« | »




विडंबन

चाल : कोण होतास तू...

प्रेमिकेची थोरवी या दुनियेने गायली
अनेक रूपे ही तुझी ह्या दुनियेने पाहिली

कोण होतीस तू ! काय झालीस तू !
अगं वेडे कशी कात टाकलीस तू !

कोण होतीस तू ! काय झालीस तू ||

-------

सुंदर रूप तुझे प्रेमळ भारी
होतीस अशी तू चंद्र चकोरी

अबोल अधर, अधरात हासू
सख्याच्या काळजीने डोळ्यात आसू

होतीस लैला तू, होतीस हीर तू, होतीस सुमन तू, होतीस शिरी तू
रश्मी अल्लड महान झाली ! राजसाठी जगुनी मेली

लगीन जाहले, तू ही बदलली
नवर्‍याच्या जीवावर 'वाढीला' लागली
नवर्‍याची जाण नाही, शॉपिंगचे भान नाही
कजाग बायको अशी बदनाम झालीस तू
तू अशी सजणी होती ! ऐश्वर्या, राणी होती
वासुची सप्ना होऊन जगलीस, मेलीस तू

कोण होतीस तू ! काय झालीस तू !
अगं वेडे कशी कात टाकलीस तू !

कोण होतीस तू ! काय झालीस तू ||

-------

प्रियकराची थोरवी या दुनियेने गायिली
अनेक रूपे तुझीही त्याच दुनियेने पाहिली

कोण होतास तू ! काय झालास तू !
अरे वेड्या कसा बदलून गेलास तू !

खट्याळ रूप तुझे प्रेमदिवाणे
'नाही' ला 'नाही' माझ्या, हो ला हो म्हणणे

पैशाची तमा नव्हती, भेटींची रास होती
वेळेची पर्वा नव्हती, भेटीची आस होती

होतास मजनू तू, होतास रांझा तू, होतास प्रेम तू, वेडा फ़रहाद तू
'राज'पूत तर महान झाला
रश्मी साठी जिवाला मुकला

लगीन जाहले, तूही बदलला
बायकोवर घर टाकून, पुरा उधळला
फुकटची अरेरावी, सदोदीत चालू टी.व्ही.
खादाड, ऐदी असा बदनाम झालास तू

तू असा डॉन होता, अभिषेक, जॉन होता
सिम्रनचा राज म्हणून प्रेमात पडलास तू

कोण होतास तू ! काय झालास तू !
अरे वेड्या कसा बदलून गेलास तू !
कोण होतास तू ! काय झालास तू ||

-----------

लाजवंती कालची तू, का शूर्पणखा होई
बेछूट तुझ्या बोलण्याला धरबंध आज नाही

कोण होतीस तू ! काय झालीस तू !
अगं वेडे कशी कात टाकलीस तू !

वाचाळ तोंड तुझे फटकळ बोलणे
सासरच्या सार्‍यांना शब्दांनी झोडणे

कालची सखी आज नकोशी पीडा झाली
प्रत्येक वेळी जाब, संशयी किडा झाली

म्हणे बुढी घोडी, सुंदर मी होणार
बियुटीपार्लर मध्ये पैसे उधळणार
सोन्याचा संसार सारा फुंकीत चाललीस तू

तू अशी सजणी होती ! ऐश्वर्या, राणी होती
वासुची सप्ना होऊन जगलीस, मेलीस तू

कोण होतीस तू ! काय झालीस तू !
अगं वेडे कशी कात टाकलीस तू !

कोण होतीस तू ! काय झालीस तू ||

------

काल तुझ्या हाती अंगठी होती, प्रेमिकेचा तू गुलाम
आज तुझ्या हाती बाटली आणि पिणे बेलगाम

कोण होतास तू ! काय झालास तू !
अरे वेड्या कसा वाया गेलास तू !

काय तुझी व्यसने ही, कहर झाला
त्यापेक्षा दे मला जहर प्यायला

मित्रांचे टोळके, पत्यांचे डाव
सिगरेटचे झुरके, खाण्यावर ताव

जात तुझी आळशी, नावाला बाप
जरा मूल रडताच, डोक्याला ताप
मर्दपणा तुझा घडोघडी लादलास तू

तू असा डॉन होता, अभिषेक, जॉन होता
सिम्रनचा राज म्हणून प्रेमात पडलास तू

कोण होतास तू ! काय झालास तू !
अरे वेड्या कसा बदलून गेलास तू !

कोण होतास तू ! काय झालास तू ||


- मिल्या.