Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
ajjuka
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members A-N » ajjuka « Previous Next »

बरेच जणांनी बरेच दिवस आग्रह केल्यानंतर आता मी माझे 'श्वास' चे अनुभव शब्दबद्ध करत आहे. 'श्वास'च्या अनुषंगाने माझा प्रवास असणार आहे. सगळी गोष्ट एका लेखात सांगण्यापेक्षा अनेक भागात सांगणे हे जास्त न्याय देणारे ठरेल असे मला वाटतेय त्यामुळे ही एक लेखमाला असेल. माझ्या सवयी बघता या लेखांना ठराविक काळाचे बंधन नसेल पण तरी किमान दर महिन्यात एकतरी लेख आपल्याला वाचायला मिळेल असा माझा प्रयत्न असेल. 'श्वास' बद्दल लिहित असतानाच दुसरा असाच प्रवास मी अनुभवत असणार आहे, काम करत असणार आहे तेव्हा वेळेचं समजून घ्यालंच..
माझा 'श्वास' – १

"आपल्याला इ-टीव्ही साठी एक टेलिफिल्म करून द्यायची आहे. स्पंदन या स्लॉटसाठी. त्या आंधळ्या मुलाच्या गोष्टीवर." एक दिवस संदीप ने सांगितले. ऑक्टोबर २००१ मधली गोष्ट ही. त्याआधी महिनाभर त्याने मला आंधळ्या मुलाची गोष्ट ऐकवली होती. तेव्हा मी नुकतीच परत आले होते भारतात आणि आता काम सुरू करायचे, चांगले कामच करायचे अश्या विचारात होते. होणार्‍या नवर्‍याबरोबर एकत्र काम करण्यासाठीही उत्सुक होते.

त्या गोष्टीतला विचार खूपच छान होता. आणि संदीप ज्या पद्धतीने तो विचार पुढे यावा यासाठी ती treat करू पहात होता ते खूपच interesting वाटत होते.

माधवी घारपुरे यांच्या काही कथा त्यांनी संदीपकडे वाचायला पाठवल्या होत्या. त्यातली संदीपला potential वाटलेली ही एकमेव गोष्ट. य गोष्टीत एक सच्चा आणि enriching अनुभव देण्याच्या शक्यता संदीपला जाणवल्या होत्या. मग संदीपने या गोष्टीबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा असं कळलं की पुण्यातले प्रसिद्ध कर्करोगतज्ञ व सर्जन डॉ. शैलेश पुणतांबेकर हे त्यांच्या सुरूवातीच्या काळात जेव्हा मुंबईत टाटा’ मधे होते तेव्हाचा त्यांचा हा अनुभव आहे.

तर अश्या ह्या कथेवर आधारीत एक टेलिफिल्म करायची आहे. साधारण डिसेंबर मधे शूट असेल, असं संदीपने सांगितल. आणि लवकरच आम्हाला कळल की इ-टीव्ही ने तो स्लॉटच बंद केलाय. त्यामुळे आता ती टेलिफिल्म होणे नाही.

असंच होत होतं संदीपच्या बाबतीत दर वेळेला. हाती येतेय असे वाटतंय तोच समोरून काम निघून जावे असे प्रत्येक project मधे होत होते.

पण संदीपला मात्र या कथेने, यातल्या अनुभवाने घेरून टाकले होते. इतक्या सहजासहजी हे project सोडून द्यायला तो तयार नव्हता. त्यामुळे या कथेवर feature film करावी असे त्याच्या मनाने घेतले.

साधारण डिसेंबर २००१ च्या सुमारास अरूण (नलावडे) आणि संदीप यांच्यात बोलणे झाले की एखादी छोट्या बजेटची फिल्म असेल तर करता येण्यासाठी आर्थिक आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यावर संदीपने ही आंधळ्या मुलाची गोष्ट अरूणला सुचवली. दोघांचेही ही फिल्म करायची असे ठरले.

संदीप संशोधनाच्या कामाला लागला. डॉक्टरांचा मूळ अनुभव, कॅन्सर, हॉस्पिटल, लहान मुलाचे भावविश्व, तो गावाकडचा होता पण गाव कुठच हे ठरवणं… एवढ्या सगळ्या गोष्टींवर अगदी खोलात जाऊन संशोधन करायची गरज होती. 'तेवढं नाही केलं तर ते खरखुर कसं वाटणार. त्य कथावस्तुची dignity कशी पाळली जाणार? त्यामुळे ते करायलाच हवे' इतका साधा सोपा approach होता संदीपचा.

मार्च २००१ मधे आमची engagement झाली. ठरलं होतं आधीच फक्त घरच्यांसाठी सोपस्कार पार पडले. त्याच वेळेला या गोष्टीवरच्या फिल्म साठी चक्र जोरात फिरायला लागली होती.

संदीप दिवसचे दिवस पुण्यात येऊन रहात होता डॉ. शैलेश पुणतांबेकरांना भेटण्यासाठी. ते बिचारे पडले बिझी सर्जन आणि कर्करोगतज्ञ. पेशंटस, ऑपरेशन्स यातून एका सिनेमासाठी ते किती वेळ देऊ शकणार होते. त्यामुळे अनेकदा ठरलेल्या appointments cancel व्हायच्या. पण संदीप चिकाटीने थांबून रहायचा त्यांच्यासाठी. मला आठवतंय अशी कधी ठरलेली meeting cancel झाली की मी जाम चिडायचे, ‘ते असं कसं करू शकतात?’ म्हणून.. पण तोवर मला त्यांचे आयुष्य माहित नव्हते. आणि आता माहित झाल्यावर त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल फारच आदर वाटतो.

मे २००२ मधे आमचं लग्न झालं. या मधल्या वेळात संदीप त्या संशोधनात इतका गुरफटायला लागला होता की मला वाटल ह्याला लग्नासाठी दोन दिवस तरी काढता येणारेत की नाही! मग तेव्हढ्यात मलाही एक छोटं project मिळालं होतं मुंबईमधे त्यामुळे मी लग्नासाठी वेळेत पुण्यात पोचणार आहे की नाही अशी भिती मला वाटायला लागली. पण तस काही न होता आम्ही वेळेत पोचलो आणि लग्न झालं. लग्नाच्या आधी २-३ दिवस डॉक्टरांकडे संदीप गेला होता. त्यांनी त्याला सांगितले की 'असं कर आता २४ तारखेला तू ये. त्यादिवशी तुला अजून काही पेशंटस भेटतील.' संदीप हो’ म्हणता म्हणता थांबला (बहुतेक माझा चिडलेला चेहरा आठवून…) आणि म्हणाला, "२४ च्या ऐवजी नंतर थोडे दिवसांनी चालणार नाही का?" डॉक्टरांना कळेना याला काय झालं अचानक. त्यांनी विचारलं, "का?" "नाही एक छोटासा problem आहे. त्याच दिवशी माझं लग्न आहे, त्यामुळे जमणार नाही." (पण नसेल नंतर शक्य, तर मी येईन थोडा वेळ काढून.. हे वाक्य त्याने भितीनेच गिळले असावे..) डॉक्टर हसू लागले. "कृपया पुढचे १५ दिवस तरी येऊ नका इथे." असा दम दिला असावा त्यांनी कारण लग्नानंतर चक्क १०-१२ दिवस संदीप त्यांच्याकडे गेला नाही.

माझा श्वास्’ – २

लग्नानंतर आम्ही गेलो मालवणला. मालवणच्या आसपासचा परिसर फिरत होतो. धामापुरच देऊळ ओलांडून तिथून मग नेरूरपार कडे येऊन काळश्याला खाली उतरून वनलक्ष्मीच्या बोटीतून कर्ली नदीमधे फिरून आलो. फार मस्त होता तो भाग. मला आपलं नवीन लग्न झालेल्या मुलिला जसं वाटावं तसं छान छान वाटत होतं तिथे फिरताना आणि दिग्दर्शकाच्या डोक्यात वेगळीच चक्र चालू होती. सगळ्या परिसराची बैजवार माहिती घेऊन ठेवली. काळश्याचे केशव सावंत, वनलक्ष्मीची बोट चालवणारे कोरगावकर, त्या परीसरातली हिरवाई, उन्हाच्या दिशा इत्यादी इत्यादी. एकाच ठिकाणी २-३ वेळा जाऊन आलो आम्ही ६ दिवसांत आणि ही एवढी माहिती... परत ओळख झालेल्या रिक्षेवाल्याबरोबर त्याचे गाव, खोताचे जुवे, सुरुचे बन इत्यादी बघून येणे, तिथल्या परिसराचे फोटो काढणे, माणसांशी ओळखी करून घेणे.. इत्यादी इत्यादी इत्यादी. दिग्दर्शकाच्या उत्साहाची लागण मलाही झाली. त्या भरात तपशीलवार माहिती लिहून घेणे, हे गाव त्या’ मुलाचं म्हणून योग्य वाटेल की नाही इत्यादी चर्चा दिग्दर्शकाबरोबर करणे हे सर्व मीही केलं. पण मग अचानक मला आठवल आपण हनीमून ला आलोय आणि location hunting करतोय लग्नानंतरचे पहिले कडाक्याचे भांडण यावरून झाले. ते अजूनही अधून मधून वर येते पण आता location hunting नसलेला second HM दिग्दर्शकाने मला प्रॉमिस केलाय आणि मी वाट बघतेय!! :-)

मुंबईत परत आलो आणि संदीपच्या पायाला परत भिंगरी लागली. डॉ. पुणतांबेकर व कॅन्सरशी संबंधित इतर व्यक्ती नी संस्थांना भेटणे. स्वतःच्या notes काढणे. पटकथेची बांधणी करणे. हे सगळं सुरू झालं. मुंबईत तो लिखाण करत होता तेव्हा रोज सकाळी आम्ही डबा घेऊन निघायचो आणि वडाळ्याला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जाऊन बसायचो. रात्री ८ वाजता ग्रंथालय बंद व्हायचे. मग तेव्हा तिथून निघायचे आणि शिवाजी पार्क किंवा अजून कुठेतरी जाऊन कथेवर चर्चा किंवा कधी कॅमेर्‍याच्या movement बद्दल किंवा कधी general filmmaking मधला एखादा कुठला तरी मुद्दा घेऊन चर्चा करत असू. अजून माझा सहभाग चर्चेपुरताच जरी मर्यादीत असला तरी जे काही त्याच्या डोक्यात आकार घेतंय त्याच्या treatment ची थोडी कल्पना यायला लागली होती.

संशोधन हा कुठल्याही पटकथेचा महत्वाचा भाग असतो. इथे कथेची पार्श्वभूमी वैद्यकीय असल्याने त्या जगाबद्दल आतून समजून घेणे गरजेचे होते. फक्त कथेच्या अनुषंगाने येणारीच माणसे नाहीत तर त्या त्या जगातली सगळीच माणसे, त्यांचे आपसातले व्यवहार, त्यांची मानसिकता इत्यादी गोष्टी महत्वाच्या ठरतात. कथेतील महत्वाच्या आणि कमी महत्वाच्याही व्यक्तिरेखा ह्या त्यांच्या बारीक बारीक कंगोर्‍यांसकट खर्‍या वाटल्या पहिजेत. त्यांची प्रत्येक कृती तर्काला धरून असायला हवी. खरोखरिच माणूस वागेल तसे ते वागायला हवेत लेखकाने लिहिलय म्हणून नव्हे. प्रत्येक घटना ही आधीच्या घटनेनंतर सहजतेने येणारी वाटायला हवी. ह्यासाठी व्यक्तिरेखांचा तपशीलात अभ्यास करायची गरज होती. त्यासाठी संदीप डॉक्टर पुणतांबेकरांच्या बरोबर अक्षरश दिवसरात्र फिरत होता. स्वत डॉक्टर, त्यांचे असिस्टंटस, त्यांना भेटायला येणारे कॅन्सरच्या वेगवेगळ्या अवस्थेतले रूग्ण, सपोर्ट ग्रुप्स चालवणारे काउन्सेलर्स इत्यादी सगळ्यांना बघणे, भेटणे, सपोर्ट ग्रुप्स च्या मिटींग्ज अटेण्ड करणे, सिप्ला सेंटरमधील रूग्ण (सिप्ला सेंटर हे कॅन्सरच्या शेवटच्या स्थितील रूग्णांची काळजी घेणारे केंद्र आहे), त्यांचे नातेवाईक, तिथले डॉक्टर्स, सोशल वर्कर्स यांना भेटणे, बघणे अश्या अनेक पद्धतींनी संशोधन चालू होते.

पटकथेचा कच्चा आराखडा तयार होत आला आणि आता तपशील भरण्यासाठी, दृश्य अधिक जिवंत व्हावे यासाठी चित्रीकरणाच्या जागा निश्चित करणे गरजेचे होते. प्रत्येकाची लिहायची विशिष्ठ पद्धत असते. संदीप पटकथा लिहीत असताना मुंबईत एका जागी बसून लिहू शकत नाही. संशोधनामधे सगळ्या गोष्टींची माहिती करून घेण्याबरोबरच, घटना घडण्याचे अवकाश(स्पेसेस) शोधत जाणे, त्यातून त्या त्या अवकाशाचे आणि पर्यायाने घटनेचे कॅरेक्टर निश्चित करत जाणे हि प्रक्रिया संदीपसाठी गरजेची असते. हॉस्पिटल म्हटले की कुठलेही हॉस्पिटल किंवा नुसते पांढरे पडदे लावून चालत नाही. प्रत्येक घटना कुठे घडते यावर ती कशी कशी घडते हे अवलंबून असते. हे सगळे काम साधारण सप्टेंबर ऑक्टोबर २००२ च्या दरम्यान सुरु झाले. आणि त्या त्या ठिकाणाची तपशीलवार माहिती जमवणेही. यावेळेला मग संदीपबरोबर मीही वेगवेगळ्या हॉस्पिटल्सच्या फेर्‍या मारू लागले. लोकेशनची तपशीलवार माहिती म्हणजे प्रत्येक भागाचा बारीक बारीक गोष्टींसकट नकाशा किंवा चित्र काढणे. आत असेल तर दारे, खिडक्या, वस्तू आणि बाहेरची जागा असेल तर झाडे, कुंड्या, रस्ता सर्व काही. नैसर्गिक (खिडकीतून वा परावर्तित होऊन येणारा सूर्यप्रकाश) व कृत्रिम(वेगवेगळ्या प्रकारचे दिवे) अश्या प्रकाशाच्या sources ची माहिती लिहून ठेवणे. दिशांसकट हे सगळं टिपून ठेवायचं. बरोबर संदर्भासाठी फोटो जोडायचे. असा सगळा कार्यक्रम असायचा. दिवसातल्या आणि वर्षातल्या कुठल्या वेळेला ती ती जागा कशी कशी दिसेल याचा अंदाज येण्यास यातून मदत होते कारण अर्थातच सप्टेंबर मधे असलेली परिस्थिती फेब्रुवारि मधे रहाणार नव्हती. अर्थात ऋतुबदलाने बदळणारी परिस्थिती हे outdoor locations च्या बाबतीत जास्त महत्वाचे ठरते.

चित्रपटाच्या आर्थिक आधारासाठीही धडपडणे चालू होते. सुरूवातीला मिळालेला आधार हा संपूर्ण नसणार हे माहित होते त्यामुळे बाकीचा बराच मोठा भाग उभा करण्यासाठी यत्न चालू होते. अनेकांशी अरूण आणि संदीप बोलत होते. काहीजण पुढे येत होते आणि एकदोन मिटींग्ज नंतर गळत होते. अरूणच्या ओळखीतल्या एका हितचिंतकाने interest दाखवला. अनेक मिटींग्ज संदीपने केल्या त्यांच्याबरोबर आणि त्यांना ह्या project चे महत्व पटले, संदीपची passion लक्षात आली आणि त्यांनी उरलेली सगळीच आर्थिक अडचण दूर केली. ही घटना ३-४ ओळीत सांगितली असली तरी हे सगळे साधारण २००२ च्या जूनपासून डिसेंबरपर्यंत चालू होते.

असा सगळा माहौल हळूहळू तयार होत होता. याच्याबरोबर पात्रयोजनेतला सगळ्यात crucial भाग म्हणजे लहान मुलगा, त्याचा शोध चालू होता. तो मिळत नव्हता. त्यावेळेला आजूबाजूला दिसत असलेल्या बालकलाकारांच्यात कोणीच योग्य वाटत नव्हता.

माझा 'श्वास' - ३
आजूबाजूला बर्‍याच मालिकांमधून किंवा काही चित्रपटांच्यात बरीच लहान मुले होती पण कोकणातल्या खेड्यातला मुलगा काही सापडत नव्हता. सगळी मुलं एकजात शहरी वळणाची. आणि वर इंग्रजी माध्यमातली होती.

आम्ही शोधत होतो. चारी दिशांना दूत पाठवले होते म्हणजे सगळ्यांना सांगून ठेवलं होतं. मुलगा ६-७ वर्षांचच हवाय हे स्पष्ट कळवूनही चित्रपटाच्या मोहाने आपल्या १०-१२ वर्षाच्या बाब्यालाही "लहानच दिसतो हो तो" म्हणत आम्हाला भेटायला येणार्‍या आया पाहिल्यावर त्या मुलाची दयाच येत असे.

अश्यात एकदा माझ्या आईने एक फोटो दिला आम्हाला बघायला. ती एका मंगळागौरीच्या कार्यक्रमाला गेली होती तिथे एका चुणचुणीत छोट्याने एक नाट्यछटा केली होती. त्याचा फोटो आईने मागून घेतला होता. तो हा फोटो होता. फोटोतल्या cartoon चे गमतीशीर डोळे, त्याचा सावळा रंग आणि कपाळावरचे केसांचे मजेशीर छप्पर हे पाहून आम्ही दोघेही खुश झालो.


अश्विनचा पहिल्यांदा पाह्यलेला फोटो

त्याच्या घरी पोचलो. लाल शर्ट आणि काळी चड्डी अश्याच वेषात साहेब आमच्यासमोर हजर झाले. समोरच्या दिवाणावर तो आणि त्याची आई बसली होती. इकडे खुर्च्यांवर आम्ही दोघं. संदीपने त्याच्याशी गप्पा मारायला सुरूवात केली. संदीपच्या हातात व्हिडीओ कॅमेरा होता. तो हळूच त्याने चालूही केला. ज्यूनियर चितळे आपल्याला भेटायला कुणीतरी आलंय म्हणून जाम खुश होते आणि किंचित लाजतही होते. संदीपच्या हातातल्या कॅमेर्‍याकडे त्याचं वारंवार लक्ष जात होतं. संदीप त्याला, "इकडे ये!" म्हणाला, समोरचा दिवाण ते संदीप बसला होता ती खुर्ची यातलं अंतर ५ - ६ पावलं असेल नसेल पण जवळजवळ मॅरेथॉन मधे धावावं एवढ्या वेगात त्याने धाव घेतली आणि पटकन संदीपच्या जवळ आला. आजही माझ्या डोळ्यासमोरून त्याची ती धाव हटत नाही. संदीपला आणि मला जाम हसायला आलं. साधारण दीड मिनिटात त्याचा बुजरेपणा संपला होता आणि तो आमच्याशी गप्पा मारायला लागला होता. नंतर त्याला त्याचं नाव आणि त्याच्याबद्दल २ ओळी बोलायला सांगितल्या कॅमेर्‍यात बघून. "माझे नाव अश्विन मिलिंद चितळे आहे. माझे वय ६ वर्ष आहे. नुकतीच माझी मुंज झाली. तेव्हा मला खूप मजा आली." अशी वाक्य म्हणताना हळूच एकीकडे हसू न आवरणं, हसण्याच्या नादात शब्दांची गडबड करणं, त्यावरून जीभ बाहेर काढून किंवा मानेनेच 'नाही' म्हणून वाक्याची परत सुरूवात करणं, आणि यामुळे त्याला अजूनच हसायला येणं असं त्याचं चालू होतं. 'तू टीव्ही बघतोस का? काय आवडतं? मारामारी करायला आवडते का?' असं काय काय संदीपने त्याला विचारलं. मारामारीचं नाव काढल्यावर स्वारी खूशच. संदीपने त्याला माझ्याशी मारामारी करायला सांगितली. हे सगळं संदीपच्याकडे टेप होत होतं आणि हे त्या पिल्लाला विसरायला झालं होतं एव्हाना. मी तर तेव्हाच खुश झाले होते. हाच 'तो' अशी माझी खात्री पटली होती. आणि संदीप अर्थातच इतक्या पटकन खुश होणार्‍यातला नसल्याने "चांगला आहे. शक्यता आहे हाच ठरण्याची. पण अजून screentests कराव्या लागतील" असं म्हणून आम्ही चितळ्यांच्या घरून बाहेर पडलो.

यानंतर संदीपने अश्विनशी छान मैत्री वाढवली. त्याला घरी जाऊन भेटणे, त्याला बाहेर खेळायला घेऊन जाणे इत्यादी सुरू झाले. त्याच्याशी संदीपने खूप गप्पा मारल्या. अगदी आज शाळेत काय झालं पासून काल आईने फटका दिला होता इथपर्यंत सगळं तो संदीपला सांगू लागला. अश्विन संदीपच्याबरोबर खूपच रूळला, comfortable झाला. हळू हळू संदीपलाही १००% खात्री पटली की हाच 'परश्या' आणि मग त्याचे ट्रेनिंग चालू झाले. साधारण चारपाच महिने हे ट्रेनिंग चालू होते.

ह्यातच मग हळूहळू 'परश्या' साकारण्यासाठी म्हणून विशिष्ठ inputs द्यायला संदीपने सुरूवात केली. 'तुला काय वाटतं काय करायला हवं आता परश्यानं? किंवा असं झालं तर तुला कसं वाटेल?' अश्या साध्या साध्या संवादांच्यातून संपूर्ण पटकथा गप्पा मारत मारत, चर्चा करत, हळू हळू संदीपने अश्विनपर्यंत पोचवली.

पटकथेच्या अनुषंगाने येणार्‍या ठिकाणी विशेषतः हॉस्पिटलमधे, डॉक्टरांच्या क्लिनिकमधे त्याला फिरवूनही आणले होते. अगदी मेल सर्जिकल वॉर्ड पासून ऑपरेशन थिएटर पर्यंत. हेतू हा की त्याला या सगळ्या वातावरणाची सवय व्हावी. पहिल्यांदा त्याला तिथे घेऊन गेलो होतो तेव्हा आम्हालाच तो घाबरेल का? रडेल का अशी थोडी भिती होती. पण एव्हाना आमच्या दोघांची विशेषतः संदीपकाकाची त्याला इतकी सवय झाली होती की तो कणभरही घाबरला नाही. मजेत होता. अगदी हॉस्पिटलमधे स्ट्रेचर वर झोपवून त्याला OT मधे नेऊन आणले तेव्हाही. वर स्पिरिटचा वास मला खूप आवडतो असंही सांगितलं त्याने.

अस सर्वच दृष्टीने त्याला 'परश्या' करण्यासाठी तयार करणं चालू होतं. पण सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे अश्विनला या सगळ्याचा त्रास न होणं. वय लहान आणि कर्करोग, आंधळं होणं या गोष्टी नट म्हणून अंगावर घेताना त्याच्या मनावर आयुष्यभरासाठी 'स्कार' होणं ही शक्यता खूपच होती. आणि त्याचा परिणाम film मधल्या performance वर होण्याची शक्यताही होती. त्यामुळे पहिल्यापासून त्याला हे सगळं खोटं आहे. ही एक गोष्ट आहे आणि ती एकदम खरी वाटेल अशी आपल्याला दाखवायचीये हे त्याला वेगवेगळ्या पद्धतीने संदीपने समजावून दिलं. म्हणजे कसं की..

"आजारी कोण आहे?"
"परश्या"
"लोकांना कळलं पाहीजे तो आजारी आहे. परश्या कोण करतंय?"
"अश्विन"
"मग अश्विन बरं नाहीये असा दिसला तर लोकांना कळेल ना परश्या आजारी आहे ते.."

अश्या गप्पांच्यातून परश्या आणि अश्विन हि सीमारेखा संदीपने कायम ठेवली. त्यामुळे पुढे शूटींगच्यावेळेला अत्यंत intense scenes च्या वेळेलासुद्धा अश्विन एकदम relax असायचा.

नेहमी भेट झाल्यावर काय काय झालं, संदीपकाका काय काय बोलला असं सगळं त्याला लिहून ठेवायला संदीपने सांगितलं होतं. कधी कधी संदीप त्याला प्रश्नही द्यायचा ज्याच्याबद्दल पुढच्या वेळेपर्यंत त्याने लिहून आणणं अपेक्षित असायचं. हे प्रश्न म्हणजे 'मग आता परश्यचं काय झालं? आजचा गोष्टीतला जो भाग होता त्याबद्दल तुला काय वाटतं? आज आपण अमुक अमुक ठिकाणी गेलो होतो तिथे तुला कसं वाटलं?' विविध स्वरूपाचे असायचे. वय वर्ष सहा, इयत्ता दुसरी या वयाला साजेसं, जमेलसं तो त्यात लिहायचा. अर्थात तो काही अभ्यासू विद्यार्थी नव्हता ( thank god! ). कधी कधी कंटाळाही करायचा. कधी कधी वात्रटासारखं "मला झोप आली म्हणून आईला लिहायला सांगितलं." असं उत्तरही यायचं त्याच्याकडून किंवा एकदा वहीची दोन पानं मोठ्ठ्या अक्षरात 'काही नाही' असं लिहिलं होतं त्याने. मग संदीपकडून एखादी खरीखुरी किंवा शाब्दिक चापटही खायचा तो तेव्हा पण एकुणात त्याने पटकथा, परश्या हे सगळं पचवायला सुरूवात केली होती हे नक्की.

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner ajjuka Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators