Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 11, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Archive through September 11, 2007 « Previous Next »


Friday, August 10, 2007 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Millingtonia hortensis किंवा इंडिअन कॉर्क ट्री, असे नाव असलेल्या या झाडाला इतकी सुंदर फुले येत असतील, असे नावावरुन तरी वाटत नाही.
याला मराठीत बुचाचे झाड, असेही म्हणतात.

पुर्वी काचेच्या बाटल्याना, खास नरम चिवट बुचे बसवलेली असत. त्या बुचासारखीच या झाडाची साल असते. पाने संयुक्त, हिरवीगार आणि दंतुर कडांची. झाड बहुतांशी हिरवेगार असते.

उन्हाळ्यात याला झुपक्यानी फुले येतात. तुरा सहज २५ ते ३० सेमी उंच असतो. त्यात क्रमाक्रमाने फुले फुलत जातात.

या फुलाला नीट बघितल्या तर पाच पाकळ्या दिसतात, पण त्यातल्या दोन एकमेकीना चिकटलेल्या असल्याने, फुल चारच पाकळ्यांचे दिसते. या चार पाकळ्यावरुन या फुलाना येशुच्या क्रुसाचाहि संदर्भ आहे.

या फुलाचे निशिगंधाच्या फुलाशी खुप साम्य दिसते, पण त्याच्यापेक्षा या फुलांचा देठ लांब व लवचिक असतो. हि फुले संध्याकाळी फुलायला सुरवात होते, रात्रभर झाडावर असतात आणि सकाळी टवटवीत असतानाच झाडावरुन गळुन पडतात. या लांब आणि लवचिक देठांमूळे, या देठाचाच वापर करुन गोव्यात सुंदर गजरे करतात. डोक्यात फुल माळणे हा गोव्यातील स्त्रियांचा अत्यावश्यक शृंगार आहे. ज्यावेळी शहरात या प्रकाराला नाके मुरडली जात होती, त्यावेळीही गोव्यात या प्रकाराला प्रतिष्ठा होती. अजुनही हि प्रथा, गोव्यात, खास करुन मध्यमवयीन स्त्रियात आवर्जुन पाळली जाते. आपण कल्पनाही करु शकणार नाही अशी फुले, इथे सहजरित्या गजर्‍यात वा हारात गुंफली जातात.

या फुलांचा रंग साधारणतः शुभ्र असला तरी, पाकळ्यांवर किंचीत लाल नक्षी असणारी एक जात, मी गोव्यात बघितली आहे.

या फ़ुलांची खासियत म्हणजे याचा मंद सुगंध. झाडाचा परिसर या गंधाने भारलेला असतो. जितका उन्हाळा अधिक, तितका याचा गंध तीव्र. मस्कतमधल्या मुख्य रस्त्यावर याची लागवड केली आहे, आणि तिथल्या कडक उन्हात तर तो आणखीनच सुगंधी होतो.

या झाडाला जरी इंडियन कॉर्क ट्री असे म्हणत असले तरी त्याच्या मूळ स्थानाबद्दल संदेह आहे. याच्या नावातल्या Hortensis चा अर्थ उद्यानात लावण्याजोगा. पुर्वी हे झाड केवळ उद्यानातच दिसत असे, नैसर्गिकरित्या जंगलात वाढलेले ते फारसे दिसत नाही.

या लेखासोबतचा फोटो तितकासा स्पष्ट नाही, कारण तो मी रात्रीच्या अंधारात घेतला आहे, शिवाय हा गुच्छ पण बर्‍याच उंचीवर होता. चांगला फोटो घेण्यासाठी पुढच्या वसंत ऋतुची वाट बघायला हवी.


Buchachee Phule


Friday, August 10, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण मसाल्यात जे चक्री फुल किंवा Star anise वापरतो ते एका मॅग्नेलिया म्हणजे चाफा कुळातल्या झाडाचे फळ असते, हे मी लिहिले होतेच.

या झाडाचे फुल कसे असेल, किंवा चक्रीफ़ुल त्याला नेमके कसे लागत असेल, याची मला खुप उत्सुकता होती. त्या झाडाचा नाही, पण त्याची साधारण कल्पना येऊ शकेल असा एक वृक्ष मला दिसला. त्याच्या या तीन अवस्था. पहिल्या फोटोत दिसतय ते पिवळे धमक फ़ुल. दुसर्‍या फोटोत दिसत ते फ़ुटु लागलेले बोंड, आणि तिसर्‍या फोटोत दिसतय ते पुर्ण उकललेले बोंड.

या बोंडाकडे बघुन, याला फळ म्हणावे का फुल असे वाटत राहते. हे झाड मुंबईतल्या राणीच्या बागेत आहे.


chakriful1

chakriful2

chakriful3


Monday, August 13, 2007 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुईचे झाड आपल्या नेहमीच्या बघण्यातले. हिची मुद्दाम लागवड कुणीच करत नाही, तरी शनिवारी मारुतिरायाला वाहण्यासाठी याचा कधी तुटवडा पडत नाही

ruee

Calotropis procera असे याचे शास्त्रीय नाव. याचे बहुदा २ मीटर्सपर्यंत वाढणारे झुडुप असते. याची पाने साधारण वडासारखीच असली तरी पांढुरकी असतात. पान तोडल्यास भरपुर चीक निघतो. पान कापले तरी त्यातुन चीक निघतो.

याला वरिलप्रमाणे गुच्छात फ़ुले येतात. वरच्या फोटोत निळसर झाकेची फुले दिसत असली तरी, गुलाबीसर फुले येणारेही झुडुप दिसते.

जाड पांढरट देठावरच्या पाच पाकळ्या, त्याही अत्यंत साध्या. पण याचे सगळे सौंदर्य आहे ते फ़ुलामधल्या कळसात.

पाच भागाचा हा आमलक, किंवा मोख, एखाद्या देवळाच्या कळसागत देखणा असतो. त्याच्या पाचही कडांवरची महिरप, मंदिराच्या कमानीसारखी. वरती आणखी एक चांदणी, शिवाय बुडाशी गोलाकार. हा भाग फ़ुलापासुन वेगळा करता येतो, आणि मारुतिच्या हारात हाच भाग वापरतात.

याला छोट्याश्या करंजीसारखे फळ लागते. यातुन सावरीसारख्याच कापसाच्या म्हातार्‍या निघतात. यामूळेच त्याचा भरपुर प्रसार होतो. ( हिंदीत कापसाला रुई म्हणतात, त्याचा इथे काहितरी संबंध असावा असे मला वाटत असे. पण हिंदित याला आक असा शब्द आहे, आणि तो आलाय अर्क या संस्कृत नावावरुन. )


mandar


याचेच एक पांढरीशुभ्र फुले येणारे झाड असते, आणि तो म्हणजे मंदार. गणपति ला प्रिय असणारा मंदार तो हाच. अष्टविनायकांपैकी जे गणपति, कोकणात नाहीत, त्या परिसरात मंदाराची झाडे खुप दिसतात. कोकणात मात्र ती अभावानेच दिसतात. शिवाय तिथे त्याची फारशी माहितीही कुणाला नसते.

रुईचा चीक हा अनेक त्वचारोगावर खास करुन खरजेवर अत्यंत उपयोगी आहे. पण ती तितकीच विखारीदेखील आहे. मात्रा जराही अधिक झाली तर, उलटे परिणाम होतात. अर्श तसेच चामखीळ, भोवरी वैगरे गळुन पडण्यासाठी पण याचा चीक वापरतात, पण त्यावेळीही खुपच दाह होतो.

त्वचारोगाप्रमाणेच, दमा, प्रसूती, कावीळ, घटसर्प अश्या अनेक विकारात, रुईचे मूळ, फुले वैगरे वापरतात, पण अर्थातच ते उपचार जाणकार व्यक्तीनेच करायचे आहेत.




Wednesday, August 15, 2007 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोंगरात काय किंवा गावकुसाबाहेर काय. अगदी गावातदेखील. निगडी असतेच. पांढरट पानाची व एक काळसर पानाची. तसेच आणखी एका जातीत पानांची कड नागमोडी, म्हणुन ती कात्री निर्गुडी. याचे निळसर फुलांचे तुरे सहज नजरेस पडतात.

Nirgudi


Vitex nirgundi trifolia असे हिचे नाव. झाड एकदोन मीटर्सपर्यंतच वाढते. याच्या पानाला एक रानवट वास येतो. सहज हाताशी असल्याने, गावात माश्या वैगरे वारण्यासाठी तो वापरतात. निखार्‍यावर याची पाने टाकल्यास, डास माश्या पळुन जातात. याला काळपट हिरवी फळेही धरतात.

अगदी सहज सापडणारे झाड असले तरी ते औषधी गुणानी परिपुर्ण आहे. त्याच्या गूणांची दखल घेऊन, संस्कृतमधे याला सिंदुवार, उपनाहवृक्ष, वातारि, शेफाली, भूतकेशी, सुगंधा, शीतसहा अशी अनेक नावे आहेत.

यातले वातारि हे नाव महत्वाचे आहे. या पानापासुन केलेले वाताहारी नावाचे तेल बाजारात उपलब्ध आहे. थंडीमधे वाताने जेव्हा सांधे आखडतात, हातपाय दुखतात, त्यावर या तेलाचा छान उपयोग होतो. तसेच शरिरावरील व्रणांवरही हे तेल लावता येते.

या पानांचे इतरही अनेक औषधी उपयोग आहेत. सुज येणे वा मुरगाळणे यावर निरगुडी, धोत्रा आणि कडुनिंबाची पाने गरम करुन लावतात. शरिरावरीलच नव्हे तर आतड्याला व फ़ुफ़्फ़ुसाला आलेली सुजदेखील, याने उतरते.

तसे हे झाड भराभर वाढतेही. त्यामूळे तुरे खुडत राहिले, तरी झाडाची वाढ थांबत नाही.

मी उल्लेख केलेला रानवट वास मला खुप आवडतो, पुढच्यावेळी हे झाड दिसले तर बघा पानांचा वास घेऊन.




Wednesday, August 15, 2007 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रावणात आमच्या वाड्यात शुक्रवारचे हळदिकुंकु असायचे. त्यावेळच्या चणे आणि गुळ यांच्या आठवणीबरोबरच, केवड्याचीही आठवण आहे. पुढे कॉलेजमधे असताना, माटुंगा स्टेशनजवळच्या गणपतिच्या सजावटीत, केवड्याच्या खास तामिळ कलाकारानी बनवलेल्या पताका असत.

kevaDa

Pandanus adoratissimus असे याचे शास्त्रीय नाव. याला स्क्रु पाईन ट्री, असेही नाव आहे.

केवड्याचा सुगंध अगदी आपल्या मर्मबंधातील ठेव आहे. ( बकुळीच्या फुलाप्रमाणेच, जगात इतरत्र हे झाड, सुगंधापेक्षा, फळांसाठी ओळखले जाते. ) तरिही केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर, असे काहि मी कधी अनुभवले नाही.

याचे बन मात्र खुप दाट असते. करड्या रंगाची खोडांची गुंतवळ आणि वर लांबलांब पानांची दाटी असे याचे रुप. पानाला अर्थातच भरपुर काटे. हि पाने तलवारीसारखी लांबलचक वाढतात. पण तेवढी लांबी पेलवण्या इतकी मजबुत नसतात. त्यामुळे ती कायम अर्ध्यातुन मुडपलेली असतात. या पानांकडे बघुन, बा. भ. बोरकराना आईचे गोरेपान लांबसडक हात आठवले होते.

माझा आधी समज होता, कि हे पुर्ण झुडुपच पांढर्‍यारंगाचे असावे. केतकिवर्ण वैगरे शब्द वाचनात होतेच. पण तसे काहि नसते. झडाची पाने हिरवीच असतात. याला जेव्हा फुले येतात, त्यावेळेसच त्या कणसातली पाने शुभ्र होतात. ( हो केवड्याचे कणीस, असाच शब्द आहे ) याला नर आणि मादी. अश्या दोन प्रकाराची फुले येतात. आपण जे कणीस आणतो, ती नर फुले. त्यात फ़िकट मातकट रंगाची छोटी छोटी बोंडे असतात. झटकली तर त्यातुन परागकण बाहेर पडतात. हि फुले पुर्ण विकसित झाल्याशिवाय त्याला सुगंध प्राप्त होत नाही. बाजारात मात्र खुपवेळा, कोवळीच फुले विकायला आणलेली असतात. मादी फुले मात्र छोटी असुन त्याना सुगंध नसतो.

केवड्यांची अनेक बने बघितली, पण झाडावर केवड्याचे कणीस क्वचितच दिसते. हे कणीस विकसित झाले, कि परिसर सुगंधाने भरुन जातो, आणि मग ते कणीस उतरण्याची घाई केली जाते. झाडावरुन ते काढणे जरा जिकिरीचेच असते. पानाला काटे असतातच, शिवाय ते खुप उंचावर असते. यावेळी त्या पुर्ण फांदीचाच बळि जातो.

तसा केवड्याच्या सुगंघ वा अर्क बाजारात उपलब्ध आहे. अंगाला लावण्यापेक्षा तो जास्त करुन खाद्यपदार्थात वापरतात. पानाचा विडा बनवताना, केवडा अत्तराचे बोट पुसले जाते. तांदळाच्या फ़िरनीत हा सुगंध छान खुलतो. एकंदरच तांदळाशी याचा संयोग छान होतो. याच कुळातल्या एका झाडाचे पान शिजणार्‍या भातात, घालतात, त्याने भाताला सुगंध येतो. ( या झाडाला बासमति असे नाव आहे !!! )
अश्याच एका झाडाच्या पानाचे चौकोनी पुडे करुन त्यात तांदळाचे गोड मिश्रण भरुन, एक पक्वान्न मलाय जेवणात करतात.
आपल्याकडे पुर्वी सुगंधी कातगोळ्या करायची पद्धत होती. या गोळ्या थेट केवड्याच्या कणसातच बांधुन मुरवलेल्या असत.

केवड्याला गरम आणि दमट हवामानच जास्त मानवते, त्यामुळे समुद्रकिनार्‍यावरच याची बने आढळतात. बहुतकरुन, भरतीच्या रेषेवर केवडा चांगला फोफावतो. किनार्‍यापासुन थोडा दुरवरही तो दिसतो, पण उंचावर मात्र तो क्वचितच दिसतो. ( अंबोलीला उंचावर मी तो बघितला आहे, पण अंबोलीची बातच और )

मी वर उल्लेख केलेली फळे, अननसासारखीच दिसतात. आधी हिरवी असतात व पिकली कि केशरी होतात. रुपडे तसेच असले तरी, डोळे उठावदार नसतात. हि फळे खाद्य आहेत आणि आफ़्रिकेत ती आवडीने खाल्ली जातात. मीही अर्थात खाऊन बघितले, ते गोडसर लागते, आत मांसल रेषायुक्त पिवळट गर असतो. पण त्याला केवड्याच्या किंवा अननसासारखा स्वाद नसतो.

आपल्याकडे हे फळ बघायला मिळणे जरा कठिण आहे, पण गणपतिपुळ्याच्या प्रदक्षिणेच्या मार्गावर, शेवटी जिथे पाण्याचे कुंड लागते, तिथे केवड्याचे मोठे बन आहे. आणि तिथली फुलेपाने कुणी तोडत नसल्याने, तिथे हि फळे दिसतात.

याशिवाय, घायपाताप्रमाणे, याच्या जुन पानांपासुन वाखही करता येतो.




Wednesday, August 15, 2007 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेटवर केवड्याच्या फ़ुलोर्‍याचा हा एक सुंदर फोटो सापडला. आपल्याकडे तो झाडावर दिसणे अशक्य

screwpine


Thursday, August 16, 2007 - 12:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रावणात चहुकडे फुलु लागतो तेरडा. मुंबईच्या मध्य रेल्वेवरच्या वाशी स्टेशनच्या आजुबाजुला, रुळाच्या कडेने भरपुर फुलतो तो. तीन दिवस का असेना, तेरड्याचा जांभळट गुलाबी रंग, हिरव्या पोपटी पानात छानच खुलुन दिसतो.

teraDa

पावसाचे दोन तीन आठवडे गेले कि तेरड्याची रोपे चहुकडे दिसु लागतात. गाठीगाठीचे जाड मांसल खोड, पाण्याने भरलेले असते आणि त्यामुळेच किंचीत पारदर्शक असल्याचा भास होतो. आम्ही पुर्वी हि खोडे, पाटी पुसण्यासाठी वापरत असु.

मग तेरड्याच्या खोडालाच बारिक बारिक कळ्या दिसु लागतात. देठाशी फ़ुगीर असलेली हि कळी, आठवडाभरातच मोठी होते, आणि एखाद्या फ़ुलपाखराच्या आकाराचे फुल, तिच्यातुन उलगडते. एक छोटासा द्रोण, त्यावर दोन पाकळ्या आणि बुडाशी एक नांगीसारखा भाग. पण या फुलाचे निर्मळ हसु, रानावनात फ़ैलावते.
डोंगरदर्‍यात जो तेरडा उगवतो त्यात वरच्या फोटोतला राणी, गुलाबी आणि पांढरा असे मोजकेच रंग दिसतात. पण खास करुन बागांमधे जो लावला जातो त्यात अनेक मनोहारी रंग दिसतात.

उदयपुरच्या लेक पॅलसच्या समोर एक बाग आहे, तिथे मी अगणित रंगाचे तेरडे बघितले होते. आणि एकेक फुल गुलाबापेक्षाही भरदार होते.

तेरड्याचे फुल गळले कि तिथे एक बारिक कळीसारखे फ़ळ लागते. ते साधारण एक इंच लांब झाले कि तडकते, आत मोहरेपेक्षा थोड्या मोठ्या बिया असतात.
हे फळ तसे हातात धरले तरी तडकते. बिया दुरवर उडतात आणि फळाच्या आवरणाचा एखाद्या सुरवंटासारखा आकार तयार होतो. लहानपणी मुलीना चिडवायला, आम्ही ते वापरत असु.

या बिया वर्षभर सहज टिकतात. पुढच्या पावसात त्या रुजतात. आपल्याकडे तेरड्याची रोपे गौर म्हणुन पुजतात. त्या वेळेपर्यंत तेरड्याच्या बहर ओसरु लागलेला असतो. त्यामुळे या झाडाचा यथोचित सन्मान करुन, निरोप दिला जातो.

आपल्याकडे तो खाण्यासाठी वापरल्याचे माझ्या वाचनात नाही, पण बालि देशात तो खाल्ला जातो, असे डॉ डहाणुकरानी लिहुन ठेवले आहे. तसेच याच्या बियांपासुन तिथे तेलही काढले जाते, असे त्यानी लिहुन ठेवलेय.

या तेरड्याची एक मोठी जात उंचावर फुलते. याची पाने व झाड, दोन्हीही मोठे असतात. याला रानतेरडा असे म्हणतात. मला हा गागनबावड्याच्या घाटात दिसला होता. यात हा एकच रंग दिसला मला

RanateraDa


Friday, August 17, 2007 - 12:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पावसाळ्याच्या सुरवातीलाच दिसणारी एक वनस्पति, तिला तसे वनस्पतिच म्हणावे लागेल, ती म्हणजे मश्रुम्स

mashroom

कुत्र्याची छत्री असे विचित्र नाव तिला पुर्वी होते, आणि तिच्या अस्तित्वाचे कारणही, तसेच विचित्र समजले जात असे. मश्रुमचा पद्धतशीरपणे प्रसार हा गेल्या वीस पंचवीस वर्षातलाच.

पण त्यापुर्वी ती आपल्याकडे खाल्ली जात नसे, असे मात्र नाही. कोकणात वादळात पडलेल्या माडाच्या खोडावर जी मश्रुम्स उगवत ती आवर्जुन खाल्ली जात. पण इतरत्र उगवलेली मात्र खाल्ली जात नसत.

कोकणात घराची उन न पडणारी एखादी भिंतदेखील मश्रुमसाठी तयार केली जात असे. त्यावर उगवलेली मश्रुम्स मात्रं खाल्ली जात.

गोव्यात एक खास प्रकारची मश्रुमस पावसाळ्याच्या सुरवातीला विकायला येतात. मोठ्या करमळीच्या पानातला जेमतेम पंचवीस तीस मश्रुम्सचा वाटा १५० ते २०० रुपयाना घ्यावा लागतो. हि मश्रुम्स वारुळावर उगवलेली असतात. या भावातदेखील घेणारे गिर्‍हाइक असल्याने, या मश्रुम्सचा भाव करण्याचा प्रश्णच नसतो.
याची भाजी मात्र भाजलेल्या कांदाखोबर्‍याचे वाटण लावुन करतात. त्याला असलेली भरपुर माती साफ करणे फार जिकिरीचे असते.

याची लागवड अर्थातच करता येत नाही. डोंगरदर्‍यात फ़िरणार्‍या आदिवासीना ती सापडतात. अशी मश्रुम्स दिसली कि पुर्वी त्यावर झाडाची एखादी फांदी झाकली जात असे. अशी फ़ांदी झाकलेली असेल तर, त्यावरची मालकी गृहित धरली जात असे, व इतर कुणी ती खुडत नसे. ती साधारण रुपयाच्या नाण्या इतकी मोठी झाली कि खुडली जात असत, त्यावेळीही एखादे मश्रुम मुद्दाम राखले जात असे. पुढ्यावर्षीचे बियाणे त्यातुनच निर्माण होणार आहे, हे माहित असे.
आता मात्र जास्त पैसे कमवायच्या नादात, अगदी कोवळे मश्रुमही खुडले जातात. अक्षरशः काड्यापेटीतल्या काड्यांइतके मश्रुम बाजारात आणले जातात. आणखी काहि वर्षानी, हे मश्रुम्स मिळतील कि नाही, अशी शंका वाटते.

कोल्हापुर भागात शेतातच एक वेगळे मश्रुम्स उगवतात, त्याना भुईफ़ोडं असे नाव आहे. अगदी अंड्यासारखे दिसतात ते.

आता त्याची पद्धतशीर लागवड केली जाते. निर्जंतुक करुन घेतलेला तांदळाचा कडबा, त्यावर खास प्रयोगशाळेत निर्माण केलेले बियाणे पेरुन, तसेच तपमान व आर्द्रता यांवर काटेकोर नियंत्रण ठेवुन उत्पादन केले जाते. जवळजवळ वर्षभर ताजे मश्रुम्स आता बाजारात उपलब्ध असतात.
केनयामधल्या एलडोरेट या गावी अगदी नैसर्गिकरित्या असे वातावरण उपलब्ध असते, त्यामुळे तिथे मश्रुमसची छान पैदास होते.

तसे मश्रुम्स आवडीने खाल्ले जात असले तरी, काहिजणाना त्याची चव आवडत नाही, हेही खरेच. काहिजणाना त्याचा तिटकारा असु शकतो, तसेच ते खाण्यात आले तर त्यांच्या शरिरावर रॅश येऊ शकतो.

तसेही अनोळखी मश्रुम्स खाणे योग्य नव्हेत. कुठेही उगवलेले मश्रुम्स खाण्यापुर्वी ते जाणकारांकडुन पारखुन घेतले पाहिजेत. युरपमधे अश्या खास सहली आयोजित केल्या जातात. त्यावेळी मस्रुम्सची परिक्षा करणे शिकवले जाते. पण तरिही आकर्षक दिसणारे मश्रुम खाण्याजोगे असतीलच असे नाही. वरच्या फोटोत दिसणारे मश्रुम चार इंच व्यासाचे होते, ते माझ्या अंगणात उगवले आहे.
खालचे आकर्षक दिसणारे, मश्रुम मला एका बांबुच्या बनात सापडले, पण तेही खाण्याजोगे नसावे.


mashroomache phul

आपण साधारणपणे बटन मश्रुम्सच खातो. क्वचित आपल्याकडे ऑयीस्टर मश्रुम्सही दिसतात. मश्रु तसे ताजे असताना टिकत नाहीत, पण सुकवुन ठेवता येतात. टिनमधेही ते टिकवुन ठेवता येतात.
फ़्रांसमधुन आयात झालेले अनेक प्रकारचे मश्रुम्स मी खाल्ले आहेत. प्रत्येकाची चव आणि स्वाद वेगळा होता.

आता आपल्याकडच्या खास मश्रुमचा उल्लेख करायला हवा. हिमालयाच्या पायथ्याशी हे मश्रुम्स मिळत असत. गुलाबी छत्रीवर पांढरे ठिपके असे याचे रुप. हे मश्रुम्स चांदण्यात चमकत असत.
या मश्रुमपासुन चक्क एक मादक पेय केले जात असे. ते पिवुन उन्मादावस्था येत असे. पण प्राचीन भारतात ते पेय अगदी आनंदाने प्राशन केले जात असे. ते पेय जवळजवळ स्वर्गीय आनंद देत असे म्हणे.

ओळखलत ? ते मश्रुम म्हणजे सोमवल्ली आणि त्यापासुन केले जात असे ते पेय म्हणजे सोमरस !!!!




Monday, August 20, 2007 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या दिवसात अगदी शहरात नाही, पण जरा दुर गेले तर सह्याद्रीत असे निळे तुरे डोके वर काढुन उभे असतात. यात क्वचित पांढरी फुलेही असतात. हि आहे भारंगी

Bharagi

Cleradendron seraatum असे भारंगीचे शास्त्रीय नाव. हिलाच संस्कृतमधे भार्ली, भुमिजंबु व खर्शाक अशी नावे आहेत.

भारंगी पहिल्या पावसानंतर आपोआप उगवते. याला अनेक फांद्या फुटतात. पाने अंडाक्रुती व दातेरी असतात. कोवळ्या पानांची भाजी करतात. पोटातल्या कृमीवर ती असरदार आहे. भाजी कडवट असली तरी चवदार असते. ताक घालुन पातळसर भाजी करतात. अलिकडे लोकाना भारंगीच माहित नसते तर भाजी कुठुन मिळणार ?

हि देखणी फ़ुले पांढरीशुभ्र किंवा वरच्या फोटोतल्याप्रमाणे आकाशी रंगाची असतात. यातली खालची पाकळी गर्द निळी असते. या फ़ुलांचीदेखील भाजी करतात. पिठ पेरुन केलेली हि भाजीही खुप चवदार लागते. पण आता तिही बाजारात दिसत नाही.

औषधाच्या दृष्टीने याचे मुळ अत्यंत उपयोगी आहे. भारंगीचे मुळ ४०० ते ५०० रुपये किलो दराने विकले जाते. अशक्त मुलांचे श्वसन सुधारण्यासाठी, खास करुन फ़ुफ़्फ़ुसदाहात हे मुळ वापरतात. त्वचारोगावर, सर्पदंशावर देखील याचा वापर करतात.




Monday, August 20, 2007 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सुवर्णपत्राच्या झाडावर लिहिले होते, त्यावेळी पुर्ण वाढलेल्या झाडांच्या पानांचा फोटो मिळाला नव्हता. तसेच त्या झाडाची फुले कशी असतात, तेही बघायचे होते, म्हणुन मुंबईतल्या हुतात्मा चौकातल्या झाडाच्या पानांचा हा खास फोटो. पानाचे दोन्ही रंग दिसताहेत, शिवाय नाव सार्थ करणारी झळाळी आहेच.

SuvarNapatra


Monday, August 20, 2007 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ुलांचे फ़ोटो काढताना, अशी गोड हुलकावणी मिळतेच.

fulpakharu


Tuesday, August 21, 2007 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वी कोकणातल्या घरांच्या कमानीवर कृष्णकमळाचा वेल हमखास असायचा.

kruShNakamaL


Passiflora incarnata त्रिकोणाकृति पानांचा हा वेल हिरवागार असतो. याला फुले तशी फार येत नाहीत, पण फ़ुलाना खुप छान गंध असतो. या गंधावरुनच ती उमललई आहेत हे कळते.

पण फ़ुले अशी लबाड कि अजिबात दिसत नाहीत. पानांच्या दाटीत कुठेतरी लपलेली असतात. खुडायची असतील तर खुप शोधावी लागतात. याचे कळे पण तितकेच देखणे असतात.

याच्या नावाची पण कथा आहे. हे फुल म्हणजे चक्क महाभारत आहे. वरच्या फोटोत फ़ुलांच्या मधोमध उभा दांडा दिसतोय तो श्रीकृष्ण, त्याच्या भोवती ढाली घेऊन कोंडाळे करुन उभे आहेत ते पाच पांढव. आणि निळ्या पाकळ्या म्हणजे १०० कौरव. लहानपणी मी कधीच पाकळ्या मोजल्या नव्हत्या. आता मात्र मोजल्या, खरेच शंभर आहेत की. वरच्या पातळीत ५० आणि खालच्या पातळीत ५०. या अश्या दोन रांगांमुळे, पाकळ्या नाजुक असल्या तरी फुल भरगच्च दिसते.

या वेलाला फळे आल्याचे मी कधी बघितले नाही, पण अश्याच एका वेलाचे फळ मात्र पॅशन फ़्रुट म्हणुन आवडीने खाल्ले जाते. त्या पॅशनफ़्रुटचे फुल असेच पण आकाराने छोटे आणि रंगाने पांढरे असते. त्यात तशी निळी जातही आहे. पण पॅशन फ़ुलाच्या पाकळ्या आकाराने छोट्या असतात. शिवाय कृष्णकमळात पाकळ्यानी झाकुन गेलेली बाह्यदलं, पॅशनफ़्लॉवरमधे मात्र, ठळकपणे दिसतात.

आपल्याकडे हौसेने याचे वेल लावले जातात. पण बाजारात हे फळ अगदी क्वचित दिसते. खरे तर हा वेल कुठेही वाढु शकतो. अगदी भिंतीवर चढवला तरी भरपुर फ़ोफ़ावतो.

या पॅशनफ़्रुटचे दोन प्रकार मी बघितले आहेत. एकाची साल किरमिजी रंगाची असते आणि आतला गर पिवळा असतो. दुसर्‍याची साल केशरी असुन आतला गर पांढरा असतो. हे दोन्ही प्रकार केनयात भरपुर होतात.

हे फळ तसे नुसते खाता येत नाही, कारण ते खुपच आंबट असते ( किरमिजी जात सर्वात जास्त आंबट आणि चवदार असते. ) यातला गर गाळणीवर रगडुन बिया वेगळ्या कराव्या लागतात. त्या गरात साखर घालुन सरबत करता येते. त्याला आंबा, अननस आणि मोसंबी यांचा एकत्रित स्वाद असतो. दुसरी जात तितकी आंबट नसते, त्यामुळे डेझर्ट्सवर त्याचा गर नुसताच टाकुन खाता येतो. बियाही खाता येतात. हे फळ सुकले तरी खराब होत नाही. आतला गर सुकतो पण पाण्यात मिसळुन वापरता येतो.




Thursday, August 23, 2007 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रवाहाच्या विरुद्ध एखादे विधान करायचे, तर सगळ्यांचा रोष ओढवतोच. पण तो धोका पत्करुन देखील, मला गुलमोहोर तितकासा आवडत नाही, असे विधान करावेसे वाटतेय.

आपल्याकडे साथीच्या रोगांसारख्या, वृक्षलागवडीच्या साथी येऊन गेल्या. आधी पर्जन्यवृक्ष, मग गुलमोहोर, मग पेल्टोफ़ेरम, मग ऑस्ट्रेलिअयन बाभुळ, निलगिरी अशी अनेक साथी. मग सगळीकडे तीच झाडे लावायचा सपाटा सुरु होतो. वृक्षतोड होतेय, माळरान उजाड झालय, लावा झाडं. परदेशात कठिण परिश्तितीत तग धरणारी हि झाडे, इथल्या सुपीक जमिनीत खुप फोफावली, आणि मग अनेक रस्ते, या झाडानी व्यापुन टाकले.
डेक्कन क्वीन गाडीला ५० वर्षे झाली त्यावेळी एक कार्यक्रम दूरदर्शनवर दाखवला होता, त्यावेळी एका प्रवाश्याने खंडाळ्याच्या घाटात, फ़ेकलेल्या बियांपासुन गुलमोहोराचे मोठे वृक्ष झालेले दाखवले होते.
आम्हाला शाळेत गुलमोहोर नावाचा निबंध पाठ्यपुस्तकात होता. गुलमोहोराचे नीटनेटके रुप. हिरवीगार पाने, देखणा फ़ुलोरा, पुंकेसरानी खेळता येण्याजोगा खेळ, खोडाचा नितळपणा, वैगरे बाबींचे खुप कौतुक केले होते.


gulamohorache ful

गुलमोहोर आपल्याकडे आला तो मादागास्कर मधुन. हे बेट आफ़्रिका खंडाच्या आग्नेय दिशेला आहे. मुख्य भूमीशी फ़टकुन असलेल्या भूखंडांवरची जीवसृष्टी अगदी वेगळी असते. पण तिचे वेगळेपण त्या बेटावरच जपले जाते. इतरत्र ते टिकत नाही.

आता गुलमोहोराची साथ ओसरलीय. नव्याने झालेली लागवड फारशी दिसत नाही.

माझा राग असायचे कारण म्हणजे ऐन उन्हाळ्यात ज्यावेळी सावलीची गरज असते, त्यावेळी गुलमोहोराची पाने झडलेलेली असतात. तसेच लगोलग येणारा लालभडक फ़ुलांचा बहर, निदान मुंबईच्या उन्हाळ्यात तरी तितकासा सुखावत नाही. तश्या याच्या लाल व केशरी अश्या दोन जाती दिसतात. पण दोन्ही तितक्याच दाहक. शिवाय तो ऐन बहरात असताना, मुंबईत पावसाळा सुरु व्हायचा. आणि त्या पावसात, नुसत्या पाकळ्याच नव्हे तर कळ्याही गळुन पडायच्या.

माझ्या लहानपणी गुलमोहोर असा भरभरुन फ़ुलायचा.


gulamohor

आताश्या तो असा फ़ुलत नाही. वरचा फोटो कोल्हापुरच्या शालिनी पॅलेसमधल्या झाडाचा आहे. अलिकडे बहराचा कालावधीही मागेपुढे झालेला दिसतो. अवेळी उन्हाचा तडाखा वाढला तर याला अवेळीच बहरही येतो. शिवाय वरच्या फोटोतल्याप्रमाणे पुर्ण लाल झालेले झाड क्वचितच दिसते. ( याच्या पाकळ्या खातात आणि त्या आंबट लागतात, हे ज्ञान मला मायबोलीवर मिळाले )
गुलमोहोराला चांगल्या दीड फ़ुट लांब शेंगा लागतात. अगदी वर्षभर त्या झाडावर असतात. वीसतीस वर्षांपुर्वी, पिकनिकला जाताना आतासारखे एम्पी थ्री प्लेयर्स नसायचे. ट्रांसिस्टर्सही नव्हते, त्यावेळी गाण्याना ताल धरायला या शेंगा उपयोगी पडायच्या. रविवारी रेल्वेत हमखास असा ग्रुप दिसायचा. याशिवाय गुलमोहोराचा आणखी उपयोग मला माहित नाही.
गुलमोहोरा इतकेच पळसाचे, पांगार्‍याचे झाड देखणे दिसते. ती थोडीफार दिसतात. पण मीरेच्या भजनात ( कहो तो कुसुंबी रंग सारी रंगाऊ ) दिसणारा कुसुंब आपल्याकडे बघायलाही मिळत नाही.
आणि गुलमोहोर हे नाव, जरा अतिच काव्यमय वाटते. हिंदितल्या गुलशन, वैगरेसारखे. ( होनाजी बाळाची, सखे तु गुलेचमन, गुलबहार, असे एक कवन आहे. त्याच नावाच्या नाटकात ते आहे. ) एकेकाळी तर बंगल्याना ठेवायला, अत्यंत लाडके नाव होते ते. ( आणखी यादी वाढवत नाही. )

तशी जॅकरांदा, चेंडुफ़ुल यांची झाडे पण फ़ुलावर नसताना, गुलमोहोराच्या झाडासारखीच दिसतात. पानात फ़ारच सुक्ष्म फ़रक असतो.

पण अश्या झाडांवर मी बारकाईने लक्ष ठेवुन असतो. राणीच्या बागेत फ़िरताना, असेच एक झाड दिसले. ज्यावेळी बाकिचे गुलमोहोर फ़ुलले होते, त्यावेळी यावर एकही फुल नव्हते. माझ्या सराईत नजरेने ते टिपले होतेच, शिवाय ते जॅकरांदा वा चेंडुफ़ुल नाही, हे मी ओळखले होतेच.


vegaLa gulamohor


ऐन पावसात परत तिथे गेलो तर वरच्या फोटोतला देखणा फ़ुलोरा दिसला. अगदी जडावाचा दागिना असावा, तसा सुघड मोहोर.

मुद्दाम निरखुन बघितले तर गुलमोहोराशी असलेले साम्य दिसले. फ़ुले तशीच, त्याच रंगाची, पण फारशी उमललेली नव्हती. तीर ए नीमकश, सारखे प्रकरण.


vegaLya gulmohoracha bahar

खाली पडलेली फुले मुद्दाम हातात घेऊन बघितली. सुगंध नव्हता, पण गळुन पडली तरी फुले अखंड होती.

आणि मला सगळ्यात आवडले ते गुलमोहोरावर कधीही न दिसणारे गोकुळ. माश्या, मधमाश्या, खारी, पक्षी सगळ्यांची चंगळ होती.

चला मला आवडेल असा गुलमोहोरचा प्रकार सापडला म्हणायचा. ( दुःख एवढेच कि राणीच्या बागेतली दोन झाडे सोडली, तर हा वृक्ष मी आणखी कुठेच बघितला नाही. )
अर्थात An ugly Tree is yet to be born. हे मला मान्य आहे, मला आवडत नाही, म्हणुन एखादे झाड वाईट ठरत नाही. फ़िरभी यारो. .. .. ..




Monday, August 27, 2007 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमरी हे कुळ, विंचु, बाहुली. कंगवा अशी नावे घेतली तर हि फुलांची नावे असु शकतील असे वाटणारही नाही. पण ऑर्किड्स म्हंटले तर सगळ्याना अर्थबोध होईल.

सिन्गापुर, थायलंड मधली ऑर्किड्स गार्डन्स ज्यानी बघितली असतील, त्याना या फुलांच्या देखण्या रुपाची सहज कल्पना येईल. मॉरिशियस मधे देखील सुंदर ऑर्किड्स फ़ुलतात.

या सर्व देशांची खासियत म्हणजे तिथले उष्ण आणि दमट हवामान. असेच हवामान आपल्या मेघालय राज्यातदेखील आहे, आणि तिथेही अगदी सुंदर ऑर्किड्स नैसर्गिकरित्या फ़ुलतात. पण एकदंतरीतच आपली ईशान्यकडची राज्ये दुर्लक्षित असल्याने, मेघालयाच्या या वैभवाची आपल्याला कल्पनाही नसते.
मी मुद्दाम नैसर्गिकरित्या हा शब्द वापरला कारण, सिन्गापुर, थायलंडमधली ऑर्किड्स देखणी असली तरी त्यातले बरेचसे प्रकार कृत्रिमरित्या विकसित केलेले आहेत. म्हणाल त्या रंगाचीच नव्हे तर म्हणाल त्या रंगाच्या म्हणाल त्या शेड्सची फुले तिथे बघायला मिळतात. ती खुप सुंदर दिसत असली तरी, त्यात थोडी कृत्रिमता जाणवते. त्यातली काहि आता आपल्याकडे मिळुही लागली आहेत.

तरीही कोकणपट्टीत आणि घाटात या दिवसात भरपुर ऑर्किड्स दिसतात. शोधक नजर मात्र हवी.

ऑर्किड्स हे वनस्पतिचे एक खास कुळ आहे. बहुतेक आमरींची फुले हि वैषिष्ठपुर्ण आकाराची असतात. त्यातली एक पाकळी बहुदा, मोठी आणि वेगळ्या रंगाची वा आकाराची असते. या पाकळीला लिप म्हणतात.

ऑर्किड्स दलदलीत वा माळरानावर देखील उगवतात. पण कोकणात दिसणारी अनेक ऑर्किड्स एपिफ़ाईट कुळातली म्हणजे इतर झाडांवर वाढणारी असतात. आंबा, हिरडा सारखी झाडे यात यजमानपद भुषवतात.

इतर झाडांवर हि दिसत असल्याने. त्याना पॅरासाईट्स म्हणजे बांडगुळ समजले जाते. अगदी भल्याभल्या लोकानाही मी असे म्हणताना बघितले आहे. पण अमरी झाडांचा केवळ आधार घेतात. त्यांची वैशिष्ठपुर्ण फ़ुले निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा सुर्यप्रकाश आणि सुरक्षितता त्याना जमिनीवर मिळत नाही. मोठ्या झाडांच्या खडबडीत खोडाना घट्ट पकडुन या अमरी वाढतात. पण तरिही त्यांची मुळे बांडगुळांप्रमाणे, खोडांच्या आत शिरुन त्यांचा जीवनरस शोषत नाहीत. ( वरुन साळसुद दिसणारे चंदनाचे झाड मात्र आजुबाजुंच्या मोठ्या झाडांच्या मुळात मुळे खुपसुन त्यांचे अन्न लाटते. ) मीठ जसे हवेतील बाष्प शोषुन घेते, तश्याच रासायनिक क्रियेने अमरी हवीतील पाणी शोषतात. ज्यावर त्या वाढतात, ते झाड इतर काहि कारणानी मेले वा ती फांदी तुटुन पडली तरी, अमरी व्यवस्थित वाढते. म्हणुनच तर ती अ - मरी.

या प्रकारातली बहुतेक सगळी फ़ुले, सुंदर असतात. त्यांच्या खास गुणधर्मांवरुन त्याना नावे दिली आहेत.


Waghari

ही आहे वाघरी. अगदी वाघासारखी दिसते म्हणुन वाघरी. तुलनेने ही खुपच जास्त प्रमाणात दिसते. वसईच्या किल्ल्यातही हि भरपुर आहे. याला एक छानसा सुगंधही येतो, पण तुलनेने फुले कमी दिसतात.

seetechee veNee

भूमिकन्या सीता, हि लोकसाहित्यात खुपच लाडाकोडाची आहे. वनवासात असताना, तिच्या साजशृंगारासाठी दागदागिने कुठले असणार. म्हणुन वृक्षवल्लीनी तिच्यासाठी खास आभुषणे तयार केली.
वरच्या फोटोत दिसते आहे ती सीतेची वेणी. याचे दोनतीन प्रकार दिसतात. पण अगदी नैसर्गिकरित्या गुंफ़लेली ही वेणी अगदी साजरी दिसते हे मात्र खरे.
या वेण्या खुप उंचावर दिसतात. कोल्हापुर तालुक्यातल्या चंदगड गावी, आठवडी बाजारामुळे माझी बस थांबली होती. त्यावेळी उंच फांदीवर हि दिसली. खुप अंतर असल्याने नीट फोटॉ काढता आला नाही.


aaShaaDh Amri

अजयबरोबर सातार्‍याच्या सज्जनगडावर ऐन पावसाळ्यात गेलो होतो. तिथल्य विशाल माळरानावर असंख्य आषाढ अमरी फुलल्या होत्या. जमिनीलगत बदामाकृति दोन ते तीन पाने, त्यात एकच उभी वीतभर उंचीची दांडी, आणि तिला हि सुंदर शुभ्र फुले. हिचे खास नाव, हिच्या उमलण्याच्या काळावरुन. केवळ याच महिन्यात, जेमतेम दोनतीन आठवडे ती दिसते.

kangava amri

अश्याच एका पावसाळ्यात जी एस, गिर्‍या, सुभाष, आरती बरोबर तुंगच्या किल्ल्यावर गेलो होतो. तिथे दिसली हि कंगवा अमरी.

Nilee Amri


पण अमरीत याहुन कॉम्प्लेक्स रचना दिसतात. हि अमरी मला मुंबईच्या राणीच्या बागेत दिसली होती. हे फुल इतके वेगळे आणि खास होते, कि ते फ़ुल असेल असे कुणालाच वाटत नव्हते. आणि अगदी हातासरशी असुनही कुणाचे तिच्याकडे लक्ष जात नव्हते.

amba ghat

आंबा घाटात भटकत असताना उंचावर हि अमरि दिसली होती. हि इतकी नाजुक होती, कि मूळ जागी फोटोच काढता येत नव्हता. म्हणुन मी अलगदपणे सोडवुन गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवुन फोटो काढला. मग परत अलगद तिला झाडावर ठेवायला विसरलो नाही मी.

अगदी कथकलीच्या मुखवट्यासारखी दिसणारी अमरीही असते. बाहुली अमरी तर थेट छोट्या बाहुलीसारखीच दिसते.

कोकणात एक माशी अमरी म्हणजे बी ऑर्किड दिसते. या फुलाची एक पाकळी चक्क एका खास प्रकारच्या बी सारखी दिसते. याचा गंधदेखील त्या जातीच्या बी च्या मादीसारखी असतो. इतकेच नव्हे तर अगदी लवचिक देठामुळे हि अमरी त्या बी च्या उडण्याचा देखील आभास निर्माण करते.

हो लिहायचे राहिलेच. अमरि नुसत्या शोभेच्या बाहुल्या नसतात. आपल्या सगळ्यांच्या आवडीचा व्हॅनिला, एका अमरीच्या शेंगेपासुन करतात. त्याचा फ़ुलोराही देखणा असतो. पण कमर्शियल प्रॉडक्शन करताना, या अमरीचे परागसिंचन हाताने करावे लागते. असे केले तरच याला भरगोस शेंगा लागतात.






Tuesday, August 28, 2007 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेंदरी किंवा कुंकवाचे झाड म्हणुन एक झुडुप कोकणपट्टीत खुपदा दिसते. व्हायोलेट रंगाची फ़ुले गुच्छाने येतात याला.

shendari

Bixaa orellana असे याचे शास्त्रीय नाव. हे झाड मूळातले दक्षिण अमेरिकेतील. स्पॅनिश लोकानी ते फ़िलीपीन्स मधे नेले आणि तिथे ते खुप लोकप्रिय झाले.
मध्यम उंचीचे हे झाड असुन पाने बदामाकृति असतात. पानांचा रंग लालसर हिरवा असतो.पाने तजेलदार दिसतात.


faL


फ़ुलांनंतर याला लाल रंगाची त्रिकोणी फ़ुगीर केसाळ फळे लागतात.
या फळावरची लव खुप दाट असुन ती जवळजवळ काट्यांसारखी दिसते. तशी दिसली तरी ते काटे अजिबात टोचत नाहीत.

हे फळ पुर्ण पिकले कि सुकुन तडकते आत लाल रंगाच्या शंकुसारख्या बिया असतात. या बिया हातावर चोळल्या कि लाल रंगांची पावडर हाताला लागते, आणि याचसाठी त्याला कुंकवाचे झाड म्हणतात. ( खरे कुंकु हळदीवर प्रक्रिया करुन केले जाते, किंवा रसायनांपासुन केले जाते. )

हे फळ फ़िलीपीन्स मधे लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे हा रंग. ( नाही तिथल्या सवाष्ण बाया कुंकु वैगरे लावत नाहीत. ) हा रंग खाद्य असुन तो जेवणात वापरला जातो. त्याला Annatto असे खास नाव आहे. या बिया तेलात परतल्या कि पदार्थाला हवा तो रंग येतो. मग या बिया काढुन टाकतात. या बिया पाण्यात भिजत घातल्या तरी रंग तयार होतो. या पासुन खाद्यरंग तयारही करता येतो. पण सध्या हा उपयोग मागे पडलाय. इतर आशियाई देशात असा वापर नाही.

दक्षिण अमेरिकेतील काहि भागात मात्र या बियाच कुटुन जेवणात वापरल्या जातात.
हा उपयोग सोडला तरी देखणे आटोपशीर वाढणारे झाड म्हणुन हे लोकप्रिय आहे. पुण्यातही याची झाडे दिसतात. याची पांढरी फुले येणारी एक जात असते, दोन्ही जातीत फळांच्या बिया मात्र एकाच रंगाच्या असतात.





Sunday, September 02, 2007 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणपतिच्या मांडवाची तयारी आता सुरु झाली आहे. पहिल्यांदा उभा राहतो तो मांडवाचा सांगाडा आणि हा सांगाडा करतात, बांबुपासुन.
इमारत बांधकामात अलिकडे लोखंडी पाईप्स वापरत असले तरी पुर्वापार बांबुचाच वापर होत आलाय. उभे आडवे बांबु रोवुन इमारतींच्या बाहेर जो सांगाडा केला जातो त्याला, परात असा एक खास शब्द आहे. लवचिक तरिही मजबुत असा हा सांगाडा असतो. प्लॅष्टरिंग, रंगकाम यासाठी तो हवाच.

महाराष्ट्राच्या घाटात चिवारीची बनं भरपुर दिसतात. चिवारी म्हणजे एक प्रकातचा बांबुच. अलिकडे बागांमधुन व घराभोवती शोभेसाठी म्हणुनही, बांबु लावला जातो.


baambu

वरच्या फोटोत दिसतोय तो टायगर बांबु किंवा Bambusa vulgaris जरा आणखी जवळुन बघितलं तर जास्त स्पष्ट दिसेल तो. मराठीत याला वंश कुल्लुका असे नाव आहे.

Tiger Bambu


बांबु म्हणजे तसे गवतच. आपला इक्षुदंड म्हणजे उसही गवतच कि. बांबुची वाढ खुपच भराभर होते. आपल्याकडे बांबुचे अनेक प्रकार आढळतात. सगळ्यात जास्त वापरला जातो तो वंश, म्हणजेच Bambusa bambos
बहुतेक बांबु आतुन पोकळ असतात, पण भरीव असणारा एक प्रकार असतो त्याला मराठीत भरियेल असा शब्द आहे. त्याचे शास्त्रीय नाव Dendrocalamus strictus . याच्या मजबुतीमुळे याचा उपयोग, लाठ्या, बॅटन्स, धनुष्य बाण वैगरे तयात करण्यासाठी होतो. तंबुच्या कनातीसाठी पण हा वापरतात.
एकशिंगी गेंड्याच्या शिंगासारखे कोंब येणारा तो र्‍हिनो बांबु किंवा Dendrocalamus hamiltonii हिरव्यागार रंगाचा असतो तो Melocanna baccifera तर आकाराने खुपच मोठा असतो तो Dendrocalamus giganteus

अनेक प्रकारचे बांबु बघितले असले तरी बांबुची फ़ुले वा फ़ळे मात्र प्रत्यक्ष बघण्याचा योग आला नाही. या फ़ुलोर्‍याबद्दल काहि श्रद्धा आहेत. बांबुला भरभरुन फ़ुलोरा येतो. काहि जातीत या फ़ुलोर्‍यात तांदळासारखे धान्य तयार होते. त्याची साठवणुक करता येते. त्याची खीरही करतात. काहि जातीत शहाळ्या एवढी हिरवी फळे लागतात.
पण असा फ़ुलोरा आला कि हमखास दुष्काळ पडतो असा संकेत आहे. अनेक बंगाली सिनेमात हे प्रतीक वापरलेले दिसते. या फ़ुलोर्‍यानंतर उंदरांची बेसुमार वाढ होते व अन्नधान्याची टंचाई होते, असेही मानले जाते.

बांबुचे उपयोग अनेक. खेडेगावात अजुनही वापरात असलेल्या, टोपल्या, कणग्या, डाली, सुपं, रोवळ्या या सगळ्या बांबुपासुनच बनतात. घरोघरी वापरात असणारी शिडीही बांबुचीच असते. पण तरिही वा वापर मर्यादित म्हणावा, असे वाटते कारण. आसाम सारख्या राज्यात, घराच्या बांधकामात, जळण म्हणुन, चटई म्हणुन, काहि पदार्थ शिजवण्यासाठी भांडी म्हणुनही बांबु वापरतात. इतकेच नव्हे तर उंदराना पकडायचे सापळे देखील बांबुपासुनच करतात.
बांबुपासुन या वस्तु तयार करणे हे जरा कौशल्याचेच काम आहे. मराठी लेखिका, उर्मिला पवार यांचे आयदान हे आत्मचरित्रात्मक पुस्तक, याच व्यवसायाशी निगडीत आहे.

बांबुचे कोवळे कोंब, म्हणजेच वासोते किंवा किल्लं आपल्याकडेच नव्हे तर अनेक आशियायी देशात आवडीने खाल्ले जातात. आपल्याकडे कर्नाटकात व असाम मधे त्याचे लोणचे आवडीने खातात. बांबुची बने नष्ट होवु नयेत म्हणुन या कोंबांच्या विक्रीवर कायदेशीर बंदी आहे, तरी हे कोंब बाजारात सर्रास दिसतात. ( बांबुतोडणीसाठी जे ठेके दिले जातात व जे कामगार जंगलात शिरतात, त्यामूळे जंगलाचे तेथील जीवसृष्टीचे कसे अतोनात नुकसान होते, याचे विदारक वर्णन, चितमपल्लीनी केले आहे. )

निसर्गानेही या कोंबाना संरक्षण देण्यासाठी त्यात थोडा सायनाईडचा अंश दिला आहे. त्यामूळे हत्ती वैगरे प्राणी, या कोंबांचे नुकसान करत नाहीत. पण माणुस हुश्शार ना, हे सायनाईड जाण्यासाठी, या कोंबांचे तुकडे करुन चोवीस तास पाण्यात बुडवुन ठेवले आणि धुवुन घेतले, कि झाले.

चिनी जेवणातच नव्हे तर चित्रकलेतही बांबुला अढळ स्थान आहे. तिथे बांबु हा जीवनाचे प्रतीक मानतात, त्यामूळे बांबुची पाने त्यांच्या चित्रात येतातच.
संस्कृतमधे बांबुला वंश असा शब्द आहे. त्यावरुनच हिंदीत बाँस व त्यातुन पुढे बाँसुरी असे शब्द आलेत. अर्थातच बासरी करण्यासाठी बासरीचाच वापर होतो. कधीकधी काहि किडे बांबुना छिद्र पाडतात. अश्या वनातुन वारा वहात असला तर उच्च स्वरातली शीळ ऐकु येते. बासरीची कल्पना बहुतेक यातुनच स्फुरली असावी. आपल्या कन्हैयाचे नाव या बासरीशी निगडीत आहे. मारवा पुरिया सारखे सायंकालीन राग बासरीवर छानच खुलतात.

बांबुचा जो डोळा असतो, तिथे मिठासारखा एक क्षार दिसतो. त्याला आयुर्वेदात वंशलोचन असे म्हणतात. आणि अनेक औषधात तो क्षार वापरला जातो.
या बांबुचा आणखी एक खास उपयोग. पुर्वी रंगपंचमीच्या पिचकार्‍या प्लॅश्टिकच्या नसत, लांब नळीसारख्या असत. त्या पिचकार्‍या मलकापुरला बांबुच्या करतात. पोकळ दांड्यात बांबुचीच काडी सरकवुन तिला बांबुचाच एक दट्ट्या बसवतात. दुसर्‍या बाजुने एक लहान छिद्र करतात. हा दट्टा मागेपुढे करुन त्यात पाणी भरता येते व उडवता येते. तिथे कधी गेलो कि हौसेने अशी पिचकारी करुन घेतो.




Sunday, September 02, 2007 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उद्या जन्माष्टमी. कान्हाच्या बासरीसोबत वृंदेच्या तुळशीही पण आठवण काढली पाहिजे. या झाडाकडे बघुन, आपल्या मनाला कसे शांत शुचिर्भुत वाटते. पहिल्यांदा मस्कतला गेलो होतो, त्यावेळी तिथे बागांमधुन आवर्जुन लावलेली तुळस बघितली आणि, खुप छान वाटले होते.

आताश्या घरापुढे तुळशीवृंदावन वैगरे शहरभागात चैनीची गोष्ट झाली आहे. पुलंच्या चाळीतले डालड्याच्या डब्यातले तुळशीचे रोपही, आता फारसे दिसत नाही. पण तरिही जिथे शक्य आहे, तिथे तुळशीचे रोप आवर्जुन लावले जाते.


tuLas

Ocimum sanctum असे हिचे शास्त्रीय नाव. आता नवल वाटेल पण तुळशीचे मूळ स्थान कदाचित ब्राझिल वा आफ़्रिका असण्याची शक्यता आहे. या कुळात १६० च्या वर वनस्पति आहेत. इतालियन जेवणात वापरली जाणारी बेसिल पण तुळशीच्याच वर्गातली.

आपल्याकडे रामतुळस, काळी तुळस, सब्जा, कापुर तुळस व गांधारी अश्या जाती दिसतात. यापैकी काळ्या तुळशीचा औषधासाठी जास्त वापर होतो.

तशी तुळस वाढवायला सोपी आहे. तिला उनपाणी नीट मिळाले कि ती भरभरुन वाढते. कोवळ्या मंजिर्‍या खुडुन टाकल्या कि तिला भरपुर फांद्या फुटतात.
तुळशीच्या रोपातुन ओझोन वायु उत्सर्जित होतो, हे तर आपल्याला माहितच आहे. त्यामुळे घराच्या परिसरात त्याची लागवड व्हावी अशी योजना होती. सकाळ संध्याकाळ, दिवा लावण्याच्या निमित्ताने, तिचा सहवासही घडत असे.
आम्ही लहानपणी परिक्षेला जाताना आवर्जुन तुळशीची पाने चघळत जात असु. काहि किडा वैगरे चावला तर तुळशीची माती लावत असु. खोकला ताप सारख्या बारिकसारिक आजारात तुळशीची पाने खाल्ली वा काढा घेतला, तर हमखास गूण येतो.
मी वर सब्जा चा उल्लेख केला आहे. त्याबद्दल आपल्या मनातच उगाचच अढि असते. पण सबज्याचे झाडही तुळशीप्रमाणेच असते. पाने मोठी व जांभळट छटेची असतात. त्याला भरगोस किरमिजी रंगाचे तुरे येतात आणि त्याला खुपच छान सुगंध असतो. विठ्ठलाला सबज्याचा तुरा वहायची पद्धत आहे. ( सबज्याची एक वेगळी जातही दिसते. याची पाने हिरवी असुन झाड छोटे असते. याच्या मंजिर्‍या उलट्या म्हणजे खालच्या बाजुने उघडलेल्या कोषांच्या असतात. )

सब्ज्याच्या बिया फ़ालुदात वापरतात तश्या तुळशीच्याही वापरता येतात. तुळशीच्या बिया तपकिरी रंगाच्या व आकाराने खुप बारिक असतात. या बियांची खीरही करता येते.

सत्यनारायणाच्या पुजेत १००० तुळशीची पाने वहायची पद्धत आहे. तुळशीची उत्पत्ती कशी झाली याची पौराणिक कथा आहे. सती वृंदा, हिचा पति देवाना डोईजड झाला होता. वृंदेच्या पुण्याईमुळे तो अवध्य होता. पण देवानी नेहमीप्रमाणेच लबाडी करुन, तिच्या पातिव्रत्याचा भंग केला. हे कळताच तिने स्वतःला अग्निच्या स्वाधीन केले. तिच्या राखेतुन तुळशीचे रोप उगवले, व तिला दिलेल्या वचनानुसार, तिचे दरवर्षी विष्णुशी लग्न लावले जाते.
कोकणात हा सण खुपच मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. अगदी लेकीच्या लग्ना इतका थाट केला जातो. त्या संदर्भातील हे एक पुरातन प्रकाशचित्र देतोय इथे


tuLasheeche lagn

तुळशीचे औषधी गुणधर्म आपल्याला परंपरेने माहित आहेतच. हिवताप, विषमज्वर, कफ, वात, पित्त, कृमी, कानदुखी, मूत्रदाह, अश्मरी अश्या अनेक विकारात ती वापरतात.

तुळशीच्या पानात जवळजवळ ०.५ टक्के तेल असते. तसेच युजेनॉल, कापूर, सिट्रॉल, जिरॅनिऑल, मेथील, चानीक्रॉल अशी अनेक द्रव्ये असतात.
तुळशीच्या जुन झाडांच्या खोडाचे मणि करुन त्याची माळ घालायची पद्धत आहे. हि माळ घातली कि अनेक नैतिक बंधने पाळावी लागतात.




Friday, September 07, 2007 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेले दोन दिवस परत कोकणभागाचा दौरा करुन आलो. नजर पोहोचेल तोपर्यंत तेरडा आणि कळलावी फ़ुललेत. तसा तेरडा महामुर फ़ुलतोच, पण कळलावी भरपुर दिसतेय, याचे कौतुक वाटले. आणि मग लक्षात आले कि यावर्षी जेष्ठ महिना अधिक होता. कळलावीचा बहर हे या जेष्ठ महिन्याचे दान आहे.
तसा थेट संबंध नाही याचा, पण जरा विचार करा जर अधिक महिना नसता तर हे दिवस असते गौरी गणपतिचे, आणि मग या काळात कळलावीची कत्तल ठरलेली. यावर्षी तिला जरा फुलायला उसंत मिळालीय. प्रसारही अधिक होईल.
आज काहि अश्याच रानवनस्पति बघुया.


ranadrax


युरपमधे वेगवेगळ्या बेरीज दिसतात. त्यापैकी बर्‍याच खातातही. आपल्याकडे मात्र तितक्याश्या दिसत नाहीत. ही वरच्या फोटोत दिसताहेत ती आहेत रानद्राक्षं. Ampelocissus latifola रानद्राक्षाच्या वेली असतात. याची पाने थेट द्राक्षाच्या पानासारखीच असतात. ( वरच्या फोटोत दिसताहेत ती आहेत पायरी या झाडाची पाने ) या वेली उभ्या उभ्या वाढताना दिसतात. तसा वेलींचा पर्णसंभार फार नसतो. उन्हाळा सरता सरता याना लालभडक फ़ुले येतात. पण फ़ुलांचा आकार लहान असल्याने ती दिसत उठुन दिसत नाहीत. मग त्याला हिरवी छोटी फळे घोसात लागतात. हळुहळु ती पिवळी आणि मग लालभडक होतात. हा घड अगदी द्राक्षाच्या घडाचीच आठवण करुन देतो. या दिवसात पाने नसतात वेलीवर पण असे अनेक घड ठिकठिकाणी झुलताना दिसतात.
अगदी मोहक रंग यामुळे ती फळे खावीशी वाटतात. ( ओके लेट मी कनफ़ेस, काहिच माहिती नसताना मी ती खाण्याच्या अगोचरपणा केला. मग कळले कि ती खाल्ली तरी चालतात. ) आत चिकट गोडसर द्रव असतो. मोठी बी असते. चव गोडही नाही, गोडसरच. किंबहुना रुपाच्या तुलनेत चव डावीच असते. म्हणुन कुणी खाताना दिसत नाही. पक्षीसुद्धा नाहीत.


ranateeL

याच दिवसात हि रानतीळाची झुडुपे पण बरिच दिसतात. Sesmum orientale असे य झुडुपाचे नाव. रस्त्याच्या कडेला तेरड्या कुड्याच्या गर्दीत हि फुले असणारच. झुडुप साधारण दोनेक मीटर्सपर्यंत वाढणारे. याला मुळापासुनच फांद्या फुटतात. मग उभे तुरे येतात. प्रत्येक तुर्‍यावर अशी नळकांड्यासारखी जांभळी फ़ुले येतात. एक पाकळी ऑर्किड प्रमाणे गर्द रंगाची व वेगळ्या आकाराची. हिचा वापर बहुदा किटकांसाठी हेलिपॅड म्हणुन होत असावा. याला २ सेमी लांबीच्या शेंगा लागतात.

ranapaDavaL

दिवाळीला तसा अजुन वेळ आहे, पण निसर्गाची दिवाळीची तयारी आताच सुरु झाली आहे. नरकचतुर्दशीला आपण एक लंबगोल फळ टाचेखाली फोडतो. त्या फळाचे वेल आता फ़ुलु लागले आहेत. Trichosanthes cumcumerina असे या वेलीचे नाव. चवीला कडु असणार्‍या या फळाला रानपडवळ असेही नाव आहे. हा एक दिवस सोडला, तर त्या फळाचा काहि उपयोगही आपण करत नाही.

या फळाचे फुल मात्र अत्यंत देखणे असते, ते या फोटोवरुन कळेलच. गर्द हिरव्या पानात हि इवलीशी फ़ुले उठुन दिसतात. फ़ुलांच्या पाकळ्यांचा व्यास जेमतेम १ सेमीचा. त्यामुळे अगदी जवळुन निरखल्याशिवाय हि पाकळ्यांभोवतीची नाजुक लेस दिसतही नाही.




Monday, September 10, 2007 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ुलांच्या राज्यात जसा निळा रंग अपुर्वाईचा तसा हिरवाही. हिरवा रंग आपण मनाने खास पानांसाठी राखुन ठेवला आहे. ( खरे तर पानांपासुनच फुले तयार होतात. आपण ते बघुच. पण यावेळी रंग बदलायचा असतो हे झाडाना माहित असते. हिरव्या फुलांच्या बाबतीत मात्र काहितरी गफ़लत झालेली दिसतेय. )

हिरवा चाफा आपण बघितला आहेच. काहि जणानी हिरवा गुलाबही बघितला असेल. पाने गुलाबाची असली तरी फुल मात्र गुलाबासारखे नसते. ते चक्क शेवंतीसारखे असते. तसा तो क्वचितच दिसतो पण, प्रदर्शनात मात्र आवर्जुन ठेवलेला असतो.


hirava chafa


हा वरचा प्रकार मला अनमोडच्या जंगलात दिसला होता. जरा उंचावर होते हे प्रकरण, आधी वाटले, कोवळे बांडगुळ असेल, पण नीट निरखुन बघितले तर ती फुलेच आहेत हे कळले. याला सुगंधी अशोक असे नावही आहे. शास्त्रीय नाव Polyalthia fragrans . म्हणजे चला एकातरी झाडाच्या सुगंधाची दखल शास्त्रीय नावातही घेतली आहे तर.
हि फुले तशी मोठी. सहज पाच सेमी व्यास असेल. वास साधारण हिरव्या चाफ़्यासारखाच. पण त्यापेक्षा जास्त लेमनी. या झाडाच्या फांद्या आडव्याच असतात. आणि मणिबांधेवर बांधलेल्या गजर्‍यासारखी हि फुले त्या मिरवत असतात. ( समोर एखादी जोहराबाईचीच काय ती कमी. )


lajalu

कोकणाची खासियत म्हणजे लाजाळु. रस्त्याच्या कडेने भरपुर पसरलेली अस्ते ती. आपल्याला शालेय जीवनापासुन लाजाळु ओळखीची असते. कुणीतरी कुंडीत लावलेलीही असे ती. क्वचित गवतात दिसेही ती. तिला बोट लावले कि पाने मिटुन आपली खाली मान घालते ती. ( लहानपणीचे प्रयोग म्हणजे, काडी लावली तर मिटते का, पीस लावले तर मिटते का, पाणी टाकले तर मिटते का, किती वेळ अशी मिटुन राहते. )

लाजाळुचे शास्त्रीय नाव Mimosa pudica . देशावर क्वचितच दिसणारी हि लाजाळु कोकणात बेसुमार वाढते. रस्त्याच्या कडेने ती असतेच. पावसाळ्यात तिला अशी सुंदर फुले येतात. फुले मात्र अजिबात लाजाळु नसतात. साधारणपणे जोडीने येतात ही. हि तिकोळी खास टिपलीय मी.
कोकणात हि जमिनीवरच पसरते. वीस तीस सेमीच्या खालीच पसारा तिचा. नायजेरियाच्या जंगलात मात्र अफ़ाट वाढलेली बघितली. अगदी तीन चार फुट वाढते ती तिथे.



pinguli

याच दिवसात जमिनीवर कुंपणावर सगळीकडे हि लालभडक फ़ुले फ़ुललेली असतात. मराठीत याला लाल पुंगळी असे नाव आहे. पुंगळी हे साधारण अश्या आकाराच्या फुलांसाठीचे कॉमन नाव. लाल असे विशेषण लावायचे कारण म्हणजे, अशीच पिवळी पुंगळीही असते. ती मात्र जरा कमी दिसते.
या दोघींची शास्त्रीय नावे अनुक्रमे Ipomoea hederifolia व Ipomoea obscura .
फोटोत दिसताहेत त्याप्रमाणे याची पाने खास आकाराची असतात. रंगही हिरवागार असतो. पण ही फ़ुलायला लागली कि इतकी फ़ुलते, कि सगळी पाने झाकुन जातात.


chittaranjan

पण तशी लाल पिंगुळी साधीच म्हणावी, अशी हि चित्तरंअजनाची वेल असते. पाने संयुक्त आणि अगदी नाजुक. माझ्या केनयाच्या घरी तळमजल्यापासुन पहिल्या मजल्याच्या बाल्कनीभर हा वेल होता.
खरे तर वेलच फार शोभिवंत. हिरवागार. त्यावर फुले म्हणजे बोनसच म्हणावीत अशी.
गर्द राणी रंगाची. मखमाली पोताची. सहाच पाकळ्या, पण त्याची नजाकतीच्या. फुल जेमतेम दोन सेमी व्यासाचे. आणि त्यात तो पांढराशुभ्र तीट लावल्यासारखा, पुंकेसराचा झुपका.
हि फुलेही भरभरुन फुलतात. याला मिरी एवढी गोलसर फळे लागतात. आत काळ्या बिया असतात. बिया सहज रुजतात.

हा वेल शोभेसाठी खुप ठिकाणी लावलेला असतो. केनयात बागेची खुप हौस भागवुन घेतली. लोकांच्या आणि सरकारी बागातली फ़ुलझाडे पळवायचा माझा आणि शेजारिणीचा प्लॅन असे. चांगले फ़ुल दिसले कि मी मुद्दाम माझी घराची चावी खाली टाकत असे. चावी उचलताना, हळुन एखादे रोपटे उपटत असे. ते शेजारीणीच्या पिशवीत वा छत्रीत घालुन, आम्ही त्या गावचेच नाही, असा आव आणुन, निघुन जात असु.
अशी चोरुन आणलेलीच झाडे, छान रुजतात, यावर आम्हा दोगांचे एकमत होते.






Tuesday, September 11, 2007 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्यु लाये सैंया पान हो, मेरी होंठ तो युही लाल
ले तु ही पान चबा दे, और अपनी बढा दे शान

असे काहिसे गाणे होते, सौदागर सिनेमात.
पान खाऊन ओठ करी लाल, अंगावरी शाल
झळकती तुरे,

अशी एक लावणीही आहेच. ( स्वरसम्राज्ञी नाटकात )
तांबुल भक्षण करणे हा आपल्याकडच्या श्रुंगाराचा भाग होता. पण मुळात पान खाल्याने तोंड लाल होत नाही, ते होते त्यातल्या काथामूळे. आणि कात तयार करतात खैरापासुन.


khair

Acacia catechu असे याचे शास्त्रीय नाव. अकाशिया म्हणजे बाभळीचे कुळ, त्यामूळे रुपात साम्य आहेच. पाने तशीच पण जरा दाट. खैर फुलायला लागला कि त्याचे वेगळेपण जाणवते. कोवळी पालवी आणि असे तुरे एकदमच येतात. त्यामूळे झाड अगदी उठुन दिसते. अशीच फ़ुले येणारी बाभळीची पण जात असते, पण त्याला फुले अश्या रचनेत येत नाहीत. शिवाय खैराच्या फुलाना मंदसा सुगंध असतो. साधारण जून महिन्यात हा नजारा बघायला मिळतो. खैराची झाडे रानोमाळ खुप दिसतात.
काथ करण्यासाठी खैराच्या जून खोडाचे बारिक तुकडे करतात. मग ते पाण्यात शिजवुन त्याचा लगदा करतात. हा लगदा वाळवुन त्याच्या वड्या केल्या, कि झाला कात. काहि अनाकलनीय कारणांमूळे, काथाच्या भट्टीजवळ बांगड्या वाजवायच्या नाहीत असा समज आहे, त्यामूळे बायका सहसा त्या भट्टीत काम करत नाहीत.
भलताच रंगला काथ, लाल ओठात, किंवा डाव्या डोळ्यानं खुडुन घातला, नजरकाताचा खडा वैगरे लाव्ण्यातील ओळी आठवायला लागल्या असतीलच. विडा करणे, तो देणे आणि तो रंगणे याच्याशी अनेक शृंगाराच्या कल्पना निगडीत आहेत. कत्थई रंग हा साड्यांमधला एक लोकप्रिय रंग आहे.
याचे लाकुड शिजवुन काथ करतात याचा उल्लेख वर आलाच आहे, पण हे लाकुड काहि मऊ नसते. अगदी मजबुत असते. ( यातली एक जात शेण्या खैराचे लाकुड मात्र पोचट असते. ) पुर्वी उसाचा रस काढायचा चरक लाकडी असे आणि तो खैराच्या लाकडापासुन तयार करत असत. तसेच पुर्वीच्या काळी बांधकामाचा चुना तयार करताना त्यात खैराचा अर्क मिसळत असत. त्याने त्या चुन्याला मजबुती येते व ती भिंत तोफगोळ्यालाही तोंड देऊ शकते, असा समज होता.
खैराला संस्कृतमधे खदिर असे नाव आहे. खदिरादी तेल बाजारात उपलब्ध आहे. खास करुन घश्याच्या विकारात ते वापरतात, अर्थातच खोकला पित्त यावरही तो गुणकारी आहे. बहुतेक सर्व दंतमंजनात खैराची साल असतेच.

आज खैराची आठवण यायचे कारण म्हणजे, गणपतिला प्रिय असणार्‍या शमीच्या झाडाशी त्याचे असलेले साम्य. शमी Prosopis spyicigers हा वेगळा वृक्ष असतो. त्याला सवदंड असेही म्हणतात. बाभळीपेक्षा किंवा खैरापेक्षा पाने गडद रंगाची असतात. याला काळ्या लांब शेंगाही लागतात.

अगदी पुरातन काळापासुन हा वृक्ष दुर्मिळ आहे. म्हणुन आपण विजयादशमीला शमी च्या जागी आपट्याची पाने लुटतो. तसा शमीही औषधी आहेच. दुर्वांप्रमाणेच अग्निदाह, उन्हाळे यावर तो उपयोगी आहे.

गुजराथी व राजस्थानी भाषेत याला खेजडी असे नाव आहे. तिथे तो गणपतिला वाहतात का याची कल्पना नाही, पण या शेंगांचे लोणचे मात्र राजस्थानात आवडीने खाल्ले जाते.


wakeri

पावसाळ्याची आधी डोंगरात असे लाल पिवळे तुरे उंचावर दिसत असतात. लालभडक रंगाचे ते तुरे आकारानेही मोहक दिसतात.

vakeri

पण याची शोभा दुरुनच साजरी. याला हात लावला तर याचे उलटे फ़िरलेले काटे, तळहात सोलुन काढतात. ( पुर्वी रुईया कॉलेजच्या मागे याचे झाड होते, तिथे अस्मादिकानी हा प्रसाद मिळवला आहे. पण त्यावेळच्या जखमांपेक्षा आता ते झाड तिथे नसल्याची जखम मोठी आहे. )

हि आहे वाकेरी. Moullava spicata याची पाने मोठी संयुक्त असतात. या पानाखाली पण खुप काटे असतात. हे साधारण एक झुडुप असते, पण इतर झाडांच्या आधाराने वरवर वाढत जाते. कळ्या लाल असल्या तरी फुले पिवळी असतात. फुले खालपासुन उमलत जातात, पण पुर्णपणे कधीच उमलत नाहीत.
या झाडाचे मूळ वाकेरीचं भातं म्हणुन ओळखले जाते. अनेक गुढ रोगात त्याचा उपयोग होतो.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators