Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Jivticha pooja

Hitguj » Looking for » Religion » Jivticha pooja « Previous Next »

Ritu4u
Sunday, August 12, 2007 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोणी जिवतिचा फ़ोटो कुठे मिळेल ते सागेल का आणि त्यासाठी काय काय करावे लागते, ते पण सागा.... }

Suparna
Monday, August 13, 2007 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रितु, इथे आहे फोटो
/hitguj/messages/35/88901.html?1155576608
आणि जिवतीची किंवा श्रावणी शुक्रवारची माहिती माझ्या आईच्या वहीत आहे. ती शोधून मी नंतर लिहिन.

Suparna
Friday, August 17, 2007 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रावणी शुक्रवार व जिवती पुजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे.
श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची अराधना करून सुवासिनींना भोजन व हळदी-कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षीणा देऊन सत्कार केला जातो. ह्या विधीस "सवाष्ण करणे" म्हणतात.

श्रावण महीन्यात चारी शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनींना हळदी- कुंकवाला बोलवून त्यांना दुध्-साखर चणे-फुटाणे द्यावेत.प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे व कोणत्याही एका शुक्रवारे पुरण्पोळी करून सवाष्ण जेवावयास घालावी. तिला दक्षीणा द्यावी.

श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पुजा करतात. ही पुजा संततीरक्षणार्थ मानली जाते.
जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार (उदा. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार) येईल त्या दिवशी देव्हार्‍याजवळ भिंतीवर लावावा. त्याची पुजा आठवड्यातून चार दिवस करावी.

श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीमातेची तसेच जिवतीची पुजा करावी.
फुले, आघाडा व दुर्वा ह्यांची एकत्र करून केलेली माळ, हळद्-कुंकू लावलेले २१ मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र, गंध, हळदि-कुंकू, अक्षता लावून जिवतीची पुजा करावी.
पुरणाचे ५ / ७ / ९ असे दिवे करून लक्ष्मीमातेची व जिवतीची आरती करावी. विड्यांच्या पानांबरोबर सुपारी वफळ ठेवून दुध्-साखरेचा व चणे-फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा.

त्या दिवशी स्वयपाकांत मुख्य म्हणजे पुरण घालतात. बाकी स्वयंपाक वरण्-भात्-तूप, लिंबू, भाजी, पुरण, खीर, चटणी, कोशिंबीर, तळण, वाटली डाळ, आमटी ई. करावा.
ह्या दिवशी मुलांना वाण म्हणून "आरत्या" किंवा" मुरण्या" देतात त्या कराव्या.
( आरत्या- कणकेत गुळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकेरीत तळलेया पुर्‍या.
मुरण्या- पिकलेल्या केळ्यात रवा गुळ खोबरे घालून छोटे छोते तळलेले गोळे.)

देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा.
सवाष्णीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी.
जेवावयास बसण्यापुर्वी पानापुढे विडा दक्षीणा ठेवून नमस्कार करावा. जेवण झाल्यावर सवाष्णीची खणा-नारळाने ओटी भरावी.

जिवतीची पुजा करून तिला औक्षण करून तिची आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना पण औक्षण करावे.
कुंकू अक्षता लावून चणे साखर फुटाण्याचे व आरत्यामुरण्यांचे वाण देऊन, निरांजनात ५ वाती (तेलवाती घ्याव्या फुलवाती असू नये) ठेऊन त्याने औक्शण करावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, व दिर्घायुश्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी.
परगावी जर मुलं असतील तर चारी दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्या सारखे होईल.

त्या दिवशी देविची ओटी भरतात.

श्रावणात नाग्-नरसोबाचे पुजन घरोघरी केले जाते. बुधवारी बुधाची व गुरुवारी ब्रहस्पतीची पुजा करतात.
प्रत्येक शनिवारी नृसिंहाची पुजा करतात. हळदि कुंकू, वस्त्र, विड्याच्या पानाची माळ नृसिंहाच्या फोटोला घालून तांदळाचे तिखट वडे करून नैवेद्य दाखवतात. जिवतीची जशी दिव्याची आरती करतात तशी ७ वडे ताम्हणात ठेऊन त्यावर फुलवाती ठेवून त्याने आरती करतात.
ह्या दिवशी मारुतीची उपासना करायची तसेच एका विद्यार्थ्याला जेऊ घालायची पद्धत आहे.


नागचतुर्थीला पाटावर चंदनाने पांच फण्याचे नागाचे चित्र करून त्याची पुजा करतात. त्यावेळी दुध व लाह्याचा प्रसाद असतो व दुसर्‍या दिवशी नागपंचमीला उपास सोडतात. पुरणाचे दिंडे किंवा गुळ खोबर्‍याच्या पतोळ्याचा नैवेद्य करून बाकी सणांप्रमाणेच स्वयंपाक करावा. त्या दिवशी विळीने चिरत नाहीत व तळणही करत नाहीत.

श्रावण महीना संपेपर्यंत ही वस्त्रे, माळा फोटोवरून काढत नाहीत.
जिवतीचा कागद, गौरी-गणपती विसर्जनानंतर हळद्-कुंकू अक्षता वाहून काढावा व माळा, फुले निर्माल्य सोडावे.


Suparna
Friday, August 17, 2007 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला असे वाटते की आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जिवनात पुर्वीची व्रतवैकल्ये, उपास तापास पुष्कळ्शी हरवून गेली आहेत. आज आपण गौरी-गणपती, दही-हंडी, रक्षाबंधन, दिवाळी, होळी सारखे मोठे व मोजकेच असे सण साजरे करतो. श्रावणात येणार्‍या कितीतरी छोट्या मोठ्या सणांचा आपल्याला विसर पडला आहे
संसार व नोकरी-व्यवसाय याच्या चक्रात सापडलेल्या आपल्या पिढीला हे सर्व साग्रसंगीत करणं एकतर शक्य नाही किंवा शिक्षणामुळे येणार्‍या उच्च वैचारीक पातळीमुळ ही व्रतवैकल्ये निरर्थक वाटत असावीत.
पण आजही श्रावण महीना आला की मनात एक उत्साह संचारतो.
माझ्या लहानपणी श्रावणात साजरे केले जाणार्‍या सणांनीच व अशा संस्कारांनीच माझे बालपण समृद्ध केले.

माझी आई नोकरी करायची पण घरातील कुळधर्म व कुळाचार संसारात पाळवेच हा तिचा अट्टाहास असायचा. व ते ती आचारायची. आजही तिने केलेला श्रावणी सोमवारचा उपास व संध्याकाळी सुर्यास्ता नंतरचा केलेला ताजा स्वयंपाक व नैवेद्यासह उपास सोडणे अजून मनात ताजं आहे.
त्या मनोभावे केलेल्या पुजा, श्रावणी शुक्रवारी पुरणा-वरणाचा स्वयंपाक, एखाद्या संध्याकाळी शेजारच्या बायकांना बोलावून चणे-फुटाणे व केशरी दुध देऊन साजरे झालेले हळदी-कुंकू, श्रावणातल्या एखाद्या शनिवारी किंवा पौर्णिमेला घातलेला "सत्यनारायण", साजूक तुपातला केळी घातलेला घमघमीत प्रसाद, धूपदिपांच्या वासाने प्रसन्न झालेले वातावरण, रंगीबेरंगी सुवासीक फुलांनी हिरव्यागार पानांनी सजलेल्या त्या मंगळागौरी, नागपंचमीला हातावर निघणारी नाजूक केशरी मेंदीची नक्षी..... सारं आठवून मन प्रसन्न करतं आणि त्याच बरोबर आज तसा श्रावण हरवल्याची हुरहुर लागते.

श्रावणातल्या विविध सणाची माहिती माझ्या आईने आपल्या वहीत संकलीत केली होती. त्यातली जिवती पुजन व शुक्रवरची इथे लिहिली. लिहिताना मला जो आनंद वाटला तो तुम्हाला वाचताना वाटो.


Savyasachi
Friday, August 17, 2007 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड्स, कृपया बीबीचे नाव ठीक करावे. 'जिवतीचा पूजा' झालय.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators