण कुठेतरी युरोपीय विचारसरणी कुरघोडी करतेच!

आमचं चौघांचं कुटुंब युरोपांत एका छोट्या मराठी उबदार घरट्यांत राहात होतं आता मुलं उडून गेलीयत्... मुलांना सुरुवातीला आमचा मानसिक आधार प्रचंड प्रमाणांत लागत होता, तो आम्ही कटाक्षाने पुरवला. वंशभेद वा वर्णभेद इथे नाही... पण कांही प्रमाणांत तुलना होतेच. त्याची जाणीव मुलांना होते. मी चांगलं लिहूनही त्या अमुक तमुक मुलाला माझ्यापेक्षा जास्त मार्क दिले गेले असं जेंव्हा मुलं सांगतात तेव्हा खरी परिक्षा असते. त्यांचा आत्मविश्वास गमावूं न देता त्यांना समजावणें अत्यंत महत्वाचें आहे. नाहीतर परक्या देशांत ती मुलं निगेटिव भावनेने जगत राहतात.

तुमच्याबरोबर माझे स्वीस अनुभव
share करावंसे वाटले म्हणून लिहिण्याचा प्रपंच केला!
पहिल्यांदा आम्ही कांही आमच्या आधी स्थायीक झालेल्या भारतीय कुटुंबांना भेटलो तेव्हा जाणवलं की त्यांची मुलं मातृभाषा बोलतच नाहीत. त्यांना मातृभाषा व्यवस्थित समजत असे कारण आईच्या मातृभाषेतील प्रश्नाला स्वीस जर्मनमधे उत्तर दिलं जाई. हें आम्हा दोघांनाही खटकलं. आम्ही तेव्हाच ठरवलं की घरी काहीही झालं तरी स्विस जर्मन येता कामा नये. अशी वेळ आली होती की माझी मुलं एकमेकांच्यांत स्वीस जर्मन बोलू लागले होते, त्याला मी व माझ्या नवर्‍याने विरोध केला. जर आमच्याशीही त्या भाषेत बोलू लागले तर उत्तरच देत नसूं. काही भारतीय घरांमधे मुलांना उत्तेजन दिलं जात असे कारण पालकांना मुलांकडून स्वीस जर्मन अनायासे शिकता येत होतं. दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या भारतीय नातेवाईकांशी संपर्क! मुलांचे आजी - आजोबा, काका, मामा, चुलत - मावसभावंडे ह्या सर्वांशी खूप जवळीकीचे संबंध आहेत ते मराठी येत असल्यामुळेच! त्यांनाही माझी मुलं फिरंगी वाटत नाहींत व मुलांनाही भारतात परकं वाटत नाही. मराठी येत असल्यामुळे माझ्या मोठ्या मुलाने मुंबईच्या मराठी मुलीशी लग्न केलं आहे. माझ्या सुनेलाही आमच्या घरातलं वातावरण परकं वाटलंच नाही. फक्त मराठी लिहायला वाचायला शिकवलं नाही तेव्हा माझ्या मुलांना साहित्यिक मराठी समजायला जड जाते. मराठी बातम्या डोक्यावरून जातात...

इथे दुसरी एक गोष्ट सांगाविशी वाटते की लहान मुलांना दोन ते तीन भाषा एकाचवेळी शिकण्यांत काहीच आडचण येत नाही. स्वीसमधे स्थायिक झालेले अनेक परदेशी आपली भाषा जिवंत ठेवतात. इटलियन, स्पॅनिश, फ्रेंच आपली भाषा सोडत नाहीत. त्या सर्वांची मुलं दोन्ही भाषा व्यवस्थित बोलतात. सुमारे ऐशी वर्षांपुर्वी स्वीस लोकांनी मोठ्या प्रमाणांत दक्षिण अमेरिकेला देशांतर केलं होतं. तुम्हाला खोटं वाटेल, पण तेव्हा हा देश गरीब होता, पोटापाण्यासाठी स्वीस मोठ्या प्रमाणांत दक्षिण अमेरिकेत जात असत. आता त्यांची मुलं म्हणजे तिसरी पिढी परत येत आहे. ते अस्खलीत स्वीस जर्मन बोलतात व जर्मन भाषेत लिहितात. याचं कारण तिथे स्वीस व जर्मन नागरिकांनी जर्मन भाषा शिकवण्यासाठी शाळा उघडल्या. त्यांचे तिथल्या स्थानिक स्पॅनिश किंवा पोर्तुगीज भाषांवर पण प्रभुत्व असते.
ही माहिती मी 'आपली दाद, आपला संवाद'मध्ये दिली होती. वाहून जाऊ नये म्हणुन इथे टाकते आहे....

Swiss Constitutionमधे एक तरतूद आहे ज्यामुळे युध्दामुळे वा अंतर्गत बंडळीमुळे त्रस्त झालेल्या देशांतील लोकांना इथे आश्रय (asylum) मागता येतो. त्यानुसार श्री लंकेतील लोक रेफ्युजी म्हणून मोठ्या संख्येने वास्तव्य करून आहेत. सरकारी आकडेवारीप्रमाणे श्री लंकन ३५,००० आहेत व भारतीय फक्त ६,००० आहेत. श्री लंकनांनी लगेच किराणा मालाची दुकाने उघडली तेवढी मागणी निर्माण झाली होती. त्यामुळे दक्षिण भारतीय जिन्^नस उपलब्ध झाले. कढीपत्ता, मोहरी - जिरं, तांदूळ आणि नारळ्सुध्दा आला. गेल्या ५ वर्षांत थाय दुकानं उघडली... कोथिंबीर, मिरच्या, आलं मिळू लागलं. आता नवीन येणार्‍यांना आमच्यासारखा प्रॉब्लेम येत नाही. फक्त भाषा शिकावी लागते, शाळेत जाणारी मुलं असतील तरच! जर तुम्ही मुलांना इंटरनॅशनल शाळेत पाठवलंत तर जर्मन शिकलंच पाहिजे असं नाही. (या शाळा बेफाट महाग आहेत) शिवाय } globalizationचा जमाना आहे, स्वीस लोकांनी बर्‍यापैकी इंग्रजी आत्मसात केलं आहे. तरूण स्वीस इंग्रजी बोलतात. तेव्हा यायचंय् का कुणाला इकडे?

जेव्हां आपण मुलं परदेशांत वाढवतो तेव्हा त्या देशांतील भाषा मुलं शिकणारच असतात. स्थानिक मुलांशी संबंध आल्यावर, शाळेत गेल्यावर तिथली भाषा मुलं आत्मसात करतातच, पण मग आपली भाषा मुलांना कोण शिकवणार? आपणच ना? तेवढ्यासाठी मराठी घरांत बोललीच पाहिजे!

भारतांत बर्‍याच लोकांचा समज असतो की पाश्चिमात्य देशांत राहून आपण आपली भाषा, संस्कृती विसरून जातो. असं हो^ऊच कसं शकतं? माझी स्वतःची मातृभाषा कोकणी आहे, पण स्वीस्मधल्या घरी आम्ही फक्त मराठी बोलतो. महिने न् महिने मी कोकणी कधी ऐकत नाही की बोलतही नाही.... तरीही भारतांत गेल्यावर माझ्या सर्व नातेवाईकांशी मी सुध्द कोकणीत बोलते. कुणाला जाणवतच नाही की मी काही वेगळं बोलते आहे किंवा शब्द वेगळे उच्चारले जात आहेत.

स्वीसमधे पुरूषांना वयाच्या एकोणिसाव्या वषी मिलिटरींत भरती व्हावें लागतें. अर्थात् शारिरीक क्षमता
(fitness) असावी लागते. कांही व्याधी असल्यास, डोळे कमकुवत असल्यास, पाठदुखी असल्यास मिलिटरीतुन सूट मिळते. पण तें सिध्द करून द्यावे लागते. सहसा अशी सूट अगदी वाईट परिस्थिती असेल तरच मिळते.... नाहीतर भरती व्हायला सांगतात व झेपेल अशा कामावर नेमणूक करतात.

रिक्रुटिंग कमीत कमी एकवीस आठवड्यांचं असतं. जर वरची रॅंक मिळाली तर जास्तीत जास्त तीस आठवड्यांचं रिक्रुटिंग असू शकतं. कॉलेजमधे असतांना मुलं रिक्रुटींगला जातात. कॉलेजला ह्या दिवसांत मुलांना सुटी द्यायचं बंधन असतं. पहिलं रिक्रुटिंग संपल्यावर जवळ जवळ पस्तिसाव्या वर्षापर्यंत दरवर्षी दोन ते चार आठवड्यांसाठी (रॅंकप्रमाणे) जावं लागतं. माझी दोन्ही मुलं त्याप्रमाणे मिलिटरीत जात आहेत.

मला स्वतःला विचाराल तर मी म्हणेन की ह्या मिलिटरी ट्रेनिंगने मुलं खूप चांगलं शिकतात. स्वाध्याय, शिस्त आनि मुख्य म्हणजे आजपर्यंत घरांत आईवडिल आपल्याला किती सुखं उपल्ब्ध करून देतात याची जाणीव! आवडीचं खाणं, परीटघडीचे कपडे, तयार स्वच्छ बिछाना ह्या सर्वांची किंमत कळू लागते. हे सर्व आपण घरातल्यांसाठी सहज करत असतो पण त्याचं महत्व मिलिटरीसारख्या कडक वातावरणांत जास्त कळतं. मुलं बदलून जातात. क्वचित काहीं जणांवर मिलिटरीचा विपरीत परिणाम होतो. त्यांना मिलिटरीतल्या रुक्ष वातावरणाचा धसका बसतो.... मग मानसिक कारणांसाठी डॉक्टरचं सर्टिफिकेट दाखवून मिलिटरी करावी लागत नाही.... पण हे अपवादानेच घडते. त्यामुळे प्रत्येक स्वीस पुरुष हा सैनिक असतो.
माझी शाळा

इतकं प्रशस्त आवार असलेली ही मुंबईतील एकुलती एक शाळा असेल.
Wilson College, Wilson High school ह्याच मिशनच्या दोनशे वर्षें जुन्या संस्था आहेत. माझी शाळा मुलींची होती.

दक्षिण मुंबईत दाट लोकवस्तीत निगा राखलेली बाग हे या शाळेचं वैशिष्ट्य आहे. अजूनही तशी बाग आहे का कल्पना नाही कारण गेल्या दहा वर्षांत मी शाळेला भेट दिलेली नाही. बागेत माळी रोज काम करताना दिसत असे. वेगवेगगळे वृक्ष होते, बदामाची, रायावळ्याची झाडं होती, गुलमोहर, पिंपळाची गडद छाया होती. रातराणी, बोगनवेलिया सुगंध व रंगाची उधळण करायचे. शिवाय माळीबुवा प्रत्येक सीझनप्रमाणे फुलांचे वाफे रंगवायचे. गुलाबाचे कितीतरी प्रकार दिसायचे. मला अजुनही कर्दळीची फुलं दिसली की शाळेची बाग डोळ्यापुढे तरंगू लागते. माझ्या सातवीच्या वर्गासमोर एक जुनं बदामाचं झाड होतं. वर्ग चालू असताना आमचं लक्ष असायचं केव्हां पिकलेला बदाम खाली पडतो. तास संपला की दुसर्‍या बाई वर्गावर यायच्या आंत पुढच्या रांगेतल्या मुली बदाम उचलायला पळायच्या, अर्थात् माझा कधीच नंबर लागला नाही कारण मी सर्वांत वर्गांत उंच असल्याने मागच्या बाकांची भागीदार होते...

व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आमची शाळा त्यावेळी खूप संधी देत असे. शिवणकाम, विणकाम शिकवलं जायचं. सर्वप्रथम पाचवीमधे एक शिवणाची पिशवी शिवायला शिकवीत असत. वरती भरतकाम करायचं असे. पिशवीवर भरतकामाने नावाची आद्याक्षरं काढून आपापाल्या लॉकरमधे शाळेतच ठेवायची असे. शिवणाचं सामान घरी न्यायची परवानगी नव्हती, आईच्या मदतीने शिवणांत मार्क्स मिळवणं शक्यच नसे. पुढची सहा वर्षे तीच शिवणाची पिशवी वापरात होतो. दहावीपर्यंत आम्ही स्वतचे ब्लाउज व स्कर्ट तयार केले होते... विणकाम भरतकाम आमच्याकडून काटेकोरपणें करून घेतलं जाई. आम्ही चीनी आक्रमणाच्या वेळी शाळेच्या हिरवळीवर बसून जवानांसाठी लोकरीचे पुलोव्हर, हातमोजे व पायमोजे विणले होते. शाळा सुटल्यावर एक तास व शनिवारी सकाळी मुलींना हिरवळीवर गोलाकार बसवत असत. कर्णिकबाई आमच्याकडून विणून घेत असत. हसत खेळत विणकाम चाले. आता लिहितांना ते दिवस मी पुन्हा जगले..... (सरकारी लोकर होती तेव्हा घरी विणायला देत नसत)

पी.टी.
(physical training) साठी एक बुटाची पिशवी आम्ही शिवणाच्या तासाला शिवली होती. ही पिशवी लॉकरमधे टेनिसचे बूट व मोजे ठेवण्यासाठी बनवली जायची. प्रायमरीमधून पाचवीच्या वर्गांत आलं की पहिल्यांदा ही पिशवी शिवायला लागायची. आम्हाला टेनिस, बॅडमिंटन, व्हॉलिबॉल शिकवत असत. वर्गावर्गांमध्ये सामने होत होते. उत्तम खेळणार्‍या मुली निवडून व्हॉलिबॉलसाठी टीम तयार करत, त्यांचे मग मुंबईतल्य दुसर्‍या शाळेच्या मुलींबरोबर सामने होत असत. तयारीच्या वेळी एक चुरशीचं वातावरण असे, आम्हाला तोच विषय पुरून उरत असे. शत्रुच्या गोटांतील खेडाळूंच्या बातम्या काढून आणायच्या, त्याप्रमाणे आपल्या टीमचे पवित्रे आखायचे, एखाद्या वेळी हरलो तर का हरलो व जिंकायला पवित्रे कसे बदलायचे वगैरे, वगैरे... मस्त मजा यायची! छोटीशी चुरस, छोटे छोटे तणाव आमचं चिमुकलं विश्व व्यापून टकत असे.

आठवड्यातून एकदा आम्हाला गाण्याचा तास असे. चिक्कार गाणी व थोडे रागही शिकलो. वर्षातून एकदा नाट्यछटा, नाच व गाण्यांचा कार्यक्रम होत असे. मग आधीचे तीन महिने समुहगीतं, नाच, नाट्यछटा बसवण्यची धमाल असे. इथे शिक्षक भाग घेत नसत. सुत्रधार, दिग्दर्शक, संचालक मुलीच असायच्या. रंगीत तालिमीला सर्व शिक्षक हजर राहून मार्गदर्शन करीत असत. ह्यातूनच भक्ती बर्वे निर्माण झाली. ती माझ्याच बॅचला होती.

आमच्यावेळी फक्त दहावी व अकरावीच्या वर्गाला दोन शिक्षक होते, तोपर्यंत सर्व शिक्षिका होत्या. एक स्वतंत्र लॅब होती, तिथे प्रयोग करायला नेत असत. दर महिन्याच्या शेवटी शिकवलेल्या अभ्यासाची उजळणी टेस्ट असायची, त्यामुळे नियमित अभ्यास होत असे. शिवाय सहामाही व वार्षिक परिक्षा असायच्या... होमवर्क भरपूर मिळत असे. तें नीट तपासलं जाई. बोर्डाचा रिझल्ट नेहमीच १०० टक्के असे. डॉ. शरदिनी डहाणूकर आमच्या शाळेतून शिकल्या! माझ्या काही समकालीन विद्यार्थीनी जगांत ठिकठिकाणी स्थायीक झालेल्या आहेत. तिथेही त्या आपापल्या क्षेत्रांत कर्तुत्व गाजवून आहेत. त्यांना भेटल्यावर व बोलल्यावर कळतं की शाळेने आम्हां सर्वांना किती भरभरुन दिलं आहे!

या शाळेने मला प्रचंड आत्मविश्वास दिला. खूप कला शिकवल्या. शाळेच्या लायब्ररीचा उपयोग करयला वर्गात नेहमी सांगितले जाई, संदर्भ कसे बघावे, त्यांचा उपयोग कसा करावा हे शाळेतच आम्हाला शिकवलं होतं. ही शिस्त खूप उपयोगी पडली. वाचनाची गोडी लागली.

मिशनरी शाळा असल्यामुळे रोज प्रार्थनेला बायबलमधील एक गोष्ट सांगितली जायची व नंतर येशूची प्रार्थना व्हायची. सरस्वती वंदना रोज सुरावर म्हटली जाई. पण येशूची प्रार्थना व बायबलातील एखाद्या गोष्टीशिवाय आमच्यावर कुठलेही ख्रिश्चन संस्कार झाले नाहीत. ख्रिश्चन विद्यार्थिनी व हिंदू विद्यार्थिनीत भेदभाव केला जात नव्हता. तेव्हा प्रत्येक वर्गांत फक्त ३५ मुली असत, त्यांतल्या जास्तीत जास्त ५ मुली वेगळ्या धर्माच्या असत. माझ्या वर्गांत एक ज्यू, दोन ख्रिश्चन व एक मुस्लिम मुलगी होती.

शाळेत एक शेड बांधलेली होती. वरती कौलांचं छप्पर होतं व लाकडाचे मजबूत खांब होते. तो एक लांबलचक व्हरांडा होता. त्यांत दोन्ही बाजूला बाकडे ठेवलेले होते. तिथे आम्ही पावसाळ्यांत मधल्या सुटीत डबा खात असू. उन्हाळ्यांत तिथे गार असायचं कारण आजूबाजूला झाडी होती. शेडच्या पलिकडे गांवदेवी पोलिस स्टेशन होतं. त्यांचा लॉकप आमच्या शेडला समांतर होता. कधी कधी कैद्यांचा आरडाओरडा ऐकू यायचा.

शाळेच्या आवाराला दोन दरवाजे होते. एक नाना चौकातून व दुसरा गांवदेवीच्या बाजूने. मला गांवदेवीची शांत बाजू खूप आवडत असे. तो रस्ता अगदी शांत असे. रस्त्याच्या दुतर्फा लॅबर्नमची झाडं होती, अजूनही आहेत असं ऐकलं आहे. ती हिवाळ्यांत पांढर्‍या गुलाबी छटांच्या फुलांनी भरून जायची. त्यांचा सुगंध सगळ्या रस्त्यावर दरवळत असे. शाळेत शिरताना मन प्रसन्न होऊन जाई.

अरेच्या! मी माझ्या शाळेच्या आठवणी सांगताना शाळेचं नाव सांगायला विसरलेच की! माझ्या शाळेचं नाव व पत्ता आहे...

St. ColumbA High School
Alexandra Road
Gamdevi, Mumbai 400 007
गेली बरीच वर्षे माझा मायबोलीकरांशी परिचय फक्त online आहे. जेव्हा भारतात पुतण्याच्या लग्नाचं आमंत्रण आलं, तिकिटं रिझर्व झाली आणि मी मुम्बईच्या मायबोलीकरांना भेटायचच असं पक्क ठरवून टाकलं. उत्साहाच्या भरांत जवळ जवळ आठ महिने आधीच गजानन व भावनाला भेटण्याचा इरादा कळवून पण टाकला, दिनेशनापण लिहिलं. तिघांनीही उत्साह दाखवला. डिसेंबर ३१ २००५ ला मी मुम्बईत येणार होते. मला आल्याआल्याच सर्वांना भेटावंसं वाटत होतं, पण त्यावेळी मला वाटतं, नव्या वर्षाच्या धामधुमीत जीटीजीला येणं जरा अवघड होत असेल म्हणून पंधरा जानेवारीला शिवाजी पार्कवर नेहमीच्या जागी सकाळी अकरा वाजता भेटायचं ठरलं. भावनाने पुढाकार घेऊन मुंबईतल्या मायबोलीकरांना जीटीजीसठी बोलावले. रविवार होता, दवाखान्याला सुटी असल्याने माझा दीर राजीव व त्याची पत्नी सुचेताला मायबोलीकरांना भेटायला यायचं होतं. त्या दोघांना नवल वाटत होतं... कशी माणसं इंटरनेटने जोडली जाताहेत. आम्ही सर्वच एकमेकांना पहिल्यांदाच भेटणार होतो त्यांत दोघंजणं आणखी!
साधारण पावणे अकराला भावनाचा फोन आला की तुम्ही सर्वजण कुठे आहांत, मी शिवाजी पार्कजवळ येऊन बराच वेळ झाला अजुन कुणीच आलं कसं नाही, तुम्ही येत आहात ना? आम्ही अगदी जवळच रानडे रोडवरच होतो. तरी दहा मिनिटांत शिवाजी पार्कला मासाहेबांच्या पुतळ्याजवळ अलो. भावना वाट बघत उभी होतीच. आमचे नमस्कार व ओळख होईपर्यंत गुरूदास, गजानन, रा. ना., योगी०५०१८१ आले. तेव्हढ्यांत आमचं जीप्सी'मध्ये जेवायचं ठरलं. अमीचा फोन आला...तिला पोहोचायला जरा उशीर होत होता, तेव्हा तिने परस्पर जिप्सीमध्ये यायचं असं ठरलं.
आमची मायबोली सेना जिप्सीमध्ये गेली, स्थानापन्न झाली.... एकमेकांशी बोलत असतानाच अमी आली. जेवणाची ऑर्डर दिली व गप्पा सुरू झाल्या.
भावना पांढर्‍या साडीत सुरेख दिसत होती आणि गोड हसत होती, अमीचे मोठे मोठे डोळे लक्षांत राहिले...
जीडी, योगी, रा. ना. बरोबर तर अगदी छान गप्पा रंगल्या. ग़ुरुदास तर आमच्या पिढीचेच.... आमचं भावविश्व एकच, गप्पांची तार जुळायला वेळ लागला नाही. सर्व इतकं छान जुळून आलं की मला आपल्याच माणसांत बसल्यासारखं वाटत होतं. माझ्या दीराला हे इतकं आवडलं कि तो मायबोलीचा त्या दिवशीच सभासद झाला.
वेळ कसा भुर्रकन उडुन गेला...... परत जायची वेळ आली. जीप्सीच्या बाहेर कोंडाळं करुन उभे राहिलो व निरोप घेतला. मला परत सर्वांना भेटायची इच्छा मनांत आहे... या वेळेस अपरिहार्य कारणामुळे काही मायबोलीकर येऊ शकले नाहीत. मग मी परत मुम्बईल येईन तेव्हां जास्तीत जास्त संख्येने भेटायचं नं?

फ़ोटो नंतर टाकीन...
अरे मला वाटलं की कशाला जर्मनीवर आपलं स्वीस पुराण लावायचं म्हणुन लिहित नव्हते.... चला सुरू करुया तू म्हणतोयस तर!

कुठून लिहायला सुरुवात करू... इथला निसर्ग... खरोखरच अतिशय सुंदर आहे, जास्वन्दने 'मी काढलेले फोटो'मध्ये टाकलेला फोटो पहा. तुम्ही तसे बॉलिवूडमध्येही पाहिले असणारच. मला तर इथला पानझडीचा ऋतु फारच आवडतो. लाल पिवळ्या झाडांच्या पानांवर सुर्याची तिरपी व सोनेरी किरणं पडली की एक अलौकिक मंत्रमुग्ध दृष्य निर्माण होतं. माझ्यामते हा एक देवदत्त प्रदेश आहे... त्या त्या ऋतुमध्ये हा प्रदेश निरनिराळी रुपे धारण करतो, सगळीच सरस!

गावं, टेकड्या, डोंगर, रस्ते, घरं आखिव व रेखिव.... त्याला कारण शिस्त. हे मी जाड अक्षरांत लिहिलंय मुद्दाम! एखाद्या गावचा पंचायतीने गावाची जशी रुपरेखा ठरवलेली असते त्याबरहुकुम चालायचं ही शिस्त पाळली जाते... प्रत्येक गावाच्या घराच्या छताचा कोन गांवपंचायतीने ठरवून दिलेला असतो. नव्या घराचं छत तसंच होईल याची घर बांधणार्‍याला काळजी घ्यावीच लागते. त्यामुळेच स्वीस खेडी व गावं रेखिव दिसतात. आम्ही घर बांधताना हा अनुभव घेतलाय. आर्किटेक्टला जेव्हा आम्ही घराच्या छताचा कोन बदलता येणार नाही का असं विचारलं होतं तेव्हा त्याने हा कायदा दाखवला होता.

घर दार एवढंच नव्हे तर शाळा पटांगणं, सार्वजनिक बागा अतिशय स्वच्छ ठेवलेली असतात. हे लोक लहानपणापासुन स्वच्छतेचं धडे गिरवीत असतात. उदाहरण द्यायचं तर स्वीस घरी जेवायला आले तर एकही अन्नाचा कण इथे तिथे सांडला जात नाही... अगदी लहान मुलं देखिल न सांडता लवंडता जेवतात. मी एकदा आपला चिवडा मुद्दाम ड्रिंक्सबरोबर ठेऊन पाहिलं... एकही पोहा, दाणाच काय पण फोडणीतील मोहरी - जिरं देखिल सांडत नाही!

स्वीसमध्ये त्या त्या गांवाची किंवा शहरातील म्यूनिसीपालीटीसारखी
(Gemeinde) सरकारी संस्था स्वायत्त असते. प्रत्येक गांवपंचायत सर्व प्रकारचे कर नागरिकांकडून गोळा करते. केंद्राचा पण वेगळा आयकर असतो. या कराच्या भांडवलातून नागरिकांना प्रामाणिकपणे सर्व सुविधा पुरवल्या जात असतात. मुलांचे शिक्षण याच सरकारी कोषागारातून होतं. पाठ्यपुस्तके, वह्या, सर्व प्रकारच्या लेखण्या, कॅल्क्युलेटर मोफत पुरवले जातात. अर्थात मुलांना दुसर्‍याच्या प्रॉपर्टीचा मान राखणे शिकवीत असल्यामुळे अगदी चार पाच वर्षे या सामानाचं हस्तांतर होऊनही नग धडधाकट परिस्थितीत असतात! जर सरकारी वस्तू हातून खराब झाली तर त्याची किंमत वसूल केली जाते. स्वीसना पैसे गेल्याचं भारी दु:ख होतं, त्यामुळे वस्तू नीट हाताळणं आलंच. शाळा किंवा युनिव्हरसिटी फी आकारत नाहीत. ती सरकारची जबाबदारी असते.

इतकं असुनही फार कमी स्वीस लोक उच्च शिक्षणाच्या भानगडीत पडतात. अभ्यास व पाठ्यक्रम खूप असतो, परिक्षा काटेकोर असतात. अर्थात् कुठलीही वशिलेबाजी शिक्षणक्षेत्रांत नाही. एखाद्या शाखेची ऍप्रेन्टिसशीप करून कष्ट व बुद्धीकौशल्यावर बहुसंख्य स्वीस प्रगती करताना दिसतात. या शाखा म्हणजे विविध औद्योगिक, वैज्ञानिक, शेती वगैरे वगैरे. अगदी फुलांचे गुच्छ करून विकायला देखिल ऍप्रेन्टिसशीप करुन सर्टिफिकेट मिळवावे लागते

तरीही सर्व आलबेल असतं अशी समजूत करून घेऊ नका... व्यक्ती तितक्या प्रकृती! भ्रष्ट्राचार नाही असं म्हणणं धारिष्ट्याचं होईल. पण सामान्य माणसाला त्यापासून उपद्रव होत नाही. आम जनतेची गरज विनासायास पुरविली जाते... सरकारी, निमसरकारी संस्थांतून कामें चटकन होतात. फक्त त्यांची भाषा आत्मसात केली पाहीजे!

क्रमश: .....
स्वीसमधे तीन भाषा बोलल्या जातात. ६०% जनता जर्मन बोलते. स्वीस जर्मन डायलेक्ट जर्मन बोलणार्‍या प्रांतात बोलली जाते. जशी आपली मराठी किंवा कोकणी प्रांताप्रांतातून बदलते तशीच वालिस(एक स्वीस कॅन्टन)ची भाषा सेंट गालनच्या लोकांना समजायला कठीण जाते. जरी स्वीसमध्ये भाषावार प्रांतरचना आहे तरी त्यावरुन राजकारण होत नाही. काही कॅन्टोन्स ऑफिशिअली द्विभाषिक आहेत, तिथे लोक जर्मन किंवा फ्रेंच दोन्ही भाषेत प्रवीण असतात. उदाहरणार्थ, Fribourg or Biel ही शहरे दोन्ही भाषा वापरतात. आणखी एक भाषा इथे आहे... रोमान्श, पण ती ३५,००० लोकंच बोलतात.... त्यामुळे मी इथे त्याबद्दल फारसं लिहित नाहीये.

स्वीसमध्ये जेव्हा आम्ही आलो म्हणजे - २५ वर्षांपुर्वी - तेव्हा इथली भाषा येणे जरुरीचे होते. (आता इंग्रजीचा प्रसार झाला आहे... आयटीमुळे इंग्रजी शिकणे अपरिहार्य झाले त्यामुळे स्वीस बर्‍यापैकी इंग्रजी बोलतात.) आम्ही आलो ते जर्मन प्रांतात. स्वीस जर्मन लिहिले जात नाही त्यामुले लेखी व्यवहार जर्मनमध्ये होतो. वर्तमानपत्रे जर्मन भाषेत असतात, दूरदर्शनवर बातम्या जर्मनमध्ये असतात्; फक्त वेधशाळा दूरदर्शनवर हवामानाचा अंदाज स्वीस जर्मनमधे वर्तवते. तुमच्या आजुबाजुला, रस्त्यावर, दुकानातुन स्वीस जर्मनच बोलली जाते, इतकंच काय पण ऑफिसमध्ये मिटींगला स्वीस जर्मनच वापरतात. तुम्ही सांगू शकता की लेखी जर्मनमध्ये मिटिंग घेतल्यास मला समजायला बरे पडेल.... तुमच्यासाठी सुरू करतात जर्मनमधे मिटिंग पण पाच मिनिटांतच स्वीस जर्मनमध्ये संभाषण सुरु होते. त्यामुळे भाषा शिकल्यावाचून पर्याय नाही. जिथे राहतो तिथली भाषा शिकलीच पाहिजे.

ज्यांची स्वीस जर्मन मातृभाषा असते ते शाळेत जर्मनमध्ये लिहिताना चुका करतात किंवा त्यांना जर्मन कठिण जाते. याचं एक कारण म्हणजे शाळेत शिक्षक विषय स्वीस जर्मनमध्ये समजावून सांगतात पण वाचतात जर्मनमध्ये.... या गुंतागुंतीमुळे आता शिक्षकांना वर्गांत लेखी जर्मन बोलण्यास सांगण्यात आले आहे.

स्वीस समाज सुमारे चाळीस वर्षांपुर्वी कुटुंबप्रिय होता. रुढीप्रिय स्वीस अजुनही कुटुंबपध्दती टिकवून आहेत. नवी पिढी वेगळा विचार करते. त्यामुळे विभक्त होण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. शून्याच्या खाली बर्थरेट गेला आहे. रहाणीमान उच्च असल्याने मुलं परवडत नाहीत. चिंतेची बाब आहे.

प्रत्येक स्वीस मिलिटरीत असतो. त्यामुळे ८०% घरांत बंदुका अगर रायफली असतात. पण गुन्हेगारी अजिबात नाही म्हटलं तरी चालेल. फार झालं तर स्वीस माणूस मिलिटरीच्या शस्त्रांनी आत्महत्या करील पण शस्त्र दुसर्‍यावर चालवणार नाही, अर्थात अपवाद असतीलच. काही प्रमाणात जनता अंतर्मुख आहे. 'जगा व जगू द्या' अशा विचारांची आहे. त्यामुळे आपण दुसर्‍या देशातील असुनही आपला धर्म, राहाणी जतन करु शकतो. त्यांचे कायदे कानून संभाळून आपण आपलं वेगळेपण जपलेलं त्यांना खूप आवडतं.
हे मी प्रियाच्या रंगीबेरंगी पानावर टाकलं होतं, पण आता इथेही टाकते आहे....

प्रिया, आम्ही १५ एप्रिल २००६ पासुन आम्ही
goldan retriever आणला आहे. तू जे लिहिलं आहेस तसंच आम्ही अनुभवतो आहोत. त्याला आम्ही breeding house मधून विकत घेतला. तिथे त्याचं नाव Quando ठेवलं होतं. स्वीसमधे प्रत्येक कुत्र्याच्या कानांत चीप इन्जेक्ट करतात. चीपमध्ये त्याच्या मालकासकट त्याची सर्व माहिती असते, त्यामुळे स्वीसमधे प्रत्येक कुत्र्याची सरकारकडे यादी असते. चीपमुळे त्याचं नाव आम्हाला बदलणं शक्य नव्हतं. मला स्वत:ला कुत्री तितकीशी आवडत नाहीत, पण नवर्‍याला अतिशय वेड, त्याने रिटायर झाल्यावर लगेच क्वांडोला घरी आणला.

क्वांडोची लव सोनेरी आहे व डोळे काजळ घातल्यासारखे काळेभोर आहेत. आणला तेव्हा १२ आठवड्याचा होता, वजन ९ किलो होतं. त्याची वाढ फार वेगाने होते आहे... आता ७ महिन्यांचा झाला आहे आणि वजन २५ किलो! पूर्ण वाढ झाल्यावर त्याचं वजन म्हणे ३५ ते ४० किलोपर्यंत जाईल असं कळलं! (रेफ: त्याचा डॉक्टर!)

पहिले दोन महिने मी खरंच फार टेन्स होते, आता त्यानेच लळा लावला आहे. त्याची शाळा असते, तिथे कुत्र्यांना शिस्त कशी लावायची याचं शिक्षण देतात. प्रायमरी पास झाला... ऑगस्टमध्ये हायस्कूलमध्ये गेला आहे. शाळेचा खूपच फायद होतोय आम्हाला! त्याचं सोशलायझेशन होतं.... शाळेत इतर कुत्र्यांशी संपर्क आल्यामुळे फिरायला गेल्यावर जर दुसरे कुत्रे भेटले तर इतका छान खेळतो की त्या कुत्र्यांच्या मालकांना क्वांडो खूपच आवडतो. शाळेतले कमांडस विशेषत: रस्त्यावरुन चालतांना, घरी पाहुणे आले असताना, खाण्याच्या सवयी लावताना फार उपयोगी पडतात. शाळेमुळे वळण लावणं सोपं जातं.

सध्या आमची दिनचर्या क्वांडोच्या भोवती व क्वांडो आमच्याभोवती! त्याचं खाणं, शी-शूसाठी बाहेर घेऊन जाणं, फिरायला नेणं, त्याच्याशी खेळणं.... यांत दिवस कसे निघून जाताहेत कळत नाही! माझ्या नवर्‍याला निवृती नंतरचे डिप्रेशन येणं तर दूरच.... क्वांडोमुळे स्वत:बद्दल विचार करायला फुरसत नसते!

आता पुरे! नाहीतर पु. लंच्या कुत्र्यांच्या मालकांच्या यादीत मी जाऊन बसेन!


बी ने मला पुढे शाळेविषयी लिहायचा आग्रह केला, म्हणुन पुढे.....

बी, अरे शाळाच काय पण आमच्या गावांत
Cynology Association आहे. या संस्थांमधुन कुत्र्यांवर प्रशिक्षण घेतलेली माणसं काम करीत असतात. हे शिक्षक अगदी नावापुरती फी आकारून कुत्र्यांची शाळा चालवतात. इथल्या शिक्षकांचा पोटाचा व्यवसाय दुसरा असतो, हे काम ते विना मोबदला करतात. फी संस्था चालवायला व कुत्र्यांच्या प्रशिक्षणासाठी जी साधने लागतील त्यावर खर्च होते. या संस्थेचं खूप मोठं आवार आहे. तर्‍हेतर्‍हेचे खेळ आहेत. आवार नदीच्या काठावर असल्याने कुत्र्यांना पाण्यांतही सोडतात. सगळे कुत्रे मस्त मजेत एकेमेकांसोबत पोहतात.

कुत्र्याचं पिल्लू असतांनाच त्याला शिक्षण देणे, वळण लावणें हे लोक जरुरीचं समजतात. त्याचा फायदा होतो हे आम्ही अनुभवतो आहोत. कुत्र्याने मालकाच्या सांगण्याकडे एकाग्रतेने लक्ष देणे ही पहिली महत्वाची पायरी आहे, पण ते शिकवणे कौशल्याचे शिवाय अत्यंत जिकिरीचे आहे. शाळा आठवड्यांतून एकदाच असते. कुत्र्याचा मालक बरोबर जातो. दोन तास प्रशिक्षण असते. कुत्र्यांची बुध्दी काही आपल्यासारखी नसते हे लक्षांत घेऊन मालकाने कुत्र्याकडून शाळेत शिकवलेले पुढे करून घ्यायचे असते.... गृहपाठच म्हण! कुत्र्याकडून गृहपाठ करुन घ्यायला संयम आणि चिकाटी दोन्हीची अत्यंत जरुरी आहे. थोडक्यांत कुत्र्याबरोबर मालकाचंही शिक्षण! डबा देत नाही पण बरोबर कुत्र्यांची बिस्किटं न्यायची असतात. कुत्र्याने शिकवलेले नीट केले की त्याला एक बिस्किट देऊन प्रोत्साहन द्यायचे असते. तसंच गृहपाठ करतांना बिस्किटाची बक्षिसी दिली की कुत्रा ते लक्षांत ठेवतो.

दुसरी महत्वाची गोष्ट... कुत्र्याने कुठेही केलेली शी - अगदी जंगलांतसुध्दा - उचलायची सक्ती आहे. ठिकठिकाणी रॉबी डॉग नावाच्या हिरव्या पेट्या उभारलेल्या असतात. त्यांत काळ्या रंगाच्या छोट्या प्लास्टिकच्या पिशव्या ठेऊन दिलेल्या असतात. त्या हाताला लावून शी उचलून त्याच डब्यांतील मोठ्या पिशवीत टाकून द्यायची असते. या पिशव्या व्यवस्थित मोठ्या असतात. आपले हात एकदम सुरक्षित राहातात. शेतांतदेखिल कुत्र्याने शी केली तर ती उचलावी असा तिथे फलक लावलेला असतो. कुत्री पाळणारे इमाने इतबारे हा नियम पाळतात!

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner lalitas Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators