Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 29, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Archive through October 29, 2007 « Previous Next »


Tuesday, September 11, 2007 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

klaaeenahavia phule

दोन औषधी झाडानंतर एक शोभेचे झाड बघु. हा आहे क्लाईनहाविया.

अलिकडे गुलाबी रंग म्हंटला कि जास्तीत जास्त गडद छटा अपेक्षित असते. पण हि फुले मात्र अति नाजुक. आकाराने आणि रंगानेही. पांढर्‍याकडुन गुलाबी वर्णाकडे झुकलेला रंग. पाच पाकळ्या. मधे एक गुलाबी रंगाचे नरसाळे आणि त्यावर एक नाजुकसा पिवळा ठिपका.


klv jhad

क्लाईनहावियाचे झाड पावसाळ्यातच फुलावर येते. याची पाने थोडीशी पिंपळासारखी, पण टोक वैगरे नाहीच. पानाचा रंग मात्र अगदी मंद हिरवा. त्यावर हे असे नाजुक गुलाबी तुरे.

या झाडाला पंचधारी फळे लागतात. आतुन पोकळच असतात ती. तुर्‍यात फुले व फळे एकदमच दिसतात.

माटुंग्याच्या किंग्ज सर्कलपासुन माटुंगा स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर हारिने हे वृक्ष उभे आहेत. माझा कॉलेजला जाण्यायेण्याचा रस्ता तो. अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवसापासुन त्यांच्या प्रेमात पडलोय मी. तिथे ते वृक्ष अर्थातच बरिच वर्षे आहेत, पण त्यांची वाढ तीन चार मीटर्स पर्यंतच झालेली दिसतेय.

वरचा फोटो मात्र राणीच्या बागेतला आहे. तिथेही तो वृक्ष फारसा वाढलेला नाही. कोल्हापुरला मात्र याचे खुप मोठे वाढलेले झाड मी बघितले.

याचे काहि औषधी उपयोग आहेत का, ते मला माहित नाही. याला मराठी नावही नाहीच बहुतेक. पण केवळ नजरसुखासाठी तरी मला तो प्रिय आहे.


Saturday, September 15, 2007 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री गणेश गायत्री मंत्र व इतर मंत्र.
gayatree

kleshanashak mantra

shree laxmee vinaayak mantra


Sunday, September 16, 2007 - 12:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री गणेशाय नमः
Ganesh


Wednesday, September 26, 2007 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कैलाशपतिच्या फ़ुलांच्या पोस्टमधे, नागचाफ़्याच्या उल्लेख केला होता. अनेकजण कैलाशपतिच्या फुलानाच नागचाफ़ा म्हणत असले तरी, खरा नागचाफ़ा तो नव्हे.
ह्या नागचाफ़्याचा शोध मी बरेच दिवस घेत होतो, आणि तो सापडला शेवटी राणीच्या बागेतच.
राणीच्या बागेत मी लहानपणापासुन जातोय. पुर्वी प्राणी आणि पक्ष्यांची आकर्षण होते आता मात्र झाडांच्या ओढीने जातो. पुर्वी तिथे झाडांवर नावाच्या पाट्या होत्या, आता त्या काढुन टाकल्या आहेत. ( याबाबत डॉ डहाणुकरानी लिहुन ठेवले आहे, कि त्या ज्यावेळी एखाद्या झाडाच्या औषधी गुणधर्माबाबत लिहीत असत, त्याच्या दुसर्‍या दिवसापासुन राणीच्या बागेतल्या त्या झाडावर संक्रांत येत असे. लोक त्याची पाने फुले ओरबाडुन नेत असत. म्हणुन बहुतेक या पाट्या काढुन टाकल्या असाव्यात. )


nagachafa

Mesua ferrea असे याचे शास्त्रीय नाव. याची पाने भाल्याच्या टोकासारखी, वरुन गडद हिरवी तर खालुन चंदेरी असतात. कोवळी पालवी तांबुस रंगाची असते. अगदी कोवळी पाने लाल रंगाची मग गुलाबी तांबुस व शेवटी हिरवी होतात. काहिवेळा पानावर निळसर झाकही दिसते.

झाड साधारण २४ ते २५ मीटर्स पर्यंत वाढु शकते. याला खालपासुनच भरपुर फ़ांद्या फ़ुटलेल्या असतात, त्यामुळे झाड खुप भरगच्च दिसते.
हे झाड तसे भारतभर दिसते, तरिही फुलावर आल्याशिवय ओळखणे कठिण आहे.
या फुलाला चारच पाकळ्या असतात. पण त्या मात्र अगदी पांढर्‍याशुभ्र असतात. पाकळ्या उलट्या वळलेल्या असतात, आणि त्यात साहारण नागफणीचा आकार दिसतो, म्हणुन हे नाव.
मध्यभागी पिवळ्याधम्मक पुंकेसरांचा गुच्छ असतो. फ़ुले खुप सुगंधी असतात. हे पुंकेसर सुकवुन मसाल्यात वापरतात. त्याला नागकेशर म्हणतात. ( खुपदा खर्‍या नागकेसरात उंडीच्या पुंकेसराची भेसळ केली जाते. )
हे नागकेसर औषधी आहे. उष्ण, तिखट, व्रणरोपक असे याचे गुणधर्म आहेत. खोकल्यावर हे उपयोगी ठरते.
याची फुले व पाने सर्पदंशावर वापरतात. याच्या बिया तेलकट असतात, आणि त्या तेजस्वी पिवळ्या ज्योतिने जळतात.

याची साल भुरकट रंगाची असुन ती पापुदयाने गळुन पडते. आत मात्र लालसर तपकिरी रंगाचे मजबुत लाकुड असते. या लाकडाच्या मजबुतीमुळे याला आयर्नवुड ट्री असेही नाव आहे. गोल्फ़ क्लब्जचे हेड्स याच्यापासुन बनवतात.

एकंदर एक देखणा आणि उपयोगी वृक्ष.
Wednesday, September 26, 2007 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाई, जुई, चमेली हि सगळी मंडळी जास्मिन कुळातली. संध्याकाळी वा रात्री उमलणारी पांढरीशुभ्र फुले, हि एक कॉमन बाब, पण तरिही प्रत्येकीत थोडाफार भेद आहे.

जाई जुई या अगदी नाजुक वेली. जाईचा जुना वेल, मात्र खुप मजबुत असु शकतो. यांची पाने बदामाकृति.
थोडीफार गोलसर आणि संयुक्त पाने असणार्‍या एका प्रकाराला गोव्यात जाया म्हणतात. याच्या पाकळ्यावर एक गुलाबी रंगाची रेघ असते. गोव्यातील देवळात खास जायांची पुजा बांधायची रित आहे. यात सर्व देऊळ, निव्वळ या फुलांच्या गजर्‍यानी सजवले जाते.
मदनबाणाची फुले पण अशीच पण जरा आकाराने मोठी असतात.
नेवाळीची फुले त्याहुन जरा मोठी. याचे झुडुप असते व त्याला गोलाकारात हिरवे पुष्पगुच्छ लागतात.
रानोमाळ फ़ुलणारी कुंदाची फुले पण याच कुळातली. ऐन ग्रीष्मात अगदी भरभरुन फुललेला असतो हा कुंदा. पण तिथे फुले खुडायला कुणीच नसल्याने, त्याला छोटीछोटी काळसर फळेही धरतात. पक्षी हि फळे आवडीने खातात. आणि त्यातुनच कुंदाचा प्रसार होतो.

कागडा हा जरा कमी सुगंधी पण टिकाऊ प्रकार. मुंबईच्या बाजारात अक्षरशः किलोनी विकतात हा. खास दक्षिणेकडुन येणारा तो मल्लिगे.
सुगंधाच्या बाबतीत सगळ्यात वरचढ तो अर्थातच मोगरा. यातही वेली मोगरा, बटमोगरा असे अनेक प्रकार आहेत. जितका उन्हाळा कडक, तेवढा मोगर्‍याला सुगंध अधिक. मस्कतमधल्या कडक उन्हाळ्यातही मोगरा भरभरुन फ़ुलतो. तिथे या दिवसात अनेकजण ऑफ़िसमधल्या टेबलावर मोगर्‍याची फुले ठेवतात. मोगर्‍याची फुले कोरड्या पांढर्‍या तीळात पुरुन ठेवली तर, तिळात तो सुगंध शोषला जातो, आणि मग त्या तीळाचे तेल काढले तर त्या तेलाला मोगर्‍याचा सुगंध येतो.


hajari mogara

वरच्या फोटोतला मोगरा मात्र या कुळातला नाही. याला हजारी मोगरा असे नाव आहे. Clerodendrum philippinum असे याचे शास्त्रीय नाव. अर्थातच मूळ ठिकाण, फ़िलीपीन्स. याचे झुडुप असते. पाने बरिच मोठी असतात. वरच्या फोटोत दिसतोय, त्यापेक्षा मोठे गुच्छ असु शकतात. याच्या पाकळ्या संख्येने जास्त असतात व फुलही भरीव दिसते. सुगंध बराचसा मोगर्‍यासारखा.

chandanavel


सुगंधाच्या बाबतीत, या कुळाशी नाते सांगु शकेल अशी एक वेल असते. तिचे नाव चंदनवेल. Aganosma cymosa असे हिचे शास्त्रीय नाव.

मुंबईत मादाम कामा रोडच्या बाजुला, मंत्रालयाजवळ जे उद्यान आहे, तिथे हि वेल आहे. जंगलातही हि वेल क्वचित दिसते.
फ़ुलांची ठेवण मात्र खुपच वेगळी आहे. याला एक उंच देठ असतो. त्या देठाला मधेच पाच हिरव्या पाकळ्या फुटतात. त्यावर हे फुल फुलते. या फुलांच्या पाकळ्यांची ठेवणही जरा वेगळीच आहे. कागदाचे भिरभिरे असावे तसे हे फुल दिसते. फुल गळुन पडले तरी मागची हिरवी तारकाकृति वेलीवर तशीच असते, त्यामुळे या वेलीला दोन प्रकारची फुले लागलीत कि काय, असे वाटत राहते.
पण तशी हि वेल, फारशी दिसत नाही.
Friday, September 28, 2007 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा आहे वेली मोगरा,

velee mogaraa

हि आहे नेवाळी

nevaaLee

हि आहे जुई Jasminum auriculatum

jui

आणि हि आहे रानजुइ Jasminum ritchiei

Ranjui


Friday, September 28, 2007 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निवडुंग हे वनस्पतिंमधले एक खास प्रकरण आहे. पर्णविहिन तरिही हिरवी, बहुतांश काटेरी वनस्पति असे तिचे सर्वसाधारण रुप.

हे सगळे केलेले असते ते निव्वळ तग धरण्यासाठी. निवडुंग वाढतो तो कमी पाण्यावर. त्यामुळे मिळेल ते पाणी साठवुन ठेवण्याकडे कल असतो. यासाठी याची खोडं असतात मांसल.
पाने प्रकाशसंश्लेशण करुन अन्न तयार करत असली तरी त्यांच्या पसरट आकारामुळे, पाण्याचाही अपव्यय करतात. ते निवडुंगाला परवडण्यासारखे नाही, म्हणुन पाने अगदीच छोटीशी. बहुदा फ़ांद्यांच्या टोकाशी येणारी. आणि थोड्याच वेळात गळुनही जाणारी. पण अन्न निर्माण करायचे काम तर चालु राहिले पाहिजे, म्हणुन ती जबाबदारी खोडानीच उचललेली असते.

पण एखाद्या प्रदर्शनात बघायला गेलात तर अनेक आकाराची व रंगांची निवडुंग दिसु शकतात. फ़ुलांचे सगळे मनोहारी रंग मौजुद असतात त्यात.
शेवटी निवडुंगही एक वनस्पति आहे आणि फ़ुले व पर्यायाने बीज उत्पादन तिला करावेच लागते. आपल्या अजागळ रुपाला नाकं मुरडणार्‍याना, डोळे विस्फारुन बघावे लागेल, इतकी सुंदर असतात निवडुंगाची फ़ुले. त्यातही दिवसा रात्री फ़ुलणारी असे प्रकार आहेतच.

केनयाचा बहुतांशी भाग वाळवंटी असला तरी तिथेही भरपुर पाऊस पडणारी काहि ठिकाणे आहेत. त्यापैकी अहेरो नावाच्या गावी माझे खुपवेळा जाणेयेणे व्हायचे. त्या गावच्या वाटेवर निवडुंगाची बने आहेत आणि त्यावर लाल पिवळ्या फ़ुलांची देखणी आरास असायची. कृत्रिम वाटावीत इतकी देखणी फ़ुले होती ती. माझ्या नेहमीच्या येण्याजाण्याच्या वाटेवर एक भलामोठा निवडुंग होता. त्याला शुभ्र कमळासारखी फ़ुले यायची, पण ती रात्री उशीरा उमलायची व पहाटेसच कोमेजुन जायची. निव्वळ ती फ़ुले बघण्यासाठी मी धोका पत्करुन भल्या पहाटे जायचो. माझ्या ओंजळीतही न मावणारे असे सुगंधी देखणे फ़ुल असायचे ते. ( आपण ज्याला ब्रम्हकमळ म्हणतो, त्याच्या किमान चौपट मोठे. )

आपल्याकडेही तशी निवडुंगांची कमतरता नाही. बहुतेक ठिकाडी फ़ड्या निवडुंग असतोच. अगदी समुद्रकिनारीही हा वाढतो आणि उंच डोंगरावरही.


faDya nivaDungache ful

Opuntia elatior असे याचे शास्त्रीय नाव. अशी फ़ुले आली कि त्याचे अवघे निवडुगत्व सरुन जाते. याच निवडुंगाला लालभडक फळेही धरतात. या फ़ळाना बारिक काटे असतात, म्हणुन ती फळे भाजुन खातात. भाजल्यावर काटे जळुन जातात.

बाकि या झाडाचा तसा काहि उपयोग नाही. क्वचित कुंपण म्हणुन तो लावतात, पण त्याची वाढ फार झपाट्याने होत असल्याने, तो लवकरच काढुन टाकावा लागतो.
एका प्रकारच्या निवडुंगाचा रस गढुळ पाण्यात घातला, तर ते पाणी नितळ होते, असे मी ऐकले आहे. अजुनही दिवाळीच्या सुमारास काहि लोकात, पाचधारी शेर निवडुंगाचे कोरुन दिवे केले जातात.

आपण वेस्टर्न सिनेमात खुपदा त्रिशुळासारखे वाढलेले निवडुंग बघतो. ते मात्र खुपच अवाढव्य वाढतात. त्यालाही पांढरी फुले येतात. अनेक पक्षी व वटवाघळे त्यावर येतात. अनेक पक्षी त्यात ढोली करुन राहतात. गरुडासारखे काहि पक्षी, त्यावर विसावतात. निवडुंगावर साप खात बसलेला गरुड, हे तर मेक्सिकोचे मानचिन्ह आहे.

तिथे निवडुंगाचा खाण्यासाठी उपयोग करतात. त्यापासुन दारुही करतात.
एका निवडुंगाचे फळ मात्र गेल्या काहि वर्षात चांगलेच प्रसिद्ध झालेय.


Dragon Fruit1

Dragon fruit cut


ड्रॅगन फ़्रुट असे याचे नाव. यात लालभडक व गुलाबी असे दोन प्रकार दिसतात. रंग आणि आकार फारच देखणा असतो.
खुप जणाना हे फळ माहित नसते, आणि रुपाकडे बघुन खाण्याजोगे असेल असे वाटतही नाही. ( म्हणुन खुपदा ते फ़्री टेस्टिंग साठी कापुन ठेवलेले असते. )

या फळात पांढरा गर असतो व काळ्या बिया असतात. गर अतिगोड नसतो, नुसता गोडसर लागतो. तोंडात पटकन विरघळतो. अजुन चव बघितली नसेल, तर एकदा अवश्य खाऊन बघा.

Tuesday, October 02, 2007 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अवाकाडोची आणि माझी ओळख झाली साधारण ३० / ३५ वर्षांपुर्वी. आमच्या कुर्गी शेजारणीने बटरफ़्रुट म्हणुन त्याची ओळख करुन दिली होती. ते कसे खायचे हे पण तिनेच दाखवले होते.

त्यावेळी अर्थातच ते मुंबईत बाजारात मिळत नव्हते. मग असे वाचनात आले कि केवळ पुणे बॅंगलोर अश्या थंड हवेच्या ठिकाणीच त्याची झाडे वाढतात.

केनयातला किसुमु भाग हा लेक बेसिन एरियामधे येतो. तिथले हवामान काहि थंड म्हणता यायचे नाही, पण तिथे मात्र हि झाडे भरपुर होती. नायजेरियातले पोर्ट हारकोर्ट तर समुद्री बंदरच, तिथेही हि झाडे भरपुर. म्हणजे या झाडाबाबत समजले होते ते खोटेच ठरले होते तर.


avakado

Persea americana असे याचे शास्त्रीय नाव. मेक्सिको हे उगमस्थान. गोव्यातही हि झाडे भरपुर आहेत. पण तरिही हे फळ काहि अजुन लोकप्रिय होवु शकले नाही. बाजारातही ते अभावानेच दिसते.

याचे झाड चांगले उंच वाढते. ३० मीटर्सच्या पुढची उंची ते गाठु शकते. झाडाची पानी साधी, दहा ते बारा सेमी लांब व सहा ते आठ सेमी रुंद. किंचीत बाहेर झुकलेली व हिरवीगार असतात. याचा पर्णसंभार खुप दाट असतो त्यामुळे, सावलीसाठी झाड आदर्श आहे.

याला हिरवाच मोहोर येतो. आधी बाळ हिरड्या एवढी असणारी हि फळे एखाद्या लहान पपई एवढी मोठी होतात.

पण या फळाची एक खोड आहे. हि फळे झाडावर क्वचितच पिकतात. आकाराने मोठी व रंगाने चमकदार हिरवी होत जातात, पण पिकत नाहीत. तोडुन घेतली तर मात्र एक दोन दिवसात पिकतात. पिकल्यावर साल गडद किरमिजी रंगाची होते. याला किंचीत आक्रोडाचा स्वाद येतो.

या एवढ्या मोठ्या फळात एकच मोठी, लिंबा एवढी बी असते. पिकलेल्या फळाच्या सालीकडे फ़िक्कट हिरव्या तर आत फिक्कट पिवळ्या रंगाचा गर असतो. हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या या खास छटा, या फळाच्या नावानेच ओळखल्या जातात.

पण तरिही हे फळ लोकप्रिय न होण्याचे कारण म्हणजे याची चव असावी. नुसते खाल्ले तर या फळाला काहिच चव लागत नाही. कच्चे खाल्ले तर चक्क कडवट लागते.
त्यामुळे काहितरी भर घातल्याशिवाय याला चवच लागत नाही. मॅश करुन त्यात कांदा मिरची वैगरे घालुन डिप करता येते किंवा साखर घालुन खाता येते. गराचा रंग टिकवण्यासाठी यात थोडा लिंबाचा रस घालावा लागतो. याच्या गराचा मिल्कशेकही छान लागतो.
माझी खाण्याची रित म्हणजे बी काढुन त्या खळग्यात, चमचाभर दूध आणि थोडी साखर घालायची. मग चमच्याने हळुहळु गर कुस्करुन, त्यात मिसळायचा. या फळाची सालच बोल म्हणुन वापरता येते. आणि थंडगार करुन खाल्ले तर एका वेगळ्या चवीचे आईसक्रीम खाल्ल्याचे समाधान मिळते.

फळात क्वचितच असणारे स्निग्ध पदार्थ या फ़ळात असतात. पोटॅशियम आणि काहि जीवनसत्वेही यात असतात.
याच्या आकारावरुन आणि नावावरुन काहि गैरसमज प्रचलित होते. सध्या मात्र ते फळ भारताबाहेर लोकप्रिय होत आहे. भारतातही ते व्हावे. निदान त्याची लागवड तरी मोठ्या प्रमाणात व्हावी.
Tuesday, October 02, 2007 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतीयाना अतिप्रिय असलेली मिरची केवळ तीन शतकांपुर्वी भारतात आली, त्यापुर्वी आपल्याकडे तिखटपणासाठी, मिरी आले याबरोबरच पिंपळीचा उपयोग केला जात असे.

अत्यंत औषधी अश्या या वनस्पतिचा आपल्याला अलिकडे मात्र विसर पडत चालला आहे.


pimpali


Pepper longum असे याचे शास्त्रीय नाव. याच्या वेली असतात व आधाराने वर चढत जातात. पाने ५ ते ८ सेमी लांब व हृदयाकृति असतात. यात जुन पाने रुंद व कोवळी पाने लांबट असतात.

सप्टेंबर महिन्यात याला वरच्या फोटोतल्याप्रमाणे उभट शेंगा लागतात. या जुन झाल्या कि त्याला पिंपळ्या म्हणतात.

या झाडाचे मुळ इंडोनेशिया असले तरी भारतभर याची लागवड केली जाते. याच्या पेरावर छोटे छोटे कंदही लागतात आणि ते कंदही औषधी आहेत.

पिंपळी चवीला खुपशी मिरीसारखीच लागते. यामधे पाईपरीन, पिंपलटिन, पायपरोलॅक्टम ए आणि बी, पायपोराडीओन अशी अनेक अल्कलाईड्स असतात.
लहान मुलाना दुध पचावे तसेच बल मिळावे म्हणुन वर्धमान पिंपळी प्रयोग केला जातो. ( यात दुधात क्रमाक्रमाने जास्त पिंपळ्या उकळुन, ते दूध प्यायला देतात. )

इतकेच नव्हे तर कफ़, दमा, वात, खोकला, ताप, मूळव्याध, मेदोरोग, उदरशूल, अपचन, अपस्मार, कुष्ठरोग, काविळ अश्या अनेक विकारात पिंपळी वापरतात.
Thursday, October 04, 2007 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे दोन दिवसांपुर्वी तिवराची आठवण निघाली होती. Barringtonia acutangula असे त्याचे नाव. सदा हिरवागार दिसणारा हा वृक्ष, भरपुर पर्णसंभार लेऊन असतो.

tivar

वसंत ॠतु आला कि याला लांबलांब तुरे फुटायला लागतात. हे तुरे झाडाखाली झुलत असतात. सहज फ़ुटभर लांब असतात. मग त्यावर लालभडक फ़ुले दिसु लागतात. या फ़ुलात पाकळ्या वैगरे नसतातच. बाहेरचा हिरवा पुषपोषच आतुन गुलाबी रंग घेतो.

वरचा फोटो खुपच जवळुन घेतलाय. पण लांबुन बघितल्यावर असे विरळ पुंकेसर न दिसता, एकच केसाळ माळ दिसते. या झाडाला हे तुरे खुप लागतात आणि ती शोभा काहि औरच.

या झाडाबरोबर मला दुसरेच एक झाड आठवते.

पुर्वी महाराष्ट्र शासनातर्फ़े जे दुध वितरित केले जात असे, ते अर्धा लिटरच्या बाटल्यांमधुन दिले जात असे. केंद्रावर रिकाम्या बाटल्या घेऊन जायच्या आणि भरलेल्या घेऊन यायच्या. दुधाबाबत गृहिणी किती काटेकोर असतात, हे मी सांगायला नकोच.
तर या बाटल्या रोज धुणे हा एक कार्यक्रम असायचा. ( खरे तर सरकारी दुग्धशाळेत त्या बाटल्या धुतल्या जात असतच. आणि कितीही धुतली तरी आपण जी रिकामी बाटली परत केली, त्यातच आपल्याला दुसर्‍या दिवशी दूध मिळेल, याची शक्यता जवळजवळ नव्हतीच. )

तर अशी हि बाटली रुंद तोंडाची असली तरी आतला ओशटपणा जाण्यासाठी एक खास प्रकारचा ब्रश लागत असे. आणि त्याला म्हणत बॉटल ब्रश. तसा तो जमाना, USE & THROW चा नसल्याने, इतर अनेक बाटल्या धुवाव्या लागत असत.

या बॉटल ब्रशचे नाव एका झाडाला दिले आहे. ( नाही, हे ब्रश झाडाला लागत नसत. )

या झाडाचा विस्तार जरा आडवा असतो. साधारण इंग्लिश विलो चा भास व्हावा असा ( या विलो पासुन क्रिकेटच्या बॅट्स आणि डोकेदुखीवरचे औषध करतात. !!!) पाने त्यापेक्षा बरिच रुंद पण तश्याच खाली झुकलेल्या फांद्या.


bottle brush

याची फुले क्वचित फांद्याच्या टोकाना पण बहुदा फांद्यांच्या मधेच येतात. लांबुन नीट ओळखु येत नाहीत. मधलीच काहि पाने लाल झालीत असे वाटत राहते.

वरच्या फोटोत दिसतोय तो एकलकोंडा गुच्छ असला तरी झाडावर अनेक गुच्छ लटकत असतात.


bb

झुलत्या वार्‍यावर हे झुले झुलत असतात त्यावेळी झाड खुपच छान दिसते. याचे खोड मात्र खुपच खडबडीत असते. पण पानांमुळे खोडाकडे लक्ष जात नाही.

मुंबईत कलानगरला म्हाडाच्या ऑफ़िसच्या आवारात एक छान वाढलेला वृक्ष आहे. मुंबईबाहेर मात्र बागातुन वैगरे तो खुप दिसतो.

याचे शास्त्रीय नाव Callistemon lanceolatus ग्रीक भाषेत कॅलॉस म्हणजे सौंदर्य, स्टॅमॉन म्हणजे पुंकेसर आणि लॅन्सिओलॅटस आलय ते पानाच्या आकारावरुन.
Friday, October 05, 2007 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाण्यात तरंगणारी जलपर्णी आपण सगळ्यानी पाहिली असेलच. त्याचबरोबर गोंडाळ हि वनस्पति पण खुप जलाशयात दिसते.

gondaL

Pistia stratiotes असे याचे शास्त्रीय नाव. यालाच The Water Lettuce असेही नाव आहे. संस्कृतमधे गुंडळा, कंभिका वा जलसैनिक अशीही नावे आहेत.

पाण्याच्या वर फुलासारख्या आकृतित दिसणारी पाने व पाण्याखाली बारिक मुळे असे हिचे स्वरुप असते. याची वाढ अत्यंत झपाट्याने होते व थोड्याच अवधित सगळा जलाशय व्यापुन टाकते. अगदी घरी एखाद्या पाण्याने भरलेल्या टबमधे ती ठेवली तरी भराभर वाधते.

या वनस्पतिचे औषधी उपयोग आहेत. ताजी पाने किंवा पाने सुकवुन जाळुन त्याची राख वापरतात. या पानाच्या राखेतले क्षार पाण्यात विरघळतात, व ते पाणी आटवुन क्षार मिळवता येतात. त्याला पाननिमक असा शब्द आहे. ते साध्या मिठासारखेच दिसते. त्यात पोटॅशियम सल्फेट व क्लोराईड सापडते.

या झाडाची वाढ मुळापासुन होते पन याला पांढरट फ़ुलेही लागतात. छोटी फळे धरतात व ती तडकल्यावर बिया दुरवर उडतात.

गोंडाळाच्या मुळ्या औषधी असतात. गर्भपोषक, उष्णतानाशक, मूत्रल, कफ़ोत्सारक असतात.

पानाचा उपयोगही मूळव्याध, मूत्राघात, खोकला, अर्धशिशी, अतिसार, त्वचारोग यावर करतात.

पण तरिही हिची झपाट्याने होणारी वाढ रोखणेच ईष्ट असते. नाहीतर सगळा जलाशय हि वनस्पति व्यापुन टाकते.
Sunday, October 07, 2007 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोव्यातल्या जायांच्या पुजेबद्दल एक खास लेख लोकसत्ता मधे आलाय. इथे वाचा.
http://www.loksatta.com/daily/20071007/rv03.htm


Monday, October 08, 2007 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या लहानपणी एक प्रथा आवर्जुन पाळली जायची. दारात लावलेल्या झाडाचे पहिले फुल देवाला वहायचे आणि दुसरे फ़ुल, आवर्जुन शाळेतल्या शिक्षिकेला द्यायचे. आवडत्या शिक्षिका वर्गात आल्या कि त्याना फ़ुले देण्यात आणि त्यानी ती केसात माळल्यावर आम्हाला खुप आनंद वाटत असे.

आणि हा आनंद हमखास देत ती सोनटक्क्याची फुले. पुर्वी बहुतेकांच्या दारी सोनटक्का लावलेला असायचाच. वर्षभर गुमान वाढणारे हे झाड, पावसाळाभर हमखास फ़ुले देत असे.


sonaTakkaa

Hedichium coronarium असे याचे शास्त्रीय नाव. साधारण आल्यासारखेच दिसणारे हे झाड, आल्यापेक्षा थोडे मोठे असते. साधारण तीन फ़ुट वाढले कि त्याला हिरवा पुष्पकोष येतो. हा पुषपकोष काहि कमी देखणा नसतो. ( देखणा पुषपकोष, हे या कुळाचे वैशिष्ठच आहे. ) तो पुरेसा मोठा झाला कि त्यात पांढर्‍या कळ्या डोकावु लागतात. पाळ्याणातुन डोकावुन बघणार्‍या बाळांसारख्याच त्या भासतात.
एक मखमाली पारदर्शक आवरणात त्या लपलेल्या असतात. आणि अगदी उद्यावर उमलणं आला, कि हळुच तो पडदा दुर सारुन, एखाद्या बॅले नर्तकीप्रमाणे लांब पाय करत एंट्री घेण्याची वाट बघत असतात.
आणि जादु केल्याप्रमाणे त्यांचे एकदम एका फ़ुलपाखरात रुपांतर होते. अगदी तोच आकार, मिश्यांसकट तेच रुप. पण गडबड झालीय ती रंगात. फुलपाखरानी फुलांचे रंग घेतले तर या सोनटक्क्याने केवळ आकार. या फ़ुलाना किंचीत आल्यासारखा सुगंधही येतो.
पुर्वी याची पिवळसर जात दिसायची. आता मात्र ती दिसत नाही, पण एकदा तिलारी घाटात मी सोनसळी रंगाचा सोनटक्का बघितला. आधी वाटले कि मावळत्या सुर्याच्या किरणांमूळे मला तसा भास होतोय, पण आभाळात सुर्यच नव्हता, त्यामुळे ती शक्यता मावळली. ती जात Hedychium flavescens आता जरा दुर्मिळच झालीय.

मी वरती उल्लेख केलाय तो या कुळाच्या देखण्या पुषपकोषाचा.


laal puShapakosh

त्याचा हा मासला. या झाडाला मात्र म्हणावी अशी फुले येत नाहीत.

Torch Ginger


हे वरचे प्रकरण जरा अवघडच वाटतय ना. हे आहे Torch Ginger किंवा Nicolatia elatior याचे झाड सोनटक्क्यासारखेच पण खुपच उंच असते. सहज दोन ते तीन मीटर वाढते.

याची फुले मात्र झाडाना न लागता, स्वतंत्ररित्या वेगळ्याच दांड्यावर उगवतात. आठ ते दहा सेमी उभट गुलाबी कळी भराभर वाढत जाते.

खरे तर हाहि पुषपकोषच. पण आकाराने थेट कमळासारखा. वरच्या फोटोत दिसतेय त्यापेक्षा नायजेरियातली फुले आकाराने फारच मोठी आणि रंगाने गडद असत.

याच्या पाकळ्या खुपच जाडसर असतात आणि झाडावरुन खुडले आणि पाण्यात ठेवले तर आठदहा दिवस छान टिकते.

थाई जेवणात हे वापरतात. उमलण्यापुर्वीच ते खुडतात, व एका खास सॉसबरोबर खातात. खाओ याम नावाच्या एका सलाडमधला हा एक घटक आहे.
वर दिसतेय ते गडद गुलाबी असले तरी त्यापेक्षा थोडे फ़िक्कट फुलही असते. ते असे.


gulabi torch ginger


Friday, October 12, 2007 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी
कोमेजली कोवळी पाने, असुनी निगराणी

उषा मंगेशकरचे हे गाणे ऐकले कि मला हटकुन जळगाव आठवते. लहानपणापासुन आपण जळगावची केळी अशी सांगड घालत आलोय. पण तिथल्या उन्हाळ्याचे आणि केळीच्या तलम पोताचे काहि नाते जुळवता येत नव्हते. अर्थात प्रत्यक्ष बघितल्यानंतर मात्र हि शंका राहिली नाही.

तसे अगदी माझ्या घरासमोर केळ्याचे बन आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणारी ती पाने. पावसात अंगाला पाणी लावु न देणारी पाने, जोराचा वारा सुटला, कि पानाच्या झालेल्या केविलवाण्या चिंध्या. केळफुलाची चाहुल देणारे, नेहमीपेक्षा थोडे वेगळे पान. आणि मग हळुच डोकावणारे केळफुल.

एकेक किरमिजी पान उलगडत, लागणारे केळ्याचे घड. त्यावरची खारीची लगबग. आणि मग आपली क्षमता संपली कि आपोआप खाली पडणारी कोवळी फ़ुले. भाजीसाठी अलगद काढलेले केळफुल.

मग दिसामाशी वाढणारी केळी. जरा फिकुटली कि आधी झाडावर घातलेला घाव आणि मग अलगद काढलेला केळ्याचा घड. त्या घडाचे तरी किती कौतुक, प्रत्येक केळ्याचा चुन्याचे बोट पुसुन, तो गोणपाटाने झाकुन ठेवायचा.

आणि मग पिकली कि शेजारीपाजारी चारसहा केळी वाटायची.


keLaphul

keLaphul2

Musa Paradisiaca असे केळीचे शास्त्रीय नाव. मला केळी या नावापेक्षा कदली, हे संस्कृत नाव जास्त नादमधुर वाटतं

केळ्याच्या बाबतीत आपली अतिपरिचयात अवज्ञा, अशी अवस्था झालीय. चांगल्या पिकलेल्या केळ्यात २२ टक्के साखर असते ( उसात केवळ १८ टक्के साखर असते ) त्यामुळे तात्काळ शक्ती मिळवण्यासाठी केळी खाणे कधीही उत्तम.
आपल्याकडे वर्षभर ताजी केळी मिळतातच. पण सुकवलेली केळी चवीला कुठल्याही सुक्या मेव्यापेक्षा छान लागतात. वसईजवळचा अर्नाळा भाग पुर्वी अश्या सुकवलेल्या केळ्यासाठी प्रसिद्ध होता. त्याना सुकेळी असे म्हणतात. केळीच्याच सोपात बांधलेली सुकेळी अजुनही मिळतात, पण मागणी कमी म्हणुन पुरवठा कमी अशी गत आहे.
सुकेळी करण्यासाठी केळी सोलुन बांबुच्या सांगाड्यावर उभी ठेवुन सुकवतात. केळी सुकताना, त्यातुन मधासारखा गोड द्राव टपकतो. रात्री हि केळी त्या द्रावात घोळवतात, व परत सुकवतात. उत्तम सुकेळे, हाताच्या दोन बोटाभोवती सहज गुंडाळता येते. सुकेळे वजनात ताज्या केळ्याच्या ३७ टक्के भरते. ( बटाटा २५ टक्के भरतो. )

पुर्वी वसई केळ्यासाठी प्रसिद्ध होते. तिथली जमिन केळ्यासाठी इतकी उत्तम होती कि शेतातुन उपटुन फ़ेकुन दिलेल्या गड्ड्यानाही कोंब फ़ुटुन, त्याची झाडे होत असत. तिथे पुर्वी लाल सालीची केळी मिळायची, आता ती अतिदुर्मिळ झालीत.

आपण नेहमी खातो ती हिरव्या सालीची केळी, आहाराच्या दृष्टीने अगदी उत्तम असतात. तरिही केळ्याचे अनेक प्रकार मी खाल्ले आहेत.
अजुन मुंबईत पिवळी छोटी केळी मिळतात. ती चवीला थोडी आंबट लागतात. फ़िक्कट पिवळ्या सालीची अस्सल वेलची केळी मात्र खुपच गोड लागतात.
केनयामधे अगदी हाताच्या करंगळी इतकी पिवळी केळी मिळायची. चवीला ती खुपच गोड असायची. अगदी डझनभर आणली तरी, अर्ध्या दिवसात संपायची. तिथे या केळ्यापासुन बियर करतात. युगांडाच्या मबाले, गावात भली मोठी पिवळी केळी मिळतात. ती पण चवीला खुपच छान असतात.
नायजेरियात आपलीच हिरवी केळी मिळतात. पिकलेली केळी आणि भाजलेले शेंगदाणे, खायची तिथे पद्धत आहे.
ओमानमधे सलालाह मधे उत्तम केळी होतात. तिथे खुप बनाना फ़ॅक्टरीज आहेत. ( खास बाजारासाठी ज्या वेळी केळी पिकवतात, त्यावेळी ती खास प्रक्रियेने पिकवतात. आपल्याकडेही केळ्याची वखार असते. ) पिवळ्या सालीची ती केळी चवीला थोडी कमी गोड असायची.

आपल्याकडे राजेळी केळी मिळतात, ती खास करुन केरळ मधुन येतात. केळ्याची ती वेगळी जात आहे. प्लान्टेन, असा त्या प्रकाराला शब्द आहे. हि केळी बहुदा शिजवुनच खावी लागतात. या केळ्याचे चिप्स, हलवा वैगरे केले जातात. गोव्यात खास रसबाळी नावाची केळ्याची जात मिळते. त्याचा पण सहसा हलवाच केला जातो.

पिकलेल्या केळ्याबरोबरच कच्ची केळी पण आवडीने खाल्ली जातात. कापं भजी तर करतातच, पण त्या केळ्याचे सुकवुन पिठ करतात व ते खुपदा लहान मुलांच्या आहारात वापरतात. टोमेटो सॉसला दाटपणा येण्यासाठी ते वापरतात. आफ़्रिकेत खुपदा लहान मुलाचा पहिला आहार, भाजलेले केळे असाच असतो.

जैन लोकांमधे जमिनीखालचा कंद म्हनुन बटाटा निषिद्ध मानतात. पण त्याना कच्चे केळे चालते, व बटाट्याच्या जागी कच्चे केळे वापरुन, ते अनेक चवदार पदार्थ करतात. त्यांच्या ज्या साध्वी स्त्रीया असतात, त्यांच्याकडे केळ्याच्या बुंध्याचा तुकडा असतो, व साधे पाणी न पिता त्या, त्या कंदाचे पाणी पितात. त्याला कदलीसार म्हणतात.

तसा केळ्याच्या झाडाचाही कुठलाच भाग वाया जात नाही. केळीच्या बुंध्यावरचे जे पापुद्रे असतात, त्यापासुन चिवट दोर मिळतो, गोव्यातील अबोलीचे वळेसार म्हणजे गजरे गुंफ़ण्यासाठी तोच वापरतात. त्याच बुंध्यावर जर प्रक्रिया केली तर उत्तम प्रतीचा धागा मिळतो.
या बुंध्याच्या पाण्यात काहि क्षार असतात. त्या पाण्यात पापडाचे पिठ भिजवले तर पापड हलके होतात.

केळीचा मधला भाग असतो त्याला आपण सोप म्हणतो. आपल्याकडे त्याची भाजी फारशी खात नसले तरी बंगालात आणि दक्षिणेकडे ती आवडीने खातात. तो भाग कापला असता त्यातुन चिवट धागे निघतात, ते काढुन टाकले तर मात्र त्याची भाजी चवदार होते.

केळ्याची पाने देखील अति तलम असतात. मोदक उकडण्यासाठी, पानगे करण्यासाठी आपण वापरतोच. शिवाय त्याच्या मोठ्या आकारामुळे, जेवण वाढायला पण त्याचा छान उपयोग होतो. त्याच्या तलम पोतामुळे, पुर्वी भाजलेला रुग्ण, केळ्याच्या पानांच्या शय्येवर निजवत असत.

मुद्दाम लागवड केलेल्या केळ्याप्रमाणेच आपल्याला घाटात केळीसदृष्य झाडे दिसतात. ती असतात रानकेळी किंवा चवई. वर्षभर यांचे बुंधे सुप्तावस्थेत असतात, पण पावसाला सुरवात झाली कि याला छान तजेलदार पाने फुटतात. ( बाजारात विकायला येणारी पाने, खुपदा चवईचीच असतात. हि पाने जरा जास्त चिवट असतात. ) याचे केळफुल मोठे असते, बाजारात भाजीसाठी येणारे केळफुलही बहुदा चवईचेच असते. या चवईला फारसा बुंधा नसतो, पण केळी मात्र लागतात.
अवघड जागी असल्याने, हि केळी मिळवणे जरा जिकिरीचे असते. ती चवीला खुप गोड असतात पण त्यात बिया असतात. माकडाना ती केळी फार आवडतात.

केळीत औषधी गुणधर्म भरपुर आहेत, विषबाधेवर, श्वानदंशावर, उचकीवर, सुजेवर, जिभेच्या खरावर, उन्हाळीवर, ओकारीवर याचा उपयोग करता येतो.


keLyaachaa ghaD


Monday, October 15, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाळेच्या वाटेवर एखाद्या झुडुपावर खाजखुजलीची वेल चढलेली दिसायची. त्या वयात ती ओळखता यायची नाही पण खाजखुजल्या लागलेल्या असल्या, कि मात्र ती सहज ओळखता यायची.
या खाजखुजलीबाबत आमच्या मनात भितीयुक्त उत्सुकता असायची.
एरवी कश्यावरही पट्टी मारणारे आम्ही, या खाजखुजल्या मात्र लांबुनच बघत असु.

या शेंगावरची कुसं अंगावर पडली तर असह्य अशी खाज येते. काहि सिनेमातुन शिक्षकांवर असे प्रयोग केलेलेही बघितले होते, पण स्वतः कधी असा प्रयोग करावेसे वाटले नाही. ( इतकी घृणा वाटावी, असा एकही शिक्षक मला आयुष्यात भेटला नाही, हे मी माझे परमभाग्य समजतो. ) या असह्य खुजलीचा उपायही भयंकर होता. सर्व अंगाला शेण लावणे, हाच त्यावर उपाय होता. पुढे वाचनात असेही आले, कि हि कुसं जर खाण्यात आली तर आतड्यातील नाजुक त्वचेला जखमा होवुन, अंतर्गत रक्तस्त्राव सुरु होतो, व त्या कारणाने एखाद्याचा मृत्युदेखील येऊ शकतो.


khaajakhujalee

आता दहा पंधरा दिवसात भारतात हिवाळा सुरु होईल. मग दुकानातुन खास कौचापाक दिसु लागेल. खासकरुन गुजराथी दुकानात, अडदियापाक बरोबर कौचापाकही असणारच. हिवाळ्यात शक्ती कमावण्यासाठी, तसेच वंध्यत्वावर उपाय म्हणुन हा पदार्थ खाल्ला जातो. इतकेच नव्हे तर पार्किन्सन्स सारख्या मेंदुच्या विकारावरही या बिया उपयोगी ठरतात.

काळसर तपकिरी रंगाच्या या बिया असतात.


kk2


आता कुणालाही वरच्या दोन उल्लेखात काहि सामायिक बाब असेल असे वाटायचे कारण नाही. पण होल्ड युअर ब्रेथ, खाजखुजलीच्या बियानाच कौचा म्हणतात.


Mucuna pruriens असे याचे शास्त्रीय नाव. याला व्हेलवेट बीन, काऊ इच अशी इंग्लिश नावे आहेत तर संस्कृतमधे आत्मगुप्त असेही नाव आहे.

याची वेल असते. पाने साधारण चवळीच्या पानासारखीच असतात, व वेल अगदी १५ मीटर्सपर्यंतही वाढु शकते.
याला पांढरी, गुलाबी किंवा जांभळी फुले तुर्‍याने येतात. जंगलात हि वेल दिसतेच पण मनुष्यवस्तीच्या आसपासही दिसते. याच्या बियात लेवोडोपा नावाचे रसायन सापडते आणि मानवी मेंदुच्या संदेशवाहनाचे काम करणार्‍या, डोपामाईन वर ते परिणाम करते. याच कारणासाठी ते पार्किन्सन्स सारख्या विकारात वापरतात.

शेंगांच्या कुसात सेरोटोनिन, नावाचे द्रव्य असते आणि त्यानेच प्रचंड खाज येते. याच्या मुळांचा उपयोग चेहर्‍याच्या अर्धांगवायुवर करतात. मुळाचा काढा ताप, दमा सारख्या विकारातदेखील करतात.

नवलाची बाब म्हणजे, यालाच इंग्लिशमधे Nescafe असाही शब्द आहे.
Wednesday, October 17, 2007 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अकबर बिरबलाच्या, खर्‍या किंवा रचलेल्या एका कथेत असा उल्लेख आहे कि बादशाहकडे एक हिंदु साधु येतो व त्याला प्रसाद म्हणून भस्म देतो आणि मुसलमान फ़कीर येतो व तो प्रसाद म्हणून समजा देतो. अर्थातच बादशाह हिंदु साधुवर नाराज होतो. मग बिरबल समजाऊन सांगतो कि राख म्हणजे तुझे सगळे वैभाव राखुन ठेव आणि सबजा म्हणजे, सगळे जाऊ दे.

अश्याच पुर्वग्रहामूळे, सबजा तो 19 त्यांचा 19 असा आपल्याकडे समज झालेला आहे. तसे काहि नसते, एकतर सबज्याचा तुरा विठ्ठलाला वहायची पद्धत आहे, शिवाय सबजाशिवाय फ़ालुदा, म्हणजे कोंबडीशिवाय उरुस.


sabaja

Ocimum basilicum असे याचे शास्त्रीय नाव. नावावरुन लक्षात आले असेलच कि हा बासिल कुळातला म्हणजेच तुळशीच्या नात्यातलाच आहे.

याची झाडे एक मीटरपर्यंत वाढु शकतात. कधीकधी पाने दातेरी असतात. झाड हिरवेगार असते व योग्य वाढ झाली कि याला किरमिजी तुरे यायला सुरवात होते. काहि झाडाना उभे तुरे येतात तर काहि झाडाना पसरट तुरे येतात. त्यात छोटी गुलाबी फुलेही येतात.

पण या झाडाचे खास वैषिष्ठ म्हणजे या तुर्‍याना अतिषय तीव्र असा सुगंध येतो. या झाडाच्या परिसरातुन गेल्यास तो जाणवतोच पण तुर्‍याला हात जरी लावला तरी हात सुगंधी होतात.

आपल्याकडच्या खास सुगंधी वनस्पति, पाचु, मरवा सारखाच हा गंध असतो, पण त्यापेक्षा तो खुपच तीव्र असतो. खरे तर सुगंधाची तुलना करता येत नाही, तरी पण गुळाच्या गरम पाकात वेलची, दालचिनी आणि लवंगाची पुड घातली तर जसा गंध येईल तसा हा गंध असतो.
या तुर्‍यात ज्या बिया तयार होतात त्या सबजा. पाण्यात घातल्यावर त्यावर पांढरे आवरण तयार होते, व असा भिजवलेला सबजा फ़ालुदा मधे घालतात. ( सबजाचे आणखी एक झाड माझ्या बघण्यात आहे. याला हिरव्या मंजिर्‍या येतात. त्याची पानेही छोटी असतात. )

पण या झाडाचे आणखीही काहि गुणधर्म आहेत. या झाडापासुन एक हिरवट पिवळे तेल मिळते. हे तेल बाहेर ठेवले तर गोठुन त्याचे स्फटिक तयार होतात. साधारण कापरासारखेच ते दिसते. पण त्याला कमी सुगंध असतो.

सबजाचा अंगरस तीक्ष्ण, उष्ण व रुक्ष आहे. अंग दुखुन ताप येतो त्यावेळी तो अंगाला चोळतात व पोटातही देतात. त्याने घाम निघतो व ताप उतरतो. हाच रस दुखर्‍या दाढांवरही वापरतात. जखमांवर, पोटातील कृमींवर भाजल्यानंतर आलेल्या फ़ोडांवरही तो लावतात.
पंजाबमधे याची खुप लागवड होते. मस्कतमधेही हा खुप दिसतो. इदच्या सुमारास याचे तुरे बाजार विकायला असत तिथे.
Friday, October 19, 2007 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाळेतल्या जीवशास्त्राच्या धड्यात, धावत्या मूळाचे उदाहरण म्हणुन, ब्रम्हीचा उल्लेख असायचा. थोडीफ़ार अर्धगोलाकार पाने असलेली वनस्पति, पुर्वी खुपदा कुंडीत लावलेली दिसायची. आम्ही तुळशीबरोबर हि पानेही खात असु. खास करुन परिक्षेच्या दिवशी, मोठ्याना नमस्कार करणे, गायीची शेपटी डोक्यावरुन फ़िरवणे इतकेच तुळस ब्रम्हीची पाने खाणे, हा अत्यावश्यक उपचार असे.

braamhi

Herpestis monniera असे हिचे शास्त्रीय नाव असले तरी संस्कृतमधे तिची नावे जास्त समर्पक आहेत. सौम्य, सरस्वती, मंडुकपर्णा, त्वाष्टी, दिव्या आणि महौषधी अशी अनेक नावे आहेत हिला.

ओलावा असेल तर हि वनस्पति सहज पसरत जाते. रानात आपोआप वाढलेली दिसते. ओलावा कमी असेल तर पाने लहान असतात, सकस ओलसर जमिनीत मात्र पाने मोठी व मांसल असतात.

फ़ुले गुलाबी रंगाची असुन फ़ळे बार्लीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यात छोट्या बिया असतात. ओलावा संपला कि हि वनस्पति मरुन जाते, पण परत ओलावा मिळाला कि लगेच उगवते.

याच्या पानाची भाजी करायची बंगालात पद्धत आहे. पुदिना कोथिंबीरीप्रमाणे कच्ची पानेही वापरता येतात. श्रीलंकेत ओले खोबरे, खोबरेल तेल, मिरची व ब्रम्हीची पाने घालुन कोशिंबीर केली जाते. आपल्याकडे मात्र असा वापर दिसत नाही. पण बाजारात, खास करुन जिथे तामिळ लोक भाज्या घेतात, तिथे या पानांच्या जुड्या दिसतात.

ब्राम्हीचा असर प्रामुख्याने मज्जासंस्थेवर होतो, तसेच रक्त्वाहिन्यांवरही होतो. नुसता ब्राम्हीचा रस घेतला तरी बुद्धीसाठी पोषक ठरतो.

ब्राम्ही आमला केश तेल प्रसिद्धच आहे. केसाच्या वाढीसाठीदेखील या तेलाचा छान उपयोग होतो. नुसत्या पानांचा लेप डोक्याला लावला तरी फायदा होतो.
Saturday, October 20, 2007 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उद्या, दसरा. मातीच्या सृजनशक्तीचा सन्मान करायचा दिवस. विद्येची, शस्त्रांची पुजा. दारावर मंगल तोरणे, पाटीवरची सरस्वती, सोने लुटणे सगळे कसे निखळ आनंदाचे.
उद्याच्या विजयादशमीनिमित्त तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा.
उद्या माझ्या दारावरच्या तोरणात एक अनोखी वस्तु असणार आहे. निव्वळ भाताच्या ओंब्यापासुन केलेले हे " पंखे " उद्या माझ्या दारावरच्या तोरणात, शोभणार आहेत.


pankha1

pankha2


Wednesday, October 24, 2007 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधारणपणे मे जुनचा कडक उन्हाळा जाणवायला लागला, कि ओमानच्या सुलतानातर्फे स्थानिक वृत्तपत्रात, एक जाहिर निवेदन प्रसिद्ध होत असे. खजुर आता तयार आहे, लोकानी यावे आणि खुशाल खावा. हा खजुर तुमच्यासाठीच आहे.
तिथल्या कडक उन्हाळ्यात या दिवसात रस्त्याच्या कडेने लावलेल्या खजुराच्या झाडाना घोसाघोसाने खजुर लगडलेले असत. बागांमधुनही हि झाडे खजुरानी भरलेली असत. हवा तेवढा खुशाल खावा.
पण आम्ही क्वचितच त्या झाडावरचा खजुर खात असु, एकतर त्या उन्हाळ्यात, झाडाजवळ जाणे मुष्कील, आणि हवा तेवढा खजुर अगदी माफक भावात बाजारात सहज उपलब्ध होत असे.


khajur

Phoenix dactylifera असे या झाडाचे शास्त्रीय नाव. खरे तर तो पाम या वर्गातलाच. पण खुपदा याला फांद्या फुटलेल्या दिसतात. शिवाय खजुर से टपके बबुल पे अटके, हि म्हण सार्थ करणारी याची पाने.
याच्या पानाची एकच ओळ असते, पण तिची ठेवण दोन प्रतलात असल्याने, खजुराचे पान भरगच्च दिसते. आणि कसाहि हात लावला कि ते टोचतेच. अगदी कोवळ्या पानातही अजिबात नाजुकपणा नसतो. संयुक्त पान तीन ते पाच मीटर लांबीचे असु शकते. प्रत्येक पान साधारण ३० सेमी व २ सेमी रुंदीचे असु शकते. झाड १५ ते २५ मीटर्सची उंची गाठु शकते, पण त्याहुन छोट्या, अगदी दोन मीटर वाढलेल्या झाडाना भरपुर खजुर लागलेले मस्कतमधे दिसतात.
तसे झाडाला खजुर लागायला साधारण ७ वर्षाचा कालावधी जावा लागतो, पण त्यापुर्वी देखील थोडेथोडे खजुर लागायला सुरवात होतेच.
नैसर्गिकरित्या खजुराची ५० टक्के झाडे नर व बाकिची मादी निपजतात. फळे अर्थातच फक्त मादी झाडानाच लागतात, पण मुद्दाम लागवड करताना, अर्धी जागा नर झाडांसाठी देणे शक्य होत नाही. म्हणुन खजुराच्या झाडाचे परागीभवन कृत्रिमरित्या केले जाते. नरपुष्पे बाजारात विकायला असतात, ती मादी फ़ुलांवर झटकली जातात. क्वचित प्रसंगी ब्लोअरही वापरला जातो. बाजारात हि फुले विकायला असतात त्यावेळी त्यावर मधमाश्या घोंघावत असतात. पण तरिही नैसर्गिकरित्या पुरेसे परागीभवन होत नाही.
जानेवारी फ़ेब्रुआरी महिन्यात झाडाच्या सभोवताली लांब दांडे येतात व त्यावर फुले लागतात. त्यावर परागीभवन करण्यासाठी खास शिक्षित कामगार लागतात. मग बोराएवढे हिरवे खजुर लागतात. अप्रिल मे पर्यंत ते पुरेसे मोठे होतात. जातीप्रमाणे ते तीन ते सात सेमी लांबीचे असु शकतात. मग त्यांचा रंग पालटुन तो पिवळा किंवा लाल होतो. या अवस्थेतच ते मुंबईच्या बाजारात विकायला येतात, पण ते तितकेसे गोड लागत नाहीतच शिवाय ते तसेच खाल्ले तर घसा धरतो. दोन तळव्यात किंचीत रगडुन खाल्ले तर थोडे मऊ व गोड होतात.
मस्कतमधे मात्र असे खजुर बाजारात नसतात. जसजसा उन्हाळा वाढत जातो, तसतसे खजुर गोड होत जातात. पिवळा रंग थोडा निस्तेज होतो, व खजुर अर्धवट तपकिरी रंगाचा होतो. या अवस्थेतला खजुर चवीला अप्रतिम लागतो. काहि खास जातीचा खजुर तर तोंडात टाकताच विरघळतो. आणि हे खजुर खास खाण्यासाठी म्हणुन बाजारात येतात. पण हे टिकु शकत नाहीत. साठवायचे असतील तर ते डीप फ़्रीजरमधेच ठेवावे लागतात. खास रमझानसाठी असे खजुर साठवुन ठेवले जातात. खजुराच्या पिकण्याच्या चार अवस्थाना चार अरेबिक नावे आहेत ती अशी. किमरी, खलाल, रुतब आणि तमार. वरचे वर्णन आहे ते रुतब अवस्थेचे.
पिकलेला खजुर मात्र कितीही टिकु शकतो. त्यात साधारण ६३ टक्के साखर असते. हि साखर ग्लुकोज, फ़्रक्टोज किंवा सुक्रोज असु शकते. या साखरेच्या प्रकारावरुनच खजुराची जात ठरते. अरब जगतात मात्र खारिक क्वचितच खातात.
तिथे खजुर नुसताच खुप आवडीने खातात. तो खुपच गोड लागत असल्याने आपल्याला सहा सात पेक्षा जास्त एकावेळी खाता येत नाही, पण त्यांच्या पद्धतीच्या स्ट्रॉंग काहवा बरोबर तो जास्त खाता येतो. तिथे खजुरातली बी काढुन त्याजागी बदाम वा काजु घालुन खायची पण रित आहे. आणी असा खजुर चवीला अप्रतिम लागतो.
खजुर नैसर्गिकरित्याच झाडावर तयार होतो. झाडाखालची जमीन स्वच्छ करुन, तिथे ताडपत्री अंथरुन तो गोळा केला जातो. साधारण सहा ते आठ हजार वर्षांपासुन तो लागवडीखाली आहे. त्याचे मूळ ठिकाण उत्तर आफ़्रिकेतले मानले जाते, पण सध्या संपुर्ण आखात व थेट स्पेन पर्यंत खजुराची लागवड होते. इजिप्त, सौदी, इरान हे देश उत्पादनात अग्रेसर आहेत.
खजुराच्या झाडापासुन एक प्रकारचा मधही मिळतो. दारुही करता येते. आपल्याकडे बंगालात खजुरापासुन गुळ करतात. खिरीसाठी तो आदर्श मानला जातो.
खजुरापासुन अर्थातच अनेक प्रकारच्या मिठाया करता येतात. बिस्किटेही करता येतात. खजुराची फुलेही खातात. खजुरात एकच बी असते. ती पण खाता येते. तिचे काहि खास औषधी उपयोगही आहेत. खजुर रमदानच्या उपासाचे पारणे फ़ेडताना आवश्यक असतो. खजुर आणि दुध घेऊन, इफ़्तार केला जातो. यामुळे आम्लपित्ताचा त्रास होत नाही. आपल्याकडेही उपासाला खजुर चालतोच.
खजुराच्या झाडाच्या सर्वच भागाचा छान उपयोग होतो. लाकडापासुन घराचे वसे करता येतात. होड्या व इतर बांधकामालाही हे लाकुड वापरतात. खजुर काढुन घेतल्यावर उरलेला भाग झाडु म्हणुन वापरता येतो. त्याची पानेही झाडलोटीसाठी वापरता येतात. वाळवंटात सहज उपलब्ध होणारे सरपण म्हणुनही पाने वापरतात. हि पाने विणुन झापे, व अनेक उपयोगाच्या वस्तु करता येतात. अगदी कोवळी पाने व पर्णगुच्छ शिजवुन खातातही.
Monday, October 29, 2007 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिसवी लाकुड आपल्याला बहुदा ऐकुनच माहित असते. आता तर ते इतकं आवाक्याबाहेर गेलय कि, शिसवी फ़र्निचर म्हणजे पुरानी हवेली, असे समीकरण होवु पाहतेय.

पण वाटते तितके हे झाड दुर्मिळ नाही. अगदी मुंबईतदेखील हि झाडे सहज दिसतात. के ई एम च्या आवारात आहेत. इतरत्रही दिसतात. याला ओळखायची एक खुण म्हणजे याच्या शेंगा. अगदी कोवळ्या वाटाण्याच्या शेंगाचे घोस या झाडाला लागल्याचे दिसतात नेहमी.


Shisavee

Dalbergia Latifolia असे याचे शास्त्रीय नाव. याला संस्कृतमधे शिंशपा असे नाव आहे. मला खात्री आहे, अश्या शेंगा लगडलेले झाड तूमच्यापैकी अनेकजणानी बघितलेले असेल.
अश्या प्रचंड वाढलेल्या झाडाची ओळख पटवण्यासाठी नेमक्या कुठल्या भागाचा फोटो काढायचा असा मला प्रश्न पडतो. त्यातल्या त्यात सहज दिसणार्‍या वैशिष्ठाचा फोटो म्हणुन या शेंगाचा फोटो देतोय.

याची झाडे बरिच मोठी असतात. फांद्या खुप असतात पण जरा विरळ असतात. पानांचा रंग एकसुरी म्हणजे मातकट हिरवा असतो. याच्या पानाची खासियत म्हणजे याचा शेंडा नेहमी जमिनीकडे झुकलेला असतो. ( बहुतेक झाडांची पाने टोकदार असतात. आणि त्याचे कारण म्हणजे झाडावर जमा होणारे पाणे व दंव सहज ओघळुन जावे, हे असते. )

या झाडाची पाने पिंपळपानासारखीच अकारण झुलत असतात. पण या झाडाचा फ़ुलोरा कधी येतो ते कळतच नाही. ग्रीष्म ॠतुमधे या अश्या पोपटी रंगाच्या शेंगा झाडावर दिसु लागतात.

हि शेंग खुप छान दिसते. चमकतही असते. आत एकच बी असते, शेंगाचा हा खास आकार ग्लायडरसारखा. वार्‍यावर स्वार होवुन उडण्यासाठी अगदी योग्य. पण तरिही याचा प्रसार बियांमार्फ़त फारच थोडा होतो.

याच्या खोडाचा रंग गुलबट असतो. पण साल कायम फाटलेली. आधी वाटते अस्वल किंवा वाघाने नखं घासली असावीत, पण हि या झाडाचीच खोड आहे. या सालीच्या भेगातुन आपले शिसवी अंग दाखवायचे असते ना ! पण याच्या वरच्या फांद्या मात्र अगदी कोवळ्या असतात.
अगदी प्राचीनकाळापासुन शिसवी लाकुड उपयोगात आणले जात आहे. हडप्पा येथील उत्खननात सापडलेले लाकडाचे अवशेष याच लाकडाचे असावेत, असा कयास आहे.

लाकडाचे उपयोग आपण बघितलेच. या लाकडाला वाळवी लागत नाही. जून लाकुड लोखंडाइतके मजबुत असते. यावर उत्तम कोरीव काम करता येते.
आयुर्वेदात याला त्रिदोषनाशक म्हंटलच आहे, पण यात गर्भपातनी, असा गुणही आहे. यावर संशोधन चालु आहे. कफ़, मेद, सूज, रक्तदोष यावरही हा वापरतात.

शिसवीचे लाकुड तयार व्हायला ४० ते ५० वर्षे लागतात. त्या वयाची झाडे फार नसल्याने हे लाकुड दुर्मिळ आणि महाग आहे.

याचे फ़र्निचर करताना जो भुसा निघतो, त्याचापण एक वेगळाच उपयोग होतो. बिळातले उंदीर व साप बाहेर काढण्यासाठी, या भुश्याच्या धूराचा उपयोग होतो.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६ 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators