« | »




बुद्धीमताम् वरिष्ठाम्


साधारण दोन वर्षांपूर्वीची एक गोष्ट. कंपनीतर्फे एका सेमिनारला गेलो होतो. प्रमुख वक्ता, एक फार हुशार आणि अनुभवी असे प्रोफेसर होते. अनेक उदाहरणांसह विश्लेषण करुन ते आपले मुद्दे समजावून सांगत होते. बोलता बोलता, समोरच्या मोठ्या स्क्रीनवर R E D अशी मोठी अक्षरे असलेली स्लाईड त्यांनी झळकावली आणि सगळ्यांना विचारलं, "What color comes to your mind?", "तुम्हाला कुठला रंग आठवतो?" अर्थातच सगळ्यांचं उत्स्फूर्त उत्तर होतं, "लाल". त्यांनी स्लाईड बदलली. नवीन स्लाईडवर तीच अक्षरं आता निळ्या रंगात होती. पुन्हा त्यांनी तोच प्रश्न विचारला. उत्तरादाखल आता बरीचशी लोकं थोडा विचार करुन ओरडली "लाल", तर थोडीफार कुजबुजली "निळा"! उरलेली काय म्हणावं या संभ्रमात होती. प्रोफेसर त्यांना अपेक्षित परिणाम साधल्यासारखे मंद हसले, आणि त्यांनी त्यांचा मुद्दा स्पष्ट केला. पुढच्या स्लाईडवर जाण्याआधी ते चटकन बोलून गेले, "Synesthetics are smarter in this situation!" सेमिनारची पुढची काही मिनिटं मला त्यांचं ते वाक्य आठवत राहिलं आणि ते कोणाबद्दल बोलत असावेत ते न कळल्यामुळे त्याचं औत्सुक्यही वाटत राहिलं. जर सगळ्यांचा मेंदू एकसारखा विचार करत असेल (म्हणजे त्यातले कोणी mentally challenged नसतील) तर सगळ्यांचाच एकसारखा असा गोंधळ उडायला हवा वगैरे माझे विचार सुरु होते. घरी येईस्तोवर मात्र या गोष्टीचा आणि त्या वाक्याचा साफ विसर पडला होता.

अगदी अलिकडचा हा आणखी एक किस्सा. माझ्या मित्राच्या भावाशी गप्पा मारता मारता असाच कुठूनतरी विषय निघाला आणि तो सांगू लागला की त्याच्या ओळखीत कोणी एक अमुक अमुक जण रंगांधळा आहे, color blind. म्हणजे त्याला जास्वंदीच्या हिरव्या पानांमधलं लाल फूल सहजपणे वेगळं दिसत नाही. थोडक्यात हिरवा आणि लाल हे रंग वेगळे असे ओळखताच येत नाहीत. मग सिग्नलचे दिवे कसे न ओळखू शकल्यामुळे तो वाहने चालवत नाही वगैरे गप्पा सुरु होत्या, पण तिथून माझं लक्ष उडालेलं होतं.

डोक्यात हाच विचार, की आपण काही गोष्टी किती ग्राह्य धरतो नाही! डोळ्यांनी दिसणं, कानांनी ऐकणं, वगैरे गोष्टी किती सहजरित्या आपण रोज अनुभवत असतो. त्याबद्दल आपण थांबून असा विचार कधी करत नाही. म्हणजे थोडक्यात हा आपला जो मेंदू आहे तो किती दुर्लक्षित आहे! हाताचं बोट कापलं की त्याला बँडेड लाव, पाय दुखू लागले की कैलासजीवन चोळ किंवा गरम पाण्यात पाय बुडवून शेक घे, थकलेल्या डोळ्यांवर काकडीचे काप ठेव वगैरे लाड आपण करत असतो. पण 'मेंदूला आराम म्हणून आजचा दिवस पूर्ण झोपून काढला' असं बोलताना कधी कोणी दिसत नाही. समजा उद्या सकाळी आपण उठल्यावर मेंदू कामच करायचा थांबला, तर? किंवा आपली सगळी स्मरणशक्तीच पुसली गेली तर? अगदी तेवढं सोडा, पण आपल्याला अचानक सगळ्या पदार्थांची चवच कडू लगायला लागली तर? या अशा शक्यताही आपल्याला कधी शिवत नाहीत.

टीव्हीवरती कुठल्याशा कुकींग शो मधे एक तिखट खाद्यपदार्थ बनवण्याचं प्रात्यक्षिक सुरु होतं. कार्यक्रमात एका शास्त्रज्ञ डॉक्टरांनाही आमंत्रित केलं होतं. त्यांना एक प्रश्न विचारला की एकाच प्रकारची मिरची काही माणसं काकडी खाल्ल्यासारखी खातात तर इतरांना मात्र ती तोंडात ठेवताच आग आग होते; त्यांचा तिखटपणाचा टॉलरन्स (सहनशक्ती) अजिबात नसतो, असं का? डॉक्टरबाईंनी उत्तरादाखल दोन पॅच काढले. कसलेसे मिश्रण असलेल्या पट्ट्याच होत्या त्या. दोन माणसांना तोंड उघडायला सांगून त्यांनी ते पॅचेस त्यांच्या जिभेवर ठेवले व पाच मिनिटांनंतर त्यांना तोंड उघडायला सांगितले. आणि नीट बघावं तर काय, दोघांच्या जिभांवर वेगवेगळ्या गडदतेचे कमीजास्त रंग दिसत होते. एका माणसाचे अधिक गडद रंग तर दुसर्‍याचे काहीसे फिके. डॉक्टरांनी खुलासा केला की हे taste buds आहेत. या buds ची प्रत्येक जीभेत संख्या जवळपास सारखी असली तरी त्यांची sensitivity (संवेदनाशक्ती) मात्र कमीजास्त असते. म्हणजे एखाद्याला साधी मिरचीही जहाल तिखट वाटू शकते तर कोणाला अति मसालेदार जेवणही मिळमिळीत. मला माझ्या एका गुजराती मैत्रिणीच्या आईची आठवण आली; त्या भाजीत तिखटपणासाठी म्हणून चक्क भोपळी मिरची टाकायच्या!
पुन्हा एकदा माझ्या डोक्याला स्वस्थ बसवेना. प्रत्येकाच्या taste buds ची sensitivity वेगळी का बरं असू शकेल? जर एखाद्या सुदृढ व्यक्तिच्या रक्तातल्या साखरेचे प्रमाण १०० च्या आत असले तर तिला डायबेटीस नाही असं जसं प्रमाण ठरवलं गेलंय, तसं मेंदूचं नाही का? म्हणजे एखादी निरोगी व्यक्ती कुठल्याही दुसर्‍या सामान्य व्यक्तिएवढी हुशार आणि तल्लख असेल तर मग त्या दोन व्यक्तींच्या चवीचवीत असा फरक का बरं असावा?

वरचे दोन तीन प्रसंग मी तसे विसरुनही गेलो होतो. शिवाय, मानसिक वैगुण्य असणारी माणसं आपल्या सगळ्यांनाच थोड्याफार फरकानं कुठेतरी भेटलेली असतात अधूनमधून. थोडी 'हळू' असणारी, काही कलाप्रवीण असणारी, काही तीक्ष्ण स्मरणशक्ती असलेली, अगदी ken Jennings किंवा शकुंतलादेवीसारखी अतिशय हुषार माणसंही आपल्या माहितीची असतात. त्यावर फारसा विचार आपण करत नाही. पण विसरुन गेलेले हे सगळे प्रसंग आता आठवायला कारणंही तसंच विशेष घडलं. (आता इथे विसरुन गेलेले म्हणजे conscious mind मधून विसरून गेलेले, नाहीतर ते आठवतायत म्हणणं म्हणजे तसा विरोधाभासच होईल!)

अचानक एके दिवशी नकळत, ध्यानीमनी नसताना, पुन्हा एकदा त्या शब्दाशी गाठ पडली, "Synesthesia"! टीव्ही वर एक मुलगी पियानो वाजवत होती. सुरांच्या लडीच्या लडी उधळत होत्या आणि ते मोहक सूर कोणाही ऐकणार्‍याला मुग्ध करावेत असे विलक्षण होते. पियानो वाजवून झाल्यावर चोवीस वर्षीय लॉरा रॉसरला मुलाखतकर्त्याने विचारले, की इतकी सुंदर स्वररचना कशी केलीस? ती चटकन म्हणाली, "I just follow the colors!" गोंधळलात? मीदेखील असाच गडबडलो होतो. ती पुढे सांगत होती, "I just follow the colors; this major C note is like a turquoise blue and this flat D is like a pale magenta, I play them as I see them. They come naturally to me". शेवटी सहज जाता जाता लॉराने पुस्ती जोडली, "आणि हो, मला आकड्यांमधेही रंग दिसतात!"

त्यानंतरचा एक तास Synesthesia शी ओळख करुन घेण्यात कसा गेला ते कळलंच नाही. विद्यार्थ्यांचे दोन गट दाखवले. दोघांना एक आकड्यांची सरमिसळ असलेलं चित्र दाखवून त्यात काही वेगळं दिसतंय का ते ओळखायला सांगितलं. दुसर्‍या गटातल्या प्रत्येकाने पाच ते आठ सेकंदांमधे उत्तर दिलं की हिरव्या रंगाच्या पाच आकड्यांमधे एक लाल रंगातल्या दोन आकड्यांचा त्रिकोण आहे! पहिल्या गटातल्या विद्यार्थ्यांनीही तो त्रिकोण ओळखला पण तब्बल पाच ते सहा मिनीटांनंतर, कारण त्यांच्यासाठी सगळे आकडे काळेच होते. दुसर्‍या गटातले सर्वजण अर्थातच Synesthesia असणारे होते! पहिल्या आणि दुसर्‍या गटाला दाखवलेलं चित्र त्यांना अनुक्रमे असं दिसलं.








या सिनेस्थीट्सच्या मेंदूंच्या प्रतिमा घेण्यात आल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर जेव्हा काळ्या रंगातले वेगवेगळे आकडे आणले गेले तेव्हा त्यांच्या मेंदूमधल्या रंगांसाठी राखीव असलेल्या जागा लख्ख उजळल्या. साध्या माणसांच्या मेंदूच्या रंगाच्या जागांमधे मात्र काहीही हालचाल झाली नाही.

लिन आणि कॉस्टेन्को यांना विशिष्ट खाद्यपदार्थ पाहिले की त्यांना ठराविक भौमितिक आकार आठवतात. तुम्ही म्हणाल हे म्हणजे चकली म्हटलं की गोल आठवण्यासारखं आहे! पण असे स्मरणशक्तीवरुन आठवलेले नाही, तर त्यांच्या मेंदूने ठरवलेले आकार त्यांना दिसतात. लिनला ब्लू चीज 'टोकदार' वाटतं तर तिच्या बहिणीला, कॉस्टेन्कोला, ते लहान लहान गोळे गोळे असल्यासारखं वाटतं. ब्रिटीश पेयगृहात काम करणार्‍या जेम्सला त्याची गिर्‍हाईकं काही बोलली की त्यानुसार तोंडात वेगवेगळ्या चवी येतात!

सिनेस्थेशिया म्हणजे दोन किंवा अधिक सेन्सेस चं झालेलं मिश्रण. चव+दृष्टी, वास+आवाज, स्पर्श+चव वगैरे असे सगळे प्रकार अशा लोकांमधे आढळतात. पण याला मानसिक रोगाचं लेबल चिकटवण्याची घाई मात्र करु नका! कारण विचार करा, तुम्हाला जर माणसांची नावं केवळ त्यांच्या चेहर्‍याशीच अनुसरुन लक्षात न ठेवता, त्यांच्या रंगाबरोबरही जोडता आली तर? म्हणजे "पुष्पा", "माधव" ही नाव पांढर्‍या किंवा "अशोक" आणि "संजय" ही नावं पिवळ्या रंगाबरोबर जोडली आणि समोरच्या व्यक्तीचा 'रंग' तुम्हाला दिसतो आहे तर? किंवा एखाद्या रम्य सूर्यास्ताच्या देखाव्याबरोबर तुम्हाला तितकाच मोहक सुगंधही अनुभवायला मिळाला तर? एखाद्या मिट्ट अंधार्‍या रात्री अस्फुट येणार्‍या आवाजाबरोबर तुम्हाला ओळखीचे रंग दिसले तर? ट्रीश आणि मॉली या बहिणी आठवड्याचे वार आणि महिन्याच्या तारखा एका त्रिस्तरीय (3-D) आकाराने लक्षात ठेवतात. त्या म्हणतात, "कुठल्याही नोंदी लक्षात ठेवायला त्याचा फार उपयोग होतो. आम्ही एका अंडाकृती आकारामधे हे वार किंवा तारखा बघतो आणि मग त्यात आपण कुठे आहोत हे आम्हाला माहित असतं, त्यामुळे मग आम्हाला दिसू शकतं की अमुक एका गोष्टीपासून मी दोन दिवस दूर आहे." बाकी लोकं या सोप्या पद्धतीचा अवलंब का करत नाहीत याबद्दल त्यांना आश्चर्यही वाटतं. थोडक्यात, एकाच इंद्रीयाचा वापर करण्याऐवजी असे multiple senses आपल्याला एकत्र वापरता आले तर काय बहार येईल! याची केवळ कल्पनाच आपण करु शकतो. आणि मग सिनेस्थेटिक लोकं मुख्यतः कलाकार असतात हे सांगितलं तर विशेष आश्चर्यही वाटायला नको.

पण मग अशा वेगवेगळ्या सेन्सेसचं मिश्रण म्हणा किंवा गुंता म्हणा, होतो कसा? एक कल्पना अशी आहे की आपण जेव्हा अगदी लहान असतो तेव्हा आपला मेंदू सेकंदाला लाखो अशा वेगानं संवेदना वाहून नेणार्‍या नवनवीन वाहिन्या (synaptic connections) तयार करत असतो. जसजसे आपण मोठे होत जातो, तसतसे हे मार्ग छाटले जातात आणि आपल्या स्पर्श, वास, दृष्टी वगैरे संवेदना वेगळ्या होत जातात. पण सिनेस्थीट्स मधे मात्र हे 'क्रॉस वायरिंग' पुष्कळदा तसंच रहातं. अनुवंशिक म्हणजे आईवडिलांकडून पुढच्या पीढीला पोचवल्या जाणार्‍या या विलक्षण सामर्थ्याबद्दल इंटरनेटवर नंतर मी जितकं वाचत गेलो तितका चकित होत राहिलो. आणि एके ठिकाणी वाचलेली ही दोन वाक्यं मला फार आवडली, "Synesthesia is 'abnormal' only in being statistically rare. It is, in fact, a normal brain process that is prematurely displayed to consciousness in a minority of individuals." दोनच वाक्य, पण विचार करायला लावणारी, त्या इवल्याश्या मूठभर आकाराच्या मेंदूच्या अफाट ताकदीची चुणूक दाखवून देणारी!

हं, म्हणजे हे "बुद्धीमताम् वरिष्ठाम्" प्रकरण अशा मूर्त स्वरूपात अस्तित्वात आहे तर! माझे विचार पुन्हा सुरु. एखाद्याला लाल हिरवे रंग वेगळे ओळखता येत नसतील. तो दोष मानला आणि हे रंग ओळखू येणारे निर्दोष मानले तर या रंगांबरोबरच त्यांची चवही जाणवणारे अधिक बुद्धीमान मानावे लागतील!

नुकताच अजून एक कार्यक्रम पाहिला. मिशिगन मधे राहणार्‍या सिंडीला सतत नैराश्याने घेरलेलं असायचं. खास कारण नसतानाही ती सदैव दुःखी, खिन्न असायची. कुठल्याही औषधाने, मानसोपचरांनी फरक पडत नव्हता. शेवटी ती व तिचा नवरा धाडसी निर्णय घेऊन एका अभूतपूर्व अशा प्रयोगाला तयार झाले. शास्त्रज्ञांनी सिंडीच्या मेंदूला ठराविक वोलटेजचे व ठराविक कालांतराने अतिसौम्य असे विद्युत झटके (electric shocks) देऊन बघायचे ठरवले. दहा वर्षांहून अधिक काळापासून असे झटके वापरुन पार्किन्सन्स किंवा उच्च रक्तदाबासारखे रोग नियंत्रणात ठेवण्यात डॉक्टरांना यश आलेलं आहे. पण अशा केसमधे मात्र हा प्रयोग करणं हे नवीन होतं. शस्त्रक्रिया सुरु असतांना डॉक्टरांनी सिंडीच्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागांवर (spots) हे झटके दिले असता तिची चर्या ताबडतोब बदलू लागत असे.
एका ठिकाणी ती अत्यानंदाने हसू लागत असे तर दुसर्‍या ठिकाणी हमसून रडू लागे. गेली वर्षानुवर्षे सदैव दुःखी असणारी ही बाई, हे विद्युतझटके दिल्यावर प्रथमच आनंदाने हसली. डोक्टरांनी आता शस्त्रक्रियेद्वारे ती बॅटरी व त्याला संलग्न असलेली यंत्रणा तिच्या डोक्याच्या कवटी (skull) मधे स्थापित (implant) केली आहे. आता मानसोपचार तज्ञाकडे गेल्यावर ते तज्ञ रिमोट कंट्रोलद्वारे आवशक्यतेनुसार तिच्या मेंदूला दिला जाणारा विद्युतप्रवाह हवा तेवढा वेळ नियंत्रित करतात. तिला, "आता तुम्ही कायम आनंदी राहण्याएवढा विद्युतपुरवठा होत राहील असे बॅटरीचे परिमाण निवडले आहे का?", असे विचारले असता तिचे उत्तर फार मार्मिक होते. ती म्हणाली की, "सतत नैराश्याला उपाय म्हणून जशी मी ही शस्त्रक्रिया करुन घेतली तशी मग सतत आनंदी राहण्यावर उपाय म्हणून परत दुसरी शस्त्रक्रिया करावी लागेल! दुःख, आनंद, राग, लोभ या सगळ्या भावभावनांशिवाय जीवनात वैविध्यच उरणार नाही. तेव्हा मला कायम आनंदी राहायचे नाही तर फक्त चारचौघांसारखे जगायचे आहे."

कित्येक मैल दूर आयोवा मधे राहणार्‍या केलीची गोष्ट आणखी निराळीच. तिच्यासाठी बाहेरचं जग म्हणजे अतिप्रदूषित जागा यापलिकडे काही उरलं नव्हतं. सतत स्वच्छतेची काळजी करणं आणि कुठल्याही वस्तू वा माणसांच्या स्वच्छतेविषयी चिंता करत बसणं याशिवाय तिला दुसरं काही सुचत नसे. Obsessive compulsive disorder (OCD) म्हणजे स्वैर भाषांतर करायचं झालं तर 'एखाद्या गोष्टीचं अती वेड, चळ असल्याचा मानसिक आजार' असल्यागत ती आपलं आयुष्य जगायचं सोडून साफसफाई करण्यात घालवू लागली. शेवटी फ्लोरिडामधे निष्णात तज्ञांच्या देखरेखीखाली केलीने सिंडीसारखीच शस्त्रक्रिया करवून घेतली. अपेक्षेपेक्षा अधिक लवकर बदलाव्या लागणार्‍या बॅटर्‍या सोडल्या तर केली आता अतिशय समाधानी आहे. "आता मी जगू शकते. कामाला जाऊ शकते, मुलांबरोबर स्वच्छतेची पर्वा न करता खेळू शकते!"

जगात आजपर्यंत केवळ पन्नास लोकांवर नैराश्य वा OCD वर उपाय म्हणून असे मेंदूला खोलवर उत्तेजना (deep brain stimulation) देण्याचे प्रयोग केले गेले आहेत.

पण तरीही खर्‍या अर्थाने आपले सगळे विचार, भाव, मनोवस्था, मूडस् हे एखाद्या रिमोट कंट्रोलने आता ठरवता येऊ शकतात! विकारांवर, वैगुण्यांवर मात तर गेली कित्येक दशकं आपण केली आहे. आता आपल्या मेंदूवरही आपण ताबा मिळवत आहोत!

हे सगळं पाहून असं वाटून गेलं की मर्त्य मानवाची ही झेप वायूवेगे झेपावणार्‍या मारुतीएवढी उंच नसेलही कदाचित, पण ती पाहून त्या सर्वशक्तीमान अशा हनुमंतालाही 'अणुपासोनी ब्रम्हांडाएवढा होत जातसे' हे सर्वार्थाने खरे ठरवणार्‍या त्याच्याच वंशावळीतील सुपुत्राचं कौतुक वाटल्याखेरिज राहिले नसणार! आपलाच "बुद्धीमताम् वरिष्ठाम्" चा वारसा मानवही पुढे नेतो आहे, या समाधानाने त्याचीही छाती अभिमानाने भरुन आली असणार!

- चाफा