« | »




विन्संट वॅन गॉ

" चित्र सुरेख आहे ना गं! वेगळंच "
मी कुतूहलाने त्या म्युझियमच्या एका बाजूला थांबले. चित्राचे निरीक्षण करताना अजून अजून त्या रंगात, ब्रशच्या फटकार्‍यात गुरफटत गेले.

" विन्संट वॅन गॉ चे आहे.. बिचारा ना! " माझी मैत्रीण म्हणाली. मी कुतूहलाने तिच्याकडे बघत विचारले,
" का गं? बिचारा का? "
" अगं तोच नाही का, तो ज्याने आत्महत्या केली आणि ज्याचं एकच चित्र त्याच्या हयातीत विकलं गेलं? "
अजूनही माझ्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह बघून ती पुढे म्हणाली,
" अगं तोच गं ज्याने आपला एक कान कापून एका बाईला भेट दिला होता. आठवलं का? "

आता मात्र मला तो चांगलाच आठवला. लहानपणी किशोरमध्ये की अजून कुठेतरी त्या कलाकाराबद्दल वाचले होते. पण बाकी काही लक्षात न राहता कानाची गोष्ट मात्र नक्कीच लक्षात होती. तर्‍हेवाईक कलाकार असेल असा विचार करून त्याबद्दल नंतर कधी विचारही केला नव्हता आणि वाचलेही नव्हते.

पण ह्या चित्राने मात्र माझे कुतूहल चांगलेच चाळवले. Starry night सारख्या चित्रांचा अर्थ समजण्याइतके मला चित्रांमधले काही कळत नाही. किंवा एखादी शैली कळण्याचा दावा देखील मी करत नाही पण कुठेतरी विन्संटची चित्रे मनाला स्पर्शून जातात. आणि मला माहीत आहे, बघणार्‍याने जरी त्याच्या चित्रातून वेगळेच अर्थ काढले तरी तो फारसा आक्षेप घेणार नाही. कारण त्याने आपली चित्रं स्वत : च्या inner feelings सांगण्यासाठीच तर वापरली. तेव्हाचा तथाकथित प्रतिष्ठीत युरोपियन समाज त्याची चित्रं समजू शकला नाही तरी आज ती शैली impressionism म्हणून ओळखली जाते. दृष्य नक्की कसे आहे तसे, जसेच्या तसे कागदावर उतरवण्याऐवजी कलाकाराच्या दृष्टीकोनातून ते दृष्य समोर उभे रहाणे. खरे सांगते, हे करणे - नुसते समोरचे दृष्य कागदावर जसेच्या तसे उतरवण्यापेक्षा - खूप अवघड असते.

सदतिसाव्या वर्षी ह्या कलाकाराने स्वतःचे आयुष्य संपवले. पूर्ण आयुष्यात ह्या माणसाचे फक्त एकच चित्र विकले गेले. चारशे फ्रॅंक्सना. ते पण त्याच्या मरणाच्या आधी फक्त चार महिने. अनेक अनेक चित्रे काढली ह्या माणसाने. जवळ जवळ हजाराच्या वर. पण शेवटपर्यंत अयशस्वी राहिला. गंमत अशी की आज विन्संट वॅन गॉ पेक्षा यशस्वी कलाकार दुसरा नाही.

एकापाठोपाठ एक अयशस्वी प्रेमप्रकरणं, घुमा एकटाच बसणारा अतिशय हळवा असा हा कलाकार. शिक्षणात गती नाही म्हणून सोळाव्या वर्षी आर्ट डीलर म्हणून काम करायला लागला. त्याला स्वतःच्या उपजत कलेची जाण नसली तरी तो पटकन रंग, कलाकृतीची जाण असलेला डीलर बनला. तो इतका पारंगत झाला की गिर्‍हाईक जास्त पैसे देऊन वाईट कलाकृती विकत घ्यायला लागले तर तो ते चित्र कसं वाईट आहे असं पटवून देऊन त्यांना ते घेण्यापासून परावृत्त करे. साहजिकच धंद्यात तो अयशस्वी झाला. शिक्षक, मिनिस्टर, वगैरे व्हायचे प्रयत्न मोडून पडत गेले. आणि स्वतःच्याच कझीनच्या प्रेमात पडून घरच्यांची नाराजी ओढवून घेतली. धाकट्या भावाने मात्र विन्संटवर मनापासून प्रेम केले. शेवटपर्यंत तो त्याला पोसत राहिला. आज विन्संटची भावाला लिहिलेली अनेक पत्रं उपलब्ध आहेत. पत्र वाचताना वाटतं की खरंच विन्संटच्या पाठीवर थोडी जरी कौतुकाची थाप मिळाली असती तर तो इतक्या निराशेच्या गर्तेत कोसळला नसता.

विन्संटच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची ट्रीप म्हणजे त्याची पॅरीसची ट्रीप. इथेच त्याने impressionism चा अभ्यास केला. आणि काही मित्र देखील मिळवले. इथे त्याने थोड्या ब्राईट कलरचा वापर करायला सुरुवात केली. त्याची ती प्रसिद्ध सूर्यफुलांची चित्रं देखील ह्याच काळातली. एक दोन चित्रे त्याने आपल्या मित्रांची घरं डेकोरेट करायला म्हणून दिली बाकी चित्रं दुर्लक्षीतच राहिली. आज अनेक कलाकार ह्या सूर्यफुलांची नक्कल करतात पण विन्संटचे चित्र अजरामर झाले आहे. 4 cut sunflower हे माझं आवडतं चित्र. ह्या चित्रातल्या सूर्यफुलांची पाकळी न् पाकळी वेगळी आहे. चित्राला एक वेगळाच सॅटीनच्या कापडासारखा फील आहे.




ह्याच काळात विन्संटचे आपल्या अतिशय जवळच्या चित्रकार मित्राशी (Gauguin) भांडण झाले. विन्संटला बहुतेक तोपर्यंत डिप्रेशनचे झटके यायला सुरुवात झाली होती. अशाच एका वादावादीत विन्संटने आपला कान कापून तो एका ब्राऊन पेपर मध्ये गुंडाळून एका स्त्रीला भेट म्हणून दिला. आणि तिथून तो तडक घरी परतला. जबरदस्त रक्तस्रावामुळे विन्संट तिथल्या तिथे कोसळला. पोलिसांनी त्याला जवळच्या hospital मध्ये नेले. आणि विन्संटच्या भावाला फोन केला. तिथून मग विन्संट मरेपर्यंत असायलम मध्ये राहिला. सुरुवातीचे काही दिवस त्याला त्याच्या खोलीमधून देखील बाहेर पडायची परवानगी नव्हती. ह्याच काळात त्याने काढलेले हे स्टारी नाईट.



चित्रात नक्की काय दाखवले आहे माहीत नाही. दूरवर दिसणारे लहानसे गाव. कदाचित त्याच्या लहानपणाची आठवण असावी. मोठे चर्च. त्याचे वडील मिनिस्टर होते आणि कधी काळी त्यांना खूष करण्यासाठी विन्संटने देखील तो प्रयत्न केला होता. डाव्या साईडला काळ्या रंगांच्या ज्वाळा ज्या वादळी आकाशापर्यंत जातात. मला माहीत नाही चित्रात काही गूढार्थ वगैरे आहे का. पण चित्रात मला खूप emotions दिसतात. भावनेचा अनावर आवेग दिसतो. हे चित्र त्याने अंधार्‍या खोलीत नुसत्या आठवणींवर काढले. वाटत नाही एकदम अस्वस्थ ह्या चित्राकडे बघून?

विन्संटचे अजून एक चित्र म्हणजे त्याचे शेवटचे. त्याने आत्महत्या करण्याच्या काही दिवस आधी पूर्ण झालेले. हे चित्र देखील प्रसिद्ध आहे. पण बहुतेक काही जण अस म्हणतात की ते चित्र म्हणजे विन्संटची Suicidal note होती. कदाचित म्हणूनच हे चित्र जास्त चर्चेत आले असावे. मला ह्या चित्रात फक्त एकाकीपणा दिसतो. तसेच वादळी आकाश. त्याच्या असंख्य चित्रांमधल्यासारखेच. कदाचित त्याच्या मनाचा थांग घेणारे, आणि दूरवर पसरलेला एकाकीपणा. आणि ते कावळे कदाचित ते जवळ येत आहेत बघणार्‍याकडे की विन्संटकडे?




चित्रात गूढार्थ असेलही. कोण जाणे. कारण चित्र पूर्ण झाल्यावर काहीच दिवसांनी विन्संटने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

आज विन्संटची चित्रे इतकी कमर्शलाईज झाली आहेत की त्याच्या चित्रांच्या पर्सेस, घड्याळ, टीशर्ट्स प्लेसमॅट्स काय वाट्टेल ते विकत मिळते. कुठेतरी दुःख होते. विन्संटने ही चित्रं इतक्या भावनेच्या आवेगात काढल्यासारखी वाटतात की त्याची एखादी पर्सनल डायरी वाचतोय की काय असाच भास होतो. मग नुसतेच अस्वस्थ वाटते. लोकं कशाचाही बाजार मांडतात असे वाटते. आज विन्संटविषयी आपल्याला बर्‍याच गोष्टी माहिती आहेत. त्याची वेळोवेळी भावाला लिहिलेली पत्रं त्याची पत्रातून पाठवलेली, जपून ठेवलेली स्केचेस. पण मुख्य म्हणजे त्याची चित्रं. तो expressionist artist असल्यामुळे त्याचे प्रत्येक चित्र त्याच्या मनोवृत्तीची झलक दाखवते. कदाचित आपलेच भाग्य चांगले होते म्हणून की काय तो कायम वेगवेगळ्या धंद्यात अपयशी होत गेला आणि सततच्या एकटेपणामुळे चित्र हे एकच माध्यम त्याला स्वतःचे मन उघडे करायला मिळाले. त्याने कधीतरी त्याच्या एका पत्रात म्हटले होते. I feel like I should have been a shoemaker instead of musician of colors पण - तो त्याच्या प्रत्येक पत्रात करायचा तसा - त्याला एक Warm handshake आणि त्याचे आभार. त्याच्यासारखा musician of colors कोणी होणार नाही आणि झाला नाही.

लेखातली चित्रे webmuseum network वरून घेतलेली आहेत.

- रचना_बर्वे