« | »




सुमाचं लग्न

"काय हो, पत्रां आसत काय कोनाची?" रस्त्याने जाणार्‍या पोस्टमनला पकल्याने आवाज दिला. एकदा गुरं चरायला सोडली, की तो रस्त्याने येणार्‍या - जाणार्‍या लोकांबरोबर गजाली करायला रिकामाच असे. येणार्‍या - जाणार्‍याला मुद्दाम थांबवलं नाही तर वेळ जाणार कसा, हे त्यालाही माहीत होतं.

"तुका रोज रोज पत्रां लिवाक तू का सवताक मिनिश्टर समाजतस काय?" पकल्याच्या रोजच्या प्रश्नावर पोस्टमनाचं उत्तरही ठरलेलं होतं. पण कधी कधी त्याला पकल्याच्या उपयोगही व्हायचा. त्याच्या शेजारपाजारची तीन चार पत्रं आपल्या पिशवीतून त्याने बाहेर काढली. पकल्या भेटला, म्हणजे आज त्या अवाठापर्यंत जायची गरज नाही, हा विचार त्याच्या मनात आला. गावची पद्धत अशीच. दहाबारा दिवसानी कधीतरी एकदाच पोस्टमनचे दर्शन होई. ते पण कधी कोणाची मनीऑर्डर नाहीतर तार असली तरच. बाकी पत्रं बहुतेकवेळा वाटेत भेटलेल्या शेजार्‍यांमार्फतच घरी पोहोचायची.

"आसत आसत तर. दोन तीन तरी पत्रां आसत. देशीत काय रे?" पोस्टमन विचारता झाला.

"देन तर काय? आजपर्यंत एकतरी पत्र कदी हरावला काय?" पकल्याने हात पुढे केला.

"आज तुझ्या आवशीचां एक पत्र आसात तेच्यात," पोष्टमनने सगळी पत्रं पकल्याचा स्वाधीन केली.

"आयेक पत्र कोणी लिवला?" पकल्या विचारणार होता, पण पोस्टमनने घाईघाईने वाट धरली. तशीच सगळी पत्रं त्याने खिश्यात ढकलून "हैक, हैक" करीत शेजार्‍याच्या बैलाची झुंज खेळणार्‍या आपल्या बैलामागे पकल्या धावला. "फटकेचो वांको येव ते तुझ्यार," ओरडत त्याने दोन चार ढेकळं बैलावर भिरकावेपर्यंत पकल्या पत्राची गोष्ट विसरला.

पेजेची वेळ झाली तशी सगळी गुरं गोठ्यात बांधून, पकल्याने हातपाय धुऊन घेतले, आणि गप्पा मारण्यासाठी तो दाजीच्या दुकानाकडे निघाला. दाजी तिथेच एका खांबाला टेकून बसला होता, तर शेजारी जगल्या कसल्यातरी लाकडाची मापं घेत होता.

"काय रे काय करतास?" विचारत पकल्या तिथेच टेकला.

"काय नाय, लग्नाक जावची तयारी चललली, तुका आमंत्राण इला नाय?" जगल्याने हातातली शिसली कानाना लावली.

"लगीन? कोणाचा? माका कोणी सांगलां नाय ता?" पकल्याचा प्रश्न.

"असां काय? व्हकाल तुझ्या शेजारा आणि तिंया शोदतस बाजारा? आमका शेंडी लावतस काय? सुमलां तुमच्या अवाठातलां मारे?" दाजीने पकल्याला आठवण करून दिली. "तेच्या बापाशीन सगळ्यांक पोष्टान पत्रिका पाठवल्यान..... तुका नाय इली?"

"पत्रिका काय दिसली नाय, पण एक पाकीट इलां आज... आयेच्या नावार आसा," पकल्याने खिश्यातून एक पाकीट काढलं. शेजार्‍यांची दोन चार पत्रं पण त्याबरोबर बाहेर पडली. "कोणाचां काय ता काय कळणां नाय," पाकिटावर नजर टाकत पकल्या म्हणाला.

"मेल्या कदी शाळेत गेल्लं? लिवललां बगलं तरी तुका समाजतालां काय गुंडे?" जगल्याने पाकीट खेचायचा प्रयत्न केला.

"लिवणां नाय समजना, पण कोणी पत्तो घातलो असतो, तर दिसतलो मा? धाडणार्‍याचां नांव, पत्त्या काय नाय," पकल्याने पाकीट उलटसुलट करून बघितलं.

"हाड हडे, मी वाचतंय. तुझ्या पेक्षा चार इयत्ता जास्ती शिकलंय मी," जगल्याने पाकीट ताब्यात घेतलं.

पाकीट फोडून, त्याने आधी डोळे बारीक केले, आणि वाचायला सुरुवात केली.

"पकल्याच्या.. आयेस... सा... काय तरी कायतरी... काय मेल्यांचा अक्षार लागात तर शप्पत. नुसते कोंबडेचे डोकले काडल्यान दिसता. ह्या सा... कायतरी... कायतरी काय असता?" जगल्याला प्रश्न पडला.

"चार इयत्ता जास्त शिकलस मा? मगे तूच सांग मरे, " पकल्याला चान्स मिळाला.

"इयत्ता शिकलंय खरो, पण आमच्या मास्तरांचा अक्षार बरां होता. ही जी कोणी घाण जी केल्यान पत्रात त्येच्यातसून एक शब्द लागात तर शप्पत."

"सान म्हणजे बघ, तीनसाना लिवल्यान असताल्यान म्हणान सान कायतां लिवल्यान... तू फुडे वाच," दाजीने डोकं चालवलं.

"सुमल्याचे ल... ल हां हां लग्न ठ.... र.... , " एक एक अक्षर जोडीत जगल्याने अजून वाचण्याचा प्रयत्न केला.

"अरे काय वाचूक घेतलास?" पायातले चप्पल काढता काढता दादाने प्रश्न केला.

"ब्रम्हदेवाची लिपी वाचतों. तेका तरी वाचूक जमात का काय कोणात ठावक?" जगल्याने हात जोडले. जगल्याच्या हातातलं पत्र दादाच्या हातात आलं. एक दोनदा डोळे चोळून दादाने वाचायचा प्रयत्न केला.

"काय अक्षार आसां ह्यां? लिवणारो आंदळो आसा का काय कोणाक ठावक." डोळे अजूनच बारीक करून दादाने पुन्हा प्रयत्न केला. काही वाक्य कशीबशी वाचल्यावर,

"सुमल्याच्या लग्नाची बातमी आसा," दादाने पत्राचा अर्थ सांगायला सुरुवात केली.

"फुडच्या म्हयनात लगीन आसा, लग्नाची तयारी झाल्लली आसा," एक एक शब्द लावीत दादा पत्र वाचू लागला.

"आं आणि ह्यां काय लिवलां पकल्याने सुमल्यापासून.... लांब र.. हा... वे... नाहीतर परिणाम बरोबर होवचे नाय... तुमका तेचे मू.. ल. ठावक आसत.. काय? तुमका तेचे मुल ठावक आसत?", दादाने परत वाचून खात्री केली.

"पकल्या, तुका धमकी देता लिणारो. भानगड केलस की काय?" जगल्या पकल्याकडे बघू लागला.

"मी आणि भानगड? कायतरीच काय?" पकल्याने खांदे उडवले.

"भानगड नायतर काय? तुका कोण धमकी कित्याक देत? आणि सुमल्याक मुल झाला कदी? पकल्या, अरे काय मेल्या हे धंदे?" दाजीने अजून किल्ली फिरवली.

"तुमीच मेल्यानू काय तरी लिवला असतालात. माजो आणि सुमल्याचो सम्मंद तरी आसा? काय वाट्टत तां बोलश्यात काय?"

"नाय कशी? गेल्या म्हयन्यात पाननीत गजाली नाय करी होतस तू सुमल्यावांगडा?" इति जगल्या.

"अरे पण वळखीच्या मानसा वांगडा चार गजाली केले तर पोरांटोरां जातत काय?" पकल्या वैतागला. "कसले मित्र तुमी? तां आमच्या मागे फुडे मोठां झालां, तेच्या बरोबर भानगड कोण करीत? तुमका काय काळीज आसा काय नाय?" पकल्याने सगळ्यांना सरळ फैलार घेतलं.

"तसां न्हय रे. पण हो लिणारो काय म्हणतासा तां बग. तेचां म्हणणां आसा सुमल्याक मुल झाला म्हणान," दादाने पुन्हा पत्र वाचून खात्री केली.

"मुल झाला, तर काय मी तेचा नांव ठेवाक जांव काय? आणि काय रे दादा, कोण गुरवार असलां तर तेचां पाॅट दिसतलां नाय? तां हंय गावातच रवता. तिंया बगललस तेका मोठां पाॅट घेवान फिरताना? काय धाकटां पण दडवन झालां?"

"तिंया म्हणतस तां खरां हां. म्हस गाभण रवली तरी सगळ्या गावाक बातमी असता, तर असा काय झाला तर लोकांक पत्त्या नाय, असां कसां होयत?" दादाचा तर्क.

"अरे कोणीतरी मेल्यान आपल्या गावच्या पोराची बदनामी केली, आणि माजां नांव तेच्यात घातलां. चोर सोडून सन्याश्याक सुळार देवक उबे रवलात बरे," पकल्या आता चांगलाच पेटला होता.

"पकलो म्हणता तां खरां आसा हां, पण हो लिवणारो गावता कसो हाताक? मगे आपण तेचे दात शाप तोडून टाकले असते," दाजीने उपाय शोधला.

"तां काय तां मी बगतंय. लिवणारो किती शाणो असलो, तरी मी बरोब्बर शोदतंय तेका. पकल्या, चल जरा मास्तरांकडे जावया," दादाने पायताण चढवली.

मास्तरांच्या घराकडे जाईपर्यंत पकल्या गप्पगप्प होता. घर जवळ आलं तसा त्याचा धीर सुटायला लागला.

"अरे पण मास्तरांका पत्र दाखवलस तर गावभर गजाल जातली नाय?"

"वगी रव रे. मी बरोबर काय तां करतंय," तेवढ्यात मास्तर येताना दिसले.

"मास्तर, तुमच्याकडे याक काम आसा," दादाने सुरुवात केली.

"काय म्हणतोस दादा? आज काय काम काढलेस?" मास्तरानी त्यांच्या नेहमीच्या संथ, शांत सुरात प्रश्न केला. गावतली बरीच मुलं मास्तरांच्या हाताखालून गेलेली. मास्तर अक्षर नक्की ओळखणार अशी दादाची खात्री झाली.

"नाय, तसां काय विशेष काम नाय, पण एक अक्षार वळखुचां होतां," दादाने पत्राची नीट घडी घालून फक्त पत्ता दिसेल असं पत्र मास्तरांच्या पुढे केलं.

"पत्रात काय आहे ते मी विचारू नये, अशी तुझी अपेक्षा दिसते," मास्तर हसत म्हणाले.

"तसांच समजा. ह्या पत्रान मोठो घोळ केलोहा. बगतंय लिवणारो हातीक गावता काय," दादाने पुन्हा बाजू मारून नेली.

"तेतुरली गजाल मात्र मास्तरांका...." पकल्या बोलणार होता, पण दादाने पकल्याचा हात दाबला. मास्तरांच्याही ते लक्षात आलं.

"अरे असू दे. मला काय करायच्या आहेत नसत्या चौकश्या##.....## पण हे अक्षर माझ्यातरी एकाही विद्यार्थ्याचे वाटत नाही. मुळात तुमच्या गावात एकूण एकाचे अक्षर वाईट, त्यात धड शाळेत कुणी येत नाही, मग अक्षर वळणदार होणार कसे?" मास्तरांनी बोलायला सुरुवात केली, तसा दादा पटकन उठला. दादाच्या मागोमाग चप्पल पायात सरकवून पकल्या बाहेर पडला, आणि मास्तरांच्या बडबडीकडे लक्ष न देता ते चालू लागले.

"तरी मी तुका सांगा होतंय, दुसर्‍या कोणाक पत्र दाखव नको म्हणान," पकल्याने परत सुरुवात केली.

"दाखवलंय नाय, तर शोदतलस कसो? आणि शोदलस नाय, तर सुमल्याच्या होणार्‍या घोवाची काय इज्जत रवली?" दादाने प्रश्न टाकला.

"आता सुमल्याची इज्जत काय तेच्या घोवाची?" पकल्याचा प्रश्न.

"कोणाची पण असना, पण गावची अब्रू गेली काय गेली. ती काय परत येवची नाय. तेवां मी आत्ता पोस्टमास्तरांकडे जातंय. बगुया तेंका काय कळता काय?" दादाने वाट बदलली. दादा बरोबर पकल्याची वाट पण बदलली आणि तो दादाबरोबर पोस्टाच्या दिशेने निघाला.

पोस्टमास्तरांना पण तो पत्ता वाचून, अक्षर ओळखता येईना. तरी दादाने थोडा जोर धरला. "पण पोष्टाक खंयच्या पडलां तां सांगश्यात काय नाय?" दादाचा प्रश्न.

"आता ह्यावर शिक्का नीट उमटला नाही तर मी काय करू? आम्ही प्रत्येक पत्रावर लक्ष ठेऊ शकतो का?"

सगळीकडून निराशा पदरात पडली, तरी दादा तसा हाय खाणारा नव्हता. सुमल्याचं लग्न चार दिवसावर आलं, तसा दादा खडबडून जागा झाला. गावच्या चार मोठ्या माणसांना एकत्र करून त्याने खरं खोटं काय ते ठरवायचा निश्चय केला. जगल्या, दाजी, पकल्या, आणि दादा सगळे तात्यांच्या घरी जमले. जो काही ठराव होईल तो मास्तरांच्या साक्षीने व्हावा म्हणून मास्तरांना निरोप गेला. इकडे सुमा नाही तर त्यांच्या घरातून कोण तरी हवं म्हणून सुमाच्या बापाला बोलवायला कुणीतरी गेलं. लग्नाच्या गडबडीत सुमाचा बाप कुठेतरी गेला होता, तेवां तेच्या आईने आपल्या थोरल्या मुलाला पाठवलं. सगळे जमले आणि बैठकीला सुरुवात झाली. घसा खाकरून दादा बोलायला उभा राहिला.

"आमका एक पत्र इलांहा. म्हणजे पकल्याच्या आवशीच्या नावान. आणि पत्रात जो मजकूर कोणी लिवलो हा तो आमी तुमच्या समोर मांडतो," थोडा भाव खात दादाने सगळीकडे नजर फिरवली.

"पत्रात काय आसां तां सांगाच्या आदी मी तुमका सांगतंय की आमी मास्तरांकडे, पोस्टमास्तरांकडे आणि इतर महत्वाच्या लोकांकडे आदीच चौकशी करून, तां पत्र कोणी लिवलां तां शोदुचो प्रयत्न केलो.... पण आमका कोण गावलो नाय," दादाला भरपूर काहीतरी बोलायचं होतं पण...

"अरे दादा, नमनार अडान रवतलस काय फुडे सराकशीत थोडो?" तात्यांच्या प्रश्नामुळे दादाला आवरतं घ्यायला लागलं.

"सांगतंय.... पत्रात पकल्यार गंभीर आरोप केलेले आसत." इथे पकल्याने मान खाली घातली. "पण ते सगळे खोटे आसत अशी पकल्यान आमची खात्री करून दिलिहा," दादाने वाक्य पूर्ण करून सभोवार नजर टाकली. इथे सुमाचा भाऊ अरण्या उभा राहिला.

"खयलां काय तां पत्र जरा बगुया तरी?" त्याने त्याचा प्रश्न फेकला. अरण्या भडकेल या भीतीने दादा थोडा मागे सरकला. पत्र एकदम त्याच्या हातात द्यावे की नाही हा विचार करीत दादाने खिश्यातून हळूच पत्र भाहेर काढलं. पत्राकडे बघून अरण्या स्वतःच थबकला.

"अरे तां पत्र, माका ठवक आसा. मियांच लिवलंय तां, " समोर बसलेल्या मंडळींचा काहीही विचार न करता अरण्याने सांगून टाकलं.

"काय?" पकल्याने टुणकन उडीच मारली. प्रश्न त्याच्याकडून आला असला तरी सगळे त्याच उत्तराची वाट बघत होते.

"सवताच्या भयणीबद्दल असां कायय लिवतस? आणि माजां लफडां आसा असां लिवतस?" अरण्याच्या कानाखाली वाजवायला पकल्याचा हात पुढे झाला. अरण्या दचकून मागे सरकला, पण तोपर्यंत सगळेच इतक्या जोरात बोलू लागले, की तात्यांना सगळ्यांना शांत करावं लागलं.

"अरे सगळे कवा कवा काय करतास? एका वेळाक येकान बोला रे. आदी अरण्याक काय तां सांगादेत," तात्यांनी बैठकीला शांत केलं.

"मी सुमल्याक आणि पकल्याक पाननीत गजाली करताना बगलंय. दोगां मोठ्या मोठ्यान हसां होती, आणि हळूहळू बोलां होती. म्हणान माका वाटलां...."

"आमची भानगड आसा म्हणान," पकल्या पुन्हा उसळून उभा राहिला. "तेका येदा असल्यापासून मी वळाखतंय," ती केवढी होती ते दाखवत तो म्हणाला.

"आता माका काय ठावक? तेचां लगीन करूचां आसा असा आज्यान सांगल्यान. कायतरी भानगड नको, म्हणान मिया पकल्याक धमकेचा पत्र लिवलंय," अरण्याने मान खाली घातली, आणि पकल्याने डोक्याला हात लावला.

"तां जावंदे. पण आता तिंयाच लिवलस तर तिंयाच सुमल्याचा मुल आमका दाखय. बापुस दाखव नायतर श्राध्द कर," दादा पाऊल मागे घ्यायला तयार नव्हता.

"काय? सुमल्याक मुल? आणि झाला कदी आणि कसां?" किंचाळायची पाळी आता अरण्याची होती.

"दादा, तुका कोणी सांगलां रे सुमल्याक धाकटां आसा म्हणान?" तात्यानी विचारलं.

"आता अरण्याकच विचारा, विचारा तुमी, " दादानं अरण्याकडे बोट केलं.

"दादा, कायतरी बडबडा नको, माझ्या भयणीबद्दल कायतरी बोलशीत तर खून करीन तुजो," अरण्या नसलेली छाती बाहेर काढत म्हणाला.

"माका काय विचारतस? तिंया सवताच लिवलस, ह्या बग, 'तिचे मुल तुम्हाला माहीत आहेच'," दादा पत्र उडवीत म्हणाला.

"असां मी लिवलंय? खंय लिवलंय दाखव तरी," अरण्याने पत्र ताब्यात घेतलं. पत्रात काय काय लिहिलंय ते वाचायला बहुतेकांनी आपलं डोकं त्यात घालण्याचा प्रयत्न केला.

"रे दादा जरा थांब," हे प्रकरण पुन्हा काहीतरी वळण घेणार हे तात्यांच्या लक्षात आलं.

"ह्या काय? तिंया लिवलस नाय?" दादा थांबायला तयार नव्हता.

"अरे मेल्या मुल न्हय.... तिचे गुण लिवलंय मी..... तिचे गुण तुम्हाला माहितच आहेत, असां लिवलंय... मुल खंय आसा?"

"काय?" कुणीतरी ओरडलं. फुग्यातली हवा निघावी तशी बैठकीची अवस्था झाली, आणि क्षणापूर्वी मारामारी होईल असं वाटत होतं, तिथे सगळे हसायला लागले.

"बग दादा, आज परत घोटाळो घातलस तिंया, कित्याक वगीच हेरगिरी करूक जातस?" तात्यांचं हे वाक्य दादा सोडला तर कुणालाच ऐकू आलं नाही.

"तरी मी तुम्हाला सांगत होतो, शाळेत येत जा. अरे शाळेत आला असता तर लिहिता वाचता आलं असतं..." मास्तरांची बडबड चालूच राहिली. त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच सगळे तिथून पसार झाले.

- विनय देसाई.