« | »




हृषिदा...

चित्रपटांबद्दल फक्त 'पाहणे' इतकाच दृष्टिकोन असण्याच्या वयात केव्हा तरी एकदा 'असली नकली' चित्रपट पाहण्यात आला. आणि इतका आवडला की बस्स! त्यातल्या साधानावर चित्रित केलेले 'तेरा मेरा प्यार अमर' आजही तितकेच आवडते आणि भावते, जितके पहिल्या खेपेला आवडले होते. एरवी साधनाचा प्रसिद्ध 'साधना कट' मला अगदीच नावडता प्रकार वाटत असल्याने त्यातले साधनाचे साधे सरळ रूप त्या वयात अधिकच गोड आणि सुंदर वाटले होते. त्या चित्रपटात डोकावणारा समाजवाद तितकाच भावला होता. खरं तर दिग्दर्शक वगैरे काय प्रकार असतो ते तितकसं माहीत नव्हतंच तेव्हा! नंतर जेव्हा दिग्दर्शकचं काम काय असतं ते उमगलं तेव्हा चित्रपटातल्या कलाकारांपेक्षाही संगीतकार, गीतकार, लेखक मंडळ आणि दिग्दर्शकाचं नाव वाचायचा छंदच जडला. आणि अशाच काही आवडत्या चित्रपटांचे दिग्दर्शक नेमके हृषिकेश मुखर्जी आहेत हे वाचून माणूस जामच आवडून गेला. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला काय दिलंय यापेक्षा मला त्यांनी किती आवडीचे चित्रपट दिलेत इतका संकुचित आणि स्वार्थी विचार केला तरी या माणसाबद्दल खूप आदर वाटतो!

१९२२ मध्ये बंगालात जन्मलेले हृषिदा विज्ञानाचे पदवीधर असूनही चित्रपट माध्यमाकडे वळले ते बिमल रॉय यांच्या टीममध्ये एक एडीटर म्हणून! त्या काळच्या चित्रक्षेत्रावर बंगाली बाबूंचा एकूणच वरचष्मा होता. त्या काळच्या बंगालातल्या सांस्कृतिक क्षेत्राचा आणि प्रागतिक विचारांचा प्रभाव अर्थातच हृषिदांवर होता. सुरुवातीला बिमल रॉय यांच्याबरोबर त्यांनी एडीटर म्हणून काम केले. १९५३ मध्ये जेव्हा बिमल रॉय यांनी सलील चौधरी यांच्या एका लघुकथेवर आधारीत चित्रपट निर्मिला त्यात हृषिदांनी पटकथा लिहिली होती. त्याचबरोबर त्यांना आवडते असणारे संपादनही त्यांचेच होते. आणि यावेळेस बिमलदांचे ते मुख्य सहाय्यक दिगदर्शक म्हणूनही काम पाहत होते. या चित्रपटाने इतिहास घडविला. चित्रपटाचे नाव होते 'दो बिघा ज़मीन'!
बिमलदांच्या छायेतून बाहेर येऊन पुढे त्यांनी स्वतःचा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला तो म्हणजे १९५७ सालचा 'मुसाफ़िर'! वेगवेगळ्या तीन कथा एकाच सूत्रात गुंफून त्यांनी स्वतःची एक चुणूक दाखवून दिली. त्यातूनच त्यांना पुढचा चित्रपट मिळाला 'अनाडी'. या चित्रपटाने त्यांना हिंदी चित्रसृष्टीच्या मुख्य प्रवाहात आणून ठेवले. त्यानंतर आलेल्या 'अनुराधा' ला उत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. मात्र या चित्रपटाच्या व्यावसायिक गर्तेतून बाहेर येण्यासाठी निर्माण केलेला 'असली नकली' खूप यशस्वी झाला. चित्रपट व्यावसायिक गणिते बघून निर्मित असला तरी एका स्वप्नाळू समाजवादाची आणि आदर्शवादाची पार्श्वभूमी यालाही लाभली होती. बिमल रॉय यांचा प्रभाव हृषिदांच्या तोपर्यंतच्या चित्रपटांवर निश्चितच जाणवत होता.

अनाडीनंतरच्या काळात हृषिदा एका कथेवर काम करत होते आणि राज कपूरला मध्यवर्ती भूमिकेत बसवूनच त्यांचे काम चालू होते. परंतु हृषिदांना राज कपूरला त्या भूमिकेत बघणे नंतर जड जाऊ लागले. कारण होते, कथानायकाचा मृत्यू! पुढे त्यांनी या चित्रपटात राजेश खन्नाला घेतले. चित्रपटाने पुन्हा एकदा इतिहास घडवला. नाव होते 'आनंद'! राजेश खन्ना आणि अमिताभ दोघांसाठी हा चित्रपट एक मैलाचा दगड ठरला. कोण विसरू शकेल तिरकी मान करून डोळ्यात वेदना घेऊन तोंडभर हसू मिरवत 'बाबू मोशाय' म्हणणारा राजेश खन्ना आणि आपल्याच असहायतेवर चिडणारा अमिताभ! दोघांनाही त्या वर्षी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष उल्लेखनीय म्हणजे अमिताभचा हा दुसराच चित्रपट होता.

१९७० साली आलेल्या 'आनंद'पासून एका नव्याच युगाचा प्रारंभ झाला होता. त्यानंतर आलेले चित्रपट म्हणजे : चित्रपटनायकावर आकृष्ट झालेल्या जया बच्चनचा 'गुड्डी', वेगळ्याच प्रकारे समाजसुधारणा करणारा राजेश खन्नाचा 'बावर्ची', गायनात पतिपेक्षा उजवी असणारी गायिका पत्नी आणि तिचा पती यांच्यातील भावनिक संघर्षावर बेतलेला 'अभिमान', 'आनंद'च्याच मुख्य कथानकावर बेतलेला नायिकाप्रधान 'मिली', दोन मित्रांमधल्या तत्त्वनिष्ठ संघर्षावर असणारा 'नमक हराम', धर्मेंद्र आणि अमिताभच्या धमाल विनोदाने सजलेला 'चुपके चुपके', रेखाच्या अदाकारीने सजलेला 'खूबसुरत' आणि उत्पल दत्त, अमोल पालेकर यांनी धमाल उडवून दिलेला 'गोलमाल' असे सगळेच चित्रपट व्यावसयिकदृष्ट्या यशस्वी झालेच पण आजही सदाबहार आणि उत्कृष्ट चित्रपट म्हणून गणले जातात. एक लक्षात येतं सामान्य माणसांच्या जवळ जाणार्‍या व्यक्तिरेखा साकारतांना, त्यांचे जीवनसंघर्ष, त्यांची सुखदुःखं मार्मिकपणे टिपताना हृषिदा अधिक रंगून जात. याचाच प्रत्यय त्यांनी दिगदर्शित केलेल्या हम हिंदुस्तानी, तलाश, रिश्ते, उजाले की ओर या त्यांच्या अशा काही दूरचित्रवाणी मालिकांमध्ये येतो. त्यांच्या चित्रपटात संगीत एक महत्त्वाचा भाग असे. अगदी असली नकली पासून प्रत्येक चित्रपटात संगीत कथेच्या सादरीकरणात महत्त्वाची भूमिका निभावत असे. म्हणूनच नायकावर जीव ओतून प्रेम करणारी साधना 'तेरा मेरा प्यार अमर' म्हणते तेव्हा तिच्या प्रेमाला आगळीच झळाळी येते. तीच कथा 'बडी सुनी सुनी है' म्हणणार्‍या मिली मधल्या अमिताभची! प्रत्येक पात्राचं स्वभाववैशिष्ट्य दर्शवणारं संगीत त्यांच्या चित्रपटांतून नेहमीच ऐकायला मिळालं. आशीर्वाद मध्ये त्यांनी अशोक कुमार यांना गायला लावलेलं 'रेलगाडी' कुणाला आवडणार नाही! अजून एक गंमत म्हणजे त्यांनी 'मुसाफ़िर' मध्ये दिलीप कुमारलाही गायला लावलं होतं, तेही लता बरोबर आणि तीही चक्क रागदारीमधील रचना!

फिल्मफेअर पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. सन २००० साली जरा उशीराच त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि पुढच्याच वर्षी भारत सरकारने पद्मविभूषण देऊन त्यांचा उचित गौरव केला. मात्र बिमल रॉय यांनाच आपल्या यशाचे श्रेय ते शेवटपर्यंत देत आले.

त्यांच्या पुढच्या चित्रपटाची वाट पहात असताना अचानकच त्यांच्या निधनाची बातमी खूपच दुखावून गेली. जवळजवळ सहा दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवणारे हे व्यक्तिमत्त्व विस्मरणात जाणार नाही. गोलमालमधल्या विनोदाला खळखळून हसू येत राहिल आणि आनंदच्या मृत्यू नंतर अमिताभबरोबर आपणही अश्रू गाळू तोपर्यंत हृषिदांना विसरणे शक्य तरी आहे का? हृषिदा, सलाम तुमच्या कारकिर्दीला, सलाम तुमच्या एकेका पात्राला जे कधी अस्तित्वहीन वाटले नाहीतच!

सलाम हृषिदा सलाम!!!!

- गिरिराज