Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
ameyadeshpande
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members A-N » ameyadeshpande « Previous Next »

असंच.
मी एक पेंटींग बघत होतो. पावसाळी संध्याकाळ आणि उधाणलेला समुद्र. आकाशातल्या ढगांच्या फ़टीतून मधूनच किंचितसे सुर्य किरण समुद्रावर पडलेत आणि क्षितिजापाशी असलेलं पाणी एकदम चकाकून आलयं... अन हे सगळं, समुद्राकाठी बांधलेल्या कठड्यापाशी उभं राहून कुणीतरी एका हरवलेल्या नजरेनी ते पहातयं......... अन अचानक एक आश्चर्य घडलं... हे चित्र जिवंत झालं... त्या उधाणलेल्या समुद्राच्या स्थिर लाटा एकदम घोंघावत त्या कठड्यावर झेपावल्या... पांढरा शुभ्र फ़ेस बनून कधी परतीच्या लाटा बनल्या तर कधी त्या कठड्यावरुन उंच उंच उडून हवेत क्षणभर टपोरे मोती साकारून गेल्या... काही कळायच्या आतच ते मोती त्या उभ्या असलेल्या मुलाच्या अंगावर पडले... अंगावर पडलेला त्या पाण्यानी एकदम सगळं वातावरण शहारून गेलं... मनातली क्षितीजं दूर झाली अन द्रुष्टीच्या पलिकडचं खूप सारं नजरेसमोर येऊन उभं राहिलं.........
नाही... खरंतर असं आश्चर्य वगैरे काहीच घडलं नाही... पण आज संध्याकाळचे जिवंत क्षण मात्र चित्र बनून माझ्या मनात घट्ट घर करून गेले......
वरळी सी फ़ेस... समुद्राची अखंड खळखळ आणि क्षणाक्षणाला पालटत जाणारं त्याचं रूप. दूर क्षितीजापाशी हिरव्यागार रंगात डुंबून राहिलेला तर काठापाशी तांबूस रंगात रंगलेला... मधूनच सुर्याच्या तेजात सोनेरी चकाकणारा अन रात्रीच्या वेळी काळ्या रंगाची शाल पांघरून फ़क्त फ़ेसाळलेल्या पावलांनी जमिनीला मिठी घालणारा... कधी अल्लड तर कधी भिती वाटावी इतका वेडावलेला... मिट्ट काळोख्या रात्री फ़क्त आपल्या आवाजानी अस्तित्व दर्शवणारा... इतक्या वेगवेगळ्या छटा घेऊन प्रत्येक वेळी वेगळेपणानी नजरेत भरणारा... तसे पाहिले तर हे सगळे रंग समुद्राचे स्वत:चे नाहीतच...त्याला स्वत्:ला एकच रंग... तो म्हणजे अखंड खळखळत रहाणे. उन्हात.. पावसात.. वादळात.. दिवसा.. रात्री कधीही पाहिलं तरी अखंड खळखळत रहाणारा... त्या खळखळणार्‍या लाटा म्हणजे समुद्राची भाषा असावी...कधी भरती येऊन खूप काही सांगू पहाणारा तर कधी ओहोटी लागून एकलकोंड्या सारखा सगळ्यांपासून दूर जाऊ पहाणारा... निश:ब्द आणि गंभीर... जो रंग टाकू त्यात उठून दिसणारा........
खरंतर समुद्र, वारा, सूर्य, पाऊस आणि अशा सगळ्याच गोष्टी निर्जीव निर्विकार... निसर्गानी ज्या स्थितीत ठेवलं आहे त्यात अखंडपणे टिकून रहाणार्‍या... माणसाच्या जाणिवा त्याला आकार देतात.. शब्द देतात आणि सुरेखपणे एकमेकात गुंफ़ून टाकतात... निसर्गानी त्याच्या भाषेत घातलेल्या हाका असतात ह्या... त्याच निसर्गानी मला ऐकायला कान दिले... पहायला डोळे दिले आणि अनुभवायला जाणिवा दिल्या... म्हणून त्याचं बोलण भरभरून ऐकू येतं...खूप सारं डोळ्यात साठवता येतं आणि मनसोक्त त्याच्यात सामावून जाता येतं... पण एक मात्र खरं, जिवंत प्राण्यांना निसर्गानी जाणिवा दिल्या आणि स्वत्:कडे मात्र निर्विकारता खूप जपून ठेवली...आपल्याला जणिवांबरोबर सुख दिलं, दु:खं दिली, आनंद दिला आणि वेदनाही दिल्या... आणि त्याच बरोबर ह्या सगळ्यात राहून स्वत्:सारखं निर्विकार बनण्याची ताकदही दिली...
ही निर्विकारताच अशा वेळी माझ्याशी संवाद साधू लागते...वार्‍याच्या आवाजानी...खळखळून बोलणार्‍या लाटांनी...कडकडीत उन्हाच्या धगीतून आणि कोसळणार्‍या पावसाच्या सरीतून...मनातल्या त्या जिवंत चित्रावर असंख्य वेगवेगळे रंग चढत रहातात आणि मग निसर्गाची सगळीच रूपं माझी होऊन जातात आणि मीही तितकाच त्यांचा होऊन जातो...त्या निर्विकार जिवंत चित्राचा एक भाग बनून जातो...
आत्ता पर्यंत फ़क्त जमिनीच्या वरती दिसणार्‍या झाडाचाच विचार करत होतो. पण अलिकडे जाणवलं की त्याला जिवंत आणि उभं ठेवणार्‍या मुळांचं अस्तित्व तितकच उठावदार आहे...सगळ्यांच्या नजरेआड राहून जमिनीत घट्ट रूजतात, मातीत रुतून तिच्याशी एकरूप होऊन जातात. उद्देश एकच. त्या उभं असलेल्या झाडाला बळकटपणे एका जागी जिवंत राहण्याची ताकद देणे. त्यांना वार्‍यावर झुलणं माहीत नसतं...फ़ळांची चव माहीत नसते...मुक्त हवेत श्वास घेणं माहीत नसतं की मुलांचं अंगाखांद्यावर खेळणं माहीत नसतं...
पण हे सगळं माहीत नसूनही स्वखुषीनी ती मातीत आत आत रूजत जातात...एखाद्या उत्तूंग यश गाठलेल्या मुलाच्या खूप सहनशील आणि कष्ट करणार्‍या आई सारखं. त्या फ़ुललेल्या फ़ुलातला सुगंध, रंगीबेरंगी फ़ुलं, साखरेहून गोड फ़ळं, हिरवीगार पानं ह्या सगळ्यांना जन्म देतात कशाचीच आस न ठेवता...
समजा उलट झालं असतं तर? सगळी फ़ुल, पानं, फ़ळं, फ़ांद्या जमिनीखाली आणि वरती मुळं वाढली आहेत... छे.... खूपच विचित्र चित्र डोळ्यांसमोर येतं एकदम...
देवानी संधी दिलीच तर कुठल्याही झाडाचा वरचा भाग होण्याआधी मला त्याची मुळं होऊन राहणं जास्त समाधानकारक वाटेल...म्हणजे त्या फ़ळाच्या फ़ुलाच्या रूपात उतरताना सहनशीलतेची जाणीव सतत आत कुठेतरी रुजलेली राहील...
पण माणसाचं गणित थोडसं उलटच आहे! तो आधी एखाद्या झाडावरती बसलेलं खेळकर पाखरू होतो...मग कोवळ्या पानातून जगाकडे पहातो...पिकत जाऊन हिरवा गर्द तजेला धरतो...फ़ुलतो...सुगंधीत होतो आणि मग हळू हळू कुणासाठी तरी त्या मुळांसारखं स्वत:ला माती रुजवून दुसर्‍याला फ़ुलवतो...
ह्या मातीत रुजलेल्या मुळांशी थोडसं हितगूज करावं म्हणलं तर आधी त्यांच्या इतकं खोल जाता आलं पाहिजे... मग अगदी दगडालाही छेदून कितीही घट्ट मातीतून वाट काढत तिथवर प्रवास करेपर्यंत केवढ्यातरी गोष्टी त्यांनी न सांगताही कळून येतील...
एका गोष्टीची मात्र मजा वाटते...झाडांची नावं फ़क्त दिसणार्‍या गोष्टींनाच दिली आपण...एकाला आंबा, एखाद्याला पेरू...कधी मोगरा...बकुळी... चाफ़ा आणि अशी किती! पण सगळ्या झाडांच्या मुळांना नाव अशी गोष्टच नाही...ती मुळच फ़क्त आणि त्यातच मुळांचं अनामिक महत्व हरवलयं...


माझ्या घराजवळचं हे झाड...कळशीतुन एक बाई पाणी घालतेय एखाद्या तुळशीच्या रोपाला असा कायम वाटतं मला ते पाहिल्यावर...कदाचित अलिकडे खूप गीतरामायण ऐकतोय म्हणून असेल पण हे असं स्तब्धपणे कमरेत वाकून, मान कलून दोन्ही हातांनी मन लाऊन हे तिचं पाणी घालणं पाहिलं की मला शिळा होऊन पडलेल्या आहिल्येची आठवण होते...वसंताच्या एका झुळुकीच्या स्पर्शाची वाट पाहत बसलेल्या ह्या निष्पर्ण झाडाला पक्षांच्या किलबिलाटांची अन फ़ुरफ़ुरणार्‍या पानांची पालवी फ़ुटेल आणि ते जिवंत होऊन येईल...
मृगजळ आणि इंद्रधनुष्य...फ़रक काय आणि साम्य काय? मृगजळ हे नकारात्मक...खोट्या असणार्‍या गोष्टीबद्दल ओढ असल्यासारखं... आणि इंद्रधनुष्य? प्रकाश....जो स्वत:तच एक सत्य असतो असा... अशा प्रकाशाचे, सत्याचे अंतरंग म्हणजे इंद्रधनुष्याचे रंग...मात्र हे रंग सहजासहजी न दिसणारे...थेंबांच्या आतून प्रवास होतो आणि मग प्रत्येक प्रकाशकिरण स्वत:ला उलगडत जातो...त्या पाण्याच्या थेंबामधून जेव्हा तो जात असतो तेव्हा तो छोटासा प्रवासच पुढची दिशा आणि रंग बदलून जातो... सूर्याकडून कोट्यावधी मैल धावत येणार्‍या प्रकाशरेषांचा आणि आकाशातून जमिनीकडे झेपावणार्‍या थेंबांचा मेळ कुठल्यावेळी कसा बसतो ह्यावर तो इंद्रधनुष्य आकार घेतो...
आणि मृगजळ? तेही खरंतर सूर्याच्याच प्रकाशानी तयार झालेलं पण त्याला एक असत्याची जोड चिकटलेली कायमची...कितीही धावलं त्याच्याकडे तरी हाती न येणारं....
योग्य संधी आणि कष्ट ह्यांचाही मेळ थोडासा असाच....वेळेची, क्षणांची सांगड खूप मोलाची...संधी हुकल्यावर कष्टांची सीमा गाठली, झळीवर झळी सोसल्या तरी पदरात काहीच पडत नाही...मृगजळाच्या पाण्यात कधी इंद्रधनुष्य खुलेल का?
आता थोडसं वेगळं...इंद्रधनुष्य सदैव आकाशात...मृगजळाच्या मागे माणसं धावतात पण इंद्रधनुष्याच्या धरायला कुणी गेल्याचं ऐकलं आहे का कधी? त्याला दुरून न्याहाळण्यात आणि वाहवा करण्यापुरताच सगळ्यांचा उत्साह असतो...पण जे मृगजळाच्या मागे धावताना दिसतात त्यांच्यापैकी एकाला तरी मृगजळाच्या ठिकाणी कदाचीत oasis सापडण्याची ही शक्यता असते...इंद्रधनू जरी सकारात्मक असला तरी तो खरंच काही घेऊन येणारा असतो का?

hmm :-) खरतरं जसा विचार करू तसं दिसू लागतं सगळं...इंद्रधनू काय आणि मृगजळ काय...मनातल्या गोष्टी त्याच्याशी जशा जोडू तसा त्याला अर्थ देऊन जातो आपण....
पुण्यात कोथरूड कडून डहाणूकर कॉलनी पार करून किर्लोस्कर कमीन्स च्या पाठीच्या रस्त्याकडून जायला लागलं की शहराच्या गजबजाटापासून एकदम दूर आल्याचा भास होतो. कमीन्स ला चक्कर मारून मागच्या बाजूला येताना डाव्या बाजूला एक टेकडी लागते...त्याच्यावर बरीच झाडं आहेत... हिवाळ्यात सगळीच निष्पर्ण होतात मात्र वसंत आला की बहर येतो त्यांना आणि त्या ओसाड टेकडीचं वन बनून जातं. ह्याच टेकडीच्या बाजूनी अजून पुढे गेलं की मग महात्मा हौसिंग सोसायटी वगैरे चालू होतं... त्याच्या थोडसं अलिकडे त्याच टेकडीचा भाग अजून विस्तारलेला आहे... इथे ही खूप सारी झाडं आहेत, पण आधीहून वेगळी...दिसायलाच नाही तर अस्तित्वानीही... त्या टेकडीच्या ह्या भागाचं नाव स्मृतीवन... चढायला १५-२० मिनिटं लागेल अशी उंची... तिथल्या गर्द झाडीतून एक पायवाट वरती जाते... वरती जाता जाता दिसणार्‍या प्रत्येक झाडाशेजारी एक एक पाटी दिसते कुणाच्यातरी नावाची... प्रत्येक झाड म्हणजे एक स्मृती आहे तिथे... त्यामुळे त्यांचं अस्तित्व मनात जास्त ठसवून जातं काहीतरी... म्हणलं तर रानवेलीही आहेत थोड्या... अशा ह्या हिरव्या आच्छादातून वाट काढत जायला वेगळच वाटतं... मला तिथे जाऊन आता ४ एक वर्ष उलटली असतील... तेव्हा पुलंच्या नावाचं ही एक रोप नुकतच जन्माला घातलेलं त्या चढाच्या एका वळणावर... एकदा वरती चढून गेलं की मग झाडी संपते आणि मोठे मोठे खडक सुरू होतात... गावातल्या वातावरणापेक्षा गारवाही बराच जास्त असतो...एकदा टेकडीच्या माथ्यावर गेलं की समोर कोथरूड चा सगळा परिसर दिसायला लागतो...फ़ारसं पहाण्यासारखं नसतं कारण दिसतं ते फ़क्त सिमेंट चं जंगल...इथून सुर्यास्त मात्र सुंदर दिसतो... पण सुर्यास्तापर्यंत वाट बघत बसलं की खाली उतरताना मात्र चांगलाच अंधार पडतो...
ह्याच स्मृतीवनात मी एकदा जाऊन आल्यानंतर मनाशी केलेलं गूज...

आज स्मृतीवनात जाऊन आलो...टेकडी चढून जाऊन लांब बघितल्यावर सिमेंटच्या असंख्य इमारतींचं जंगल दिसत होतं... पण मी उभा राहिलो असलेल्या त्या टेकडीला निसर्गत:च इतकी उंची मिळाली होती की त्या माणसानी कष्ट उपसून बांधलेल्या सगळ्या इमारती तिथून अगदीच छोट्या वाटत होत्या...पण तरीही... त्या टेकडीला सह्याद्रीच्या कड्यांची सर नव्हती... आणि सह्याद्रीलाही उगाच गर्व चढू नये म्हणून की काय निसर्गानी हिमालय बनवला... पण एक लक्षात येतं का आपल्या? जितकी उंची जास्त तितका तो मोठा होतोच पण त्याच्याबरोबर त्याची साथ कमी कमी होत जाते...जगात टेकड्या हजारो मिळतील... सह्याद्री सारखे ही बरेच जण आहेत... पण हिमालयाची उंची गाठणारा एखादाच... पण आपल्याला नुसतीच उंची दिसते... हिमालयाला काय वाटत असेल असा विचार मनात येतो आणि कळतं की त्याला त्या उंची बरोबरच मिळालयं एक एकाकीपण... क्वचितच कुणीतरी ती उंची सर करतं पण तिथे काही क्षणांसाठीच राहू शकतं कारण तितक्या उंचीवर टिकून राहणे म्हणजे त्याच्या साठी अस्तित्वाचीच आहुती ठरू शकते... आणि हिमालयाला मात्र आयुष्यभर त्या एकाकीपणाबरोबर रहायला लागतं...
तरीही उंची द्यावी ती निसर्गनीच... माणसानी सपाट मातीवर आयुष्यभर कितीही जरी इमारती बांधल्या...त्यासाठी खूप कष्ट केले तरी नैसर्गिक देण लाभलेल्या माणसाएवढा तो कधीच मोठा होवू शकत नाही... पण ह्याचा अर्थ माणसानी कष्टच सोडून द्यावेत असही नाही ना... तरच तो माणूस म्हणवून घेऊ शकतो...
निसर्ग बोलतो... अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनच भरभरून बोलतो... माझ्या खूप सार्‍या प्रश्नांची उत्तरं देतो....
ह्याचसारखं एकदा कधीतरी लिहिलं होतं तेही खाली लिहितो....

फ़ुलपाखराचा प्रवास हा फ़ुलपाखरा सारखाच राहणार... त्याने जर गरूडाची झेप घेतली तर ते गरूड तर होणार नाहीच पण एकसंध फ़ुलपाखरू ही राहणार नाही... पण एका जिवाचं फ़ुलपाखरू झालं आणि दुसर्‍या जिवाचा गरूड झाला त्यात त्या फ़ुलपाखराचा काय दोष... मग अशा फ़ुलपाखरानी काय करावं?
आपल्याला लाभलेल्या देण्यात पहावं... मग तिथे त्याला कळेल की त्याला मिळालाय प्रत्येक फ़ुलाचा मोहोर... जो गरूड बनून नाही घेता येणार... त्याला मिळालेत दोन नाजूक पंख... ज्यांचा वर्ख बसेल तिथे ते ठेऊन जातं... त्याला मिळालयं लहान मुलांचं आश्चर्य... वातावरणाला रंगीबेरंगी करण्याचं सामर्थ्य... गरूड झेपेची भरारी घ्यायला तसे पंखही उपजतच लागतात... गरूडाचे पंख काढून फ़ुलपाखराला जोडले तर कुठेच काही उरत नाही... माणसाच्या आयुष्याचं ही थोडसं असच... प्रत्येक माणसाजवळ एक उपजत ताकद असते... कुणी उंच भरारी घेतं तर कुणी फ़ुलपाखरू होऊन प्रत्येक फ़ुलातला पराग गोळा करतं... मग इथे फ़ुलपाखरानी गरूडाच्या उंचीसाठी हट्ट धरू नये... कदाचीत त्याच्या पंखांचा वर्खच त्याला एक दिवस गरूडापेक्षाही जास्त उंची देऊन जाईल...
USA . दीड एक वर्षापूर्वी ह्या देशात पाऊल टाकलं. पूर्ण अनोळखी देश, हवामान, ऑफ़ीस मधली लोकं, मित्र सगळेच नवे. इथे येताना "इथे का चाललो" हा विचार तसा होताच मनात (मात्र जाताना "इथे का आलो" असा असेलच असं नक्कीच नाही पण :-) ). इथे आल्यावर थोड्या दिवसातच जे आधी मुंबईच्या ऑफ़ीसात फ़क्त "माहीती" होते त्यांच्याशी मैत्री जमली. ७-८ जणांचा एक मस्त ग्रूप जमला आणि पुढला वर्षभर नुसती धमाल केली. ह्याचं मुख्य कारण म्हणजे सगळेच single त्यामुळे भटकायला अगदीच मोकळे. कुठलाही long wknd आला की ह्यावेळी कुठे जायचं ह्यावर महिन्याभरा आधीपासुन मेल्स चालू व्हायच्या. आता नोकरी बदलली, गाव बदललं, मित्रांना ही रोज भेटता येत नाही. मात्र आमच्या सगळ्याच ट्रीप्स च्या खूप आठवणी जमा झाल्या आहेत आता... वर्षभरापुर्वी कोरं पान घेऊन आलो होतो, खूप छान कोलाज तयार झालाय त्याचा.
कालच सागरच्या एका पोस्टनी न्यू यॉर्कच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आणि त्या मागोमाग इतर ट्रीप्स च्या ही. रंगीबेरंगी सोडून आणखी कुठली जागा असणार हा कोलाज उतरवायला? न्यू यॉर्कची सगळी पोस्ट इकडे हलवून घेतो मॉड साहेबांच्या मदतीनी... खूप उत्साह आलाय आठवणींमधे बुडून जायला.

लवकरच परतीन इकडे आता.
न्यू यॉर्क

जानेवारी २००५ च्या ८ तारखेला अमेरिकेत पाऊल टाकलं. सगळीकडे बर्फ़ बर्फ़ पाहून विमानातून उतरताना खूप मस्त वाटलेलं पण आठवड्याभरातच स्नो ची कौतुकं संपली. कधी एकदा मोकळेपणानी फ़िरू शकतो आता अस झालं काही दिवसातच. असं वाटण्याची आणखी एक गोष्ट म्हणजे अमेरिका फ़िरण्याची हौस. न्यू यॉर्क तर लिस्ट वर कायमच होतं. मार्च च्या एका लॉंग विकेंड ला ठरत आलेली न्यू यॉर्क ट्रीप पोस्टपोन करावी लागली... कारण काय तर फ़क्त एका कडेच ड्राईवींग लायसन्स होतं आणि १४ तासाच्या प्रवासाला एकट्यावर अवलंबून असणे शक्यच नव्हते. माझा मित्र विशाल ह्याला मिळणार होता जायच्या आधी लायसन्स पण नेमका तो त्या attempt मधे फ़ेल झाला आणि मग न्यू यॉर्क ऐवजी शिकागो ट्रीप झाली. मग पुढे महिन्याभरातच आमच्या कडे जवळ जवळ सगळ्यांकडे लायसन्स आले आणि न्यू यॉर्क गाठायला २००५ चा मेमोरियल डे चा लॉंग विकेंड उगवला. सगळेच single असे मुलं मुली मिळून १० जण... २६ मे ला दुपारी सगळ्यांनी २ ला निघून रात्री १ पर्यन्त इसिलीन, न्यू जर्सी ला पोचायचा plan होता. पण निघायला संध्याकाळचे ५ वाजले आणि ओहायो, पेनसिलवेनीया कापत कापत न्यू जर्सी गाठायला दुसर्‍या दिवशी पहाटेचे ४ वाजले. उत्साह खूप असल्यामुळे सगळ्यांनी सकाळी ९ वाजता उठून ट्रेन ची चौकशी करून WTC गाठलं. आधी करून ठेवलेल्या rnd प्रमाणे पहिल्या दिवशी ground zero, statue of liberty आणि times square तर दुसर्‍या दिवशी empire state building, madam tussards museum, central park आणि न्यू यॉर्क च्या स्ट्रीट्स वर भटकणे असं करायचं ठरलं होतं. मी ग्रुपचा official navigator होतो त्यामुळे हातात सतत maps , सगळ्या रस्त्यांची नावांकडे लक्ष ठेवणे, ट्रेन्स च्या वेळा लक्षात ठेवणे आणि सगळ्यांना वेळेत परत संध्याकाळी इसीलीनच्या हॉटेल वर घेऊन जाणे अशी जबाबदारी होती. पहिल्या दिवशी परत जाताना जरा ब्लू लाईन, रेड लाईन चा घोळ झाला... त्यातून होबोकेन च्या डेड एंड स्टेशनावर जाऊन तिथून ट्रेन्स बदलून हॉटेल वर पोचायला ३ तास लागून रात्रीचे २ वाजले... तसेच आम्ही रात्री ११ ला times square वरून निघाल्यामुळे ऑलरेडी उशीर झाला होताच. पण मग दुसर्‍या दिवशी हे सगळं व्यवस्थित पार पडलं. न्यू यॉर्क मधे फ़िरताना काही मुख्य गोष्टींच्या आठवणी... सुरूवात statue of liberty पासून....

statue of liberty एका छोट्याश्या बेटावर आहे. तिथे जाण्यासाठी फ़ेरी घ्यायला लागते. त्याचं तिकीट काढण्यासाठी जी जागा आहे ते म्हणजे broadway चं शेवटचं टोक. broadway म्हणजे nyc चा सगळ्यात छान रस्ता. सगळ्या numbered ब्लॉक्स ना तो perpendicular जातो. ह्याच broadway वरून खाली south कडे जात राहिलं की ती statue of liberty ला जायची खाडी लागते. एक छोटीशी पार्कच आहे ती battery park म्हणून. इथे २ प्रकारच्या फ़ेर्‍या मिळू शकतात. एक म्हणजे ज्या statue of liberty च्या बेटावर जातात तिथे उतरवतात आणि दुसर्‍या म्हणजे नुसतीच बेटाला एक चक्कर मारून(आणखी १ museum ही आहे दुसर्‍या बेटावर) येतात. ह्याला तिकीट लगेच मिळतं. पण जर न्यू यॉर्क ची स्कायलाईन मनसोक्त पहायची असेल तर लाईन मधे उभं रहावं. statue of liberty साठी जितकी प्रतीक्षा करावी लागते तितकं आकर्षक मात्र वाटत नाही तिथे. तिथे जायला फ़ेरी घ्यावी लागते म्हणूनच कदाचित जास्त गर्दी गर्दी होत असेल.
ह्या लाईन मधे उभं असतानाच मला एक म्हातारा "जनं गणं मनं" ची ट्यून वाजवताना दिसला... बराच घोळका ही जमला होता ते कौतुकानी ऐकायला.

न्यू यॉर्क मधे जे प्रेक्षणीय म्हणून जे काही आहे ते फ़क्त manhattan मधेच. बाकीचे बहुतेक भाग ह्याच्याशी compared बकालच वाटतात.

साऊथ manhattan तसं इथे आटपून जातं. empire state च्या छतावर जाण्यासाठी एक आणि त्याचं तिकीट काढण्यासाठी एक अशा २ रांगा असतात. long wknd असला तर दोन्हीत कमीतकमी एक एक तास उभं राहण्याची योगसाधना करावी लागते. इथे जाताना संध्याकाळच्या वेळीच जावं जेणेकरून न्यू यॉर्कचं उजेडातलं सौंदर्य आणि रात्रीची मोहकता दोन्हीही अनुभवता येतं. दिवसा अजून एक गोष्ट इथून अगदी पहाण्यासारखी. ती म्हणजे central park . उत्तरेकडे शहराच्या अगदी मध्यभागी खूप मोठ्या परिसरात फ़क्त झाडी आहे. खुद्द central park मधे जाऊन येण्याचा अनुभव वेगळाच पण empire state वरून ही खूप छान दिसतं हे दृश्य. बाकी चौफ़ेर वेगवेगळ्या इमारती दिसतात. सेंट्रल पार्क कडे तोंड करून उभं राहिलं असलं तर उजव्या हाताला खूप सारे पूल दिसतात. तो brooklyn bridge ह्यामधेच एक आहे.
माझ्या आठवणीप्रमाणे empire state ही 33 आणि 34 ब्लॉक च्या मधे आहे. ह्याच्या पायथ्याशीच ३३साव्या ब्लॉकच्या रस्त्यावर एक अगदी छोटं भारतीयपाकीस्तानी जेवण मिळणारं हॉटेल आहे. तसं अगदीच छोटं आहे आणि फ़ार चकचकीतही नाहीये पण पोटात अगदी कावळे ओरडत असले तर जायला हरकत नाही. पण भारतीय खायचं असेल आणि थोडसं चालायची तयारी असेल तर 53rd ब्लॉक(बहुतेक...१ / २ ब्लॉक अलिकडे पलिकडेही असेल) आणि broadway च्या intersection वरती एक bombay garden म्हणून restaurant आहे छान. पण जर non-indian food ही चालणार असेल तर मात्र भरपूर मिळतील कुठेही

empire state हून खाली उतरल्यावर broadway पकडून जर चढत्या ब्लॉक्सकडे चालायला लागलं की हळू हळू कुठल्यातरी भलत्याच चकचकत्या दुनीयेत प्रवेश करतोय असं होतं... बरोबर १० ब्लॉक्स दूर, 42nd ब्लॉक पाशी broadway चं नाव बदलून Times असं होतं... इथून सुरू होतो तो Times Square . रस्त्याच्या दोन्हीबाजूच्या इमारतींवर मोठ्या मोठ्या धावत्या जाहीराती, प्रचंड गर्दी अश्या सगळ्यानी पुढचे जवळ जवळ ७-८ ब्लॉक्स भरून गेले असतात. इथे जावं ते अंधार पडल्यावरच. सूर्याच्या गर्भ जसा सगळ्यात जास्त तप्त असतो तसा न्यू यॉर्क चा हा चौक इतर कुठल्याही जागेपेक्षा जास्त रंगीबेरंगी आणि रोषणाईत बुडून गेलेला असतो. फ़ूटपाथवर रेंगाळणारे भरपूर tourists आणि रस्त्यांवर सतत traffic jam मधे अडकलेल्या गाड्या. emergency vehicles तर इथे मिनीटाला एक दिसते... ह्याच चौकात एक toys R us आहे भलं मोठं. नेहमीच्या toys R us पेक्षा नवलाईची गोष्टं म्हणजे ह्या दुकानाच्या आत एक giant wheel आहे... खरं खुरं ज्यात बसून गोल गोल फ़िरू शकता(इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते... thinking loud म्हणा हवंतर. US मधे मी कुठलही giant wheel भारतातल्या सारखं वेगानी फ़िरताना पाहिलं नाहिये( orlando, LA चं disney सोडलं तर. शिकागो मधे ही navy pier म्हणून जे ठिकाण आहे तिथल्या giant wheel ला तर paralysis चा attack आल्यासारखं वाटतं इतक्या मंदगतीनी फ़िरताना पाहून... असो) तर ह्या टाईम्स स्क्वेअर वर तुम्ही कितीही वेळ घालवू शकता नुसतं फ़िरत फ़िरत. रात्रीच्या वेळी empire state च्या डेक वरून जर पाहिलं तर हा टाईम्स स्क्वेअर खूप उजळून गेलेला दिसतो. इतका प्रकाश असतो की त्या भागावरचे ढगही चकाकताना दिसतात. broadway च्या पलिकडे जी लेन आहे ती थोडीशी शांत ह्याच्या पेक्षा. आणि तिथल्या रस्त्याच्या दुतर्फ़ा खूप मस्त आणि महाग अशी clothing ची दुकानं आहेत.
टाईम्स स्क्वेअरला जर रात्री फ़िरत असलात आणि हॉटेल NJ किंवा train नी तासाभरावर असेल तर रात्री ९-१० च्या सुमारास परत निघणे बरे. पण हा individual choice आहे. टाईम्स स्क्वेअर च्याच जवळ 40th ब्लॉक मधे madam tussard's wax museum आहे. प्रत्येकी ३०$ देऊन सगळ्या celibrities बरोबर फ़ोटो काढयला मिळतात इथे. दलाई लामांच्या शेजारी गांधीजी आणि त्यांच्या शेजारी आईनस्टाईन असे उभे असलेले दिसतात :-)
न्यू यॉर्क ची मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे central park . 72nd ब्लॉक पासून सुरू होऊन जवळ जवळ पुढचे २०-२२ ब्लॉक्स व्यापणारी आणि रुंदीतर त्याहून जास्त असणारी अशी ही एक आयताकृती पार्क. प्रचंड मोठ्या इमारती, सतत भरून वाहणारे रस्ते ह्याच्या अगदी उलट. जिथे ही पार्क सुरू होते त्या 72nd street वर बर्‍याच घोडागाड्याही(बग्गी) असतात... हे त्याच शहराच्या downtown चं रूप आहे असं वाटत सुद्धा नाही. एकदा पार्क मधे शिरलात की मोठे मोठे वृक्ष, walkways , playgrounds , छोटे lakes अश्या खूप सार्‍या गोष्टी दिसू लागतात. आधीच जर बाकीचं न्यू यॉर्क पाहून झालं असेल तर पायाचा पिट्टा पडलेला असतो चालून चालून... पण इथे चालण्यासाठी थोडी energy नक्कीच राखून ठेवावी. अगदीच थकावट झाली असेल तर सरळ कुठल्यातरी झाडाच्या सावलीत ताणून द्यावी मस्तपैकी. हाताशी पार्कचा map असलेला बरा. तिथे जाऊन जो अनुभव येतो तो सांगता येत नाही. हेच तेच न्यू यॉर्क का असं वाटतं. पार्कच्या साधारण मध्यभागी एक मस्त fountain आहे. (कल हो ना हो मधल्या "कुछ तो हुआ है" गाण्यातला fountain तो हाच). पार्कभर फ़िरताना खूप छान वाटतं. एका lake मधे boating ही करता येतं. boathouse ही आहेच त्याच्याबरोबर. पार्कमधला जो मुख्य रस्ता आहे त्याच्या दोन्हीबाजूला मोठे मोठे वृक्ष आहेत आणि प्रत्येकाला history मधल्या कुणाकुणाची नावं आहेत.(चु. भु. द्या घ्या). अशा जागी रोज जायला मिळालं तर काय बहार येईल असं वाटतं. पार्कच्या डाव्या बाजूच्या गेटपाशी beatle boys मधल्या John Lenon चं एक छोटसं memorial आहे. कुणीतरी माथेफ़िरूनी त्याच्यावर उगाचच गोळ्या झाडल्या होत्या इथे. पार्कचा हा एवढा मोठा परिसर खूपच छान maintain केलाय.
न्यू यॉर्क मधे खास देसी फ़ूडची व्हरायटी हवी असली तर taxi पकडून lexington street वर जायचं. penn station पासून साधारण ७-८$ होतात. न्यू यॉर्क मधे taxi वाले बहुतेक भारतीय किंवा पाकीस्तानी. सरळ हिंदीत गप्पा मारायला सुरुवात करावी :-) एकूणच manhattan च्या कुठल्याही फ़ूटपाथवर वेगवेगळ्या कसरती करून पोटाची सोय करणारी लोकंही दिसतात. साध्या बादल्या उपड्या टाकून त्याच्यावर drums वाजवणारे ही असतात त्यामधे.
जर लहान मुलं बरोबर असली तर एवढं चालणं खरंच शक्य होत नाही. त्यासाठी city tour करणार्‍या छत नसलेल्या बसेस असतात. new york ची सगळी main attractions ती कव्हर करतात. त्याचं booking ही online करता येतं. adult ला ९०$ तर under 12 ला ६५$ च्या आसपास पैसे घेतात ह्या tours . बर्‍याचश्या tours मधे empire state चं तिकीटही included असतं. पण बस मधून फ़िरण्यापेक्षा चालत खूप जास्त जवळून पाहता येतं आणि जास्त enjoy करता येतं हे ही खरं.
अजूनही बर्‍याचश्या गोष्टी राहून गेल्या असतील, न्यू. यॉर्क, NJ मंडळींना सांगता येतील त्या.

माझा अनुभव छानच होता २ दिवस न्यू यॉर्क फ़िरण्याचा, पण मला स्वत:ला न्यू यॉर्क पेक्षाही जास्त शिकागो ची स्कायलाईन आवडली. खूप artistic इमारती आणि जास्त कल्पकता आहे असं वाटतं त्यात. त्यातच chicago river ही शहरामधूनच जाते लेक मिशीगनला मीठी घालायला. जितकं शिकागो मला जास्त आवडलं तितकच ते लिहायला ही आवडेल. लवकरच.
empire state वरून दिसणारा टाईम स्क्वेअर चा हा प्रकाशलेला चौक

शिकागो

एप्रिल २००५ च्या १५ ला गुड फ़्रायडे ची सुट्टी होती आणि त्यामुळे हा माझा यु. एस. मधला पहिला वहिला लॉंग विकेंड होता. जवळ जवळ महिनाभर आधीपासून आमचे न्यू यॉर्क ला जायचे plans सुरू झाले. अगदी न्यू यॉर्क मधल्या सगळ्या जागांची लिस्ट सुद्धा तयार झाली. पण १५ दिवस राहिले असताना ज्यांनी लायसन्स काढतो नक्की म्हणून सांगितलं होतं त्यांना जमलं नाही आणि ही ठरलेली न्यू यॉर्क ट्रीप "नंतर कधीतरी बघू" असं म्हणून पुढे ढकलावी लागली. १ दिवस सगळं cancel झालं ह्या रुसव्यातच गेला. पण मग आता एकच जण ड्राईव्ह करू शकेल पूर्ण वेळ अशी पहिली condition धरून कुठली कुठली ठिकाणं आहेत ह्यावर चर्चा सुरू झाली आणि काही अनुभवी मंडळींकडून शिकागो चं नाव पुढे आलं. लगेच सिनसिनाटी पासूनचं अंतर, तिथलं लॉंग विकेंड चं हवामान आणि हॉटेलचे रेट्स ह्यावर काम चालू झालं.

३ मुली(गुंजन, सुजू आणि ehren ) आणि ४ मुलं(मी, विशाल, अमीत आणि PI (ह्याचं नाव प्रशांत आय्यंगार पण त्याला PI नाव पडलं ते पडलंच. नंतर तर त्याला सगळे जण PI ऐवजी 22/7 म्हणत :-) ) असा ग्रूप होता. सगळ्यांचीच अमेरिकेतली पहिली ट्रीप ही... त्यामुळे नेटवरून माहीती काढत असलो तरीही एकूणच कार बुकिंग, हॉटेल बुकिंग हे सगळं करताना सगळ्यातच एका नाविन्याची excitement होती. सुदैवानी तेव्हा हॉटेलच्या चांगल्या डील्स चालू होत्या आणि आम्हाला 90$/day मधे शिकागो downtown मधल्या Hotel 71 ह्या ४० मजली हॉटेलमधे बुकिंग मिळालं. (पहिल्याच ट्रीपला हे असलं हॉटेल मिळाल्यामुळे नंतर च्या काही ट्रीप्स ना days inn, quality inn, holiday inn अशा हॉटेल मधे रहाताना कससंच वाटत होतं :-) )

आम्ही सगळेच खाण्यातले दर्दी पण मी आणि गुंजन त्यातल्या त्यात कुकिंग सेन्स जरा बरा असणारे असल्याने ट्रीपला निघायच्या दिवशीच्या जेवणापासून परत येईपर्यंत ग्रूपच्या खाण्या-पिण्याची जबाबदारी घेतली. गुरुवारी संध्याकाळी निघून रविवारी परतायचं असा ३ दिवस आणि २ रात्रींचा full span plan होता. अमित हा एकमेव U.S. license मिळालेला असल्यामुळे एकूणच ड्राईवींग आणि directions print करून घेणे हे काम त्याच्यावर गेलं... विशाल हॉटेल आणि खर्चा विषयक सगळं बघणारा होता. सुजू ही ग्रूपची joker . तिच्या बडबडीशिवाय ग्रूप तसा थोडा थंडच असायचा... आणि Ehren सगळ्यांची manager . सगळे जण आपापली कामं नीट वेळेत पूर्ण करत आहेत ना हे बघणं तिचं काम. काहीकाहींच्या रक्तातच managerial skills असतात एक वेगळाच जोश असतो त्यातलीच Ehren . त्यामुळे सगळे तिचं निमूटपणे ऐकतही.

१५ दिवस आधी पासून ऑफ़ीस मधे रोज ट्रीपबद्दल २५ एक इमेल्स तरी असायच्याच. असं करत करत फ़क्त १ दिवस उरला लॉंग विकेंड चा आणि तेव्हाच सुजू कडून एक इमेल आली सगळ्यांना. तिच्या project मधे घोटाळा झाला होता आणि तिचं offshore पूर्ण विकेंड काम करणार होतं आणि त्याच्याबरोबर तिलाही थांबावं लागणार होतं. सगळ्यांचीच तोंडं हिरमुसली झाली. ग्रूप ला अशक्य PJ न्नी भंडावून सोडणारी सुजू नाही म्हणल्यावर आता सगळ्यांनीच cancel करायचं का इथपर्यंतही जोरदार discussion झालं. पण शेवटी तिच्याच आग्रहानी आहे तो plan तिच्या शिवाय continue करायचा असं ठरलं. plan प्रमाणे गुरुवारी संध्याकाळी ६ च्या दरम्यान निघून ५ तासाच्या प्रवासानंतर रात्री १० पर्यंत हॉटेलवर पोचायचं(शिकागो सिनसिनाटीहुन एक तास मागे आहे) अशा plan प्रमाणे निघालो. अमितनी enterprise ची लाल dodge minivan I-275 वर शिकागो च्या दिशेनी घातली आणि आमचा अमेरिकेतल्या पहिल्या वहिल्या ट्रीपची सुरूवात झाली.
ह्या आधी माझ्यावर कधी रस्ते शोधण्याचा किंवा navigation करण्याचा प्रसंग असा फ़ार आला नव्हता. शिकागो च्या ५ तासाच्या प्रवासात मात्र हे पूर्णपणे बदलून गेलं. निघताना मी अमीत शेजारी पुढच्या सीटवर बसलो आणि हातात U.S चा atlas आला... त्याचबरोबर mapquest.com वरून घेतलेल्या Cincinnati to Chicago directions चे print outs ही होते. हळू हळू मला ते करणं आवडायला लागलं, कागदावरती सांगितलेल्या रस्त्यांची नावं खरोखरची दिसल्यावर जो काही आनंद व्हायचा सुरूवातीला तो मी सांगू शकत नाही. :-)

अमीतला गाण्याची आणि गिटार वाजवण्याची खास हौस. त्यामुळे प्रवासात CDs ची अजिबात कमी नव्हती. आणि त्याबरोबर जुनी हिंदी गाणीही रंगत होती. ह्याबरोबर पूर्ण ड्राईव्ह भर बहुतेक वेळा माझा map चा अभ्यासही चालला होता. आत्ता पर्यंत शिकागो माहीत होतं ते इतिहासातल्या पुस्तकात स्वामी विवेकानंदांनी भारताला represent केलेल्या धर्म परिषदेमुळेच. बाकी शिकागो ची तशी फ़ारशी ओळख नव्हतीच. windy city अशी एक नव्यानी ओळख झालेली अमेरिकेत आल्यापासून. आता प्रत्यक्ष अनुभवताना अनेक नव्या गोष्टी कळणार होत्या. Illinois state हे अमेरिकेतलं north central state ... ह्या राज्याच्या दक्षिणेला वसलेलं आणि लेक मिशिगन च्या पश्चीम तिरावरचं हे शहर... लेक कसला छोटा समुद्रच तो. ११८ मैल रुंदीचा आणि साधारण ३०० मैल लांबीचा हा अवाढव्य लेक. शाळेत great lakes मधे शिकलेल्यातला एक. ह्या लेक बरोबरच शहराच्या अगदी core downtown मधून जाणारा आणखी एक पाण्याचा प्रवाह म्हणजे शिकागो रिव्हर. पुण्यात जसे मुठा नदीवर थोड्या थोड्या अंतरावर पूल आहेत तसेच इथेही जवळ जवळ प्रत्येक १००-१५० फ़ुटांवर पूल आहेत. जितक्या इमारती दिसत होत्या त्या प्रत्येकात एक वेगळीच आर्ट. प्रत्येकाचा वेगळा इतिहास. नवं काहीतरी बघायला मिळणार खास हे ठाऊक झालेलं आत्तापर्यंत.

सिनसिनाटी तसं शांत शहर, फ़ार गर्दी आणि traffic नसणारं. शिकागो जसजसं जवळ येऊ लागलं आणि Indiana state मधून जसे आम्ही Illinois मधे शिरलो तसे वाटेवर खूप वेगवेगळे freeways येऊन मिळू लागले. शिकागो चं वारं लगेच कळालं. रात्रीच्या १० वाजता गगनचुंबी इमारती म्हणजे काय ते दिसू लागलं. त्यात अजुनच रात्रीच्या अंधारात फ़क्त दिव्यांमुळे अजूनच जास्त सुंदर दर्शन होऊ लागलं. तोंडातून "वा! काय मस्त आहे हे!!!" असे उद्गार न कळताच निघून गेले. ह्या सगळ्या इमारतींमधून रस्ता काढत काढत आमचं हॉटेल सापडलं. East Wacker Drive वरचं हे हॉटेल म्हणजे एक ४० मजली इमारत होती. रस्ता ओलांडल्यावर समोरच एक शिकागो रिव्हर वर छोटासा पूल होता... आजुबाजूला ही तितक्याच उंच इमारती... पण प्रत्येकाची ठेवण निराळी. हॉटेल मधे जायचं राहून आम्ही आजूबाजूलाच बघत बसलो कितीतरी वेळ. पुलाच्या पलिकडे २ उंच गोल वेटोळ्या इमारती होत्या ज्याचे खालचे १० मजले फ़क्त पार्कींग होतं. ठोकळ्यासारख्या अश्याच इमारती पाहिलेल्या पण ह्यात काहीतरी वेगळच होतं हे मात्र खरं.
बराच उशीर झाला होता बाहेर टाईम पास करेपर्यंत आणि आता पोटात कावळे ओरडायला सुरूवात झाली होती. त्यामुळे मग हॉटेल मधे पटापट checkin केलं. ते हॉटेल पाहिल्या पाहिल्याच असं वाटत होतं की ह्याच्या सगळ्यात वरच्या मजल्यावरच्या रूम्स मिळाव्यात. अगदी एकदम वरच्या नाही पण ३४ व्या मजल्या वरच्या रूम्स मिळाल्या. इतक्या उंची वरती कधी गेलोही नव्हतो आणि इथे तर ३ दिवस इतक्या उंचीवर रहायलाच मिळत होतं. (मधेच क्षणभर जरा भिती ही वाटलेली एवढ्या उंच रहायचं म्हणल्यावर) :-)
त्या दिवशी इतक्या उशीरा पोचल्यावर गुंजन च्या एका शिकागो स्थित मित्राच्या ओळखीनी त्याच्याबरोबर एका पाकिस्तानी रेस्टॉरंट मधे गेलो. तेव्हा भारत पाकिस्तान क्रिकेट matches चालू होत्या आणि पहिल्यांदाच तेंडुलकर आऊट झाल्यावर इतक्या खुषीनी नाचणारी लोकं पाहीली! हे असं anti-india feeling पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहत होतो. जेवणापेक्षा तिथून कधी निघतोय असं झालं.
इतके दिवस जे शिकागो शिकागो करत होतो ते दुसर्‍या दिवशी पहायचं ह्या विचारातच हॉटेल वर येऊन झोपलो. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर आमचं स्वागत शिकागो मधल्या स्नो फ़ॉलनी होणार आहे ह्याची कल्पना देखील नव्हती.
दुसर्‍या दिवशी सकाळी ८ च्या सुमारास जाग आली. सहज खिडकीतून पाहिलं तर स्वच्छ पांढर्‍या कापसाच्या तुकड्यांसारख्या स्नो नी सगळं आकाश भरून गेलं होतं. ३४ व्या मजल्यावरून हे दृश्य जरा वेगळच दिसत होतं... समोरच्या सगळ्या इमारतीही खूप अस्पष्ट दिसत होत्या त्यामुळे. तरी खाली रस्त्यावर बर्फ़ फ़ारसा साठला नव्हता. पटापट सगळ्यांना उठवलं. वेदर पाहिलं होतं तसं यायच्या आधी, इतकं ही वाईट नव्हतं. पण आता समोरच हे असं दिसायला लागल्यावर "झालं... बसा आता" असं झालं दोन क्षण. काही इलाज नसल्यामुळे आम्ही आमचं आवरून होईपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. तासाभरात सगळ्यांचं आवरून झालं. सिनसिनाटीहून नेलेल्या मायक्रोवेव्ह मधे इडली सांबार चा नाष्टा झाला. आकाशातल्या स्नो चा पसारा आता जरा बराच कमी झाला होता. खाली रस्त्यांवरची वर्दळ ही वाढलेली दिसत होती. आता स्नो असुदे नाहीतर पाऊस... आलोय तर बाहेर जायचंच असं ठरवून निघालो. विंटर jackets चढवली आणि ३४ व्या मजल्यावरून लिफ़्ट खाली घ्यायला सुरूवात केली.

हॉटेलच्या बाहेर आल्यावर आभाळ बरचसं मोकळं झालेलं... आणि सुदैवानी मग ते पुढचे तीनही दिवस तसंच राहिलं. थंडी मात्र काकडवणारी होती चांगलीच. एप्रील असूनही विंटरचा जोर बर्‍यापैकी होता. काल रात्री पाहिलेला हा downtown चा भाग दिवसा पूर्ण वेगळा वाटत होता. त्या नदीवरच्या पुलाची बांधणी खूपच भक्कम आणि दगडी आहे असं बघूनच कळत होतं. रस्त्यावरती ही बर्‍यापैकी वर्दळ होती... सिनसिनाटीला पब्लिक ट्रांस्पोर्ट काहीच नाहिये. त्यामुळे बसेस, ट्रेन्स पाहून मला ४-५ महिने होऊन गेले होते. त्याची पूर्ण भरपाई होणार होती २ दिवसात.

शिकागो मधे "पहावित" अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी आम्ही मग २-३ दिवसात कुठल्या दिवशी कुठली पहायची हे आधीच ठरवून टाकलं होतं. सगळ्यात पहिलं होतं लीस्ट वर ते shedd aquarium . कुठल्याही शहराच्या downtown मधे जो पार्किंग चा प्रॉब्लेम असतो तितकाच इथेही होता. त्यामुळे आमची minivan हॉटेलच्याच पार्किंग मधे ठेऊन बस आणि ट्रेननीच हिंडायचं असं ठरवलं. हॉटेलच्या समोरच एक बस स्टॉप होता... तिथे जाऊन जरा चौकशी केल्यावर shedd aquarium पर्यंत जाणारी एक बस आहेच असं कळाल्यामुळे त्याची वाट पाहत बसलो. १५-२० मिनिटातच ती आलीही. मुंबईतल्या BEST मधून सकाळी ९ वाजता दरवाजात उभं राहून जाण्याची सवय मला... अमेरिकेतल्या ह्या बंदीस्त AC बस मधे बसणं जरा नाही खूपच वेगळं वाटत होतं. ह्या बिनकंडक्टरच्या बसमधे ड्राईव्हर शेजारीच असणार्‍या तिकीट काढायच्या मशीन मधून तिकीट घेताना ड्राईव्हरचं "सुटे पैसे असले तरंच या" असं ऐकताना खूप मजा वाटली. ते वाक्य ऐकल्यावर जसं गावात वाढून शहरात गेलेल्या माणसाला गावाकडची गैरसोय सुद्धा आपलीशी वाटते तसं झालं. मुंबईच्या कंडक्टरनी मला ह्यावरून बराच पिडलेला होता. पण मुंबईचे कंडक्टर सुद्धा इतकी खळखळ करणार नाहीत इतका वैताग आम्हाला पुढे शिकागोच्या बसच्या ह्या "सुटे नसले तर चढू नका" पॉलीसीनी आणला. आम्ही सगळेच "बस" मधे बसल्यामुळे इतके चेकाळलो होतो की ती बस आपल्याच मालकीची आहे अश्या प्रकारे जिथे तिथे बसून फ़ोटो काढत होतो :-) थोड्याच वेळात बस shedd aquarium पाशी येऊन थांबली. जाताना मात्र शिकागो चं सुंदर दर्शन घडत होतं. Michigan Avenue हा शिकागो downtown मधला सर्वात गजबजलेला रस्ता. दोन्ही बाजुंनी खूपच उंची दुकानं, फ़ूटपाथ वरून फ़िरणारे खूप सारे लोक... त्यातले बहुतेक tourists च असावेत कारण इतक्या निवांतपणे चालत चालत रमत गमत त्यांचही शिकागो दर्शन चालंलय असं वाटत होतं.
Shedd Aquarium मधे शिरण्या आधी त्याच्या बाहेरच खूप सहज वेधून घेईल अस दृश्य दिसलं. शिकागो ची पूर्व बाजू मिशिगन लेक च्या किनार्‍यानी पूर्ण व्यापलिये. बहुतेक किनारा सरळ एका रेशेत आहे पण मधे मधे जमिनीचे काही भाग थोडेसे आत शिरलेत. त्यातलाच १ भाग म्हणजे Shedd Aquarium आणि Adler's Planetarium जिथे आहेत तो. आणि दुसरा म्हणजे नेव्ही पियर. गोव्याचा दोना पॉला पाशी जसा काही भाग पाण्यात शिरलाय किंवा अगदी आपल्याकडे सह्याद्री मधल्या बहुतेक किल्ल्याची माची जशी एकदम निमुळती होऊन दूरवर गेलेली असते तसे हे २ भाग पाण्यात शिरल्या सारखं वाटतात. Adler's Planetarium हे ह्या भागाच्या अगदी शेवटच्या टोकावर आहे तर Shedd Aquarium अलिकडच्या भागावर. हा भाग आपल्या मरीन ड्राईव सारखा वाटतो. थडाथड लाटा येऊन आदळत असतात आणि जरा वाकून पाहिलं तर खोल पाणी. पण हे पाणी वाकून पहावं असंच आहे. निळं शार पाणी पण त्या निळ्या रंगाच्या शेड मधे वेगळीच छटा दिसते. कुठेच इतका नितळ निळा रंग पाहिला नव्हता... समुद्राचा रंग वेगळाच असतो... इथे समुद्राच्या लाटा असल्या तरी लेकची नितळता होती. आणि लेकची व्याप्ती खूपच मोठी असल्यानी क्षितिजापर्यंत हा रंग पसरला होता. तिथल्या किनार्‍याला कठडाही नाहिये. वार्‍याचे झोतच्या झोत येत होते अंगावर... आणि सांगायला नकोच... वार्‍यानी थंडी अजूनच जास्त जाणवत होती. तिथेच जरा वेळ रेंगाळून -- इथे मात्र एक गोष्ट सांगावीशी वाटते... बहुतेक वेळेला मी एखादी गोष्ट पहायला गेलो आणि तिथे ती गोष्ट सोडून अजूनच अप्रतीम असं काहीतरी नजरेस पडलंअय असं कित्येक वेळा होतं... कुठल्याही अशा गोष्टीचा ती फ़क्त छान आहे म्हणुन नाही तर ती छान आहे हे आश्चर्यानी कळण्यात जास्त आनंद मिळतो -- लेकचा बोचरा वारा शेवटी जरा जास्त झाला आणि आमचा मोर्चा Shedd Aquarium कडे वळला. तिकीटाच्या लाईन मधे उभं राहून काऊंटरपाशी पोचलो आणि ६०$ चे सिटी पासेस घेतले. ह्यात शिकागोतली ६ प्रेक्षणीय स्थळं कव्हर्ड होती Aquarium सकट. Aquarium पाहण्यात जवळ जवळ पुढचे ३ तास गेले... छोट्या छोट्या नाजूक माशांपासून, सी. हॉर्स सारखा लाजाळू प्राणी आणि लाल, हिरव्या बेडकांपासून २० फ़ुटी व्हेल ही पाहिले. पण सगळ्यात आवडून गेला तो डॉलफ़ीन शो. अशक्य कसरतींचं प्रात्यक्षिक करून दाखवतात हे डॉलफ़ीन्स... मला तर त्यांच्या चेहर्‍यावर कायम एक गोड हास्य आहे असं वाटतं. डॉलफ़ीन्स बरोबर त्यांच्या ट्रेनर्सचंही तितकंच कौतुक करायला पाहिजे... एकाहून एक प्रात्यक्षिकं डिसाईन करण्यात त्यांनी पूर्ण कौशल्य पणाला लावल्याचं जाणवत होतं.

एवढं होईपर्यंत भुक सगळ्यांनाच लागली होती. तिथेच खाणं आवरलं आणि परत जायच्या बस ची वाट पाहत थांबलो. बसमधून aquarium ला येताना शिकागो downtown चं दर्शन थोडंफ़ार घडलंच होतं... त्यामुळेच ते सगळं आता चालत चालत फ़िरून पाहण्याची खूप हौस आली होती. बसनी मधेच एका स्टॉप वर उतरलो आणि मिशिगन avenue वर चालू लागलो... फ़क्त मिशिगन avenue च नव्हे तर अजूनही आतल्या बर्‍याच रस्त्यांच्या बाजुंना खूप इमारती होत्या. त्या प्रत्येकात अशी वेगळी जादू असल्या सारखी होती. त्यांचं लक्ष वेधून घेण फ़क्त त्या उंच आहेत म्हणुन नाहीत(ते न्यू यॉर्क मधे) तर उभ्या असलेल्या प्रत्येक इमारतीत स्वत:चा असा एक वेगळा grace होता. मुंबईच्या फ़ोर्ट मधल्या सारखी एखादी भक्कम दगडी तर एखादी पूर्ण काचेची, एकाच्या अगदी टोकावर एक छानसा पुतळाच बसवला होता. क्वचितच कुठलीतरी ठोकळ्यासारखी होती. पण इथे जन्मणारी प्रत्येक इमारत शिल्पकाराच्या शिल्पाला शोभेल अशी वाटत होती. इमारत फ़क्त इमारतच नाही राहत मग ती... कुणीतरी जीव ओतून काहीतरी केलं की त्या कलाकृतीत त्याचा जीव उतरलेला दिसतोच दिसतो आणि त्यामुळे ती जिवंत आहे... बोलतेय आपल्याशी असं वाटतं. प्रत्येकात तसं काहीतरी आहे असं वाटत होतं. त्यातलीच एक निळ्या काचांची मान ९० कोनात वरती केली तरी नीट दिसत नव्हती. सियर्स टॉवर... सियर्स टॉवर त्याचं नाव. सध्या जगातली उंचीच्या क्रमांकात ३ रा क्रमांक लागत असलेली ही इमारत.
फ़क्त इमारतीच नव्हेत तर त्यात अजून भुरळ घालणारी गोष्ट म्हणजे downtown च्या बरोबर मधून वाहत जाणारी शिकागो रिव्हर. छोटे छोटे पुल आणि दोन्ही बाजुंना अश्या दिव्य कलाकृती. ह्यातच एक "अ ज स्त्र" ह्या शब्दांनीच सांगता यावी अशी... merchandise mart नावाची. ह्याची उंची फ़ार नाही(तरी २० एक मजले असतील) पण पाहून खूप huge वाटावी अशी... एखादा दणकट आणि पिळदार शरीराचा पैलवान समोर उभा रहावा तसं वाटत होतं... इतकंच काय तर ह्याच्या दुसर्‍या की तिसर्‍या मजल्यावर रेल्वे स्टेशन आहे आणि रेल्वे त्याच्या मधून जाते अशी discovery आम्हाला नंतर झाली.

शहराच्या बांधणीत गुंगलो असताना आणखी एक मजेशीर गोष्ट दिसली... ती म्हणजे शिकागो शहरात प्रवास करण्यासाठीच्या ट्रेन्स. ह्यात थोडसं हसू येण्यासारखी गोष्ट अशी की ह्या सगळ्याच रस्त्यांच्याबरोबर वरून धावतात. खालून बसेस, कार्स जात आहेत तर त्याला अगदी parallel ५०-६० फ़ुटांवर ट्रेन्स धावत आहेत हे दृश्यच "अरे हे काय आहे" असं वाटणारं होतं. :-) त्यातून मग त्यांचे routes काढणं आलं आणि शिकागो downtown मधेच ४ वेगळ्या वेगळ्या लाईन्स धावतात असं कळालं. मुंबई मधे जसं वेस्टर्न, हार्बर आणि सेंट्रल अश्या लाईन्स आहेत तश्याच इथेही. फ़क्त इथे त्यांना सरळ रंगांची नावं दिली होती. ब्राऊन लाईन, ग्रीन लाईन रेड लाईन अशी नावं असणार्‍या ह्या ट्रेन्स ना आपल्या दादर सारखं एक कॉमन ठिकाणही होतं. हे म्हणजे "शिकागो लूप". चारी लाईन्स ह्या लूप मधे फ़िरून वेगवेगळ्या दिशेंना जातात. बस मधून फ़िरण्यात जितकी मजा आली तितकीच ह्यातूनही. एकूणच शिकागो मधे हे असं फ़िरायला खूप छान वाटत होतं कारण तिथे फ़िरणारी बरीच माणसं, रस्त्यांवर गर्दी असली तरी कुठेच घाई गडबड नव्हती. रस्त्यांवरून धावणार्‍या गाड्या मात्र अधून मधून नियम बिंधास्त तोडत होत्या. "जागा दिसली की घुसव गाडी" ह्या तत्वावर बराच traffic चालू होता. पण ते बघणं ही आम्ही enjoy करत होतो... मजा वाटत होती ह्याची जरा इथे बघायला.

फ़िरत फ़िरतच संध्याकाळ होत आली होती पहिल्या दिवसाची आणि खूप ऐकुन असलेल्या Mini India ( Devon Street ) चे वेध लागले होते... जास्त करून पोटासाठीच.



shedd aquarium च्या इथलं लेक मिशिगनचं पाणी आणि जवळ जवळ उड्या मारायला तयार असणारे आम्ही...




हेच ते महाकाय merchandise mart ...
शिकागो ला जाण्याआधी शिकागो ला जाऊन आलेल्या ज्या ज्या माणसाशी बोललो होतो त्याच्या तोंडून डेवॉन स्ट्रीट हे नाव आवर्जून ऐकलं होतं. भारतीय खाण्याची चंगळ करून घ्यायची असेल तर ह्या ठिकाणी जाणं भागच आहे असंही ऐकुन होतो. त्यामुळे शिकागो मधली सगळी जेवणं ही डेवॉन वरंच करायची हे पक्क होतं.
शिकागो downtown पासून डेवॉन ला जायला साधारण अर्धा तास लागतो. तसा मुख्य शहरापासून दूरच आहे म्हणलं तरी चालेल. पहिल्या दिवशी जाताना १ ट्रेन आणि एक बस असा प्रवास करून तिथे गेलो. नंतर कळालं की इथे कार घेऊन येणं जास्त सोयीचं होतं.

ह्या जागेला डेवॉन स्ट्रीट म्हणत असले तरी त्याचं खरं नाव डेवॉन avenue आहे. तसा हा रस्ता खूपच मोठा आहे पण त्याचा काही भाग अमेरिकेनी भारत आणि पाकिस्तान ला भेट दिलाय की काय असंच वाटतं. न्यु जर्सी ची गोस्ट वेगळी तिथे तर खरा खुरा भारतच आहे असं वाटतं. पण इथे असा एकच रस्ता जास्त असल्यामुळे त्याचं जरा जास्त अप्रुप. डेवॉनच्या एका चौकापासून विरुद्ध दिशेंना २ उपनाव आहेत. त्यातला एक "गांधी मार्ग" तर दुसरा "मोहम्मद अली जिना" मार्ग. अजब वाटतं अश्या २ पाट्या एकमेकांना लागून असलेल्या पहाताना. त्याहीपेक्षा आपल्याला M.G. Road भारतात कुठे ही पहायला मिळतो पण दुसरं नाव जरा अशक्यच. रस्त्याच्या नावांप्रमाणेच दोन्हीकडची वर्दळ आणि दुकानं ही भारतीय आणि पाकिस्तानी छापाची. साऊथ इंडियन पासून उत्तर भारतातल्या कुठल्याही प्रकारच्या चवीचे पदार्थ असलेली रेस्टॉरंट्स... त्यातच एक Sukhadia's म्हणुन आहे ते खास चाट आणि तत्सम पदार्थांसाठी एकदम प्रसिद्ध. भेळ, पाणी पुरीवाल्या गाडीवाल्याची किम्मत ही सारसबागेच्या बाहेर बसून पाणी पुरी खाताना कळत नाही तर त्याच्या पासून इतक्या दूरवर येऊन शिकागो मधल्या अश्या एखाद्याच रस्त्यावर असणार्‍या दुकानात गेल्यावर कळते. आम्ही तिथे चाप चाप चापलं हे सांगायला नकोच. रस्ते ही अगदी खास देसी वळणाचे. प्रचंड गर्दी आणि दोन्ही फ़ुटपाथ भरून वाहणारे. त्यात गोरा माणूस क्वचितच दिसणारा. कुणाशीही जाऊन हिंदी मधे संवाद चालू करावा. फ़क्त खाण्याचीच जागा नाही तर इतरही बरीच दुकानं आहेत आजुबाजुला. अगदी लक्ष्मी रोड वरच्या "शर्मीली" च्या काचेत बाहेर जश्या मॉडेल्स लावलेल्या असतात तश्या मॉडेल्स ही दिसतात चुडीदार आणि साड्या नेसवलेल्या. त्यातच एखादं दुकान पितळ्याच्या समईंनी सजलेलं आणि कोरीव वस्तुंनी भरलेलं ही दिसतं. मी नुकतीच कार घेतली होती त्यामुळे त्यात लावायला एक छोटासा गणपती घेतला तिथून. गांधी मार्ग सोडून पलिकडच्या जिनाह मार्गावरही एक चक्कर टाकली. तिथल्या रेस्टॉरंट्सच्या नावावरूनच इथे "व्हेज पाहिजे" म्हणलं तर फ़क्त पाणी मिळेल हे कळत होतं. बाहेर रस्त्यापर्यंत घमघमाट सुटलेला. आम्ही मग मैसूर woodlands नावाच्या एका हॉटेलात साऊथ इंडीयन थाळी खाल्ली. १३$ ला एका नाही तर जवळ जवळ ३ माणसांना पुरेल अशी थाळी होती! पुढची सगळीच जेवणं मग डेवॉनवर पार पडली. त्यातच गुंजन ला ती आत्या झाल्याची खुषखबर मिळाली त्यामुळे तिची एक पार्टीही तिथेच झाली. आम्हा सगळ्यांनाच खाण्याचा मनापासून शौक. कित्येकदा सिनसिनाटी च्या "उडीपी" मधे गेल्यावर एका मागून एक ऑर्डर देताना शेवटी तो विचारायचा... एव्हरीथिंग फ़ॉर हीयर ऑर टू गो? :-) आमचं कायम "फ़ॉर हियर"च अस असतं. नंतर नंतर त्याला ही सवय झाली. त्यामुळे डेवॉनवरती हे सुख आम्ही पुरेपूर मिळवलं.

धो धो खाऊन झाल्यावर परत बस, ट्रेन करत आमच्या हॉटेल 71 मधे परतायचं होतं. ट्रेनचा आम्हाला हवा होता त्या स्टॉपच्या आधीच आम्ही चुकुन उतरलो आणि बाहेर platform वर येऊन पाहतो तो काय... एका इमारतीतच शिरलो होतो. तीच ही merchandise mart . रात्रीच्या १० वाजता हे सामसूम स्टेशन पाहून जरा घाबरलो ही होतो. तिथुन बाहेर आलो आणि मग ४ रस्त्यांपलिकडचं आमचं हॉटेल दिसल्यावर हुश्श झालं. एका अर्थी आम्ही चुकीच्या स्टेशन वर उतरलो ते बरंच झालं. तिथुन चालत जाताना शिकागो रिव्हरवरच्या त्या छोट्या छोट्या पुलांवरून जाताना आणखीन एक सुंदर दृश्य दिसलं. आजूबाजूला downtown च्या त्या सगळ्या इमारटी वेगवेगळ्या लाईट्स मुळे अजूनच छान दिसत होत्या. आणि ह्या सगळ्यांचं प्रतिबिंब त्या नदीत उतरलं होतं. त्यातली एक इमारत सकाळी साधी वाटली होती ती रात्रीच्या वेळी त्याच्या वरच्या भिंतींवरती वेगवेगळ्या प्रकाश योजनेमुळे एकदमच वेगळी भासत होती. हे सगळं चालू असताना रस्त्यावर तस कुणीच नव्हतं. दिवसा गर्दी खेचणारा मिशीगन avenue ही शांत होता. सिग्नलच्या कोपर्‍यावर १-२ भितीदायक लोकं ही भीक मागत उभी होती. आमचा मोठा घोळका असल्याने फ़ारसं घाबरलो नाही तरीही लवकरात लवकर हॉटेल गाठलं. एवढं सगळं फ़िरून झाल्यावर मस्त झोप लागली.

सकाळी उठून, aquarium मधे घेतलेल्या सिटीपास मधे आणखी कुठल्या कुठल्या जागा आहेत ते पाहिलं. hancock observatory नावाचं काहीतरी त्यात होतं जे सगळ्यात जवळ वाटत होतं. east wacker drive हून मिशिगन avenue वरती चालत चालत निघालो. कालच्या सारखीच परत गर्दीही होतीच. ह्यातच एक मजा झाली. आमच्यातल्या PI - प्रशांतला फ़ोटो काढायचा उत्साह प्रचंड. एखादी खार जरी झाडावर दिसली तरी तो तिथे तासभर थांबेल. शिकागो सारख्या शहरात फ़िरताना त्याची काय अवस्था झाली ते विचारूच नका. पण त्यामुळे व्हायचं काय की आम्ही कुठे तरी जात असलो की हा कुठेतरी मागेच थांबायचा फ़ोटोग्राफ़ी करत आणि चक्क हरवायचा. मग त्याला शोधण्यात तास तास ही जायचा :-) असाच मग हा ह्या hancock observatory च्या रस्त्यावरती कुठेतरी हरवला आणि त्याला शोधून एकाच्या हाताला गच्च बांधूनच पुढे चालू लागलो.

मिशीगन avenue वरची ही hancock observatory ८८ मजले उंच. लिफ़्टनी वरती जाताना कानाला चांगलेच दडे बसत होते. ह्याची एक बाजू लेक मिशिगनला फ़ेसिंग आहे. वरती गेल्यावर खालून नितळ दिसणारा लेक मिशिगन वरून जास्तच नितळ आणि शांत भासत होता. काल न दिसलेली आणखी एक गोष्ट इथून दिसली. lake shore drive ... हे त्या रस्त्याचं नाव. लेक मिशिगन च्या काठानी खूप मोठ्या लांबीचा हा रस्ता. आपल्या मरीन ड्राईव्ह सारखाच पण खूपच लांब. आणि तो असा इतक्या उंची वरून पहायला मस्त वाटत होतं. हीच गोष्ट सियर्स टॉवरची. शिकागो मधलीच नव्हे तर जगातली सध्याची ३ क्रमांकाची उंच इमारत ही. ११० मजली. फ़क्त ३.५ वर्षात बांधून पूर्ण झालेली. अमेरिकेत Sears ह्या कंपनी ची खूप मोठी चेन आहे. साधारण १९७३ साली त्याच्या मालकाच्या डोक्यात आलेल्या कल्पनेचं हे मूर्त रूप. बाहेरून पूर्ण नीळ्या काचांनी आणि वरती गेल्यावर शिकागो शहर आणि लेक मिशिगनचा "नेत्रसुखद" की काय ते म्हणता येईल असंच दर्शन घडवीणारी. hancock observatory वरती आम्ही दिवसा गेलो तर sears tower वरति रात्रीच्या वेळेला. शिकागोचं असं प्रत्येक दर्शन नवं नवं होतं.

उरलेले दोन्ही दिवस मग ट्रेन, बस सोडून सरळ dodge minivan काढून lake shore drive वरती long drive चा आनंद घेत डेवॉन ला गेलो. नंतर पाहिलं ते नेव्ही पियर. navy pier म्हणजे लेक मिशिगनवरचं बंदर. पुर्वी इथे सामान वाहतुक होत होती. आता ही होते पण त्यापेक्षा आता एक पर्यटन स्थळ म्हणुन जास्त प्रसिद्ध. छोट्या मुलांसाठी तिथे खूपच entertainment होती. एक मोठं giant wheel ही होतं खूप हळू चालणारं. ते बहुतेक शिकागो चं असं वरून दर्शन घेता यावं म्हणूनच इतक्या हळू चालत होतं. आपल्या कडच्या giant wheels सारखं माणसांना गरा गरा फ़िरवण्यासाठी हे नसावं बहुतेक. इथेच २ वेगवेगळ्या cruises ही होत्या. एक लेक मिशिगन मधे जाऊन फ़िरवून आणायची तर दुसरी शिकागो रिव्हरच्या पात्रातून downtown मधे फ़िरवून आणणारी architecture tour . आम्ही शिकागो रिव्हर मधली cruise घेतली. थंडी तशी चांगलीच होती पण तश्यातही deck वरती उभ रहायला मस्त वाटत होतं. २ दिवस बघत होतो ते सगळं तासाभरात नदीतून फ़िरून पाहत होतो. cruise चा guide शहराचा इतिहास सांगत होता. एकुणच बर्‍याच दिवसांनी असं बोटीतून फ़िरायला छान वाटत होतं. PI ला आता बोटीवर कुठे हरवणार नाही म्हणून फ़ोटो काढायला मोकळा सोडला होता :-)

आता २-३ museums बाकी होती. पैकी एक adler's planeterium होतं. मुंबईतल्या nehru planeterium सारखंच होतं हे ही. मात्र इथली एक गोष्ट कायम लक्षात राहील. आतल्या डोम मधे जाऊन बसल्यावर जेव्हा वरती virtual आकाशात ग्रह तारे दिसू लागले, तेव्हा तिथल्या AC मुळे आणि २-३ दिवस पायपीट करून थकून गेल्यामुळे जी काही झोप लागली ती तो शो संपून लाईट लागल्यावरच जाग आली :-) ही स्थिती माझीच नव्हे तर आमच्या सगळ्यांचीच. त्यामुळे पुन्हा कधी शिकागोला येणं झालं तर ही झोप घ्यायला का होईना इथे नक्की यायचं असही वाटलं. :-)

तिसर्‍या दिवशी संध्याकाळी ६ च्या सुमारास ३४ व्या मजल्यावरून परत सगळे जमिनीवर आलो. शिकागो शहर तर खूप enjoy केलं होतंच पण त्याच्याबरोबर आमच्या ग्रुपचं रसायन ही छान जमून आलेलं होतं. प्रत्येक आठवणीत फ़क्त क्षण नाही तर बरोबरीचा प्रत्येक जण होता... म्हणूनच हे शिकागो अजूनच सुंदर वाटलं.

रात्री सिनसिनाटीला येताना खूप जोराचा पाऊस लागला... अमितचं ड्राईव्हींग मात्र throughout झकास होतं. रात्री १२ च्या सुमारास सिनसिनाटीला घरात पोचलो.
ह्या सगळ्याच आठवणी त्यानंतर फ़क्त काही दिवस, आठवडे नाहीत तर अगदी आत्ता ह्या क्षणापर्यंत तितक्याच ताज्या राहिल्या आहेत.
lake shore drive - इथेच छोटे छोटे beaches ही आहेत. फ़ोटोतला हा रस्ता खूप लांब आहे दोन्ही बाजुंना.
hancock observatory मधून घेतलेल्या ह्या फ़ोटोत थोडे ढग ही दिसत आहेत खाली.


मुग्ध करणारा लेक मिशिगन... डाव्या बाजुला दिसतं आहे ते Shedd Aquarium ...
मधेच थंडीमुळे आलेलं धुकं आणि त्यामागे स्कायलाईनची एक बाजू


पिट्सबर्ग

पिट्सबर्गच्या आठवणींना जवळ जवळ वर्ष होत आलं आता. तशी आमची ही वन डे ट्रीप. फ़क्त चार जणांची... न्यू यॉर्क, नायगारा(हा नंतर सांगेन), शिकागो, Louisville( लुइवील) च्या ट्रीप्स नंतर आम्ही जरा थंडावलो होतो. कारणं ही होती तशी. गुंजन आणि Ehren भारतात परतल्या होत्या. सगळ्यांच्या वेळा जमणं ही कठीण झालं होतं. जवळ जवळ ३ एक महिने आम्ही Pittsburgh च्या दर्शनासाठी planning करत होतो पण ते म्हणावं तसं जमून येत नव्हतं. मे विकेंडच्या नायगारा ट्रीप नंतर सप्टेंबरचा लॉंग विकेंड त्यासाठी उगवावा लागला. सप्टेंबर ४ हा अमेरिकेतला लेबर डे. सोमवारची सुट्टी लागून आलेली. तसं असूनही आम्ही फ़क्त रविवारची वन डे ट्रीप आखली. एक मुख्य कारण म्हणजे सगळ्यांचे खिसे फ़िरून फ़िरून थोडे हलके झाले होते आणि Pittsburgh चा एकुण इंटरनेटवरून आणि जाऊन आलेल्यांच्या सांगण्यावरून पिट्सबर्ग पहायला एक दिवस पुरेसा होतो अशी माहीती गाठीशी होती. मी अजुन सिनसिनाटी मधेच रहात होतो आणि पिट्सबर्ग तिथून ५ तासांवर पुर्वेला आहे. भल्या पहाटे उठुन रात्री उशीरा परत यायचं असा ढोबळ बेत पहिल्यांदा आखला. रेंटल कारही पहाटे पहाटे सिनसिनाटीच्या एअर्पोर्टवरून घ्यायचं ठरलं.(एक एअरपोर्ट वरच २४ तास मिळतात रेंटल कार्स, बाकी सगळ्या ठिकाणी सकाळी ८ नंतरच रेंटल कार मिळू शकत होती आणि इतक्या उशीरा निघालो तर सगळा बेत कोसळला असता). जायला फ़क्त ४ जण. मी, विशाल, सुजू आणि शैली म्हणुन आणखीन एक नुकतीच सुज़ू बरोबर रहाणारी मुलगी. आत्तापर्यंत लायसन्स वगैरे सगळे सोपस्कार पूर्ण झाले होते. न्यू यॉर्क, नायगाराच्या ट्रीपच्या वेळी तर minivan १०० mph (१६० kmph ) ना टेकवून "स्पीड" हा एक वेड प्रकार असू शकतो ह्याची पुरेपूर जाणीव झाली होती.

सप्टेंबरच्या ३ तारखेला माझ्या एका मित्राचं सिनसिनाटी ला आम्ही राहतो तिथून सिनसिनाटी युनिवर्सिटी मधे शिफ़्टींग करण्यात रात्रीचा १ वाजला होता. आणि ४ तारखेला भल्या पहाटे ४ ला उठून पिट्सबर्ग कडे दौडत निघायचं होतं. कशीबशी झोप घेतली आणि लगेचच उठून विशालच्या कारनी पहाटे ५-५.३० वाजता सिनसिनाटी एअरपोर्ट गाठला. तिथून Chevrolet Impala घेतली आणि ड्राईविंगचा ताबा मी घेऊन I-71 नॉर्थ ला लागलो.

पीट्सबर्ग हे पेनसिल्वेनिया (pennsylvania) राज्याच्या साधारण पश्चिमेच्या बाजूला असणारं एक शहर. पेनसिल्वेनिया राज्याचा आकार साधारण आयताकृती. पैकी ३ बाजूंनी तर अगदी पट्टीनी रेघ मारावा इतका सरळ. रुंदीला उंचीच्या जवळ जवळ दुप्पट. ह्याच्या पशिमेला ओहायो तर पुर्वेला न्यू जर्सी आणि न्यू यॉर्क ही राज्य. पेनसिल्वेनिया च्या मध्यापासून पुर्वेकडे जसजसं जात जाऊ तसतसा हा प्रदेश खूप डोंगराळ होत जातो. खुद्द पिट्सबर्ग हे शहरही डोंगरांनी वेढलेलं आहे. इतकं की पिट्सबर्ग मधे शिरायचं असेल तर आधी एका डोंगरातल्या बोगद्यातून जायला लागतं. लहानपणी गोष्टी ऐकल्या होत्या की एक दरवाजा उघडला आणि समोर एक वेगळच नगर नजरेत आलं. इतकं नाही पण थोडसं अलिबाबाच्या गोष्टीत आहे ना की बाहेरून फ़क्त डोंगर नजरेस पडत होता पण शिळेपाशी जाऊन मंत्र म्हणल्यावर गुहा वगैरे उघडते. इथे अलिबाबाची गुहा नाही पण "अलिघेनी" ची गुहा मात्र उघडत होती.

I-71 ला लागल्यावरती ५ एक तासाचा प्रवास होता. पहिला तासभर होऊन गेला होता. मी ८५ चा क्रुज़ लावून जोरात दवडत होतो. कोलंबस(ओहायो मधील, ही ओहायो ची राजधानी) यायच्या साधारण एक १५-२० मिनिटं आधी त्या ८५ mph नी १५०$ चा झटका दिला! पोलिसाच्या स्पीडगन वर माझा स्पीड ८६ नोट झाला होता आणि मागए पोलिसाच्या गाडीचे दिवे लागलेले पाहून गप्प एका बाजुला जाऊन थांबलो. "लायसन बघू" वगैरे झाल्यावर माझ्या हातात १५०$ च्या फ़ाईनचं तिकीट ठेऊन "you have a safe journey sir" म्हणत माझ्याही पेक्षा जास्त वेगानी तो निघून गेला. अमेरिकेतलं हे पहिलच traffic ticket (होपफ़ुली शेवटचं असुदे अशी प्रार्थना नंतर मी पिट्सबर्ग च्या बालाजी ला केली). झालं... त्या नंतर पिट्सबर्गचा तो बोगदा येईपर्यंत मी ६५ mph च्या वरती चुकुनसुधा गेलो नाही.

थोडया वेळानी डोंगरांच्या कुशीत शिरल्या सारखं वाटायला लागलं. सकाळी १० च्या सुमारास आम्ही एका बोगद्यात शिरत होतो... शिरत होतो पेक्षा बाहेर पडत होतो हे म्हणणं जास्त बरोबर असावं कारण बोगद्यात शिरण्यापेक्षा त्याच्यातून बाहेर पडतानाचा क्षण खूप जास्त लक्षात राहण्यासारखा होता. "अलीघेनी" (Allegheny) आणि "मोनोंगाहेला" (Monongahela) ह्या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं एक रेखीव शहर दिसू लागलं. साधारण ४० अंशाच्या कोनातून येणार्‍या ह्या नद्या तिथे मिळतात आणि त्याचं पुढचं पाणी "ओहायो रिव्हर" ह्या नावाखाली पुढे शेकडो मैल वाहत जातं. बोगदा संपला रे संपला की एकदम पुलावरच एंट्री होते. ह्या दोन नद्या जिथे मिळतात, अगदी तिथे पिट्सबर्ग चं डाऊनटाऊन वसलंय. तसं फ़ार मोठं असं नाहिये पण जे आहे ते खूप जास्त उठून मात्र दिसतं. संगमाच्या टोकावरती एक पार्क आणि अगदीच टोकाला एक मोठा कारंजा आहे. तो संगमाच्या इतक्या जवळ आहे की जरा पाऊस आला तर तीन नद्यांचं पाणी ह्याला आरामात खाऊन टाकेल असं वाटतं. तो बोगदा एकुणच डोंगराच्या वरच्या बाजूनी निघतो आणि त्यानंतरचा पूल उतरणीला लागून सरळ पिट्सबर्ग डाऊनटाऊनमधे नदीच्या काठाशीच घेऊन जातो. आणि इथे गेलं की परत एक नवीनच काहीतरी दिसतं. जिथून आलो तो डोंगर आणि आजुबाजुचे सगळे डोंगर ह्यांच्या मधोमध आपण उभे असतो. सप्टेंबरच्या महिन्यात तशी हिरवी गर्द झाडी. हिरव्या गुच्चाच्या मधे आहोत की काय असं वाटतं. ह्या सगळ्यावरती दागिना म्हणुन की काय ह्या दोन्ही नद्यांवरती रंगीत पूल बांधले आहेत. तेही असे भक्कम लोखंडी कमान असलेले. शिकागोला मानवी करामतींच सौंदर्य पाहिलं होतं, इथे इमारती अमेरिकेतल्या कुठल्याही शहरात सापडतील अश्याच होत्या मात्र त्यांना जागा खूपच खास मिळाली होती. आकाशात उंच उंच गेलेले ते ५-७ सुळके नाही म्हणलं तरी त्या निसर्गात जास्त शोभून दिसत होते.

तिथल्याच एका डोंगरावरती एक washington point म्हणुन आहे. त्या पॉईंटवरून डाऊनटाऊन, संगमाचं दृश्य बघावंच असं बर्‍याच जणांकडून ऐकलं होतं. तेही दोनदा. दिवसा एकदा आणि रात्रीच्या अंधारात एकदा. आम्ही तिथे आधी जाऊन नंतर पिट्सबर्गच्या बालाजी मंदीराला भेट द्यायचं ठरवलं होतं. वॉशिंग्टन पॉईंटला जाण्यासाठी तिथे एक स्लाईडिंग कार्ट ही आहे. डोंगराच्या पायथ्यापासून वरती घेऊन जाते ती. कारनीही जाता येतं. आम्ही कारनी जाऊन पोचलो. हा view खरंच न चुकवण्यासारखा आहे. नद्या आणि पुलांमुळेच आधी खुलून आलेल दृश्य त्या छोट्याश्या कारंज्यामुळे अजून छान दिसतं. इथेच आणखी एक छोटसं आश्चर्य सापडलं. वॉशिंगटन पॉइंट वरती डोंगराच्या पुढे काढलेला थोडासा एक डेक आहे. त्यावर उभं असताना सहज मागे पाहिलं तर एक उंच आणि भव्य चर्च दिसलं. तिथे बहुतेक नुकतच कुणाचं तरी लग्न झालेलं त्यामुळे बाहेर बरीच लोकं होती नटून थटून आलेली. बाहेरून बरंच उठावदार दिसत होतं त्यामुळे आत जायचा मोह आवरला नाही. एकुणच कुठल्याही चर्चच्या आतल्या उंच छतामुळे त्याचा स्वत:चा असा एक occupance येतो. हे बाहेरच्या इतकंच आतूनही सुरेख होतं. मी अमेरिकेत अगदी सुरुवातीला आल्या आल्या १-२ दा सिनसिनाटीतल्या चर्च मधल्या बेंचेसवर जाऊन मनाचे श्लोक म्हणले होते. पण त्या बेंचेस वरती नुसतं बसूनही शांतता मिळते. सिनसिनाटीला असंच माझ्या घराजवळ एक विंटन वुड्स म्हणुन एक पार्क होती तिथे एक थोडसं एकलकोंडं चर्च पाहिलेलं. कधीतरी एकदा मी आणि माझा एक मित्र पहाटे ६ ला उठून विंटन वुड्स मधून विंटन लेक वरती होणारा सुर्योदय पहायला गेलो होतो. आधीच पार्क आणि विकेंडच्या पहाटेची शांतता ह्यात एकदम त्या चर्चच्या घंटेचे टोले ऐकू आले. त्या घंटेच्या आवाजाची गंभीरता फ़ार साठून राहीली होती इतक्या निरव शांततेत. चर्च मधून बाहेर पडलो आणि पिट्सबर्गच्या ह्या वॉशिंगटन पॉइंटवरून मग प्रसिद्ध बालाजी मंदीरात निघालो. ह्यालाच एस. व्ही. टेंपल(श्री वेंकटेश्वरा) ही म्हणतात. डाऊनटाऊनपासून साधारण २०-२५ मिनिटाच्या अंतर आहे हे कारनी.

हे देऊळ ही थोडसं टेकडावरतीच आहे. उतरत्या रस्त्यावरच पार्किंग करून आत मधे गेलो. मी अमेरिकेत येऊन ८ महिने होऊन गेले होते आणि इतकी सारी भारतीय लोकं एकत्र मी तितक्याच वेळानी पाहत होतो. आत मधे जाताना गणपतीचं ही एक छोटसं देऊळ आहे. बालाजी ला दक्षिण भारतियांची बरीच दाटी होती. गाभार्‍यात जायला चक्क लाईन होती. १० मिनिटांनी सरकत सरकत गाभार्‍यापर्यंत पोचलो. बालाजी ची मुर्ती आहे मात्र छान. देशाकडचा गाभारा वाटावा इतकं मंत्रपठण आणि नवस चालले होते. अमेरिकेत मी आत्तापर्यंत डेटनचं आणि सिनसिनाटीचं देउळ पाहीलं होतं. ती combo मंदीरं होती. combo मंदीरं म्हणजे एकाच ओळीत गणपती, राधाकृष्ण, राम सीता लक्ष्मण, शिवपार्वती, बालाजी, बुद्ध अश्या सगळ्यांच्या माणुसभर उंचीच्या मुर्ती होत्या. सिनसिनाटीचं देऊळ आहे छान पण एवढ्या सगळ्या देवांना असं एका ओळीत उभं बघायची सवय नव्हती. पहिल्यांदा तर प्रत्येकाच्या समोर जाऊन नमस्कार करे पर्यंत अर्धा तास गेला होता. पण हे अगदीच घरच्या देवळासारखं होतं. हां पण एक गोष्ट मात्र वेगळी. स्वच्छतेच्या बाबतीत अमेरिकेमधली शिस्त होती. पुजार्‍यानी केळं नारळही दिला प्रसादाचा. ह्यानंतर मुख्य गाभार्‍याच्या मागच्या बाजूला एक सर्वप्रिय गोष्ट चालली होती. एक मोठा प्रशस्त हॉल होता आणि त्यात चक्क पंगती बसल्या होत्या. कार्यालयात बसतात तसे लोक हॉलभर बसले होते. फ़रक इतकाच की वाढायला कुणी नव्हतं. ह्या हॉलच्या बाहेरच्या बाजूलाच सेल्फ़ सर्विस होती. तिथे केवळ दीड डॉलरला प्रत्येकी सांबार भात, दही भात आणि tamrind राईस मिळत होता. सांबार भाताची चव खरोखर समाधान देणारी होती. छोटी छोटी मुलं "mom, this is delicious" करून घास मटकवत होती. एकूणच बालाजी पीट्सबर्गवासियांवरती प्रसन्न आहे हे दिसत होतं. नंतर मी ऐकलं की तिथे बरेच लोक तर फ़क्त जेवायला येतात. दीड डॉलर ला पोटभर सांबार राईस हे खरच आपल्या कडल्या किर्लोस्करांच्या factory मधे २ रुपयात पोटभर जेवण असं मी ऐकुन होतो त्यासारखं होतं. मला एकुण जरा तिथे गोंदावल्याची आठवण झाली. भारतात असताना दर वर्षी एकदा तरी गोंदावले फ़ेरी व्हायचीच. मिरजेपासुन १०८ की. मी. वरती हे गोंदावलेकर महाराजांचं गाव. तिथल्या सारख्या पगंगती मी कुठेच पाहिल्या नाहियेत. मिरजेची कार्यालयं प्रसिद्ध आहेत पण शे-दोनशे माणसांच्या जेवणाची management ही सोपी नसते हे मी पाहिलं आहे. पण गोंदावल्यात किती हजार लोक रोज जेवत असतील ह्याला मोजमाप नाहिये. उत्सवात तर तिथे आकडा लाखाच्या घरात गेलेला पाहिलाय. आणि हे सगळं फ़क्त भक्तांच्या दानावर चालतं. एका देवमाणसामुळे त्यांच्या नंतर शंभर वर्षांनी सुद्धा किती लोकांची पोटं भरत आहेत हे पाहून खरंच तिथे हात जोडावेसे वाटतात. पिट्सबर्ग च्या सांबार राईस साठी तेवढी गर्दी नसली तरी त्याची आठवण करून देणारी होती.

दिवसा पाहिलेलं पिट्सबर्ग पुन्हा रात्रीच्या काळोखात पहायचं होतं. संध्याकाळी माझ्या एका तिथल्या मित्राला भेटून रात्रीच्या ८.३० च्या सुमारास गाडी परत डाऊनटाऊनच्या दिशेनी घातली. दोन नद्यांपैकी एकीच्या किनार्‍यावरूनच आम्ही जात होतो. जसजसं संगमापाशी जात होतो तसतसं शेजारच्या पात्रात डाऊनटाऊनच्या दिव्यांची प्रतिबिंब दिसू लागली. सगळ्याच पुलांचे काठ आणि वरच्या कमानीदेखील दिव्यांनी चमकत होत्या. आम्ही थेट परत वॉशिंगटन पॉईंट गाठला. तिथे गेल्यावर जे दृश्य दिसलं त्यावरूनच बहुतेक "विहंगम" शब्द तयार झालाय असं वाटत होतं. नद्यांची दोन्ही पात्र खुलुन आली होती त्यांच्या मधल्या इमारतींच्या प्रकाशामुळे. सगळे पूल तर दोन दोन दिसत होते... एक खरा आणि त्याच्याच खाली पाण्यात. त्या संगमावरच्या कारंज्यालाही गोलाई आली होती दिव्यांची. ह्यात सकाळी न दिसलेली आणखी एक गोष्ट दिसली. संगमाच्या दुसर्‍या बाजूला २ बॉल स्टेडियम्स आहेत. तिथल्या एका स्टेडियम मधे बेसबॉलची मअह चालू होती. दिव्यात ते तर तळपून निघालं होतं. अगदी गच्च भरलेलं ते मैदान त्यातल्या लोकांमुळे खूप रंगीबेरंगी ही दिसत होतं. फ़ोटोंचे flashes तर क्षणाक्षणाला पडत होते. अर्धा तास तर आम्ही तिथे आरामात उभे असू ते सगळं बघत. पिट्सबर्ग मधे ना न्यू यॉर्क सारखी गडबड होती ना शिकागो सारखी फ़ारशी गर्दी. निसर्गानी मात्र आपल्या सगळ्या पाउलखुणा तिथे उतरवल्या सारख्या दिसत होत्या. रात्रीच्या १० वाजता तिथुन परतीच्या प्रवासाला निघालो. घरी येईपर्यंत पहाटेचे ४ वाजले होते. एकाच दिवसाच्या भेटीत पिट्सबर्गनी अजुनी नव्या आणि वेगळ्या आठवणी (आणि ड्राईव्हींगचा एक धडाही) गाठीशी बांधुन दिल्या होत्या. ह्या सगळ्या परत आठवताना मी स्वत:तच गेले काही दिवस दंग होऊन गेलो होतो.
गम्मत...

माझ्या लहानपणी अगदी मला जेव्हापासून आठवतं तेव्हापासून. उन्हाळ्याची सुट्टी लागली की मी नेहमी मिरजेहून पुण्याला आजीच्या घरी किमान १-२ महिने जायचोच जायचो. दुसरी तिसरी पासूनची ही सुट्टी मला अगदी स्पष्ट आठवते. आजीच पुण्याचं घर म्हणजे हत्ती गणपती च्या जवळ एक पावगी वाडा होता त्यातलं एक बिर्‍हाड. मातीच्या भिंती त्यामुळे उन्हाळ्यातही एकदम गार राहणारं असं घर. वाड्यामधे आजीचं घर जिथे होतं त्याच्या समोरच एक बर्‍यापैकी मोठी बागही होती. ह्या बागेत तर आमचा दिवसातला अर्धाअधिक वेळ जायचा. उरलेला सगळा वेळ आजीबरोबर. तिच्या कडून भरपूर गोष्टी ऐकुन घ्यायच्या आणि प्रत्येक वेळी "नवी आणि मोठी" गोष्ट हवी अशी माझी डिमांड असायची. त्या घरात ३ ओळीनी खोल्या होत्या. बाहेरची बैठकीची खोली आणि रात्रीच्या वेळी आमची म्हणजे माझी दीदीची आणि आजीची बेडरूम. त्यावेळी आजोबा काम करत असत आणि ते दुपारी १.३० च्या सुमारास जेवायला घरी येत. जेवण झाल्यावरती त्यांची मधल्या खोलीत एक छोटीशी डुलकी होत असे. आजोबांचा स्वभाव एकदम कडक शिस्तीचा आणि तापट. त्यामुळे त्या दुपारच्या वेळेत आमची कुणाचीच त्या मधल्या खोलीत जायची टापच होत नसे. मग आजोबा ऑफ़ीसला गेले की परत धिंगाणा चालू. ह्या अशा दुपारच्या ४ च्या सुमारास आजीकडे वर्ग भरत असत. आजीचा होमिओपथी चा अभ्यास होता गेली कित्येक वर्ष. ती औषधही द्यायची आणि वर्गही घ्यायची. अजूनही घेते. आमच्या कानावरती तेव्हा मग होमिओपथी मधली चित्र विचित्र नावं पडत असत. अर्निका, पल्सेटीला, magphos , caliphos अशी नावं आजीच्या तोंडून सारखी ऐकली जायची. तेव्हा मला ती नावं खूप आवडायची. पण माझं लक्ष त्या औषधाच्या पेटीपेक्षाही जास्त औषध न लावलेल्या साखरेच्या गोळ्यांच्या बाटल्यांकडे. त्या गोळ्यांचे मी कित्येकदा बकाणेही मारायचो आणि आजीकडुन हळुच जरासं ओरडून घ्यायचो. आजीचा हा अभ्यास, वर्ग तिच्या मोकळ्या वेळेत चालायचा. पण मी तिथे असलो की आमच्या भरपूर गप्पाही चालायच्या. मला आठवतं मी नुकतच घड्याळ शिकलो होतो. पण तितकं ही येत नव्हतं. तेव्हा मला आजीनी त्या बाहेरच्या आणि मधल्या खोलीत घड्याळ्यातल्या ३ काट्यांसारखं पळून दाखवलं होतं वेगवेगळ्या वेगानी. ते इतकं पक्क लक्षात राहिलं की घड्याळात काटे फ़िरताना पाहिले की मला आजीच आठवते. मी आणि माझी दीदी सुट्टीमधे आंघोळीला प्रचंड आळशीपणा करायचो. अगदी दुपारच्या जेवणापर्यंत पारोसे बसायचो. आजी आजोबा ह्या बाबतीत एकदम कोकणस्थी. सकाळी उठलं की पटापट आवरून तयार. आम्हाला कित्येकदा सांगून आम्ही कुठचे ऐकतो. मग तेव्हा आजीनी एक छोटीशी युक्ती काढली. आंघोळ झाल्यावरती प्रत्येकाला एक पेपरमींटची गोळी दिली जाईल, पण ज्याची आंघोळ आधी होईल त्याला एक जास्त मिळेल. त्यादिवसानंतर मी आणि दीदी अक्षरश: उठलो की आंघोळीसाठी धावायचो. :-)
आणखीन एक गोष्ट सुट्टीतली ती म्हणजे आंबे. आमरसाची तर चंगळ असायची. मामा ह्या बाबतीत जाम हौशी. मधल्या खोलीत आजोबांच्या कॉटखाली आंब्यांच्या पेट्यांचा ढीग असायचा. मग त्यातले कच्चे काढून त्याची अढी घालायची. आजीनी आमरस काढला की मी साली कोई चोखायला तयार.
चोखून खाल्लेल्या आंब्याची कोय एकदा मी त्या समोरच्या बागेत पेरून ठेवली होती. ती माझी एक वेगळीच हौस. चिकू खाल्ला किंवा कुठलं फ़ळ खाल्लं की त्याची बी त्या समोरच्या बागेत पेरून ठेवायची आणि मग काही दिवसांनी तिथे एक रोप यायचं. अस जादू झाल्यासारखं वाटायचं तेव्हा मग. आजोबा आजीसारख्या गमती नाही सांगायचे पण तेही लाड करायचे. रोज संध्याकाळी एक लॉलीपॉप आणायचे मला आणि दीदीला. दोघेही संध्याकाळच्या वेळी लकडीपुलापर्यंत चालत जात असत. लकडी पुलाच्या एका बाजूला बसायला जागा आहे. आम्हीही जायचो मग त्यांच्या बरोबर बोटाला धरून. तेव्हा पुण्यात जोड बसेस होत्या. तिथे बसलो की आजीचं आणि माझं एकच काम. किती जोड बसेस आणि किती डबलडेकर पुलावरून जातात ते मोजायचं. तेव्हा मला एकदम मजा यायची जोड बसेस पहाताना. मागच्या डब्यामधे कंडक्टर वेगळा असू शकतो ही कल्पना तेव्हा यायची नाही. मग एकच कंडक्टर तिकीट काढताना डबे कसे बदलत असेल(कदाचित प्रत्येक स्टॉप वरती पुढे मागे करत असेल) ह्याचं आश्चर्य वाटायचं :-) संध्याकाळच्या वेळी फ़िरून आलो की आजोबा "चला आता पर्वचा म्हणायला बसा" अस सांगायचे. मला कित्येक वर्ष "पर्वचा" ह्या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता. तोपर्यंत मला नेहमी आजोबा "पर्वाचं म्हणा" म्हणजे पर्वा संध्याकाळी जे म्हणलं तेच आज म्हणा अस सांगतात असं वाटायचं. अशा कित्येक कल्पना मी कित्येक वर्ष मनात ठेऊन होतो.
आजीचा आवाज मुळातच एकदम मऊ आणि मृदू, त्यात ती गोष्ट सांगायला लागली की अजूनच छान वाटायचा. जसा आवाज तसाच स्वभाव. तिची चीडचीड झालिये, कुणावरती ओरडते आहे असं कधीच पाहिलं नाही.
जसजसे मोठे होत गेलो तश्या आमच्या गप्पांमधले विषय ही वाढत गेले. गोष्टी तर मी अगदी नोकरी करायला लागलो तेव्हापर्यंत ही सांगून घ्यायचो कुशीत शिरून. त्यात गोष्टीपेक्षा आजीचा तो बोलण्याचा स्वर, आवाज ऐकण्यात जास्त मजा येत असे. लहान असताना जी आजी होती तीच मला अजूनही भेटतेय ह्याचं खूप समाधान वाटत असे अशावेळी. शाळा संपून कॉलेजच्या काळात मग तितकं राहणं झालं नाही. महिना महिना सुट्टी ची चैन संपली होती. पण त्या नंतर जेव्हा नोकरी लागून मुंबईला रहायला गेलो तेव्हा खूपशा विकेंड्स ना मग आवर्जून पुण्याला जात असे. त्या जाण्यात एक ओढ होती, आजीबरोबर परत रहायला मिळणार ह्याची मजा होती. कितीतरी गोष्टींवरती बोलत बसायचो. तिच्या होमिओपथी चा अभ्यास आणि त्याचे वर्ग तर जोरदारच चालू होते आणि त्याच बरोबर बाराक्षार आणि पुष्पौषधी ह्यांचीही त्यात addition झाली होती. त्यातला फ़्लॉवर रेमिडीज हा प्रकार थोडासा थक्क करणारा होता. डॉ. बाख ह्या इंग्रज डॉक्टरनी शोधून काढलेल्या ह्या पद्धतीमधे फ़ुलांच्या पाकळ्यांचे स्वभाव ओळखून त्यापासून औषधं तयार करून ती माणसाच्या मानसिक स्थिती वरती काम करतात. पुष्पौषधींचा आजीचा अभ्यास कधी सुरू झाला ते मला ठाऊक नाही, पण दर वेळी मी जायचो तेव्हा ती तिच्याकडे येणार्‍या वेगवेगळ्या माणसांबद्दल सांगायची. जगात किती वेगवेगळे आणि कसे प्रॉब्लेम्स असू शकतात आणि ते बरे करण्याचं समाधान काय असतं हे कळायचं. आम्ही खूपदा माणसाचा स्वभाव, त्याच्या वेगवेगळ्या परिस्थिती मधे react करण्याच्या पद्धती ह्यावर बोलत असू. त्यात मग कित्येकदा आजूबाजूच्या माणसांनाच अगदी घरातल्याही उदाहरण म्हणून घेत असू. आणि मग नक्की माणसाचा स्वभाव घडत जातो तरी कसा ह्यावर आपापली मतं मांडत असू. तिच्या कडून कित्येकदा नव्या नव्या पुस्तकांची ही माहीती मिळायची. लहानपणापासून मी तिला साहित्यपरिषद मधे जाताना पहायचो. त्यामुळे तिला वाचनाचं वेड आहे हे माहीतीच होतं. पण आता मीही ती सांगेल त्या पुस्तकात involve होत असे. कित्येकदा ती तिच्या लहानपणीच्य गोष्टी सांगत असे. कधी कधी मीच मागे लागत असे की सांग ना तुझी आई कशी होती, तुझे बाबा कसे होते तेव्हा तुम्ही कसे रहायचात. तिच्या आईबद्दल तिला खूपच आदर होता हे चांगलच जाणवलं तेव्हा मला. आजीशी हे सगळं बोलताना फ़क्त गप्पा मारल्याचं आनंद मिळत होता अस नव्हे तर माझी आजी ही माझी सर्वात आवडती मैत्रीण होऊ शकली आहे ह्याचं एक प्रचंड समाधान वाटत असे. अजूनही तितकच वाटतं. आमच्या ह्या मैत्रीच्या नात्यामुळे मला बोलताना वयाचं अंतर कधी जाणवलच नाही. "आजी" बद्दल मला मान आहेच, तितकाच अभिमान ही आहे आणि त्याबरोबर मनमोकळी जवळीकही. तिच्या बोलण्यात, वागण्यात, प्रश्नांची उत्तरं देण्यात खूप समंजसपणा आहे, प्रत्येक गोष्टीवरती शांतपणे विचार करून मगच कृती करण्याची क्षमता आहे हे जाणवतं.

कधी कधी गम्मत वाटते एका गोष्टीची. "मुलगी" म्हणून त्या काळात फ़क्त matric पर्यंत शिकू शकलेल्या सांगलीच्या ताम्हनकरांच्या ह्या मुलीमधे प्रचंड चिकाटी आहे. ज्ञानाबद्दल खूप ओढ आहे. त्याचबरोबर माणसांना धरून रहाण्याची वृत्ती आहे. म्हणूनच कुठल्याही कॉलेजात न गेलेल्या माझ्या आजीला लोक डॉक्टर म्हणून ओळखू लागले, अजूनही ओळखतात. तिच्या कडून भरभरून शिकून जातात, आपलं दुखणं ह्या नक्की बर्‍या करतील असा विश्वास ठेवतात.
अलिकडेच त्यांना गुरू मानणार्‍या एका बाईंनी पुष्पौषधींवरती एक पुस्तक लिहिलं. ते आजीच्या घरी मी बघत होतो तर त्यात सुरूवातीच्या पानावरती "माझ्या गुरू सौ. निर्मला रानडे ह्यांस सादर अर्पण" असं लिहिलं होतं. माझ्या आजीचं नाव! आजीला ते बघून जितका वाटला असेल तितकाच आनंद मलाही झाला तेव्हा. माझी ही गोंडस आजी किती मोठी आहे ह्याची जाणीव होत राहीली. तशी आजीही आदीमाता म्हणून एका नियतकालीकात बाराक्षार आणि पुष्पौषधींवरती लेख लिहायची. अलिकडेच तिच्याशी बोलणं झालं. सांगत होती की ते प्रकाशक आता त्याचं एक स्वतंत्र पुस्तक काढत आहेत. लहानपणी जिच्या बोटाला धरून मी लकडी पुलावरच्या बसेस मोजायचो तिचं स्वत:चं असं एक पुस्तक प्रकाशित होतं आहे. ह्यात मला कळत नाही की नेमकी ह्यातली "लेखिका" कोणती? कारण ती जेव्हा जेव्हा तिच्या कामाबद्दल बोलते, तेव्हा तिच्यातल्या तो "आज्जीचा" प्रेमळपणा तितकाच जाणवतो. कुणासाठीही. मी तिला फ़ोनवरती बोलताना सांगितलं की पुस्तक छापून आल्यावर त्यावर सगळ्यात पहिली स्वाक्षरी करून ते मला हवंय.
गेल्या २ वर्षांपासून मी मुंबई सोडल्यामुळे तितकं भेटणं होत नाही. पण बोलणं मात्र खूपदा होतं. कधी कधी तर फ़क्त मी तिचा आवाज ऐकण्यासाठीच फ़ोन करतो. तिच्या असण्यामुळे मला कायमच मी एकदम श्रीमंत आहे असं वाटत रहातं.
आजच आजीनी वरचा पोस्ट वाचला. खूप छान वाटलं म्हणाली. स्वत:ची स्तुती कुणाला आवडत नाही असही म्हणाली. :-) आणि माझ्या लहानपणीच्या आठवणी अजुनी इतक्या ताज्या आहेत ह्याचं ही तिला खूप बरं वाटलं. त्याच बरोबर एक छोटसं वाक्य अजून सांगितलं. फ़क्त ह्या पोस्टशी निगडित असं म्हणुन नाही, पण जाता जाता सहज सांगितलं की आपल्या आयुष्यात येणार्‍या बहुतेक लोकांची आपली ओळख एका मजेदार गोष्टीसारखी असते. ती म्हणजे ७ आंधळे आणि हत्तीची गोष्ट, ज्यात प्रत्येक जण हत्तीच्या वेगळ्या अवयवाला स्पर्श करतो आणि "संपूर्ण" हत्ती कसा आहे ते आपापल्या त्या तेवढ्या अनुभवानी सांगतो.

मी जे वरच्या पोस्टमधे "तिच्या बोलण्यात, वागण्यात, प्रश्नांची उत्तरं देण्यात खूप समंजसपणा आहे, प्रत्येक गोष्टीवरती शांतपणे विचार करून मगच कृती करण्याची क्षमता आहे हे जाणवतं" हे लिहिलं आहे ते अजुनच खोलवर रुजलं आणि ह्याबाबतीत मी त्या ७ पैकी नक्कीच नाहिये ह्याचीही खात्री झाली :-)

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner ameyadeshpande Type HTG0001



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators