Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
विश्वास

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » कथा कादंबरी » विश्वास « Previous Next »

Shonoo
Tuesday, February 27, 2007 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विश्वास
अल्पना संध्याकाळी जरा लवकरच घरी आली. नाहीतरी शुक्रवारी फारशी कामं पण नसतातच. तिच्या ग्रूप मधले सगळेजण एकत्र बाहेर जेवायला जातात. तिथून आलं की आठवड्याच्या कामाचा स्टॅटस रिपोर्ट लिहिला, खर्चाचे एक्स्पेन्स रिपोर्ट सादर केले की सगळे घरी पळतात. कधी प्रॉजेक्टची काही डेडलाईन असेल तर थाम्बावं लागे. नाहीतर एरवी चार वाजेपर्यंत ऑफ़िस अगदी रिकामं होऊन जाई.

अपार्टमेन्टमधे शिरल्या बरोबर तिला आठवलं आज पल्ल्लवी उशिरा येणार होती. पल्लवीच्या ऑफ़िसमधल्या मैत्रिणीला सरप्राइझ Bridal Shower पार्टी होती. आदल्याच आठवड्यात त्या मैत्रीणीसाठी पल्लवीने Victoria's Secret मधून जोरदार खरेदी केली होती. ती 'बघ बघ' म्हणत असतानाही अल्पनाने त्या वस्तू उघडून बघायचं टाळलं होतं. उगाच कोणाच्या अती खाजगी, नाजूक गोष्टी आपण का बघाव्या? पल्लवी म्हणाली होती ' अगं दुकानात याच गोष्टी किती लोकांनी बघितलेल्या असतातच ना?'. पण अल्पनाने काही त्या पिशव्या उघडून पाहिल्या नाहीत.

तिने डायनिंग टेबलपाशी बसून पल्लवी ला एक चिठ्ठी लिहिली झाडांना पाणी, टॅंकमधल्या माशांना खाणं वगरेच्या सूचना लिहिल्या आणि ती चिठ्ठी फ़्रीजवर लावाणार तर तिथे पल्लवीने तिच्या करता चिठी लावली होती ' फ़्रीज मधे दोन ब्राऊन बॅगा आहेत. त्या न विसरता ने. गाडीत नुस्त्या ठेवू नकोस. कूलर मधे भरपूर बर्फ़ टाकून त्यात ठेवशील .' तिने फ़्रीज उघडून बघितलं. खरोखर दोन ब्राउन कागदी पिशव्या दुकानाचं नाव बघितल्या बरोबर तिला कळलं काय असेल ते. तरी तिने दोन्ही बॅगा उघडून पाहिल्या. त्यातलं चीज, smoked salmon , ऑलिव्ह, डच चॉकोलेट, चिनी चहा वगैरे बघुन ती खुदकन हसली. तिला माहीत होतं की राहुलच्या मामा मामींना या गोष्टी नक्किच आवडणार. पण तिला काही त्यांच्यावर इम्प्रेशन मारायचं नव्हतं या वेळेस. पण पल्लवी सुधारणार नाही! तिने कूलर काढला, फ़्रीझरमधला होता नव्हता तेव्हढा सगळा बर्फ़ त्यात ओतला आणि त्या दोन्ही बॅगा एका प्लास्टिक बॅगेत गुंडाळून बर्फ़ात अलगद ठेवल्या. कूलर दराशी ठेवून ती तिच्या बेडरूमकडे वळली.

पल्लवी आणि ती युनिव्हर्सिटी पासून मैत्रिणी आणि रूममेटस होत्या. दोघींचे विषय वेगवेगळे. अल्पना इलेकट्रिकल इंजिनीयर तर पल्लवी फार्मसी आणि हॉस्पिटल व्यवस्थापन शिकत होती. ओरिएंटेशन च्या दिवशी दोघींची ओळख झाली आणि त्यांनी एकत्र अपर्टमेन्ट शोधायचं ठरवलं. त्या दिवसापासून दोघींची मैत्री. सुदैवाने दोघींना नोकरी पण एकाच सुमारास लागली. युनिव्हर्सिटीह्च्या जवळचं अपार्टमेन्ट सोडून त्यांनी एक टाऊन हाउस भाड्याने घेतले होते.

अल्पनाला नोकरीच्या निमित्ताने चिक्कार फिरावं लागे. तिची कंपनी इमारतींवरचे, आणि जाहिरातीच्या बोर्डांवरच्या लाइटिंग चं काम करणारी होती. कॅसिनो, हॉटेलं, मोठाले ऑफ़िस कॉम्प्लेक्स हे त्यांचे क्लायंट्स. ज़िथे जिथे काम असेल तिथे आधी जाऊन इमारतींची पहाणी, आसपासच्या जागेचा अभ्यास हे सर्व तिला करावं लागे. मग डिझाईन त्या क्लायंटला पसंत पडले की त्या प्रमाणे सर्व बनवून घ्यावं लागे. शेवटी installation ला पण जावं लागे. अशाच एका मोठ्या हॉटेलच्या कामानिमित्त तिची राहुल शी भेट झाली होती. राहुल त्या हॉटेलच्या मार्केटिंग डिपार्टमेंट मधे होता. लाइटिंग डिझाईन सारख्या कामात अल्पनाला पाहून तो पहिल्यांदा चक्रावला होता. त्याला वाटलं होतं की ती कदाचित Intern वगैरे असावी. पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यावर अल्पना त्याच्या बिल्डिंगच्या आर्किटेक्ट आणि इंजीनीयर लोकांशी बोलून कामं करवून घेवू लागली ते पाहून तो अचम्बित झाला होता.

लास वेगास मधल्या त्या हॉटेल बिल्डिंग च्या साइन्स लावायचं काम बरेच दिवस चाललं होतं. सुरुवातीला राहुलला तिच्याबद्दल फार कुतुहल वाटत असे. त्याच्या कंपनीची हॉटेलस सर्व जगभर असल्याने त्याचं बरंच फिरणं होत असे. नोकरी निमित्त एकट्याने फिरणं, दिवसचे दिवस हॉटेलात रहाणं, बाहेरचं जेवणखाण या सर्वातून तो ही जात होता. .पण या सार्‍यांचा त्याला भयंकर कंटाळा येत असे. अल्पना मात्र कधी कंटाळल्याचं दिसत नसे. तिलाही देश-विदेश बरंच फिरावं लागे. अशा फिरतीबाबत ती अगदी उत्साही नसली तरी कंटाळलेली पण नसे. आपल्या कामाचा तो अविभाज्य भाग आहे. ख़ाम तर आपल्याला आवडतं नवीन शिकायला, प्रयोग करायला वाव मिळतो यावर ती खुश असे.

खरंतर मितभाषी, अगदी अबोल म्हणायला हरकत नाही असा तिचा स्वभाव. सुरुवातीला नव्या गावात कामा निमित्त जावं लागलं की ती बिचकत असे. पण हळू हळू तिने प्रत्येक ठिकाणची प्रेक्षणीय स्थळे पहायला सुरुवात केली. म्युझीयम, ऐतिहासिक महत्त्वाच्या वास्तू, ऑपेरा हाउस, प्रसिद्धा नाट्यगृहे अशी ठिकाणं ती आवर्जुन पहात असे.



Shonoo
Tuesday, February 27, 2007 - 10:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बॅग भरता भरता अल्पना राहूलशी ओळख झाली ते दिवस आठवू लागली. जेमतेम वर्ष झालं होतं त्यांच्या पहिल्या भेटीला. राहुलच्या कंपनीमधलं तिचं काम बरंच लाम्बलं होतं. त्यातून तिला लास वेगास मधल्या प्रेक्षणीय स्थळांमधे काही रस वाटला नव्हता. एकदा ती वीकेनअला तिथेच रहाणार म्हटल्यावर राहुलने तिला Hoover Dam दाखवायला नेले होते. त्या प्रवासात दोघांची एकमेकांशी खरी ओळख झाली होती. तो दिल्लीत लहानाचा मोठा झालेला, पण त्याचे आई वडील हिमाचल प्रदेशातले होते. तिथे त्याच्या आजोबांची बरीच मोठी जमीन वगैरे पण होती. त्याचे बरेच नातेवाईक अमेरिकेत होते आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचे मामा मामी बॉस्टन मधेच होते. तो त्यांच्याकडे वर्षातून दोन्-तीनदा तरी जायचा.

त्या Hoover Dam च्या ट्रिप नंतर महिन्याभरातच तो बॉस्टन ला आला होता तेंव्हा आवर्जून अल्पना ला भेटला होता. त्याचवेळेस तिची राहुलच्या मामा-मामींशी ओळख झाली होती. त्याच्या जुळ्या मामेबहिणी अल्पनाला अगदी पहिल्याच भेटीत चिकटल्या होत्या. एरवी कोणाशी पटकन न बोलणारी अल्पनाही त्या दोघींच्या अगदी प्रेमातच पडली.

राहूल लास वेगास ला परत गेल्यावर सुद्धा त्याच्या मामींनी अल्पनाशी भेटीगाठी चालूच ठेवल्या होत्या. अर्थात राहूलच्या बॉस्टन्च्या फेर्‍याही बर्‍याच वाढल्या होत्या गेल्या वर्षभरात. ख्रिस्मस्च्या वेळी तो आला होता तेंव्हा मामींनी तिलाही रहायलाच बोलावलं होतं. पण तिने नकार दिला होता. तिच्या नकाराच्या मागची घालमेल मामींनी अचूक हेरली होती पण त्यांनी जास्त चिकित्सा केली नव्हती.

राहुलने त्याच्या घरी अल्पनाबद्दल थोडेसे सूतोवाच केले होते आणि त्याच्या आईचा फारसा चंगला प्रतिसाद मिळाला नव्हता. 'महाराष्ट्रीयन म्हणजे साउथ कडचेच ते' पासून तिचे आई वडील दोघेही शाळेत शिक्षक असण्यापर्यंत प्रत्येक गोष्टी बद्दल त्यांनी आक्षेप घेतला होता. अल्पनाला हे सगळं सांगितल्यावरची तिची प्रतिक्रिया अगदी अनपेक्षित होती. तिने शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि मग म्हणाली ' त्यांचा जरा जरी विरोध असेल तर आपण आताच मागे फिरावं'


Shonoo
Tuesday, February 27, 2007 - 10:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या आईचं आणि अल्पनाचं मन आपल्या बाजूनं वळवण्याची गळ शेवटी राहुलने मामींना घातली होती. त्यात राहुलच्या आईचं मन वळवण्यासाठी त्या काय करत होत्या हे जाणून घ्यायच्या फंदात अल्पना पडली नव्हती. पण त्यांनी तिला मात्र पटवून दिलं की तिला राहूल खरोखर आवडत असेल, त्याच्याबरोबर संसार मांडायचा असेल तर घरच्यांच्या विरोधाला तोंड दिलंच पाहिजे. नुस्तं सलामीच्या तोफा ऐकूनच शस्त्र त्याग करता कामा नये.

तिच्या आणि राहुलच्या भेटी गाठी चालूच राहिल्या होत्या. पण आपण मामांच्या घरी राह्यलो वगैरे तर राहुलचे आई वडील मामा मामींवर पण वैतागतील अशा विचाराने तिने त्यांच्याकडे रहायला जायला नकार दिला होता. या सर्व प्रकरणात मामा मात्र काही बोलत नसत. आठ भावांच्या पाठची एकुलती एक बहीण होती राहुलची आई. त्यांना काही सांगायचं झालं की सर्व भाऊ एकमेकांना पुढे करत असत.

या सगळ्या प्रसंगांची अल्पनाने पुन्हा कितव्यांदा तरी मनाशी उजळणी करून झाली. आता सुध्दा मामा मामींनी त्यांच्याबरोबर skiing ला यायचं निमन्त्रण दिल्यावर ती साशंक होती. पण राहूल त्यावेळेस कामानिमित्त मेक्सिको ला जाणार असल्याचं म्हणाला होता. म्हणून तिने होकार दिला. शिवाय व्हरमॉँट मधे skiing करायला ती अन पल्लवी देखील जात असत. पण त्यांचं नेहेमी students budget . राहुलचे मामा मात्र दर वर्षी एक मोठा बंगलाच भाड्याने घेत. ते चौघेजण आठवडाभर रहात. आणि बर्‍याच मित्र मैत्रिणींना एक्-दोन दिवसांकरता बोलवत असत. अल्पनाने सोमवारची रजा टकली होती. शुक्रवारी रात्री जाऊन सोमवारी दुपारि परत. शनिवार रविवार तिथे भयंकर गर्दी असणार. पण सोमवारी जरा निवांत skiing करायला मिळेल.

तिने बॅग भरून दाराशी ठेवली आणि skiing paraphernaliaa घ्यायला गेली तर तिच्या skis च्या बाजूला एक मोठी victoria secret ची बॅग. अल्पनाला वाटले की पल्लवी तिच्या कलीगचे गिफ़्ट विसरली बहुतेक. तिने बॅग उचलली तर त्यात वरतीच तिच्या नावाने एक लिफाफा होता. तिने घाईघईत उघडला. आतल्या चिठ्ठीवर झरकन नजर फिरवली. काहीच अर्थबोध झाला नाही तिला म्हणून तिने परत एकदा सावकाश वाचली This is for you. Enjoy! P भोवती एक दोन hearts ! तिने बॅग उघडून बघितली आत तीन सुंदर पजामा सेटस अर्ध्या बाह्यांचे टीशर्ट, फार ढगळ नाही पण फार तंगही नाही असे पजामा आणि प्रत्येकावर मॅचिंग असा लाम्ब बाह्यांचा कार्डिगन. परत सगळ्यात तळाशी अगदी म ऊ म ऊ गुलाबी चपला.

तिने परत एकदा चिठ्ठी उलट सुलट करून पाहिली. त्या कागदाच्या मागच्या बाजुला लिहिलं होतं 'Please don't take your maxies with you this weekend' . घ्या! म्हणजे ती घरात मॅक्स्या घालते यात काय प्रॉब्लेम?


Shonoo
Tuesday, February 27, 2007 - 10:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण एकंदरीत तिला ते नाइटसुट आवडले. त्या भाड्याच्या बंगल्यात आपल्याला कदाचित बेडरूम मिळणार नाही, हॉलमधल्या कोचावर झोपावं लागेल वगैरे गोष्टी खरंतर तिच्या लक्षातच आल्या नव्हत्या. बरं भांडायला पल्लवी सुद्धा समोर नव्हतीच. तिने गपचूप ती बॅग आपल्या बॅगेत कोम्बली आणि सगळं सामान गाडीत भरुन ती निघाली. तिच्या घरनं त्या भाड्याच्या घरी पोचेस्तोवर चांगलाच काळोख झाला होता. मामा मामी दुपारीच पोचणार होते. तिने गाडी ड्राइव्हवे मधे वळवल्यावर लगेच पोर्चचा दिवा लागला आणि दार उघडून कुणीतरी बाहेर आलं. तिने फारसं लक्ष न देता गाडी पार्क केली आणि ' नमस्ते मामाजी' म्हणेपर्यंत राहुलने तिला विळखा घातला.

त्याला तिथे पाहून ती अगदी आश्चर्यचकित झाली. राहुल तेव्हढ्यानेच अगदी खुश झाला. तिच्या चेहर्‍यावर खुशीची छटा नाहीये हे त्याच्या लक्षातच नाही आलं. दोघांनी मिळून तिचं सामान आत आणलं तर जेवण अगदी तयार होतं. बॅगा तिथेच हॉलमधे ठेवून राहूल जेवणाच्या टेबलकडे वळला. अल्पनाने कूलर मामींच्या स्वाधीन केला आणि ती पण निधि आणि निशा च्या बरोबर दुसया दिवसाचे प्लॅन ठरवू लागली.

गप्पा मारत, हसत खेळत जेवणं झाली. राहूलने आणि मामींनी मिळून कसा प्लॅन आखला. त्यात मामा कसे सर्व 'राज़' उघडकीस आणणार होते वगैरे थट्टा मस्करी झाली. जेवणं आवरल्यावर मामा मुलींना झोपवायच्या कामगिरीवर गेले. मामींनी अल्पनाला सकाळच्या तयारीसाठी मदत कर म्हणून सांगितलं आणि राहूलला म्हणाल्या 'बेटा अल्पना का सामान अपने कमरे में रख दो'. आता मात्र अल्पनाच्या चेहर्‍यावरचे भाव राहुलला लख्ख कळले. आपल्याबरोबर इतका वेळ एकत्र रहाणं तेही असं एखाद्या घरात याचं तिला दडपण वाटतंय हे त्याच्या लक्षात आलं. त्याने मामींकडे ' अप आप ही मुझे बचा लीजिये' अश चेहर्‍याने पाहिलं.

त्या मात्र काही न कळल्या सारखं दाखवत त्याला परत म्हणाल्या ' बेटा सामान रख दो जल्दीसे.' आणि अल्पनाचा हात धरून स्वैपाकघरात गेल्या देखील.


Shonoo
Tuesday, February 27, 2007 - 11:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किचनमधे आल्या आल्या मामींनी अल्पनाचा चेहरा दोन्ही हातात धरला आणि तिच्या डोळ्यात अगदी काहीतरी शोधत असल्या सारख्या बघू लागल्या. क्षण्- दोन क्षणच पण ते किती लांब वाटले अल्पनाला. डोळ्यातून आपल्या मनातल्या सगळ्या शंका, सगळी भिती त्यांना कळली असणार असं तिच्या मनात आलं. मामींनी दोन्ही हात काढून घेतले आणि अल्पनाचे दोन्ही हात आपल्या हातात धरले. अल्पना अगदी खूप आश्वासक वाटला तो स्पर्श. आपण पाय पडल्या वर आजी, आजोबा, आई, बाबा डोक्यावर हात ठेवतात अगदी तसंच. यांच्यात मुलींनी कोणाच्या पाया पडायची पद्धतच नाहिये पण अस विचार येऊन ती जराशी हसली.

एक दीर्घ निश्वास सोडून मामी म्हणाल्या ' आज मी जे काही सांगीन ते ऐकून घे. पूर्ण ऐक आणि मग तू काय तो निर्णय घे. माझा तुझ्यावर आणि राहुलवर पूर्ण विश्वास आहे'

मग मामींनि सांगायला सुरुवात केली- "राहुलची आई घरात सगळ्यांची लाडली, तालेवार घरातली मुलगी. तिच्या मर्जी विरुद्ध काही झालेलं खपत नसे. लग्न होऊन सासरी गेल्यावर सुद्धा माहेरच्या प्रत्येक गोष्टीत तिला मान मिळत असे. कालांतराने इतर भावजयांना हे पटेनासं झालं. हळू हळू सम्बंध बिनसू लागले. सासरच्यांशीही फारसं पटत नसे. पण राहुल चे वडील मनमिळाउ होते त्यामुळे नातेवाईकांनी अगदी वाळीत टाकलं नव्हतं येवढंच. त्यामुळे राहुलला ओळखीच्या लोकांची स्थळं सांगून येत नव्हती. त्याच्या आईने एका दोघांकडे आडून आडून विचारलं होतं त्यालाही ' आमची मुलगी पुढे शिकायचं म्हणतेय' वगैरे उत्तरं मिळाली होती.

बरं राहुलने कुठलीही मुलगी जर स्वत: पसंद केली असती तर त्यांनी काही ना काही खुसपटं काढलीच असती. राहुललाही हे माहित आहे. पण स्वत:ची आई आल्याने तो जास्त बोलू शकत नाही. वडीलांना बायकोच्या जाचाला रोज तोंड द्यावं लागतं त्यामुळे ते नाही म्हटलं तरी तिला बिचकून असतात. पण आम्ही त्याच्या वडिलांशी बोललो आहोत. त्यांचा तुम्हाला पूर्ण पाठिम्बा आहे"

" तुला या सगळ्या प्रकरणामधे मनस्ताप नक्कीच होईल. पण eventually she will accept you . तुला थोडं त्यांच्या कलानं घ्यावं लागेल. किती झालं तरी राहुल त्यांचा एकुलता एक मुलगा आहे."

अल्पनाच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. मामींना का आपल्या बद्दल एवढी काळजी? नाहीच जमलं तर आपण काय एकदम जीव वगैरे नाही देणार. अजून दुसर्‍या कोणाचा विचार सध्या तरी मनात येणार नाही हे खरंय. पण काळाचा महिमा आपण जाणतोच. यथावकाश कोणी ना कोणी मनासारखा जोडीदार भेटेलच की.

मामींनी जणू तिच्या मनातले सगळे विचार वाचलेच होते. "अगं मलाही माहिती आहे की तुम्हाला दोघांनी सहज दुसरा जोडीदार मिळेल. पण थोड्याशा विरोधाने तू इतकी नाउमेद का झालीस? का इतक्या सहजा सहजी सोडून द्यायला तयार झालीस? जो पर्यंत राहुल तुझ्या बरोबर आहे तोपर्यंत तू हार मानू नकोस. Promise? "


Shonoo
Tuesday, February 27, 2007 - 11:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मामींनी अल्पनाचे डोळे पुसले, डोक्यावर थोपटल्या सारखं केलं आणि म्हणाल्या ' चलो तुरंत जाके सो जाओ. कल सुबह मामाजी जल्दी उठायेंगे सबको.' अल्पना परत घुटमळली. राहूल बॅग ठेवायला म्हणून जो गेला होता तो अजुनही खाली आलाच नव्हता. त्याच्या बरोबर तीन दिवस under the same roof कसे काढायचे म्हणून अल्पना धास्तावली होती आणि इथे मामींनी तर दोघांना एकच रूम बहाल केली होती! आता कसं होईल आपलं? एकदम तिला पल्लवीची चिठ्ठी आठवली. तिने मामींना विचारलं ' पल्लवी को ये सब पता था क्या?'

मामी म्हणाल्या 'सांगितलं ना मघाशीच की माझा तुमच्या दोघांवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही दोघे सज्ञान आहात, मिळवते आहात. इथे मी कोणा एकाला कोचावर झोपायला सांगू शकते. पण इतर वेळी तुम्ही काय करता यावर कोण नजर ठेवील? जा जा पुढचे सगळे प्लॅन्स ठरवायची हीच वेळ आहे. आपल्या या ट्रिप बद्दल दिल्ली ला कळताच तिथून कशा तोफा डागल्या जातील ते पहाशीलच तू. जा बेटा! एकमेकांवर विश्वास काय चीज असते ती तुम्हाला दोघांनीही कळू देत. Good night! '

जड पावलांनी आणि धडधडत्या ह्रुदयाने ती वर निघाली. वरच्या मजल्यावर येता येताच तिला राहुल दिसल. खोलीच्या दारात उभा राहून तो त्यांचं बोलणं ऐकत होता. तिला पाहून तो जरासा बाजूला सरकला आणि तिच्या पाठोपाठ आत आला. त्याने तिची बॅग उघडून सर्व कपडे कपाटात व्यवस्थित लावले होते. victoria secret ची बॅग कपाटाच्या तळाशी होती आनि एक पजामा सेट बाथरूम मधे ठेवला होता. एक दृष्टिक्षेपातच हे सगळं तिच्या लक्षात आलं.

पण ती त्याच्या कडे वळली तेंव्हाच तिने पाहिलं की खोलीत पलंगाशिवाय आणखीन एक Futon पण आहे आणि राहुलचा पायजमा-कुर्ता त्याच्यावर ठेवलेला आहे. आता मात्र ती आपणहून त्याला बिलगली आणि कुजबुजली ' वाह रे विश्वासराव.'



Shonoo
Tuesday, February 27, 2007 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल्पनिक आणि समाप्त बरं का! आणि एका दमात 'सम्पा' केल्याबद्दल मी अगोदरच स्वत:ची पाठ थोपटतेय. त्या दुसया अपूर्ण गोष्टीचे उल्लेख करु नयेत ही 'विनम्रतासे' विनंती.

Psg
Wednesday, February 28, 2007 - 12:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, वेगळी कथा, आवडली..
आणि समाप्त केल्याबद्दल 'धन्यवाद'..
हे 'समाप्त'चे बोर्ड 'सर्व' कथांवर लावले तरी चालतात बरका


Bee
Wednesday, February 28, 2007 - 12:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथेची डेप्थ छान आहे शोनू. इतक्या डेप्थ मधे तुला शिरायला जमलं म्हणजे तू आता लेखिका शोनू झालीयेस असेच समज :-)

R_joshi
Wednesday, February 28, 2007 - 2:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनु खुपच छान लिहिलिस कथा. एका दमात पुर्ण केलिस त्याबद्द्ल आभारी आहे.:-)

Maku
Wednesday, February 28, 2007 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shonoo छान आहे कथा .

Jhuluuk
Wednesday, February 28, 2007 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनु, छान आहे कथा..
अजुन मोठी पण चालली असती, पण वेळेत सम्पवली ते ही ठिकच :-)


Milindaa
Wednesday, February 28, 2007 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या दुसया अपूर्ण गोष्टीचे उल्लेख करु नयेत ही 'विनम्रतासे' विनंती. <<
कोणती अपूर्ण गोष्ट गं शोनू?

Shonoo
Wednesday, February 28, 2007 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा

आता विचारलंच आहे तर ( तेही दात विचकून) नव्या महिन्यात हलवणार का प्लीज?


Asami
Wednesday, February 28, 2007 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम ओघवती लिहिलीस. शन्नांच्या गोष्टीची आठवण झाली एकदम

Shonoo
Wednesday, February 28, 2007 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी, बी, झूळुक, पूनम मिलिन्दा, रूपा, मकु धन्यवाद.
थेट शन्ना म्हणजे फारच कौतुक झालं की. आता फक्त एखाद्या चित्रपट निर्मात्याने विचारायचं राहिलं :-)


Sanghamitra
Thursday, March 01, 2007 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे हं गोष्ट शोनू.
आता फक्त एखाद्या चित्रपट निर्मात्याने विचारायचं राहिलं :-)
करणचा फोन नाही आला? निघालाच आहे तो. रानी आणि अभीचे कॉस्च्युम्स पण तयार आहेत.


Bee
Thursday, March 01, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राणी आणि अभी असेल तर मी तरी हा चित्रपट बघणार नाही. भले शोनू एक फ़्री पास मला देईन तरी देखील.. :-)

Chinnu
Thursday, March 01, 2007 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, छान आहे गोष्ट. पण बेनझीर इतकी नाही! :-)

Maitreyee
Thursday, March 01, 2007 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

करण त्या खोलीतला फ़ुटॉन काढून टाकेल बर का पण :-O
शोनू.. छान आहे कथा!
असाम्या तुला 'शहाणी सकाळ' आठवली का शन्नांची:-)



Chinnu
Thursday, March 01, 2007 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी फुटॉन काढला की स्टोरीचे नाव अविश्वास का? :-)
सन्मी :-)


Asmaani
Saturday, March 03, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

exactly मैत्रेयी! मला पण आठवली ती "शहाणी सकाल ". शोनू, सुंदर कथा. आवडली.

Varadakanitkar
Monday, March 12, 2007 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती छान गोष्ट आहे..थोडक्यात पण खूप सांगून जाणारी... आणि लिहिण्याची style पण खूपच सुंदर..

Abhiyadav
Monday, March 12, 2007 - 11:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

karan johar ne KANK movie deun saglya vishwasacha aadhich chotha kela aahe.

SHONOO chi katha kityek pat chhan aahe.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators