« | »




एक पणती माझीही

मी आणि माझी आई स्वारगेटजवळच्या भागात कामासाठी म्हणून गेलो होतो. स्कूटर लावण्यासाठी मी गणेश क्रीडा मंचच्या गल्लीत वळले. स्कूटर लावत असताना शेजारूनच एका मुलीचा आवाज आला. आवाज थोडा विचित्र पण ओळखीचा वाटला म्हणून शेजारी पाहिले तर एक निळी जिन्स, पांढरा शॉर्ट टॉप, लांब कानातले आणि सोनेरी केस रंगवलेली मोबाईलवर कुणाशी तरी बोलत होती. मला पटकन आठवत नव्हतं की मी त्या मुलीला कुठे पाहिलेय, तिचे नाव काय? हा विचार माझ्या डोक्यात चालू असतानाच तिचे माझ्याकडे लक्ष गेले आणि तिने पटकन मोबाईलवर हात ठेवून, ''हाय दीदी!'' म्हटले. त्याबरोबरच लख्खकन् मला तिचे नाव आठवले आणि त्यामागोमाग ती रहात होती ती गल्ली, तिथली तिची छोटी खोली, तिचा घरक्रमांक व नेहेमीच्या झगमगीत कपड्यातली पूजा आठवली. ''हाय पूजा, कैसी हो?'' असे म्हणत मी तिच्या जवळ पोहोचेपर्यंत तिने गडबडीत मोबाईल बंद केला आणि ''दीदी, बाद मे बात करते हैं'', म्हणत शेजारीच उभ्या असलेल्या सॅंट्रोत बसून निघून गेली. मला एकदम वाईट वाटलं, ज्या मुलीशी मी रोज दहा मिनिटे तरी बोलत असे तिने असं न बोलता निघून जावं? पण लगेचच मला सरांचं वाक्य आठवलं, 'वस्तीत जरी त्या तुमच्याशी मोकळेपणाने बोलत असतील तरी बाहेर कधी भेटल्यास तुमच्याकडे ढुंकूनही बघणार नाहीत. तुमच्याशी असलेल्या ओळखीचा लवलेशही त्यांच्या नजरेत दिसणार नाही आणि त्यांनी तुम्हाला ओळख न दाखवणं हे तुमच्या दृष्टीने हिताचंच आहे.'' त्याचा आज मला अनुभव आला होता.

त्या दिवशी घरी आल्यावर मला सगळेच नीट आठवत होते. अकरा महिन्यांपूर्वी नोव्हेंबरमध्ये पुण्याच्या एका वृत्तपत्रात मी एक जाहिरात वाचली होती.....
पुण्यातील बुधवार पेठेतील लालबत्ती विभागात शरीर विक्रय करणार्‍या महिलांकरीता काम करण्यासाठी खालील जागा भरणे आहेत:
'सोशल वर्कर्स, पिअर्स, समुपदेशक'


संस्थेच्या गरजेनुसार माझे MSW (Master in Social Works) पूर्ण झालेलं असल्यानं मी लगेचच बायोडेटा आणि अर्ज संस्थेत देऊन आले. पंधरा दिवसातच मी संस्थेच्या ऑफिसमध्ये बसले होते आणि तेवीस वर्षांपूर्वी ज्यांनी हे काम आणि संस्था सुरू केली ते माझा इन्टरव्ह्यू घेत होते. मात्र त्यांनी जास्त काही प्रश्न न विचारता, लालबत्ती विभाग म्हणजे काय, तिथे बायका कशा येतात, त्यांचे तिथले आयुष्य, भावविश्व, व्यसनं, श्रद्धा - अंधश्रद्धा याबद्दल कल्पना दिली. शेवटी ते म्हणाले, '' थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्या दृष्टीने जे लाजिरवाणे किंवा शत्रूच्याही वाट्याला येऊ नये असे जीवन त्या रोज जगत असतात, अनुभवत असतात. त्यांना आपल्यासारख्या माणसांचा हेवाही वाटत असतो, तसेच कुठेतरी एक भयंकर चीड त्यांच्या मनात असते.'' इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी फक्त तीनच प्रश्न विचारले, - अशा ठिकाणी काम करण्यासाठी मुलाखत द्यायला आली आहेस हे घरच्यांना माहीत आहे का? नवरा, सासू, सासरे यांची परवानगी आहे का? आणि अपमान, दुःख सहन करून विचित्र माणसांबरोबर काम करण्याची तुझी तयारी आहे का?

या बायकांबरोबर काम करताना माणुसकीची कोणतीच अपेक्षा ठेवायची नाही कारण आपला ज्यांच्यावर जास्तीत जास्त विश्वास असतो, जे आपलं हित पाहतील, आपलं संरक्षण करतील अशी आशा असते अशाच आई - वडिलांनी, भावांनी, नवर्‍याने अथवा जवळच्या नातेवाईकांनी त्यांना फसवणूक करून इथे आणलेले असते. इतका जबरदस्त धक्का पचवून पुन्हा एक लाजीरवाणं आयुष्य जगायला सुरुवात करताना त्यांचा सर्व चांगल्या गोष्टींवरचा विश्वास उडालेला असतो. लाज, भीड पूर्णपणे चेपलेली असते. त्यामुळे त्यांच्याकडून कुठल्याही सद्वर्तनाची अपेक्षा न करता आपल्याला काम करावं लागेल. इन्टरव्ह्यू संपला! मी घरी येऊन सर्वांना सांगितलं. घरच्यांनी देखील अनावश्यक चिंता न करता काम करण्यास हरकत नाही म्हणून सांगितले. सासू सासरे, आई - वडील यांनी यातले धोके लक्षात आणून दिले. त्याचबरोबर सतर्कतेने, सावधगिरीने काम करण्यासाठी प्रोत्साहनही दिले.

१ डिसेंबरला मी संस्थेच्या मुख्य कार्यालयात रुजू झाले. तिथे सर्व कार्यकर्त्यांशी ओळख झाल्यावर आम्हाला बुधवारातील प्रत्यक्ष वस्तीतील ऑफिसमध्ये नेण्यात आले. लक्ष्मी रस्त्यावरच पहिल्या मजल्यावर ऑफिस होते. तिथल्या खिडकीतून पाहिल्यास ऑफिसच्या मागचा, बाजूचा व समोरचा असा सर्व भाग - ज्यात काही पत्र्याची बसकी घरे, काही इमारती होत्या - हाच तो red light भाग, असे तिथे साताठ वर्षे कार्यकर्ती असणार्‍या ताईंनी सांगितले. माझ्यासोबतच आणखीन चौघेजण त्या दिवशी नवीन होते. आम्हाला वारंवार सूचना देण्यात येत होत्या की कोणत्याही परिस्थितीत एकट्याने या भागात जायचे नाही, काही शंका वाटल्यास, अस्वस्थ वाटल्यास काम बाजूला ठेवून आहे तिथून निघून यायचे. कोणत्याही घरात पाणी, अन्न, प्रसाद, चहा, कोल्ड्रिंक वगैरे चुकूनही घ्यायचे नाही. कोणालाही आपला फोन नंबर, घरचा पत्ता अथवा स्वतःची माहिती द्यायची नाही. आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यासमोर कोणतेच मतभेद दाखवायचे नाहीत की वाद घालायचा नाही.

माझे काम समुपदेशकाचे असले तरी कामाचे स्वरूप खूप वेगळे होते. एरवी ज्यांना समस्या असतात ते समुपदेशनासाठी येतात. परंतु इथे उलट होतं. बायकांना समस्या अस्तित्वात आहेत याची पुरेशी जाणीव देखील नव्हती. आणि असली तर त्यातून मार्ग काढण्यासाठी बाहेर पडण्याची परवानगी नाही. प्रत्येक घरात तीनचार ते दहाबारा मुली / बायका राहतात. त्या घराची एक मालकीण असते आणि ती घरातील मुलींवर कडक नजर ठेवते. वरकरणी जरी ती खूप प्रेमळ वाटली तरी तिचे नियम खूप कडक असतात. कुणालाही परवानगीशिवाय घराबाहेर पाऊलही ठेवता येत नाही. बाहेर जायचे असल्यास तासाला पन्नास ते शंभर रुपये मालकीणीस द्यावे लागतात. त्यामुळे सहसा बायका बाहेर जाण्याचे टाळतात. स्वतःचे पैसे घालवून, मालकीणीचा संशय ओढवून, धंद्याचा वेळ वाया घालवून (त्यांच्या दृष्टीने फारसे महत्त्व नसलेल्या) समस्येवर उपाय शोधण्यासाठी ऑफिसमध्ये जाणे ही संकल्पनाच त्यांना पटत नाही. मग त्यांच्यापर्यंत पोचायचे तरी कसे? त्यांचा विश्वास कसा संपादन करायचा? आणि त्यांनी मोकळेपणाने आपल्याशी बोलावे असं नातं निर्माण तरी कसं करायचं?

त्यासाठी अनेक उपक्रम संस्था राबवते. यातला सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे 'बचत'! बचतीसाठी मी आणि माझ्याबरोबर दोघेजण रोज अकराच्या सुमारास बाहेर पडायचो. हा उपक्रम आधीपासून चालू असल्याने बर्‍याच बायकांनी बचतखाती उघडली होती. रोज त्यांच्या खोलीवर जाऊन त्यांच्याकडून पैसे घ्यायचे, त्यांच्या खात्यात जमा करायचे व किती जमले त्याचा आकडा सांगायचा. कधी त्यांना गरज लागल्यास त्या त्यांचे पैसे घेत. या उपक्रमातून प्रत्येक बाईशी ओळख होत गेली. त्यांची दैनंदिनी, राहणीमान, आहार, पोशाख, विचारसरणी, श्रद्धा, रूढी यांबाबत सविस्तर माहिती होत गेली. बचतीमध्ये रोज पाचदहा रुपयांपासून ते दीड - दोन हजार रुपयांपर्यंत पैसे भरणार्‍याही बायका होत्या. सुरुवातीला पैसे घ्यायचे, नोंद करायची आणि हिशेब सांगायचा इतकाच संवाद असायचा. पण आम्ही सातत्याने येतोय हे बघून विश्वास वाढू लागला आणि त्या मोकळेपणाने बोलू लागल्या. रात्रभर या बायका धंद्यासाठी उभ्या असल्याने त्यांचा दिवस सुरू होतो तोच मुळी अकराच्या पुढे! कधी धंदा झाला नसल्यास अथवा झोप पूर्ण झाली नसली आणि आम्ही तिथे गेल्यास झोपेतच शिवीगाळ करायच्या. पण लाज वाटून दुसर्‍या दिवशी आवर्जून माफी मागायच्या. हळूहळू त्या त्यांच्या अडचणी सांगायला लागल्या होत्या. मालकीण / मॅनेजर कसा त्रास देतो, गिर्‍हाईक कसे फसवतात, आजकाल धंदा कसा कमी झालाय हे त्या सांगत असत. पण त्याचबरोबर गावाकडे कोणकोण आहेत, मुलं काय करतात, मानलेला नवरा कसा आहे आणि त्या इथे कशा प्रकारे आल्या हेदेखील त्या बोलू लागल्या. एकदा बचतीसाठी गेले असता असा प्रसंग पाहिला की आज आठवले तरी डोळ्यांत पाणी उभे राहते. एका पंधरा - सोळा वर्षांच्या मुलीकडे मी रोज बचतीसाठी जात असे. ती कधी बोलायची नाही. त्या दिवशी मी गेले तेव्हा तिच्या खोलीत एक दारूडा माणूस बसला होता. वयाने पन्नाशीच्या आसपास होता. डोळे लालभडक झालेले, अंगावर मळके कपडे होते. खोलीत गेल्यागेल्याच दारूचा भपकन वास आला. त्या माणसाकडे बघूनच किळस वाटत होती. त्याने मालकीणीच्या हातात शंभराची नोट ठेवली व तो आतल्या खोलीत जाऊन बसला. बाहेर ती मुलगी मालकीणीला त्याच्याकडून पैसे घेऊ नको म्हणून सांगत होती. पण मालकीणीने ऐकले नाहीच आणि वर मुलीला नजरेनेच दटावून आत जायला सांगितले. पटकन त्या मुलीच्या डोळ्यांत पाणी आले. आत जातांना तिने देवाच्या तसबीरीसमोर डोके टेकवले आणि आत निघून गेली. त्या क्षणी त्या मुलीला काय वेदना होत असतील याची कल्पनाच मला करवत नव्हती. कधी कधी तर मी पस्तीशीच्या आसपासच्या बायकांना गिर्‍हाईकाच्या मागे लागताना पाहिले. पन्नास रुपयांपासून सुरुवात करून अगदी पाच रुपयांपर्यंत भाव करून त्या गिर्‍हाईक मिळवायच्या. पाच रुपयांसाठी एवढा अपमान, दुःख, किळस का सहन करायची, हे माझ्यासाठी एक कोडेच होते. एकदा एक बाई मला म्हणाली, ''ताई, तुम्ही कशाला इथे येतात? तुम्ही चांगल्या शिकलेल्या, चांगल्या घरच्या! ऑफिसातली नोकरी करा. इथल्या घाणेरड्या गल्लीत कशाला येता? तुम्ही कितीही चांगलं सांगितलं तरी आमच्या डोक्यात घुसणार नाही. मग कशाला वेळ घालवता?''

समुपदेशनाचा सर्वात महत्त्वाचा भाग होता तो वस्तीतील बायकांना एच्. आय. व्ही. एडस् बाबत माहिती देणं, सुरक्षित संबंधासाठी निरोधचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणं. आणि ज्यांना एडस् झाला आहे अशा बायकांना औषधोपचार सुरू करणं. ऐकल्यावर हे सोपं वाटलं पण बायकांशी बोलल्यावर यातली प्रत्येक गोष्ट किती कठीण आहे हे कळलं. एक म्हणजे गिर्‍हाईक येतं ते मजेसाठी, मग त्याला कुठलेच निर्बंध नको असतात. निरोध वापरत नाहीत अशा माणसाला नकार दिल्यास गिर्‍हाईक तर जातंच पण मालकीणीच्या शिव्या आणि प्रसंगी मारही खावा लागतो. सुरक्षित संबंधाबाबत बोलतांना त्या म्हणतात, "कसली काळजी करायची? पोलिसांपासून गटार साफ करणार्‍यांपर्यंत वेगवेगळी माणसं येतात. कोणालाच नाही म्हणू शकत नाही. मालकीण ठरवते कुठलं गिर्‍हाईक घ्यायचं." आणि याच मालकीणी, बाईला एखादा आजार झालाय अशी शंका आली तरी निर्लज्जपणे घरातून हाकलून देतात. आयुष्यभर जिच्या जीवावर पैसा कमावला अशा बाईला आजारात काळजी तर सोडाच, पण साधं भेटायला पण कोणी जात नाही. आजारी बायकांना घराबाहेर काढले की त्यांना त्यांच्या घरीही जाता येत नाही आणि हक्काचे कोणते ठिकाणही उरत नाही. माझ्या अनुभवात मी चार पाच जणींना अक्षरशः रस्त्यावर मरताना पाहिले आहे. एकदा अशीच एक बाई एडस् मुळे अनेक रोग होऊन शेवटचे दीड महिने हॉस्पिटलमध्येच होती. तिचा सर्व खर्च आमची संस्था करत होती. तेव्हढ्या काळात तिला कोणीच भेटायला आले नाही. एकदा दुपारी हॉस्पिटलमधून तार आली की पेशंट खूप सिरीयस आहे, जवळच्यांना भेटायला यायला सांगा. ती तार घेऊन मी ती बाई दहा वर्षं ज्या घरात रहात होती तिथे गेले. इतर बायकांनी व घरमालकीणीने तिची चौकशी केली. मी त्यांना तार दाखवली. मी हॉस्पिटलमध्ये जात होते, तर कोण येतेय म्हणून विचारले तर मालकीण चवताळून म्हणाली, "आमच्यापैकी कुणीच येणार नाही. तिथे जाऊन आमच्या बायकांना रोग झाला तर? फार तर दोनशे रुपये देते, ती गेली तर तिकडेच तिला जाळून टाका. आणि पोलिसांकडे, हॉस्पिटलमध्ये आमच्या खोलीचा नंबर देऊ नका." मालकीणीचं हे बोलणं ऐकून बाकीच्या बायका रडायला लागल्या. एकीने हिम्मत करून विचारले, "आज तू अशी वागतेस मग आमच्याशीही तशीच वागशील. मग आम्ही कशाला हा धंदा करायचा?" हळूहळू सगळ्यांनाच त्यांच्या असुरक्षितपणाची जाणीव झाली होती. पण त्याविरुद्ध बोलायची कुणाचीच हिम्मत नव्हती. तिथला गोंधळ थांबवून त्यातल्या एकीला घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे एका मोठ्या हॉलमधल्या सगळ्यात शेवटच्या पलंगावर ती बाई डोळे टक्क उघडे ठेवून पडली होती. ब्लॅंकेटमध्ये तिचं शरीरही दिसत नव्हतं. चेहरा अगदी मलूल झालेला आणि तोंड कोरडं पडलेलं, बोलायचं त्राणही तिच्यात शिल्लक नव्हतं. आम्हाला बघितल्यावर तिच्या डोळ्यांतून पाणी ओघळलं. इतकी असहायता मी त्याआधी कधीच पाहिली नव्हती. ती नजर मी कधी विसरूही शकत नाही. तिच्याजवळ आम्ही थोडावेळ थांबलो. उद्या येताना मुलाला आणू का विचारल्यावर मानेनेच ती 'हो' म्हणाली. परत तिच्या खोलीवर जाऊन मुलाला निरोप दिला. तो चांगला चौदा - पंधरा वर्षांचा होता. पण त्याने अगदी निर्लज्जपणे 'येत नाही' म्हणून सांगितले. दुसर्‍या दिवशी ऑफिसातले पाच जण हॉस्पिटलमध्ये गेलो तर नर्सने सांगितले की पहाटे पाचलाच ती बाई गेली. मग आमच्यापैकी दोघांनी थांबून त्या बाईचे अंत्यसंस्कार केले.

माझा या भागातल्या कामाचा अनुभव खरं तर चारच महिन्यांचा! पण त्यातच मी आयुष्य पाहिले, ते जगताना येणार्‍या असंख्य अडचणी पाहिल्या आणि त्यातूनही जगण्याची इच्छा, उमेद अगदी जवळून अनुभवली. कुठल्या आशेवर या बायका जगतात कोण जाणे! मला तर हे अजूनही कळलेलं नाही. पण एव्हढं निश्चित आहे की तुमच्या - माझ्यासारख्याच स्त्रिया इच्छेनं वा अनिच्छेनं अतिशय बिकट जिणं कंठत असतात. त्यांना त्याची जाणीव असो वा नसो! आपणच त्यांना सहकार्याचा हात द्यायला हवा!

- ऋचा मुळे